"एका दिवसात दोन घाटवाटांसोबत दोन किल्ल्यांची डोंगरयात्रा"
ढाकगड, भीवगड या दोन किल्ल्यांसोबत गाळदेवी आणि बहीरी घाटवाटांचा ट्रेक हा खरं म्हणजे कमीतकमी दोन दिवसांचा आहे पण आम्ही फाल्कन्सनी तो एका दिवसातच करण्याचा घाट घातला होता. आत्तापर्यंत आम्ही सोबत अवघड असे बरेच ट्रेक्स केल्यामुळं प्रत्येकाच्या चालण्याचा वेग, कुवत एकमेकांना चांगलीच माहिती होती. एवढंच काय तर प्रत्येकाचं सामर्थ्य आणि कमकुवतपणा देखील एकमेकांना पक्का ठाऊक आहे. त्यामुळं हे सगळं एका दिवसात नक्की जमवता येईल याची खात्री वाटत होती. तरीपण आम्ही ठरवलेला ट्रेकचा सगळा प्लॅन वेळेत पूर्ण होण्याचं सगळं गणित पावसावर अवलंबून होतं. बहुधा त्यालाही आमची अडचण समजली असावी कारण रविवार २२ सप्टेंबर या ट्रेकच्या दिवसापूर्वी दोन दिवस आधीच तो पूर्णपणे उघडला होता. ट्रेक संध्याकाळी दिवस मावळायच्या आत संपवण्यासाठी सकाळी लवकर सुरु करणं गरजेचं होतं म्हणून आदल्या दिवशीच कुंडलेश्वरला मुक्कामी जायचं ठरवलं होतं. अर्थातच या सर्व दिवसभराच्या कार्यक्रमात पाऊस, वेळ वगैरे गोष्टी पाहून आयत्यावेळी थोडेफार बदल करावे लागणार होते आणि काय ते परिस्थितीनुसार आयत्यावेळी ठरवावे लागणार होते.
असा हा एक दिवसाचा भलामोठा ट्रेक खरं म्हणजे प्रचंड तंगडतोडीचा होता तरीही कायमचा आठवणीत राहील अगदी असाच झाला. त्यासाठी कुंडलेश्वर मुक्कामासाठी सगळेजण शनिवारी रात्री घरून जेवण करूनच निघालो. तसं चिंचवड ते जांबिवली हे अंतर काही फार नाही तरीसुद्धा पुणेकर मंडळी सोमाटणे फाट्याला पोहोचेपर्यंत सोमाटण्याच्या येवलेंकडं एक चहाथांबा झालाच. नंतर बाकी पुढे कुठेही न थांबता थेट कुंडलेश्वर मुक्कामी पोहोचलो. गाडीतून सामान उतरवून दुसऱ्या दिवसाच्या सूचना दिल्या. कितीही गडबड केली तरी झोपायला रात्रीचे साडेबारा वाजलेच.
ट्रेक सुरू करण्यापूर्वी नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची भाजी आम्ही स्वतः बनवणार होतो त्यामुळं सकाळी पाचलाच उठावं लागणार होतं. त्यामुळं तशी झोप कमीच मिळणार होती म्हणून फार वेळ वाया न घालवता लगेचच झोपून टाकलं.
लगेचच झोपलो खरं पण पहाटे साडेतीन-चार वाजता काहीजण मंदिरात आले आणि त्यांनी अगदी जोरजोरात घंटा वाजवून दर्शन घेतलं. मग काय सगळ्यांच्याच झोपेचं पार खोबरं झालं. त्यानंतरही थोडा वेळ तसंच लोळत पडलो खरं पण झोप काही येईना म्हणून मग उठून शेवटी आवरायलाच घेतलं. सकाळची आन्हीकं उरकून नाश्त्यासाठीची कांदाबटाटा रस्साभाजी आणि जेवणासाठी डब्यातून सांडू नये म्हणून मटकीची सुकी उसळ आमच्या नेहमीच्या बल्लवाचार्यांनी म्हणजेच अर्जुन ननावरेंनी बनवली.
नाश्ता आणि जेवणासाठी पोळ्या प्रत्येकाला घरूनच आणायला सांगितलेल्या होत्या. त्यातल्या नाश्त्यासाठीच्या आणलेल्या सोबत घेऊन मंदीराबाहेरच्या प्रांगणात भरभक्कम पोळीभाजीचा नाश्ता केला आणि वर स्पेशल चहा प्यायला.
'आधी पोटोबा मग विठोबा' प्रमाणं नाश्ता झाल्यावर नेहमीप्रमाणे कुंडलेश्वराची आरती केली आणि कुंडलेश्वर सोडलं. या शंकराला कुंडेश्वर किंवा कोंडेश्वर असंही म्हणतात पण मंदीरामागच्या कुंडली नदीला लागून असलेलं शिवालय म्हणून याला कुंडलेश्वर हे नाव जास्त योग्य वाटतं. अर्थात 'नावात काय आहे'? असं शेक्सपियर सांगून गेलाच आहे की. होय की नाही?
ढाक बहिरीकडे जाताना सह्यधारेवरून 'बहिरी' घाटवाटेच्या पायथ्यातलं सांडशी तर त्याच्याच शेजारी मांजरसुंब्याला चिकटून 'दारचा माळ' घाटवाट उतारणारं सालपे दिसत होतं. मांजरसुंब्याच्या मागे किल्ले राजमाची, ड्युक्सनोज ऊर्फ नागफणी, खंडाळा तर त्याच्या थोडं उजवीकडं किल्ले इर्शाळ, माणिक, प्रबळ आणि अलिकडचं माथेरान सुध्दा स्वच्छ दिसत होतं. या माथेरानच्या दक्षिण टोकाकडे असलेल्या चौक पॉईंट खालून अलेक्झांडर आणि रामबागचा ट्रेक नुकताच म्हणजे गेल्या रविवारीच केला होता त्याच्या आठवणी क्षणार्धात डोळ्यासमोर आल्या.
गडदच्या बहिरीची वाट पायाखालचीच असल्यामुळं कळकराय खिंडीखालच्या वाटचौकात अगदी झटक्यात पोहोचलो.
आता इथून ढाक गाव गाठण्यासाठी आमच्यापुढे एकूण दोन पर्याय होते. पहिला म्हणजे सरळ चढून कळकराय खिंड गाठायची. खिंडीतुन सुरवातीला छोटंसं कातळारोहण करून ढाकगड चढून जायचा. गडावरच्या पाण्याच्या टाक्या वगैरे पाहून ढाक गावाकडील बाजूला उतरायचं आणि ढाक पठारावरून चालत ढाक गाव किंवा गारूआई मंदिर गाठायचं. अर्थात पाऊस असेल तर ढाकगडावर कळकराय खिंडीतल्या कातळटप्प्यावर निसरडं होतं हे गेल्यावर्षी मी स्वतः अनुभवलं होतं त्यामुळं तिथून जाणं अजिबात शक्य झालं नसतं. म्हणून मग याला दुसरा सोपा पर्याय वापरून खिंडीखालच्या वाट चौकातून ढाकगडाला उजवीकडून वळसा घालून थेट ढाक गाव गाठावं लागणार होतं. पण दुसऱ्या पर्यायात आम्हाला ढाकगड काही पाहता येणार नव्हता. आमचा हा सगळा जरतरचा खेळ पूर्णपणे पावसावर अवलंबून होता. तसं पावसाने नुकतीच दोन दिवस उघडीप दिली होती त्यामुळंच ढाकचा किल्ला पाहता येईल अशी ट्रेकला निघताना अंधुकशी आशा वाटत होती आणि झालंही अगदी तसंच. पाऊस अजिबात नसल्यानं कातळटप्पा पूर्णपणे कोरडा होता आणि त्यावर कातळारोहण करणं सहज शक्य होणार होतं. तसा हा कातळटप्पा फार काही अवघड नाहीये. अगदी रोप लावला नाही तरीसुद्धा चालण्यासारखं होतं तरीसुद्धा 'सेफ्टी फर्स्ट' ची सवय प्रत्येक ट्रेकरने स्वतःला प्रयत्नपूर्वक लावून घ्यायलाच हवी. नाही का? म्हणूनच कातळारोहण करून वरच्या बाजूला सेफ्टी रोप लावला आणि बाकीच्या सर्व भिडूंना खिंडीतून वर घेतलं.
आता आडवं जात ढाकगडाच्या माथ्यावर पोहोचायचं होतं. डाव्या बाजूला चढ तर उजव्या बाजूला खोल दरी होती अशा जागेवरून आम्हाला वाट शोधत चढत जायचं होतं. पावसाळा नुकताच झाल्यामुळं प्रचंड वस्पटी होती. ढाकगडावर नेमकं कुठं चढून जायचंय हे पक्कं ठाऊक असल्यामुळं तसा फारसा फरक पडणार नव्हता. अर्थात वस्पटी असल्याचा अशा अवघड वाटेवर फायदाच जास्त होतो. सर्वजण सोबतच आहेत याची खात्री करत करत गडाच्या माथ्यावर पोहोचलो.
इथून गडाच्या पश्चिमेकडच्या धारेवरून किंवा पूर्वेकडच्या पोटातुन कुठूनही जाऊन ढाक पठारावर उतरता येतं. आम्ही आपली पोटातली वाट निवडली. तिने जात असताना वाटेत लागलेल्या ओढ्यावर थोडी विश्रांती घेतली. पाऊस अजिबात नसल्यामुळं समोरच खांडीचा भाग, ठोकळवाडी जलाशय, कुसुर घाट, भीवपुरी कँप, थोडं मागे तासुबाई रांग, वांद्रे खिंड आणि नाखिंद्याजवळच्या पवनचक्क्या स्पष्ट दिसत होत्या.
पुढे जात एका ओढ्यात असलेल्या किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्यांच्या समुहापाशी पोहोचलो. खरं म्हणजे ही जागा थोडी आडबाजूला असल्यामुळं चटकन सापडण्यासारखी नाही पण या अगोदर दोनचार वेळेला किल्ल्यावर येऊन गेल्यामुळं ती सापडायला फार काही त्रास झाला नाही.
किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आणि थोडीफार तटबंदी सोडली तर फारसं काही शिल्लक नाही. जे काय आहे तेवढं पाहिलं आणि ढाक पठाराकडे निघालो. वाटेतुन उजवीकडे एक मोठा धबधबा डोळ्याला सुखावून गेला.
थोडा पाऊस उघडला की सोनकीला बहर येतो. सगळीकडं पिवळं धमक दिसू लागतं. ढाक पठारावर उतरताना ही वाटेतली सोनकी लक्ष वेधून घेत होती.
पठारावरच्या भातशेती जवळून जाताना तांदुळाचा सुवास मन प्रसन्न करून गेला.
अशा या धुंद वातावरणात 'एक कप चाय तो बनती ही है ना भीडू'? चहाला अमृत का म्हणतात ते अशा वातावरणात चांगलंच समजतं.
किल्ल्यावरून उतरल्यावर वाटेतल्या विहिरीपासून उजवीकडे वळून गावात न जाता सरळ ढाकगाव बायपासने आम्ही थेट गारूआई मंदिराच्या रस्त्याला लागलो होतो. त्यामुळं मग उजवीकडून गावातून आलेली आणि डाव्या बाजूला गाळदेवीकडे गेलेली वाट ओलांडून समोरच्या गारूआई मंदिरात गेलो. या वाट नाक्यावर एक गंमत बघायला मिळाली. समोर मंदीरात असलेल्या गारूआईला फुलं आणि उदबत्त्या या वाटनाक्यावरच वाहलेली दिसली. खरं म्हणजे या नाक्यापासून मंदीर अगदी हाकेच्या अंतरावर आहे तरी सुद्धा गावातले लोक थोडी वाट वाकडी करून मंदीरात जायचे कष्ट का घेत नाहीत ते काही कळलं नाही. गावात चौकशी केली असती म्हणजे नक्की काय ते कळलं असतं, असो. मंदीरातल्या गारूआईचं मनोभावे दर्शन घेतलं. मंदीराच्या जवळच दोन स्मारक शिळा पडलेल्या दिसल्या. मंदीराचा बाज जरी जुना असला तरी सभामंडप बाकी नवीन बांधलेला आहे. पण काहीही असलं तरी एकंदरीत आपल्या सारख्या भटक्यांना ही जागा मुक्कामासाठी बाकी भन्नाट आहे हे मात्र नक्की.
मंदीरात दर्शन घेऊन पुन्हा वाटनाक्यावर आलो आणि उजवीकडे वळून गाळदेवी घाटवाटेला लागलो. आता ही मळलेली वाट आम्हाला भीवगड आणि पुढे वदप किंवा गौरकामतपर्यंत घेऊन जाणार होती.
या गाळदेवी घाटवाटेतुन थोडं खाली उतरल्यावर एक छोटी वाट डावीकडे धारेवर असलेल्या कळकरायवाडीत उतरते. कळकरायवाडीची वाट खुपच कमी वापरात असलेली आहे त्यामुळं फारशी मळलेली नाही. या कळकरायवाडीतुन सरळ सांडशीत उतरता येतं. आम्हालाही कळकरायवाडीच्या या वाटेने सांडशी गाठता आली असती पण मग आमचा भीवगड बघायचा राहून गेला असता. याच वाटेने ढाक गावच्या लोकांनाही सांडशी गाठता येऊ शकतं पण सांडशीपेक्षा वदपपासून कर्जत हे बाजाराचं ठिकाण खुपच जवळ आहे. अर्थातच रस्ते वाहतुक सुध्दा सांडशीपेक्षा वदपला थोडी जास्तच आहे त्यामुळं ढाकचे गावकरी सरळसोट वदपलाच उतरतात. बाजाराचं ठिकाण कर्जत असल्यामुळं कोणत्याही वाटेने बाजारासाठी जाऊनयेऊन कमीतकमी पाचसहा तासांची पायपीट तर करावीच लागते त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत ढाक गावातली बरीचशी लोकं कर्जत वगैरे भागात विस्थापित झाली आहेत. नवीन पीढी ढाकसारख्या दुर्गम गावात राहण्यासाठी इच्छूक नसल्यामुळं अर्धे ढाकगाव मोकळे झालेय असं डोक्यावरून लाकडाची मोळी ढाकवरून घेऊन वदपला विकायला निघालेल्या एका ढाकच्या गावकर्यानंच सांगितलं. एवढंच नाही तर कोकणातल्या वदप, गौरकामतकडचे लोक घाटमाथा चढून जाऊन ढाक गावाची भातशेती अर्धाईने करायला घेतात. एकूणच सह्याद्रीतल्या अशा दुर्गम गावांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. सध्या अशा गावात थोडीफार वस्ती आहे तरी पण अजून काही दिवसांनी मात्र ही सगळी गावं ओस पडतील एवढं बाकी नक्की.
गाळदेवी घाटवाट अर्धी उतरल्यावर एका सोंडेवर येते आणि मग सरळ त्या सोंडेवरुनच खाली उतरते. नेमका या सोंडेच्या पायथ्याशी भीवगड आहे. हा भीवगड बहूतेक गाळदेवी घाटवाटेवर नजर ठेवण्यासाठीच बांधला गेला असावा.
भीवगडावर खुप गर्दी दिसत होती. चौकशी केल्यावर असं कळलं की मुंबईहून वदपमार्गे जवळजवळ दिडशे लोक हा भीवगड पाहण्यासाठी आलेत. डोंगरदर्यात, निसर्गात भटकणार्या आमच्यासारख्या भटक्यांना त्या लोकांच्या भाऊगर्दीत काही फारवेळ काढणं शक्य होणार नव्हतं त्यामुळं गडावरची होती तेवढी ठिकाणं पटापट पाहिली, फोटो काढले आणि गौरकामतकडच्या बाजूला उतरलो. गौरकामतकडे उतरल्यामुळं आमचे तीन फायदे होणार होते. पहीला म्हणजे उतरताना वाटेत मुंबईकरांची गर्दी लागणार नव्हती, दुसरा म्हणजे गौरकामतकडची कातळकोरीव वाट पाहता येणार होती तर तिसरा फायदा म्हणजे गौरकामतचा बसस्टॉप किल्ला उतरल्यावर वदपपेक्षा बराच जवळ आहे त्यामुळे आमचं चालणं आणि वेळ हे दोन्ही वाचणार होतं.
भीवगड उतरून आल्यावर बसस्टॉपवर असलेल्या एका किराणा दुकानदाराला लोकल जीपबद्दल विचारलं. आम्ही एवढं चालून आलोय आणि आमच्याकडे वेळ कमी आहे म्हटल्यावर त्यानं माणशी भाडं, एका रिक्षात किती लोक नेतात वगैरे सगळी इत्यंभूत माहिती दिली आणि एका रिक्षावाल्याला फोन करून लगेचच बोलवूनही घेतलं. या सगळ्या रिक्षा कर्जत स्टेशनपर्यंत जातात पण आम्हाला तर उल्हासपुलाच्या अलिकडे वळून सांडशी गाठायची होती म्हणून मग आमच्याच रिक्षावाल्याला सांडशीला सोडण्यासाठी पटवलं. तोही फरसे आढेवेढे न घेता लगेचच तयार झाला. कर्जतला जाताजाता वाटेतच भाडं ठरवून थेट सांडशीलाच पायऊतार झालो.
सांडशी चौकातून उजवीकडे वळल्यावर एक पुल आहे त्यावरून सालप्यात जाता येतं. या पुलाच्या बाजूलाच शाळा आहे त्या शाळेत बसून दुपारचं जेवण उरकलं आणि थोडा आराम केला. घाटवाट चढून जाण्यापूर्वी तो अत्यंत गरजेचा होता.
शाळेमागे असलेली नदी ओलांडली आणि वीटभट्टीशेजारून धनगरवाडा गाठला. बहुतेक ट्रेकर्स अशा वाड्यावस्त्यातल्या मुलांना गोळ्या-चॉकलेट वाटतात पण बरोबरचा जितेंद्र परदेशी प्रत्येक ट्रेकला मुलांना शाळेसाठी गरजेच्या वस्तू वाटतो. खरंच त्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
भातशेती शेजारुन वाट सह्याद्रीच्या मुख्य रांगेकडे निघाली होती. आकाशात ढगांची गर्दी जमु लागली होती. साहजिकच सगळ्यांचे कॅमेरे सॅकमधे गेल्यामुळं इथून पुढचे फोटो काही काढता आले नाहीत.
भातशेती संपून वाट सह्याद्रीच्या मुख्य रांगेला भिडली आणि चढू लागली. वाट अतिशय मळलेली पण खडी चढाईची होती. खड्या चढाईच्या वाटेचं एक बरं असतं की अशा वाटांनी पटकन माथ्यावर पोहोचता येतं. ढगाळलेलं वातावरण त्यात गच्च झाडी त्यामुळं खुपच काळवंडलं होतं. फारसं कुठं न थांबता बहिरी गुहेखालच्या पदरात पोहोचलो.
इथून पुढं आम्हाला एकूण तीन वाटांनी कुंडलेश्वर गाठता येणार होतं. पहिली वाट म्हणजे सरळ बहिरी गुहेच्या वाटेनं जायचं, पायर्या चढून गुहेकडे न जाता उजवीकडे वळून कळकराय खिंड गाठायची आणि मळलेल्या वाटेनं कुंडलेश्वरला यायचं. दुसरी वाट कळकराय सुळक्याला वळसा घालून वाट चौकात येते तिने पहिल्या म्हणजेच बहिरी गुहेच्या वाटेच्या वाटेला लागून कुंडलेश्वर गाठायचं तर तिसर्या वाटेनं म्हणजे पदरातुन आडवं जात सवाष्णी घाटाने थेट कुंडलेश्वर जवळच्या धारेला लागायचं आणि कुंडलेश्वर गाठायचं. या तीनही वाटांमधे सर्वात सोईची आणि निर्धोक वाट पहिली होती. पण पहिली आणि दुसरी या दोन्ही वाटा जास्त लांबीच्या आणि चढ-उतार जास्त असलेल्या होत्या. तर तिसरी सवाष्णी घाटाची वाट जवळची पण प्रचंड दृष्टीभय असलेली आणि अगदीच निमुळती होती. म्हणजे ट्रेकर्सच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी 'एक टप्पा आऊट' अशी होती.
अंधार पडत चालला होता त्यामुळं तिसर्या वाटेनी जाणं तसं धोक्याचं होतं पण न थांबता गेलो तर अंधार पडण्यापूर्वी माथा गाठणं शक्य होणार होतं. सगळेजण प्रचंड दमले होते तरीपण अंतर कमी असल्यामुळं सर्वानुमते तिसर्या वाटेचाच पर्याय निवडला आणि कुठेही न थांबता थेट कुंडलेश्वर जवळच धार गाठली. अंधार पडण्यापूर्वी कसंही करून कुंडलेश्वर गाठायचंच होतं म्हणून सांडशी सोडल्यापासून फारसं कुणीही आणि कुठेच विश्रांतीसाठी थांबलं नव्हतं. माथा गाठल्यावर बाकी सगळ्यांच्या मनावरचं दडपण अगदी हलकं झालं आणि मग काय सगळ्यांनी दहा मिनिटे चक्क झोप काढली. एक प्रचंड तंगडतोडीचा ट्रेक कोणतीही वाईट घटना न घडता अतिशय उत्तमप्रकारे पार पडला होता. इथून कुंडलेश्वर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. आम्हाला घरी पोहोचवणारी गाडी पण समोर दिसत होती मग बाकी सगळ्यांनाच घरचे वेध लागले त्यामुळं अगदी चहाथांबाही न घेता थेट चिंचवड गाठलं आणि ट्रेकची सांगता केली.
फोटो सौजन्य -
नितिन फडतरे
महादेव पाटील
रवि मनकर
उमेश माने
जितेंद्र परदेशी
मिलिंद गडदे
दयानंद अडाळे
साहेबराव पुजारी