मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

"पावनखिंड"

"पावनखिंडीची लढाई नेमकी कुठे झाली?"


       'पावनखिंड' म्हटलं की डोळ्यासमोर चटकन उभी राहते ती म्हणजे बाजींची रक्तरंजीत लढाई. बाजींच्या पावनखिंडीची ही गोष्ट इतिहासात तिथीनुसार आषाढ पोर्णिमेला म्हणजेच गुरूपोर्णिमेला घडली तर तारखेनुसार महाराज १२ जुलै १६६० च्या रात्री विशाळगडाकडे जायला निघाले. १३ तारखेला सकाळच्या पहिल्या प्रहरात पांढरपाण्याजवळ लढाईला प्रत्यक्ष तोंड फुटलं. पाठलागावर आलेल्या सिद्दी मसूदची धडकच इतकी जोरदार होती की पांढरपाण्याला सुरू झालेली ही लढाई साधारणपणे दिवसाच्या शेवटच्या प्रहरापर्यंत म्हणजे जवळजवळ १२ तासानंतर मागे सरकत शेवटी पावनखिंडीपर्यंत पोहोचली.

       एवढया वेळात महाराज पुढे विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले आणि सुर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकरांचा वेढा फोडून गडावर पोहोचले. गडावर पोहोचताच तोफेला इशाऱ्याची बत्ती दिली आणि तिकडे घोडखिंडीत बाजी, फुलाजींनी प्राण सोडले.

 

       आपल्या सर्वांनाच माहिती असलेली पावनखिंडीच्या लढाईची गोष्ट साधारण अशी आहे. या गोष्टीला अनुसरून बहुतेक ट्रेकर्स पन्हाळगड ते विशाळगड अशी 'धारातीर्थ मोहिम' करतात अगदी तशीच आम्ही फाल्कन्सनी देखील पुन्हा एकदा केली. इतिहासात घडून गेलेल्या एखाद्या गोष्टीचा मागोवा घेत डोंगरयात्रा करणं म्हणजे एक सुंदर अनुभुती असते. आम्हा फाल्कन्सचा तो नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे मग ते उंबरखिंड असो, सिंहगड ते उमरठ असो, रायरेश्वर ते प्रतापगड असो किंवा अगदी पन्हाळगड ते विशाळगड असो. आमच्यातले बरेच जण आम्ही या ट्रेकला जाण्यापूर्वीसुद्धा सध्या जिथं पावन खिंड दाखवली जाते तिथं आधी जावून आले होते त्यामुळं ट्रेक दरम्यान बहूतेकांनी मला आत्ता जिथं पावनखिंड स्मारक उभारलं आहे तिथंच लढाई झाली होती का? तीच पावनखिंड आहे काय? असे प्रश्न विचारले होते पण मला तेव्हा त्यांना सगळे पुरावे दाखवता आले नव्हते. वरील गोष्टीच्या जास्तीतजास्त जवळ असलेल्या समकालीन दस्तऐवजाचा म्हणजे जेधे करीण्यातला 'गनीम चढो दिल्हा नाहीं' चा संदर्भ मी लगेचच दिला आणि पन्हाळगडाहून विशाळगडाकडे जातानाचा हा उल्लेख सध्याच्या पावनखिंड स्मारकाच्या भौगोलिक परिस्थितीशी साम्य दर्शवितो काय? ते तुम्ही स्वतः ताडून पहा असं देखील त्यांना म्हटलं. सध्याच्या पावनखिंड स्मारकापाशी पोहोचल्यावर सोबतच्या सर्वांचंच उत्तर अर्थात 'नाही' असंच होतं. मग बाजींची लढाई झालेली पावनखिंड नेमकी आहे तरी कुठं? हा प्रश्न शेवटी उरला होताच. याबाबत समकालीन साधनं काय सांगतात ते पाहूया.


🚩 १) जेधे करिणा - महाराज पन्हाळगडावरून उतरून विशाळगडाकडे येऊ लागले तेव्हा सिद्दी जौहर पाठलागावर आला. महाराजांना ही बातमी कळल्यावर त्यांनी बांदलांचा जमाव आणि बाजीप्रभू यांना गजापूरच्या घाटीजवळ ठेवून ते स्वतः विशाळगडाकडे गेले असं जेधे करिण्यात म्हटलं आहे. बाजीप्रभूंनी गनीमाला चढू दिलं नाही आणि सिद्दी जौहर माघारी गेला. सध्या जिथं पावनखिंड दाखवली जाते तिथंपासून गजापूर रस्त्याने १३ किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय 'गनीम चढो दिल्हा नाहीं' हे वर्णनही सध्याच्या पावनखिंडीशी जुळून येत नाही.



🚩 २) जेधे शकावली - शकावलीत दिलेली तारीख घडून गेलेल्या गोष्टीशी जुळती आहे पण बाजीप्रभूंची पावनखिंडीत किंवा घोडखिंडीतच लढाई झाली असं मात्र कुठंही म्हटलेलं नाही. शकावलीत बाजी प्रभू देश कुळकर्णी ठार झाल्याचा बाकी स्पष्ट उल्लेख आहे.

 

🚩 ३) शिवभारत - शिवभारताच्या २७ व्या अध्यायात महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर गेल्याचा उल्लेख आहे. महाराजांनी सात प्रहरात पाच योजने म्हणजे ४० मैल किंवा ६४ किलोमीटरचं अंतर पार करून विशाळगड गाठल्याचा उल्लेख आहे. महाराज पन्हाळगडावरून निसटून विशाळगडावर निघाल्याची बातमी सिद्दी जौहरला कळल्यावर तो मसूदला म्हणाला की शिवाजी महाराज विशाळगडावर फार काळ थांबणार नाहीत त्यामुळं तु घाई कर. जौहरच्या आदेशावरून मसूद पाठलागावर निघाला पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं त्याच्या घोड्यांचे पाय गुढघ्यापर्यंत चिखलात रूतले. त्याचं पायदळ शेवाळ्यातून वाट काढू लागलं. मसूद आलेला पाहून विशाळगडावर असलेले पराक्रमी शिवाजीराजे लढण्यास सिद्ध झाले. विशाळगडावर जाताना जसवंतराव दळवी आणि सुर्यराव सुर्वे हे महाराजांना अडवू शकले नव्हते पण याच दळवी आणि सुर्वेंना आता मसूद येऊन मिळालेला पाहताच महाराज अतिशय चिडले. महाराजांनी गडावरून हे पाहताच आपलं सैन्य त्यांच्यावर पाठवलं. या सैन्याला दळवी, सुर्वे आणि मसूदचं एकत्रित सैन्यही थोपवू शकलं नाही. 'कोवळ्या गवताने अत्यंत हिरवीगार असलेली ती विशाळगडाच्या लगतची भूमी शत्रूवीरांच्या रक्ताने एकदम लालभडक झाली' असा उल्लेख शिवभारतात आला आहे.





🚩 ४) ९१ कलमी बखर - प्रस्तुत बखर मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिविस यांनी 'तारीख ए शिवाजी' या मूळ पर्शियन ग्रंथावरून लिहिलेली असून पहिल्यांदा ही बखर वि.का. राजवाडेंनी प्रभात मासिकामधे प्रसिद्ध केलेली होती. नंतरच्या काळात भारतवर्षात प्रसिद्ध केलेली त्रुटीत ९१ कलमी बखर, काव्येतिहास संग्रहात साने यांनी प्रसिद्ध केलेली महाराष्ट्र साम्राज्याच्या छोट्या बखरीतील शिवछत्रपतींची कारकीर्द, फॉरेस्टस सिलेक्शन्स या ग्रंथात आरंभीच छापलेले या बखरीचे फ्रिजेलकृत भाषांतर आणि मॉडर्न रिव्यू या मासिकात सर जदुनाथ सरकार यांनी छापलेले तारीख ए शिवाजी या फारसी बखरीचे इंग्रजी भाषांतर एकत्रित करून २२ ऑक्टोबर १९३० साली वि. स. वाकसकरांनी ती पुनः प्रकाशित केली. यामधे त्यांनी पारसनीस, वि.का. राजवाडे, साने, फॉरेस्ट आणि सर जदुनाथ सरकार यांनी बखरीवर लिहिलेल्या पृथकांचे एकत्रिकरण केले त्यामुळे त्याचा तौलनिक अभ्यास करणं अत्यंत सोईचं झालं. भारतवर्ष, राजवाडे, साने, फॉरेस्ट आणि सरकार या सर्वांनी पन्हाळगडावरून महाराज निघाल्यावर पुढे बाजीप्रभूंनी दिड प्रहरापर्यंत खिंड चढू दिली नाही अशा आशयाचाच उल्लेख केला आहे पण त्यांनीही लढाईची नेमकी जागा सांगितलेली नाही. प्रत्येकाच्या सैन्यसंख्येतही फरक आहे आणि बाजींवर चालून आलेल्या सरदारांच्या नावातही.

भारतवर्ष

भारतवर्ष

राजवाडे

राजवाडे

साने

साने

फाॕरेस्ट

फाॕरेस्ट

जदुनाथ सरकार

जदुनाथ सरकार

       याशिवाय बांदलांच्या तकरीरमधेही बांदलांचे लोक आणि बाजीप्रभू विशाळगडावरून उतरून शत्रूशी भांडले असंच म्हटलं आहे.

       वरील समकालीन साधनांत असलेल्या वर्णनावरून शेवटी एक प्रश्न उरतोच तो म्हणजे 'लढाई नेमकी कुठे झाली?' बहुतेक साधनांत बाजीप्रभू विशाळगडावरून उतरून गजापूरजवळ आले आणि तिथं झुंज दिली असं म्हटलं आहे पण ते तरी खरं कशावरून? आता मी स्वतः भूगोलाचा विद्यार्थी असल्यामुळं उपलब्ध साधनांत असलेल्या पुराव्यांशी मी सांप्रतच्या भूगोलाला ताडून पाहिल्यावर मलाही ते काही पटलेलंच नाहीये. का पटलेलं नाही तर तेही आता उपलब्ध साधनांतील वर्णनाचा आधार घेऊन भूगोलाच्या कसोटीवर ताडून बघू. पण त्यासाठी आधी विशाळगडाचा भूगोल जाणून घेणं गरजेचं आहे.


...तर असा आहे विशाळगडाचा भूगोल.



       विशाळगड हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडासा सुटावलेला आहे मात्र तो एका छोट्या खिंडीद्वारे मुख्य रांगेला जोडलेला देखील आहे. या खिंडीतून म्हणजे सध्या जिथे लोखंडी पुल आहे तिथून दोन घाटवाटा कोकणात उतरतात. या दोन घाटवाटा अनुक्रमे उत्तरेकडील देवडे तर दक्षिणेकडील प्रभानवल्ली गावात उतरतात. या दोन्ही घाटवाटांना 'विशाळगड घाटवाट' असंच म्हटलं जातं.

       विशाळगड जसा सह्याद्रीच्या मुख्य रांगेला एका छोट्या खिंडीद्वारे जोडलेला आहे तसंच विशाळगडाच्या पश्चिमेकडे अगदी चिकटून 'माचाळ' गाव वसलेलं माचाळचं पठार सुद्धा एका छोट्या खिंडीद्वारे विशाळगडाला जोडलेलं आहे. प्रशासकीय दृष्ट्या विशाळगड कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालूक्यात आहे तर माचाळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालूक्यात आहे. विशाळगडाला चिकटलेली पश्चिमखिंड कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा एका छोट्या खिंडीद्वारे विभागते.

       रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या पलिकडच्या माचाळवरून अजून एक 'मुचकुंद' नावाची घाटवाट मुचकुंद ऋषींच्या गुहेपासून कोकणातल्या साखरप्यात उतरते. वर उल्लेखलेल्या दोन विशाळगड आणि तिसरी मुचकुंद अशा तीनही घाटवाटा आजही व्यवस्थित वापरात आहेत.

       विशाळगडाचे भौगोलिक स्थान पाहता त्याला वेढा घालणं तर अशक्यच आहे. फारफार तर विशाळगडाची मुख्य रांगेकडची बाजू आहे त्या बाजूकडे मोर्चे लावून विशाळगडावरचा प्रवेश बंद करता येऊ शकतो आणि दळवी, सुर्वेंनी तेच केलं होतं. आता उपलब्ध पुराव्यांनुसार जर महाराज विशाळगडात असतील आणि दळवी, सुर्वेंच्या सैन्यामुळं लोखंडी पुलापासून देवडे आणि प्रभानवल्ली या दोन घाटवाटांनी निसटणं जरी शक्य झालं नसेल तरी तिसरी मुचकुंद घाटवाट सुर्वे आणि दळवी बंद करू शकतच नाहीत.


आता माझ्या या काही शंका आहेत...


१) पन्हाळगडाहून विशाळगडला जाताना आणि शेवटी गडाखालची खिंड चढताना बाजीप्रभूंची लढाई झाली का?

२) गडावर सुरक्षित असताना आणि तिसऱ्या घाटवाटेने निसटून जाणे सहजशक्य असताना महाराज गडाखाली आपल्या माणसांना विनाकारण जाया करण्यासाठी पाठवतील का?

३) महाराजांना पहिल्या दोन घाटवाटांपैकी एखादी वाट वापरण्याची किंवा घाटमाथ्यावरूनच राजगडला जाण्याची निकड भासली म्हणून बाजीप्रभूंना वाट मोकळी करण्यासाठी खाली खिंडीत पाठवले असेल का?


       सध्या जी पावनखिंड म्हणून दाखवतात ती पावनखिंड नाही असं माझंही स्पष्ट मत आहे. या विषयावर मु. गो. गुळवणी यांनी त्यांच्या 'पन्हाळगड ते विशाळगड' पुस्तकात विवेचन केलं आहे. त्या परिसरात एकूण पाच खिंडी आहेत. पावडाई खिंड, येळवण जुगाई खिंड, घोडखिंड, मलकापूर बाजूने येणारी खिंड आणि मुख्य रांगेवरची विशाळगडाला जोडलेली खिंड. 'गनीम चढो दिल्हा नाहीं' या वाक्याशी संबंधीत या पाचपैकीच एखादी खिंड असावी काय? अर्थात लढाई कुठे झाली यावर एकमत झालेलं नसलं तरी त्यामुळं बाजी आणि त्यांच्या बांदलसेनेचं कर्तूत्व तिळमात्रही कमी होत नाही हेही तितकंच खरं. शेवटी वर दिलेल्या कोणत्याच पुराव्यात एकवाक्यता दिसून येत नसल्यामुळं प्रत्येकाने वैयक्तिकपणे आपलं मत बनवून आपल्यापुरतं ठेवावं असं मला वाटतं.


       इतिहासाच्या ठळक गोष्टींत वाद कधीच नसतो, वाद असतो तो त्याच्या तपशीलात त्यामुळं लढाई कुठे झाली यात जरी इतिहास संशोधकांत एकवाक्यता नसली तरी लढाई झाली आणि त्यात बाजींना वीरमरण आलं यात मात्र एकवाक्यता आहे. अर्थात हेही नसे थोडके. बरोबर ना? मग लढाई नेमकी कुठे झाली? पावनखिंड स्मारक उभारलं आहे तिथंच लढाई झाली होती का? तीच पावनखिंड आहे का? ऐतिहासिक साधनांतले उल्लेख सध्याच्या स्मारकाशी जुळतात का? वगैरे वादात पडण्यापेक्षा आपण 'पन्हाळगड ते विशाळगड' भटकंतीचा मनमुराद आनंद घेत राहू. नको त्या वादात पडण्यापेक्षा ते जास्त चांगलं. नाही का?


बहुत काय लिहिणें । आपण सुज्ञ असा।

लेखनसीमा ।।


🚩 पावनखिंडीच्या लढाईवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेला, राष्ट्रीय किर्तनकार चारूदत्त आफळेंनी गायलेला आणि वीररसांनी भरलेला पोवाडा या धाग्यावर टिचकी मारून ऐकता येईल.


🚩 संदर्भ -

१) जेधे करिणा

२) जेधे शकावली

३) शिवभारत

४) ९१ कलमी बखर


🚩 फोटो - आंतरजालावरून साभार.


🚩 🚩