मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

"मावळ म्हणजे काय?"

"मावळ म्हणजे काय?"



       छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात शुन्यातुन स्वराज्य उभं केलं. मराठेशाहीचा पायाच त्यांनी इतका मजबूत घातला होता की ते पूर्णपणे लयास जाण्यासाठी पुढची तब्बल दोनशे वर्षे जावी लागली. अशा स्वराज्याचा पाया घालण्यापासून ते त्याचा विस्तार करण्यापर्यंत पुण्याच्या आसपास असणाऱ्या मावळातल्या देशमुख-देशपांडेंची त्यांना अत्यंत मोलाची साथ लाभली. मोगल सरदार 'शास्ताखान' प्रकरण असो किंवा सिध्दी जौहरच्या वेळचे 'पन्हाळगड ते विशाळगड' असो, काटक असणाऱ्या मावळ्यांची साथ त्यांना कायमच लाभली. अफजलखान प्रकरणात मावळातल्याच कान्होजी जेध्यांनी त्यांच्या सगळ्या वतनावर पाणी सोडल्याचं तर सर्वश्रूतच आहे. अत्यंत काटक, शुर, कर्तबगार आणि विश्वासू मावळे ज्या भागातील असत ते "मावळ" म्हणजे काय? तेथील कर पध्दती, असणारे किल्ले त्याचा हा थोडक्यात लेखाजोखा.

       मावळ म्हणजे नेमकं काय हे पाहण्याआधी 'मावळ' या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे पाहणंही मोठं रंजक ठरेल. स. आ. जोगळेकरांच्या सह्याद्री ग्रंथात मावळ प्रांताच्या उत्पत्तीचे अतिशय सुरेख वर्णन दिले आहे. त्या ग्रंथात जोगळेकर म्हणतात...
       'मावळ या शब्दाची व्युत्पत्ती अनेक प्रकारे लावण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन शिलालेखात मामलाहार असा प्रादेशिक उल्लेख आढळतो. महाबळेश्वराचे जुने नाव मामलेश्वर असे आहे. मनुस्मृतीत मल्ल नावाच्या संकरजन्य जमातीचे नाव आहे. मल्ल किंवा तत्सम शब्द अंतर्भूत असलेली ग्रामनामे विशेषतः नगर, पुणे व सातारा या जिल्ह्यात आढळतात. या साधनांवरून श्री आबा चांदोरकर यांनी सिद्धांत मांडला आहे की मावळ म्हणजे 'मल्लराष्ट्र', किंवा महामल्ले - मामल्ल - मावळ = 'अत्युच्चपर्वतवेष्टीत' प्रदेश. ज्या प्रदेशातील अरण्यात महामल्ल, अस्वले पुष्कळ असतात तो प्रदेश'.

अ) भौगोलिक क्षेत्र


अ- १) डोंगररांगा


       सह्याद्रीची मुख्य रांग तापी नदीच्या खोऱ्यापासून सुरू होऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिलारी नदीपर्यंत 'दक्षिणोत्तर' पसरलेली आहे. तिला 'पुर्व-पश्चिम' काही उपरांगा जोडलेल्या आहेत. अशा या बहूतांशी रांगांना नावे आहेत. ज्यावर आपला सिंहगड आहे अशी भुलेश्वर रांग, सर्वात मोठी उपरांग असणारी महादेव रांग, बाळेश्वर, शैलबारी-डौलबारी, अजिंठा-सातमाळ इत्यादी. या पुर्व-पश्चिम उपरांगांना कोकणात माथेरान आणि महिपतगड रांग तर घाटमाथ्यावर दातेगड रांग आणि भाडळी-कुंडल ही महादेव उपरांगेची उपउपरांग या फक्त चार रांगांचे अपवाद सांगता येतील ज्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर म्हणजे दक्षिणोत्तर धावतात. यापैकी सह्याद्रीची मुख्य रांग आणि दातेगड रांगेदरम्यान कोयना धरणाचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र येतं.
       अजून सोपं करून सांगायचं झालं तर आपल्या अभ्यासाच्या वहीचं पान असतं हे त्याप्रमाणेच आहे. समासाची उभी रेघ म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग, त्याच्या उजव्या बाजूच्या रेघा म्हणजे ज्यावर आपण लिहितो त्या उपरांगा आणि समासाच्या डाव्या बाजूच्या रेघा म्हणजे कोकणात उतरलेले दांड किंवा नाळा आहेत ज्या वरून अनेक घाटवाटा कोकणात उतरत जातात. झालं कि नाही सोप्पं?

अ - २) नद्यांची खोरी


       पुण्याहून नाशिककडे जाताना आळेफाटा लागतो. या आळेफाट्यावरून डावीकडे वळलं की माळशेज घाटातुन कल्याणला जाता येतं. माळशेज घाटाच्या थोडं अलिकडं उजव्या बाजूला पिंपळगावजोगे धरण आहे, जे पुष्पावती नदीवर आहे. त्याच्या मागच्या बाजूला जी रांग दिसते तिला हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग म्हणतात. या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या उत्तरेकडील म्हणजे साधारणपणे नाशिक भागातील सर्व नद्या गोदावरीला मिळतात तर...
       ...तर पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना शिरवळच्या पुढे खंबाटकी घाट लागतो. हा घाट महादेव रांगेवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब असणारी ही रांग रायरेश्वरापासून सुरू होऊन शिखरशिंगणापुर जवळ संपते. या रांगेच्या अलिकडच्या म्हणजे हरिश्चंद्र-बालाघाट आणि महादेव रांगेदरम्यानच्या सगळ्या नद्या नद्या भीमेस मिळतात...
       ...आणि महादेव रांगेच्या दक्षिणेकडे असणाऱ्या म्हणजे कोल्हापूर जवळच्या सर्व नद्या कृष्णेला.
       महाराष्ट्रात गोदावरी, भीमा आणि कृष्णा या तीन नद्यांची खोरी आहेत. परंतु भीमा नदी पुढे जाऊन कृष्णेलाच मिळत असल्याने मुख्य नद्या दोनच आहेत, एक त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी आणि दुसरी महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा. कारण या दोनच नद्या अशा आहेत कि त्या उगम ज्या नावाने पावतात त्याच नावाने समुद्राला जाऊन मिळतात.

ब) ऐन मावळात


       सर्वसाधारणपणे भीमेच्या खोऱ्यात असणारा म्हणजे हरिश्चंद्र-बालाघाट रांगेच्या दक्षिणेकडील आणि महादेव रांगेच्या उत्तरेकडील भाग म्हणजे मावळ. थोडक्यात सांगायचं झालं तर भीमेच्या खोऱ्यात येणाऱ्या भागाला मावळ म्हणतात.
       मावळ हे पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन पश्चिमेकडील काही भागात पसरलेलं आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन उपरांगा संपेपर्यंत असणारा प्रदेश हा मावळात मोडतो. ज्या दोन उपरांगांदरम्यान असणाऱ्या नदीच्या क्षेत्रात नाचणी, वरई, भात इत्यादी पावसाळी पिकं पिकवली जातात अशा प्रदेशाला 'मावळ', 'खोरं' किंवा 'नेरं' अशा संज्ञा आहेत.

क) मावळांची नावं


       अशा मावळांना तिथून वाहणाऱ्या नदीच्या किंवा त्या भागात असणाऱ्या मुख्य गावाच्या नावाला साधर्म्य सांगणारी नावं आहेत. किंवा असं म्हणा हवंतर कि मावळांची नावं तिथं असलेल्या नदीच्या वा गावाच्या नावावरूनच आली आहेत. जसं पवनेचं 'पवन मावळ', पौड गाव असणारं 'पौड खोरं' तर भीमेचं भीमनेर, भामाचं भामनेर इत्यादी.

ड) प्रशासकीय व्यवस्था


       सध्याच्या काळात जिल्ह्याचा मुख्य जसा जिल्हाधिकारी असतो तसा त्याकाळी मावळांचा मुख्याधिकारी असे 'देशमुख'. जणु त्या मावळाचा राजाच. देशमुख त्याच्या भागातला सरकारने ठरवून दिलेला शेतसारा गोळा करीत असे आणि त्यातील काही हिस्सा त्या भागाच्या संरक्षण व विकास यासाठी स्वतःकडे ठेवून, बाकी सरकारजमा करत असे. या कामासाठी देशमुखाकडे प्रशासकीय लोक असत. देशपांडे, कुळकर्णी, पाटील इत्यादी प्रशासकीय पदे त्या त्या कामासाठी नेमलेली असत.(कालांतराने हीच पदे आडनावं म्हणून रूढ झाली) चांगलं काम करणाऱ्या देशमुख घराण्याला राजाकडून किताब दिला जाई. जसं पासलकरांना 'यशवंतराव', जेधेंना 'सर्जेराव'.

इ) सैन्य आणि करवसुली


       मावळाच्या आजूबाजूला असणाऱ्या डोंगररांगांवर किल्ले असत आणि ते या देशमुखांच्या ताब्यात असत. त्याच्या संरक्षणासाठी ते स्वतःचे सैन्य वा पागा (घोडदळ) बाळगत असत. त्यामुळं त्यांचा तिथं राहण्याऱ्या लोकांवर दरारा असे. जे शेतकरी शेतसारा देत नसत त्यांच्याकडून तो वसुल करावा लागे आणि अशी कामे बहुतांशी 'देशपांडे' मंडळी करत असत. 'देशपांडे' लढवय्ये असल्याची दोन उदाहरणे आपल्या सर्वांना माहिती आहेतच. बांदलांकडील बाजीप्रभू आणि मोऱ्यांकडचे मुरारबाजी.

फ) एकुण मावळं


       भीमेच्या खोऱ्यात पुणे हे साधारण मध्यात आहे त्यामुळं पुणे हे मुख्य मावळ (कर्यात* मावळ) असं समजलं तर त्याच्या पश्चिमेकडे म्हणजे मावळतीकडचा भाग म्हणजे मावळ असं सर्वसाधारणपणे समजलं जातं परंतु मावळांची ठिकाणं जाणून घेतल्यानंतर हा सिद्धांत चुकीचा ठरतो. एकूणच काय तर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन उपरांगा संपेपर्यंत असणाऱ्या प्रदेश म्हणजे मावळच पण त्याला म्हणताना बाकी 'मावळ', 'खोरं' किंवा 'नेरं' असं म्हटलं जातं. इंद्रायणी नदी ते नीरा नदीदरम्यान खोऱ्यांच्या आणि मावळांच्या नावात सरमिसळ आहे पण पुण्याहून जुन्नरकडे जाताना फक्त 'नेरं'च आहेत. भामनेर, भीमनेर, घोडनेर, मिन्नेर, कुकडनेर, जुन्नेर?, संगमनेर?, सिन्नेर? अंमळनेर?
       'सह्याद्री'कार स. आ. जोगळेकर म्हणतात नेर म्हणजे नहर. पाण्याच्या प्रवाहाला नहर म्हणतात. कुकडी नदीकाठी असलेलं जुन्नर हे अगदी प्राचीन शहर म्हणून त्याला जुने-नेर = जुन्नेर संज्ञा असावी. संगमनेरमधून प्रवरा आणि सिन्नेरमधून सरस्वती नद्या वाहतात ज्या पुढे गोदावरीला मिळतात तर अंमळनेरमधून वाहणारी बोरी नदी पुढे जाऊन तापीला मिळते. त्यामुळं एखाद्या 'नहर' शेजारी असणाऱ्या मोठ्या गावापुढे बहुधा 'नेर' लावलं जात असावं. अकोलनेर, पारनेर, जामनेर पिंपळनेर ही सुध्दा काही गावाच्या नावात 'नेर' असलेली उदाहरणं सांगता येतील.
       पुण्याखालची बारा मावळं आणि जुन्नर (जुने-नेर) खालील बारा, अशी चोवीस मावळं आहेत असं तुलशीदास शाहीराच्या पोवाड्यात आहे. पण असं वाटतं की ती एकूण बावीस आणि थोडं वेगळ्या भागात असलेलं एक शिवतर अशी एकूण तेवीस आहेत आणि ती पुढे दिलेली आहेत.

       प्रथमतः खोऱ्याचे/मावळाचे/नेऱ्याचे नाव नंतर तिथे वाहणारी नदी, त्यात येणारे मुख्य गाव, असणारा किल्ला, देवस्थान, तेथील देशमुख आणि शेवटी त्याचा किताब या क्रमाने ती वाचावीत.

१) मढनेर - पुष्पावती नदी/ मांडवी नदी - मढ/ ओतुर - सिंदोळा - हटकेश्वर.
२) कुकडनेर - कुकडी नदी - घाटघर/ जुन्नर - शिवनेरी/ चावंड - कुकडेश्वर.
३) मिन्नेर - मिना नदी - नारायणगाव - नारायणगड.
४) घोडनेर - घोड नदी - घोडेगाव/ मंचर - भीमाशंकर.
५) भीमनेर - भीमा नदी - राजगुरूनगर - भोरगिरी - भीमाशंकर.
६) भामनेर - भामा नदी - चाकण - संग्रामदुर्ग.
७) अंदरमाळ (आंद्रा) - आंद्रा - सावळे - वडेश्वर - हांडे देशमुख.
८) नाणे मावळ - इंद्रायणी - नाणे/ लोणावळे - लोहगड - कोंडेश्वर/ कुंडेश्वर/ कुंडलेश्वर - गरूड देशमुख.
९) पवन मावळ - पवना - पवनाळे/ चिंचवड - तुंग-तिकोना - वाघेश्वर
१०) कोरबारसे - आंबवडे.
११) पौड खोरे - मुळा नदी - मुळशी - कैलासगड/ कोरीगड - बलकवडे देशमुख / ढमाले देशमुख (राऊतराव).
१२) मुठे खोरे - मुठा नदी - मुठे - म्हसोबा?(खारवडे) - मारणे देशमुख (गंभीरराव).
१३) मोसे खोरे - मोसी नदी - मोसे - कुर्डुगड - पासलकर देशमुख (यशवंतराव).
१४) आंबी खोरे - आंबी नदी - पानशेत.
१५) कानंद मावळ - कानंदी नदी - वेल्हे - तोरणा - मरळ देशमुख (झुंजारराव).
१६) गुंजन मावळ - गुंजवणी नदी - गुंजवणे - राजगड - अमृतेश्वर - शिळीमकर देशमुख (हैबतराव).
१७) खेडेबारे खोरे - शिवगंगा नदी - खेड शिवापुर - बनेश्वर - कोंडे देशमुख (नाईक).
१८) वेळवंड खोरे - वेळवंडी नदी - भाटगर - कांब्रेश्वर - ढोर देशमुख (अढळराव).
१९) हिरडस मावळ - नीरा नदी - हिरडोशी - कासलोडगड / रोहीडा - बांदल देशमुख (नाईक).
२०) भोर खोरे - नीरा नदी - भोर - रायरेश्वर - जेधे देशमुख (सर्जेराव) / खोपडे देशमुख.
२१) कर्यात मावळ - मुठा नदी - पुणे - सिंहगड - पायगुडे देशमुख (रवीराव) / शितोळे देशमुख.
२२) घोटण खोरे - घारे देशमुख.
२३) शिवतर खोरे - कोयना नदी - जावळी - प्रतापगड - मोरे देशमुख (चंद्रराव).


* - कर्यात - (स्त्री) [अ. कर्यत + गाव]
      तालूका, दहा-बारा गावांचा पेटा/समुह

       मुळ अरबी भाषेत असलेल्या 'कर्यत' शब्दास गाव जोडून फार्सी भाषेत कर्यात हा शब्द आला आहे. कर्यात म्हणजे तालूका किंवा दहा-बारा गावांचा पेटा/ समुह.

       खरंतर मावळातल्या बहुतांशी लोकांचं मुळचं कुलदैवत हे महादेवच. त्यामुळं प्रत्येक मावळांत एखादं तरी पुरातन शिवालय नक्कीच असतं. मोहरीचा अमृतेश्वर, नसरापूरचा बनेश्वर अशी काही उदाहरणं सहजपणे सांगता येतील. त्यातच मावळचा भाग हा धरणं बांधण्यासाठी नैसर्गिकरित्या अतिशय परिपूर्ण असल्यामुळं सगळ्याच मावळांत हल्ली धरणं बांधली गेली आहेत. बऱ्याच मावळांतली नदीकाठी असलेली शिवालयं ही धरणं बांधल्यामुळं त्यांच्या पाणलोट क्षेत्रात कायमच बुडलेली असतात. उन्हाळ्यात ज्यावेळी धरणातली पाणी पातळी कमी होते त्यावेळी अशा मंदीरांचे अवशेष दिसू लागतात. एवढंच नाही तर कायम पाण्यात असल्यामुळं काही मंदिरं तर पूर्णपणे नामशेष झाली आहेत. सदर लेखात जेवढ्या शिवालयांची नावं समजली तेवढीच लिहिली आहेत. बऱ्याच ठिकाणची नावं अजूनही सापडलेली नाहीत. वाचक/अभ्यासक या माहितीत नक्कीच भर घालू शकतात.

       शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेपासून एकूणच प्रशासकीय व्यवस्थेत हळूहळू पण आमुलाग्र बदल केले. वर दिलेल्या पैकी 'प्रशासकीय व्यवस्था' व 'सैन्य आणि करवसुली'च्या बहुतेक पध्दती शिवपूर्वकाळातील आहेत. प्रशासकीय व्यवस्थेत सैन्यव्यवस्था आणि मुलकी व्यवस्था असे दोन भाग पडतात. परंपरागत सरंजामशाही संपवून सैन्य व्यवस्था राजकेंद्रीत तर मुलकी व्यवस्था लोककेंद्रीत करण्याचं श्रेय शिवाजीराजांना जातं. महसुलाच्या मोजणीचं काम सर्वप्रथम दादाजी कोंडदेव, नंतर मोरोपंत पिंगळे आणि शेवटी अनाजी दत्तो यांनी करून त्यात एकसुत्रीपणा आणण्याचा प्रयत्न केला. लेखाचा विषय 'मावळ म्हणजे काय?' असल्याने प्रशासकीय व्यवस्थेबद्दल पुन्हा कधीतरी.

       माझ्या या लेखात दिलेली माहिती परिपूर्ण नक्कीच नाही. खरंतर वर नमुद केलेल्या प्रत्येक मुद्यावर एकएक लेख लिहिता येईल. केवळ विस्तारभयावह येथे देण्याचे टाळले आहे. याशिवाय हे देखील सांगू इच्छितो कि या प्रस्तुत लेखात असणारी माहिती शंभर टक्के खरी आहे असंही मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या जुजबी ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा राहून गेल्या असण्याची नक्कीच शक्यता आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून आणि जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकून, माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पुर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही ||

संदर्भ -

१) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
२) सह्याद्रीतील रत्नभांडार - प्रमोद मांडे
३) फार्सी-मराठी कोश - प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन 

फोटो स्त्रोत -

१) गुगल
२) सह्याद्री - स. आ. जोगळेकर

समाप्त.



शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

"चिकणदरा"- एक अपरिचित वाट रतनगडाची...

"चिकणदरा"- एक अपरिचित वाट रतनगडाची...



       अहमदनगर जिल्ह्यात आणि अकोले तालुक्यात असणारा किल्ले रतनगड पाहिला नाही असा भटक्या खरं म्हणजे क्वचितच सापडेल. अशा या अवघ्या भटक्यांच्या आवडत्या रतनगडाला एकूण तीन दरवाजे आहेत. रतनवाडीकडे असणारा गणेश दरवाजा, साम्रदकडचा त्र्यंबक दरवाजा आणि पश्चिमेकडे म्हणजे कोकण बाजूकडे असल्यामुळे कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा.
       गडावर असलेल्या राणीच्या हुड्यापासून डावीकडे जाऊ लागायचं. बाजूच्या दोनचार पाण्याच्या टाक्या ओलांडून थोडं पुढं गेलं की वाट या टाक्यांमागच्या टेकडीला उजवीकडून वळसा मारते आणि भुयार? ओलांडून नेढ्याकडे जाते. या वाटेवरच डाव्या हाताला भरभक्कम तटबंदीत बांधलेला एक दरवाजा दिसतो. त्याचं नाव कोकण उर्फ कल्याण दरवाजा. दरवाज्याच्या बाहेर खोलखोल दरीच दिसते पण तिथून खाली उतरण्याची वाट बाकी काही दिसत नाही. इथून उतरायला जर वाटच दिसत नाहीये तर मग इथं दरवाजा का बांधला असावा? या दरवाज्याचं नाव कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा असं असल्यानं इथून कल्याणकडे वाट उतरून जात असावी का? असेल तर नेमकी कुठे उतरत असेल? जर वाट असेल तर तिथे वाट असल्याच्या काही खाणाखुणा तिथे शिल्लक असतील का? वगैरे अनेक प्रश्न मनात येत होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांची मग शोधाशोध सुरू झाली होती. अगदी गुगलबाबा पासुन ते जुन्या जाणत्या ट्रेकर्सना देखील विचारून झालं होतं. पण कुणीच मनाचं समाधान काही करू शकलं नव्हतं. प्रत्यक्ष तिथं जाऊनच शोधाशोध करावी लागणार असं एकंदरीत दिसत होतं. शोध घ्यायला जायची इच्छा तर खुप होती पण मुहुर्त काही लागत नव्हता.

...आणि जाण्याचं नक्की झालं.


       नुकताच ११-१२ नोव्हेंबरला डेहण्यातून अवघड असा 'पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार'चा ट्रेक केला. गुयरीदारच्या वाटेने डेहण्यात परतताना सोबतच्या वाटाड्यांशी आजूबाजूच्या डोंगरवाटांबद्दल गप्पा सुरू होत्या. बोलताबोलता त्यांच्या तोंडून एक नवीन घाटवाट कळली, तिचं नाव 'चिकणदरा'. ही वाट कोकणातील डेहण्यातून सांधणदरी जवळच्या घाटमाथ्यावरच्या साम्रदला तर जातेच पण याच वाटेला एक वेगळी वाट फुटून ती वाट रतनगडाच्या कल्याण दरवाज्यातून गडावर चढून जात असावी असा स्थानिक लोकांचा अंदाज होता. अर्थात या वाटेनं त्यांच्यापैकी आधी कुणीच गेलं नसल्यामुळं त्याबाबत खात्रीशीर मात्र कुणीच काही सांगू शकत नव्हतं. आता एवढी माहिती मिळाल्यावर मागे पडत असलेल्या प्रश्नांनी पुन्हा डोकं वर काढलं त्यामुळं आता काही स्वस्थ बसणं शक्य होणार नव्हतं, काहीतरी हालचाल करायलाच लागणार होती.

       आजोबाचा ट्रेक संपवून पुण्याला परतताना मनात फक्त चिकणदऱ्याबद्दलच विचार सुरू होता. कशी असेल ती वाट? किती वेळ लागेल? कुठे कातळारोहण करावे लागेल का? त्यासाठी काही साधनसामुग्रीची आवश्यकता भासेल का? असे एक ना अनेक विचार मनात येत होते. डोक्यातून 'चिकणदरा' काही केल्या जात नव्हता त्यामुळं लवकरच ही शोधमोहिम हाती घ्यावी लागणार होती. त्यामुळं चारपाच दिवसांनी आजोबाच्या धुंदीतुन बाहेर आल्यावर हळूच सोबत्यांना चिकणदर्‍याला जाण्यासाठी खडा टाकला. माझ्या मनातला विचार सर्वांनीच उचलून धरला. लगेचच डेहण्यातल्या पाटेकरांशी त्याबाबत बोललो. त्यांनीही लगेच होकार कळवला आणि आमचं या अनवट वाटेने जाण्याचं नक्की झालं. त्यादृष्टीने रेशन, इक्विपमेंट वगैरेची सगळी तयारी सुध्दा करून झाली.


       तारीखही ठरली दहा डिसेंबर म्हणजे बरोबर एक महिन्यानेच आणि त्यादृष्टीने सगळी तयारीसुध्दा झाली पण नेमकं 'ओखी' चक्रीवादळ जोराचा पाऊस घेऊन आलं. आता आम्हाला आमचा बेत रद्द करावा लागतोय की काय अशी भीती वाटू लागली पण देव कृपेने पुढच्या दोन दिवसांत ते शमलं आणि आमचं जाण्याचं नक्की झालं.

चिकणदऱ्याच्या वाटेवर...


       नऊ डिसेंबरच्या रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे जेवण करून निघालो. माळशेज घाटाच्या अलिकडे खुबी फाट्यावर एका धाब्यावर चहाला थांबलो तर गाडीच्या चाकातून हवा जात असल्याचं लक्षात आलं. मागल्या वेळेसारखा याही वेळेस गाडीने दगा दिला होता. पण एक बरं होतं की ज्या ठिकाणी चाक पंक्चर झालं तिथून पुढे फक्त अर्ध्या किलोमीटरवरच पंक्चर काढण्याचं दुकान होतं. दुसर्‍या दिवशी ट्रेक संपवून येताना डेहणे, डोळखांब, तळेगाव सारख्या मोठ्या गावांच्या ठिकाणी पंक्चर काढता आलं असतं पण संध्याकाळी ट्रेक संपायला किती वाजतायत त्यावर ते अवलंबुन असणार होतं. बरं जातानाच वाटेत परत कुठे पुन्हा पंक्चर झालं असतं तर मग अजुन अवघड झालं असतं त्यामुळे असा धोका न पत्करता खुबीतच थोडा वेळ वाया जाणं आम्हाला परवडणारं होतं. एवढं सगळं करून डेहण्यात पोहोचायला रात्रीचे साडेतीन वाजले त्यामुळं फक्त दोनएक तासच गावातल्या मारूती मंदीरात झोप काढायला मिळाली.


       सकाळचं आवरून बरोबर सहाला आरती केली आणि पाटेकरांकडे नाष्ट्याला हजर झालो. आजोबाच्या ट्रेकच्या वेळचे पोहे काही पोटभरीचे झाले नव्हते म्हणून यावेळी सरळ पोळी-भाजीच नाष्ट्याला सांगितली होती.




       आमच्या वाटाड्यांनी म्हणजे देवू शिवारींनी वोरपडीतुन रात्रीच पाटेकरांकडे येवून मुक्काम केला होता.


       त्यांचंही आवरून झालं होतं त्यामुळे वेळ न घालवता वाल्मिकनगरहुन शाई नदीच्या पात्रात असलेल्या वाटेने तडक निघालो. ही वाट आमच्या ओळखीची होती कारण याच वाटेने आम्ही महिन्याभरापुर्वी आजोबावरून डेहण्यात परतलो होतो.




       पहाटेच्या धुक्यात खुटा-रतनगड, कात्राबाई, करंडा आणि आजोबा ओझरते जाणवत होते. त्यांच्यामागे होत असलेल्या सुर्योदयामुळे सह्याद्रीचा राकटपणा चांगलाच जाणवत होता.


       आमच्या थोडंसं डाव्या बाजूला रतनगडाच्या खुटा सुळक्यासारखाच एक सुळका दिसत होता. याला कोकणातले लोक कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा म्हणतात तर घाटमाथ्यावरच्या साम्रदचे लोक भायखळ्याचा कडा म्हणतात. त्याच्या मागच्या बाजुला एक खिंड जाणवत होती. आम्हाला बरोबर त्या खिंडीतच जायचं होतं. त्यातून एक नाळ खालच्या शाई नदीच्या पात्रात उतरत होती. या खिंडीतून उतरणार्‍या वाटेलाच चिकणदरा किंवा चिकणमातीचा दरा म्हणतात.


       नदीपात्राच्या बाजूने गच्च झाडीतुन प्रवास करत आम्ही सर्व जवळजवळ मुख्य रांगेला भिडलो होतो. ऊन लागत नसल्यामुळं पहिला थांबा उंबराच्या पाण्यापाशीच घेतला.



       नदीपात्राच्या बाजूला एक उंबराचं झाड आहे. त्या झाडाच्या बाजूला कुठेही खड्डा खणला तरी बारमाही पाणी मिळू शकतं. डिसेंबर महिनाच असल्यानं आम्हाला पाण्यासाठी खड्डा काही करावा लागला नाही. इथून पुढं ज्या वाटेने आम्ही परत खाली उतरणार होतो त्या बाणच्या नाळेत पोहोचेपर्यंत आम्हाला पाणी मिळेल याची काही शाश्वती नव्हती म्हणून पोटभर पाणी पिऊनही घेतलं आणि बाटल्याही तंतोतंत भरून घेतल्या.



       आता बाकी आमची वाट डाव्या बाजूच्या डोंगरधारेवर चढू लागली होती. खरंतर चिकणदर्‍याच्या खिंडीतून उतरलेली नाळ थोडी पुढे उतरत होती पण आम्ही एक छोटासा शॉर्टकट मारून खिंडीत पोहोचणार होतो. सुरवातीची वाट तर दाट झाडीतून होती आणि वाट तयार करतच चढावं लागत होतं.




       साधारण तासाभराच्या चढाईनंतर वाट एका सोंडेवर आली. इथे डोक्याएवढ्या उंचीचं गवत होतं. पण जसजसं वर चढत गेलो तसं ते कमी उंचीचं होत गेलं.



       आता ही सोंड ओलांडून आम्हाला पलिकडच्या नाळेत शिरायचं होतं. पायाखाली वाळलेलं निसरडं गवत आणि जोरात वाहू लागलेल्या थंडगार बोचर्‍या वार्‍यामुळे जीव मुठीत घेऊनच चढावं लागत होतं. त्यातच डाव्या बाजुला चढाची बाजू तर उजव्या बाजूला निसरडा उतार आणि वाट तर फक्त एक पाऊल बसेल एवढी.



       पाऊल पुढे टाकलं तरी ते कधी घसरेल याचा नेम नसे. त्यामुळे काहीजण तर चक्क चतुष्पाद झाले होते. 'बुडत्याला काडीचा आधार' कशाला म्हणतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही त्यावेळी घेत होतो.



       आता आम्ही वरच्या कड्याला भिडलो होतो. एक बरं होतं की आता कड्याला धरता येत होतं. आडवं जात नाळेत शिरलो आणि मस्त झाडी लागली. अशा अवघड टप्प्यावरून शेवटचा माणूस येईपर्यंत थांबणं गरजेचं होतं. अर्थात त्यामूळे सर्वांनाच थोडी विश्रांती मिळणार होती आणि खिंडही आता तशी आटोक्यात आली होती त्यामुळे थांबायला काहीच हरकत नव्हती.



       वाट नाळेच्या कधी अल्याड तर कधी पल्याड जात चढत होती. जसजसं खिंडीत जात होतो तसतसं वरच्या बाजूने ढासळलेल्या दगडांच्या ढिगावरून चालून जावं लागत होतं. एखाद्या मोठ्या दगडावरही पाय ठेवल्यानंतर तो कधी खाली घसरेल याचा नेम नव्हता. ज्याला जसं जमेल तसं पण सावधगिरीने चालत हळूहळू सर्वजण खिंडीत पोहोचले. विश्रांती घेत असताना पाटेकरांशी आणि शिवारींशी पुढच्या वाटेबद्दल चर्चा केली.



       आमच्याबरोबर आलेले दोन्ही वाटाडे इथून पुढे रतनगडाकडे कधीच न गेल्याने निदान इथपर्यंत तरी त्यांचं काम झालं होतं आणि माझं सुरू झालं होतं. आतापर्यंत केलेल्या डोगरयात्रांमुळे पदरी जमा असलेला अनुभव पणाला लागणार होता. शिवारी आणि पाटेकर आमच्यासोबत येण्यास थोडे नाखुषच दिसत होते. पण आम्हाला रतनगडाची वाट शोधायचीच असल्याने खिंडीत आम्ही रतनगडावर जाण्याची सगळी तयारी केली. उजव्या बाजूच्या धारेवर चढलो. थोडं वर गेल्यावर समोरच भलामोठा कातळ आडवा आला.


       खरं म्हणजे इथून रतनगड अजिबात दिसत नव्हता. निदान समोरच्या कातळावर चढून गेलो म्हणजे काहीतरी अंदाज आला असता. त्यासाठी कातळावर चढून जाणं भाग होतं. एक नक्की होतं की जर इथून रतनगडावर जायला वाट असेल तर त्याकाळी कातळारोहण करून तर नक्कीच जात नसणार. निदान पायर्‍या किंवा खोबण्या तरी नक्कीच असायला हव्या होत्या. त्यादृष्टीने इकडेतिकडे थोडी शोधशोध केल्यावर त्या सापडल्यासुध्दा. मग काय सगळ्यांनाच आनंद झाला. पायर्‍यांच्या मागच्या बाजूला थेट कडा होता पण पायर्‍या असल्याने तशी भीती वाटत नव्हती. ही जर रतनगडाची वाट असेल तर कड्यावरच्या सपाटीवर एखादी बांधलेली चौकी असायला हवी होती पण झाडी एवढी माजलेली होती की शोधणं खूपच अवघड होतं.




       समोरच कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा नावाचा आतापार्यंत कुणीही चढाई न केलेला सुळका लक्ष वेधुन घेत होता. याची चढाईची उंची ३००-३५० फुट नक्कीच असेल. त्यासाठी एकदा पुर्ण तयारीनिशी आणि वेळ काढून यावे लागेल.


       आम्ही ज्यासाठी इतक्या लांबुन इथे आलो होतो ते स्वप्न आज पुर्ण होणार अशी सर्वांनाच आशा वाटु लागली. इथून पुर्वी रतनगडावर जायला नक्की वाट होती याची खात्री पटली होती. आता आम्हाला फक्त पायर्‍यांचा माग काढत जायचं होतं. पायर्‍या चढून वर गेल्यावर अजून एक छोटा कातळटप्पा लागला तिथल्या पायर्‍यांवरून चढल्यावर समोरच्या छोट्या टेकडीमागे असलेला रतनगड नेढ्यावरच्या झेंड्यामुळे चटकन ओळखता आला.


       समोर दिसणार्‍या टेकडीच्या उजव्या बाजूला कडा जाणवत होता आणि टेकडीवर चढून जाणंही सोपं दिसत नव्हतं त्यामुळे वाट टेकडीच्या डाव्या बाजूने जात असणार हे उघड होतं. वाटेत भयानक झाडी माजलेली असल्याने वाट तयार करतच जावं जावं लागत होतं त्यामुळे वेळ प्रचंड खर्ची पडत होता. संध्याकाळपर्यंत आम्हाला डेहण्यात पोहोचायचं असल्यानं विश्रांतीसाठी कुठेही थांबा न घेता रतनगडाच्या दिशेने चालत होतो. जुनी कारवी मोडून पडली होती आणि नवीन कारवी त्यामधूनच आली होती त्यामुळे एखादं पाऊल खाली पडलेली कारवी मोडून कधी खालच्या खड्ड्यात जाईल याचा नेम नसायचा. त्यातच मधे उगवलेली आग्याबोंड अंगाला लागली की प्रचंड खाज सुटत असे. काटेरी झुडपे तर अगणित होती त्याने कुणाला ओरखडत होतं तर कुणाच्या अंगात काटा मोडत होता. त्यामुळे एका पाठोपाठ चाललेल्या आमच्या टोळीचा म्होरक्या वाट तयार करून थकल्यावर आम्ही थोड्या थोड्या वेळाने बदलत होतो.




       खरं म्हणजे आम्ही अंदाजेच रतनगड आणि त्याला जोडलेल्या धारेच्या सांध्याकडे चढून जात होतो पण मधेच आलेल्या एका छोट्या कातळटप्प्यावर खोदीव पायर्‍या दिसल्या आणि आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत याची खात्री पटली. तसं आम्ही विश्रांतीसाठी कुठे थांबतही नव्हतो. मागून 'ए जरा थांबा. अंतर पडलंय' अशी आरोळी ऐकू आली की 'अरे चला, संपलंच. थोडंच राहिलंय' असं म्हणून रेटून नेत होतो. घड्याळातली वेळ अडीच वाजल्याचे दाखवत होती. म्हणजे आम्हाला तसा बराच उशीर झाला होता. अंधार पडायच्या आत बाणच्या नाळेने उतरून निदान खालच्या कुंडांपर्यंत तरी पोहोचायला हवं होतं. त्यामुळे थांबून चालणारच नव्हतं. पण काही वेळाने एक वेळ अशी आलीच की मागच्या थकलेल्या मंडळींसाठी थांबावच लागलं. आता इथून पुढं यायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. खरं म्हणजे रतनगड अगदी हाकेच्या अंतरावर दिसत होता. तो इतका जवळ होता की गडावरच्या मंडळींचे बोललेले आवाजही स्पष्ट ऐकू येत होते. त्यामुळे थकलेल्या मंडळींना आम्ही वाटेत थांबवून काही मोजके जण गडाकडे निघालो. मागे थांबलेल्या मंडळींमधे आमचे दोन्ही वाटाडे होते हे काही वेगळं सांगायला नको. थकलेलं टोळकं मागे थांबल्यानं एक गोष्ट बाकी आमच्या पथ्थ्यावर पडणार होती ती म्हणजे त्यांची विश्रांती. दुसरं असं की आम्ही वर जाऊन येईतोपर्यंत त्यांची जेवणे पण होणार होती. पुढे डेहण्यापर्यंत चालण्याच्या दृष्टीनं ही गोष्ट चांगलीच झाली होती. खरं तर जिथे पाणवठा मिळेल तिथे थांबून जेवण करायचं ठरवलं होतं. पण उंबराच्या पाण्यापासून इथंपर्यंत आम्हाला कुठेही पाणी सापडलं नाही. पाणवठा मिळेपर्यंत सोबतचा पाणीसाठा पुरवून वापरावा लागणार होता. रतनगडापर्यंतची वाट कशी असेल याचा अंदाज नसल्याने कातळारोहणासाठी लागणारी जुजबी सामग्री सोबत घेवून वेळ न दवडता पुढे निघालो. आम्ही जसजसं वर चढत होतो तसं झाडांच्या झरोक्यातून रतनगडाची तटबंदी, बुरूज दिसत होते.


       रतनगडावरून उतरलेली धार मागे पाहिलेल्या टेकडीपर्यंत आलेली होती. तिच्यावर हळूहळू चढत रतनगडाच्या आणि टेकडीला जोडलेल्या धारेच्या सांध्यात पोहोचलो. इथेही अपेक्षेप्रमाणे पायर्‍या असायला हव्या होत्या तशा त्या दिसल्याच. फारशी शोधाशोध करावी लागलीच नाही. त्या पायर्‍यांचा माग घेतघेत वर चढत गेलो. पण एकवेळ अशी आली की पुढे पायर्‍या संपल्या आणि नव्वद अंशाचा कडा लागला.




       जवळच प्रबळगड आणि कलावंतीणच्या खिंडीत आहे किंवा रायगडाच्या भवानी कड्याखाली आहे तसं एक टाकं दिसलं. गडावर चढून जाण्यासाठी अवघड प्रकारचं कातळारोहण करावं लागलं असतं आणि त्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज होती. आम्हाला फक्त वाट शोधायची असल्याने आम्ही त्या नियोजनाने काही आलो नव्हतो. त्यामुळे इथून पुढे आम्ही काही गेलो नाही. अगदी रतनगडावर कातळारोहण करून गेलोच असतो तरीही डेहणे गाठण्यासाठी खुप मोठा वळसा पडला असता. गुयरीदार, पाथरा घाटाने तर शक्यच नव्हतं आणि साम्रदला उतरून बाणची नाळ, सांधण किंवा अगदी करवलीनेही उतरणं अंधार पडल्यावर अवघड झालं असतं. त्यामुळं मागे थांबलेल्यांची एकंदर अवस्था बघता त्वरीत परत आम्ही फिरण्याचा निर्णय घेतला. तसं फक्त आम्ही वाट शोधण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला ती गवसली होती.
       आम्ही परत फिरून आमच्या मागे थांबलेल्या सोबत्यांपर्यंत येईस्तोवर त्यांचं जेवण होऊन एक झोप काढून झाली होती.


       थकलेली मंडळी ताजीतवानी झाल्यावर त्यांना पुढे पाठवून देऊन आम्ही पटापट आमची जेवणे उरकली आणि ते खिंडीत पोहोचेपर्यंत त्यांना मागुन जाऊन गाठलं.


       खिंडीपासून पंधरा-वीस मिनीटात एका मोकळ्या पठारावर आलो. या ठिकाणावरून रतनगड आणि खुटा अगदी स्पष्ट दिसत होते. पठाराच्या आसपास बांबुची बेटे भरपुर दिसली आणि साम्रदची मंडळी बांबु नेण्यासाठी इथे वरचेवर येतात त्यामुळे या पठारावरून बाणच्या नाळेत जाईपर्यंतची वाट अतिशय मळलेली होती.


       मळलेली वाट नाळ ओलांडून सरळ साम्रदकडे निघुन गेली आणि आम्ही डावीकडे वळून बाणच्या नाळेतुन उतरू लागलो. थोडं उतरून गेल्यावर स्वच्छ पाण्याचा साठा मिळाला. चिकणदर्‍याखालच्या उंबराच्या पाण्यानंतर आत्ताच पाणी मिळालं होतं. बाणची नाळ माझ्या चांगल्या परिचयाची होती. जानेवारी २००८ च्या पुणे व्हेंचरर्सच्या बाण मोहीमेत मी इथं आठवडाभर मुक्कामाला होतो. आता बारीक नाळेतून मोठ्या झालेल्या नाळेत आलो आणि समोर ८१० फुटांचा बाण सुळका, सांधणदरीची भेग आणि त्यामागे करवली घाट दिसु लागला.




       बाणच्या पायथ्यातून मोठमोठे कातळटप्पे उतरावे लागत होते. सुर्यास्तही होऊ लागला होता त्यामुळे आता जेवढ्या लवकर सांधण खालच्या कुंडांपर्यंत जाता येईल तेवढं जावं लागणार होतं. कारण अंधार पडल्यावर चालण्याचा वेग मंदावतो. बाणच्या नाळेतुन पूर्णपणे खाली उतरून जाता येत नाही. मधे दोन-तीन मोठाले कातळटप्पे आहेत. त्यामुळे बाणची नाळ सोडून आम्हाला डाव्या बाजूच्या नाळेत उतरावे लागणार होते. त्यासाठी अगोदर डाव्या धारेवर चढावे लागले. इथे पोहोचेपर्यंत पुर्णपणे अंधार पडला. त्यामूळे इथून पुढचे फोटो काढता आले नाहीत.

       डाव्या धारेवरून नाळेत उतरण्याची वाट इतकी सरळसोट आणि घसाऱ्याची होती की सुरक्षा दोर वापरण्याखेरीज पर्यायच नव्हता. एखादे मोठे झाड पाहून त्याला दोर बांधायचा. एकएक करत सर्वजण खाली आले की शेवटचा भिडू गाठ सोडून दोर त्याच झाडाला इंग्रजी 'U' सारखा ओवायचा आणि दोन्ही टोके खाली सोडायचा. मग दुहेरी झालेला दोर धरुन खाली बाकीच्या सोबत्यांपर्यंत उतरायचा. असं करत करत आमची जत्रा अंधारात खाली उतरत होती. जवळजवळ हा प्रकार आम्ही आठ-दहा वेळा तर नक्कीच केला. बराच वेळ असं आम्ही उतरत होतो. काहीच दिसत नसल्याने तळ किती लांब आहे ते काहीच समजत नव्हते. बाणची नाळ शेवटी सांधणदरीलाच येऊन मिळते. तिथे पोहोचल्यावर एकदाच्या सांधणदरी खालच्या ओळखीच्या खुणा दिसल्या आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्रीचे साडेआठ वाजले होते आणि डेहण्यापर्यंत अजुनही दोनएक तासांची चाल बाकी होती. पण एक बरं होतं की वाट मळलेली, सपाटीची आणि निर्धोक होती. नाही म्हणायला कोल्हेकुई ऐकू येत होती पण तेवढीच. उठतबसत एकदाचे साडेदहा वाजता सर्वजण डेहण्यात पोहोचलो. एकंदरीत पाटेकरांचा या ट्रेकचा चालण्याबद्दलचा अंदाज साफ चुकला होता. हा ट्रेक एक दिवसाचा खासच नाही. बहूतेक सर्वांनाच दुसर्‍या दिवशी सकाळी कामावर जायचं होतं त्यामुळे अर्थातच डेहण्यात मुक्काम करण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. हातपाय धूवून फ्रेश झालो, पाटेकरांकडे फक्कड चहा घेतला आणि तडक पुण्याकडे निघालो ते याच परीसरात अजून एक नवीन सापडलेल्या घाटवाटेत परत येण्यासाठीच.

🚩🚩

🚩 फोटो सौजन्य - फाल्कन्स

       या संपूर्ण ट्रेकच्या वेळेचा हिशोबच मांडायचा झाला तर आम्ही चिंचवडहून आदल्या दिवशी रात्री दहा वाजता निघालो होतो आणि ट्रेक संपवून डेहण्यात पोहोचायला रात्रीचे साडेदहा वाजले होते. म्हणजे साधारणपणे गेल्या चोवीस तासात आमची विश्रांती अशी फक्त दोनच तास झाली होती. आता इथून पुण्याला पोहोचेपर्यंत आणखी पुढचे कमीतकमी पाच तास झोप होणार नव्हती. म्हणजे पुणे ते पुणे अशा एकूण तीस तासात सोळा तास ट्रेक, दहा तास माझं स्वतःचं ड्रायव्हींग तर बाकीच्यांचा प्रवास, सकाळच्या आन्हीकांसाठी दोन तास आणि फक्त दोन तासच विश्रांती. एवढं सगळं करूनही सगळेजण दुसऱ्या दिवशी न चुकता कामावर हजर होते. एकूणच हे सगळं अशक्य कोटीतलं आमच्याकडून आपसुकच झालं होतं. या सर्वातून सांगण्याचा मुद्दा हाच की प्रत्येक व्यक्तीत प्रचंड शारीरिक क्षमता असते पण त्याला मानसिक सक्षम बनवण्याचं काम हे तो वारंवार करत असलेल्या 'डोंगरयात्राच' करून घेत असतात. नाही का?

🚩 महत्त्वाचे असे -

१) सह्याद्रीतील अशा नवीन शोधण्याच्या वाटा, डोंगरयात्रांचा पुरेसा अनुभव, कातळारोहणासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीशिवाय आणि ती योग्य प्रकारे वापरण्याचा सराव असल्याखेरीज अजिबात करू नयेत.
२) राखून ठेवलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त पुरेसा पाण्याचा साठा सोबत असावा.
३) सहा-सात तास वापरता येईल एवढी टॉर्च (शक्यतो हेडटॉर्च) सोबत बाळगावी.
४) पुरेसे अन्न सोबत बाळगावे.