शनिवार, ३० मे, २०२०

लेख पहिला "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"




लेख पहिला...


🚩 'हिंदुस्थानातील राजकीय स्थित्यंतरे'


       काही दिवसांपूर्वी whatsapp वर भारतवर्षात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांबद्दल एक सुंदर व्हिडीओ सगळीकडे फिरत होता. (हा व्हिडीओ इथे टिचकी मारून पाहता येईल) एकूणच भारतवर्षात लहानमोठ्या सर्व राजवटी सांगायच्या तर त्याची संख्या दहाबारा नक्कीच होईल. त्या व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे सुरवातीच्या काही अतिप्राचिन राजवटींनंतर साधारण इसवीसनपूर्व दुसर्‍या शतकापासून हिंदूस्थानात सातवाहनांची राजवट राज्य करत होती. या राजवटीत एकंदरीतच व्यापारवृद्धी झाल्याने सगळ्या प्रदेशाची खूपच भरभराट झाली. पण व्हिडीओत दाखवलेल्या त्यातल्यात्यात मोठ्या राजवटींचा विचार करता त्यामधल्या सातवाहनांनंतर एकापाठोपाठ एक अशा शक, क्षत्रप, कुशाण, अभीर किंवा अहीर, त्रैकुटक, वाकाटक, गुप्त, गुर्जर, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव आणि शेवटी विजयनगरचे होयसळ या सर्व हिंदू राजवटी नांदल्या.
       याच दरम्यान इ.स. १००० पासून इस्लाम धर्माच्या प्रचाराच्या मुखवट्याखाली गझनीच्या महंमदाच्या स्वार्‍या भारतावर सुरू झाल्या होत्या. त्याने एकूण अठरा स्वार्‍या करून हिंदूंची घरेदारे, मठ, देवळे फोडून, भ्रष्ट करून अगणित संपत्ती लूटून नेली. उत्तरेकडून होणार्‍या या कडव्या, धर्मांध मुस्लिमांच्या धडाक्यापुढे उत्तर हिंदूस्थानातल्या हिंदू राजसत्तांचा प्रतिकार कायमच तोकडा पडला आणि ही पुढे येऊ घातलेल्या हिंदूस्थानातल्या मुस्लिम राजवटींची नांदीच होती. इ.स. १२९४ साली दिल्लीचा बादशहा जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या अफगाण सेनेसह दक्षिणेत उतरून देवगिरीच्या रामदेवराय यादवाचा मोठा पराभव केला आणि प्रचंड खंडणी वसूल केली. पुढच्या दोन वर्षात जलालुद्दीन खिलजीच्या संपूर्ण कुटुंबाची कत्तल करून अल्लाउद्दीन खिलजी बादशहा बनला. नंतरही खिलजीची यादवांवर आक्रमणे सुरूच होती. रामदेवराय यादवानंतर, शंकरदेव आणि त्यानंतर त्याचा मेहुणा हरपालदेव यांचा प्रतिकारही तोकडा पडला आणि महाराष्ट्रातलं शेवटचं 'यादव' हे हिंदू साम्राज्य लयास गेलं.
       इ.स. १३२५ साली खिलजींना गादीवरून उतरवून महमंद तुघलक दिल्लीचा बादशहा बनला आणि त्याने आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवली. स्थानिक हिंदूंना कामाला लावून त्याने मुळ देवगिरीच्या डोंगरी किल्ल्याच्या बाजूला सध्या आपल्याला दिसतो तो तिहेरी तटबंदीचा भुईकोट बांधला आणि देवगिरीचं दौलताबाद असं नामकरण केलं. चौदाव्या शतकात दोन महत्वाची राजकीय स्थित्यंतरं झाली. त्यातलं पहिलं म्हणजे १३२६ साली झालेला विजयनगर साम्राज्याचा उदय आणि १३४७ साली झालेली बहामनी राजवटीची स्थापना. तुंगभद्रेच्या उत्तर तीरावरील अनेगुंदीच्या किल्लेदाराने सार्वभौमत्वाची द्वाही फिरवली आणि बलदंड अशा विजयनगर राजधानीची निर्मिती केली. सध्या या ठिकाणाला आपण हंपी म्हणून ओळखतो. या साम्राज्याच्या सीमा पार महाराष्ट्रातल्या उत्तर कोकणापर्यंत भिडलेल्या होत्या. रायरी ऊर्फ रायगडाचा उल्लेख हा विजयनगरच्या दफ्तरात सापडतो. तत्कालीन कोकण हे शिर्के, शेलार, सुर्वे, सावंत, दळवी, मोरे या अस्सल मराठी पाळेगारांच्या ताब्यात होते. साधारण इ.स. १३४७ च्या काळात महमंद तुघलकाच्या दक्षिणेतल्या सुभेदारांनी हसन गंगु बहामनीच्या नेतृत्वाखाली बंड करून स्वतंत्र राज्याची स्थापना केली. या बहामनी राजवटीची पहिली राजधानी गुलबर्गा होती ती पुढे त्यांनी बिदरला नेली. दक्षिणेत असलेल्या विजयनगर आणि बहामनी राजवटीतला संघर्ष अटळ होता आणि पुढे तो पिढ्यानपिढ्या सुरूच होता. अल्लाउद्दीन बहामनीने विजयनगरचा राजा दुसरा देवराय याचा पराभव केला आणि या शेवटच्या हिंदू साम्राज्याला घरघर लागली. यानंतर विजयनगरचे अस्तित्व बहामनी राजवटीचे मांडलिक एवढेच राहिले. पुढे बहामनींचा विस्तार होऊन कोकण, महाराष्ट्रापासून संपूर्ण दक्षिणेत त्यांची सत्ता स्थापली. आता बलाढ्य असे सांगायचे तर उत्तरेत मंगोल आणि दक्षिणेत अफगाणी बहामनी असा दोनच राजवटी उरल्या.
       पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत फारशा काही राजकीय हालचाली झाल्या नाहीत पण १४८५ साली बहामनी राजवटीतला एक सक्षम मंत्री महम्मुद गवान याची दरबारातल्या त्याच्या सहकार्‍यांनीच हत्या केली आणि हीच घटना बहामनी राजवटीचे तुकडे होण्यास कारणीभुत ठरली. पुढच्या पाच वर्षात म्हणजे १४९० सालापर्यंत अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापुरची आदीलशाही, बिदरची बरीदशाही आणि वर्‍हाडातली इमादशाही अशी पाच स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. अजून एक महत्वाची घटना १४९८ साली घडली ती म्हणजे 'वास्को द गामा'चा भारतप्रवेश. आतापर्यंत बहुतेक सर्व आक्रमणं उत्तरेकडून होत होती. वास्को द गामाच्या प्रवेशामुळे आफ्रिकेच्या पलिकडच्या युरोपियन राष्ट्रांना भारताचं दार उघडलं गेलं. आता डच, फ्रेंच, पोर्तुगिज आणि ब्रिटीशांना हिंदूस्थानची सोनेरी बाजारपेठ खुणावू लागली होती. सुरवातीला व्यापार, धर्मप्रसार या बहाण्यातून मोक्याची जमीन बळकावणे आणि नंतर संरक्षणाच्या नावाखाली किल्ले उभारणे असे यांचे स्वरूप होते.
       सोळाव्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे इ.स. १५२६ साली रजपुतांच्या वाढत्या प्रभावास शह देऊन मंगोलवंशीय बाबर (१५२६-१५३०) हा दिल्लीच्या गादीवर आला. त्यानंतर हुमायुन (१५३०-१५४० आणि १५५५-१५५६), अकबर (१५५६-१६०५), सलीम ऊर्फ जहांगिर (१६०५-१६२७), खुर्रम ऊर्फ शाहजहान (१६२७-१६५८) आणि अबुल मुजफ्फर मोईउद्दीन ऊर्फ औरंगजेब (१६५८-१७०७) या मंगोल किंवा आपण उच्चारतो त्या मोगल बादशहांनी शेरशहा सुरी (१५४०-१५५५) याच्या पंधरा वर्षाचा अपवाद वगळता सलग दोनशे वर्षे राज्य केले. समुद्रमार्गे आलेल्या फिरंग्यांकडुन युद्धसाहीत्य विकत घेऊन आपापसात लढणार्‍या मुस्लिम राज्यकर्त्यांनी इ.स. १५६४ साली एकत्र येऊन तालीकोटच्या लढाईत विजयनगरचे हिंदू साम्राज्य दक्षिणेतुन समूळ नष्ट करून टाकले. आता हिंदूस्थानात मेवाड आणि माळव्यातले रजपूत सोडले तर कोणतेच हिंदू राज्य उरले नव्हते. १५५६ साली गादीवर आलेल्या अकबराने जमेल तेवढ्या सगळ्या मार्गांनी म्हणजे प्रसंगी सेनाबळाचा वापर करून तर प्रसंगी रजपूत राजकन्या जोधाबाईशी विवाह करून रजपूतांना कायमचे संपवले. तरी चितोडच्या रूपाने एक पणती अजूनसुद्धा तेवत होती. पुढे इ.स. १५६७ साली चितोडगडही अकबराच्या ताब्यात आल्यानंतर राणा उदेसिंग याने आपली राजधानी उदयपुरला हलवली पण त्यानंतर त्याची तलवार काही मोगलांविरूद्ध उठली नाही. पण उदेसिंगच्या मुलाने म्हणजे प्रतापसिंहाने राजवाड्यातील विलासी जीवनाचा त्याग करून अरवलीच्या दर्‍याखोर्‍यातुन मोगलांविरूद्ध चितोड मिळवण्यासाठी हल्ले चालूच ठेवले होते. शेवट या महाराणा प्रतापाचा हल्दीघाटीत जरी पराभव झाला तरीसुद्धा सिसोदीयांच्या प्रतिष्ठेची ध्वजा त्यांनी शेवटपर्यंत कायमच फडकत ठेवली.

       या जवळजवळ सहाशे वर्षांच्या पारतंत्र्यात सतराव्या शतकात कुणी एक व्यक्ती सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात जन्म घेते. पारतंत्र्याच्या पार्श्वभुमीवर फारसा कुणाचा आणि कुठलाच पाठींबा नसताना वडिलांकडून मिळालेल्या फक्त पुणे, सुपे परगणे आणि एक हजार पदातींच्या जोरावर शुन्यातून एक मोठे साम्राज्य उभे करते. हे सर्व देवानेच माझ्या हातून करून घेतलंय असं म्हणून शेवटी श्रेय सामान्यांच्याच पदरात घालते हे दैवी अवताराशिवाय कदापि शक्य नाही. किती आणि कोणत्या विपरीत परीस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. ज्याने तीनशे वर्षांत उध्वस्त झालेल्या या भूमीच्या संस्कृतीचा संसार पुन्हा नीटनेटका मांडला. ज्यांच्यामुळे घरासमोर सडे शिंपले गेले, देवघरात पुन्हा देव मांडले गेले, वृंदावनात तुळस लावली गेली, गोठ्यात गाय बांधली गेली, हिंदूंची प्रतिष्ठा वाढवून त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. स्वराज्यात कोणावर अन्याय म्हणून उरू दिला नाही. सर्वात मुख्य म्हणजे पारतंत्र्य नष्ट केले. स्वराज्य आणि धर्माचे राज्य निर्माण केले. अशा राज्याच्या राजाला सिंहासन नाही? छत्र नाही? असं नाही म्हटल्यावर काशीच्या पंडीत गागाभट्टांनी महाराजांना राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. गागाभट्टांनी महाराजांना राज्याभिषेकाचे महत्व आणि आवश्यकता सांगितली. संस्काराशिवाय मान्यता नाही हेही सांगितले आणि त्यासाठीच राज्याभिषेक करून घेतला पाहिजे असे आग्रहाने सांगितले आणि केवळ त्यानुसारच महाराजांनी शालिवाहन शके १५९६ च्या जेष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या त्रयोदशीला स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. हा राज्याभिषेक म्हणजे या भारतभूमीवर पुन्हा एकदा हिंदूंचं साम्राज्य निर्माण झाल्याचं द्योतक होतं.

🚩 विषयप्रवेश - 


       अकराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत म्हणजेच जवळजवळ सहाशे वर्षांच्या म्लेंछ राजवटीच्या उरावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या कारणासाठी तो दिवस आपण सर्व हिंदूंनी एकजुटीने 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणूनच साजरा करायला हवा. हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि संभाजीराजांनी कसे प्रयत्न केले? हे करण्यासाठी त्यांनी काय परराष्ट्रीय धोरण अंगिकारलं? कसा पत्रव्यवहार केला? अत्यंत विपरीत परिस्थितीतून साम्राज्य उभं करणाऱ्या महाराजांबद्दल त्यांच्या काही समकालिन व्यक्तींनी याविषयी काही लिहून ठेवलं आहे काय? वगैरे सर्व अभ्यासण्यासारखं आहे. इतिहास म्हणजे फक्त लढाया नाहीत तर आर्थिक, सामाजिक, परराष्ट्रीय धोरण, व्यापार अशा अनेक विषयांचा ससंदर्भ अभ्यास करणे आहे. खरं सांगायचं तर यासाठी संपूर्ण शिवचरित्राचाच बारकाईने अभ्यास करावा लागेल. या लेखापुुुढच्या प्रत्येक लेखात आपण महाराजांच्या समकालीन व्यक्तींनी त्यांच्याबद्दल काय लिहून ठेवलंय याची थोडक्यात माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपण सर्व हिंदूनी हा दिवस 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणूनच का साजरा करावा याची थोडीफार कल्पना नक्कीच येईल. शेवटी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते त्याचं अगदी नेमकेपणाने वर्णन केलंय, काय ते पाहू आणि थांबू. यातला एकही शब्द अतिशयोक्ती असलेला नाही. प्रत्येक शब्द अतिशय तोलूनमापूनच वापरलाय. बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ असा. समर्थ म्हणतात...

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥

🚩 संदर्भ -

१) राजा शिवछत्रपति - बाबासाहेब पुरंदरे
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स

🚩 व्हिडीओ स्त्रोत - 

whatsapp

या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...
भाग दुसरा - https://watvedilip.blogspot.com/2020/05/blog-post_9.html


समाप्त.

गुरुवार, २८ मे, २०२०

लेख चौथा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


       काल ज्येष्ठ शुद्ध द्वादशी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची हिंदू कालगणनेनुसार जयंती. थोरल्या महाराजांनी आनंदवनभुवनी हिंदवी राज्याची जी मोठी मोहिम मांडली होती ती संभाजी महाराजांनी तितक्याच समर्थपणे किंवा कांकणभर सरसच राबवली असेच म्हणावे लागेल. कालच्या त्यांच्या जयंतीनिमित्त आज हा लेख खास त्यांच्यासाठी.


श्रीगणेशायनम:
श्री लक्ष्मी प्रसन्न ॥ स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके ॥
१६१० वर्ष । वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्रशुद्ध
प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-
त मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-
मनायक याहीं विनंती केलि जे पुर्विं मुसलमाना
च्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डें घेत नव्हते. तेणेंकरून व्यावहारीक लोके सुखें
येत. तेणेंकरून राजगृहिं हासिल होय. आता हे
हिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडे घेउं लागले तेणेंकरून राजगृहिं
हासिलासी धक्का बैसला. त्यासि ते कृपाळु होउन आंगभाडें उरपासि जाव
दुडुवा अर्धकोसी चौदा दुडु घेत आहेति मना करावे पण काहि राजा-
गृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी
लें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाश क
रूं नये करतिल त्यांसि महापातक आहे ॥ श्लोक ॥ श्वकृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर: ॥ यो नश्यती पापात्मा स यती
नरकान् बहून् ॥ १ ॥ लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक: ॥ यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि ॥ २ ॥
दानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं ॥ दानात् स्वर्गमवा
प्नोति पाळणादच्युतं पदं ॥ या धर्मकार्या समस्तिं मान देवावे




       पुर्वीच्या काळी पत्रातून कुणी लेखी अर्ज केला असेल तर उत्तरपत्राच्या सुरवातीला अर्ज काय केलाय ते लिहिलेले असते आणि नंतर त्यावर काय निर्णय झाला ते दिलेले असते. बहुतेक निवाडापत्रांत, इनामपत्रांत असाच शिष्टाचार पाळलेला दिसून येतो. सार्वजनिक हिताची पत्रं बरेचदा ठिकाणी शिलालेखात कोरलेली आढळून येतात. असाच इसवीसन १६८८ सालचा संभाजीराजांचा एक शिलालेख सध्याच्या गोवा राज्यातल्या हडकोळण येथे सापडलेला आहे. हा 'हडकोळण शिलालेख' गोवा राज्य संग्रहालय पणजी येथे ठेवला आहे, जो आजही पहायला मिळतो.

🚩 संभाजीराजांचा हडकोळण शिलालेखाचा अर्थ

       श्री गणेशाय नम. श्री लक्ष्मी प्रसन्न. शालिवाहन शक १६१० विभवनाम संवत्सर गुरुवार चैत्र शुद्ध प्रतिपदा. गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश. व्यापार करताना बोटीने नदी ओलांडल्यावर पूर्वी मुसलमानी राजवटीत 'अंगभाडे' नावाचा कर घेतला जात नव्हता. आता हे हिंदूराज्य झाल्यापासून अश्याप्रकारचा कर घेतला जातोय. असे केल्याने मालाची ने-आण कमी झालेली आहे. त्यामुळे हा कर घेऊ नये असा अर्ज सामनायक नावाच्या व्यापार्‍याने क्षत्रियकुळावतंस छत्रपती शंभु महाराज यांचे मामले प्रांत फोंडा येथील मुख्यदेशाधिकारी धर्माजी नागनाथ यांना केला आहे.
       याला अनुसरून आता हा कर घेतला जाणार नाही. अशाच प्रकारचे कर आता भाणस्तरि, पारगाव, मांदुस येथेही घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारचे कर माफ केल्यामुळे लोकांना दिलासा मिळतो आणि व्यापारवृद्धी होते. हा लेख देवनागरी, संस्कृत आणि मराठी भाषेत हा लेख कोरलेला आहे आणि जो जो धर्मकृत्याचा नाश करेल त्याला पाप लागेल. तसेच धर्मकृत्याचा नाश करणारा नरकात जाईल, विष्ठेमधील कृमि होईल. या धर्मकृत्याचा मान ठेवावा अशी शेवटची शापवाणी मात्र संस्कृतमधे लिहिलेली आहे.




लेख चौथा...



🚩 'शंभूराजांनी रामसिंहाला लिहिलेले पत्र' 


       संभाजीराजांनी इसवीसन १६८२ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मिर्झाराजे जयसिंहाचा मुलगा रामसिंहाला पत्र लिहून दिल्लीची बादशाही फोडून यवनाधिपाला कारावासात घालण्याचा महामनसुबा रचला. त्यांनी 'दिल्लींद्रपदलिप्सवः' अशा वडिलांच्या प्रतिज्ञेची परिपूर्ती करण्याचा मनसुबा केलेला दिसतो.
       अंबरचा राजा रामसिंह हा आग्र्याच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा रक्षक होता. औरंगजेबास जामीन राहून त्याने शिवाजीराजांचे आणि संभाजीराजांचे संरक्षण केले होते. दुंदुभीनाम संवत्सरात संभाजीराजांच्या पराक्रमाची दुंदुभी अवघ्या महाराष्ट्रात वाजत होती. साहस, शौर्य, कर्तुत्वावरील दृढ विश्वास आणि मनाची उत्तुंग झेप इत्यादी गुणांचा प्रत्यय रामसिंहाला पाठवलेल्या पत्रातून आल्यावाचून राहत नाही.

          ॥ श्री ॥
          राम राम
          राजमान्य महाराज रामसिंहवर्मा
          श्रीविष्णुपादसेवापरायण अंतःकरण-प्रवृत्तीमुळे लाभलेले वैभव आणि भक्ती यांमुळे प्राप्त झालेल्या तेजोविशेषाने अलंकृत वर्णाश्रमधर्मावर घाला घालणार्‍या दुष्टप्रवृत्तीरूप सर्पांचा संहार करणार्‍या करारी गरूडाशी साम्य असणारे धीरोदत्त वीर ज्याने केलेल्या आक्रमणाचा प्रतिकार करणे कठीण, शत्रूचे पारिपत्य करणारे, भुमितलावर नि:संकोचपणे संचार करणार्‍या हत्तींचे गंडस्थळ फोडणारे, धारदार तलवारीप्रमाणे किंवा वाघनखासारखे संहारक, प्रचंड गर्जना करणार्‍या सिंहासारखे, विलक्षण सौजन्य आणि औदार्यामुळे ज्यांनी प्रतिष्ठित सज्जनांना आपलेसे केलेले आहे, मान्यताप्राप्त सज्जनांमध्ये श्रेष्ठ, स्वसंपादित अनेक गुणरत्नांची खाण असलेले महाशय यांसी-

          'आपले स्नेहांकित श्रीशंभुराजे यांच्या सांगण्यावरून येथील कुशल निवेदन करणारे हे पत्र आपणाकडे पाठवण्यात येत आहे. आपल्या कुशलाचीही ते प्रतीक्षा करीत आहेत. आपण आपल्या मनातील भाव पत्राने कळविला की दिल्लीच्या बादशहाशी विरोध करू नये, त्यांचा मान राखावा, परिणामी कुमार कृष्णसिंहाची बादशहाच्या सांगण्यावरून कशी अवस्था झाली ती जाणून काही राजकार्याचा हेतू मनी धरून आमच्याकडे आदरपुर्वक पत्र पाठविले की, सुलतान अकबराला आपल्या संनिध सांभाळले हे उचितच केले. आपले म्हणणे आम्हालाही मान्य आहे. आपण हिंदू दुबळे, सत्वहीन झालो आहोत, आपल्या देवालयांची मोडतोड झाली तरी स्वधर्मरक्षण करण्यास असमर्थ आहोत, धर्माचरणशून्य आहोत अशी त्या यवन बादशहाची समजूत झाली आहे. त्याची भरभराट होत आहे. क्षत्रिय या पदवीला न शोभणारे वर्तन आपल्या हातून होत आहे अशी आपली भावना आहे. श्रुतिस्मृति-प्रतिपादित वर्णाश्रम धर्म आणि प्रजापालनाचा राजधर्म यांना पोहोचणारी हानी आपणांला सहन होत नाही. दुष्ट यवन बादशहाच्या विरोधासाठीच यवन बादशहाने सेनापती मारले. काहींना तुरूंगात टाकले. काहींच्याकडून खंडणी घेऊन त्यांना सोडून दिले. काहींना सामोपचाराने सोडले. काही आपणच सैनिकांना लाच देऊन पळून गेले. अशा प्रकारे त्याचे सैन्य दुबळे झाले. अशा वेळी त्या यवनाधिपतीला तुरूंगात डांबले पाहिजे. देवालयांची स्थापना करून सर्वत्र धर्माचे रक्षण केले पाहिजे असे मनांत आणून त्याप्रमाणे आचरण करावे असा आमचा हेतू आहे.
       आपण सप्तराज्यसंपन्न आहात. धैर्य धरून आम्ही आरंभलेल्या मुसलमानांचे पारिपत्य करण्याच्या कामी आपण आम्हाला सहाय्य केले तर काय होणार नाही?अशा स्थितीत आपण आपले कर्तव्य विसरून स्वस्थ बसला आहात याचे आम्हाला आश्चर्य वाटते.
       दुसरी गोष्ट अशी की, दुर्जनसिंह हाडाची मातबरी ती काय? त्याच्यापाशी पैसा किती आहे हे आपण जाणताच. आम्हालाही ठाऊक आहे. पण त्याने हे धाडस करून खजिन्याची लुट कशी केली ते आमच्या पत्रावरून कळले असेल. तसेच तो शेजाराला असल्यामुळे आपल्या कानांवर आले असेलच. त्या कामी आम्ही येथून जे करीत आहोत तेच तेथूनही करावे. आता अकबर आणि दुर्गादास यांना गुर्जर (गुजरात) देशात पाठवण्यात येत आहे. तर आपण धाडस करून जे कर्तव्य ते अवश्य करावे. पठाणाधिपती शहा अब्बासच्या नावे पत्र पाठवले की, त्याने अकबराला आश्रय द्यावा. तथापि यवनाला एवढे मोठेपण द्यावे हे अनुचित आहे. पुज्य श्री महाराजांनी (मिर्झाराजे जयसिंह) या दुष्ट यवनाला दिल्लीचा बादशहा करून लौकिक संपादिला. हे त्यांना वगळून तुम्ही आणि आम्ही मिळून अकबराला बादशहा करावे. त्यायोगे स्वधर्म-रक्षण होईल आणि महाराजा जयसिंहाप्रमाणे आपणांलाही लौकिक लाभेल.
       अधिक तपशिल कवी कलशाच्या पत्रावरून तसेच जनार्दन पंडितांच्या पत्रावरून व प्रतापसिंहाचे तोंडून आणि हेरांकरवी समजेल. आपले कुशल निरंतर कळवीत असावे. सुज्ञास बहुत काय लिहणे.



🚩 छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून केशव पंडितांनी लिहिलेल्या 'राजारामचरितम्' ग्रंथात संभाजीराजांचे सार्थ वर्णन केले आहे ते असे -

महाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् ।
श्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ॥ ५ ॥
संभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा' ।
विलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ॥ ६ ॥


अर्थ - सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.

🚩 संदर्भ -

१) ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
२) महाराष्ट्रदेशा - श्री. पंकज समेळ


🚩 फोटो स्त्रोत -

१) कौस्तुभ कस्तुरे यांच्या ब्लॉगमधून साभार
२) 'महाराष्ट्रदेशा' या श्री. पंकज समेळ यांच्या ब्लॉगमधून साभार

       संभाजी महाराजांच्या या राजकारणाला जर यश आलं असतं तर आज भारताचा इतिहास काही वेगळाच असता. पण इतिहासाला काही ही जरतरची भाषा समजतच नाही. मागे घडून गेलेला इतिहास बदलणं आपल्या कुणाच्याच हातात नाही, पण भूतकाळात झालेल्या चुकांमधून काही शिकून भविष्यात त्या चुका टाळणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. नाही का?

बहुत काय लिहिणें. आपण सुज्ञ असा.

या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...


समाप्त.

बुधवार, २७ मे, २०२०

लेख पाचवा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


फॕक्टरी रेकॉर्ड राजापुर
पृष्ठ १०९
फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शके १५८१
१३ फेब्रुवारी १६५९/६०

हेन्री रेव्हिंग्टन ते शिवाजी

       राजापूर, हेन्री रेव्हिंग्टन --- शिवाजी हिंदूसेनाधिपती
       दंडाराजपूरप्रकरणीं आपल्याकरितां इंग्रजांनी किती दोस्तांचे वचन दिले आहे हे दोरोजी व इतर अधिकार्‍यांनी कळविलेच असेल. तुमचे लोकांकडून आम्हांला किती त्रास झाला आहे हे सांगता पुरवत नाहीं. परंतु कृपा करून इतकेंच लक्षांत घ्यावे कीं (राजापूर बंदरात असलेली गलबते मराठ्यांच्या ताब्यात देऊन) आमचे मित्रांचे शत्रुत्व आम्हीं पत्करले नाहीं एवढ्याकरितां एक दलाल आणि एक इंग्रज त्यांनी २५ दिवसांपर्यंत कैदेत ठेविले! दलाल सोडून दिला. परंतु इंग्रजाला खारेपाटणांत अडकवून ठेविला आहे ! आम्हांला यानें खेद होत असून इतर व्यापार्‍यांना सर्वत्र दहशद बसून व्यापाराला धक्का बसला आहे. आपण हुकूम पाठवून आमचा माल व मनुष्य परत द्याल अशाबद्दल खात्री असल्यामुळें धीर धरून आहोंत.



       अफजलखान स्वारीच्या वेळी त्याच्या एकूण तीन गलबतांपैकी दोन गलबते जैतापूरला तर एक गलबत राजापूरला इंग्रजांच्या ताब्यात होती. ती घेण्यासाठी राजापूरच्या सुभेदाराने जैतापूरला ५००-६०० तर राजापूरला २०० माणसे पाठवली होती. ती जहाजे इंग्रजांनी ताब्यात दिली नाहीत म्हणून शिवाजीच्या माणसांनी म्हणजे मराठ्यांनी गिफर्ड नावाचा एक इंग्रज आणि एक दलाल यांना पकडून खारेपाटणला नेलं. पुढे मराठ्यांनी त्या दलालाला सोडून दिलं पण गिफर्डला काही सोडलं नाही. त्यामुळं त्याच्या सुटकेसाठी हे पत्र हेन्री रेव्हिंगटनने शिवाजी महाराजांना लिहिलेलं आहे. याच आशयाची पत्रे त्याने सुरतेच्या इंग्रजांना, फाजलखानाला आणि रुस्तुमजमा यांना देखील लिहिलेली आहेत. आपल्या माणसाच्या सुटकेसाठी हे इंग्रज किती धडपड करत हेच यावरून दिसून येतं. महाराजांना पाठवलेल्या पत्रात तो महाराजांचा उल्लेख 'Sevagy, Generall of the Hendoo Forces.' असा करतो. पत्र पहिल्यापासून अगदी नीट वाचलं तर इंग्रज किती धोरणी होते ते लगेचच लक्षात येईल. खरंतर 'इंग्रजांचं पत्रलेखनकौशल्य' या विषयावर एक संपूर्ण लेख लिहिता येईल. त्यामुळे अशा प्रत्येक शब्द तोलूनमापून वापरणार्‍या इंग्रजांच्या या पत्रावरूनच शिवाजी महाराजांचं राज्य हे 'हिंदू राज्य' होतं हे अधिकच स्पष्ट होतं.



लेख पाचवा...


🚩 'शिवाजीराजांचे मिर्झाराजे जयसिंग यांना पत्र'


       हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे रजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे बाबरवंशाची राजलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे प्रबल व प्रौढ जयशहा! ‘सेवाचा’ (शिवाजीचा) प्रणाम व आशिर्वाद स्वीकार. परमेश्वराने तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे की, मजवर हल्ला करण्यासाठी व ‘दख्खण’ जिंकण्यासाठी तूं आला आहेस. हिंदूंचे हृदय व नेत्र यांच्या रक्तानें तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे लक्षात आले नाही की, याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे. कारण, या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तूं क्षणमात्र अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे व झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग कोणाच्या रक्ताचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल. जर तू आपणहुन दक्षिणदेश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर वा डोळे तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी सेना घेऊन आलो असतों आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमि तुला जिंकून दिली असती. पण, तू सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापांस भुलून इकडे आला आहेस. तेव्हा या वेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे तर त्यात मर्दपणा नाही, कारण मर्दलोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवीत नाही. बरें, जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला, तर दोनहि बाजूंनी हिंदुंचीच हानी होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर कामासाठी माझ्या तरवारीस म्यानांतून बाहेर पडावे लागेल! जर या लढाईसाठी स्वत: तुर्क आला असता तर आम्हां वीरपुरुषांना घरबसल्या शिकार लाभल्यासारखे झाले असते. पण जेव्हा अफजलखां आणि शाईस्ताखां यांच्या हातून काम झेपत नाही असे दिसलें तेव्हा तुला आम्हांशी युध्द करण्याकरितां नेमलें आहे. कारण स्वत: औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदुलोकात कोणी बलशाली राहू नये आणि सिंहानी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढ नीती तुझ्या ध्यानांत येत नाही. यावरून त्याच्या जादूने तुला भूल पाडली आहे असे प्रत्ययास येते. तू जगात बरे वाईट पुष्कळ प्रसंग पाहीले असशील, बागेत तू फुले व कंटक या दोहिंचाही संचय केला असशील, पण आम्हां लोकांशी युद्ध करून हिंदूंचे शीर धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता सादीच्या या वचनाचे स्मरण कर. “सर्व ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते.” व्याघ्र मृगादि प्राण्यांवर व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर तुझ्या तीक्ष तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोदून टाक. जर या देशाचे राज्य दारा शिकोह यांस मिळाले असते, तर आम्हां लोकांवर त्यांनी कृपा, अनुग्रह केला असता. पण तू जसवंतसिंगास दगा दिलास व उच्चनीच यांची पारख तुला करता आली नाही. आजवर किरकोळ शत्रूंशी गाठ पडल्यामुळे तुझा दम कायम राहिला आहे. पण तू आता सिंहाशी युद्ध करायची धिटाई करून आला आहेस. एवढ्या धावपळीने तुला काय मिळत आहे! तूं मृगजळाच्या मागे धावत आहेस. एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या शत्रूच्या स्वाधीन करावी, अशा तुच्छ व्यक्तीसारखा तू आहेस! तू या नीचाच्या कृपेचा काय अभिमान धरतोस? जुझारसिंहाच्या कामाचा परिणाम काय तुझ्या लक्षांत येत नाही?

       कुमार छत्रसाल याच्यावर तो कशा प्रकारची आपत्ती आणू पहात होता, हे तू जाणतोस. या खेरीज इतर हिंदुलोकांवर या दुष्टाच्या हाताने काय काय अनर्थ झाले आहेत हेही तुला माहिती आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा वा भावांचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब सांगत असशील तर तू शहाजहानशी कसे वर्तन केलेस त्याचे स्मरण कर. जर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मर्दपणाची चाड असेल तर तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने पडणाऱ्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा नाही. कारण हिंदूलोकांवर या वेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे. आमची पोरेबाळे, देश, धन, देव व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेल तर आम्हां हिंदुलोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर रहाणार नाही! मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर पहा. आम्हा बरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो, व चेहऱ्यावर कसकसे रंग आणितो, आमच्याच पायात आमचीच बेडी अडकवतो व आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापतो ते लक्षात घ्या. आम्ही लोकांनी या वेळी हिंदू, हिंदुस्थान वा हिंदुधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तरवारीस पाणी देऊन (जशास तसे या न्यायाने ) तुर्काचा जवाब तुर्कीतच दिला पाहिजे. जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंग व मेवाडचा राजा राजसिंग यांच्याशी ऐक्य करतील तर फार मोठे काम होईल अशी आशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या सर्पाचे डोके दगडांनी ठेचून काढा म्हणजे काही काळ पर्यंत तरी त्याला दक्षिण प्रांतात त्याचे जाळे पसरता येणार नाही. तेवढ्यात मी वा माझे भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोनहि बादशाहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारींचा पाउस पाडीन आणि सर्व दक्षिण देशांच्या पटावरून इस्लामाचे नांव किंवा चिन्ह धुवून टाकीन. त्या नंतर कार्यदक्ष वीर आणि भाला चालविणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन प्रचंड लाटा वा कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशांतील पहाडांतून बाहेर पडून मैदानात येईन आणि अत्यंत जलद गतीने तुम्हा लोकांच्या सेवेत हजर होईन व तुम्हांस हिशेब विचारीन. चोहींकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात दंगल माजवून आम्ही लोकं आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्यांच्या जर्जर झालेल्या घरात पोहोचवू, म्हणजे त्यांच्या नावाचे औरंगहि (राजसिंहासन) राहणार नाही व जेब (शोभा) हि राहणार नाही. तसेच त्यांची तलवार राहणार नाही व कपटाचे जाळेही राहणार नाही. शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण करू. हे काम काही फार कठीण नाही. फक्त हृदय व डोळे आणि हात याची आवश्यकता आहे. दोन अंत:करणे एक होतील तर पहाड तोडता येईल व मोठ्या सैन्याच्या समूहाच्या ठिकऱ्या उडवता येतील. या विषयासबंधी मला तुझ्याशी फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्री लिहिणे सयुक्तिक नव्हे. तूं म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन, माझा बेत तुला कळवीन. तलवारीची शपथ, घोड्याची शपथ, देशाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही. अफजलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षात आणून तू शंकीत होऊ नको. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेवले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालवला नसता, तर या वेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते? मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण, तुझ्या माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आले, तर रात्री मी एकटा तुझ्या भेटीस येईन. शाहिस्तेखानाच्या खिशांतून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन. तुझ्या डोळ्यांवर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा खरा फलादेश करून नंतर तुझा जवाब घेईन. जर या पत्राचे उत्तर माझ्या मनाजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकालांत लपवील तेव्हा माझा अर्धचंद्र (तरवार) म्यानांतून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.

🚩 संदर्भ -

शिवकालीन पत्र-सार-संग्रह - खंड पहिला - पत्र क्रमांक ८०१ आणि १०४२.

🚩 फोटो स्त्रोत -

English Records On Shivaji(1659 - 1682).

       मागच्या लेखातले शंभूराजांनी रामसिंहला लिहिलेले आणि या लेखातले शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना लिहिलेले अशी दोन्ही पत्रे जर का नीट वाचली तर त्या काळच्या मराठ्यांच्या मोगलांविरोधी राजकारणाची थोडक्यात कल्पना येते. दोन्ही पत्रांचा तर्जुमा साधारण सारखाच आहे. त्यामुळे संभाजीराजेही महाराजांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचाच कित्ता गिरवत होते हे लक्षात येईल. शिवाजीराजे आणि शंभूराजे या दोघांच्या एकत्रित काळात अपवाद वगळता मराठे आणि रजपुत हे दोनही हिंदू कधीही एकत्र आले नाहीत. इतिहासापासून धडा न घेतल्याने भारतात आलेल्या प्रत्येक आक्रमकाने हिंदूंमधल्या दुफळीचा कायमच फायदा घेतलेला दिसून येतो. आजही जर बघायला गेलं तर फार काही वेगळे चित्र पहायला मिळत नाही त्यामुळेच 'हिंदूंचा नेमका शत्रु कोण?' हे आजतागायत हिंदूंनाच समजलेले नाही असेच दु:खाने म्हणावे लागेल.
बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.


या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...
भाग सहावा


समाप्त.

लेख सहावा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


उत्सादितां चिरतरं यवनै: प्रतिष्ठाम् ।
शोणाचलेशितुरयं विधिवद्विधाय ॥
श्रीमुष्णवृद्धगिरिरूक्मसभाधिपानां ।
पूजोत्सवान् प्रथयातिस्म सहात्मकीर्त्या ॥ ८० ॥

कृते म्लेच्छोच्छेदे भूवि निरविशेषं रविकुला ।
वतंसेनात्यर्थे यवनवचनैर्लुप्तसरणिम् ॥
नृपाव्याहारार्थे स तु विबुधभाषां वितनितुं ।
नियुक्तोsभूत् विद्वान्नृपवरशिवच्छत्रपतिना ॥ ८१ ॥

सोsयं शिवच्छ्त्रपतेरनुज्ञां ।
मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि ॥
अमात्यवर्यो रघुनाथनामा ।
करोति राजव्यवहारकोशम् ॥ ८२ ॥

उद्देशाय गृहीताsत्र म्लेच्छभाषा न दुष्यति ।
नापेक्षते किं रत्नानि खचितुं जतु जातुचित् ॥ ८३ ॥

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादशविडंबनै: ।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥ ८४ ॥


       हे श्लोक रघुनाथ नारायण हणमंतेंनी लिहिलेल्या 'राजव्यवहारकोश' या ग्रंथाच्या प्रास्ताविकातील आहेत. कर्नाटकातल्या तिरूवेन्नामलाई येथे जे 'शोणाचलपती'चे पुरातन मंदीर होते ते पाडून म्लेंच्छांनी त्या जागेवर मस्जिद बांधली होती. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून अमात्यांनी मंदीराच्या जागेवर असलेली मस्जिद तोडून त्याच जागेवर पुन्हा शोणाचलपतीचे मंदीर बांधले. शोणाचलपती हे जसे शंकराचे मंदीर आहे तसेच तिथे असलेल्या विष्णुच्या म्हणजे पेरामलच्या मंदीराच्या जागेवर असलेली मस्जिद पाडून त्या जागेवर सुध्दा महाराजांच्या आज्ञेवरून पुन्हा मंदीर बांधण्यात आलं. म्लेंच्छांच्या भितीने आजूबाजूच्या मंदीरांच्या ज्या पुजाअर्चा थांबल्या होत्या त्याही परत सुरू करण्यात आल्या. खरंतर अशी अजूनही काही उदाहरणं देता येतील पण त्यातला नार्वेचा सप्तकोटेश्वर आणि श्रीशैल्यचा मल्लिकार्जुन ही बर्‍याच जणांना माहिती असलेली उदाहरणं आहेत. महाराजांनी मस्जिदींना इनाम दिल्याचं एकही उदाहरण, अगदी वानवीदाखल सुद्धा सांगता येणार नाही पण मंदीरे, मठ, संत, शास्त्रार्थ करणारी मंडळी यांना इनामं दिल्याची शेकडो इनामपत्र, खुर्दखतं आज पहायला मिळतात. चिंचवडचे मोरया गोसावी, पाटगावचे मौनीबाबा, प्रतापगडची भवानी, पुण्यातला कसबा गणपती यांना इनाम दिल्याचे अस्सल दस्तऐवज आज उपलब्ध आहेत. नुसतं मंदीरांचच नाही तर नेतोजी पालकर आणि बजाजी निंबाळकर यांना सुद्धा त्यांनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतल्याचं आपल्याला पहायला मिळतं.
       मुसलमानी राजवट जवळजवळ पाचशे-सहाशे वर्षे राज्य करत असल्यामुळे साहजिकच फार्सी भाषेचा पगडा इथल्या बोली भाषेवर झालेला होता. त्याकाळात रोजच्या वापरात फार्सी शब्द आणि मुसलमानी कालगणना सर्वत्र प्रचलित होती. परकीय भाषेचा, कालगणनेचा वापर आपल्या रोजच्या वापरात असणं हे देखील एक पारतंत्र्यच आहे हे महाराजांनी पुरतं ओळखलेलं होतं म्हणूनच त्यांनी कालगणनेसाठी राज्याभिषेक शक आणि भाषाशुध्दीसाठी राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी भाषेवर फार्सी भाषेचा असलेला पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी जिंकून घेतलेल्या भूभागातल्या शहरांची, किल्ल्यांची नावं बदलली हा सुध्दा एक मानसिकता बदलण्यासाठीच केलेल्या कामाचा एक भाग होता.
       मुसलमानांनी मंदीरं फोडून मस्जिदी बांधल्या तर त्याच मस्जिदी तोडून महाराजांनी पुन्हा त्याच जागेवर मंदीरं बांधली, मुसलमानांनी जबरदस्तीने धर्मांतरण केलं तर महाराजांनी पुन्हा त्यांना स्वधर्मात घेतलं. राज्याभिषेकापासून कार्यालयीन व्यवहारात देवनागरी शब्दांचा आणि हिंदू कालगणनेचा वापर करण्यास सुरूवात केली. इस्लामच्या बुरख्याआडून मुसलमानांनी जे जे अत्याचार हिंदूवर केले त्यांना अगदी जशासतसं उत्तर महाराजांनी दिलं. यावरून हेच स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हिंदूंसाठी हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली आणि हेच त्यांचं प्रयोजन होतं. मला वाटतं आता तरी यावर कुणाचं दुमत नसावं.



लेख सहावा...


स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ४२, मन्मथनाम संवत्सरे,
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी, गुरूवासरे, क्षत्रियकुलावतंस
श्रीराजा शंभुछत्रपती स्वामी यांणी समस्त कार्यधुरंधर
विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य
हुकुमतपन्हा यांसी आज्ञा केली यैशी जे

🚩 "दिगंत विख्यात कीर्ति संपादिली! तें हें राज्य!"


       ज्या राज्यावर औरंगजेबासारिखा सबळ शत्रु चालोन आला असतां हतप्रभ होऊन गेला, ते हे राज्य, औरंगजेब याणें याराज्यानिमित्त आपला संपूर्ण पराक्रम व अर्थवैभवादि सर्व शक्ती वेचिली, तथापि श्रीकृपाकटाक्षवीक्षणें सकलहि निर्फळ होऊन परिणामीं हतोद्यम, हतोत्साह होत्साता पराङ्मुख होऊन यमालयास गेला. परंतु, औरंगजेब चौपन्न पातशाहीचा धनीं, सैन्यादि देशकोशविषयीं अद्वितीय बुद्धीमान, किंबहूना, या पृथ्वीतलाचे ठायीं 'दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा' यैसी ज्याची प्रख्यात आख्या, यैसे महाशत्रुशी संग्रामप्रसक्त जाहलियावर त्याचा पराजय विनाश्रम, स्वल्प सायासें होणें परम कठीण, तदनुरुपच परस्परे समर प्रसंगातिशयामुळें संपूर्ण राज्यांतील प्रजा पीडा पावली. कित्येक देश निराश्रयित जाहले. संपूर्ण मार्गावरोध होऊन इतर देश-द्विपांतरीहून वस्तुजात येणें राहिली, तैसेच सैनिक कितेक या दृढ बुद्धीनें शरीरावस्था न पाहतां स्वामिकार्यावरिं क्षात्रधर्में शाश्वतलोकाश्रयित जाहले. कितेक हतसैन्य होत्साते कुंठीत पराक्रम होऊन शत्रुस मिळोन गेले. कितेक स्वामी शत्रुसमरव्यसनासक्त पाहून दुर्बुद्धीतिमिरांधतेनें स्वाधीन केलीं देशदुर्गें स्वतंत्रवादें आक्रमुन बैसले. राजशासन स्वल्पतेमुळें स्थळोस्थळीं प्रत्यक प्रत्यक स्तोमें होऊन परस्परे कलहास प्रवर्तले. या विषम संधीमध्यें शामलादि क्षुद्रांस अवकाश पडून बद्धमुल जाहले. अवशिष्ट देश उदवस व दुर्गे सांग्रामिक सामग्रीविरहित जाहलीं. राजमर्यादा राहून गेली.

       पाहता येकेके प्रसंग अनर्थाचेच कारण, तथापि, श्रीस या राज्याचा व स्वामीचा पूर्ण अभिमान. पुढे प्रतिपश्चंद्रन्यायें दिनप्रतिदिनीं या राज्याची अभिवृद्धी व्हावी हे श्रीइच्छा बलवत्तर. तदनुरुप या संभावितवंशी स्वामींचा जन्म जाहला आहे. तीर्थरुप थोरले कैलासवासी स्वामी यांणी हे राज्य कोणें साहसे वा कोणें प्रतापे निर्माण केलें. याच वंशी आपण निर्माण जालों असतां पैसा विस्कळीत प्रसंग हे तो गोष्ट परम अनुचित.

       या अर्थें तीर्थरूप कैलासवासी महाराज साहेब यवनाश्रयें असतां त्यापासोन पुणें आदिकरून स्वल्प स्वास्ता स्वतंत्र मागोन घेऊन पंधरा वर्षांचें वय असतां त्या दिवसापासोन तितकेच स्वल्पमाचे स्वसत्तेवर उद्योग केला,

       तैसेच 'उद्योगिनं पुरूषसिंहमुपैति लक्ष्मी:' या दृढ बुद्धीने शरीरास्था न पाहतां केवळ अमानुष पराक्रम, जे आजपर्यंत कोण्हे केले नाहींत व पुढे कोण्हाच्याने कल्पवेना यैसे स्वांगें केले. मनुष्य-परीक्षेने नूतन सेवक नवाजून योग्यतेनुसार भार वाढवून महात्कार्यापयोगी करून दाखविले. येकास येक असाध्य असतां स्वसामर्थ्ये सकळांवरी दया करून येकाचा येकापासोन उपमर्द होऊ न देतां, येकरूपतने वर्तवून त्या हातून स्वामिकार्ये घेतलीं. दक्षिणप्रांते इदलशाही, कुतुबशाही, निजामशाही ही महापराक्रमी सकलार्थे समृद्धिवंत संस्थानें, तसेच मोगल येकेके सुभा लक्ष लक्ष स्वारांचा, याविरहित, शामल, फिरंगी, इंगरेज, जवार-रामनगरकर, पालेकर, सोंधे, बिदनूर, म्हैसूरवाले, त्रिचनापल्ली आदिकरून संस्थानिक तैसेच जागां जागां पुंड पाळेगार व चंद्रराव, सुरवे, सिर्के, सावंत, भालेराव, दळवी, वरघाटे, निंबाळकर, घाटगे, माने आदिकरून देशमुख कांटक सकलहि प्राक्रमी, सजुते, सामानपुर असतां बुद्धिवैभवें व पराक्रमें कोण्हाची गणना न धरितां, कोण्हावरी चालोन जाऊन तुंबळयुद्ध करून रणास आणिलें. कोण्हावरी छापे घातिले, कोण्हास परस्परे कलह लाऊन दिल्हे, कोणास मित्रभेद केले, कोण्हास परस्परें कलह दिल्हे, कोण्हाचे मित्रभेद केले, कोण्हाचे डेरियात शिरोन मारामारी केली, कोण्हासी येकांगी करून पराभविलें, कोण्हासि स्नेह केलें, कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोण्हास आपले दर्शनास आणिले, कोण्हास परस्परे दगे करविले, जे कोण्ही इतर प्रयत्ने नाकळेत त्यांचे देशांत जबरदस्तीने स्थळें बांधोन पराक्रमे करून आकळिले. जलदुर्गाश्रयित होते त्यांस नूतन जलदुर्गच निर्माण करून पराभविलें. दुर्घटस्थळीं नौकामार्गे प्रवेशले. यैसे ज्या ज्या उपायें जो जो शत्रु आकळावा तो तो शत्रु त्या त्या उपायें पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंतापासून चंदी कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य शतावधी कोट किल्ले, तैसेचि जलदुर्ग व कितेक विषम स्थळें हस्तगत केलीं. चाळीस हजार पागा व साठ-सत्तर हजार सिलेदार व दोन लक्ष पदाती, कोट्यवधी खजाना तैसेच उत्तम जवाहीर सकळ वस्तुजात संपादिलें. शहाण्णवकुळीचे मराठ्यांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविलें. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थानीं स्थापून यंजन याजनादि षट्कर्म वर्णविभागें चालविलीं. तस्करादि अन्यायी यांचे नांव राज्यांत नाहींसे केलें. देशदुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करून येकरूप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिखा महाशत्रु स्वप्रतापसागरीं निमग्र केला. दिगंत विख्यात कीर्ति संपादिली! तें हें राज्य!

🚩 संदर्भ -

१) आज्ञापत्र - रामचंद्र पंडित अमात्य लिखित
२) राजव्यवहारकोश - रघुनाथ पंडीत अमात्यकृत


       शिवशाहीतील राजनितीचे निरूपण करणारा 'आज्ञापत्र' हा एक मौलिक ग्रंथ म्हणावा लागेल. राजाराम महाराजांना राजसबाईंपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापुरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४) त्यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले. ज्यायोगे थोरल्या महाराजांनी साम्राज्य उभं केलं त्या 'राज्याचे सार ते दुर्ग' असा आज्ञापत्रकारांचा अंतीम निष्कर्ष आहे. गडकोटासंबंधीचे विवेचन त्यांनी अत्यंत बारकाईने केलेले आहे. आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे असे सांगून 'ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र' असे मार्मिकपणे नमूद केले आहे.

🚩 उपसंहार -

       शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी नेमकं काय केलं? तर पहिल्यांदा स्वतःमधे आणि नंतर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला. आपल्याकडे एक म्हण आहे 'शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजाऱ्याच्या घरात', थोडक्यात असा विचार खुद्द महाराजांनी केला असता तर कविभुषणच्या म्हणण्याप्रमाणे 'सुनति होत सबकी' अशी परिस्थिती आज नक्कीच झाली असती. समाजात बदल व्हावा असं जर वाटत असेल तर आज प्रत्येकाने स्वतःमधे असलेल्या 'शिवाजी' ला पहिल्यांदा जागं करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने मनावर घेतलं तर असं नक्कीच होऊ शकतं.
       या लेखांचा विषय हिंदू संस्कृतीचा असल्याने यात आर्थिक, सामाजिक, परराष्ट्रीय धोरण, संरक्षण, व्यापार, करपद्धती अशा इतर विषयांबद्दल मुद्दामच काही लिहिलेलं नाही. महाराजांनी नेमकं काय केलं याची पुढील काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.

१) संस्कृत मुद्रा.
२) मस्जिदी तोडून त्याच जागी पुन्हा मंदिरे बांधली.
३) धर्मवृध्दीसाठी धार्मिक स्थळे, मठ, संत-महंत, शास्त्रार्थ करणाऱ्या मंडळींना इनामं दिली.
४) गावांची, किल्ल्यांची नावे बदलली.
५) राजव्यवहारकोश लिहून भाषाशुद्धी केली आणि ती व्यवहारात आणली.
६) स्वदेशी चलन सुरू केले.
७) नवीन कालगणना सुरू केली.

       थोडक्यात जनमानसावर असलेली म्लेंच्छांबद्दलची भीती कमी केली, त्यांचा हिंदूवर असलेला वर्चस्वाचा पगडा कमी केला आणि त्या सोबतच हिंदूंचं मनोधैर्यही वाढवलं.

       आत्तापर्यंत पोस्ट केलेल्या सहा लेखात आपण काही अस्सल साधनांमधून शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं प्रयोजन नेमकं काय होतं हे पाहिलं. एक हिंदू म्हणून प्रत्येकाला ते अभिमानास्पदच आहे. खाली दिलेल्या काही साधनांव्यतिरिक्त अजूनही काही साधनांमधून या विषयीचे संदर्भ नक्कीच सापडू शकतात. हे ग्रंथ समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेले आहेत त्यामुळे इतिहासाची आवड असणार्‍यांना यातून बरंच काही अस्सल आणि नवीन सापडेल.

१) राधामाधवविलासचंपू आणि पर्णालपर्वतग्रहण आख्यान - जयराम पिंड्ये
२) शिवभारत - कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर
३) शिवराजभुषण - कविभुषण
४) राजव्यवहारकोश - रघुनाथ नारायण हणमंते
५) सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद
६) आज्ञापत्र - रामचंद्र पंडीत अमात्य
७) बुधभुषण - छत्रपती संभाजी महाराज
८) नामदेवशास्त्री बाकरे दानपत्र - छत्रपती संभाजी महाराज
९) English Records On Shivaji / शिवकालीन पत्र-सार-संग्रह

       ०१ जूनपासून सुरू असलेल्या या लेखमालेचा आज समारोप करतो आहे. हे लेख केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता शिवछत्रपतींना, शंभूराजांना आणि स्वातंत्र्यवीरांना अपेक्षित एक 'हिंदू' म्हणून पाहिल्यास कुणालाच काही आक्षेप नसावा. त्यामुळे सिंधुनदीपासुन ते सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या या भुमीत राहणार्‍या प्रत्येकाला तो हिंदू असल्याचा अभिमानच वाटेल.
       शिवराज्याभिषेक दिन हा 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणूनच का साजरा करावा यासाठी लिहिलेली ही लेखमाला आपल्या सर्वांना नक्कीच आवडली असेल. या लेखमालेत दिलेले सर्व पुरावे हे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नसून एक 'हिंदूराष्ट्र'च होतं यावर विश्वास ठेवण्यास नक्कीच पुरेसं आहे. पुढे पेशवाईतही आपल्याला या संदर्भातले अनेक पुरावे मिळतात फक्त ते जगापुढे आणून स्वराज्य 'हिंदवी'च होतं हे दाखवून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे आणि त्यासाठी एका व्रताप्रमाणे झिजूनच काम करावं लागेल. आपण सर्व हिंदूंनी यासाठी कायमच प्रयत्नशील असलं पाहिजे.
बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.

       'उत्तम लेख लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण तो लिहिताना आणि वाचतानाही त्याचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो एकूण प्रवासच सुंदर होतो आणि गेल्या सहा दिवसांत माझ्यासोबत तुमचाही तो नक्कीच झाला असेल अशी आशा करतो.
       या लेखमालेतील लेख वाचून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी वाद हे तात्त्विक असावेत नाही का?
लेखनसीमा.

       या सहा भागांच्या लेखमालेचे पहिले सर्व भाग पुढे ओळीने दिलेल्या या धाग्यांवरून वाचता येतील...






समाप्त.

लेख तिसरा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


इन्द्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर ।
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं ॥
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज है ॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं ॥
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर ।
त्यौं म्लेंच्छ बंस पर, सेर शिवराज हैं ॥


लेख तिसरा...


🚩 'सिवाजी न होते तो सुनति होत सबकी'


दुज कनौज कुल कस्यपी, रतनाकर सुत धीर ।
बसत त्रिविक्रमपुर सदा तरनि-तनूजा-तीर ॥ १॥
बीर बीरबरसे जहां उपजे कवि अरु भूप ।
देव विहारीश्वर जहां विश्वेश्वर तद्रूप ॥ २॥

       भारतात उत्तरेकडे असलेल्या कानपूर जिल्ह्यात यमुना नदीच्या काठावर त्रिविक्रमपूर नावाचे एक गाव आहे. या त्रिविक्रमपूरात रत्नाकर त्रिपाठी (तिवारी )(१) नावाचे कश्यप गोत्री ब्राह्मण रहात असत. हे रत्नाकर त्रिपाठी एक उत्तम कवी होते. त्यांना चिंतामणी, भूषण, मतिरा आणि नीलकंठ अशी चार मुलं होती. ही चारही मुलं सुद्धा उत्तम कवी होती. या चौघांपैकी कविभूषण हे त्यातल्यात्यात अजूनच नावाजलेले कवी. या भूषण कवींनी स्वतःविषयीची माहिती शिवराजभूषण या ग्रंथात दिलेली आहे.

       दक्षिणेतले दुर्गम किल्ले जिंकल्यामुळं शिवाजी महाराजांची किर्ती देशभर पसरलेली होती. इ.स. १६६७ साली कविभूषण महाराजांची किर्ती ऐकुन त्यांना भेटण्यासाठी आले. कविभूषणांनी आपल्या काव्य नायकाचं यथोचित वर्णन 'शिवराजभूषण' या ग्रंथात केलं आहे. या संपूर्ण ग्रंथात एकूण ४४२ छंद आहेत. शिवाजीराजांच्या पराक्रमांचे वर्णन कविभूषणांनी समकालीन असल्यामुळं प्रत्यक्ष पाहिल्याप्रमाणं लिहिलं आहे. राज्याभिषेकाच्या वेळी ते उत्तरेतून रायगडावर आले. राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांनी दरबारांत निवडक ५२ छंद म्हणून दाखवले. त्या ५२ छंदांना 'शिवाबावनी' म्हणून ओळखलं जातं. शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर मुसलमानी आक्रमकांनी हिंदूंची आणि हिंदू धर्माची अतिशय दैना केली असती. देवता व देवालये यांचा मुसलमानांनी केलेला विध्वंस, जबरदस्तीने इस्लामी धर्माचा प्रसार करण्याची त्यांची महत्वाकांक्षा याचं वर्णन कविभूषणांनी योग्य पद्धतीनं शिवाबावनीत केलं आहे. शिवाजीराजांचा 'अवतार' झाल्यामुळं हिंदू धर्म कसा बचावला याचं यतार्थ वर्णन त्यांनी शिवाबावनीत केलं आहे.

देवल गिरावते फिरवते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी ।
गौरा गनपति आप औरनकों देत ताप आपनी ही बार सब मारि गये दबकी ।
पीरा पयगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई गई रही बात रबकी ।
कासी हुकी कला जाती मथुरा मस्जित होती, सिवाजी न होते तो सुनति होत सबकी ॥ १९॥

       मुसलमानांकडून देवळे पाडली जात आहेत. मंदिरे उध्वस्त केली जात आहेत आणि त्यावर अलीचे झेंडे प्रस्थापित केले जात आहेत. अशा वेळी सर्व रावराणे निर्बल व पराभूत झाले आहेत. गौरी, गणपतीसारख्या देवता भक्तांनी आपली उपासना केली नाही म्हणून त्यांना त्रास देतांत पण त्यांच्यावर वेळ येताच त्यासुद्धा लपून बसल्या आहेत. हिंदू जनतेला तर अवलीया पर-पैगंबरामध्येच दिगंबर दत्त दिसू लागले होते. साधू व सिद्धांच्या रिद्धी-सिद्धी गेल्या फक्त रबचीच चर्चा सुरू झाली, अशावेळी जर शिवाजी राजांचा अवतार झाला नसता तर काशीची कळा गेली असती, मथूरेत मस्जिदी झाल्या असत्या आणि आपल्या सर्वांची तर सुंताच झाली असती.

साँच को न मानै देवी देवता न जानै अरू ऐसी उर आनै मै कहत बात जबकी ।
और पातसाहन के हूती चाह हिन्दून की, अक्कबर साहजहाँ कहै साखि तब की ।
बब्बर के तब्बर हुमायुँ हद्द बाँधि गये दोनो एक करी न कुरान बेद ढब की ।
कासी हुकी कला जाती मथुरा मस्जित होती, सिवाजी न होते तो सुनति होत सबकी ॥ २०॥

       कविभूषण म्हणतात लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळी अन्य मुसलमानी बादशाह राज्य करीत होते त्यावेळी त्यांना हिंदूंविषयी थोडीशी सहानभूती तर होती याची साक्ष अकबर व शहाजहान होते. बाबरचा मुलगा हूमायून यानेदेखील हिंदूंची धर्म मर्यादा सांभाळली. कुराण आणि वेद यांची भिन्न असलेली तत्वे एक केली नाहीत. हा औरंगजेब पहा त्याला सत्याची चाड राहिली नाही. अशावेळी जर शिवाजी राजांचा अवतार झाला नसता तर काशीची कळा गेली असती, मथूरेत मस्जिदी झाल्या असत्या आणि आपल्या सर्वांची तर सुंताच झाली असती.

कुंभकन्न असुर औतारी अवरंगजेब किन्ही कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।
खोदी डारे देवी देव सहर महल्ला बाँके, लाखन तुरूक किन्हे छूटि गई तब की ।
भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ, और कौन गिनती में भूली गति भब की ।
चारों वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि, सिवाजी न होते तो सुनति होत सबकी ॥ २१॥

       कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब त्याने मथूरेत अनेक हिंदूंची कत्तल करून सर्व शहारांत इस्लामी रबची द्वाही फिरवली. शहरांतील गल्लोगलींतून असलेल्या उत्तम उत्तम देव, देवता, देवालये खणून काढली. लाखों हिंदूंना मुसलमान केले. इतकेच काय प्रत्यक्ष काशीपती विश्वनाथ भयभीत होऊन पळाले, महादेवाचींच जर इतकी त्रेधा उडाली की इतरांची काय कथा? अशावेळी जर शिवाजी राजांचा अवतार झाला नसता तर हिंदूंच्या चारही वर्णांना आपापली धर्मकर्तव्य सोडून नमाज पढावे लागले असते व आपल्या सर्वांची तर सुंताच झाली असती.

🚩 संदर्भ -

१) कान्यकुब्ज ब्राह्मणातील त्रिपाठी कुलशब्दाचा 'तिवारी' अपभ्रंश आहे.
२) शिवाबावनी - कविभूषण

       आपण सर्व हिंदूंनी मिळून हिंदू साम्राज्य दिन का साजरा करायला हवा याचं कारण या शिवाबावनीतून बऱ्यापैकी समजतं. एकूणच या ऐतिहासिक साधनांविषयी जर सांगायचं झालं तर दर्जानुसार प्रथम सनदा, पत्रे, महजर, करीने, शकावल्या, बखरी, पोवाडे आणि सरतेशेवटी काव्ये असा क्रमांक लागतो. इथे स्तुतिपर 'काव्य' हे जरी दुय्यम दर्जाचं असलं तरीसुद्धा कविभूषण हे महाराजांच्या समकालीन होते, एवढंच नाही तर ते राज्याभिषेकाच्या वेळी स्वतः उपस्थित होते त्यामुळं त्याच्या काव्यावर एक 'विशेष' म्हणून विश्वास ठेवावाच लागेल. त्यामुळे खरंच 'सिवाजी न होते तो सुनति होत सबकी' हे मान्य करावंच लागेल.
बहुत काय लिहिणे. आपण सुज्ञ असा.

या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...

समाप्त.

लेख दुसरा "हिंदू साम्राज्य दिन"

🚩 "हिंदू साम्राज्य दिन"


प्रतिपच्चंद्र

लेखेववर्धिष्णुर्वि

श्ववंदिता॥शाहसू

नोःशिवस्यैषामुद्रा

भद्रायराजतेl




प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्राभद्राय राजते॥

या मुद्रेचा अर्थ असा आहे...
शुद्ध पक्षातील रोज रोज वाढत जाणारी (म्हणजेच या मुद्रेची सत्ता किंवा मराठी राज्य) चंद्रकोर जशी लोकपूजित होते, त्याचप्रमाणे शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा सुध्दा लोककल्याणार्थ सर्वमान्य होईल.

       शहाजीराजांची मुद्रा फार्सी आहे पण शिवाजी महाराजांची मुद्रा मात्र संस्कृतमध्ये आहे. गेल्या सहाशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 'बदलाची' खरी सुरूवात इथूनच झाली होती. ही मुद्रा शिवाजी महाराज कधीपासून वापरू लागले हे मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५ मध्ये वि. का. राजवाड्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानूसार महाराजांनी प्रथम त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी ती वापरली. पण त्या पत्रावर तारीख नाही. परंतु त्याबद्दलचे विवेचन दत्तो वामन पोतदारांनी 'शिवचरित्रप्रदीप' मधल्या 'श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा' या प्रकरणात केलेले आहे. त्यानंतरची सुध्दा काही दोनचार तारीख नसलेली पत्रे उपलब्ध आहेत. तारीख उपलब्ध असलेला पहिल्या अस्सल पत्राचा उल्लेख रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केल्यावर त्याचे वतन त्याच्याच गोतातल्या एका व्यक्तीला दिल्याचा आहे. पत्रावर सुरवातीला बाबाजी गुजराकडुन वतन का काढून घेतलं याचं कारण दिलेलं आहे. त्यावेळी सोनजी बजाजी गुजर हे त्याच्याच गोतातील म्हणून त्यांनी विनंती केली की बावाजीस माझ्या हाती द्यावे. ती विनंती विचारात घेऊन बावाजीला तीनशे पादशाही होन दंड ठोठावला. तो दंड भरून सोनजी याने देऊन बावाजीस हाती घेतले. बावाजीस संतान नाही आणि सोनजी हा त्याच्याच कुळातला आहे म्हणून साहेबांनी मेहेरबान होऊन रांजे गावची मोकदमी सरकारात दोनशे पादशाही होन शुल्क जमा करून सोनजी बजाजी गुजर याच्या हवाली केली आहे. त्याला कोणी अडथळा करू नये. हे मूळ पत्र भोगवट्याकरिता त्याला परत द्यावे. रांझे हे गाव पुणे परगण्यातल्या कर्यात मावळात येतं. कर्यात मावळाच्या ३६ गावांचा मोकासा शिवाजीराजांच्या नावे होता. त्यामुळं साहजिकच या गावचा निवाडा महाराजांनी केलेला आहे. हेच ते पत्र.


🔸लेख दुसरा...


🚩 'या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मर्‍हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट कांही सामान्य झाली नाहीं.'




       शिवराज्याभिषेकाच्या दिवशी त्या सोहळ्याला स्वत: उपस्थित असलेला कृष्णाजी अनंत सभासद या सोहळ्याचं अगदी यतार्थ वर्णन आपल्या बखरीत करतो. तो म्हणतो...

       सप्त महानदि यांची उदकें व थोर थोर नदियांची उदकें व समुद्रांची उदकें, तीर्थ क्षेत्र नामांकित तेथील तीर्थोदर्के आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्ट प्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करुन, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला.
       शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठमासी शुध्द १३ स मुहूर्त पाहिला. ते दिवशीं राजियांनी मंगल स्नाने करून श्रीमहादेव व श्रीभवानी कुलस्वामी, उपाध्ये प्रभाकर भटाचे पुत्र बाळंभट कुलगुरु व भट गोसावी, वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठित, यांची सर्वांची पूजा यथाविधि अलंकार वस्त्रें देऊन [केली.] सर्वांस नमन करून अभिषेकास सुवर्ण-चौकीवर बसले. अष्ट प्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळचीं उदकें करून सुवर्ण कलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रें, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पुज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले. कित्येक नवरत्नादिक सुवर्ण-कमळें व नाना सुवर्ण-फुलें, वस्त्रे उदंड दिधलीं. दानपद्धतीप्रमाणे षोडश महादानें इत्यादिक दानें केली. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी अष्ट प्रधानांनी उभें राहावें. पूर्वी कृतायुगीं, त्रेतायुगीं, द्वापारीं, कलयुगाचे ठायीं पुण्यश्लोक राजे सिंहासनीं बैसले, त्या पध्दतीप्रमाणें शास्त्रोक्त सर्वही साहित्य सिध्द केलें. अष्टखांबी अष्टप्रधान उभे राहिले. त्यांची नांवे बितपशील.

१) मोरोपंत त्रिंबकपंताचे पुत्र, पेशवे, मुख्यप्रधान.
२) दत्ताजी त्रिंबक वाकनीस, यांचे नाव मंत्री.
३) नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ मुजुमदार, यांचे नाव अमात्य.
४) त्रिंबकजी सोनदेव डबीर यांचे पुत्र रामचंद्रपंत, सुमंत.
५) रावजी पण्डितराव होते त्यांचे पुत्रास रायाजीराज[?]
६) अणाजीपंत सुरनीस, यांचे नाव सचिव.
७) निराजी रावजी यांस न्यायाधिशी.
८) हंबीरराव मोहिते सेनापति.

       येणेंप्रमाणे संस्कृत नांवे ठेविलीं. अष्ट प्रधानांची नांवे ठेविली ते स्थळें नेमून उभे केले. आपले स्थळी उभे राहिले. बाळ प्रभु चिटनीस व नीळ प्रभु पारसनीस वरकड अष्ट प्रधानांचे मुतालिक व हुजरे, प्रतिष्ठित सर्वही यथाकमें पध्दतीप्रमाणें सर्वही उभे राहिले. छत्र जडावाचें मोतीलग झालरीचे करून मस्तकावर धरिलें. छत्रपति असे नांव चालविलें. कागदी पत्रीं स्वस्तिश्री [राज्याभिषेक] शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालविला. पन्नास सहस्त्र ब्राह्मण वैदिक मिळाले. या वेगळे तपोनिधि व सत्पुरूष, संन्यासी, अतिथि, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम नानाजाती मिळाले. तितक्यांस चार मास मिष्टान्न उलफे चालविले. निरोप देतां पात्र पाहून द्रव्य, अलंकार, भूषणें, वस्त्रें अमर्याद दिधलीं. गागाभट मुख्य अध्वर्यु त्यांस अपरमित द्रव्य दिलें. संपूर्ण खर्चाची संख्या एक क्रोड बेताळीस लक्ष होन झाले. अष्ट प्रधानांस लक्ष लक्ष होन बक्षीस दर असामीस, त्या खेरीज एक एक हत्ती, घोडा, वस्त्रें, अलंकार असें देणें दिलें. येणेंप्रमाणें राजे सिंहासनारूढ झाले. या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मर्‍हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट कांही सामान्य झाली नाहीं.


🚩 संदर्भ -

🔸 सभासद बखर - कृष्णाजी अनंत विरचित (मुळ प्रतापगड प्रत)
🔸 शिवचरित्रप्रदीप - दत्तो वामन पोतदार

🚩 फोटो स्त्रोत -

🔸 शिवचरित्र साहित्य खंड २, लेखांक २३९ - दत्तो वामन पोतदार
🔸 श्री. कौस्तुभ कस्तुरे यांच्या ब्लॉगवरून साभार

       शिवछत्रपतींचे हे चरित्र कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेले आहे ज्यालाच आपण सभासद बखर म्हणून ओळखतो. हे थोरले राजाराम महाराज यांच्या पदरी सभासद होते. थोरले महाराज म्हणजेच शिवाजीराजे यांचे आत्मचरित्र पहिल्यापासून लिहावे अशी राजाराम महाराजांनी आज्ञा केल्यावरून हे चरित्र तंजावर येथे कृष्णाजी अनंत यांनी लिहिले. हे चरित्र ज्यावेळी लिहिले गेले तो राजाराम महाराजांच्या वेळचा काळ अतिशय धामधुमीचा होता. साहजिकच हे शिवछत्रपतींचे चरित्र सभासदाला म्हणावे तसे खुलासेवार लिहिता आलेले नाही. शिवाजी महाराजांच्या पश्चात बारा-चौदा वर्षानंतरच हे चरित्र लिहिले गेल्यामुळे हे विशेष विश्वसनिय असे म्हणण्यास हरकत नाही.
       छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांकडून स्वराज्य स्थापनेसाठी काय मिळालं आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात मागे काय ठेवलं? असं जर कुणी विचारलं तर कुणीही चटकन उत्तर देईल, 'त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि त्यांनी तयार केलेली माणसं'. पण अत्यंत विपरीत परिस्थितीत सुध्दा स्वराज्य आणि माणसांव्यतिरिक्त त्यांनी मागे ठेवलेली संपत्तीची मोजदाद पाहिल्यावर त्यांचं आर्थिक कसोटीवर कर्तुत्व अधिक स्पष्ट होतं. सद्य परिस्थितीत साधा एक फ्लॅट विकत घेण्यात पूर्ण आयुष्य निघून जातं तिथे महाराजांची कमावलेली संपत्ती पाहिल्यावर डोळे विस्फारले जातात. सभासदाने या सर्वाची नोंद सभासद बखरीत 'स्वराज्याची मोजदाद' या प्रकरणात करून ठेवलेली आहे. याबद्दल मी तीन लेख लिहिले होते. या विषयाबद्दल स्वारस्य असलेली मंडळी हे लेख इथे टिचकी मारून वाचू शकतात.
लेखनसीमा.

या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...
भाग तिसरा - https://watvedilip.blogspot.com/2020/05/blog-post_27.html

समाप्त.

शनिवार, २ मे, २०२०

भाग पहिला "कालगणना"

"कालगणना"


       इतिहासाची साधने साधारणपणे दोन प्रकारची असतात ती म्हणजे अव्वल आणि दुय्यम. अव्वल लेखांत शिलालेख, ताम्रपट, पत्रे तर दुय्यम लेखांत बखरी वगैरेचा समावेश होतो. आपल्या मराठी साधनांविषयी जर अगदी तपशीलवारच सांगायचं झालं तर दर्जानुसार प्रथम सनदा, पत्रे, महजर, करीने, शकावल्या, बखरी आणि सरतेशेवटी पोवाडे व काव्ये असा क्रमांक लागतो. वर उल्लेखलेल्यापैकी ऐतिहासिक पत्रांत असलेल्या कालगणनेबद्दल आपण या लेखात माहिती करून घेणार आहोत.
       महाराष्ट्रात मुसलमानी राजवट जवळजवळ पाचशे-सहाशे वर्षे राज्य करत असल्यामुळे साहजिकच फार्सी भाषेचा पगडा इथल्या बोली भाषेवर झालेला होता. ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करताना तर हे पदोपदी जाणवतं. त्यावेळी मुसलमानी अंमलात फार्सी शब्द आणि मुसलमानी कालगणना सर्वत्र प्रचलित होती आणि मराठी लेखकांनी देखील ती जशीच्या तशी स्विकारली होती. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक आणि राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी भाषेवर फार्सी भाषेचा असलेला पगडा काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला पण दुखा:ने सांगावे लागते की इतके करून सुद्धा मराठीतून फार्सी शब्दांचे समूळ उच्चाटन आजतागायत होऊ शकलेले नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहार कोशातीलच काय पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुध्दीसाठी दिलेले अनेक प्रतिशब्द आज आपल्याला दैनंदिन व्यवहारात टिकलेले दिसत नाहीत. खरं सांगायचं झालं तर परकीय भाषेचा, कालगणनेचा वापर आपल्या दैनंदिन वापरात असणं हे देखील एक पारतंत्र्यच म्हणावे लागेल. ऐतिहासिक पत्रे वाचत असताना तर हे प्रत्येक ठिकाणी जाणवतं. जसं शब्दांचं तसंच कालमापन पद्धतीचं. राज्याभिषेक शक सुरू करूनही म्हणावा तसा त्याचा उल्लेख पत्रात केला गेला नाही.
       ऐतिहासिक पत्र वाचत असताना एकूणच कालमापन पद्धती कशी असेल याबद्दल कायमच उत्सुकता वाटत असे. कालमापन पद्धतीबद्दलची माहिती अनेक ग्रंथातून विखुरलेली आहे त्यामुळे कालगणनेविषयीच्या माहितीचं एकत्रितपणे कुठेतरी संकलन व्हावं असं बरेच दिवस मनांत घोळत होतं. त्याच बरोबर ते नवीन वाचकांना सहजी उपलब्ध व्हावं असंही वाटत होतं म्हणूनच केवळ हा लेखनप्रपंच.
       युरोपियन आक्रमकांची पत्रे वगळता उपलब्ध असलेल्या पत्रांत आपल्याला हिंदू आणि मुसलमानी कालगणनेचा वापर केलेला दिसून येतो तर सध्या दैनंदिन वापरात आपण ख्रिस्ती कालगणनेचा उपयोग करतो. त्यामुळे पहिल्या दोन्ही कालगणनेचा ख्रिस्ती कालगणनेशी मेळ घालण्यासाठी आपल्याला तीनही कालगणनेची माहिती करून घ्यावी लागेल. तर या कालगणना साधारणपणे तीन प्रकारच्या आहेत.

अ) हिंदू कालगणना
ब) मुसलमानी कालगणना
क) ख्रिस्ती कालगणना

       एका भागात एक, अशा तीन लेखांत तीन कालगणनेची माहिती आपण पाहणार आहोत. त्यातल्या या पहिल्या भागात हिंदू कालगणनेची माहिती घेऊ.

भाग पहिला


🚩 अ) हिंदू कालगणना -

       या कालगणनेचे एकूण तीन प्रकार पहायला मिळतात.

१) विक्रम संहत
२) शालिवाहन शक
३) शिवराज्याभिषेक शक ऊर्फ राजशक

अ - १) विक्रम संहत -


       उज्जैनीचा राजा सम्राट विक्रमादित्य याने ही कालगणना सुरू केली. यामध्ये चांद्र व सौर या दोन्ही कालगणनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. आपल्याकडे दरवर्षी विक्रम संवत्सर हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते तर उत्तर भारतात ते कार्तिक कृष्ण प्रतिपदेला सुरू होते. सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडे हे संवत्सर जसे शुद्ध पक्षात सुरू होते तसे उत्तर भारतात ते कृष्ण पक्षात सुरू होते. म्हणजे त्यांच्याकडे कृष्णपक्ष हा शुक्लपक्षाच्या आधी येतो. आपल्याकडे नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. गुरूला एक रास ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे संवत्सर. अशा या विक्रम संवत्सराचे एकूण साठ भाग पाडलेले आहेत. या प्रत्येक भागाला म्हणजे प्रत्येक संवत्सराला एकेक नाव दिलेले आहे. साठावे संवत्सर संपले की हे चक्र पुन्हा पहिल्यापासून सुरू होते. हे संवत्सर 'नाम' काढण्याचे एक गणित आहे. विक्रम संवत्सराच्या आकड्यात ९ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे. उरलेल्या बाकी एवढे अंक पहिल्या प्रभव संवत्सरापासून मोजले म्हणजे विक्रम संवत्सराचे नाव मिळते. उदाहरणच सांगायचं झालं तर गेल्यावर्षी म्हणजे इ.स. २०१९ सालच्या दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत्सर २०७६ सुरू झाला.
२०७६ + ९ = २०८५
२०८५ ला ६० ने भागल्यास भागाकार ३४ व बाकी ४५ राहते.
या बाकी ४५ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास ४५ वे विरोधीकृत नाम संवत्सर येते. हे विक्रम संवत्सर २०७६ चे नाव आहे, जे इ.स. २०२० यावर्षीच्या दिवाळीच्या पाडव्यापर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षी म्हणजे २०२० साली १६ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे आणि वरिल गणितानुसार १६ नोव्हेंबरला परिधावी संवत्सर सुरू होईल. जर तुम्ही कॅलेंडर काढून पाहिलं तर तुम्हाला परिधावी नाम संवत्सराचा उल्लेख केलेला दिसून येईल. या विक्रम संवत्सरमधील साठ भाग म्हणजे साठ संवत्सरे पुढीलप्रमाणे आहेत.

१) प्रभव
२) विभव
३) शुक्ल
४) प्रमोद
५) प्रजापती
६) अंगिरा
७) श्रीमुख
८) भाव
९) युवा
१०) धाता
११) ईश्वर
१२) बहुधान्य
१३) प्रमाथी
१४) विक्रम
१५) वृष
१६) चित्रभानू
१७) सुभानू
१८) तारण
१९) पार्थिव
२०) व्यय
२१) सर्वजित
२२) सर्वधारी
२३) विरोधी
२४) विकृती
२५) खर
२६) नंदन
२७) विजय
२८) जय
२९) यन्मथ
३०) दुर्मुख
३१) हेमलंबी
३२) विलंबी
३३) विकारी
३४) शार्वरी
३५) प्लव
३६) शुभकृत
३७) शोभन
३८) क्रोधी
३९) विश्वावसू
४०) पराभव
४१) प्लवंग
४२) किलक
४३) सौम्य
४४) साधारण
४५) विरोधीकृत
४६) परिधावी
४७) प्रमादी
४८) आनंद
४९) राक्षस
५०) अनल
५१) पिंगल
५२) कालयुक्त
५३) सिध्दार्थी
५४) रौद्र
५५) दुर्मती
५६) दुंदुभी
५७) रूधिरोद्गारी
५८) रक्ताशी
५९) क्रोधन
६०) क्षय

अ - २) शालिवाहन शक -


       शालिवाहन शक हे कधी सुरू झालं हे जरी पक्कं माहिती असलं तरीसुद्धा ते नेमकं कुणी सुरू केलं यावर संशोधकांमधे आजही मतभेद आहेत. ही कालगणना चालू करणारे 'कुशाण' असू शकतील, ‘शक’ असू शकतील, ‘सातवाहन’ पण असू शकतील किंवा अजून पण कुणी एखादा ‘अज्ञात’ राजा अथवा व्यक्ती पण असू शकेल. नक्की कोण हे निदान आज तरी आपण खात्रीशीर सांगू शकत नाही. या शकाची अचूक माहिती मिळवण्यासाठी चालू वर्षातील चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ३१ डिसेंबरपर्यंत ७८ तर ०१ जानेवारीपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत ७९ वर्षे मिळवली की शालिवाहन शक कोणते ते समजून येते.

संवत्सरांची नावे

प्रभवो विभवः शुक्लः प्रमोदोsथ प्रजापतिः l
अंगिरा श्रीमुखो भावो युवा धाता तथैव च ll
ईश्वरो बहुधान्यस्य प्रमाथी विक्रमो वृषः l
चित्रभानुः सुभानुश्च तारणः पार्थिवो व्ययः ll
सर्वजित्सर्वधारी च विरोधी विकृतीः स्वरः l
नन्दनो विजयश्चैव जयो मन्मथ दुर्मुखौ ll
हेमलम्बी विलम्बी च विकारी शार्वरी प्लवः l
शुभकृच्छोभनः क्रोधी विश्वावसुपराभवौ ll
प्लवंगः कीलकः सौम्यः साधारण विरोधीकृत l
परिधावी प्रमादी स्यादानन्दो राक्षसोsनलः ll
पिंगलः कालयुक्तश्च सिध्दार्थी रौद्रदुर्मती l
दुन्दुभी रूधिद्गारी रक्ताक्षी क्रोधनः क्षयः ll
षष्टीसंवत्सरा ह्येते क्रमेण परीकीर्तिताः l
स्वाभिधानसमंज्ञेयं फलमेषां मनीषिभिः ll

संवत्सराचे नाव काढण्याची रिती

शाको द्वादशर्भिर्युक्तः षष्टीहृदवत्सरो भवेत् l
रेवाया दक्षिणे भागे मानवाख्यः स्मृतो बुधैः ll
स एव नवभियुक्तो मर्मदायास्तथोत्तरे l
यो वै वाचस्पतेर्मध्यराशिभागेन कथ्यते ll

       विक्रम संवत्सरासारखीच याची देखील ६० संवत्सरे आहेत पण त्यांचा इसवी सन वेगळा असतो. ते काढण्याचे याचेही एक वेगळे गणित आहे. शालिवाहन शकाच्या संख्येत १२ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे जी बाकी राहील त्या अंकाइतक्या क्रमांकाचा संवत्सर त्या इसवीसनात सुरू असतो. म्हणजे 'प्रभव' संवत्सरापासून मोजल्यावर त्या क्रमांकावर जे नाव येईल ते त्या शकाचे नाव असते. उदाहरणच सांगायचं झालं तर यावर्षी म्हणजे इ.स. २०२० सालच्या गुडीपाडव्याला शके १९४२ सुरू झाला.
१९४२ + १२ = १९५४
१९५४ ला ६० ने भागितल्यास भागाकार ३२ आणि बाकी ३४ राहील.
या बाकी ३४ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास ३४ वे शार्वरी नाम संवत्सर येते. हे शके १९४२ या शकाचे नाव आहे. इ.स. २०२० यावर्षी २५ मार्चला गुढीपाडवा होता. जर तुम्ही कॅलेंडर काढून पाहिलं तर तुम्हाला शार्वरी नाम संवत्सराचा उल्लेख केलेला दिसून येईल.


जेधे शकावलीतील हे दोन उतारे अनुक्रमे शालिवाहन शके १५७७ आणि १५७८ सनातले आहेत. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा खून करून जावळी घेतली हा प्रवाद बखरींतून प्रसिध्द आहे. पण त्यास अस्सल पत्राचा आधार नाही. चंद्ररावाशी झालेल्या लढाईत जेधे मंडळी होती. त्यांनी शकावलीत जावळी व रायरी घेतल्याचे वृत्त लिहूनही चंद्ररावाचा खून केल्याचा किंवा त्यास मारल्याचा उल्लेख केलेला नाही. 'चंदरराउ किलीयाखाली' उतरल्यानंतर पुढे तो कोणत्या प्रसंगाने शिवाजी महाराजांच्या पक्षाकडून मारला गेला या संबंधी अस्सल पुरावा उपलब्ध नाही.

       शिलालेखात शालिवाहन शक ही कालगणना लिहिण्याची अजूनही एक पध्दती आहे. शिलालेख अभ्यासक श्री. पंकज समेळ यांनी मंचर पुष्करणीत असलेल्या शिलालेखाबद्दल लिहिलेल्या ब्लॉगमधला उतारा पुढे जसाच्या तसा दिला आहे.
       'शिलालेखांचा अभ्यास करताना कालगणनेला फार महत्त्व असते. बऱ्याच वेळेला शिलालेखात शक अंकांमध्ये नमूद केलेला असतो. पण काही वेळेला शिलालेखात शक अंकात न देता शब्दमूल्यात देण्यात येतो. अंकमूल्यांसाठी काही ठराविक शब्दमूल्य तयार झालेली आहेत. उदा. ० = आकाश, पूर्ण, १ = पृथ्वी, रूप, चंद्र, २ = नयन, कर, ३ = अग्नी, द्वंद इ. प्रस्तुत शिलालेखाच्या २२व्या ओळीत “रसवैरिलोचनमहीतुल्ये” असा उल्लेख आला आहे. यातील महि, लोचन, वैर आणि रस हे शब्दमूल्य आहेत. या शब्दमूल्यांवरून महि किंवा पृथ्वी = १, लोचन किंवा डोळे = २, वैर = ६ आणि रस = ६ म्हणजे १२६६ हा शक मिळतो. महाराष्ट्रात मंचर शिलालेखाशिवाय अर्नाळा किल्ल्यावरील शिलालेख आणि रायगडावर असलेल्या जगदीश्वर मंदिराच्या शिलालेखात अंकाऐवजी शब्दमूल्य वापरून शकाची नोंद केलेली आहे. मंचर, अर्नाळा आणि रायगड येथील शिलालेखातील शब्दमूल्यनिर्देशक उजवीकडून डावीकडे वाचावे लागतात.'

किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिरातील शिलालेखात कालगणनेबद्दल असा उल्लेख आलेला आहे.

शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे

अर्थ - षण्णव म्हणजे ९६
बाण म्हणजे ०५
भूमि म्हणजे ०१
(अंकानाम वामतो गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचावेत)
अर्थात शके १५९६
कालगणनेनुसार संवत्सर कोणतं तर 
आनन्दसंवत्सरे म्हणजे आनंद संवत्सर.  पुढं तिथीबद्दल असं लिहिलंय...

ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।

अर्थ - ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते म्हणजे ज्योतिष शास्त्रात उत्कृष्ठ वर्णील्या गेलेल्या अशा 
तिथी कोणती होती?
शुक्लेशसापै तिथौ म्हणजे
शुक्ल - पक्ष
ईश - ०३
सार्पे म्हणजे सर्प - ०१
(इथेही अंकानाम वामतो गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचावेत)
म्हणजे १३ म्हणजे त्रयोदशी 

थोडक्यात पहिल्या श्लोकाचा पूर्ण अर्थ असा - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी जगाला आनंद देणारं हे शिवालय उभारलं आहे.

अ - ३) शिवराज्याभिषेक शक ऊर्फ राजशक -


       ज्येष्ठ शुद्ध १३, शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ०६ जुन १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या दिवशीपासून महाराजांनी ही कालगणना सुरू केली. सध्या शके १९४२ सुरू आहे म्हणजे १९४२ मधून १५९६ वजा केल्यावर राज्याभिषेक शक येईल. म्हणजे आत्ता राज्याभिषेक शक ३४६ सुरू आहे. राज्याभिषेक शकाचे  इंग्रजी वर्ष समजण्यासाठी चालू वर्षीच्या ज्येष्ठ शुद्ध १३ ला जी इंग्रजी तारीख असेल त्या तारखेपासून ३१ डिसेंबरपर्यंत १६७३ आणि ०१ जानेवारी ते ज्येष्ठ शुद्ध १२ ला जी ती तारीख असेल त्या तारखेपर्यंत १६७४ वर्षे मिळवावी लागतात.

हे पत्र राज्याभिषेक शके २५ चे आहे. या शकानंतर लगेचच शालिवाहन शकाचा उल्लेख आहे तर पत्राच्या शेवटी सुहूर सन मया व अलफच्या मोहरम महिन्यातल्या २७ व्या चंद्राचा (महिन्यातला दिवस) उल्लेख केलेला आहे.

# मराठी महिने -


मासश्चैत्रोsथ वैशाखो ज्येष्ठ आषाढसंज्ञकः l
ततस्तु श्रावणो भाद्रपदोsथाश्विन संज्ञकः ll
कार्तिको मार्गशीर्षश्च पौषो माघोsथ फाल्गुनः l
एतानि मासनामानि चैत्रादीनां क्रमाद्विदुः ll

१) चैत्र
२) वेशाख
३) जेष्ठ
४) आषाढ
५) श्रावण
६) भाद्रपद
७) अश्विन
८) कार्तिक
९) मार्गशिर्ष
१०) अश्विन
११) माघ
१२) फाल्गुन

# ऋतू आणि त्याचे काल -


वसंतो ग्रीष्मसंज्ञश्च ततो वर्षा ततः शरत् l
हेमंतः शिशिरश्चैव षडेते ऋतवः स्मृताः ll
मीनमेषगते सूर्ये वसंतः परिकीर्तितः l
वृषभे मिथुने ग्रीष्मो वर्षाः सिंहेsथ कर्कटे ll
शरत्कन्यातूलयोश्च हेमंतो वृश्चिके घने l
शिशिरो मकरे कुंभे षडेवमृतवः स्मृताः ll
चैत्रादि द्विद्विमासाभ्यां वसंताद्युतवश्च षट् l

१) वसंत आणि ग्रीष्म म्हणजे उन्हाळा - चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ

२) वर्षा आणि शरद म्हणजे पावसाळा - श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक

३) हेमंत आणि शिशिर म्हणजे हिवाळा - मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन

# पंधरवडे -


       मराठी महिन्यात दोन पंधरवडे असतात. पहिल्यास शुद्ध पक्ष तर दुसर्‍यास वद्य किंवा बहूल पक्ष म्हणतात. प्रत्येक पक्षात १५ तिथी असतात. शुद्ध पक्षाच्या १५ व्या तिथीस पौर्णिमा तर वद्य  पक्षाच्या १५ व्या तिथीस अमावस्या असते.

# वारांची जुनी नावे -


१) रविवार - आदित्यवार, भानुवासर, अर्कवासर
२) सोमवार - चंद्रवासर, इंदुवासर, अब्जवासर
३) मंगळवार - भौम्यवासर, कुंजवासर, अंगरकवासर
४) बुधवार - सौम्यवासर, विंदवासर
५) गुरूवार - बृहस्पतवासर, उष्णकवासर
६) शुक्रवार - भृगुवासर
७) शनिवार - मंदवासर, स्थिरवासर, पंगूवासर

# शेवटच्या लेखात हिंदू कालगणनेची सध्या वापरात असलेल्या इसवीसनाबरोबर असलेल्या फरकाची थोडक्यात माहिती येईलच. 

क्रमशः

वर दिलेल्या पत्राच्या शेवटी सुहूर सन मया व अलफच्या मोहरम महिन्यातल्या २७ व्या चंद्राचा (महिन्यातला दिवस) उल्लेख केलेला आहे हे म्हणजे नेमके काय हे जर समजून घ्यायचे असेल तर ते इथे टिचकी मारून वाचता येईल.

भाग दुसरा "कालगणना"

"कालगणना"


भाग दुसरा


हिंदू कालगणनेचा पहिला भाग वाचायचा राहून गेला असेल तर तुम्ही इथून तो वाचू शकता.

ब) मुसलमानी कालगणना


       हिंदूस्थानावर अखंडीतपणे स्वाऱ्या करून अखेरीस राज्य स्थापलेल्या मुसलमानांची बोली भाषा फार्सी होती आणि या मुसलमानी राजवटी पुढे बरीच शतके हिंदुस्थानात नांदल्यामुळे साहजिकच इथल्या लोकांच्या बोलीभाषेवर मुसलमानी बोलीभाषेचा म्हणजेच फार्सीचा परिणाम झाला. बहुतेक सर्व मुसलमानी राजवटींचे दफ्तर फार्सीतच ठेवले जाई. इतकेच नाही तर फार्सी ही राजभाषा झाल्याने तिचा एकूणच व्यवहारात इतका उपयोग केला जाई की मराठी पत्रांत सुध्दा फार्सी शब्दांचा अर्ध्याहुन अधिक वापर केला जात असे. एवढंच काय आपण आज जे मराठी बोलतो त्यातही फार्सीवरूनच आलेले निम्मे शब्द बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. मुसलमानी राजवटींच्या दैनंदिन कामकाजात नुसता भाषेचाच नाही तर मुसलमानी कालगणनेचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आज आपल्याला त्या काळातील कागदपत्रांचे किंवा तत्कालीन पत्रांचे वाचन आणि त्यांची सत्यता पडताळण्यासाठी कालगणना समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. या भागात आपण मुसलमानी कालगणनेबद्दल जाणून घेणार आहोत. तर अशा या मुसलमानी कालगणनेचे पुढील पाच प्रकार आपल्याला पहायला मिळतात.

१) हिजरी सन
२) फसली सन
३) शुहूर/ सुहूर सन
४) तेरीख-इ-इलाही
५) जुलूस

ब - १) हिजरी सन -


       इसवीसन २० जुलै ६२२ मधे मुस्लिम धर्मसंस्थापक मुहम्मद पैगंबर हा मक्केहून मदिनेला गेला तेव्हापासून या सनाची सुरूवात केली गेली. हिजरी कालगणना ही चांद्रमानावर आधारीत असल्याने हिजरी सन इसवीसनाच्या तुलनेत दरवर्षी १०-१२ दिवस पुढे सरकत जाते. हिजरी सनात अंदाजे ३२ ते ३३ वर्षांनी सौरमानाप्रमाणे चांद्रमानाच्या वर्षात संपूर्ण एक वर्षाचा फरक पडतो त्यामुळे हिजरी सनावरून इसवीसन नेमके गणित करूनच काढावे लागते.
       दक्षिणेत हिजरी सन देण्याचा प्रथम प्रघात होता पण सतराव्या शतकाच्या प्रारंभापूर्वीच सुहूर सन देण्याची पध्दत पडून गेली होती.

ब - २) फसली सन -


       फसली सन ही कालगणना सम्राट अकबराने सुरू केली. फसली सन हे सुर्यमानावर अवलंबून आहे. 'फसल' म्हणजे पिक तयार होण्याचा काळ. ही कालगणना सुर्याच्या मृग नक्षत्रातील प्रवेशाबरोबर सुरू होते. एखाद्या इसवीसनाचे फसली सन काढायचे असेल तर त्या इसवीसनातून ५९० वर्षे वजा करावीत, त्यानंतर मिळालेल्या वर्षाच्या २४ तारखेला ते फसली सन सुरू झालेले असते. फसली सन हे सौरमानानुसार असले तरीही त्यातील महिन्यांची गणना मात्र हिजरी सनाप्रमाणेच करतात. उत्तर हिंदुस्थानात मुख्यतः फसली सनच चालू होता. ऐतिहासिक कागदपत्रांत या सनाच्या जोडीला जुलूस सनही देण्यात येत असे.

ब - ३) शुहूर/ सुहूर सन -


       ही कालगणनाही फसली सनाप्रमाणेच सुर्यमानावर अवलंबून असल्याने ही कालगणना देखील मृग नक्षत्रापासून सुरू होते म्हणून याला मृगसाल असेही म्हणतात. तसेच या सनातील महिनेही फसली सनाप्रमाणे चांद्रमानानुसारच आहेत. सुहूर सनाच्या संख्येत ६०० मिळवल्यावर जी संख्या येते त्या संख्येच्या इसवीसनातील २३ मेला ते सुहूर सन संपलेले असते आणि त्याच्या आधीच्या इसवीसनातील २४ मेला सुरू झालेले असते. इंग्रजी किंवा मराठी कालगणना ज्याप्रमाणे आकड्यातून मांडण्याची पद्धत आहे तशी पध्दत ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आलेल्या सुहूर सनाचा बाबतीत नाही. तर तो सन शब्दात लिहितात. उदाहरण सांगायचं तर 'शुहूर सन सल्लास सब्बैन व अलफ' असं सांगता येईल. हा शुहूर सन, सल्लास म्हणजे ०३, सब्बैन म्हणजे ७० व अलफ म्हणजे १००० आहे. म्हणजे शुहूर सन १०७३, म्हणजे शके १५९४ आणि इ.स. १६७२. एकक अंक पहिला घेऊन मग दशक, शतक आणि सर्वात शेवटी सहस्त्राचा शब्द लिहिलेला असतो. सुहूर सनाचे संख्यावाचक शब्द पुढीलप्रमाणे आहेत.

१ - इहीदे, १० - अशर, १०० - मया
२ - इसन्ने, २० - अशरीन, २०० - मयातैन
३ - सलास, ३० - सलासीन, ३०० - सलासमया
४ - आर्बा, ४० - अर्बैन, ४०० - आर्बामया
५ - खमस, ५० - खमसैन, ५०० - खमसमया
६ - सित, ६० - सितैन, ६०० - सीतमया
७ - सब्बा, ७० - सबैन, ७०० - सब्बामया
८ - समान, ८० - समानीन, ८०० - समानमया
९ - तीसा, ९० - तीसैन, ९०० तीसामया, १००० - अलफ

हे सुहूर सन १०३७ चा उल्लेख असलेले शहाजी राजांनी चिंचवडच्या मोरया गोसावींना दिलेले एक खुर्दखत आहे. खुर्दखतचा शब्दशः अर्थ होतो छोटे पत्र. आदिलशाही, निजामशाही आणि मराठेशाहीत इनामांच्या नुतनीकरणाच्या छोट्या पत्रांना खुर्दखत म्हणतात.

ब - ४) तेरीख-इ-इलाही -


       सम्राट अकबराने आपल्या राज्यप्राप्तीच्या २९ व्या वर्षी म्हणजेच इ.स. १५८४ मधे तेरीख-इ-इलाही ही कालगणना सुरू केली. अकबराच्या राज्यस्थापनेच्या काळापासून ही कालगणना मानली जाते. अकबराने त्याच्या जन्मापासून म्हणजेच इसवीसन १५५६ पासून इलाही सनाची सुरूवात केली. इलाही वर्षाचे इसवीसन काढण्यासाठी इलाही सनात १५५६ मिळवले की इसवीसन समजते. इलाही कालगणना ही सौरमानावर आधारीत असल्याने अकबराने बाराही महिन्यांची पुढील बारा नावे रूढ केली.

तेरीख-इ-इलाही सनाचे महिने (कंसात महिन्याचे दिवस) -

१) फर्वर्दिन (३१)
२) उर्दी बिहिश्त (३१)
३) खुर्दाद (३२)
४) तीर (३१)
५) अमुर्दाद (३१)
६) शहरीर (३१)
७) मिहर (३०)
८) आबान (३०)
९) आजर (२९)
१०) दै (२९)
११) बहेमन (३०)
१२) इस्फन्दार (३१)

ब - ५) जुलुस -


       'बैठक' या मराठी शब्दाला अरबी भाषेत जुलूस म्हणतात. जो मोंगल बादशाहा गादीवर बसेल तो गादीवर बसलेल्या दिवसापासून ही कालगणना सुरू करत असे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत चार बादशाहाच गादीवर बसले म्हणून चारच जुलूस माहिती आहेत. थोडक्यात शिवाजी महाराजांनी जसा राज्याभिषेक शक सुरू केला तसाच हा जुलूस. पुढे दिलेल्या पहिल्या तारखा राज्यारोहणाच्या आहेत तर नंतरच्या तारखा ज्या तारखेला फर्मान जारी केले गेले त्या तारखेच्या आहेत.

१) अकबर - राज्यारोहण १५५६, फर्मान जारी ११ मार्च १५५६.
२) जहांगीर - राज्यारोहण २४ ऑक्टोबर १६०५, फर्मान जारी
     ११ मार्च १६०६.
३) शाहजहान - राज्यारोहण ०४ फेब्रुवारी १६२८, फर्मान जारी
     २८ जानेवारी १६२८.
४) औंरगजेब - राज्यारोहण ०६ सप्टेंबर १६५७, फर्मान जारी
     २४ मे १६५८ आणि दुसर्‍यांदा ०५ जून १६५९.


हे पुरंदरच्या तहाच्या वेळचे औरंगजेबाने महाराजांना लिहिलेले पत्र आहे. या औरंगजेबाच्या पत्राच्या शेवटी '८ जुलूस' सन दिलेला आहे की जो १०७६ हिजरी सनाशी जुळणारा आहे.

# तेरीख-इ-इलाही ही कालगणना सोडून इतर कालगणनेचे मुसलमानी महिने (कंसात महिन्याचे दिवस) -

१) मोहरम (३०)
२) सफर (२९)
३) रविअ-उल-अव्वल ऊर्फ रबिलावल (३०)
४) रविअ-उल-आखर ऊर्फ रबिलाखर (२९)
५) जमादा-उल-अव्वल ऊर्फ जमादिलावल (३०)
६) जमादा-उल-आखर ऊर्फ जमादिलाखर (२९)
७) रज्जब (३०)
८) साबान ऊर्फ शाबान (२९)
९) रमजान (३०)
१०) सव्वाल किंवा शव्वाल (२९)
११) जि-अल-कादा ऊर्फ जिल्काद (३०)
१२) जि-अल-हिज्जा ऊर्फ जिल्हेज (३०)

# जुने फार्सी महिने (कंसात महिन्याचे दिवस) -

१) फरवरी (३१)
२) आर्दिबेहस्त (३१)
३) खुर्दाद (३१)
४) तीर (३१)
५) अमरदाद (३१)
६) शहरिअर (३१)
७) मेहेर (३०)
८) आबान (३०)
९) आजुर (३०)
१०) दय (२९)
११) बहमन (३०)
१२) इस्किंदार (३०)

# मुसलमानी पध्दतीप्रमाणे वारांची नावे -

१) रविवार - एकशंबा
२) सोमवार - दोशंबा
३) मंगळवार - सीशंबा
४) बुधवार - चहारशंबा
५) गुरूवार - पंजशंबा
६) शुक्रवार - जुम्मा किंवा आदिना
७) शनिवार - शंबा किंवा हत्फा

# शेवटच्या लेखात मुसलमानी कालगणनेची सध्या वापरात असलेल्या इसवीसनाबरोबर असलेल्या फरकाची थोडक्यात माहिती येईलच.

क्रमशः

ख्रिस्ती कालगणनेचा पुढील भाग तुम्हांला इथे टिचकी मारून वाचता येईल.