रविवार, २४ मार्च, २०२४

बचेंगे तो और भी लडेंगे !

 बचेंगे तो और भी लडेंगे !


 

       वरील शीर्षकाला अनुशंगून इतिहासातील तीन घटना इथं सांगाव्याशा वाटतात.

🚩 घटना पहिली...


दिनांक - १० जानेवारी १७६०
स्थळ - बुराडी घाट
घटना नायक - दत्ताजी शिंदे


       लेखाला जे शीर्षक दिलंय त्या शीर्षकाचं मूळ या पहिल्या घटनेत आहे.

       तो काळ होता १७५८ चा. पानिपताच्या युद्धाचे वेध लागायला सुरुवात झाली होती. लाहोर सोडवून दत्ताजी आणि जनकोजी शिंदे हे काका-पुतणे नजीबाचे पारिपत्य करण्यासाठी दिल्लीला यमुनाकाठी रामघाट इथं आले. दरम्यान मल्हारराव होळकरांनी दत्ताजींना नजीबाचे पारिपत्य करण्यापासून परावृत्त केलं. नजीबानं मराठ्यांच्या सैन्याला यमुना नदीचं पात्र ओलांडण्यासाठी 'नावांचा पुल बांधण्यात मदत करतो' या वचनावर जवळजवळ सहा महिने झुलवत ठेवलं. या सहा महिन्यात नजीबानं आतून सर्व मुस्लिम राजांशी संधान बांधून दताजींच्या विरोधात सर्व बाजूंनी चांगलीच मोर्चेबांधणी केली.

       १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यात नजीबाच्या सांगण्यावरून अहमदशहा अब्दाली दत्ताजींच्या पिछाडीने दत्ताजींवर चाल करून आला. समोरचा यमुनेचा पूल नजीबाच्या ताब्यात तर मागे अब्दाली. आता दत्ताजी आणि जनकोजी दोघे चांगलेच कात्रीत सापडले पण अशा परिस्थितीतही दत्ताजींनी थेट नजीबावर चाल करून त्याला मागं रेटलं. परिस्थिती ओळखून नजीबानं दत्ताजींशी तात्पूरता तह केला.

       डिसेंबर महिन्यात अब्दाली कुरूक्षेत्राला येईपर्यंत दिल्लीपती शुजानेही एक कोटी खंडणीची थाप मारून दत्ताजींना कुरूक्षेत्राला अडकवून ठेवलं. कुरूक्षेत्रावर दताजींच्या समोरच्या बाजूला रोहिले तर मागे अब्दाली. दत्ताजी कुरुक्षेत्रावर चांगलेच कात्रीत सापडले पण माघार घेतील ते दत्ताजी कसले? आपल्या पुतण्याला म्हणजे जनकोजींना त्यांनी कबिल्यासह दिल्लीला पाठवलं आणि २४ डिसेंबर १७५९ रोजी कुंजपुरा इथं अहमदशहा अब्दालीशी लढाई छेडली आणि त्याच दिवशी अब्दालीचा सपाटून पराभव केला. हार पत्करल्यावर अब्दाली यमुनापार उतरला आणि नजीब, शुजा आणि मोहम्मद बंगश यांन जाऊन मिळाला. आता सर्व मुसलमान एक झाले आणि दत्ताजी एकटे पडले. त्यामुळं दत्ताजी मराठ्यांचं सैन्य घेऊन दिल्लीला आपल्या पुतण्याला म्हणजे जनकोजींना जाऊन मिळाले. दत्ताजी आणि जनकोजी यांना आता समोरासमोरचे युद्ध टाळता येणार नाही याची पुरेपुर खात्री पटली त्यादृष्टीने त्यांनी युद्धाच्या डावपेचांची आखणी करायला सुरूवात केली.

       १० जानेवारी १७६० ची मकरसंक्रांत उजाडली. दत्ताजींचं सैन्य यमुना पार करण्यासाठी उतार शोधू लागलं पण तो काही मिळेना. हे चालू असतानाच शत्रूसैन्य नदी उतरून मराठ्यांवर थेट हल्ले करू लागलं. दत्ताजींनी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. नजीबाच्या आणि गिलच्यांच्या ताज्या दमाच्या फौजेकडं बंदूका होत्या ज्या मराठ्यांकडं नव्हत्या साहजिकच एक एक मराठा बंदूकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा खच रणांगणावर जिकडं तिकडं दिसू लागला. गनिमांनी एकाचवेळी तिनही बाजूंनी मराठ्यांवर हला केला होता. बऱ्याच वेळपासून निकराने गिलच्यांना पाणी पाजणाऱ्या जनकोजींच्या दंडाला गोळी लागली आणि ते खाली कोसळले. लगोलग ही बातमी दत्ताजींना पोहोचवण्यात आली. हे ऐकून रागाने लाल झालेल्या दत्ताजींनी रणांगणावर मृत्यूचे तांडव माजवलं. तेवढ्यात त्यांना हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब दिसला. वाटेत येणाऱ्या अफगाणांचे मुडदे पाडत दताजी नजीबावर चालून गेले. इतक्यात जंबूरक्याचा एक गोळा दताजींच्या बरगडीला लागला आणि ते जागीच कोसळले. दताजी कोसळलेत म्हटल्यावर नजीब आणि कुतूबशहा दत्ताजींवर झेपावले. तलवार उचलण्यासाठी धडपडत असलेल्या दत्ताजींचे डोके हातात धरून कुतूबशहा म्हणाला...

'क्यू पटेल, और लडोगे?'

हे ऐकून बाणेदार दत्ताजींनी त्याच तडफेनी त्याला उत्तर दिलं.

'क्यो नहीं, बचेंगे तो और भी लडेंगे !'

हे ऐकून कुतूबशहा दत्ताजींच्या शरीरावर बसला आणि त्यांच्या छातीची चाळण करू लागला. नजीबाने हातातला जमदाडा दताजींच्या मानेवर घातला आणि त्यांचं शीर धडावेगळं केलं.

क्रमशः


🚩 घटना दुसरी...


दिनांक - ११ जून १६६५
स्थळ - किल्ले पुरंदर
घटना नायक - छत्रपती शिवाजी महाराज


       रायरेश्वराच्या प्रतिज्ञेपासून म्हणजे २७ एप्रिल १६४५ पासून शिवाजी महाराजांचे स्वराज्याच्या सीमा विस्तारण्याचे प्रयत्न दररोज वाढतच चालले होते. मोगल आणि आदिलशहा या दोघांनी मिळून अहमदनगरची निजामशाही बुडवल्यावर तिच्या प्रदेशाची आपापसात लगेचच वाटणी पण करून घेतली. पैकी आदिलशाहीकडे मावळातील व कोकणातील जो नवीन प्रांत आला त्यामध्ये आणि मोगलांकडे आलेल्या कल्याण, भिवंडी भागात महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न चालवले होते. इ. स. १६३७ सालात निजामशाही बुडवल्यापासून ते इ. स. १६४५ सालात स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू करेपर्यंतच्या मधल्या ८ - १० वर्षांच्या काळात आदिलशाहीकडे आलेल्या पुणे, सुपे, मावळ आणि लगतच्या कोकण भागावर विजापुरकरांचा म्हणावा तसा अंमल बसला नव्हता. तिथले देशमुख, मुलकी अधिकारी म्हणावे तसे आदिलशाहीच्या अंकीत झाले नव्हते. एकूणच सगळीकडे स्वैराचार माजला होता. त्यांच्या बेबंदशाहीला शिवाजी महाराज परस्पर पायबंद घालू लागल्यामुळे आदिलशाहीच्या ते पथ्यावरच पडले होते. त्या सर्वांचा नाश केल्यावर शेवटी एकट्या राहिलेल्या शिवाजी महाराजांची 'योग्य' व्यवस्था लावता येईल असा आदिलशाहीचा डाव होता. त्यामुळे १६५६ पर्यंत फत्तेखानाची स्वारी सोडता विजापुरकरांकडून फारशा स्वाऱ्या महाराजांवर झाल्या नाहीत पण त्यानंतर वाई, कराड भागात सीमा विस्तारण्यासाठी महाराजांच्या हालचाली सुरू झाल्या. आता मात्र स्थिरस्थावर असलेल्या म्लेंछ सत्तांना साधारणपणे १६५६ नंतर शिवाजी महाराज म्हणजे एक डोकेदुखी होऊ लागली होती. या त्रासाचा सर्वात मोठा फटका विजापुरच्या आदिलशाहीला बसत होता.

       २५ जुलै १६४८ मध्ये आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाकानाने जिंजीजवळ शहाजीराजांना अटक केली. त्यांच्या सुटकेसाठी आदिलशहाने दोन किल्ल्यांची मागणी केली. किल्ले बंगळूर आणि किल्ले कोंढाणा.  शिवाजी राजांना सिंहगड आदिलशहाला नाईलाजानंच द्यावा लागला होता. खरंतर हा किल्ला महाराज स्वतःच्या वडिलांच्या सुटकेसाठीसुद्धा आदिलशाहीला देण्यासाठी तयार होत नव्हते. त्यावेळी सोनोपंतांनी महाराजांना 'दुर्गनिती' सांगितली जी कवींद्र परमानंदांनी शिवभारताच्या सोळाव्या अध्यायात दिलेली आहे. ते म्हणतात...

न दुर्गं दुर्गमित्येव दुर्गमं मन्यते जनः l
तस्य दुर्गमता सैव यत्प्रभुस्तस्य दुर्गमः ll ६१ ll

अर्थ - दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानीत नाहींत, तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय.

प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गमः l
अदुर्गमत्वादुभयोर्विद्वषन्नव दुर्गमः ll ६२ ll 

अर्थ - प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गांमुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो.

संति ते यानि दुर्गाणि तानि सर्वाणि सर्वथः l
यथा सुदुर्गमाणि स्युस्तथा सद्यो विधीयताम् ll ६३ ll

अर्थ - तुमचे जे दुर्ग आहेत ते सर्व ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबडतोब करा.

       या दुर्गनितीच्या श्लोकांचा सारांश शिवभारताच्या प्रस्तावनेत दत्तात्रेय विष्णू आपटेंनी दिला आहे. त्या सारांशाच्या मूळ तर्जुम्याचा अर्थ असा...

       'राजकारणात बलवानाशी मारामारी करण्याचा प्रसंग आणणे शहाणपणाचे गणले जात नाही. शहाजीराजांनी बलवानाशी वैर केले आणि ते गैरसावध राहिले यामुळे त्यांच्यावर कायद्याचा प्रसंग आला. सध्या आदिलशहा व दिल्लीपती हे दोघेही तुमच्यावर (शिवाजी राजांवर) रागावले आहेत आणि त्या दोघांनाही एकजूट होऊन चाल केली तरी तुमचा निभाव लागेल असे दुर्गम स्थान हस्तगत करण्याचा प्रथम प्रयत्न करा तोपर्यंत आधी शत्रूच्या पक्षात फाटा फूट कशी पाडता येईल ते पहा. भेदनीती हीच राजकारणात फार उपयोगी असते. पित्याची सुटका होण्यासाठी एखादा गड द्यावा लागला तरी हा सौदा महाग पडला असे वाटण्याचे कारण नाही. किल्ल्याचा स्वामी अजिंक्य असणे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.'

       नंतरच्या काळात म्हणजे इ.स. १६६५ मध्ये शिवाजी महाराजांना नाईलाजानंच मोगलांबरोबर पुरंदराचा तह करावा लागला. या तहात त्यांना तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा प्रदेश मोगलांना द्यावा लागला. या तेवीस किल्ल्यात मराठ्यांच्या राज्यातला सामरिकदृष्टीने महत्वाचा आणि १६४८ साली शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिलेला सिंहगडदेखील होता. एक सिंहगड जो महाराज स्वतःच्या वडिलांच्या सुटकेसाठीसुद्धा आदिलशाहीला देण्यासाठी तयार होत नव्हते तिथं आज २३ किल्ले मोगलांना द्यायला महाराज तयार झाले होते. पुरंदरचा तह हा खरं सांगायचं तर स्वराज्यस्थापनेच्या प्रवासातील सगळ्यात वेदनादायी प्रसंग म्हणावा लागेल पण या प्रसंगाला जितका वेदनादायी म्हणता येईल तितकाच त्याला खूप काही शिकवून जाणारा सुद्धा म्हणावं लागेल.

       महाबलवान शत्रुविरुद्ध लढून मरण्यापेक्षा तात्पुरती माघार घेऊन वेळ येताच पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीचा निर्धार उरात बाळगायला हवा. म्हणजेच काय तर...

बचेंगे तो और भी लडेंगे !

क्रमशः


🚩 घटना तिसरी...


दिनांक - फेब्रुवारी १९११
स्थळ - सेल्युलर जेल, अंदमान.
घटना नायक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.


       स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या देशसेवेच्या, समाजप्रबोधनाच्या वगैरे केलेल्या कार्याबद्दल इथं सांगत नाही कारण त्याबद्दलची सर्व माहीती सोशल मिडीयावर, अनेक लेखकांनी केलेल्या चरित्र लेखनात मिळेल आणि मुख्य म्हणजे या लेखाचा तो विषय नाही. इथं फक्त मूळ विषयाशी सुसंगत मुद्दा मांडत आहे.

       १९०६ साली स्वातंत्र्यवीर सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्‍लंडला गेले आणि तिथूनच अभिनव भारताच्या आंतरराष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ झाला. इंग्‍लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जिथं राहत होते ते ‘भारत भवन’ हे 'अभिनव भारत' या चळवळीचं मुख्य केंद्र बनलं. भारतातून इंग्‍लंडमध्ये येणारे तरुण विद्यार्थी भारत भवनाकडे आकर्षित होऊन सशस्त्र क्रांतीसाठी आवश्यक असलेले शस्त्रनिर्मितीचे शास्त्रीय ज्ञान निरनिराळ्या देशांतील क्रांतिकारकांशी संपर्क साधून मिळवू लगले. वेगवेगळ्या मार्गांनी भारतात पिस्तुलेही पाठवण्यात येऊ लागली. स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्‍लंडमध्ये असताना १९०९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचे थोरले बंधू बाबाराव यांच्यावर त्यांच्या देशभक्तीपर केलेल्या पद्यांबद्दल ब्रिटीशविरोधी बंड करण्याचा आरोप ठेवून त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली. ब्रिटीशांनी बाबारावांना केलेल्या या शिक्षेमुळं तरुण पिढीत एक सूडाची भावना निर्माण झाली. मदनलाल धिंग्रा यांनी खुद्द इंग्‍लंडमध्ये केलेला कर्झन वायली याचा तर कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरे यांनी नाशिक इथं केलेला वध हे या सूडाच्या भावनेमुळेच झाले. नाशिकच्या वध हा पूर्वनियोजित कट असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत असं परस्पर ठरवून ब्रिटीश सरकारने त्यांना इंग्‍लंडमध्ये अटक केली. खरंतर जॅक्सनच्या वधामुळं सरकार बिथरून गेलं होतं. भारतात आणल्यावर सेशल ट्रिब्यूनलपुढं खटल्याचं काम सुरू झालं. एकूण सत्तर दिवस या खटल्याचं काम चाललं. शेवटी २४-१२-१९१० या दिवशी निकाल सांगण्यात आला. त्यात सावरकरांना जन्मठेपेची म्हणजे काळ्यापाण्याची पहिली शिक्षा झाली.


       पहिल्या जन्मठेपेची जी शिक्षा झाली तिने ब्रिटीश सरकारचं समाधान झालं नाही म्हणून जॅक्सनच्या खुनास मदत केल्याचा आरोप करत ब्रिटीश सरकारनं सावरकरांवर दुसरं आरोपपत्र दाखल केलं. 'जॅक्सनच्या खुनाला मदत करण्याच्या बाबतीत माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने काहीही संबंध नाही.' अशी दुसऱ्या खटल्यात सावरकरांनी आपली बाजू मांडली खरी पण अर्थातच न्यायमूर्तीनी त्याला मान्यता दिली नाही. विलायतेस जाण्यापूर्वी आरोपीचे चरित्र, इंग्लंडमधील त्याची कृत्ये, इत्यादीवरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की आरोपीने दोन पिस्तुलं सरकारी अधिकाऱ्यांचा खून करण्यासाठीच पाठवली होती आणि यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ३० जानेवारी १९११ रोजी दुसरी जन्मठेप म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पहिली २५ वर्षांची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना सलग दुसरी २५ वर्षांची शिक्षा भोगायची होती. ब्रिटीश सरकारच्या कोर्टानं त्यांना एकूण दोन जन्मठेपांची म्हणजे पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. काय होती ही शिक्षा आणि त्यांच्यावर कोणती कलमे लावण्यात आली होती? तर पुढील कलमं त्यांच्यावर लावण्यात आली होती.

१) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १२१.

"भारत सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे किंवा युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध पुकारणे."

शिक्षा - मृत्यू, किंवा जन्मठेप आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र

२) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १२१(अ).

"राज्याविरुद्ध काही गुन्हे करण्याचा कट रचणे."

शिक्षा - जन्मठेप, किंवा १० वर्षे कारावास आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र

३) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १०९.

"कोणत्याही गुन्ह्यास उत्तेजन देणे, जर प्रवृत्त केलेले कृत्य परिणामी केले गेले असेल आणि जेथे त्याच्या शिक्षेसाठी कोणतीही स्पष्ट तरतूद केली गेली नसेल."

शिक्षा - उत्तेजित केलेल्या गुन्ह्याप्रमाणेच.

गुन्हा - गुन्ह्यानुसार गुन्हा दखलपात्र किंवा अदखलपात्र आहे. गुन्ह्यानुसार प्रवृत्त केलेले जामीनपात्र किंवा अजामीनपात्र आहे.

४) भारतीय दंड संहिता १८६०, कलम ३०२.

"खून."

शिक्षा - मृत्यू, किंवा आजीवन कारावास आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र.


       अंदमानात असताना सावरकरांना जो बिल्ला दिला होता त्या बिल्ल्याचं हे छायाचित्र आहे. यात १२१, १२१ A, १०९ व ३०२ हीे राजद्रोहाची कलमे, सावरकरांच्या कारावासाची एकूण वर्षे (50 YEARS), शिक्षेची पहिली तारीख (24.12.1910) सावरकरांना मिळालेलं 'डेंजरस' किंवा 'डी' तिकीट (D) व शिक्षेची शेवटची तारीख (23.12.1960) या माहितीचा उल्लेख आहे. हे छायाचित्र २३/१२/१९६० रोजी लंडनच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित झालं. हा अंक लंडनच्या ब्रिटीश लायब्ररीने जपून ठेवलेला आहे.

       भारताच्या इतिहासात हिंसक वा अहिंसक यापैकी कोणत्याही मार्गाने भारताच्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय अन्य कुणालाच जन्मठेपेची ५० वर्षं शिक्षा मिळालेली नाही. ब्रिटीशांनी त्यांना दिलेल्या या काळ्यापाण्याच्या शिक्षेतूनच खरंतर त्यांचा ब्रिटीश सत्तेला असलेला धोका आणि त्यांचं भारताच्या स्वातंत्र्यसमरातील महत्व अधोरेखीत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील कोर्टाने १९१० आणि १९११ साली फर्मावलेली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा कोणताही विरोध न करता स्विकारली. आज या घटनेला तब्बल ११३ वर्षे होऊन गेली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात सहजी दिसून येणारे अटकपुर्व जामीन, रात्री-अपरात्री सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यासारखे किंवा कोर्टाचा अवमान होईल असे कोणतेच प्रकार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देखील केले नाहीत.

       तत्कालिन राजकीय परिस्थितीचा विचार केला तर सावरकरांना तुरूंगात राहून मरण येण्यापेक्षा त्यांचे बाहेर राहणं गरजेचं दिसतं. बरं सावरकरांनी माफीनामा लिहिलाच असेल तर तो त्यांचा सांविधानिक हक्क होता जो तत्कालिन अनेक राजकिय नेत्यांनीही अवलंबला होता. अर्थात हा सगळा एका राजकारणाचाच भाग होता हे नक्की कारण खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी अशी पत्रे औरंगजेबाला पाठवली होती. अखेर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या अर्जांना यश आलं आणि १९२१ साली ब्रिटीशांनी सावरकरांची अंदमानमधून सुटका केली. त्यानंतर पुढं ते तीन वर्षे स्थानबद्धतेत होते. अखेर ०६ जुन १९२४ रोजी ब्रिटीश सरकारनं त्यांना मुक्त केलं. ०६ जुन १९२४ पासून २६ फेब्रुवारीला त्यांनी देह ठेवेपर्यंत समाज सुधारणेचं प्रचंड कार्य केलं. थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील त्यांचाच कित्ता गिरवलेला दिसून येतो...

       'महाबलवान शत्रुविरुद्ध लढताना कैदेत मरण्यापेक्षा तात्पुरती माघार घेऊन वेळ येताच पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीचा निर्धार उरात बाळगायला हवा.' म्हणजेच काय तर...

🚩 बचेंगे तो और भी लडेंगे !

समाप्त

🚩 संदर्भ -

१) दत्ताजी शिंदे - विकिपीडिया
२) शिवभारत - कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर
३) मराठी विश्वकोश
४) माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर