शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

"ऐन श्रावणात, डोंगरयात्रा भीमाशंकरची"

"ऐन श्रावणात, डोंगरयात्रा भीमाशंकरची"


"डोंगरपाडा - तुंगी - गणेश घाट - भीमाशंकर - पदरवाडी - शिडीघाट - काठेवाडी - डोंगरपाडा"



श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे ।।

       बालकवींच्या या स्वप्नातील श्रावणाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सतरा फाल्कन्स निघालो होतो ऐन श्रावणात म्हणजे ०३ ऑगस्टला भीमाशंकरच्या ट्रेकला, पण यावर्षी दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. नेहमीप्रमाणे उन-पावसाचा खेळ करणाऱ्या श्रावणसरींनी बालकवींना अपेक्षित असलेल्या श्रावणाचा पार चुराडा करून टाकला होता. आठवडा झाला तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. बहुतेक सगळ्या न्युज चॅनलवरून दर तासाला पूरस्थितीचे अपडेट्स मिळत होते. बघता बघता सांगलीच्या आयर्विन पुलाखालच्या मोजपट्टीने नदीपात्रातल्या पाण्याची २००५ सालातील पूरपातळी पण सहजपणे ओलांडली आणि संभाव्य धोक्याची चाहूल सर्वांनाच लागली. पुढच्या आठवडाभरात पावसानं एवढा कहर केला की सांगली-कोल्हापुर भागातल्या अनेक कुटुंबांचं, शेतीचं आणि गुराढोरांचं अगदी होत्याचं नव्हतं झालं. जशी घाटमाथ्यावर परिस्थिती होती त्यापेक्षाही वाईट परिस्थिती कोकणात होती. तिथं तर पाऊस तुफान बरसत होता. त्यामुळं कोकणात बऱ्याच ठिकाणच्या पुलावरून पाणी जात असल्याचं कळलं होतं. प्रशासनानं बहुतेक सर्व धोकादयक रस्ते बंद केले होते. त्यातूनही हट्टाला पेटून आम्ही या भीमाशंकरच्या ट्रेकला कसंतरी जाताना गेलो असतो, पण येताना रस्ते बंद झाले असते तर? मग काय केलं असतं? त्यामुळं एकूणच आमच्या ट्रेकला जाण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. ऐनवेळी ट्रेक लिडर मंदार दंडवतेने ट्रेक रद्द करण्याचा निर्णय अतिशय सुज्ञपणे घेतला, जो आम्ही सर्वांनीच मनापासून मान्य केला. ०३ ऑगस्ट नंतरच्या लागोपाठ दोन्ही रविवारी अचानक मला स्वतःला पूरग्रस्तांच्या मदतीला सांगली आणि कोल्हापुरला जावं लागल्यामुळं बाकीच्यांनाही ट्रेकचं रद्द करावं लागलं होतं तर शेवटच्या रविवारचा फॅमिली ट्रेकही काही कारणांमुळं रद्द करावा लागला होता. हे सारखं सारखं 'ट्रेक रद्द' होण्याची जणूकाही 'नाट'च लागली होती. काहीही करुन त्यातून बाहेर पडण्यासाठी या अचानक ठरवलेल्या मागच्याच भीमाशंकरच्या ट्रेकला आम्ही फक्त सात मावळे वेडात दौडणार होतो.

       ट्रेकचं प्लॅनिंग मागच्या वेळी केलं होतं अगदी तेच होतं फक्त आयत्यावेळी परिस्थिती नुसार थोडेफार बदल करावे लागणार होते. पाथरजच्या डोंगरपाड्यातुन एक छोटी शिडी चढून तुंगी गाठायची, तुंगी किल्ला? पहायचा आणि पुढे गणेश घाटाच्या वाटेने भीमाशंकर गाठायचं. तिथं जेवण उरकून पदरवाडीतुन शिडी घाटमार्गे पुन्हा गाडीपाशी यायचं आणि घरी परतायचं असं साधारणपणे प्लॅनिंग केलं होतं.

       त्यासाठी शनिवारी २४ तारखेला रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे जेवण केलं आणि गाडीची पुजा करून चिंचवडहून निघालो आणि खांडसच्या थोडं अलिकडे असलेल्या डोंगरपाड्याच्या फाट्यावर रात्री दोन वाजता मुक्कामाला पोहोचलो. कर्जतपासून फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर भरपूर साप रस्ता ओलांडताना दिसत होते. त्यामुळं मुक्कामाचं ठिकाण तसं सुरक्षित पहावं लागणार होतं. नेमकं फाट्यावर एक चायनिजचं हॉटेल दिसलं जे बर्‍यापैकी सुरक्षित होतं म्हणून तिथेच पथार्‍या पसरल्या.



       तसं फारवेळ झोपायला मिळणारच नव्हतं तरीपण मिळेल तेवढी झोप घेऊन बरोबर साडेपाच वाजता उठलो आणि सकाळची आन्हीकं उरकून पाथरजच्या आश्रमशाळेपाशी पोहोचलो. शेजारीच असलेल्या एका घरातून मिळालेला बिनदुधाचा फक्कड चहा प्यायला. चहा तयार होईपर्यंत वेळेचा सदुपयोग करत रोप कॉईलिंगची प्रॅक्टीस केली आणि तिथंच गाडी पार्क करून ट्रेकला सुरूवात केली.




       डोंगरपाड्यातुन मळलेल्या वाटेने तुंगीकडे जाताना डोंगरमाथ्यावर तुंगी किल्ल्याचं शिखर स्पष्ट दिसत होतं. डोंगरपाड्यात शिरलो तेव्हा गाव हळूहळू जागं होत होतं. गाव सुधारलेलं असूनही आवर्जून जुन्या खुणा जपलेलं दिसत होतं.






       पदरात असलेलं तुंगी गाव खरंतर कागदोपत्री रायगड जिल्ह्यात मोडतं. एवढंच नाही तर गावाची बहुतेक सगळी वहिवाट हाकेच्या अंतरावर असलेल्या पाथरजच्या डोंगरपाड्यातुनच. तसं गावातुन खांडसलाही जाता येतं पण ते बरंच लांब पडतं त्यामुळं ती वाट क्वचितच कुणी वापरतं. असं हे तुंगी, भीमाशंकर आणि सुधारित पाथरजच्या जवळ असूनही या गावात वीज पोहोचायला तब्बल इ.स. २०१८ उजाडावं लागलं. काही का असेना पण गावात वीज आल्यापासून गावकरी बाकी जाम खुश आहेत.


       तुंगी गावाला जोडणारी मुख्य वाट हीच असल्यामुळं वाट अतिशय मळलेली होती त्यामुळं चुकण्याचा प्रश्नच नव्हता. पाऊलवाटही झाडोर्‍यातुन हळूहळू चढून जाते.





       जास्त वाहतुक या मार्गानेच असल्यामुळं वाट जास्तीतजास्त सुलभ केली आहे जेणेकरून वजनी वस्तूंची पण सहजपणे ने-आण करता यावी. त्यासाठी मधे आलेल्या एका कातळटप्प्यावर एक छोटी शिडी देखील लावलेली आहे. गावात चौकशी केल्यावर असं कळलं की काही वर्षापूर्वीच ती लाकडाची बदलून लोखंडी लावली आहे.



       शिडी पार करून टोकावरच्या शंकराच्या मंदिरात पोहोचलो. ही देवाची मंदिरंही अगदी मोक्याच्या जागी असतात नाही? नेमकं जिथं थकून बसावंसं वाटतं ना, बरोबर तिथेच असतात ती. एका पाठोपाठ एक सगळे पोहोचल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आरती केली. मंदिराच्या जवळ तेरडा आणि आंबेहळदीच्या फुलांचा काही तुटवडाच नव्हता. वातावरण एकदम भन्नाट होतं त्यामुळं काही फोटो काढले आणि तुंगी गाव गाठलं.












       गावात चौथी पर्यंत शाळा आहे. शाळेच्या बाजुलाच तुंगमातेचं मंदीर आहे. त्या मंदिरात घरूनच आणलेला भरपेट नाश्ता केला.





       फार वेळ न घालवता लगेचच तुंगी किल्ल्याच्या माथ्यावर गेलो. तिथलं एक पाण्याचं खोदीव टाकं सोडलं तर तुंगी 'किल्ला' असल्याच्या काहीच खुणा दिसून आल्या नाहीत. अर्थात 'किल्ला' कशाला म्हणावं? हा तसा मोठा गहनच प्रश्न आहे असं निदान मला तरी वाटतं. पण तिथं जे काही होतं ते पाहिलं आणि फारवेळ न काढता लगेचच पुढे निघालो.







       भीमाशंकरच्या मार्गावर येताना वाटेतल्या गुराख्यांकडे एकदा वाटेची खात्री करुन घेतली. समोरचा पदरगड खुणावत होता पण त्याच्या चढाईचा मार्ग पावसाळ्यात शक्य नसल्यामुळं त्यावर जाता येणार नव्हतं.



       गणेश घाटवाटेच्या वाटेला मिळालो तसं परिस्थिती एकदम बदलली. जिकडं तिकडं प्लॅस्टिकच्या बाटल्या, गुटक्याचे रॅपर्स आणि भाविकांसोबत चंगळवादी पर्यटकांची अलोट गर्दी. वाटेतुन समोरच शिडीघाट दिसतो. परत येताना त्याच वाटेने उतरायचं होतं त्यामुळं सोबत्यांना ती वाट नीट समजावून सांगितली. गणेश घाटातल्या विहरीबाजूच्या टपरीवजा हॉटेलात लिंबु सरबत प्यायलं आणि जंगलातलं कमरक फळ खाल्लं. हल्ली त्याला स्टारफळ म्हणतात. त्याची चवही आंबट-गोड अशी काही भन्नाट होती म्हणून सांगू. तोंड खवळल्यावर मग काय प्रत्येकाने दोनतीन फळं सहज हाणली.






       इथून पुढील पदरवाडीपर्यंतची वाट बऱ्यापैकी सपाटीची होती आणि वाटेत बरेच ओढेही ओलांडून जावं लागलं.


       पदरवाडीनंतरची वाट बाकी जास्तच चढाईची होती. ढगांच्या लपंडावात समोरच तुंगी, पदरगड, माथेरान, पेब ऊर्फ विकटगड, चंदेरी आणि म्हैसमाळ दिसत होते. पुढची भीमाशंकरची वाट अगदीच निमुळती होती त्यातच भाविकांच्या गर्दीतुन वाट काढत शक्यतो कुठेही न थांबता कसंबसं भीमाशंकर गाठलं.





       त्या भीमाशंकरच्या भयंकर गर्दीत रांगेत उभं राहून दर्शन घेण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. तसं आमचं नियोजनही नव्हतं आणि तेवढा वेळही नव्हता. तशाच गर्दीत तिथल्या एका बऱ्यापैकी हॉटेलात पोटभर जेवण केलं. ट्रेकला जाताना घरून डबे नेऊन प्रत्येकवेळी 'बजेट ट्रेक' करण्याचीच मुळात सवय असलेले आम्ही सर्वजण होतो. पण तरीसुद्धा यावेळी चक्क हॉटेलात जेवण करून सगळ्यांनीच थोडीफार चंगळ करून घेतली.





       इथपर्यंत आमचा अर्धा ट्रेक झाला होता आणि पदरवाडीपर्यंतची वाटही आत्ता आलो होतो तीच होती. त्यामुळं पदरवाडी प्रत्येकाने न थांबता गाठली.



       येताना आलेली गणेश घाटाची आणि उतरण्यासाठी आम्ही निवडलेली निसणीची किंवा शिडीची वाट या पदरवाडीत विभागते. नुकत्याच झालेल्या महामुर पावसात दरड कोसळून शिडी पडल्याचं बाकीच्या ट्रेकींग गृपवरून समजलं होतं. पण नंतर श्रावण असल्यामुळं ही वाट लगेचच तात्पुरती शिडी बसवून सुरू केल्याचेही मेसेज आले होते. नक्की काय परिस्थिती आहे ते नेमकं तिथं गेल्याशिवाय समजणार नव्हतं. त्यामुळं रॅपलिंगचं सर्व साहीत्य सोबत घेतलं होतंच. वेळच आली तर सरळ रॅपलिंग करून उतरायचं ठरवलं होतं पण खरं सांगायचं तर त्याची गरजच भासली नाही. पदरवाडीत गेल्यानंतर खात्रीलायक समजलं की शिडीचा घाट चालु झाला आहे आणि एवढंच नाही तर काही भाविक त्या वाटेने चढून देखील आले आहेत. आम्ही त्या वाटेने उतरून जातोय म्हटल्यावर बरोबरच उतरणारे मुंबईचे अजून तीनजण आमच्यासोबत यायला तयार झाले. पदरवाडीतुन दहा मिनीटांत घाटवाटेतल्या विहिरीजवळ पोहोचलो आणि पुढच्या मिनिटभरात ऐन घाटवाटेतल्या ओढ्यात.



       आता इथून पुढं खालच्या जंगलात पोहोचेपर्यंत काळजीपुर्वक उतरावं लागणार होतं. खडकावर शेवाळं उगवलेलं होतं त्यामुळं निसरडं झालं होतं. हळूहळू एकेक जण उतरत पहिल्या शिडीपाशी आलो.




       दगडातल्या क्रॅकमधे एकापाठोपाठ एक अशा दोन शिड्या उभ्या करून ठेवलेल्या होत्या आणि त्या उतरताना प्रचंड हालत सुध्दा होत्या.



       तिसरी शिडी बाकी व्यवस्थित होती पण पुढची चौथी शिडी मात्र पुर्णपणे नवीन बसवलेली होती. ती घाईघाईत बसवलेली कळत होतं. अगदी तकलादू असलेली ही शिडी फारफार तर एकाचंच वजन घेवू शकत होती. एक एक जण करत सगळे खाली आल्यावर खालच्या जंगलात दहा मिनीटं विश्रांती घेतली.




       इथून पुढची धोपट वाट आम्हाला बेलाची वाडी किंवा काठेवाडीत घेऊन जाणार होती. आम्हाला खांडसला जायचं असल्यामुळं आम्ही काठेवाडीत उतरलो आणि डांबरी रस्त्याने चालतच खांडस गाठलं.
       भीमाशंकर जवळच्या बहूतेक वाटा मागच्या काही वर्षात पुन्हा पुन्हा धुंडाळुन झाल्यात. त्यात गणेशघाट, निसणी घाट, रानशिळ घाट, पावल्याची वाट आणि नुकतीच पाहिलेली डोंगरपाड्याची वाट ही नावं सांगता येतील. प्रत्येक ट्रेकला काहीतरी नवीन सापडतं तसं याही ट्रेकला एक नवीन घुगुळची वाट कळलीये. ट्रेक सुरू असताना प्रत्येकवेळी पदरगडाकडे पाहिल्यावर तो आम्हाला भेटायला बोलावतोय असंच सारखं वाटत होतं पण यावेळी तरी त्याला भेटणं काही जमणार नव्हतं. पुढल्या वेळी इकडं आलो म्हणजे नक्की भेटायला येईन असं सांगून आलोय.
       साधारणपणे १५-१७ वर्षांपूर्वी विहिरीपासून पदरगडाची वाट अशी नव्हतीच. ती शोधण्याचा त्यावेळी आम्ही एकूण तीन वेळा प्रयत्न केला होता. तिसऱ्या वेळी दाट जंगलात गडाच्या उत्तरेकडील कातळावर खोदीव पावट्या सापडल्या होत्या. तिथूनच वाट असावी म्हणून चढाई करायचा प्रयत्न देखील केला होता. पण थोडी चढाई करून वेळे अभावी प्रयत्न सोडून द्यावा लागला होता. चौथ्या वेळी मात्र गडाची वाट सापडली आणि सहजतेने माथ्यावर गेलो होतो. एकदा वाट सापडली म्हटल्यावर त्या पावट्यांबाबत पूर्णपणे विसर पडला होता. एका हाडाच्या भटक्याला नुकत्याच केलेल्या या ट्रेकबद्दल सांगत असताना अचानक या पावट्यांबद्दल आठवलं आणि पुन्हा एकदा उत्सुकता जागविली गेली. आता पावट्या आहेत म्हटल्यावर नक्कीच काहीतरी असणार तिथं. खरंच नेमकं काय असेल तिथं? गुहा, पाण्याचं टाकं की गडाची एखादी चोरवाट? पुन्हा एकदा त्याचा सोक्षमोक्ष लावायला जायलाच हवं. पण त्यावेळी घुगुळची वाट आणि पदरगड सोबतीला असणारच हे काही वेगळं सांगायला नको.

समाप्त

सह्यसखे -
मंदार दंडवते
जितेंद्र परदेशी
नलावडे दादा
राहुल गायटे
अर्जुन ननावरे
महादेव पाटील
दिलीप वाटवे

फोटो स्त्रोत -
मंदार दंडवते
महादेव पाटील
नलावडे दादा
गुगल आंतरजाल