बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

ब्रिटिश तोफ / British Cannon

ब्रिटिश तोफ / British Cannon

       ब्रिटीश सुरूवातीला भारतात व्यापारासाठी आले अणि नंतर आपल्यावर दिडशे वर्ष राज्य केलं हे सर्वश्रृतच आहे. मोगल, आदिलशहा, कुतूबशहा आणि मराठे असे भारतातील सर्वच राज्यकर्ते ब्रिटीशांकडून किंवा कमी अधिक प्रमाणात पोर्तूगिजांकडून युद्धसाहित्य विकत घेत असत. अर्थात त्याला कारणही तसंच होतं, ते म्हणजे त्यांचं पुढारलेलं तंत्रज्ञान. स्वदेशी बनावटीच्या युद्धसाहित्यापेक्षा परदेशी युद्धसाहित्य हे अधिक किफायतशीर, खात्रीशीर आणि टिकाऊ असे. इतक्या वर्षांनंतर आजही आपण काही प्रमाणात तेच करतो आहोत. असं करण्याचं मुख्य कारण म्हणजे परदेशी धातूशास्त्र, तंत्रज्ञान आजही स्वदेशी तंत्रज्ञानापेक्षा कित्येक पटींनी पुढारलेलं आहे. तसं पहायला गेलं तर सर्वच क्षेत्रात युरोपीय देश हे आपल्या कित्येक वर्ष पुढे आहेत. या बाबतीत एका वाक्यात उदाहरणंच द्यायची झाली तर ती अशी देता येतील.. "शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याची बातमी इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रात छापून आली होती." किंवा "शिवाजी महाराजांनी १६७२ साली केलेल्या दुसऱ्या सुरत लुटीची बातमी लंडन गॅझेट या वृत्तपत्रात छापून आली होती" किंवा "०२ फेब्रूवारी १७६३ ला स्कॉटलंडमधील 'द कॅलेडॉनियन मर्क्यूरी' या वृत्तपत्रात पानिपताच्या युद्धाचा वृत्तांत छापून आला होता" आणि 'द बंगाल गॅझेट' हे भारताचे पहिले वृत्तपत्र १७८० साली कलकत्ता येथे सुरू झाले. असो, थोडं विषयांतर होतंय.


       तर मूळ मुद्दा हा की आपण त्या काळात ब्रिटीशांकडून युद्धसाहित्य विकत घेत असल्यामुळं आजही आपल्याला वस्तू संग्रहालयात बरंचसं विदेशी युद्धसाहित्य पहायला मिळतं. फक्त युद्धसाहित्याचा एक प्रकार जास्त करुन किल्ल्यावरच पहायला मिळतो तो म्हणजे तोफ. त्या तोफांविषयी आणि खास करून फक्त ब्रिटीश तोफांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

       गड किल्ल्यांवरील तोफा आपल्या सर्वांना परिचित आहेतच. ‘तोफ’ हा अपभ्रंश झालेला स्त्रीलिंगी फार्सी शब्द मूळ ‘तोप’ असा आहे. तोप हा शब्द तुर्की भाषेतुन आलेला आहे. जगभरात तयार केलेल्या तोफांना वेगवेगळी नावे दिली गेली. आपल्या सर्वांना माहिती असलेल्या कलाल बांगडी, लांडा कासम, मुलूख मैदान, मेंढा, कडक बिजली वगैरे तोफांची नावं प्रसिद्ध आहेतच. कोकणातल्या बऱ्याच किल्ल्यांवर आपल्याला स्वदेशी तोफांसोबत ब्रिटीश तोफा आज देखील दिसून येतात.

       नुकतीच आम्ही कोकणातल्या दुर्गांची भटकंती केली. आमची ही भटकंती विजयगडापासून मंडणगडापर्यंत होती. या भटकंतीत आम्ही बाणकोटचा किल्लादेखील पहिला. बाणकोट किल्ल्याच्या दर्शनी बुरुजावर एक ब्रिटीश तोफ आहे आणि त्यावर काही चित्र तर काही आकडे लिहिलेले दिसून येतात. सोबत्यांना त्याचा अर्थ समजावून दिला पण तेव्हा लक्षात आलं की यावर एखादा लेख लिहिला तर सर्वांनाच याविषयी माहिती होईल म्हणूनच हा लेखनप्रपंच. तर काय आहे या ब्रिटीश तोफांवरील चित्रांचा अर्थ आणि ते आकडे नेमकं काय सांगत होते? पाहूया...

       ब्रिटीश तोफांवरील हे चित्र दोन भागात आहे. वरच्या बाजुला ब्रिटीश रॉयल क्राऊन आहे तर त्याच्याखाली राजाचे नाव संक्षिप्त रुपात कोरलेलं आहे. ही तोफ ब्रॉन्झची असल्यामुळं यावर चांगल्या प्रकारचं कोरीव काम केलेलं आढळून येतं.

       रॉयल क्राऊनच्या खालच्या बाजूला इंग्रजी GR अक्षरे कोरलेली दिसत आहेत तर G अक्षरात 2 गुंफलेला दिसून येत आहे. G म्हणजे राजाचं नाव जॉर्ज, R म्हणजे Rex याचा अर्थ लॅटीन भाषेत राजा असा होतो तर 2 आकडा एकाच नावाचा हा दुसरा राजा आहे असा होतो. थोडक्यात G R 2 म्हणजे ही तोफ 'King George II' याच्या कार्यकाळात बनवली गेली आहे. King George II या इंग्लडमधल्या राजाचा कार्यकाळ 1727–1760 असा 33 वर्षांचा होता. या 33 वर्षादरम्यान ही तोफ बनवली गेली आहे.

        ही तोफ Cast Iron या धातूची बनवली गेल्यामुळं या तोफेवर म्हणावी तशी कलाकुसर नाही किंवा काळानूरूप ती झिजून गेली आहे. रॉयल क्राऊनच्या खालच्या बाजूला इंग्रजी GR अक्षरे कोरलेली दिसत आहेत तर G अक्षरात 3 गुंफलेला दिसून येत आहे. याचा अर्थ ही तोफ King George III याच्या काळात तयार केली गेली आहे. King George III या इंग्लडमधल्या राजाचा कार्यकाळ 1760–1820 असा 60 वर्षांचा होता. या 60 वर्षादरम्यान ही तोफ बनवली गेली आहे.

       या चित्रात कोरलेल्या रॉयल क्राऊनखाली एकाखाली एक असे इंग्रजी P, 1797 आणि WG असं लिहिलेलं दिसून येत आहे. यातला P म्हणजे या तोफेचं Proofing केलेलं आहे. Proofing केलेलं आहे म्हणजे या तोफेत तोफगोळा घालून Testing केलं गेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक तोफ एकदा वापरून त्या कारखान्याचे Quality Control Department त्या तोफेचं Testing Certificate देत आहे असा होतो.

       1797 हा आकडा या तोफेचं Manufacturing Year दर्शवतं.

       WG ही अक्षरे ही तोफ ज्या कारखान्यात तयार केली गेली त्या कारखान्याच्या नावाचं संक्षिप्त रूप आहे. ही तोफ 'W Greener' Guns manufacturing Company मध्ये बनवली गेली आहे असा त्याचा अर्थ होतो.

       तोफेच्या या भागाला Trunnion म्हणजे त्रिकूट असं म्हटलं जातं. फोटोत 82699 हा आकडा दिसतोय जो या तोफेचा Serial Number आहे.

       CARRON हे तोफ बनवणाऱ्या कारखानदाराचं नाव आहे. CARRON हा एक तोफा तयार करणारा त्या काळातील नावाजलेला कारखाना होता. ज्याची स्थापना 1759 साली झाली.

       तोफेवर असलेलं 1814 हे त्या तोफेचं Manufacturing Year दर्शवतं. सारांश असा की ही तोफ 1814 साली CARRON या कारखान्याने बनवली असून त्याचा Serial Number 82699 असा आहे.

       काही तोफांच्या Trunnion म्हणजे त्रिकूटावर किंवा दर्शनी भागावर P च्या आधी एक आकडा कोरलेला असतो. तो आकडा त्या तोफेतून किती पौंड वजनाचा गोळा डागता येतो ते दर्शवतो. इथं 32 P दिसतंय म्हणजे या तोफेतून 32 पौंड वजनाचा गोळा डागून हीचे Proofing केलेलं आहे असं समजून येतं.


       सर्वसाधारणपणे उपयोगानूसार 3, 4, 6, 9, 12, 18, 24, 32, 42 अशा विविध पौंडी तोफा कारखान्यात तयार केल्या जात. त्याचं Point Blank Range आणि Utmost Range With Major Caution नूसार कोष्टक दिले आहे. किती पौंडी तोफेची मारक क्षमता किती अंतरापर्यंत असे ते या दोन कोष्टकांवरून समजून येईल.

       फोटोत जे तीन आकडे दिसत आहेत ते म्हणजे त्या तोफेचे जास्तीतजास्त काटेकोर वजन सांगण्याची पद्धत आहे. तोफेचे वजन तीन अंकांनी दर्शविले जाते आणि डॅशने विभक्त केले जाते. पहिला आकडा 'शंभर वजन' म्हणजे 'Hundredweights' दर्शवतो, दुसरा आकडा एक चतुर्थांश-शंभर वजनांचा आकडा म्हणजे 'Quarter-Hundredweights' सांगतो तर शेवटचा आकडा शिल्लक राहिलेलं वजन सांगतो. या फोटोतल्या संख्येचं उदाहरण पाहू.

     वरील फोटोत '23 - 0 - 26' असं दिसून येतंय. ब्रिटीश सांख्यिकीनूसार जुने शंभर वजन म्हणजे 'Hundredweights हे 112 आधुनिक पौंड्सच्या बरोबरीचे आहे, 100 पौंड्स नाही. या प्रकरणात पहिला अंक संपूर्ण शंभर वजनांची संख्या सांगते (23 x 112 = 2576 पौंड), दुसरा एक चतुर्थांश-शंभर वजनांची संख्या (0 x 28 = 0 पौंड) सांगते तर तिसरा अंक एकक संख्या (26 = 26 पौंड) सांगते. त्यामुळे तोफेचे वजन (2576 + 0 + 26 = 2602 पौंड) आहे म्हणजे सध्या आपण वापरत असलेल्या मेट्रीक पद्धतीत ते 1180.25 किलो आहे.

       आणखी एक उदाहरण पाहू. या फोटोत '23 - 2 - 0' दिसून येतंय. याचा अर्थ या प्रकरणात पहिला अंक संपूर्ण शंभर वजनांची संख्या सांगते (23 x 112 = 2576 पौंड), दुसरा एक चतुर्थांश-शंभर वजनांची संख्या (2 x 28 = 56 पौंड) सांगते तर तिसरा एकक अंक आम्हाला सांगते की कोणतेही वैयक्तिक पाउंड शिल्लक नव्हते. त्यामुळे तोफेचे वजन (2576 + 56 + 0 = 2632 पौंड) आहे म्हणजे सध्या आपण वापरत असलेल्या मेट्रीक पद्धतीत ते 1193.85 किलो आहे.

       वेगवेगळ्या कालखंडात तोफेवर वेगवेगळ्या ठिकाणी संख्या, चिन्हे आणि वाक्यप्रचार कोरण्याची पद्धत रुढ झाली त्यामुळं वर दिलेल्या संख्या किंवा चिन्हे ही प्रत्यक्षात पाहिलेल्या तोफांच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात. असं जरी असलं तरी मुळ मसूदा किंवा संख्येनूसार करावयाची गणिते मात्र बदलत नाहीत.

       उपलब्ध माहितीनूसार हा लेख जास्तीतजास्त अचूक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तरीसुद्धा यात थोड्या प्रमाणात तफावत असू शकते. या लेखनप्रपंचामुळं भटकंती करणारी मंडळी ब्रिटीश तोफांच्या बाबतीत काही प्रमाणात साक्षर व्हावीत हाच एकमेव हेतू यामागं आहे. ब्रिटिश तोफांप्रमाणेच पोर्तुगीज तोफांबद्दल सुद्धा लिहिता येईल त्यामुळं तोफांच्या बाबतीतला हा लेख परिपूर्ण नक्कीच नाही. या विषयावर अजूनही भरपूर लिहिण्यासारखं आहे. जसं तोफांची अंगं आणि त्यांचे उपयोग, तोफगोळ्यांचे प्रकार वगैरे वगैरे. याशिवाय तोफांचं anchoring, त्यांच्या मारगिरीच्या क्षमतेनुसार दोन बुरुजातील अंतर आणि बुरुजात केलेल्या जंग्या, जंग्यांचे कोन, जंग्यामधली अंतरं वगैरे सर्व एक शास्त्र आहे. CAD वर drawing काढून खरंतर ते सुद्धा सविस्तरपणे मांडलं गेलं पाहिजे. तोफांवर लिहिलेले 'वाक्यप्रचार' हा देखील तोफांबद्दलचा एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. याबद्दल लिखाण करण्याचंही डोक्यात आहेच पण सध्या तरी वेळेअभावी ते लिहिणं काही शक्य झालेलं नाहीये. पाहू कधी मुहूर्त लागतो ते.


       माझ्या या लेखन प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहिलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो...

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही ॥

बहुत काय लिहिणें, लेखनसीमा ॥

🚩 फोटो सौजन्य -

१) दिलीप वाटवे
२) इतिहासाच्या पाऊलखुणा
३) Google

🚩 संदर्भ -
१) इतिहासाच्या पाऊलखुणा
२) विकीपिडीया