शनिवार, २८ मे, २०२२

स्वराज्याची शपथ 'सत्य की मिथ्या'

 स्वराज्याची शपथ 'सत्य की मिथ्या'

 




       शिवाजी महाराजांनी रोहिरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली होती अशीच बहूतेकांची समजूत आहे. तिचा उगम वरील पत्रात आहे पण ती  स्वराज्याची शपथ होती असे कुठेही या पत्रात म्हटलेले नाही. हे पत्र विश्वसनीय मानले तर ती शपथ कोण्या दादापंतांच्या उपस्थितीत रोहिरेश्वर येथे घेण्यात आली होती आणि नरसप्रभू उर्फ नरसीबाबा व त्यांचा मुलगा दादाजी यांचे वतन वंशपरंपरा चालविण्याचे आश्वासन शिवाजी महाराजांनी त्या शपथेद्वारे दिले होते एवढेच या पत्रावरून सिद्ध होईल. त्याप्रसंगी नरसप्रभू आणि त्यांचा मुलगा दादाजी यांनीही  शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली असेल असेही अनुमान हे पत्र विश्वसनीय मानले तर त्यावरून करता येईल पण शिवाजी महाराजांनी आपले बरेच अनुयायी रोहिरेश्वर येथे गोळा करून त्यांच्यासह स्वराज्याची शपथ घेतली होती असे अनुमान या पत्रावरून नक्कीच करता येत नाही. शिवाजी महाराजांनी आपले एक बोट तलवारीने किंचित कापून त्यातील रक्ताची धार महादेवाच्या पिंडीवर धरली आहे असे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहवयास मिळते. त्या चित्रामागील कल्पनेचे मूळ रोहिरेश्वर येथील शपथेच्या या तथाकथीत प्रसंगातच आहे. या पत्राची तारीख २९ सफर, शुहूर/सुहूर सन खमस अर्बैन अलफ म्हणजे १७ एप्रिल १६४५ अशी आहे. त्यात दादापंतांचा जो उल्लेख आहे तो दादाजी कोंडदेवांचा म्हणून केलेला उल्लेख आहे असे वाटते.

       हे पत्र विश्वसनीय मानले तर दादाजी नरसप्रभू हे रोहिडखोऱ्याचे व वेळवंडखोऱ्याचे देशपांडे होते आणि त्या खोऱ्यांमधील गावांचे कुळकर्णी होते असे सिद्ध होते. रोहिडखोऱ्याच्या देशपांडेपणाच्या वादापुरते पाहिले तर या पत्राचे महत्व एवढेच आहे पण शिवचरित्राच्या दृष्टीने हे पत्र फार महत्वाचे आहे. ते विश्वसनीय मानले तर शिवाजी महाराजांनी रोहिरेश्वर येथे घेतलेल्या शपथेचा प्रसंग खरा मानावा लागतो आणि महाराजांनी आपल्या राज्यास 'हिंदवी स्वराज्य' म्हटले होते असेही सिद्ध होते. रोहिरेश्वर येथील शपथेच्या प्रसंगाचा उल्लेख हा या पत्राखेरीज इतर कोणत्याही साधनांत आलेला नाही आणि हिंदवी स्वराज्य हे शब्दही या पत्राखेरीज शिवचरित्राच्या कोणत्याही साधनांत आलेले नाहीत.

या पत्राच्या विश्वसनीयतेवरील आक्षेप असे आहेत...

१) या पत्रात दादाजींना वेळवंडखोऱ्याचे देशपांडे म्हटले आहे पण ते वेळवंडखोऱ्याचे देशपांडे कधीच नव्हते.
 

२) विजापूहून वजिरांचा जो हुकूम आला तो शिरवळहून अमिनाने दादाजींकडे पाठवला असे या पत्रात म्हटले आहे पण यावेळी शिरवळ आदिलशाही अंमलाखाली होते आणि आदिलशाहीत 'अमीन' नावाचे पद नव्हते.
 

३)  रोहिरेश्वर नावाचे देवस्थान किंवा ठिकाण रोहिडखोऱ्यात सध्या नाही आणि पूर्वी कधी असल्याचा पुरावाही नाही.
 

४) पत्रात शेंड्रीचा म्हणजे सह्याद्रीचा उल्लेख आहे पण इसवी सनाच्या सतराव्या शतकातील मराठी कागदपत्रांमध्ये सह्याद्री हे नाव वापरल्याचे आढळत नाही. त्याऐवजी घाट किंवा घाटमाथा असा मोघम मराठी उल्लेख  मराठी कागदपत्रांमध्ये केला जाई.
 

५) रोहिरेश्वर येथे जर शिवाजी महाराज, दादाजी नरसप्रभू इत्यादींचा शपथेचा कार्यक्रम झाला असेल तर या पत्रात तो रोहिरेश्वर 'दादाजींच्या खोऱ्यातला आदि कुलदेव आहे, डोंगरमाथ्यावर आहे, सह्याद्रीलगत आहे आणि स्वयंभू आहे' हे सर्व वर्णन करण्याची आवश्यकताच नव्हती. रोहिरेश्वर कुठे आहे आणि कसा आहे ते दादाजींना ठाऊक असलेच पाहिजे. तेव्हा रोहिरेश्वराने आम्हांस यश दिले एवढे म्हटले असते तरी पुरेसे होते. म्हणून या पत्रात रोहिरेश्वराचे वर्णन येणे स्वाभाविक वाटत नाही, कृत्रिम वाटते.
 

६) या पत्रात 'हिंदवी स्वराज्य' असे शब्द आले आहेत. हिंदवी (किंवा हिंदुवी, हिंदूवी) हे शब्द हिंदू शब्दापासून फार्सी पद्धतीने बनलेले विशेषण आहे. हिंदवी हा शब्द एतद्देशीयांची भाषा असा अर्थाने इसवी सनाच्या सतराव्या शतकातील मराठी व फार्सी कागदपत्रांमध्ये आढळतो पण हिंदूंचे राज्य किंवा एतद्देशीयांचे राज्य किंवा मराठ्यांचे राज्य असा अर्थ व्यक्त करण्याकरिता राज्य या शब्दाला हिंदवी असे विशेषण लावल्याचे त्या काळातील मराठी कागदपत्रांमध्ये आढळत नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याला हिंदवी स्वराज्य असे म्हटले असते तर त्यापुढेही मराठ्यांच्या राज्याचा उल्लेख करताना मराठी कागदपत्रांमध्ये ती संज्ञा अवश्य वापरली गेली असती पण मराठी कागदपत्रांमध्ये मराठ्यांच्या राज्याचा उल्लेख महाराष्ट्र राज्य, स्वराज्य किंवा देवाब्राह्मणांचे राज्य असा येतो, हिंदवी स्वराज्य असा कधीही येत नाही.
 

७) या पत्रातील भाषेची धाटणी शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या भाषेच्या धाटणीपेक्षा वेगळी आहे. उदाहरणार्थ - या पत्रात "वगैरे कितेकबहुतेक लिहिले" आणि "लेकराचे लेकरी वतन वगैरे चालवण्याविसी कमतर करणार नाही" या वक्यांमध्ये 'वगैरे' शब्दाचा जसा उपयोग केला आहे तसा शिवाजी महाराजांच्या पत्रांत केलेला आढळत नाही.

       वरील सर्व आक्षेप विचारात घेतल्यास हे पत्र बनावट आहे आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरला घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेला 'मिथ्या' असंच म्हणावे लागेल. 

बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.

🚩🚩


🚩 वरील पत्रात कुळकर्णी आणि देशपांडे असा उल्लेख आला आहे. कुळकर्णी आणि देशपांडे हे ज्या वतनसंस्थेत असत त्याविषयी थोडेसे...


🚩 वतनसंस्था -


       गावाकरिता किंवा देशासाठी करीत असलेल्या कर्तव्यबद्दल त्या व्यक्तीच्या उपजीविकेकरिता, मानमरातब राखण्यासाठी आणि जनतेचे दिलेले व वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन. यात चाकरी, वृत्ती, अधिकार, हक्क, नेमणूक यांचा अंतर्भाव होतो व हे हक्क आणि तदानुषंगिक कर्तव्ये उपभोगण्याची राजमान्य आणि लोकमान्य पद्धत म्हणजे वतनसंस्था होय. ‘वतन’ या संज्ञेच्या व्युत्पत्तीसंबंधी भिन्न मत-मतांतरे आहेत. काही विद्वानांच्या मते हा शब्द ‘वर्तन’ या संस्कृत शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ उपजीविकेचे शाश्वत साधन किंवा उदरनिर्वाह वा वेतन असा आहे तर काही विद्वान तो अरबी शब्द असून वतन् म्हणजे जन्मभूमी−घर असा अर्थ देतात. उत्पन्नाची शाश्वती ही वतनदार पद्धतीतील मूलभूत कल्पना आहे. वंशपरंपरेने काम करण्याचा हक्क असणारा, वतन धारण करणारा गावकरी, मग तो कोणत्याही धंद्यावर पोट भरो, वतनदार ही सामान्य संज्ञा आहे.

       ग्रामसंस्थांचा कारभार नीटपणे चालावा म्हणून प्राचीन काळ राज्यकर्त्यांनी या वतनसंस्थेस मान्यता दिली आणि मग राजेही आपल्या मर्जीतील व्यक्तींना, विशेषतः नात्यागोत्यांतील इसमांना, गावे इनाम देऊ लागले. जे आपल्या हुषारीने किंवा पराक्रमाने, राज्य मिळविण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी राजांना मदत करीत. त्यांना अशी इनामे कायमची मिळू लागली. शासनव्यवस्थेत उच्च अधिकारपदांसाठीही अशी जमीन तोडून देण्याची प्रथा सुरू झाली. राजे किंवा सरदार हे देवालयांच्या योगक्षेमासाठीही जमीनी व गावे इनाम देऊ लागले. अग्रहार देण्याची प्रथा जुनीच होती, ती चालू होतीच. अशा प्रकारे वतनदारी ही पद्धती राजमान्य व धर्ममान्य ठरली.

       वतनदारीचे दोन प्रमुख प्रकार आढळतात : एक, राजाला हवी असेल तेव्हा लष्करी किंवा इतर मदत देण्याच्या अटीवर जी वतने दिली जातात, ती सरंजामशाही वतने आणि दोन, गावकामगारांना गावकीकडून (गावसभा) ग्रामव्यवस्थेच्या विशिष्ट कामासाठी मिळतात ती वतने. यांशिवाय बलुतेदार म्हणजे निरनिराळे कारागीर-कामगार, गावासाठी जी विशिष्ट सेवा करीत, त्याबद्दल त्यांना मेहनतान्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून कायमस्वरूपी ठराविक धान्य मिळत असे.

       वतनसंस्था भारतातील सामाजिक व्यवस्थेत निश्चितपणे केव्हा प्रविष्ट झाली, याबद्दल विद्वानांत एकमत नाही. काहींच्या मते ती इसवी सनाच्या प्रारंभापासून अंशतः अस्तित्वात असावी व पुढे मध्ययुगात संरजामशाहीच्या विकासाबरोबर अधिक दृढतर झाली तर काही विद्वान असे मानतात की महाराष्ट्र−कर्नाटकात चालुक्य−राष्ट्रकूट काळात (६०६−९७५) ग्रामव्यवस्थेत महत्तर (वयस्कर पुढारी) आणि व्यापारी श्रेणींचे प्रतिनिधी यांचे महत्त्व असे. ग्रामसंस्थेतील कारभारात काही अधिकारपदे काही कुळांकडे वंशपरंपरेने दिली जात आणि त्या कुळांना काही जमीन कायमची इनाम देण्याची प्रथा असे. त्यामुळे त्या त्या कुळातील अधिकारी आपापली कामे दक्षतेने करीत असत. यादवकाळापूर्वी ही संस्था व्यवस्थित कार्यरत असल्याचे दाखले शिलालेखांतून आणि ताम्रपटांतून मिळतात. यादवकाळात (९८०−१३१८) वतनदारी पद्धत पूर्णतः प्रस्थापित झालेली दिसते. ग्रामव्यवस्थेत पाटील हा सर्वांत मोठा वतनदार आढळतो. तसा देशमुख किंवा देशग्रामकूट होय. पाटील हा जसा गावचा राजा, तसा देशमुख हा आपल्या हाताखालच्या प्रदेशाचा नायक असे. वतनाच्या अधिकाराचे महत्त्व मोठे असले, तरी कर्तव्यपालनाची इच्छा त्यापेक्षा अधिक असे. वतनदार हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकांच्या हितासाठी झटणारे असल्यामुळे लोक त्यांना मान देत. वतनदारांनीही आपल्या वतनाचा व आपल्या अधिकाराचा मोठा अभिमान वाटे. ग्रामसंस्था ही प्रत्येक गावात असे आणि तिचा कारभार ग्रामपंचायत नावाची सभा करीत असे. पुढे मात्र ही व्यवस्था थोडी बदलली आणि ग्रामीण भागात देशकसत्ता आली. देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून ‘देशक’ म्हणत. गावाच्या कारभारासाठी ज्या सभा भरत, त्यांत बारा बलुतेदार, शेतकरीस जोशी या सर्व जानपदस्थ लोकांचा समावेश असे. यांतील सर्वजण वजनदार असत. त्यामुळे राजसत्त बदलली, तर अधिकारी बदलत पण लोकव्यवहाराचा कणा बनलेली वतनदार मंडळी कायम असत. म्हणून यादवांच्या सीमाभागात परमार, शिलाहार, काकतीय इ. वंशांतील राजांनी अधूनमधून हस्तक्षेप केला किंवा यादवांना प्रसंगोपात काही प्रदेश सोडावा लागला तरी स्थानिक कारभारात त्यामुळे विशेष गोंधळ झालेला दिसत नाही. त्या काळी देशवहीत सर्व घटनांची नोंद करण्याची पद्धत होती व वतनी अधिकाऱ्यांनी ती अप्रतिहत चालू ठेवली होती. यादवांच्या नंतर मुसलमानी अंमल (१२१८ ते १७०७) आला. दक्षिण हिंदुस्थानात मध्ययुगात बहमनी सत्ता (१३४७ ते १५३८) व पुढे तिचे पाच शाह्यांत−आदिलशाही, कुत्बशाही, बरीदशाही, निजामशाही व इमादशाही−विभाजन झाले पण वतन संस्थेत लक्षणीय बदल झाले नाहीत कारण राजसत्ता बदलली, तरी स्थानिक कारबारात विशेष फरक पडला नाही. फक्त राजनिष्ठेत फरक झालेला दिसतो. मुसलमानांनी ही सर्व वतने चालू ठेवलेली दिसतात.

       मराठेशाहीत या वतनसंस्थेत आमूलाग्र बदल झाला नाही, तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी देशमुख−देशपांडे यांची प्रसंगोपात वतने जप्त करून वेतनपद्धती आणण्याचा प्रयत्न केला आणि वसूल गोळा करण्यासाठी त्यांनी देशमुख−देशपांडे या जुन्या वतनदारांवर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे पगारी अधिकारी नेमले. त्यामुळे वचनदारांच्या चढेलपणास पायबंद बसला. शक्यतो नवीन वतने न देण्याचे तत्त्व त्यांनी पाळले तथापि सर्वच जुनी वतने त्यांनी काढून घेतली असे नव्हे फक्त त्यांवर काही निर्बंध लादले. शिवकाळात वतनसंस्थेची स्थिती थोडी वेगळी होती. अनेक वतनदार देशमुख स्वराज्यनिष्ठ होते तर काही शत्रूला सामील होते. रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात शत्रूशी संधान बांधण्याऱ्या वतनदारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचा उद्योग आरंभताच, असे काही मुस्लिम स्वामीनिष्ठ वतनदार त्यांच्या विरूद्ध गेले होते.

       त्यावेळी राजसत्तेच्या खालोखाल देशकसत्ता म्हणजे देशमुख, कुळकर्णी, देशकुळकर्णी, पाटील, बलुतेदार इ. वतनदारांची लहानमोठे अधिकार असलेली उतरंड होती. हीतच प्रमुख गावकरी रयतेचा अंतर्भाव होतो. देशकसंस्थेला वतन म्हणत आणि गोत म्हणजे ग्रामसंस्था. त्यालाही वतन म्हणत. ह्या ग्रामसंस्थेला फार महत्त्व होते. गावातील वतनाचे भांडण-तंटे ग्रामसंस्थेमार्फत निकालात काढण्याचा प्रघात होता. त्यावेळी महाराष्ट्रात कडेकपारी अनेक खेडी होती. त्यांपैकी प्रत्येक गाव बव्हंशी स्वयंपूर्ण होते. गावात शेतीखेरीज कारागिरी करणाऱ्यास बलुते अशी संज्ञा असे. त्यास पोटाकरिता जमिनीच्या उत्पन्नानुसार धान्यादी वस्तू मिळत व जमीन इनाम मिळे.

       शिवकालीन ग्रामसंस्था कुटुंबतत्त्वावर आधारित होती. वतनदार कुळकर्णी हा गावचा मिरासदार असे. कुळकर्ण्याचा निर्वंश झाल्यास त्याच्या जागी दुसरा कुळकर्णी वंशपरंपरेने नेमण्याचा हक्क ग्रांमस्थांना असे. तत्पूर्वी ग्रामस्थ तात्पुरता मुतालिक नेमून नव्या कुळकर्ण्याचा शोध घेत. ग्रामस्थांनी अशी वतने बहाल केली, तरी त्यांवर परण्याच्या देशमुखांचे शिक्के व देशपांड्यांचे दस्तक असावे लागत. एकदा वतन दिल्यानंतर त्याला कोणी हरकत घेतली, तर सारा गाव वतनदाराची पाठ राखीत असे. कुळकर्ण्याप्रमाणे पाटीलसुद्धा मिरासदार होता. पाटील मृत्यू पावला त्याचा खून झाला, तर त्याच्या बायकोच्या आणि अज्ञान मुलाच्या हातून ग्रामस्थ कारभार चालविण्यास मदत करीत. शिवकालीन समाजात वतनासक्ती जबरदस्त होती व वतनासंबंधी भांडणे पिढीजात चालू राहत परंतु वतनाच्या भांडणात राजसत्ता अखेरचा निकाल ग्रामसभांवर सोपवी. राजाकडून फिर्यादीस मुळातच हुकूम असे की, ‘हे मिराशीचे काम आहे, तरी उभयता वादी गोतामध्ये जाऊन कागद रूजू करून निवाडा करून घेणे.’ गोतदेशकसभेत त्या मंडळींनी खऱ्या साक्षी द्याव्या, अशी त्यांना शपथ घालण्यात येई. शिवाजी महराजांनी खोटी साक्ष देणाऱ्याची जीभ कापण्याचा हुकूम दिला होता.

       शिवाजी महाराजांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी हे धोरण सोडले आणि सरंजामशाहीला प्रारंभ झाला. शाहू छत्रपतींच्या (१७०७ - १७४९) वेळी एखाद्या सरदाराने नवीन प्रदेश जिंकून घेतला, की त्यालाच तो जहागीर म्हणून देण्याची प्रथा पडली. त्यांमुळे पुढे पेशवाईत मराठी साम्राज्याचा विस्तार होऊनही या सरंजामशाहीमुळे एकसूत्री राज्य राहिले नाही आणि स्वतंत्र संस्थाने उद्यास आली. पुढे ब्रिटिशांनी हिंदुस्थान पादाक्रांत केल्यानंतर अव्वल इंग्रजी अंमलात ही संस्थाने कायम ठेवली. ग्रामसंस्थेतील पाटील, कुळकर्णी, महार ही वतने तशीच चालू ठेवली पण देशमुख−देशपांडे यांची सरंजामी वतने नष्ट केली. पुढे स्वातंत्र्योत्तर भारतात संस्थानांच्या विलीनीकरणाबरोबर सर्व वतनेसुद्ध संपुष्टात आली.

       कुळकर्णी, देशमुख-देशपांडे व देसाई यांच्या वतनांसंबंधी त्यांचे हक्क व कर्तव्ये मानमरातब आणि उपजीविकेची साधने इत्यादीची माहिती पुढे दिली आहे.

🚩 कुळकर्णी - प्राचीन ग्रामसंस्थेचील एक अधिकारी व वतनदार. त्याला मिळालेल्या वतनाला ‘लिखनवृत्ती’ म्हणत असत. हे वतन सुमारे एक हजार वर्षांचे जुने असावे असे मानतात. गावातील एकूण जमिनीचा पंचविसावा हिस्सा पाटील, कुळकर्णी व चौगुला यांना इनाम देण्याची वहिवाट होती. यांना जमिनीवर शेतसारा नसे. गाव-पाटलाचा लेखक-मदतनीस या नात्याने गावाच्या वसुलाचा हिशोब ठेवण्याचे काम कुळकर्ण्याकडे असे. किल + करण या सामाजिक शब्दावरून कुळकर्णी हा शब्द वनला असून कुळ म्हणजे जमिनीचा भाग वा शेतकरी व करण म्हणजे लिखनवृत्ती होय. कुळवार हिशोब लिहिणारा तो कुळकर्णी, असेही त्याचे व्यवसायानुरूप वतननाम बनले असावे. याला स्थलपरत्त्वे ‘पटवारी’ अथवा ‘पांड्या’ म्हणतात. बहुधा कुळकर्णी ब्राह्मण असत परंतु प्रभु, मराठे, लिंगायत व मुसलमान या ज्ञातीतही कुळकर्णी वतनदार आढळतात. शिवकालात यांना दोन चवाळी, जोडा, मुंडासे, धोतरजोडी, रूमाल, पासोडी वगैरे हक्कबाबी असत. यांशिवाय गावातील धंदेवाल्यांकडून तेल, पाने, सुपारी, गूळ, केळी इ. मुशाहिरा मिळे. गावाचे दप्तर, शिवाराचे कमाल क्षेत्र, आकार व वर्णन ह्यांचा आकारबंद, शेतवारपत्रक, लावणीपत्रक, पडपत्रक, वसुलीबाकीपत्रक, त्याची फाळणी व जमाखर्च, गुरे-माणसांची गणती वगैरे लेखी कामे तो करी. त्याचा सामाजिक दर्जा चांगला असे. स्वातंत्र्योत्तर काळात ही वतने जाऊन त्याजागी तलाठ्यांची शासनाने नियुक्ती केली.

🚩 देशमुख-देशपांडे व देसाई - हे उच्चश्रेणीतील परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. देशमुखी म्हणजे लष्करी व फौजदारी अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी, तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख-देशपांडे यांनी अमूक एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत. कर्नाटकात देशमुख-देशपांडे यांनाच अनुक्रमे ‘नाडगावुडा’ आणि ‘नाडकर्णी’ म्हणत. हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. शिवाजीनी देशमुख−देशपांडे वतनदारांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले.

       देशमुख−देशपांडे यांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. त्यास ‘रूसूम’ म्हणत. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. पाटील−कुळकर्ण्यांप्रमाणेच परागण्याच्या पंचायतीत त्यांना हक्कबाबी असत. भेट, तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल वगैरे वस्तू बलुत्याप्रमाणेच त्यांनाही अधिक प्रमाणात मिळत असत. परागण्याच्या जमाबंदीचे सर्व दप्तर देशपांड्यांच्या ताब्यात असे. त्यांच्या हाताखाली ‘मोहरीर’ नावाचा एक कारकून हे काम पाही. निरनिराळ्या वहिवाटदारांचे, वतनदारीचे हक्क व जमिनीची प्रतवारी, तिचे वर्णन इत्यादी बारीकसारीक बाबींची नोंद या हिशोबात केलेली असे. देशपांडे विविध गावांच्या कुळकर्ण्यांनी पाठविलेले सर्व हिशोब संकलित करून सर्व परगण्यांचा ताळेबंद तयार करीत असे. कोकणात व कर्नाटकात हे काम देसाई हे वतनदार करीत. कोकणातील प्रभुपणाचा हुद्दाही देसायांच्याच जोडीचा असे. काही वेळा प्रभुदेसाई असा वतन-हुद्याचा उच्चार करीत. देशपांडे-देसाई हे देशमुखाच्या हाताखालील वतनदार असत. काही ठिकाणी देशपांड्यासच देशकुलकर्णी असेही म्हटले आहे. मुसलमानी अंमलात वतनाच्या घालमेली झाल्या. त्यावेळी मराठे पाटील व मराठे देशमुख हे बरेचसे स्थानभ्रष्ट होऊन त्यांच्या जागी ब्राम्हण देशमुख आले. वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख−देशपांडे, परगणे−नाईक क्वचित काही ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात. अव्वल ब्रिटिश अंमलात देशमुख−देशपांडे यांचे वतनदारी अधिकार कमी करण्यात आले मात्र त्यांचा रूसूम चालू होता.

लेखनसीमा ॥

🚩 पत्र संदर्भ - शिवकालीन पत्र-सार-संग्रह खंड पहिला, पत्र क्र. ५०४.

🚩 फोटो - गुगल

🚩 लेख खालील ग्रंथांतून साभार -
१) 'स्वराज्याची शपथ'- श्री राजा शिवछत्रपती - गजानन भास्कर मेहेंदळे
२) 'वतनसंस्था' - मराठी विश्वकोश

🚩🚩

मंगळवार, १० मे, २०२२

"स्वराज्याचे मुख्यप्रधान"

 'स्वराज्याचे पेशवे / पंतप्रधान / मुख्यप्रधान म्हणजे सरकारकून'

 



       सतराव्या शतकात शहाजीराजे आणि जिजाबाईसाहेबांना स्वराज्यस्थापनेचं स्वप्न पडलं. मग ते आपल्या मुलानं म्हणजे शिवबानं पुर्ण करावं असं त्यांना वाटणं अगदी स्वाभाविकच होतं. त्यासाठी दोघांनी अगदी जीवापाड प्रयत्न केले. आई जिजाऊंनी चांगले संस्कार करून तर वडील शहाजीराजांनी पूर्णपणे पाठबळ देऊन.

       इ.स. १६३७ च्या आसपासचा काळ शहाजीराजांसाठी अतिशय धामधुमीचा आणि कष्टाचा होता. निजामशाहीच्या नावाखाली स्वराज्यस्थापनेचा मांडलेला डाव पूर्णपणे उधळला गेला होता. तोपर्यंत निजामशाहीचे वजीर असलेल्या शहाजीराजांना लवकरच आदिलशाही सरदार रणदुल्लाखानाच्या हाताखाली एक सामान्य बाराहजारी मनसबदार म्हणून कर्नाटकात रुजू व्हावं लागणार होतं. त्यावेळची एकंदर राजकीय अस्थिर परिस्थिती पाहता संपूर्ण कुटूंब कर्नाटकात नेणं धोक्याचं होतं त्यामुळं कर्नाटकात जाण्यापूर्वी त्यांना सगळ्या कुटूंबाची काळजी वाटणं तसं स्वाभाविकच होतं. यावर उपाय म्हणून त्यांनी हळूहळू कर्तबगारी दाखवू लागलेल्या थोरल्या संभाजीराजांना सोबत कर्नाटकात घेऊन जाणं पसंत केलं तर दुसरीकडे त्यांना धाकटया शिवाजीराजांना मातोश्री जिजाऊंसोबत पुण्याला ठेवणं योग्य वाटलं. असं केल्यामुळं एकतर कुटुंब सुरक्षितही राहणार होतं आणि स्वतःच्या अनुपस्थितीत त्यांना मिळालेल्या पुणे परगण्याच्या जहागिरीवर लक्षही ठेवणं शक्य होणार होतं. (बारामती आणि सुपे हे परगणे इ.स. १६३९ च्या आसपास शहाजीराजांकडे आले असावेत.) हा सर्व विचार करून त्यांनी विश्वासू अशा दादाजी कोंडदेव मलठणकरांना आपला मुतालिक नेमून पुणे परगण्याच्या व्यवस्थेचा भार सोपवला आणि दादाजींच्या मदतीसाठी सिध्दी हिलालला एक हजार घोडदळासह पुण्याला नियुक्त केलं.

       पुण्याला आल्यानंतरच्या म्हणजे इ.स. १६३७ नंतरच्या तीनचार वर्षात स्वराज्याच्या मुलकी व्यवस्थेची घडी हळूहळू बसू लागली होती. पुढे इ.स. १६४१ च्या सुरवातीला शिवाजीराजे आणि जिजाऊसाहेब बंगळूरला शहाजीराजांना भेटायला गेले. मधल्या काळात जिजाऊसाहेबांचे संस्कार शिवाजीराजांवर होऊ लागले होतेच पण आता वेळ वडिलांनी पाठबळ देण्याची होती. राज्यकारभार चालवायचा तर चांगल्या माणसांची गरज असते हे उभी हयात निजामशाहीच्या राजकारणात घालवलेल्या शहाजीराजांनी चांगलंच ओळखलं होतं. या संदर्भातला रामचंद्र पंडीत अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रातला हा उतारा बरंच काही सांगून जातो.

 


       त्यामुळं शहाजीराजांनी शिवाजीराजे, जिजाऊसाहेब आणि दादाजी कोंडदेव यांच्याबरोबर बंगळूरहून परत येताना शामराव नीळकंठ रांझेकर ऊर्फ शामराजपंत पद्मनाभी हे पेशवे म्हणून, बाळकृष्णपंत आणि नारोपंत दिक्षित यांना मुजूमदार म्हणून तर सोनोपंत डबीर आणि रघूनाथ बल्लाळ यांना सबनीस म्हणून सोबत पाठवलं. ही सर्व मंडळी शहाजीराजांच्या विश्वासातली आणि अतिशय सक्षम अशी होती. या माणसांनी अगदी सुरूवातीलाच स्वराज्याच्या व्यवस्थेचा पाया इतका मजबूत घातला की इ.स. १६४१ सालातल्या पहिल्या शामराजपंत पद्मनाभींपासून सुरू झालेली पेशवेपदाची परंपरा इ.स. १८५७ सालातल्या नानासाहेब पेशव्यांपर्यंत म्हणजे तब्बल दोनशेसोळा वर्ष अखंडीतपणे सुरू असलेली दिसून येते. या दोनशेसोळा वर्षांच्या काळात एकूण चौदा कर्तुत्ववान पेशव्यांनी स्वराज्याची चाकरी केली. कोण होते ते चौदा जण? आपल्या पुढील लेखात आपण याबद्दलच तर जाणून घेणार आहोत. चला तर मग...

 

 
 



       ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी फारसी शब्दाला पर्यायांसाठी लिहिल्या गेलेल्या राजव्यवहारकोशात पहिल्याच 'राजवर्ग' प्रकरणात पेशवा शब्दाला पर्याय म्हणून 'प्रधान' हा शब्द योजला गेला आहे. 'पेश्वा' किंवा 'पेशवा' या मूळ पुल्लींगी फारसी शब्दाला पर्याय म्हणून प्रधान, मुख्यप्रधान, पंतप्रधान किंवा सरकारकून हे शब्द मराठी साधनांत वापरलेले दिसून येतात. मुसलमानी अंमलात/साहित्यात मात्र पेशवा या शब्दानेच मुख्यप्रधानाचा उल्लेख आढळतो.

॥ राजवर्गः ॥

राजा ज्ञेयः पादशाहः स्वामी साहेब ईरितः ।
अन्तःपुरं तु दरुनीत्याहुर्यवन भाषया ॥ १ ॥
युवराजा परिज्ञेयो वलीयहृद नामकः ।
शाहजादा राजपुत्रः प्रधानः पेशवा तथा ॥ २ ॥


       राज्याभिषेकानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ज्येष्ठ वद्य प्रतिपदेला महाराजांनी राज्यकारभार कसा करावा, कोणत्या अधिकाऱ्यांनी कायकाय कामे करावीत याबद्दल तीन जाहीरनामे प्रसिद्ध केले तर चौथा ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला प्रसिद्ध केला यालाच 'कानून जाबता' असं म्हणतात. चौथ्या जाहीरनाम्यात प्रधानमंडळानी करावयाच्या कामांबद्दल एकूण वीस कलमे दिलेली आहेत. या लेखाचा विषय 'पंतप्रधान/पेशवा' असल्यामुळं आपण फक्त त्याविषयीच बोलू. चौथ्या जाहीरनाम्यातील मुख्य प्रधानांच्या संदर्भातील काही कलमे...

१) मुख्य प्रधान यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रावरी शिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका ताबिनात स्वाधीन होईल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावे व सर्व सरदार, सेना यांजबरोबर जावे आणि सर्वसंमत चालावे. येणेप्रमाणे कलम १.
२) अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जाणे त्यास मुतालिक करून दिले. त्यांणी सेवा व्यापार चालवावा. हुजुर रहावे. येणेप्रमाणे कलम १.
३) अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जावयास दखरदार सर्व हुजुराचे जावे. त्याचे दाखल्यानी व्यवहार करावा. स्वारीस जाणे त्यास मुतालिक करून दिल्हे त्यांणी सेवा-व्यापार चालवावा. हुजुर रहावे. येणेप्रमाणे कलम १.

       अष्टप्रधानातल्या पंडीतराव आणि न्यायाधीश सोडल्यास सर्व प्रधानांना युद्ध किंवा गरजेनुसार युद्धप्रसंगांना जाणे जबाबदारीत समाविष्ट केलेले होते. महाराजांनी राज्यकारभाराबाबत घालून दिलेले नियम इतके काटेकोर पद्धतीने तयार केले होते की ते मोडण्यास कुठे पळवाटच ठेवलेली नव्हती. त्यांची राज्यपद्धती अशी होती की संपूर्ण राज्यकारभार अष्टप्रधान मंडळावर सोपवून तो चोख चालेल याची पूर्ण काळजी घेतलेली होती. घालून दिलेल्या या नियमांमुळं राज्यकारभारात प्रत्यक्ष ढवळाढवळ न करता राजाला राज्यकारभाराविषयी दैनंदीन माहिती विनासायास मिळणार होती. प्रत्येक खात्यावर त्या त्या खात्याच्या प्रमुखाबरोबरच स्वतःचेही पूर्णपणे नियंत्रण राहील यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील माणसं जागोजागी नेमलेली होती.

स्वराज्याचे पेशवे/पंतप्रधान/मुख्यप्रधान म्हणजे सरकारकून कोणकोण होते, त्यांचा कार्यकाळ कोणता याबद्दल थोडक्यात माहिती आता आपण पाहू...

🚩 शामराजपंत पद्मनाभी म्हणजे शामराज निळकंठ रांझेकर - (कार्यकाळ इ.स. १६४१ ते १६६१) -


🚩 महादजी शामराव म्हणजे महादेव रांझेकर - (कार्यकाळ इ.स. १६६१ - १६७२) -
       शिवछत्रपतींचे पहिले प्रधान किंवा मुख्यप्रधान शामराजपंत रांझेकर होते. त्यानंतर त्यांचे पुत्र महादेव मुख्यप्रधान झाले असावेत किंवा शामराजपंतांच्या अनुपस्थितीत महादेव स्वतः प्रधानांचे शिक्के करत असावेत. या दोघांच्याही शिक्यांत मुख्यप्रधान असा शब्द न वापरता ‘मतिमंत्‌प्रधान’ असा शब्द वापरण्यात आला आहे. शामराजपंतांचा शिक्का शके १५८४ म्हणजे इ. स. १६६२ पर्यंतच्या, तर महादेव रांझेकरांचा शिक्का १५९४ म्हणजे इ. स. १६७२ पर्यंतच्या कागदपत्रांवर आढळतो. अतिशय कमी कागदपत्रं उपलब्ध असल्यामुळं पहिल्या दोन प्रधानांची कर्तबगारी समजण्यास काही मार्ग नाही पण अगदी बाल्यावस्थेत असणाऱ्या स्वराज्याच्या मुलकी व्यवस्थेचा पाया या दोन पेशव्यानी घातल्यामुळं त्यांना नक्कीच कर्तुत्ववान म्हणायला हवं. महादेव रांझेकरांनंतर मोरोपंत त्रिमल/त्र्यंबक पेशवे हे शिवाजी महाराजांचे मुख्यप्रधान झाले.

शामराजपंत रांझेकर


🚩 मोरोपंत त्रिमल/त्र्यंबक पिंगळे - (कार्यकाळ इ.स. १६७२ ते १६८१) -
       मोरोपंत पेशवे प्रधान होण्यापूर्वी कित्येक वर्षे शिवछत्रपतींच्या सेवेत होते. त्यांनी कोकणात व देशावर अनेक प्रकारच्या यशस्वी हालचाली केल्यानंतर त्यांना मुख्यप्रधानपद मिळालं. इ.स. १६५९ च्या प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानाचा वध केल्यावर विजापुरी सैन्यावर मराठा फौजांनी जोरदार हल्ला चढवला तेव्हा मोरोपंत त्रिमल/त्र्यंबक पिंगळ्यांनी सैन्याच्या एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं. इ.स. १६७१ च्या फेब्रुवारीत त्यांच्या हाताखालील मराठा फौजांनी मुघलांच्या ताब्यातील पश्चिम खानदेश आणि बागलाण प्रदेशांत चढाया केल्या आणि संपूर्ण बागलाण भाग ताब्यात आणला. इ.स. १६७२ मधील उत्तर कोकणातील कोळी राज्यांविरुद्धच्या मराठा मोहीमेचं नेतृत्व मोरोपंतांनी केलं. या मोहीमेत ०५ जून १६७२ रोजी मराठ्यांनी कोळ्यांचा राजा विक्रमशहाच्या सैन्याचा पराभव करत जव्हाराचा पाडाव केला. त्यानंतर मराठा सैन्याने उत्तरेस रामनगराकडे कूच केलं मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळं व मुघल सेनापती दिलेरखानाने त्याच्या सैन्याची मराठ्याविरूद्ध जुळवाजुळव सुरू केल्यामुळं मोरोपंतांनी रामनगरातून तात्पुरती माघार घेतली. सैन्याची पुन्हा जुळवाजुळव करून जुलै १६७२ च्या सुमारास मोरोपंतांच्या हाताखालच्या मराठी सैन्याने रामनगरचा सर्व मुलूख जिंकून घेतला.
       शिवराज्याभिषेकाच्या वेळी मोरोपंतच मुख्यप्रधान होते. महाराजांच्या गैरहजेरीत त्यांचा प्रतिनिधी या नात्याने मोरोपंतांनाच राज्यकारभार सांभाळावा लागे. त्यांच्या पहिल्या शिक्क्यात प्रधानकीचा निर्देश नाही पण पुढील दोन्ही शिक्क्यांत त्यांचा मुख्यप्रधान म्हणून निर्देश आला आहे. संभाजीराजांच्या कारकीर्दीच्या आरंभी तेच मुख्यप्रधान होते. ते वारल्यानंतर त्यांचा थोरला मुलगा निळो मोरेश्वर हा मुख्यप्रधान झाला.
 

मोरोपंत पिंगळे


🚩 निळो मोरेश्वर पिंगळे - (कार्यकाळ इ.स. १६८१ ते १७०१) -

🚩 बहिरोजीपंत/भैरवजी मोरेश्वर पिंगळे - (कार्यकाळ इ.स. १७०१ ते १७१३) -
       छत्रपती शाहू मोगलांच्या कैदेतून १७०७ साली सुटून आल्यानंतर १७१३ पर्यंत निळो मोरेश्वराचे भाऊ बहिरो मोरेश्वर हेच मुख्यप्रधान म्हणून काम पहात होते.

🚩 बाळाजी विश्वनाथ भट - (कार्यकाळ इ.स. १७१३ ते १७२०) -
       बहिरोजीपंतांनंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ या कोकणातील भट घराण्यातील हुशार आणि कर्तबगार इसमास मुख्यप्रधानकी दिली. बाळाजी आणि जानोजी ही विश्वनाथ भटांची मुलं मूळची श्रीवर्धनची. तिथे राहून हे देशमुखीचा कारभार पहात असत. इ.स. १६८९ नंतर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिद्दीने उचल खाल्ली. जंजिऱ्याच्या सिद्दीच्या जवळच यांचा भाग असल्यामुळं साहजिकच यांना सिद्दीचा नेहमीच उपद्रव होई. त्यातच जानोजींना सिद्दीने धरून नेलं आणि समुद्रात बुडवून मारून टाकलं. असं झाल्यावर श्रीवर्धनला राहणं धोक्याचं आहे हे जाणून बाळाजी विश्वनाथ वेळासला राहणाऱ्या बाळाजी महादेव भानूंकडे गेले. भानू आणि भट ही आतेमामे भावंड. बाळाजी भट रोजगारासाठी कोकणातून घाटावर जाणार असं म्हटल्यावर बाळाजी भानू पण त्यांच्या दोघा भावांसोबत यायला तयार झाले. राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी बाईसाहेब साताऱ्याला त्यावेळी मराठी राज्याची धुरा सांभाळत होत्या.
       पुर्वीपासून सासवडच्या पुरंदरे घराण्यासोबत भट कुटुंबाचा स्नेह होता, त्यामुळं कोकणातून घाटावर आल्यावर बाळाजी आणि भानू बंधू पहिल्यांदा अंबाजीपंत पुरंदऱ्यांना भेटले. त्यानंतर इ.स. १६९०-९७ या दरम्यान कधीतरी अंबाजीपंत पुरंदरे बाळाजी विश्वनाथ यांना घेऊन साताऱ्यात आले. साताऱ्याला आल्यावर जात्याच हुषार आणि शुर असलेल्या बाळाजींची कारकीर्द बहरली. सुरवातीला साताऱ्यात शंकराजी नारायण सचिवांकडे त्यांची कारकीर्द सुरू झाली. नंतर रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे त्यांनी मुतालकी केली. पुढे १६९९ साली त्यांना पुणे प्रांताचे सरसुभेदार म्हणून नेमलं गेलं. शेवटी इ.स. १७०४ साली दौलताबाद प्रांताचे सरसुभेदार म्हणून त्यांच्या कारकीर्दीचा आलेख चढतच गेला. शाहु महाराज सुटून महाराष्ट्रात आल्यावर बाळाजी विश्वनाथांनी बहुतेक सगळ्या मराठा सरदारांना शाहु महाराजांकडे वळवून मोठी कामगिरी केली. बाळाजींनी मराठी राज्यातील कान्होजी आंग्रे, उदाजी चव्हाण इ. मातबर सरदारांना छत्रपती शाहूच्या छत्राखाली एकत्र आणून मराठी राज्याची विसकटलेली घडी पुन्हा नीट बसविली. बाळाजींची आत्तापर्यंतची कामगिरी पाहून १७ नोव्हेंबर १७१३ रोजी पुण्याजवळच्या 'मांजरी' येथे शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना पेशवाईची वस्त्रे दिली. बाळाजी विश्वनाथांची सर्वात भरीव कामगिरी म्हणजे १७१७ साली येसुबाईसाहेबांबरोबरच भोसले कुटूंबीयांची दिल्लीहून केलेली सुटका आणि मोगलांकडून मिळवलेला चौथाई - सरदेशमुखीचा हक्क. या चौथाईचा हक्कामुळं अकराव्या शतकापासून उत्तरेकडून दक्षिणेकडे होत असलेल्या स्वाऱ्यांचा रोख बदलून मराठ्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे स्वाऱ्या सुरू झाल्या. ही एकूणच हिंदूस्तानच्या राजकारणाला कलाटणी देणारी अतिशय महत्वाची घटना होती. थोरल्या महाराजांचं स्वप्न आत्ता कुठे हळूहळू साकार होऊ लागलं होतं. अखेरीस दिल्लीच्या तख्तावर कुणाला बसवायचं ते शेवटी मराठे ठरवू लागले.
       दोन वर्ष अखंड धावपळ, एका पाठोपाठ स्वाऱ्या करून स्वराज्याचा हा कर्तबगार पेशवा अंथरूणाला खिळला आणि शेवटी ०२ एप्रिल १७२० रोजी सासवडला मृत्यू पावला.

बाळाजी विश्वनाथ भट


🚩 बाजीराव बल्लाळ म्हणजे पहिले बाजीराव - (कार्यकाळ इ.स. १७२० ते १७४०) -
       बाळाजी विश्वनाथांनंतर त्याचा थोरला मुलगा पहिला बाजीराव ऊर्फ बाजीराव बल्लाळ यांस शाहू महाराजांनी चैत्र शु.७, शके १६४२, शार्वरीनाम संवत्सरात कराडजवळच्या मसूर येथे जगदाळेंच्या वाड्यात पेशवेपदाची वस्त्रे दिली. पहिल्या बाजीरावांमध्ये धडाडी होती. त्यांनी आपल्या पराक्रमाने छत्रपती व मराठे सरदार यांमध्ये परस्परविश्वास निर्माण केला आणि मोगलांच्या ऱ्हासाची संधी साधून मराठी राज्याचा विस्तार राजपूत, बुंदेले यांच्या मदतीने उत्तर हिंदुस्थानात केला. शिवाय दक्षिणेतील मोगल सुभेदार आसफजाह निजाम याचा अनेक लढायांत पराभव करून त्याच्यावर वचक बसवला आणि जबर खंडणी वसूल केली. इ.स. १७३७ ते १७३९ ही दोन वर्षे अटीतटीचा सामना होऊन शेवटी चिमाजीआप्पांनी वसई जिंकली आणि पोर्तुगीजांचं तेथील बसलेलं बस्तान पार मुळापासून उखडून टाकलं. नंतर पुढल्याच वर्षी बाजीराव व चिमाजीआप्पा यांनी औरंगाबादजवळ निजामाच्या मुलास म्हणजे नासीरजंगास गाठून त्याचे हंडीया व खरगोण हे सुभे हस्तगत केले.
       शेवटी २८ एप्रिल १७४० रोजी मराठ्यांचे बाजीराव बल्लाळ हे ईश्वरदत्त सेनानी नर्मदेकाठी रावेरखेडी येथे वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी मरण पावले. खरंतर आयुष्यातल्या बेचाळीस लढायात कायमच अजिंक्य राहिलेल्या बाजीरावांच्या प्रत्येक लढाईवर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. एवढंच नाही तर त्यांच्या उण्यापुऱ्या वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यातल्या एकएक घटनेवरही एकएक संपूर्ण लेख लिहिता येईल इतकं त्यांचं कर्तुत्व मोठं आहे. पण लेखाचा विषय थोडा वेगळा असल्यामुळं बाजीरावांच्या मुख्यप्रधानपदाच्या वीस वर्षांच्या कारकीर्दीतील काही महत्वाच्या घटनाच आपण पुढे पाहू...

१) खानदेशात सय्यदबंधुंचे बंड मोडून काढले.
२) डिसेंबर १७२० साली औरंगाबादला हैदराबादच्या निजामाचा दारूण पराभव.
३) जून १७२१ साली माळव्यात दाऊदखान पन्नीचा पराभव. खान रणांगण सोडून पळत सुटला.
४) बाजीरावांना घाबरून पोर्तुगिजांचा ०९ जानेवारी १७२२ ला वर्सोली येथे पेशवे-आंग्रे यांच्या बरोबर तह.
५) बाजीरावांनी नाशिक, गोंडवन, बागलाण, वऱ्हाड, खानदेश ताब्यात आणला.
६) वरील मुलूखातून सुरळीत वसूलीसाठी बाजीरावांनी उदाजी पवार यांची धार येथे नेमणूक केली.
७) गुजरात-माळवा भागाचा सुभेदार दयाबहाद्दराचा उज्जैन येथे पराभव. बाजीरावांच्या सर्व अटी बिनशर्त मान्य केल्या.
८) दक्षिणेतील गुबी/गुत्तीचे मुरारराव घोरपडे, म्हैसूरचे वडियार, अर्काट, गदग, कनकगिरी, चित्रदुर्ग, सुरापूर, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टण आणि बिदनूर संस्थाने स्वराज्यात दाखल.
९) २५ फेब्रुवारी १७२८ ला झालेल्या पालखेडच्या युद्धात हैदराबादच्या निजामाचा सपशेल पराभव. लगेचच ०६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगावचा निजाम आणि मराठ्यांमधे तह.
१०) गुजरात-माळवा प्रांताच्या चौथाई व सरदेशमुखीचा गुजरातचा सुभेदार सरबुलंदखानासोबत तह.
११) ग्वाल्हेरला राणोजी शिंदे आणि इंदौरला मल्हारराव होळकरांची नेमणूक.
१२) चिमाजीअप्पांचा उदाजी पवार, राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांच्या फौजेसोबत राजपुतान्यात गिरीधरबहाद्दरचा पराभव. गिरीधरबहाद्दर खुद्द चिमाजीअप्पांकडून मारला गेला.
१३) बुंदेलखंडातल्या जैतपूरला महम्मदखान बंगशाचा पराभव. पन्न्याच्या किल्ल्यात छत्रसाल बुंदेल्यांकडून बत्तीस लक्ष रूपये वार्षिक उत्पन्नाचा म्हणजे बुंदेलखंडाचा एकतृतीयांश मुलूख आणि हिऱ्याच्या खाणी मराठ्यांना मिळाल्या.
१४) ०१ एप्रिल १७३१ ला गुजरातेतील डभईजवळ मिलापूरला त्र्यंबकराव दाभाडे आणि पिलाजी गायकवाडांचं बंड मोडून काढलं.
१५) दमण येथे निजामाच्या फौजेचा धुव्वा उडवला.
१६) एप्रिल १७३३ मधे सेखोजी आंग्रेंसोबत कोकण मोहिम. नागोठणे, पेण, पनवेल, चौल, रेवदंडा, मुरूड, दंडा-राजपुरी, महाड, पाचाड, बिरवाडी, वेळास, श्रीवर्धन, आगरकोट, दाभोळ, गुहागर ताब्यात.
१७) मार्च १७३७ मध्ये दिल्ली लुटली.
१८) डिसेंबर १७३७ दुराई-सराई करार.
१९) १३ मे १७३९ वसई ताब्यात.
२०) २७ फेब्रूवारी १७४० रोजी पराभुत झालेल्या नासीरजंगाशी मुंगी-शेगावचा तह. तहान्वये हंडीया आणि खरगोण सुभे मराठ्यांकडे.

बाजीराव बल्लाळ


🚩 बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब - (कार्यकाळ इ.स. १७४० ते १७६१) -
       बाजीराव बल्लाळांनंतर शाहूमहाराजांनी त्याचा थोरल्या मुलाला बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब यांस २५ जून १७४० म्हणजेच आशाढ शु. द्वादशी शके १६६२ ला मुख्यप्रधानपदाची वस्त्रे दिली. नानासाहेबांनी कोकणात पुन्हा एकदा जम बसवू पाहणाऱ्या पोर्तुगिजांवर मोहिम काढून त्यांना शांत बसवलं. इ.स. १७४६ च्या अखेरीस सदाशिवरावभाऊ, महादजीपंत पुरंदरे वगैरे मंडळी कर्नाटकाच्या मोहिमेत व्यस्त होती. या मंडळींनी मराठी साम्राज्याविरूद्ध यमाजी दाभाडे, गायकवाडांची फूस असलेल्या छोट्या संस्थानिकांचं बंड तर मोडीत काढलंच पण तुंगभद्रेपर्यंत धडक मारून सावनूरच्या नबाबालाही धडा शिकवला. नबाबाशी तह करून त्याचे कित्तूर, यादवाड, बागलकोट, नवलगुंद, हरिहर, बसवपट्टण, तोरगळ, हल्ल्याळ, गोकाक असे छत्तीस परगणे मराठी राज्यात सामील करून घेतले. नंतरच्या काळात पेशवेपदाचं महत्त्व अनन्यसाधारण वाढलं आणि इ.स. १७४९ साली शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपतीपदाचे महत्त्व कमी होऊन मराठी सत्तेची सूत्रे जवळजवळ पेशव्यांच्या हातात आली. शाहूमहाराजांना त्यांच्या पश्चात मराठी साम्राज्याचा डोलारा व्यवस्थितपणे सांभाळू शकेल असा कुणीच व्यक्ती न दिसल्यामुळं त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात 'पेशवाई' ही भट घराण्याकडे वंशपरंपरागत करून दिली. मराठी सत्तेत पेशव्यांचं महत्व वाढू लागल्यामुळं दिल्लीचा बादशाह आता पेशव्यानांच मराठी राज्याचा प्रमुख मानू लागला. काबुल-कंदहारच्या महत्वाकांक्षी अहमदशहा अब्दालीच्या आता हिंदुस्थानवर स्वाऱ्या होऊ लागल्या होत्या. त्याच्या दोन स्वाऱ्या शाही फौजेने परतवून लावल्या खऱ्या पण अब्दालीला शह देऊ शकेल असा उभ्या हिंदुस्थानात पेशव्यांशिवाय कुणीच नसल्यामुळं दिल्लीचा बादशहाने 'मोगलाईत चौथाई व सरदेशमुखी मराठे वसूल करतील' ही पेशव्यांची अट मान्य केली आणि यातच पेशव्यांचं पानिपतावर जाण्याचं कारण दडलेलं आहे. नंतर इ.स. १७५५-५६ साली तुळाजी आंग्रेंविरूद्धची स्वारी, १७५७ सालातली श्रीरंगपट्ट्णच्या हैदरअलीविरूद्धची स्वारी या महत्वाच्या घटना सांगता येतील. दिल्लीचा बादशाह अहमदशहा हा अब्दालीला वश झाल्यामुळं रघुनाथराव पेशव्यांनी अहमदशहाला कैदेत टाकून अझीझउद्दीनखानाला दिल्लीच्या तख्तावर बसवून अब्दालीला खिबरखिंडीच्या मागे ढकलून लाहोर आणि अटक ही ठाणी हस्तगत केली आणि मराठ्यांच्या साम्राज्याची सीमा पार अफगणिस्तानला भिडवली. पुढे सदाशिवरावभाऊ, राघोबादादा आणि विश्वासरावांच्या एकत्रित फौजांनी हैदराबादच्या निजामाचा उदगीरजवळ पराभव करून जवळजवळ ८५ लाख रूपयांचा मुलूख, शिवनेरी, देवगिरी, अशीरगड, नळदुर्ग आणि हैदराबाद व विजापूरची चौथाई निजामाकडून वसूल केली. दरम्यान अहमदशाह अब्दाली पुन्हा हिदुस्थानात आला होताच. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नानासाहेबांनी सदाशिवरावभाऊ आणि विश्वासरावांना पाठवलं. भाऊंनी दिल्ली ताब्यात घेऊन बादशहाला कैदेत तर टाकलंच पण शाही तख्तावरची मेघडंबरी फोडून नाणी बनवली आणि फौजेचा पगार केला. इथून पुढे मराठ्यांचा आणि अब्दालीचा शह-काटशह सुरू झाला. शेवटी ०७ डिसेंबर १७६० रोजी पानिपताच्या युद्धाची पहिली ठिणगी पडली आणि लगेचच १४ जानेवारीला त्याचा शेवटही झाला. पानिपताच्या लढाईला 'अनिर्णित सामना' असंच म्हणावं लागेल. खरंतर पानिपत हा विषयच एवढा मोठा आहे की त्यावर एक संपूर्ण अशी लेखमाला लिहिता येईल.
       पानिपतात पडलेल्या भाऊसाहेबांच्या आणि विश्वासरावांच्याच्या आठवणींनी नानासाहेबांची प्रकृती खालावत चालली होती. शेवटी जेष्ठ वद्य षष्ठी शके १६८३ म्हणजे २३ जून १७६१ या दिवशी बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे मृत्यू पावले. बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत मराठी राज्याचा उत्तरेत आणि दक्षिणेत चांगलाच विस्तार झाला आणि त्यांच्या काळातच मराठ्यांचं साम्राज्य परमोच्य स्थानी पोहोचलं होतं. नानासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या दुसऱ्या चिरंजीवांना म्हणजे थोरल्या माधवरावांस पेशवाईची वस्त्रे मिळाली.

बाळाजी बाजीराव


🚩 माधवराव बल्लाळ - (कार्यकाळ इ.स. १७६१ ते १७७२) -
       लहान वयात पेशवाईची वस्त्रे मिळालेल्या माधवराव बल्लाळांनी पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांचे झालेले नुकसान आपल्या कर्तबगारीने भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला. नंतरच्या काळात पानिपतात झालेल्या सैन्याच्या नुकसानीमुळं माधवरावांनी थेट निजामाशी न भिडता आपलं सैन्य निजामाच्या प्रदेशात घुसवलं. २० ऑगस्ट १७६१ रोजी घोरपडे, जाधव, घाटगे अशा मराठा सरदारांना फितवून पुण्याच्या जवळ अगदी उरळीकांचनपर्यंत आलेल्या निजामाबरोबर पुण्यात असलेल्या रघुनाथरावांनी घाईघाईने २९ डिसेंबर १७६१ रोजी वार्षिक २७ लक्ष रूपयांचा तह केला आणि माधवरावांना उरलेली कर्नाटक मोहिम सोडून नाईलाजानं पुण्याला परतावं लागलं. पुढं १० ऑगस्ट १७६३ ला राक्षसभुवनाच्या लढाईत माधवरावांनी निजाम आणि जानोजी भोसल्यांना नमवलं. दोघांनी पेशव्यांबरोबर तह केला. राक्षसभुवनच्या या लढाईत निजामाचा सेनापती विठ्ठल सुंदर परशुरामी ठार झाला. लगेचच ०३ सप्टेंबर १७६३ साली पेशव्यांनी राक्षसभुवनहून औरंगाबादला पळून गेलेल्या निजामाला पुन्हा एकदा कोंडीत पकडलं. अखेरीस २५ सप्टेंबरला शरण आलेल्या निजामाने पेशव्यांबरोबर उदगीरच्या तह कायम ठेऊन नवीन वार्षिक २२ लक्ष रूपयांचा तह केला. या दोन्ही तहान्वये एकूण ८२ लक्ष रूपयांचा निजामाचा प्रदेश पेशव्यांना मिळाला. राक्षसभुवन आणि औरंगाबादच्या या लढायांच्या जोरदार फटक्यानंतर माधवराव असेपर्यंत तरी निजामाने अजिबात डोकं वर काढले नाही. एव्हाना दक्षिणेत म्हैसुर संस्थानात हैदरअलीचा उगम झाला होता. त्याने मराठी मुलखात येऊन त्रास द्यायला सुरूवात केली होती. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी १७ फेब्रुवारी १७६४ रोजी माधवरावांनी दक्षिण मोहिम काढून हैदरअलीस वठणीस आणलं आणि मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा स्थापन केलं. या मोहिमेत माधवरावांनी हैदरअलीकडून ३२ लक्ष रुपयांची खंडणी वसूल केली. नोव्हेंबर १७६६ ला माधवरावांनी कर्नाटकाची तिसरी मोहिम हातात घेतली. या स्वारीत मराठी फौजांनी निजाम आणि हैदरअलीने मराठ्यांच्या लाटलेल्या हौसकोट, सिरा, बाळापूर, बसवपट्टण वगैरे भागावर पुन्हा स्वामित्व मिळवलं. प्रदेश लाटल्याचा दंड म्हणून माधवरावांनी हैदरअलीकडून ३० लक्ष रूपये पुन्हा खंडणी वसूल केली. हैदरअली हा तसा करामतीच. प्रत्येकवेळी मराठ्यांकडून मार खाऊनही तो कुरापती काढणं काही थांबवत नसे. याचाच परिपाक म्हणून डिसेंबर १७६९ रोजी त्र्यंबकपंत पेठेंच्या अधिपत्याखाली तर १७७१ च्या सुरवातीला हरीपंत फडक्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठी फौजेने हैदरअलीकडून जबर खंडणी वसूल केली.
       अखेरीस माघ वद्य एकादशी शके १६६६ म्हणजेच १६ फेब्रुवारी १७४५ रोजी जन्मलेल्या या कर्तबगार पेशव्यांचा कार्तिक वद्य अष्टमी शके १६९४ म्हणजेच १८ नोव्हेंबर १७७२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. माधवरावांच्या या अकाली मृत्यूमुळं पानिपतापेक्षाही जास्त नुकसान मराठेशाहीचं झालं असंच शेवटी म्हणावं लागेल.

माधवराव बल्लाळ


🚩 नारायणराव बल्लाळ - (कार्यकाळ इ.स. १७७२ ते १७७३) -
       थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव यांजकडे मुख्यप्रधानकी आली. माधवरावांनी केलेल्या नऊ कलमी मृत्युपत्राच्या जोरावर नाना आणि मोरोबादादा फडणवीस ही बंधूद्वयी, हरिपंत फडके वगैरे मंडळींनी नारायणरावांना पेशवाईची वस्त्रे मिळवून दिली खरी पण पेशवा होण्यास लागणारी सक्षमता मात्र त्यांच्याजवळ तोपर्यंत तरी आलेली नव्हती. ही प्रधानकी मिळाल्यापासून १० महिन्यांच्या आतच भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शके १६९५ म्हणजे ३० ऑगस्ट १७७३ रोजी त्यांचा खून झाला. पेशवेपदाच्या या दहा महिन्यांच्या काळात एकूणच परराष्ट्रीय राजकारणावर ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

नारायणराव बल्लाळ


🚩 रघुनाथराव म्हणजे राघोबादादा - (कार्यकाळ इ.स. १७७३ ते १७७४) -
       नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावांना पेशवाईची वस्त्रे मिळवण्यात कोणताच अडथळा राहिला नाही. साहजिकच १० ऑक्टोबर १७७३ रोजी सातारकर छत्रपती राजाराम महाराजांनी अतिशय साधेपणाने पेशवाईची वस्त्रे रघुनाथरावांना त्यांच्या अमृतराव नावाच्या दत्तकपुत्राकरवी पाठवून दिली. पेशवेपदाची वस्त्रे मिळाल्यावर लगेचच राघोबादादांनी कर्नाटकात हैदरअली विरूद्धची मोहिम हाती घेतली. सोबत सखारामबापू बोकील, नाना फडणवीस आणि हरिपंत फडके यांनाही मोहिमेत घेतलं. या तिघांनी संधी साधून मोहिमेतून काढता पाय घेतला आणि मंडळी पुण्याला परतली. पुण्याला आल्यावर या मंडळींनी रामशास्त्री प्रभूणे, त्र्यंबकराव पेठे, मालोजी घोरपडे, मोरोबादादा फडणवीस वगैरे मंडळींना सोबत घेऊन रघुनाथरावांना पेशवेपदावरून पदच्युत करण्याचं कारस्थान रचलं. हेच ते 'बारभाई कारस्थान' म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या बारभाईंनी नारायणरावांच्या पत्नी गंगाबाईंच्या नावाने कारभार पाहण्याची घोषणा करून रघुनाथरावांविरूद्ध उघडपणे बंड पुकारलं. सातारच्या छत्रपतींना झाला प्रकार सांगून रघुनाथरावांकडील पेशवाई दुर केल्याचं छत्रपतींचं आज्ञापत्र पूर्ण राज्यात फिरवलं. या आज्ञापत्रामुळं बरेचसे सरदार बारभाईंना येऊन मिळाले. पुढे वैशाख शुद्ध सप्तमी शके १७९६ म्हणजेच १८ एप्रिल १७७४ रोजी  नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई प्रसूत झाल्या. बाळाचं नाव ठेवलं माधवराव. हे माधवराव हा सव्वा महिन्यांचे असतानाच त्यांस सातारच्या छत्रपतींकडून मुख्यप्रधानपदाची वस्त्रे आणविली गेली. वस्त्रे मिळाल्यावर बारभाईंनी त्यांचं नामकरण केलं 'सवाई माधवराव'.

🚩 माधव नारायण म्हणजे सवाई माधवराव - (कार्यकाळ इ.स. १७७४ ते १७९५) -
       रघुनाथराव बारभाईंना शरण आले आणि त्यांचं राजकीय जीवन संपलं. सवाई माधवराव लहान असल्यामुळं सखारामबापू बोकील व नाना फडणवीस असे दोघे त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यप्रधानकीचे काम पहात होते. सवाई माधवरावांच्या पेशवाईच्या कार्यकाळात परकीय इंग्रज शिरजोर होऊ लागले होते. त्याच दरम्यान रघुनाथरावांनी इंग्रजांबरोबर संधान बांधून कर्नल इगर्टन या गोऱ्या साहेबाच्या हाताखाली कॅप्टन स्टुअर्ट आणि कॅप्टन कॉकथन मिळून पाचशे इंग्रज आणि दोन हजार स्थानिक शिपायांसह पुण्याकडं कुच केलं. मुंबईची खाडी ओलंडून पनवेल आणि पुढं बोरघाट चढून हे सैन्य खंडाळा मार्गे वडगावपर्यंत आलं. वडगावला कॅप्टन स्टुअर्ट मारला गेला. शेवटी वडगावला इंग्रजांना मराठ्यांसोबत जानेवारी १७७९ ला तह करावाच लागला. इ.स. १७७९ नंतरही इंग्रज भारतीय राजकारणात ढवळाढवळ करत असल्यामुळं त्यांच्याविरूद्ध मराठ्यांच्या चकमकी सारख्या होतच होत्या. इ.स. १७८० सालात इंग्रजांनी बडोदा, कल्याण, ग्वाल्हेर, मद्रास, वसई, अर्नाळा वगैरे ताब्यात घेतले. पुढे १७ मे १७८२ रोजी मराठे , हैदरअली, शिंदे यांनी इंग्रजांबरोबर 'सालबाई' इथं तह केला. सवाई माधवराव सज्ञान झाल्यावर राज्यकारभाराचे काही काम पाहू लागले. १२ मार्च १७९५ ला खर्ड्याची लढाई झाली तेव्हा तिच्यात सवाई माधवराव स्वतः उपस्थित होते. ती लढाई म्हणजे नाना फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीचा कळस होता.
       खर्ड्याची लढाई संपल्यावर सवाई माधवरावांना ताप येऊ लागला आणि त्या तापाच्या भरात त्यांनी शनिवारवाड्यातील गणेश महालाच्या दुसऱ्या मजल्यावरून दक्षिणेच्या कारंजावर उडी टाकली. पुढच्या दोन दिवसांतच अश्विन शुद्ध त्रयोदशी म्हणजेच २७ ऑक्टोबर १७९५ रोजी ते मृत्यू पावले.

सवाई माधवराव



🚩 बाजीराव रघुनाथ म्हणजे दुसरे बाजीराव - (कार्यकाळ इ.स. १७९५ ते १८१८) -
       सवाई माधवरावांच्या अकाली मृत्युमुळं आणि त्यांना मूलबाळ नसल्यामुळं आता पेशवेपदावर कुणाला बसवावं याविषयी नाना फडणवीस यांना पेच पडला. त्यांनी सवाई माधवरावांची पत्नी यशोदाबाई हीच्या मांडीवर रघुनाथरावांच्या दत्तक पुत्राला म्हणजे अमृतरावास देऊन राज्यकारभार सुरू केला पण शिंदे आणि होळकर यांच्याबरोबर वितुष्ट वाढू लागले तेव्हा नाना फडणवीसांनी दुसऱ्या बाजीरावांस पेशवेपदावर बसविले. नाना फडणवीस यांना पुढे राज्याची बिघडलेली घडी पुन्हा काही नीट बसवता आली नाही. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्युनंतर थोरले माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे आणि बाजीराव रघुनाथ पेशवे या चार पेशव्यांच्या कार्यकाळात एक कडक शिस्तीच्या, अखंड सावध असणाऱ्या, मातब्बर, मुत्सद्दी नाना फडणवीस यांचा तत्कालीन राजकारणात वारंवार उल्लेख येतो. अशा या मुत्सद्दी नाना फडणवीसांनी आपल्या आयुष्याची पंचवीस वर्षे स्वराज्याची इमानेइतबारे सेवा करून १३ मार्च १८०० रोजी देह ठेवला.
       नाना फडणवीस वारल्यानंतर दुसऱ्या बाजीरावांच्या राज्यकारभारात गोंधळ उत्पन्न झाला. मराठे सरदार त्यांना विचारीनासे झाले. तेव्हा निरूपाय होऊन इ.स. १८०२ मध्ये त्यांनी इंग्रजांशी वसई येथे तह केला आणि त्यांची मांडलिकी पत्करली. पुढे त्यांनी इंग्रजांविरूद्ध उठाव करण्याचे ठरवले खरे पण सर्व मराठी सरदारांना एकत्र आणून इंग्रजांशी लढण्याचे कर्तृत्व त्यांना काही दाखवता आले नाही. बापू गोखले हे त्यांचे कर्तबगार सेनानी इ.स. १८१८ साली आष्टीच्या इंग्रज-पेशवे लढाईत मरण पावले. पुढे इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावांची उत्तर हिंदुस्थानात कानपूरजवळ बिठूर येथे रवानगी केली आणि वार्षिक आठ लाख रूपये पेन्शन घेऊन तेथेच कायमचे वास्तव्य करण्यास सांगितले.

बाजीराव रघुनाथ

      
🚩 गोविंद बाजीराव म्हणजे नानासाहेब - (कार्यकाळ इ.स. १८१८ ते १८५७) -
        इ.स. १८२७ मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी माधव नारायणराव या आप्तांचा मुलगा नानासाहेब यांस दत्तक घेतले. त्यांचे मूळ नाव गोविंद धोंडोपंत. दुसऱ्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी नानासाहेबांस पेन्शन नाकारलं. इ.स. १८५७ च्या राष्ट्रीय उठावात २७ जुलै १८५७ रोजी नानासाहेबांना तात्या टोपे व त्यांच्या सहकार्यानी 'पेशवा' म्हणून जाहीर केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीशांविरूद्ध रणशिंग फुंकलं. पेशवाईची पणती खरंतर १८१८ सालीच जवळजवळ विझली होती पण तात्या टोपे वगैरे मंडळींनी ती तेवत ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न चालवला होता.
       शेवटी १८५७ च्या राष्ट्रीय उठावात पराभव झाल्यामुळं अखेरचे नानासाहेब पेशवे नेपाळात निघून गेले आणि शिवकालापासून अखंडीतपणे सुरू असलेली ही दोनशेसोळा वर्षांची ही पेशवेपदाची परंपरा अखेर १८५७ मधे संपुष्टात आली.

इति मुख्यप्रधानपर्व: ॥

       या लेखात प्रत्येक पेशव्यांचा एकूण राजकारणावर परिणाम दिसेल अशा आणि त्यातल्यात्यात मुख्य राजकीय घडामोडींचा धावता कालपट दिलेला आहे. खरंतर बहूतेक पेशव्यांचं कार्य एवढं मोठं आहे की राजकीय, युद्धविषयक, घरगुती संबंध, पत्रव्यवहार वगैरेवर एकेक लेख लिहावा लागेल. प्रत्येक पेशव्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचं तपशीलवार विश्लेषण देणं हे या लेखाच्या आकारबंधात बसलं नसतं त्यामुळं केवळ विस्तारभयावह इथं देण्याचं ते टाळलं आहे. सुरवातीच्या काही पेशव्यांच्या कार्याबाबत कुठल्याही साधनांत ससंदर्भ असं काहीच न सापडल्यामुळं त्यांच्याबाबत बऱ्याच गोष्टी इथं देता आलेल्या नाहीत.
       माझ्या या लेखन प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो...

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही ॥

बहुत काय लिहिणें, लेखनसीमा ॥

🚩 संदर्भ -

१) राजव्यवहारकोश - रघुनाथ पंडीत अमात्य कृत
२) शिवराज-मुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, महाराष्ट्र शासन
३) आज्ञापत्र - रामचंद्र पंडीत अमात्य विरचित
४) सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद लिखित
५) मराठी विश्वकोश
६) पेशव्यांची बखर - कृष्णाजी विनायक सोहनी
७) पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे


समाप्त.