सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

"शिवराज्याभिषेक"

"शिवराज्याभिषेक"


"या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मर्‍हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट कांही सामान्य झाली नाहीं."

       आज ०६ जून, म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. या सोहळ्याला स्वत: उपस्थित असलेला कृष्णाजी अनंत सभासद या सोहळ्याचं अगदी यतार्थ वर्णन आपल्या बखरीत करतो. तो म्हणतो...

       सप्त महानदि यांची उदकें व थोर थोर नदियांची उदकें व समुद्रांची उदकें, तीर्थ क्षेत्र नामांकित तेथील तीर्थोदर्के आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्ट प्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करुन, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला.

       शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठमासी शुध्द १३ स मुहूर्त पाहिला. ते दिवशीं राजियांनी मंगल स्नाने करून श्रीमहादेव व श्रीभवानी कुलस्वामी, उपाध्ये प्रभाकर भटाचे पुत्र बाळंभट कुलगुरु व भट गोसावी, वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठित, यांची सर्वांची पूजा यथाविधि अलंकार वस्त्रें देऊन [केली.] सर्वांस नमन करून अभिषेकास सुवर्ण-चौकीवर बसले. अष्ट प्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळचीं उदकें करून सुवर्ण कलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रें, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पुज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले. कित्येक नवरत्नादिक सुवर्ण-कमळें व नाना सुवर्ण-फुलें, वस्त्रे उदंड दिधलीं. दानपद्धतीप्रमाणे षोडश महादानें इत्यादिक दानें केली. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी अष्ट प्रधानांनी उभें राहावें. पूर्वी कृतायुगीं, त्रेतायुगीं, द्वापारीं, कलयुगाचे ठायीं पुण्यश्लोक राजे सिंहासनीं बैसले, त्या पध्दतीप्रमाणें शास्त्रोक्त सर्वही साहित्य सिध्द केलें. अष्टखांबी अष्टप्रधान उभे राहिले. त्यांची नांवे बितपशील.

१) मोरोपंत त्रिंबकपंताचे पुत्र, पेशवे, मुख्यप्रधान.
२) दत्ताजी त्रिंबक वाकनीस, यांचे नाव मंत्री.
३) नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ मुजुमदार, यांचे नाव अमात्य.
४) त्रिंबकजी सोनदेव डबीर यांचे पुत्र रामचंद्रपंत, सुमंत.
५) रावजी पण्डितराव होते त्यांचे पुत्रास रायाजीराज[?]
६) अणाजीपंत सुरनीस, यांचे नाव सचिव.
७) निराजी रावजी यांस न्यायाधिशी.
८) हंबीरराव मोहिते सेनापति.

       येणेंप्रमाणे संस्कृत नांवे ठेविलीं. अष्ट प्रधानांची नांवे ठेविली ते स्थळें नेमून उभे केले. आपले स्थळी उभे राहिले. बाळ प्रभु चिटनीस व नीळ प्रभु पारसनीस वरकड अष्ट प्रधानांचे मुतालिक व हुजरे, प्रतिष्ठित सर्वही यथाकमें पध्दतीप्रमाणें सर्वही उभे राहिले. छत्र जडावाचें मोतीलग झालरीचे करून मस्तकावर धरिलें. छत्रपति असे नांव चालविलें. कागदी पत्रीं स्वस्तिश्री [राज्याभिषेक] शक, सिंहासनावर बसले त्या दिवसापासून नियत चालविला. पन्नास सहस्त्र ब्राह्मण वैदिक मिळाले. या वेगळे तपोनिधि व सत्पुरूष, संन्यासी, अतिथि, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम नानाजाती मिळाले. तितक्यांस चार मास मिष्टान्न उलफे चालविले. निरोप देतां पात्र पाहून द्रव्य, अलंकार, भूषणें, वस्त्रें अमर्याद दिधलीं. गागाभट मुख्य अध्वर्यु त्यांस अपरमित द्रव्य दिलें. संपूर्ण खर्चाची संख्या एक क्रोड बेताळीस लक्ष होन झाले. अष्ट प्रधानांस लक्ष लक्ष होन बक्षीस दर असामीस, त्या खेरीज एक एक हत्ती, घोडा, वस्त्रें, अलंकार असें देणें दिलें. येणेंप्रमाणें राजे सिंहासनारूढ झाले. या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मर्‍हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट कांही सामान्य झाली नाहीं.

संदर्भ -

सभासद बखर - कृष्णाजी अनंत विरचित (मुळ प्रतापगड प्रत)

फोटो स्त्रोत -

गुगल

समाप्त.