"भटकंती जावळीच्या खोऱ्यातली"
'शिडीडाक, आंबिवली घाटवाटांसोबत चकदेव आणि पर्वत'
बरेच दिवस डोक्यात जावळीचा प्लॅन घोळत होता पण मुहूर्त काही केल्या लागत नव्हता. समस्त ट्रेकर्स मंडळीत जावळीचं आकर्षण नाही असा क्वचितच कुणी सापडेल. खरं सांगायचं तर ही जावळी म्हणजे विजापूर दरबारावर व्यापारी अंकुश ठेवण्यासाठी आणि सामरिक दृष्टीने अतिशय मोक्याची जागा. त्यामुळं शिवाजी महाराजांचं जावळीवर लक्ष गेलं नसतं तरच नवल. महाराजांनी जावळी ज्या मोरेंकडून हिसकावून घेतली तिच्यावर ते फार पूर्वीपासून राज्य करत होते. महाराजांनी जावळी घेईपर्यंत मोरेंच्या जवळजवळ आठ पिढ्या जावळीत नांदून झालेल्या होत्या. त्यांच्या म्हणजे मोरे घराण्याच्या बखरीत 'सावित्री नदीच्या उगमापासून मुखापर्यंत मोरे घराण्याने महाबळेश्वर, पर्वत, चकदेव, घोणसपूर, तळदेव, गाळदेव, धारदेव, मोळेश्वर इत्यादी सात? शिवपुऱ्या निर्माण केल्या' असा उल्लेख मिळतो. पण सध्या या सगळ्या शिवपुऱ्या जिथे आहेत ते कोयना वनक्षेत्र हे 'व्याघ्र प्रकल्प' घोषित झाल्यापासून ट्रेकर्स मंडळींना या जावळीच्या जंगलात जाणं काहीसं अवघड झालंय. त्यातून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या एका बाजूला हे जावळीचं खोरं येत असल्यामुळं घाटमाथ्यावरून बोटीतून या भागात जाणं 'मुष्कील ही नहीं तर नामुम्कीन' होऊन बसलंय. पण हार मानेल तो ट्रेकर कसला? घाटमाथ्यावरून जाणं जरी अवघड झालंय तरी कोकणातून घाटवाटा चढून जावळीच्या काही ठराविक भागात पूर्वपरवानगीने नक्कीच जाता येतं. त्यातल्याच 'शिडीडाक' घाटवाटेने कोकणातल्या आंबिवलीतून चढून चकदेव गाठायचं, तिथून पर्वतला जायचं आणि आंबिवली घाटवाटेने उतरून पुन्हा आंबिवलीत यायचं असा दोन दिवसाचा भन्नाट प्लॅन आम्ही फाल्कन्सनी आखला होता.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री जेवण करून निघालो. सर्वांना गोळा केल्यावर नेहमीप्रमाणे गाडीची विधीवत पुजा केली.
आंबिवली गाठण्यासाठी आम्हाला खेडजवळचा भरणा नाका गाठावा लागणार होता. त्यासाठी पुण्याहून ताम्हिणी, वरंध आणि आंबेनळी असे तीन घाटांचे पर्याय होते. पैकी वरंध घाट दरड कोसळल्यामुळं बरेच दिवस बंद होता, ताम्हिणी घाट लांबचा असल्यामुळं टाळावा लागणार होता. त्यामुळं आता आंबेनळीशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. या एकूण रस्त्यातला महाबळेश्वर ते पोलादपूर हा चाळीस किलोमीटरचा टप्पा अतिशय खराब असल्यामुळं आंबिवलीचं झोलाई मंदीर गाठायला पार सकाळचे सहा वाजले त्यामुळं आता झोपण्याचा काही प्रश्नच उरला नव्हता.
झोलाई मंदीर गावाच्या थोडं बाहेर आहे आणि त्याच्या बाजूलाच ओढा वाहतो त्यामुळं सकाळची आन्हीकं तिथंच उरकली. नाश्त्यापर्यंत दम निघावा म्हणून भरणा नाक्यावरून थर्मासमधे भरून आणलेल्या चहासोबत बिस्कीटांचा सुपरफास्ट नास्ता केला.
आज आम्ही चकदेवच्या 'शिडीडाक' घाटवाटेने श्रीशैल्य चौकेश्वर मंदिर गाठणार होतो. तिथून चकदेव-पर्वत दरम्यानच्या जंगमवाडीत उतरणार होतो. मग तिथे थोडी विश्रांती घेऊन रात्रीच्या मुक्कामाला पर्वत माथ्यावरच्या मल्लिकार्जून मंदीरात पोहोचायचं होतं. मल्लिकार्जून मंदीरातून दुसर्या दिवशीच आम्ही गाडीपाशी परतणार असल्यामुळं दोन दिवसांची शिधासामग्री, भांडी आणि इक्विपमेंट वगैरे सर्व सोबत घेऊनच जावं लागणार होतं. एकालाच जास्त वजन होऊ नये म्हणून सोबत घ्यायच्या सर्व शिधासामग्रीचं सर्वात समसमान वाटप केलं. त्यामुळं प्रत्येकाला आता पाठीवरच्या ब्रम्हराक्षसाचं वजन चांगलंच जाणवायला लागलं होतं पण ते न उचलून सांगतो कुणाला? दुसरा काही पर्यायच नव्हता. मंदीराजवळच्या शेतात आलेल्या गावकर्यांना चकदेवची वाट विचारून बरोबर सात वाजता झोलाई मंदिर सोडलं.
मंदीराजवळून आम्हाला चकदेव माथा आणि तिथेपर्यंत पोहोचण्याची जंगलातून जाणारी वाट दिसत होती. माथा जरी समोर दिसत असला तरी या शिडीडाक घाटवाटेची वाट बरीच फिरून जात होती. ही वाट दोन टप्प्यात आहे. साधारण अर्धे चढून गेल्यावर उजवीकडे आणि डावीकडे असे दोन धनगरवाडे आहेत. पैकी चकदेवच्या माथ्यावर जाणारी वाट डाव्या धनगरवाड्यातुन आहे. त्यामुळं आता आमचं पहिलं लक्ष धनगरवाडा होतं. या दोन्ही धनगरवाड्यांची मंडळी शाळा-कॉलेजसाठी आणि रोजच्या गरजांसाठी आंबिवलीवर अवलंबुन असल्यामुळं आम्हाला जायचं असलेली पाखाडीची वाट अतिशय प्रशस्थ आणि न चुकवणारी होती.
सकाळच्या एका झपाट्यात कुठेच न थांबता नाश्त्यासाठी थेट धनगरवाड्यात पोहोचलो. हा धनगरवाडा उजवीकडे असलेल्या धनगरवाड्यापेक्षा थोडा उंचीवर आहे त्यामुळं इथे फक्त एकच घर होतं. तिथल्या वयस्कर दादांनी त्यांच्या खळ्यात बसायला मस्तपैकी सतरंजी अंथरून दिली आणि पातेलंभर ताक आणून दिलं. घरून आणलेला नाश्ता करून फारसा वेळ न घालवता लगेचच निघालो.
चंद्ररावांच्या जावळीत सुर्यरावही डोक्यावर येऊन चांगलेच तळपत होते. जंगलपट्टाही संपला होता त्यामुळं चढाई चांगलीच दमवत होती.
आता इथून चकदेवटोक समोर दिसत होतं आणि ज्यावरून आमची वाट जात होती ती धारही स्पष्ट दिसत होती.
पुढची वाट थोडी जास्तच चढावाची आणि कातळटप्पे असलेली होती. चकदेवटोकाच्या खालच्या बाजूला उजवीकडे कड्याला लावलेल्या शिड्या दिसत होत्या. नेमकं तिथेच आम्हाला पोहोचायचं होतं.
गवत सुकलेलं असल्यामुळं बराच घसारा होता. त्यावरून सावधपणे चालत शिड्यांच्या पायथ्याशी पोहोचलो. या शिड्या पूर्वी लाकडाच्या होत्या. दरवर्षी पावसाळ्यानंतर त्याचे कुजलेले वासे बदलत. चकदेवची जंगम मंडळी चकदेव पठारावर पिकणारी नाचणी आणि वरई डोक्यावरून आंबिवलीत आणून मग एसटीने खेडच्या बाजारात नेऊन विकत. पण पी.डब्ल्यु.डी ने खेडहून शिंदीला चढून येणारा रघुवीर घाटरस्ता बांधून काढल्यामुळं या घाटवाटेने सहसा कुणी जात नाहीत. महाराष्ट्र शासनाने जशा सगळीकडे लाकडी काढून लोखंडी शिड्या लावल्या तशाच इथल्याही १९९९-२००० सालच्या आसपास बदलल्या. या घाटवाटेला चकदेवची डाक किंवा शिड्या असल्यामुळं शिडीडाक असं म्हटलं जातं.
शिड्या चढून वर आल्यावर थोडं वरच्या बाजूला दगडात गणपतीची एक मुर्ती कोरलेली दिसली.
माथ्यावर पोहोचल्यावर चहूबाजूकडे ऐसपैस पसरलेलं पठार दिसत होतं. खरंतर पावसाळ्यात या ठिकाणी आलं तर गवतामुळं चकदेवचं श्रीशैल्य चौकेश्वर मंदिर सापडणं थोडंसं अवघडच आहे पण आम्ही नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात इथे आल्यामुळं वाट बर्यापैकी समजून येत होती. शिडी चढून वर आल्यावर तासाभरात या पुरातन श्रीशैल्य चौकेश्वर मंदीरात दाखल झालो.
आदल्या रात्रीचा प्रवास आणि सकाळपासून पाठीवर बोजे घेऊन भलीमोठी चढाई झाल्यामुळं सगळेजण खूप थकले होते त्यामुळं मंदीरात पोहोचल्यापोहोचल्या सगळ्यांनी थोडावेळ मस्त पडी मारली.
तासाभराच्या विश्रांतीनंतर ताक पिऊन ताजेतवाने झालो आणि श्रीशैल्य चौकेश्वराची आरती केली.
तिथे ठेवलेल्या तुतार्या बघून आमच्यातल्या काही जणांना त्या वाजवायचा मोह काही आवरता आला नाही.
मंदीरात फारसा वेळ न घालवता काही फोटो काढले आणि चकदेवच्या जंगम वस्तीतून पायथ्याशी असलेल्या वळवणच्या जंगमवाडीत जायला निघालो.
या वाटेवरून खूप वावर असल्यामुळं वाट अतिशय मळलेली होती.
आम्ही उतरून आलेली जंगमवाडी वळवण गावाचीच एक नवीन वाडी आहे. चकदेवच्याच मंडळींची इथे काही घरे आहेत. या वळवण गावच्या एकूण तीन वाड्या आहेत. पूर्वेस उगवतवाडी, पश्चिमेकडील मावळतवाडी तर या दोन्ही दरम्यान आहे जंगमवाडी. जंगमवाडीत संतोष जंगम यांच्या घरी घरून आणलेले डबे खाल्ले.
मावळतवाडीतुन म्हसाव्याचा दाऱ्याने तर जंगम वाडीतुन सोनाव्याचा दाऱ्याने चकदेव गाठता येतो तर वळवणमधून डिगी, जरतळी डिगी, घारव्याचा दारा अशा वाटांनी पर्वतवर जाता येतं. अर्थात मल्लिकार्जुन काय किंवा श्रीशैल्य चौकेश्वर काय, ही दोन्ही देवस्थानं म्हणजे रहाळातल्या साऱ्यांचीच दैवतं. त्यामुळं असंख्य वाटा पर्वत, चकदेववर चढून येतात. त्यातल्याच डिगीच्या वाटेने मल्लिकार्जूनाच्या मंदिरात जायला निघालो. पर्वताच्या पदरात एक मोठा जंगलपट्टा आहे. या पटट्यात असंख्य वाटा असल्यामुळं वाट चुकण्याची शक्यता होती म्हणून स्वतः संतोष जंगम वाटेला लावून देण्यासाठी सोबत आले होते. वाटेतले ओढे ओलांडत वाट चढणीला लागली होती. पायथ्याशी वळवणची जंगमवाडी तर तिच्या डाव्या बाजूला उगवतवाडी दिसत होती.
तिच्या मागच्या बाजूला घाटमाथ्यावर मेटशिंदीचा महिमंडणगड दिसत होता. त्याच्या डाव्या बाजूला 'शिरगाव सरी' तर उजव्या बाजूला 'रघुवीर' या दोन घाटवाटांच्या खिंडी दिसत होत्या.
वाट आता गवताळ धारेवरून चढू लागली त्यामुळं आमच्यातल्या सर्वात तरूण नलावडेदादांना त्यावर लोळण्याचा मोह काही आवरला नाही.
आता पदरातला जंगलपट्टा समोर दिसत होता आणि इथे चुकण्याची शक्यता होती म्हणून सगळे एकत्र झाल्यावरच पुढे निघालो. त्यामुळं सर्वांनाच थोडीफार विश्रांती मिळाली.
या ठिकाणाहून मावळतवाडी आणि तिच्या मागच्या बाजूला चकदेवटोक दिसत होतं.
जंगलातली वाट सरळ निघून गेली आणि आम्ही पर्वतमाथ्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला वळलो. वाट जंगलातून बाहेर पडून चढणीला लागली. या वाटेवर राबता जास्त असल्यामुळं सिमेंटच्या पायर्या आणि बाजूला रेलींग लावलेलं होतं.
पायर्या चढून वर आल्यावर समोर मल्लिकार्जून मंदीर तर पाठीमागे चकदेव पठार दिसत होतं.
मुक्कामाचं ठिकाण समोर दिसताच एका झपाट्यात ते गाठलं आणि पाठीवरच्या बॅगा उतरवल्या. काहीजण पाणी आणायला तर काही रात्रीच्या स्वयंपाकासाठी सरपण आणायला गेले आणि आम्हा सर्वांसाठी बल्लवाचार्यांनी चुलीवर चहाचं आधण ठेवलं.
अंधार पडायच्या आत स्वयंपाक तयार व्हायला हवा होता म्हणून मग सर्वजण कामाला लागले. आज रात्रीच्या जेवणापुर्वी स्टार्टर म्हणून व्हेज मंचाव सुप आणि जेवणात मिक्स व्हेजचा फक्कड बेत होता.
आदल्या रात्रीचा प्रवास आणि नंतरच्या दिवसभर चालण्यानं सगळे खूपच थकून गेले होते. त्यामुळं जेवणानंतर मल्लिकार्जूनाला बाहेरूनच दंडवत घालून फारसा टाईमपास न करता सगळे लगेचच झोपी गेले.
सकाळी लवकर उठून आन्हीकं उरकली. आज नाश्त्याला पोहे आणि चहा होता.
निघण्यापूर्वी मल्लिकार्जूनाची आरती केली. उगवत्या सुर्याचे किरण मंदीरात असलेल्या मल्लिकार्जूनाच्या पायावर पडतात म्हणजे इथे किरणोत्सव असतो अशी माहिती मिळाली होती. पण बहुतेक दक्षिणायन सुरू असल्यामुळं आम्हाला काही ते पहायला मिळालं नाही. मंदीराचा परिसर स्वच्छ केला आणि फोटो काढून उतरायला लगेचच सुरूवात केली.
आम्ही जंगमवाडीतून ज्या वाटेने चढून आलो होतो त्याच वाटेने अर्धा पर्वत उतरलो. आम्हाला आता 'आंबिवली' घाटवाटेने आंबिवलीत उतरायचं होतं त्यामुळं थेट मावळतवाडीत उतरणं कमी अंतराचं होणार होतं म्हणून अर्ध्या वाटेतून मावळतवाडीच्या वाटेला लागलो. मावळतवाडी जवळ आली तसं मावळतवाडीचे एक दादा भेटले. अशा डोंगरदर्यात राहणार्या मंडळींना पाणवठे, औषधी झाडं आणि प्रचंड वाटा माहिती असतात. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांना आपण एकदा आपलेसे वाटलो की ते बोलते होतात आणि माहितीचा खजिनाच तुमच्यापुढे उघडतात. त्यामुळे या दादांबरोबर गप्पा मारताना त्यांच्याकडून अजून दोन नवीन घाटवाटा समजल्या.
मावळतवाडीहून कच्च्या रस्त्याने घाटमाथ्याच्या थोडं अलिकडे असलेल्या मारुतीचं दर्शन घेतलं आणि पाचच मिनिटांत घाटमाथा गाठला.
कोकणातून घाटमाथ्यावर चढून येताना आम्ही शिडीडाक घाटवाटेने आलो होतो आणि आता उतरताना आंबिवली घाटवाटेने उतरणार होतो. शिडीडाक घाटवाट खड्या चढाईची, कमी अंतराची होती तर आम्ही उतरत असलेली आंबिवली घाटवाट अतिशय रुंद, दरीच्या बाजूस कठडे, बैलांना सहजपणे चढून जाता येईल अशी gradually चढाईची आणि वळवत नेलेली वाट होती. या घाटवाटेला गरजेच्या ठिकाणी पायऱ्या देखील बांधलेल्या होत्या. ही घाटवाट उतरताना का कोण जाणे पण सारखी नाणेघाटाची आठवण येत होती. त्यामळे ही घाटवाट नक्कीच व्यापारी मार्ग असला पाहिजे. ही आंबिवली घाटवाट दाट जंगलातून आहे. बरंच खाली उतरून आल्यावर वाटेत एक ओढा लागला आणि वाटेचा गोंधळ झाला. पण थोडी शोधाशोध केल्यावर डावीकडे थोडं आडवं जात एका कच्च्या रस्त्याला लागलो जो थोड्या खाली असलेल्या वाडीत जात होता. या रस्त्याने वाडीतून आंबिवलीत जाणाऱ्या डांबरी सडकेवर आलो. वाडीतून आंबिवलीला जाणाऱ्या एका मोटारसायकलवाल्याकडे रस्त्याची खात्री करून घेतली. मग बाकी धोपट मार्ग न सोडता आंबिवलीच्या झोलाई मंदिरात पोहोचलो.
ओढ्यात फ्रेश होऊन चिंचवडला परत येताना वाटेत भरणा नाक्यावरच्या प्रसिद्ध 'हॉटेल सम्राट'मधे पोटभर जेवण केलं आणि ट्रेकची सांगता केली ती नवीन कळलेली चकदेवची 'शेपची वाट' आणि पर्वत जवळची 'कासारसरी' या दोन वाटांचा ट्रेक करण्यासाठीच.
परतताना जावळीचा इतिहास सारखा डोक्यात घोळत होता. अफजलखान जावळीत येण्यापूर्वी त्याची तीन जहाजे दाभोळ बंदरात नांगरून ठेवलेली होती. राजापुरच्या इंग्रजांकडून त्याने दारूगोळा विकत घेतलेला होता आणि एका स्थानिकाकडून तीनशे नावाही भाड्याने घेतलेल्या होत्या. अफजलखानाचं थोडंफार सैन्य दाभोळ बंदरात होतं. हे सैन्य तीनशे नावांतून दोन दिवसांत दारूगोळा घेऊन सुरूवातीला वासिष्ठीतून आणि तसंच पुढे जगबुडीतुन आंबिवली घाटवाट चढून मकरंदगडाजवळ असलेल्या सरवरखानाच्या सैन्याला येऊन मिळू शकत होतं. अफजलखानाच्या या रणनितीज्ञ हालचालींवरून खानाला नक्कीच आंबिवली घाटमार्ग माहिती असावा. नेमके काय असावेत अफजलखानाचे लष्करी डावपेच? नुकत्याच उतरून आलेल्या आंबिवली घाटवाटेशी अफजलखान प्रकरणाचा काही संबंध असावा काय?
शोधायलाच हवं...
🚩 संदर्भ -
१) शिवकालीन पत्र-सार-संग्रह. खंड १ ला, पत्र क्र. ८००.
२) English Record On Shivaji(1659-1682).
३) युद्ध प्रतापगडचे - एक नवा प्रकाश - ले. मेजर मुकुंद जोशी.
४) मोरे घरण्याची बखर.
🚩 ट्रेकभिडू आणि फोटो सौजन्य -
१) रवी मनकर
२) श्रीकांत मापारी
३) साहेबराव पुजारी
४) विनायक गाताडे
५) जितेंद्र परदेशी
६) मिलींद गडदे
७) मंगेश आठल्ये
८) नंदकुमार नलावडे
९) नितीन लोखंडे
१०) रविंद्र जाधव
११) अर्जुन ननावरे
१२) दिलीप बढेकर
१३) संजय मालुसरे
१४) राजेंद्र नारखेडे
१५) आनंद देसाई
१६) दिलीप वाटवे