'शिवमुद्रा'
प्रतिपश्चंद्र
लेखेव वर्धिष्णुर्वि
श्ववंदिता ll साहसू
नोः शिवस्यैषा मुद्रा
भद्राय राजते ll
🚩 अर्थ - प्रतिपदेपासून दिवसागणिक वाढत जाणारी चंद्रकोर जशी विश्वाला वंद्य असते, त्याचप्रमाणे शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा सुद्धा सर्वमान्य होईल.
🚩🚩🚩
शहाजीराजांची मुद्रा फार्सी आहे पण शिवाजी महाराजांची मुद्रा मात्र संस्कृतमध्ये आहे. गेल्या सहाशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 'बदलाची' खरी सुरूवात इथूनच झाली. ही मुद्रा शिवाजी महाराज कधीपासून वापरू लागले हे मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५ मध्ये वि. का. राजवाड्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानूसार महाराजांनी प्रथम त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी ती वापरली. पण त्या पत्रावर तारीख नाही. परंतु त्याबद्दलचे विवेचन दत्तो वामन पोतदारांनी 'शिवचरित्रप्रदीप' मधल्या 'श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा' या प्रकरणात केलेले आहे. त्यानंतरची सुध्दा काही दोनचार तारीख नसलेली पत्रे उपलब्ध आहेत. तारीख उपलब्ध असलेला पहिल्या अस्सल पत्राचा उल्लेख रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केल्यावर त्याचे वतन त्याच्याच गोतातल्या एका व्यक्तीला दिल्याचा आहे. पत्रावर सुरवातीला बाबाजी गुजराकडुन वतन का काढून घेतलं याचं कारण दिलेलं आहे. त्यावेळी सोनजी बजाजी गुजर हे त्याच्याच गोतातील म्हणून त्यांनी विनंती केली की बावाजीस माझ्या हाती द्यावे. ती विनंती विचारात घेऊन बावाजीला तीनशे पादशाही होन दंड ठोठावला. तो दंड भरून सोनजी याने देऊन बावाजीस हाती घेतले. बावाजीस संतान नाही आणि सोनजी हा त्याच्याच कुळातला आहे म्हणून साहेबांनी मेहेरबान होऊन रांजे गावची मोकदमी सरकारात दोनशे पादशाही होन शुल्क जमा करून सोनजी बजाजी गुजर याच्या हवाली केली आहे. त्याला कोणी अडथळा करू नये. हे मूळ पत्र भोगवट्याकरिता त्याला परत द्यावे. रांझे हे गाव पुणे परगण्यातल्या कर्यात मावळात येतं. कर्यात मावळाच्या ३६ गावांचा मोकासा शिवाजीराजांच्या नावे होता. त्यामुळं साहजिकच या गावचा निवाडा महाराजांनी केलेला आहे. हेच ते मूळ पत्र.
मूळ पत्राचा मराठी तर्जूमा |
🚩🚩🚩
आता मूळ विषयाकडे वळूया...
हल्ली शिवाजी महाराजांची मुद्रा इंटरनेटवर सहजी उपलब्ध होते पण त्यातल्या बहुतांशी या मुद्रा बनावट आहेत. मग बनावट मुद्रा ओळखायची तरी कशी? तर अशी...
१) अस्सल मुद्रेत पहिल्या ओळीत 'प्रतिपश्चंद्र' असं पूर्ण लिहिलेलं आहे. बनावट मुद्रेत दुसऱ्या ओळीत 'द्र' लिहिलेला दिसून येतो.
❌
२) अस्सल मुद्रेत 'च्च' हे अक्षर देवनागरीप्रमाणे लिहिलेलं नाही. यातील 'च' किंचितसं तिरकं असून ते 'श्च' वाचलं जाईल अशा प्रकारचं आहे.
❌
३) अस्सल मुद्रेत 'वंदिता' आणि 'राजते' नंतर दोन उभे दंड आहेत. पैकी राजते नंतरचे दंड कमी जागा राहिल्यामुळे अगदीच लहान आहेत.
✔️
४) काही मुद्रांमधे 'लेखेव' ऐवजी 'रेखेव' लिहिलेलं आढळतं. ही मुद्राही बनावट आहे.
❌
'शिक्का' हा पत्रलेखनात किंवा दस्तऐवज करून देताना उपयोगात आणला जात असे. थोडक्यात त्या पत्राचा किंवा दस्तऐवजाचा अस्सलपणा फक्त त्या शिक्क्यावर अवलंबून असे. अशा अस्सल पत्राच्या किंवा दस्ताच्या सुरवातीला असलेल्या शिक्क्याला 'प्रारंभ मुद्रा' असं म्हटलं जाई तर पत्राच्या शेवटी 'मोर्तब' असे, जिला 'समाप्ती मुद्रा' असं म्हणत. पत्राची वा दस्ताची सुरूवात करताना 'शिक्का' उठवून त्याला चिकटून लेखनाची सुरूवात केली जाई तर लेखन संपल्यावर त्याला चिकटून 'मोर्तब' उठवली जाई. या दोन्ही मुद्रा पत्रात वा दस्तात कुणालाही जास्तीचे कलम लिहिता येऊ नये या काळजीपोटी उठवल्या जात. एखाद्या गोष्टीची खात्री पटली की 'शिक्कामोर्तब' झालं असं आपण सहजतेने म्हणतो, तो शिक्कामोर्तब हा शब्द मूळ पत्र वा दस्तलेखनातूनच आलेला आहे.
'शिक्का' हा पुल्लिंगी शब्द मूळ फारसी 'सिक्का' या शब्दावरून आला आहे आणि त्याचा अर्थ मुद्रा, छाप किंवा ठसा असा आहे तर 'मोर्तब' हा नपुसकलिंगी शब्द मूळ 'मुरत्तब्' या अरबी शब्दावरून फारसीत आलेला असून त्याचे अर्थ तयार आणि सुव्यवस्थित असे आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी भाषाशुद्धीसाठी त्यांच्याच सांगण्यावरून फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्दांची रचना रघुनाथपंत अमात्यांनी 'राजव्यवहारकोश' या ग्रंथात केलेली आहे. राजव्यवहारकोशाच्या लेखनवर्गात त्यांनी शिक्का या शब्दाला पर्यायी 'मुद्रा' तर मोर्तब या शब्दाला 'अलंकृति' असा पर्यायी शब्द दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाप्ती मुद्रा म्हणजे मोर्तब 'मर्यादेयं विराजते' अशी आहे.
'पत्रे' साधारणतः दोन प्रकारची असत. एक खाजगी आणि दुसरी सरकारी. एकूण उपलब्ध पत्रांत सरकारी पत्रे अधिक प्रमाणात सापडतात. सरकारी पत्रे कोण कुणाला पाठवतंय यावर त्याचे महत्त्व अवलंबून असे. असे सरकारी कागद तब्बल ८४ प्रकारचे असत त्याबद्दल अधिक माहिती पुन्हा कधीतरी...
🚩 फोटो -
१) श्री. कौस्तुभ कस्तुरे यांच्या ब्लॉगमधून साभार.
२) गुगल
🚩 संदर्भ -
१) साधनचिकित्सा - वा. सी. बेंद्रे.
२) श्री. कौस्तुभ कस्तुरे यांचा ब्लॉग.
३) फार्शी-मराठी-कोश - माधव त्रिंबक पटवर्धन.
४) राजव्यवहारकोश - रघुनाथपंत अमात्य आणि धुंडिराज व्यास.
५) मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड १५ - वि. का. राजवाडे.
६) शिवचरित्रप्रदीप - दत्तो वामन पोतदार.