रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

"गड आला पण सिंह गेला" सत्य, कथा आणि व्यथा


       ०४ फेब्रुवारी १६७० ला झालेल्या सिंहगडाच्या लढाईला मराठी साम्राज्याच्या पायभरणीची खरी सुरूवात म्हणता येईल आणि यात पहिलं पुष्प गोवलं ते तान्हाजींनी. या लढाईला मराठयांच्या इतिहासाच्या सुवर्णकाळाचा खरा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. ही घटना म्हणजे नुसतीच शौर्याची, बलिदानाची कथा नाही तर या घटनेला मराठ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी एक घटना म्हणता येईल. इथून पुढं मराठ्यांचा आलेख नेहमी चढताच राहिला. या लढाईच्या विजयानंतर मधला पानिपतचा दुखःद काळ सोडला तर मराठ्यांनी पुन्हा मागं वळून कधी पाहिलंच नाही. बरं ही घटना सिंहगडाशी संबंधीत असल्यामुळं या घटनेला पुणेकरांच्या दृष्टीनं अगदी जिव्हाळ्याचा विषय सुद्धा म्हणता येईल. आपल्या सर्वांना माहिती असलेली ही घटना काय आहे आणि अस्सल संदर्भ काय सांगतात. चला पाहूया.

       तान्हाजी मालुसरे हे शिवाजीराजांचे बालपणीपासूनचे सवंगडी, त्यामुळं साहजिकच अत्यंत विश्वासातले. महाराजांनी आग्र्याहून सुटून आल्यावर काही वर्षातच पुन्हा स्वराज्याची सीमा वाढवायला सुरूवात केली. पहिला घाव कोंढाण्यावर पडणार होता. ही मोहीम कुणाला सांगावी म्हणून महाराज काळजीत होते. तेवढयात तान्हाजी आपल्या मुलाच्या लग्नाची म्हणजेच रायबाच्या लग्नाची पत्रिका द्यायला महाराजांकडे आले. महाराजांचे पाय आपल्या गावाला लागावेत एवढीच त्यांची भाबडी इच्छा. पण राजगडावर आल्यावर त्यांना महाराजांची काळजी समजली आणि ते म्हणाले 'आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे.'
       लगेचच तान्हाजी तयारीला लागले. सोबत भाऊ सुर्याजी आणि शेलारमामांना घेतले. शेलारमामा सोबत एक घोरपड घेतात आणि तिचं नाव 'यशवंती.' बरं आता इथून पुढची 'अंधारी रात्र', 'भाकरीसोबत कच्ची खाईन', 'तान्हाजीराव आणि उदेभान समोरासमोर', 'तान्हाजीरावांची ढाल तुटते, मग डोईचा शेला हाताला गुंडाळला', 'तुमचा मालक इथे पडलेला असताना भ्याडासारखे पळता काय? असं म्हणून दोऱ्या कापल्या', 'गवताची गंजी' ते 'गड आला पण माझा सिंह गेला' पर्यंतची रंजक गोष्ट सर्वांनाच माहिती आहे, मी काही वेगळी सांगत बसत नाही. पण खरंच असं झालं होतं का? तर याचं उत्तर स्पष्टपणे नाही असंच आहे पण मग हे सगळं आलं तरी कुठून? तर ते आलंय शाहीर तुळशीदासाच्या पोवाड्यातून. पुढं याच पोवाड्याचा संदर्भ घेऊन हरि नारायण आपटे यांनी 'गड आला पण सिंह गेला' ही कादंबरी लिहिली आणि पुढं याच कादंबरीचा संदर्भ घेऊन इ. स. १९३३ साली व्ही. शांताराम यांचा 'सिंहगड' नावाचा एक चित्रपटदेखील आला. चित्रपटाच्या सुरवातीलाच हरि नारायण आपटे यांच्या 'गड आला पण सिंह गेला या कादंबरीच्या आधारे रचलेला', असा बॅनर येतो खरा पण याच चित्रपटानं तान्हाजी मालूसरेंच्या तुळशीदास शाहिरांच्या पोवाड्यातील गोष्टीवर ती खरी असल्याचं काहीसं शिक्कामोर्तबच केलं. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा या कादंबरीतल्या बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. 

        ऐतिहासिक कादंबऱ्या, नाटकं आणि चित्रपटांच्या बाबतीत वा.सी. बेंद्रेंनी त्याच्या 'साधन चिकित्सा' ग्रंथात सुंदर उहापोह केला आहे. ते म्हणतात...

       'कादंबरीकार, नाटककार आणि अशाच प्रकारचे ललित वाङ्‍‍मयकार आपल्या कादंबऱ्या, नाटकं वगैरेतील संविधानके पूर्ण ऐतिहासिक आहेत असं लिहितात. या लिहिण्याचा साधारण जनतेला व्हावा तसा उलगडा होत नाही. मुळातच इतिहासवाचनाची गोडी फार थोडी त्यामुळं सामान्य जनतेला इतिहासाचं ज्ञान अगदीच अल्प असतं. त्यात जर एखादा शब्दचित्राने किंवा चित्रपटाच्या साह्याने कोणताही ऐतिहासिक प्रसंग नटविला गेला की ते शब्दचित्र किंवा तो चित्रपट इत्यंभूत इतिहास असाच मानला जातो. इतिहास इतिहास म्हणून वाचण्याची आम्हास अजून सवय जडली नाही.'

       काही वर्षांपूर्वी आलेल्या अजय देवगणच्या 'तान्हाजी' चित्रपटानं तर कहरच केला. चित्रपट हे समाजाचं प्रबोधनाचं उत्तम साधन असल्यामुळं ते फक्त एक मनोरंजनाचं साधन आहे हे सोईस्कर विसरलं जातं आणि चित्रपटात दाखवलेला हाच खरा 'इतिहास' असं समाजमनात आपोआपच घट्ट बिंबलं जातं. चित्रपट निर्मीती हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसायाचं गणित सांभाळण्यासाठी लोकांना चित्रपट भावला पाहीजे यासाठी तो रंजक केला जातो हे मात्र इथं सोयीस्कर विसरलं जातं आणि त्यावर वाद देखील उत्पन्न केले जातात. असो, बरंच विषयांतर झालं. आणि हा आपला विषयही नाही.

       शाहीर तुळशीदासाच्या पोवाड्याचे तब्बल ५५ चौक आहेत. इतका विस्तृत पोवाडा खरंतर अन्य कुणाच इतिहासपुरुषाचा नाही त्यामुळं तान्हाजीरावांना या रंजक पोवाड्यानं इतिहासात अजरामर करून टाकलं आहे. वर दिलेल्या आणि आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींशिवाय इतरही बऱ्याच अतर्क्य गोष्टी या पोवाड्यात आलेल्या आहेत.

ऐतिहासिकडे पोवाडे

       इतिहासाची साधने साधारणपणे दोन प्रकारची असतात ती म्हणजे अव्वल आणि दुय्यम. अव्वल लेखांत शिलालेख, ताम्रपट, पत्रे तर दुय्यम लेखांत बखरी वगैरेचा समावेश होतो. आपल्या मराठी साधनांविषयी जर अगदी तपशीलवारच सांगायचं झालं तर दर्जानुसार प्रथम सनदा, पत्रे, महजर, करीने, शकावल्या, बखरी आणि सरतेशेवटी पोवाडे व काव्ये असा क्रमांक लागतो. या पुढच्या यादीत तर आता नाटकं आणि चित्रपटांचा देखील समावेश करावा लागेल. तान्हाजींच्या या सिंहगड मोहिमेविषयी अस्सल ऐतिहासिक पत्रांचा आधार उपलब्ध नाही. पत्रांच्या खालोखाल ज्याला विश्वसनीय म्हणता येईल असे शकावल्यांतील फक्त दोन उल्लेख मिळतात पण तेही अतिशय त्रोटक स्वरूपात आहेत. याखेरीज बखरींतून या मोहिमेची माहिती मिळते. यापुढं आपण तेच संदर्भ पाहणार आहोत. या घटनेबद्दल ऐतिहासिक साधनं काय म्हणतात ते पाहू...

       या घटनेचा इतिहास मांडण्याची सुरुवातच मुळात चुकीची झाली आहे आणि तीही गडाच्या नावापासून. तान्हाजींची ही लढाई ०४ फेब्रुवारी १६७० ला झाली पण ०२ एप्रिल १६६३ चं एक पत्र उपलब्ध आहे. त्यात किल्ल्याचा 'सिंहगड' असाच उल्लेख सापडतो. मूळ पत्राचा तर्जुमा असा...

       १६६३ च्या एप्रिलमधे शाहिस्तेखान चाकण जिंकून पुण्याला येऊन राहिला होता. पुण्याला आल्यावर त्याने सिंहगड फितुर केला. होय!! म्हणजे तान्हाजीरावांनी गड फत्ते करण्यापूर्वीच गडाचं नाव कोंढाणा बदलून सिंहगड झालं होतं त्यामुळं 'गड आला पण सिंह गेला' म्हणून गडाचं नाव सिंहगड झालेलं नाही तर ते तान्हाजींनी गड ताब्यात आणण्याच्या किमान सात वर्ष आधीच झालेलं आहे.

       बरं ही फितवा झाल्याची बातमी महाराजांना कळताच त्यांनी मोरोपंत पिंगळे, सोनोपंत मुजुमदार यांना राजगडाहून सिंहगडावर जाण्याचा हुकूम केला आणि बरोबर तान्हाजीस नेण्यास सांगितलं. नंतर काही दिवसांतच महाराजांनी शाहीस्तेखानावर लाल महालात छापा घातला. शाहीस्तेखान पुण्यात येण्यापूर्वी महाराजांची कोकणात नामदारखानावर मोहीम ठरली होती पण सिंहगड फितुर झाल्यामुळं ती रद्द करावी लागली. तान्हाजींना तेव्हापासून सिंहगडाची खडानखडा माहिती असल्यामुळं सिंहगडाची मोहीम ही तान्हाजींचीच होती म्हणजे 'आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे' हेही तान्हाजीरावांच्या तोंडी आलेलं विधान चुकीचं ठरतं.

शिवकालीन पत्र सार संग्रह, खंड पहिला, पत्र क्रमांक ९२५

        या लढाईत महाराजांचा सिंह गेल्याने किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड केले असा सगळीकडे समज आहे. 'गड आला पण सिंह गेला' असा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक साधनांत नाही. सभासद बखरीत याच्या थोडंसं जवळचं 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला!' असं वाक्य आलेलं आहे.

सभासद बखर

        शिवापूरकर आणि जेधे शकावलीत पुढील त्रोटक उल्लेख येतो.

 

शिवापूरकर शकावली

जेधे शकावली

        मराठी दफ्तर रूमाल पहिला म्हणजे शेडगावकर बखरीत या प्रसंगाचं त्यामानानं बऱ्यापैकी विश्लेषण आलं आहे. 

मराठी दफ्तर - रूमाल पहिला

        इतिहासाची कशी दुर्दशा करता येते हे पाहण्यासाठी अस्सल दस्तऐवज अभ्यासण्यासोबतच सिंहगड चित्रपटदेखील जरूर पहावा. तुळशीदासाचा पोवाडा आणि 'गड आला पण सिंह गेला' ही कादंबरी देखील अभ्यासकांनी अवश्य वाचावी. कोणतंही वाङ्‍‍मय त्याज्य नाही पण त्याचा तटस्थ राहून तौलनिक अभ्यास मात्र करता यायला हवा. तान्हाजीरावांनी दाखवलेलं शौर्य आणि केलेलं बलिदान साधारण नव्हतं हे नक्कीच पण लढाईचं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करताना शाहीर, कादंबरीकार आणि चित्रपट निर्माते हे तान्हाजीं मालुसरेंच्या ठाई असलेलं 'कर्तुत्व' आणि स्पष्टपणे दिसणारा 'पराक्रम' तर झाकोळून टाकत नाहीत ना? अशी शंका मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही.

बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.

मर्यादेयं विराजते।
लेखनसीमा॥

🚩 संदर्भ -

१) साधन चिकित्सा - वा. सी. बेंद्रे.
२) ऐतिहासिक पोवाडे किंवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास (भाग पहिला) - यशवंत नरसिंह केळकर.
३) शिवकालीन पत्र सार संग्रह, खंड पहिला, पत्र क्रमांक ९२५.
४) सभासद बखर.
५) शिवापूरकर शकावली.
६) जेधे शकावली.
७) मराठी दफ्तर - रूमाल पहिला, शेडगावकर बखर.