'शिमगा' म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात वारं संचारतं, शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते, फाक कानात घुमायला लागतात. मग त्याला वेध लागतात ते कोकणात जायचे...
कोकणात दोन सण सर्वात मोठ्ठे साजरे केले जातात एक गणेशोत्सव आणि दुसरा शिमगा. गणपतीला अजून खूप वेळ आहे खरं पण शिमगा मात्र अगदी तोंडावर आलाय. गणपतीनंतर कोकणात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे शिमगा. कोकणात होळीच्या सणाला खास ‘शिमगा’ असं म्हटलं जातं. शिमगा हा सण कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणूनच गणेशोत्सवानंतर प्रत्येक कोकणी माणूस शिमग्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कोकणात हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सणांसाठी सर्वच चाकरमानी म्हणजे नोकरीनिमित्त मुंबईपुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी राहिलेली कोकणी मंडळी आवर्जून गावी जातात त्यामुळं या सणांना कोकणातील प्रत्येक घरात अगदी उत्सवाचं वातावरण असतं. एरव्ही फक्त एक दोन माणसं असलेली कोकणातील घरं या सणाला आनंदानं भरून वाहतात. कोकणातल्या या शिमगोत्सवाविषयी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ किंवा खासकरून घाटावरच्या लोकांना माहिती व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच...
सामान्यत: निसर्गातील बदलाशी संबंधित काही घटनांच्या आधारे सण निर्माण होतात. अनेक सणांचा जन्म ज्या कारणामुळं झाला त्यामागचं नेमकं शास्त्रीय कारण आपण नेहमीच समजून घ्यायला हवं. भारतात होळीचा सण हा सगळेच हिंदू लोक साजरा करतात पण महाराष्ट्रात मात्र या सणाचं मूळ नाव शिमगा असं आहे. आता या मूळ नावाचा उच्चार फक्त खेड्यांतच अधूनमधून झालेला दिसतो. बहूतेक ठिकाणी शिमग्याऐवजी होळी असंच म्हटलं जातं पण आपण किमान एतद्देशीय महाराष्ट्रवासीयांनी तरी या सणाला 'शिमगा' असंच म्हणायला हवं. अर्थात त्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यात शिमगा किंवा शिमगो या नावाने ओळखल्या जाणार्या सणाच्या नावाची मूळ व्युत्पत्ती कशी झाली हे समजून घेणंही मोठं रंजक ठरेल.
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे १९१० साली मोरेश्वर वासुदेव कर्वे यांनी लिहिलेल्या ‘आर्यांचे सण’ या पुस्तकमालेत ‘शिमगा’ या नावाचं ८० पानांचं छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकात ‘शिमगा’ या शब्दाची व्युत्पत्ती कर्वे यांनी सांगितली आहे. ‘फाल्गुनी पुनवेस सूर्य उदगयनारंभ बिंदूवर आला म्हणजे नक्षत्र चक्रात तो दक्षिण दिशेच्या सीमेवर जाऊन उलटला म्हणून सीमग: सीमेप्रत आलेला दिसला.' सूर्याचं 'सीमग:' हे विशेषण पुढं मराठीत नाम होऊन बसलं आणि 'सीमग:' चं बोली भाषेत शिमगा असं झालं. सोप्या भाषेत सांगायचं तर शिमग्याचा सण म्हणजे शिवेवर आलेल्या सूर्याचा सण. या सणाचा काळ हा निसर्ग बहरण्याचा असतो. थंडी थोडीफार असते पण आकाश मात्र निरभ्र असल्यामुळं रात्री चांदणं सोबतीला असतं. १९१० सालचं कर्वे यांचं ‘शिमगा’ हे पुस्तक आताशा काहीसं दुर्मीळ झालं आहे.
यंदा २०२५ साली १३ मार्चला फाल्गुन पौर्णिमा असल्यामुळं त्या दिवशी शिमगा साजरा केला जाणार आहे. फाल्गुन पौर्णिमेनंतर शरद ऋतू संपून वसंत ऋतू सुरू होतो, म्हणजे ऋतू बदलतो. वसंतोत्सवाला सुरुवात होते. वसंत ऋतूचा उत्सव म्हणजे वसंतोत्सव असं म्हणण्याचं कारण हेच की झाडांना नवीन पालवी फुटू लागते. पक्षी घरटी बांधू लागतात कारण लगेचच त्यांच्या विणीचा हंगाम सुरू होतो. आपल्या शरीरातही बदल घडू लागतात त्यामुळे आयुर्वेदात या दिवसांत वमन करायला सांगितलं आहे. यालाही 'वासंतिक वमन' असंच म्हटलं जातं. थोडक्यात काय की फक्त मनुष्यच नाही तर संपूर्ण सृष्टी जुनं टाकून नवीन धारण करू लागते त्यामुळं जूनं, वाईट सर्व जाळून टाकून नाविन्याची सुरुवात करण्याचा हा सण आहे. एखाद्या विषयी मनात राग असेल तर शिमग्याच्या दिवशी त्याच्या नावाने कोकणात जल्लोशात फाक घालतात म्हणजे स्वच्छ भाषेत बोंबा मारतात. होळीचा होम धडधडून पेटू लागला की 'फाक' ऐकू येऊ लागतात. एखाद्याला शिव्या घातल्यामुळं त्याच्याबद्दल असलेला मनातला राग कमी होतो किंवा नाहीसा होतो हे प्रयोगाअंती सिद्ध झालंय त्यामुळं तर ही फाक घालण्याची किंवा बोंबा मारण्याची प्रथा पडली नसेल? असं राहून राहून मनात येतं. वर्षभराचा राग, उखाळ्यापाखाळ्या या सगळ्याला फाक घालून उत्स्फूर्तपणे वाट मोकळी करून द्यायची आणि आपापसातले मतभेद होळीसोबत दहन करून टाकायचे. निसर्गाप्रमाणं जूनं वाईट टाकून किंवा निसर्ग नियमाप्रमाणं माणसानं जूनं वाईट सगळं विसरून नव्यानं सुरूवात करण्यासाठीच बहूदा या सणाची निर्मिती केली गेली असावी असं वाटतं.
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात 'शिमगा' हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या पट्ट्यात माड, पोफळी, आंबा अशा वेगवेगळ्यात रूपात होळी सजते. तिथं हा सण जवळजवळ ०५ ते १५ दिवस साजरा करतात. रत्नागिरी जिल्ह्यातलं तवसाळ हे माझ्या मित्राचं म्हणजे मिलिंद गडदेचं गाव. या गावात फाल्गुन शुक्ल पंचमीला म्हणजे फाक पंचमीला मानाच्या तुळशीवरची पूजा करून आई महामाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरूवात होते. त्या दिवशी तवसाळ गावात पहिली होळी पेटवतात. यालाच ‘होम’ लागणं असं म्हटलं जातं. देवानं सांगितलं की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडतो. ढोलताशाच्या गजरात, नाचत, गात ती गावात परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते आणि मग सुरू होतो खरा शिमगोत्सव.
फाल्गुन शुक्ल पंचमीच्या दिवशी छोटी होळी लावल्यानंतर पुढचे काही दिवस गावात, वाड्यावस्त्यांवर घरोघरी पालख्या फिरतात. देवळातून पालखी कुणी उचलायची?, ती कुठल्या वाडीतून न्यायची?, ती प्रथम कुठं थांबवायची?, पहिल्या पूजेचा मान कुणाला?, जागरण कुठं?, जेवण कुठं?, खेळे कुठे? हे सारं काही ठरलेलं असतं. ज्याच्या जागेतून पालखी जाणार तो त्या पालखीमार्गावर कधीच कोणतं बांधकाम करणार नाही. वर्षानूवर्ष हे असंच चालत आलंय आणि पुढंही असंच चालत राहील. काही ठिकाणी पौर्णिमेच्या आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी केली जाते तर काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात. अर्थात प्रथेप्रमाणं फाल्गुन पौर्णिमेलाच होळीचा म्हणजेच होमाचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमेला जोडून आलेल्या प्रतिपदेला होम केला जातो. याला ‘भद्रेचा होम‘ असं म्हणतात.
कोकणात ‘सहाण’ नावाची एक संकल्पना आहे. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका विशिष्ट दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण साधारण देवळासारखीच असते पण तिचा वापर हा फक्त शिमगोत्सवातच केला जातो. इतर वेळी मात्र तिथे देव ठेवले जात नाहीत. तो चौथरा मोकळाच असतो.
वर्षभर आपण देवळात जातो, देवाच्या दारी त्याला भेटायला जातो पण वर्षातला हाच एक दिवस असा आहे की ज्या दिवशी देव आपल्याला भेटायला आपल्या घरी येतात अशी कोकणवासीयांची अपार श्रद्धा आहे. मग जर खुद्द देव आपल्या घरी येत असतील तर आपण त्याच्या स्वागताला घरी असलंच पाहिजे अशी कोकणवासीयांची धारणा आहे त्यामुळं कोकणी माणूस शिमग्याच्या दिवसांत आपली सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या को़कणातल्या घरी आवर्जून जातो. कोकणात गावागावातून शिमग्याच्या सणात ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षं ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानल जातं. आपली ग्रामदेवता आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्याचा आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची यथासांग पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात.
कोकणात शिमग्याच्या सणात खरंतर सगळीकडंच अतिशय आनंदी वातावरण असतं पण त्यातही गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा कार्यक्रम अलोट उत्साहात करण्यात येतो. खरंतर या सणातली पालखी नाचवताना पाहणं हा डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण असतो. यावेळी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात. गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात. यावेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात असं समजलं जातं. यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण-नारळ बदलण्यात येतात. कोकणवासियांसाठी हा क्षण असविस्मरणीय असतो. यावेळी वेशीवर सारा आसमंत ढोलताशांच्या आवाजात दणाणत असल्यामुळं सगळा माहोल भारलेला असतो. पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. त्यामुळे पालखी नाचवताना पाहण्यासाठी प्रत्येक गावचे ग्रामस्थ इतर गावांमध्येदेखील जातात त्यामुळं खऱ्या अर्थाने याला लोकोत्सव म्हणता येईल. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केलेला सण म्हणजे शिमगा.
शिमग्याच्या निमित्तानं प्रत्येक गावात वेगवेगळे खेळ खेळले जातात. आगीतून पळणं, नारळ जिंकणं अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तळकोकणात शिमग्याच्या दिवसात 'जती'च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा आणि त्यातील सवाल-जवाब, संकासुर, नटवा यांसारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ देखील असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात. याशिवाय नमन किंवा खेळे, दशावतार, सिनेमा, भजन-किर्तन अशा मनोरंजक गोष्टींचं देखील आयोजन केलं जातं. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात 'शालू झोका दे गो मैना' हे गाणं आणि तो विशिष्ट प्रकारचा नाच प्रभाकर मोरेंनी अतिशय लोकप्रिय केला. हा नाच तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. तो नाच आणि ते गाणंही याच शिमगोत्सवातील नमनातलं आहे बरं का !!
फाल्गुन शुक्ल पंचमीला म्हणजे फाक पंचमीला पहिली होळी पेटून जो शिमगोत्सव सुरू होतो तो वैशाख शुक्ल तॄतीया म्हणजेच अक्षय्यतृतीयेला पालखी पुन्हा मंदिरात जाईपर्यंत म्हणजे जवळजवळ दोन महिने सुरू असतो. देव पुन्हा मंदिरात जाताना मृगाचा पाऊस घेऊनच येतात असा समज आहे. शिमगोत्सव हा सण एक सामाजिक उत्सव असतो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यातील किंवा गावागावातील प्रथा, परंपरा, रुढी जरी वेगवेगळ्या असल्या तरी हा सण येताना नेहमीच एक नवचैतन्य घेऊन येतो. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी म्हणण्याचा काळ औद्योगिकरणाच्या रेट्यात वाहून गेला. कुणबी व बलुतेदारी हातात हात घालून नांदत होती तोपर्यंत गावकुसाला महत्त्व होतं. आताशा सर्व व्यवहार पैशात होऊ लागल्यामुळं घरटी किमान एका कोकणी माणसाला शहरांचा आधार घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. पोटासाठी दाही दिशा पसरलेल्या कोकणी माणसाला आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडीक बनलेल्या जमिनीची ओढ लागते ती गणपती आणि होळीच्या निमित्तानंच. हा सगळा उत्सवी वारसा महानगरांच्या गर्दीत आणि धबडग्यात कसा काय मिळणार? तो घ्यायला कोकणातलं आपलं गावच गाठायला हवं त्यामुळंच शिमग्याचं हे ऋण फेडायला शिमग्याला जायलाच हवं.
कोकणात राहिलेली उरलीसुरली म्हातारीकोतारी आपल्या आप्तेष्ठांकडं फोन करून 'काय मग शिमग्याला घरी येताय ना? असं आजही विचारत असतील आणि आपल्या वाटेकडं डोळे लावूनही बसली असतील. चाकरमानी सणसूद उरकून पुन्हा जाताना यांच्या डोळ्यांच्या कडा नेहमीच पाणावलेल्या असतात हे फारसं कुणाला कळत नाही. खरंतर हे आता नेहमीचंच झालंय. जमीनी, घरं विकल्यामुळं हळूहळू चाकरमान्यांची गावाची नाळ तुटत चालली आहे. पूर्वी गावाकडची मंडळी पाहूणे मंडळींना 'येवा कोकण आपलोच असा' असं म्हणत असत पण आता असं आपल्याच आप्तस्वकीयांना सांगण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. खरंतर लग्न, कार्य आणि सण हे निमित्तमात्र असतात ते आपल्या मातीला जोडून ठेवण्यासाठी त्यामुळं आपली नाळ आपल्या मातीशी तुटू द्यायची नसेल आणि आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर आपल्याला स्वत:पासून आणि तेही आत्तापासूनच सुरूवात करायला हवी. बरोबर ना?
चला तर मग वाट कसली बघताय भरा आपली बॅग आणि चला शिमगोत्सवाला कोकणात फाक घालायला...
उंबर रे उंबर.. आमच्या महामाईला सोन्याचा झुंबर.
किंवा
काळी कोंबडी पिसा चा भार
बोंब नाही मारेल तो गावाचा हमार
आणि शेवटचा...
उकडलेला बटाटा वर हिरवी वांगी
शिमग्याला गावाला जाणार नाही तो गावचा गंभी
“काय मग गाववाल्यानु यंदा शिमग्याक गावाक जाणार हास की नाय?”
🚩 माहीती साभार - मिलिंद गडदे, तवसाळ आणि गुगल.
🚩 फोटो - गुगल.
🚩 या होलिकोत्सवाच्या अखेरीस 'समा' किंवा 'लोटण्या' चा एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात भंडारी समाज आणि खारवी, कुणब्यांचा पंचरस असा तो खेळला जातो. अशा काहीशा वेगळ्या खेळाबद्दलही लवकरच...