सोमवार, २ मार्च, २०२६

"व्याप्ती महादेव रांगेची"

       दक्षिणोत्तर पसरलेली सह्याद्रीची मुख्य रांग, त्याच्या पूर्वपश्चिम उपरांगा वगैरे भूगोल बहूतेक सर्वांना परिचित आहेच. मुख्य रांग, उपरांगा हा झाला महाराष्ट्राचा ढोबळ भूगोल पण याच डोंगररांगांच्या भूगोलाचा आणखी थोडा सूक्ष्म अभ्यास केला तर असं लक्षात येतं की महाराष्ट्रातल्या उपरांगांना सुद्धा काही उपफाटे फुटलेले आहेत. रविवारच्या खांबटाकी ट्रेकला जात असताना सोबत आलेल्या मूळच्या साताऱ्याच्या एका मित्राबरोबर गाडी प्रवासात त्यांच्या गावामागं असलेल्या डोंगररांगांबद्दल बोलता बोलता सहज विषय निघाला तो भाडाळे-कुंडल रांगेचा. ही रांग नेमकी कुठून कुठंपर्यंत आहे?, ती कोणत्या गावांच्या जवळून जाते?, आणि त्यावर कोणती ठिकाणं आहेत यावर बरीच चर्चा झाली. आज सकाळी थोडा वेळही होता म्हणून म्हटलं त्याविषयी लिहूनच टाकू म्हणजे सर्वांनाच या रांगेबद्दल सांगता येईल. लिहायला घेतलं आणि सुरूवात केली तर म्हटलं लिहायचंच तर अर्धवट का लिहा? भाडाळे-कुंडल रांग ज्या महादेव रांगेचा भाग आहे त्या संपूर्ण महादेव रांगेबद्दलच लिहून टाकू म्हणून मग पहिल्यापासून तपशीलवारच लिहायला सुरूवात केली.

       नांदगिरी ऊर्फ कल्याणगड, चंदन-वंदन, वर्धनगड, संतोषगड, वारूगड आणि महिमानगड हे सातारा जिल्ह्यातील किल्ले सर्वांना परिचित आहेतच पण ते नेमक्या कोणत्या डोंगररांगेवर आहेत हे मात्र चटकन सांगता येत नाही म्हणूनच हा लेखनप्रपंच...

       सह्याद्रीच्या सर्वात मोठया 'सातमाळ-अजिंठा' या उपरांगेनंतर नंबर लागतो तो रायरेश्वर ते शिखर शिंगणापूर अशा धावणाऱ्या 'महादेव' रांगेचा. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेल्या रायरेश्वराच्या नाखिंद्यापासून सुरू झालेली ही महादेव रांग ढोबळमानाने शिखर शिंगणापूरला जरी संपत असली तरी पुढं ती तुटक स्वरूपात पंढरपूरच्या दिशेने पिलिव गावापर्यंत जाते. आम्ही फाल्कन्सनी केलेला खांबटाकी घाटाचा मार्ग हा नीरेच्या खोऱ्यातून महादेव डोंगररांग चढून पलीकडे कृष्णेच्या खोऱ्यात उतरतो. ही महादेव डोंगररांग भीमेचे आणि कृष्णेचे खोरे विभागते. खरंतर भीमा रायचूरजवळ कृष्णेलाच मिळत असल्यामुळं तांत्रिक दृष्ट्या भीमेला कृष्णेचीच उपनदी म्हणावं लागेल.

       महादेव रांगेत अनेक सुप्रसिद्ध ठिकाणं आणि किल्ले वसलेले आपल्याला पहायला मिळतात. महादेव रांगेवर वसलेल्या किल्ल्यांची नावं वाचली तर नक्कीच आश्चर्य वाटेल. खरं सांगायचं तर ही महादेव रांग एखाद्या नारळाच्या झावळीच्या आकारासारखी आहे. नारळाच्या झावळीला कसं डावीकडं उजवीकडं हीर असतात त्याचप्रमाणं या महादेव रांगेला सुद्धा दक्षिण-उत्तर अनेक फाटे फूटलेले आहेत. खरंतर सगळे फाटे म्हणजे महादेव रांगच पण आपल्याला समजायला सोपं व्हावं म्हणून त्या त्या फाट्याला त्यावर असलेल्या महत्वाच्या ठिकाणाचं आपण नाव देऊया.

       महादेव रांगेवरचं पहिलं ठिकाण म्हणजे सर्वांना परिचित असलेला रायरेश्वर महादेव. भोर खोरं, हिरडस मावळाच्या ऐन गाभ्यात असलेला रायरेश्वर महादेव म्हणजे जेधे, खोपडे आणि बांदल देशमुखांचं कुलदैवत. 

रायरेश्वर महादेव

        रायरेश्वरानंतर महादेव रांगेवरून पूर्वेकडं जाऊ लागलं की महादेवाच्या मुख्य रांगेवर लगेचच पहिला केंजळगड किल्ला वसलेला आहे. महादेव रांग ओलांडणाऱ्या थोडक्यात निरेच्या खोऱ्यातून कृष्णेच्या म्हणजे भोर खोऱ्यातून जांभळीच्या खोऱ्यात जाणाऱ्या पहिल्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी याची निर्मिती केली गेली असावी.

केंजळगड किल्ला

        महादेव रांगेवरच्या या केंजळगडापासून आणखी थोडं पुर्वेला गेलं की एक फाटा उत्तरेला भोर गावाकडे फुटलेला आहे. या फाट्याच्या शेवटच्या टोकावर रोहिडा ऊर्फ विचित्रगड वसलेला आहे त्यामुळं आपण याला रोहिडा फाटा म्हणू शकतो. हा फाटा पुढं वाघजाई मंदीर आणि तसंच पुढं भोर-महाड रस्त्यावर असलेल्या दगडाच्या खाणीपर्यंत गेलेला आहे. भोर गावातल्या शिवाजी चौकातून मांढरदेवीकडं जाऊ लागलं की ही रोहिड्याची डोंगररांग उजव्या बाजूला कायम आपली सोबत करत असते.

रोहिडा ऊर्फ विचित्रगड

        भोरहून मांढरदेवीला जाताना खोपडे देशमुखांचं अंबाडे ओलांडलं की मांढरदेवी घाट आपण चढू लागतो. हा मांढरदेवी घाट जिथं महादेव रांगेच्या माथ्यावर चढतो नेमकं तिथूनच महादेव रांगेला वाईकडं एक दक्षिण फाटा फूटला आहे. या दक्षिण फाट्याच्या टोकावर पांडवगड वसलेला आहे त्यामुळं या फाट्याला आपल्याला पांडवगड फाटा असं म्हणता येईल. या पांडवगड फाट्यानंतर पुढं लागतं मांढरदेवीचं परिचित देवस्थान. मांढरदेवीपासून वाईकडं जाणारा घाट उतरला की गुंडेवाडी हे छोटेखानी गाव लागतं. या गुंडेवाडीतूनही पांडवगडवर चढाई करता येते. गुंडेवाडीच्या पुढं लागतं बोपर्डी. या बोपर्डीच्या पल्याड पालपेश्वर लेणी आपल्याला पाहता येतात.

पांडवगड

पालपेश्वर लेणी

        महादेव रांगेवरचा पुढचा थांबा आहे मांढरदेवीचा. मांढरदेवी हे बऱ्याच जणांचं आराध्य दैवत. भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या मांढरदेवी देवीची यात्रा दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला भरते. 

मांढरदेवी

        ऐन मांढरदेवीपासून उत्तरेकडं सारोळ्यापुढच्या शिंदेवाडीपर्यंत एक फाटा फूटला आहे. याला शिंदेवाडी फाटा म्हणता येईल. जेधे आणि खोपडेंच्या वैराची कहाणी सांगणारी 'गाडेखिंड' याच फाट्यावर उत्रोळी आणि मिरजे दरम्यान वसलेली आहे. कोल्हापूर महामार्गावरून जाताना चटकन नजर वेधून घेणाऱ्या शिरवळ औद्योगिक वसाहतीमधल्या फिनोलेक्स कंपनीच्या मागच्या बाजूला पांडवदरा नावाचं एक ठिकाण आहे. यालाच स्थानिक पाच पांडवांची गुहा म्हणूनही ओळखतात. या ठिकाणी 'हिनयान' प्रकारच्या बौद्ध लेण्या पहायला मिळतात.

फिनोलेक्स कंपनी

        मांढरदेवीपासून मुख्य रांगेवरून आणखी पूर्वेकडं जाऊ लागलं की दक्षिणेकडं धामना डोंगरफाटा फूटतो. सुरुरहून महाबळेश्वरकडं जाताना वाईच्या अलिकडं उजव्या बाजूला साधारण डी-मार्टपाशी हा डोंगरफाटा संपतो. सुरुरहून वाईला जाताना उजव्या बाजूला जे डोंगर दिसतात तो धामना डोंगरफाटाच आहे.

डी-मार्ट

भवानी मंदिर

        धामना डोंगरफाट्याच्या पुढं मुख्य रांगेवर लागतो तो खांबटाकी घाट आणि तसंच पुढं पुर्वेकडं गेलं की आहे सोळशीचं हरेश्वर मंदीर.

खांबटाकी घाट

हरेश्वर मंदीर

हरेश्वर मंदीर

        हरेश्वर मंदिरापासून दक्षिणेला एक फाटा फुटला आहे जो खांबटाकी घाटातून उतरलं की साताऱ्याच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला समांतर धावतो. या फाट्यावर साधारण जोशीविहीर या गावाजवळ केदारेश्वर आणि चवणेश्वर अशी दोन पुरातन मंदिरं पहायला मिळतात. या मंदिरांपासून पुढं म्हणजे फाट्याच्या जवळजवळ शेवटी चंदन-वंदन किल्ल्यांची जोडगोळी आहे म्हणून या फाट्याला आपण चंदन-वंदन फाटा म्हणूया पण ही रांग चंदन-वंदन किल्ल्यांपाशी संपत नाही तर पुढं ती तुटक स्वरूपात जरंडेश्वर पर्यंत धावते.

केदारेश्वर

चवणेश्वर

चंदन-वंदन

जरंडेश्वर

        सोळशीच्या हरेश्वर मंदीरापासून पुढं साधारण आदर्कीपर्यंत फारसे काही फाटे फुटलेले नाहीत पण आदर्कीच्या डोंगरांपासून एक दक्षिण फाटा फूटलाय तो म्हणजे नांदगिरी ऊर्फ कल्याणगड फाटा. या फाट्याच्या शेवटच्या टोकावर नांदगिरी किल्ला वसलेला आहे.

नांदगिरी ऊर्फ कल्याणगड

        भाडळे गावापासून दक्षिणेला एक फाटा फूटला आहे जो दोन टप्प्यात पार सांगली जिल्ह्यातल्या कुंडलपर्यंत जातो. भाडळे ते कुंडल अशी ही रांग लांबलचक पसरली असल्यामुळं हीला एक फाटा न म्हणता डोंगररांग म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. भाडळेपासून कुंडलपर्यंत पसरलेल्या या रांगेला भाडळे-कुंडल रांग म्हणतात. भाडळे-कुंडल रांग भाडळेपासून वर्धनगडपर्यंत पहिल्या तर वर्धनगडपासून कुंडलपर्यंत दुसर्‍या अशा दोन टप्प्यात विभागली गेली आहे. ही डोंगररांग भाडळेनंतर वर्धनगड, पुसेगाव, रामेश्वर डोंगर, औंधची यमाई, गिरीजाशंकर डोंगर, राजाचे कुर्ले, ओगलेवाडीचा सदाशिवगड, टेंभू लिफ्ट इरिगेशन प्रकल्प, शेणोली जवळचा चौरंगीनाथ डोंगर आणि मश्चिंद्रगड, दुधारी, ताकारीचे सागरेश्वर अभयारण्य, तुपारी ते जैन तिर्थक्षेत्र असलेल्या सांगली जिल्ह्यात, पलूस तालुक्यात कुंडलपर्यंत पसरलेली आहे.

वर्धनगड

रामेश्वर

औंधची यमाई

गिरीजाशंकर

सदाशिवगड

टेंभू लिफ्ट इरिगेशन प्रकल्प

चौरंगीनाथ

मश्चिंद्रगड

सागरेश्वर अभयारण्य

जैन तिर्थक्षेत्र कुंडल

        महादेव रांग आदर्कीच्या पुढं सरळ पूर्वेकडे जाते. जाताना वाटेत ताथवडे घाटानंतर पहिला ताथवडा ऊर्फ संतोषगड लागतो.

ताथवडा ऊर्फ संतोषगड

        संतोषगडाच्या पुढं साधारण वेळोशीपाशी महादेव रांगेला महिमानगड हा दक्षिणफाटा फूटला आहे, ज्याचं शेवटचं टोक म्हणजे महिमानगड आहे.

महिमानगड

        वेळोशीपासून पुढं महादेव रांग थोडी उत्तरेकडं वळते आणि तिच्यावर पहिला किल्ला लागतो तो म्हणजे वारूगड. या वारूगडाच्या पायथ्यात फलटण बाजूला गिरवी गाव वसलेलं आहे. पुढं गेलं की लागतो तो मोगराळे घाट. हा घाट फलटण ते दहिवडी दरम्यान आहे. पुण्यातली मंडळी गोंदवलेला जाताना याच घाटाचा वापर करतात. मोगराळे घाटानंतर महादेव रांग पुन्हा दक्षिणेकडं वळते आणि थेट शिखर शिंगणापूरपर्यंत जाते.

वारूगड

शिखर शिंगणापूर

        तसं पहायला गेलं तर तांत्रिकदृष्टीने महादेव रांग शिखर शिंगणापूरला संपते पण पुढं अगदी छोट्या उंचीच्या रुपात कारखेलपासून पुढं पिलिवपर्यंत जाते.

संताजी घोरपडे स्मारक गुहा, कारखेल

पिलिव

        कारखेल म्हटलं की आठवतात ते संताजी घोरपडे. संताजींचा याच महादेव रांगेत असलेल्या कारखेलच्या डोंगरात खून करण्यात आला होता. ज्या महादेव डोंगररांगेच्या सुरवातीला असलेल्या रायरेश्वरानं स्वराज्याचं एक उत्तुंग स्वप्न पाहिलं त्याच महादेव डोंगररांगेच्या शेवटच्या कारखेलला मात्र फितुरीचं ग्रहण पाहण्याचंच नशीबी आलं. काय करणार? कालाय तस्मै नमःl

       शंभू महादेवाचं आख्यान इथं संपलं पण जाता जाता या महादेव रांगेला फूटलेल्या डोंगरफाट्यांचा आणि त्यावर असलेल्या किल्ल्यांचा धावता आढावा घ्यायचा तर असा घेता येईल. हा अनुक्रम फाटा फूटलेली दिशा आणि डोंगरफाट्याचे नाव असा वाचावा.

🚩 महादेव रांगेचे डोंगरफाटे -

१) उत्तर - रोहिडा फाटा
२) दक्षिण - पांडवगड फाटा
३) उत्तर - शिंदेवाडी फाटा
४) दक्षिण - धामना डोंगरफाटा
५) दक्षिण - चंदन-वंदन फाटा
६) दक्षिण - नांदगिरी ऊर्फ कल्याणगड फाटा
७) दक्षिण - भाडळे-कुंडल रांग
८) दक्षिण - महिमानगड फाटा

🚩 महादेव रांगेवर वसलेले किल्ले -

१) केंजळगड
२) रोहिडा ऊर्फ विचित्रगड
३) पांडवगड
४) चंदन
५) वंदन
६) नांदगिरी ऊर्फ कल्याणगड
७) वर्धनगड
८) सदाशिवगड
९) मश्चिंद्रगड
१०) ताथवडा ऊर्फ संतोषगड
११) महिमानगड
१२) वारूगड
१३) पिलिव

       स्वतः फिरल्यानंतर मला समजलेला भूगोल आणि त्याचबरोबर स्थानिकांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर हा लेख बेतला आहे. दिलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त इथून पुढं महादेव रांगेची, त्यावर असलेल्या वाटांची, डोंगराच्या नावांची आणि देवस्थानांची अधिकची माहिती मिळवून त्यानुसार या लेखात वेळोवेळी सुधारणा करण्याचा माझा कायमच प्रयत्न असेल. 

       माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं देखील मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्याशिवाय लिहिताना नजरचुकीने काही ठिकाणांबद्दल सांगायचं नक्कीच राहून गेलं असेल. जाणकारांनी त्याची सुद्धा कल्पना दिली तर लेखात सुधारणा करण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असेल. जाणकारांकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो...

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही॥

बहूत काय लिहिणें। मर्यादेयं विराजते॥

लेखनसीमा॥

🚩 फोटो - गुगल

🚩 नकाशा - अपूर्व दामले 

🚩 🚩 🚩