स्वराज्याची शपथ 'सत्य की मिथ्या'
शिवाजी महाराजांनी रोहिरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली होती अशीच बहूतेकांची समजूत आहे. तिचा उगम वरील पत्रात आहे पण ती स्वराज्याची शपथ होती असे कुठेही या पत्रात म्हटलेले नाही. हे पत्र विश्वसनीय मानले तर ती शपथ कोण्या दादापंतांच्या उपस्थितीत रोहिरेश्वर येथे घेण्यात आली होती आणि नरसप्रभू उर्फ नरसीबाबा व त्यांचा मुलगा दादाजी यांचे वतन वंशपरंपरा चालविण्याचे आश्वासन शिवाजी महाराजांनी त्या शपथेद्वारे दिले होते एवढेच या पत्रावरून सिद्ध होईल. त्याप्रसंगी नरसप्रभू आणि त्यांचा मुलगा दादाजी यांनीही शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली असेल असेही अनुमान हे पत्र विश्वसनीय मानले तर त्यावरून करता येईल पण शिवाजी महाराजांनी आपले बरेच अनुयायी रोहिरेश्वर येथे गोळा करून त्यांच्यासह स्वराज्याची शपथ घेतली होती असे अनुमान या पत्रावरून नक्कीच करता येत नाही. शिवाजी महाराजांनी आपले एक बोट तलवारीने किंचित कापून त्यातील रक्ताची धार महादेवाच्या पिंडीवर धरली आहे असे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहवयास मिळते. त्या चित्रामागील कल्पनेचे मूळ रोहिरेश्वर येथील शपथेच्या या तथाकथीत प्रसंगातच आहे. या पत्राची तारीख २९ सफर, शुहूर/सुहूर सन खमस अर्बैन अलफ म्हणजे १७ एप्रिल १६४५ अशी आहे. त्यात दादापंतांचा जो उल्लेख आहे तो दादाजी कोंडदेवांचा म्हणून केलेला उल्लेख आहे असे वाटते.
हे पत्र विश्वसनीय मानले तर दादाजी नरसप्रभू हे रोहिडखोऱ्याचे व वेळवंडखोऱ्याचे देशपांडे होते आणि त्या खोऱ्यांमधील गावांचे कुळकर्णी होते असे सिद्ध होते. रोहिडखोऱ्याच्या देशपांडेपणाच्या वादापुरते पाहिले तर या पत्राचे महत्व एवढेच आहे पण शिवचरित्राच्या दृष्टीने हे पत्र फार महत्वाचे आहे. ते विश्वसनीय मानले तर शिवाजी महाराजांनी रोहिरेश्वर येथे घेतलेल्या शपथेचा प्रसंग खरा मानावा लागतो आणि महाराजांनी आपल्या राज्यास 'हिंदवी स्वराज्य' म्हटले होते असेही सिद्ध होते. रोहिरेश्वर येथील शपथेच्या प्रसंगाचा उल्लेख हा या पत्राखेरीज इतर कोणत्याही साधनांत आलेला नाही आणि हिंदवी स्वराज्य हे शब्दही या पत्राखेरीज शिवचरित्राच्या कोणत्याही साधनांत आलेले नाहीत.
या पत्राच्या विश्वसनीयतेवरील आक्षेप असे आहेत...
१) या पत्रात दादाजींना वेळवंडखोऱ्याचे देशपांडे म्हटले आहे पण ते वेळवंडखोऱ्याचे देशपांडे कधीच नव्हते.
२) विजापूहून वजिरांचा जो हुकूम आला तो शिरवळहून अमिनाने दादाजींकडे पाठवला असे या पत्रात म्हटले आहे पण यावेळी शिरवळ आदिलशाही अंमलाखाली होते आणि आदिलशाहीत 'अमीन' नावाचे पद नव्हते.
३) रोहिरेश्वर नावाचे देवस्थान किंवा ठिकाण रोहिडखोऱ्यात सध्या नाही आणि पूर्वी कधी असल्याचा पुरावाही नाही.
४) पत्रात शेंड्रीचा म्हणजे सह्याद्रीचा उल्लेख आहे पण इसवी सनाच्या सतराव्या शतकातील मराठी कागदपत्रांमध्ये सह्याद्री हे नाव वापरल्याचे आढळत नाही. त्याऐवजी घाट किंवा घाटमाथा असा मोघम मराठी उल्लेख मराठी कागदपत्रांमध्ये केला जाई.
५) रोहिरेश्वर येथे जर शिवाजी महाराज, दादाजी नरसप्रभू इत्यादींचा शपथेचा कार्यक्रम झाला असेल तर या पत्रात तो रोहिरेश्वर 'दादाजींच्या खोऱ्यातला आदि कुलदेव आहे, डोंगरमाथ्यावर आहे, सह्याद्रीलगत आहे आणि स्वयंभू आहे' हे सर्व वर्णन करण्याची आवश्यकताच नव्हती. रोहिरेश्वर कुठे आहे आणि कसा आहे ते दादाजींना ठाऊक असलेच पाहिजे. तेव्हा रोहिरेश्वराने आम्हांस यश दिले एवढे म्हटले असते तरी पुरेसे होते. म्हणून या पत्रात रोहिरेश्वराचे वर्णन येणे स्वाभाविक वाटत नाही, कृत्रिम वाटते.
६) या पत्रात 'हिंदवी स्वराज्य' असे शब्द आले आहेत. हिंदवी (किंवा हिंदुवी, हिंदूवी) हे शब्द हिंदू शब्दापासून फार्सी पद्धतीने बनलेले विशेषण आहे. हिंदवी हा शब्द एतद्देशीयांची भाषा असा अर्थाने इसवी सनाच्या सतराव्या शतकातील मराठी व फार्सी कागदपत्रांमध्ये आढळतो पण हिंदूंचे राज्य किंवा एतद्देशीयांचे राज्य किंवा मराठ्यांचे राज्य असा अर्थ व्यक्त करण्याकरिता राज्य या शब्दाला हिंदवी असे विशेषण लावल्याचे त्या काळातील मराठी कागदपत्रांमध्ये आढळत नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याला हिंदवी स्वराज्य असे म्हटले असते तर त्यापुढेही मराठ्यांच्या राज्याचा उल्लेख करताना मराठी कागदपत्रांमध्ये ती संज्ञा अवश्य वापरली गेली असती पण मराठी कागदपत्रांमध्ये मराठ्यांच्या राज्याचा उल्लेख महाराष्ट्र राज्य, स्वराज्य किंवा देवाब्राह्मणांचे राज्य असा येतो, हिंदवी स्वराज्य असा कधीही येत नाही.
७) या पत्रातील भाषेची धाटणी शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या भाषेच्या धाटणीपेक्षा वेगळी आहे. उदाहरणार्थ - या पत्रात "वगैरे कितेकबहुतेक लिहिले" आणि "लेकराचे लेकरी वतन वगैरे चालवण्याविसी कमतर करणार नाही" या वक्यांमध्ये 'वगैरे' शब्दाचा जसा उपयोग केला आहे तसा शिवाजी महाराजांच्या पत्रांत केलेला आढळत नाही.
वरील सर्व आक्षेप विचारात घेतल्यास हे पत्र बनावट आहे आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरला घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेला 'मिथ्या' असंच म्हणावे लागेल.
बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.
🚩🚩
🚩 वरील पत्रात कुळकर्णी आणि देशपांडे असा उल्लेख आला आहे. कुळकर्णी आणि देशपांडे हे ज्या वतनसंस्थेत असत त्याविषयी थोडेसे...
🚩 वतनसंस्था -
गावाकरिता किंवा देशासाठी करीत असलेल्या कर्तव्यबद्दल त्या व्यक्तीच्या उपजीविकेकरिता, मानमरातब राखण्यासाठी आणि जनतेचे दिलेले व वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन. यात चाकरी, वृत्ती, अधिकार, हक्क, नेमणूक यांचा अंतर्भाव होतो व हे हक्क आणि तदानुषंगिक कर्तव्ये उपभोगण्याची राजमान्य आणि लोकमान्य पद्धत म्हणजे वतनसंस्था होय. ‘वतन’ या संज्ञेच्या व्युत्पत्तीसंबंधी भिन्न मत-मतांतरे आहेत. काही विद्वानांच्या मते हा शब्द ‘वर्तन’ या संस्कृत शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ उपजीविकेचे शाश्वत साधन किंवा उदरनिर्वाह वा वेतन असा आहे तर काही विद्वान तो अरबी शब्द असून वतन् म्हणजे जन्मभूमी−घर असा अर्थ देतात. उत्पन्नाची शाश्वती ही वतनदार पद्धतीतील मूलभूत कल्पना आहे. वंशपरंपरेने काम करण्याचा हक्क असणारा, वतन धारण करणारा गावकरी, मग तो कोणत्याही धंद्यावर पोट भरो, वतनदार ही सामान्य संज्ञा आहे.
ग्रामसंस्थांचा कारभार नीटपणे चालावा म्हणून प्राचीन काळ राज्यकर्त्यांनी या वतनसंस्थेस मान्यता दिली आणि मग राजेही आपल्या मर्जीतील व्यक्तींना, विशेषतः नात्यागोत्यांतील इसमांना, गावे इनाम देऊ लागले. जे आपल्या हुषारीने किंवा पराक्रमाने, राज्य मिळविण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी राजांना मदत करीत. त्यांना अशी इनामे कायमची मिळू लागली. शासनव्यवस्थेत उच्च अधिकारपदांसाठीही अशी जमीन तोडून देण्याची प्रथा सुरू झाली. राजे किंवा सरदार हे देवालयांच्या योगक्षेमासाठीही जमीनी व गावे इनाम देऊ लागले. अग्रहार देण्याची प्रथा जुनीच होती, ती चालू होतीच. अशा प्रकारे वतनदारी ही पद्धती राजमान्य व धर्ममान्य ठरली.
वतनदारीचे दोन प्रमुख प्रकार आढळतात : एक, राजाला हवी असेल तेव्हा लष्करी किंवा इतर मदत देण्याच्या अटीवर जी वतने दिली जातात, ती सरंजामशाही वतने आणि दोन, गावकामगारांना गावकीकडून (गावसभा) ग्रामव्यवस्थेच्या विशिष्ट कामासाठी मिळतात ती वतने. यांशिवाय बलुतेदार म्हणजे निरनिराळे कारागीर-कामगार, गावासाठी जी विशिष्ट सेवा करीत, त्याबद्दल त्यांना मेहनतान्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून कायमस्वरूपी ठराविक धान्य मिळत असे.
वतनसंस्था भारतातील सामाजिक व्यवस्थेत निश्चितपणे केव्हा प्रविष्ट झाली, याबद्दल विद्वानांत एकमत नाही. काहींच्या मते ती इसवी सनाच्या प्रारंभापासून अंशतः अस्तित्वात असावी व पुढे मध्ययुगात संरजामशाहीच्या विकासाबरोबर अधिक दृढतर झाली तर काही विद्वान असे मानतात की महाराष्ट्र−कर्नाटकात चालुक्य−राष्ट्रकूट काळात (६०६−९७५) ग्रामव्यवस्थेत महत्तर (वयस्कर पुढारी) आणि व्यापारी श्रेणींचे प्रतिनिधी यांचे महत्त्व असे. ग्रामसंस्थेतील कारभारात काही अधिकारपदे काही कुळांकडे वंशपरंपरेने दिली जात आणि त्या कुळांना काही जमीन कायमची इनाम देण्याची प्रथा असे. त्यामुळे त्या त्या कुळातील अधिकारी आपापली कामे दक्षतेने करीत असत. यादवकाळापूर्वी ही संस्था व्यवस्थित कार्यरत असल्याचे दाखले शिलालेखांतून आणि ताम्रपटांतून मिळतात. यादवकाळात (९८०−१३१८) वतनदारी पद्धत पूर्णतः प्रस्थापित झालेली दिसते. ग्रामव्यवस्थेत पाटील हा सर्वांत मोठा वतनदार आढळतो. तसा देशमुख किंवा देशग्रामकूट होय. पाटील हा जसा गावचा राजा, तसा देशमुख हा आपल्या हाताखालच्या प्रदेशाचा नायक असे. वतनाच्या अधिकाराचे महत्त्व मोठे असले, तरी कर्तव्यपालनाची इच्छा त्यापेक्षा अधिक असे. वतनदार हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकांच्या हितासाठी झटणारे असल्यामुळे लोक त्यांना मान देत. वतनदारांनीही आपल्या वतनाचा व आपल्या अधिकाराचा मोठा अभिमान वाटे. ग्रामसंस्था ही प्रत्येक गावात असे आणि तिचा कारभार ग्रामपंचायत नावाची सभा करीत असे. पुढे मात्र ही व्यवस्था थोडी बदलली आणि ग्रामीण भागात देशकसत्ता आली. देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून ‘देशक’ म्हणत. गावाच्या कारभारासाठी ज्या सभा भरत, त्यांत बारा बलुतेदार, शेतकरीस जोशी या सर्व जानपदस्थ लोकांचा समावेश असे. यांतील सर्वजण वजनदार असत. त्यामुळे राजसत्त बदलली, तर अधिकारी बदलत पण लोकव्यवहाराचा कणा बनलेली वतनदार मंडळी कायम असत. म्हणून यादवांच्या सीमाभागात परमार, शिलाहार, काकतीय इ. वंशांतील राजांनी अधूनमधून हस्तक्षेप केला किंवा यादवांना प्रसंगोपात काही प्रदेश सोडावा लागला तरी स्थानिक कारभारात त्यामुळे विशेष गोंधळ झालेला दिसत नाही. त्या काळी देशवहीत सर्व घटनांची नोंद करण्याची पद्धत होती व वतनी अधिकाऱ्यांनी ती अप्रतिहत चालू ठेवली होती. यादवांच्या नंतर मुसलमानी अंमल (१२१८ ते १७०७) आला. दक्षिण हिंदुस्थानात मध्ययुगात बहमनी सत्ता (१३४७ ते १५३८) व पुढे तिचे पाच शाह्यांत−आदिलशाही, कुत्बशाही, बरीदशाही, निजामशाही व इमादशाही−विभाजन झाले पण वतन संस्थेत लक्षणीय बदल झाले नाहीत कारण राजसत्ता बदलली, तरी स्थानिक कारबारात विशेष फरक पडला नाही. फक्त राजनिष्ठेत फरक झालेला दिसतो. मुसलमानांनी ही सर्व वतने चालू ठेवलेली दिसतात.
मराठेशाहीत या वतनसंस्थेत आमूलाग्र बदल झाला नाही, तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी देशमुख−देशपांडे यांची प्रसंगोपात वतने जप्त करून वेतनपद्धती आणण्याचा प्रयत्न केला आणि वसूल गोळा करण्यासाठी त्यांनी देशमुख−देशपांडे या जुन्या वतनदारांवर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे पगारी अधिकारी नेमले. त्यामुळे वचनदारांच्या चढेलपणास पायबंद बसला. शक्यतो नवीन वतने न देण्याचे तत्त्व त्यांनी पाळले तथापि सर्वच जुनी वतने त्यांनी काढून घेतली असे नव्हे फक्त त्यांवर काही निर्बंध लादले. शिवकाळात वतनसंस्थेची स्थिती थोडी वेगळी होती. अनेक वतनदार देशमुख स्वराज्यनिष्ठ होते तर काही शत्रूला सामील होते. रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात शत्रूशी संधान बांधण्याऱ्या वतनदारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचा उद्योग आरंभताच, असे काही मुस्लिम स्वामीनिष्ठ वतनदार त्यांच्या विरूद्ध गेले होते.
त्यावेळी राजसत्तेच्या खालोखाल देशकसत्ता म्हणजे देशमुख, कुळकर्णी, देशकुळकर्णी, पाटील, बलुतेदार इ. वतनदारांची लहानमोठे अधिकार असलेली उतरंड होती. हीतच प्रमुख गावकरी रयतेचा अंतर्भाव होतो. देशकसंस्थेला वतन म्हणत आणि गोत म्हणजे ग्रामसंस्था. त्यालाही वतन म्हणत. ह्या ग्रामसंस्थेला फार महत्त्व होते. गावातील वतनाचे भांडण-तंटे ग्रामसंस्थेमार्फत निकालात काढण्याचा प्रघात होता. त्यावेळी महाराष्ट्रात कडेकपारी अनेक खेडी होती. त्यांपैकी प्रत्येक गाव बव्हंशी स्वयंपूर्ण होते. गावात शेतीखेरीज कारागिरी करणाऱ्यास बलुते अशी संज्ञा असे. त्यास पोटाकरिता जमिनीच्या उत्पन्नानुसार धान्यादी वस्तू मिळत व जमीन इनाम मिळे.
शिवकालीन ग्रामसंस्था कुटुंबतत्त्वावर आधारित होती. वतनदार कुळकर्णी हा गावचा मिरासदार असे. कुळकर्ण्याचा निर्वंश झाल्यास त्याच्या जागी दुसरा कुळकर्णी वंशपरंपरेने नेमण्याचा हक्क ग्रांमस्थांना असे. तत्पूर्वी ग्रामस्थ तात्पुरता मुतालिक नेमून नव्या कुळकर्ण्याचा शोध घेत. ग्रामस्थांनी अशी वतने बहाल केली, तरी त्यांवर परण्याच्या देशमुखांचे शिक्के व देशपांड्यांचे दस्तक असावे लागत. एकदा वतन दिल्यानंतर त्याला कोणी हरकत घेतली, तर सारा गाव वतनदाराची पाठ राखीत असे. कुळकर्ण्याप्रमाणे पाटीलसुद्धा मिरासदार होता. पाटील मृत्यू पावला त्याचा खून झाला, तर त्याच्या बायकोच्या आणि अज्ञान मुलाच्या हातून ग्रामस्थ कारभार चालविण्यास मदत करीत. शिवकालीन समाजात वतनासक्ती जबरदस्त होती व वतनासंबंधी भांडणे पिढीजात चालू राहत परंतु वतनाच्या भांडणात राजसत्ता अखेरचा निकाल ग्रामसभांवर सोपवी. राजाकडून फिर्यादीस मुळातच हुकूम असे की, ‘हे मिराशीचे काम आहे, तरी उभयता वादी गोतामध्ये जाऊन कागद रूजू करून निवाडा करून घेणे.’ गोतदेशकसभेत त्या मंडळींनी खऱ्या साक्षी द्याव्या, अशी त्यांना शपथ घालण्यात येई. शिवाजी महराजांनी खोटी साक्ष देणाऱ्याची जीभ कापण्याचा हुकूम दिला होता.
शिवाजी महाराजांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी हे धोरण सोडले आणि सरंजामशाहीला प्रारंभ झाला. शाहू छत्रपतींच्या (१७०७ - १७४९) वेळी एखाद्या सरदाराने नवीन प्रदेश जिंकून घेतला, की त्यालाच तो जहागीर म्हणून देण्याची प्रथा पडली. त्यांमुळे पुढे पेशवाईत मराठी साम्राज्याचा विस्तार होऊनही या सरंजामशाहीमुळे एकसूत्री राज्य राहिले नाही आणि स्वतंत्र संस्थाने उद्यास आली. पुढे ब्रिटिशांनी हिंदुस्थान पादाक्रांत केल्यानंतर अव्वल इंग्रजी अंमलात ही संस्थाने कायम ठेवली. ग्रामसंस्थेतील पाटील, कुळकर्णी, महार ही वतने तशीच चालू ठेवली पण देशमुख−देशपांडे यांची सरंजामी वतने नष्ट केली. पुढे स्वातंत्र्योत्तर भारतात संस्थानांच्या विलीनीकरणाबरोबर सर्व वतनेसुद्ध संपुष्टात आली.
कुळकर्णी, देशमुख-देशपांडे व देसाई यांच्या वतनांसंबंधी त्यांचे हक्क व कर्तव्ये मानमरातब आणि उपजीविकेची साधने इत्यादीची माहिती पुढे दिली आहे.
🚩 कुळकर्णी - प्राचीन ग्रामसंस्थेचील एक अधिकारी व वतनदार. त्याला मिळालेल्या वतनाला ‘लिखनवृत्ती’ म्हणत असत. हे वतन सुमारे एक हजार वर्षांचे जुने असावे असे मानतात. गावातील एकूण जमिनीचा पंचविसावा हिस्सा पाटील, कुळकर्णी व चौगुला यांना इनाम देण्याची वहिवाट होती. यांना जमिनीवर शेतसारा नसे. गाव-पाटलाचा लेखक-मदतनीस या नात्याने गावाच्या वसुलाचा हिशोब ठेवण्याचे काम कुळकर्ण्याकडे असे. किल + करण या सामाजिक शब्दावरून कुळकर्णी हा शब्द वनला असून कुळ म्हणजे जमिनीचा भाग वा शेतकरी व करण म्हणजे लिखनवृत्ती होय. कुळवार हिशोब लिहिणारा तो कुळकर्णी, असेही त्याचे व्यवसायानुरूप वतननाम बनले असावे. याला स्थलपरत्त्वे ‘पटवारी’ अथवा ‘पांड्या’ म्हणतात. बहुधा कुळकर्णी ब्राह्मण असत परंतु प्रभु, मराठे, लिंगायत व मुसलमान या ज्ञातीतही कुळकर्णी वतनदार आढळतात. शिवकालात यांना दोन चवाळी, जोडा, मुंडासे, धोतरजोडी, रूमाल, पासोडी वगैरे हक्कबाबी असत. यांशिवाय गावातील धंदेवाल्यांकडून तेल, पाने, सुपारी, गूळ, केळी इ. मुशाहिरा मिळे. गावाचे दप्तर, शिवाराचे कमाल क्षेत्र, आकार व वर्णन ह्यांचा आकारबंद, शेतवारपत्रक, लावणीपत्रक, पडपत्रक, वसुलीबाकीपत्रक, त्याची फाळणी व जमाखर्च, गुरे-माणसांची गणती वगैरे लेखी कामे तो करी. त्याचा सामाजिक दर्जा चांगला असे. स्वातंत्र्योत्तर काळात ही वतने जाऊन त्याजागी तलाठ्यांची शासनाने नियुक्ती केली.
🚩 देशमुख-देशपांडे व देसाई - हे उच्चश्रेणीतील परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. देशमुखी म्हणजे लष्करी व फौजदारी अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी, तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख-देशपांडे यांनी अमूक एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत. कर्नाटकात देशमुख-देशपांडे यांनाच अनुक्रमे ‘नाडगावुडा’ आणि ‘नाडकर्णी’ म्हणत. हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. शिवाजीनी देशमुख−देशपांडे वतनदारांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले.
देशमुख−देशपांडे यांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. त्यास ‘रूसूम’ म्हणत. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. पाटील−कुळकर्ण्यांप्रमाणेच परागण्याच्या पंचायतीत त्यांना हक्कबाबी असत. भेट, तोरण, घट, जोडा, पासोडी, तूप, तेल वगैरे वस्तू बलुत्याप्रमाणेच त्यांनाही अधिक प्रमाणात मिळत असत. परागण्याच्या जमाबंदीचे सर्व दप्तर देशपांड्यांच्या ताब्यात असे. त्यांच्या हाताखाली ‘मोहरीर’ नावाचा एक कारकून हे काम पाही. निरनिराळ्या वहिवाटदारांचे, वतनदारीचे हक्क व जमिनीची प्रतवारी, तिचे वर्णन इत्यादी बारीकसारीक बाबींची नोंद या हिशोबात केलेली असे. देशपांडे विविध गावांच्या कुळकर्ण्यांनी पाठविलेले सर्व हिशोब संकलित करून सर्व परगण्यांचा ताळेबंद तयार करीत असे. कोकणात व कर्नाटकात हे काम देसाई हे वतनदार करीत. कोकणातील प्रभुपणाचा हुद्दाही देसायांच्याच जोडीचा असे. काही वेळा प्रभुदेसाई असा वतन-हुद्याचा उच्चार करीत. देशपांडे-देसाई हे देशमुखाच्या हाताखालील वतनदार असत. काही ठिकाणी देशपांड्यासच देशकुलकर्णी असेही म्हटले आहे. मुसलमानी अंमलात वतनाच्या घालमेली झाल्या. त्यावेळी मराठे पाटील व मराठे देशमुख हे बरेचसे स्थानभ्रष्ट होऊन त्यांच्या जागी ब्राम्हण देशमुख आले. वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख−देशपांडे, परगणे−नाईक क्वचित काही ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात. अव्वल ब्रिटिश अंमलात देशमुख−देशपांडे यांचे वतनदारी अधिकार कमी करण्यात आले मात्र त्यांचा रूसूम चालू होता.
लेखनसीमा ॥
🚩 पत्र संदर्भ - शिवकालीन पत्र-सार-संग्रह खंड पहिला, पत्र क्र. ५०४.
🚩 फोटो - गुगल
🚩 लेख खालील ग्रंथांतून साभार -
१) 'स्वराज्याची शपथ'- श्री राजा शिवछत्रपती - गजानन भास्कर मेहेंदळे
२) 'वतनसंस्था' - मराठी विश्वकोश
🚩🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा