"निसणी ऊर्फ शिवाजी शिडी आणि फेपट्याची वाट"
परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी खरंतर सीमोल्लंघन करायला हवं पण सध्याच्या दिवसांत ते काहीसं कठीण झालंय त्यामुळं निदान दसरा झाल्यानंतर तरी लगेचच कुठेतरी ट्रेकला जाण्याचा माझा पहिला प्रयत्न असतो. मी संधी शोधत होतोच तेवढयात झुक्याने फेसबुकवर नेताजी भंडारेसोबत केलेल्या 'धोदाणे - हाशाची पट्टी - सनसेट पॉईंट - धोदाणे या २०१५ साली केलेल्या ट्रेकची आठवण करून दिली. त्यातून आमच्या फाल्कन्सच्या नुकत्याच झालेल्या खंडेनवमीच्या कार्यक्रमात सोबत्यांसोबत कुठेतरी एक दिवसासाठी ट्रेकला जाऊया म्हणून थोड्या गप्पा पण झाल्या होत्या. या कार्यक्रमामुळं ट्रेकला जाण्यासाठीचं वातावरण नुसतंच तयार झालेलं नव्हतं तर चांगलंच तापलेलं होतं. आता नेमकी वेळ साधून त्यावर घाव घालायला पाहिजे होता. तसं नेताजी भंडारेशी त्या माथेरानच्या ट्रेकबद्दल बोलल्यावर त्याने पण ही कल्पना उचलून धरली आणि आमचं माथेरानलाच जाण्याचं नक्की झालं.
हा नेताजी आणि त्याची पत्नी माधुरी दोघेही फाल्कन्सच. त्यामुळं ग्रूपवर मेसेज पडला की ट्रेकला दोघांपैकी कुणी जायचं यावरून त्यांची घरी खडाजंगी होते. अर्थात बहुतेक वेळी माधुरीलाच संधी मिळते हे काही वेगळं सांगायला नको त्यामुळं निदान यावेळी या प्रकाराला फाटा देण्यासाठी नेताजीलाच ट्रेक लिडर करून टाकलं होतं. नेताजीने या संदर्भात फाल्कन्सच्या whatsapp ग्रूपवर मेसेज टाकला आणि एका झटक्यात पाच जण तयार झाले म्हणजे आम्हाला आता एक कार घेऊन जाता येणार होतं. तेवढयात ग्रूपवरच्या रविंद्र मनकरांचा ट्रेकसाठी फोन आला आणि आम्ही सहा जण झालो. सहा जणांसाठी दोन कार नेणं तसं खिशाला परवडणारं नव्हतं म्हणून मग पहिल्या पाचातल्या शिवाजी शिंदेंनी थोडी फोनाफोनी केली आणि आणखी चारजण तयार केले. आता आम्ही दहाजण दोन कारमधून जाऊ शकत होतो त्यामुळं साहजिकच खिशालाही ते परवडणारं होतं. पुढच्या एकदोन दिवसांत ट्रेकचं सगळं प्लॅनिंगही दोघांनी मिळून करून टाकलं.
माथेरानवर चढून जाणाऱ्या ज्ञात वाटांपैकी आत्तापर्यंत माझ्या सहा वाटा करून झाल्या होत्या पण अगदी सुरवातीच्या काळात 'निसणी ऊर्फ शिवाजी शिडी आणि फेपट्याची वाट' या दोन वाटा केल्यामुळं या वाटांच्या खाणाखुणांच्या आठवणी काहीशा धुसर झाल्या होत्या त्यामुळं ट्रेकसाठी माथेरानच्या याच दोन दोन वाटा करायच्या ठरवल्या होत्या. दिवसही जवळचाच ठरला तो म्हणजे खंडेनवमीच्या कार्यक्रमानंतर लगेचच पंधरा दिवसांनी रविवार २३ आॕक्टोबरचा.
सकाळी बरोबर पाच वाजता चिंचवड सोडलं आणि देहुरोड सेंट्रलपाशी एकत्र जमलो. थंडी मी म्हणत होती त्यामुळं बसस्टॉपमागच्या टपरीवर फक्कडसा चहा मारला. चहा पितापिता सोबत्यांना ट्रेकचं वेळापत्रक समजावलं आणि थेट चौक फाट्यावरच्या हॉटेल पुर्वामधे नाश्त्यालाच थांबलो.
नाश्ता करून कर्जत रस्त्यावरच्या बोरगाव फाट्याला आलो तर बोरगाव फाट्यावरून ट्रेक सुरू करण्याच्या आंबेवाडीत जाण्याचा रस्ता काम चालू असल्यामुळं बंद असल्याचं कळलं म्हणून थोडं कर्जतच्या दिशेने पुढं जाऊन वावर्ले फाट्यावरून वळून बरोबर ०८.१० वाजता आंबेवाडी गाठली.
आंबेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर गाड्या पार्क केल्या, पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि बरोबर ०८.३० वाजता ट्रेकला सुरूवात केली.
आम्ही ज्या पहिल्या वाटेने माथेरान गाठणार होतो ती निसणी ऊर्फ शिवाजी शिडीची वाट खरंतर उंबरणेवाडीकरांची. आम्हाला उंबरणेवाडीत जाऊन माथेरान गाठणं त्या मानानं सोपं झालं असतं पण पावसाळ्यात चौक रेल्वेस्टेशनपासून उंबरणेवाडीत येणारा कच्चा रस्ता प्रबळगडावरून मोरबे धरणाला मिळणाऱ्या ओढ्यांमुळं आणि वाटेतल्या चिखलामुळं बंद होतो. साहजिकच पावसाळ्यानंतर पुढचे दोनचार महिने तरी उंबरणेवाडीकरांना बाजारासाठी चालत आंबेवाडी किंवा थेट माथेरान गाठावं लागतं. आम्हाला आमचा ट्रेक आंबेवाडीत संपवायचा असल्यामुळं आम्हालाही आंबेवाडीतून ट्रेक सुरू करून आंबेवाडीतच संपवणं सोईस्कर होणार होतं. उंबरणेवाडीकरांचा रोजचा राबता असल्यामुळं वाट चांगली मळलेली होती. आंबेवाडी काहीशी उंचावर आहे तर उंबरणेवाडी मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असल्यामुळं थोडी खालच्या बाजूला आहे. आंबेबाडीतून उंबरणेवाडीत जाणारी वाट पदरातून जात होती. उजवीकडे उंचावर माथेरानचा वन ट्री हिल पॉईंट तर डाव्या बाजूला खाली मोरबे धरणाचं पाणी दिसत होतं.
उंबरणेवाडीला निघालेली वाट माथेरानच्या कड्यावरून कोसळणारे असंख्य ओढे ओलांडत जात होती. सुर्यराव डोक्यावर चढू लागल्यामुळं कोकणातला उष्मा चांगलाच जाणवू लागला होता पण वाट सदाहरीत अरण्यातून होती त्यामूळं चालणं काहीसं सुसह्य होत होतं. दुसरं असं की ती वाट सपाटीवरून जात होती आणि तिसरं म्हणजे ओढेही अधनंमधनं साथीला असल्यामुळं फारसा थकवा जाणवत नव्हता. या वाटेने आडवं जात डावीकडे जशी वाट उंबरणेवाडीकडे उतरू लागली तसा वस्पटीतून उजवीकडे एक शाँर्टकट मारून निसणी ऊर्फ शिडी घाटाच्या मुख्य वाटेवर आलो.
इथुन पुढचा चढ मात्र भयानकच होता. दर पाचदहा मिनिटांनी दम घ्यायला थांबावं लागत होतं. मजल दरमजल करीत कसेबसे पहिल्या लाकडी निसणीपाशी पोहोचलो.
निसण पार करून पुढे लोखंडी शिडीकडे जात असताना वाटेत उंबरणेवाडीच्या वरच्या वाडीत राहणारा 'गजानन उघडे' भेटला. पोटाची खळगी भरण्यासाठी उंबरणेवाडीतले हे कातकरी ऊनपावसात या अशा अवघड रस्त्यावरून पाचशे रूपयांसांठी दररोज चारपाच तासांची पायपीट करतात. माथेरानवर आल्यानंतर सुध्दा त्यांना काम मिळेलच याची शाश्वती नसते. माथेरानवर मुद्दामच फाडलेल्या तुटपुंज्या कपड्यातील पैसा उधळणारे पर्यटक आणि पैसा नसल्याने फाटके कपडे घालणारे, रस्त्यात भेटल्यावर 'जपुन जा' सांगणारे कातकरी यांच्यातील विरोधाभास फारच जिव्हारी लागला आणि आपण शहरातील लोक कित्येक पटींनी सुखी आहोत याची जाणीव झाली पण हळहळ व्यक्त करण्याखेरीज मी काहीच करु शकत नव्हतो.
शिडीपासून पाठीमागच्या बाजूला माणिकगड, इर्शाळगड, कर्नाळा, प्रबळगड आणि कलावंतीण तर डाव्या बाजूला माथेरानचा लुईझा पॉईंट खूपच सुंदर दिसत दिसत होता. उजव्या बाजूला वन ट्री हिल पॉईंटचा डोंगर खुणावत होता.
पहिली शिडी चढुन वर गेल्यावर अतिशय चिंचोळी ट्रँव्हर्सी लागली. मधेच पिसारनाथांचे मूळ गुहेतल्या मंदिराचे दर्शन घेऊन थोडा आराम केला.
मंदिरापासून पुढं निघालो आणि पुढच्या नाळेतल्या शिडीपाशी आलो. ही नाळेतली निसरडी वाट आता आम्हाला माथ्यावरच्या रानात म्हणजेच माथेरानात घेऊन जाणार होती. मागल्यावेळी आलो होतो तेव्हा इथे लाकडी शिडी होती ती जाऊन आता त्याची जागा लोखंडी शिडीने घेतली होती. आणखी एक बदल जाणवला तो म्हणजे नाळेत वरपर्यंत एकूण तीन शिड्या लावल्या होत्या आणि त्या एका लोखंडी जाड तारेने थेट माथ्यावरच्या झाडाला जोडलेल्या होत्या. हे सर्व केल्यामुळं एक मात्र झालंय की उंबरणेवाडीकरांना ही कमी अंतराची वाट भर पावसातही वापरता येऊ लागली आहे.
अखेरीस माथेरानच्या पठारावरचं प्रशस्त पिसारनाथ मंदिर गाठलं. माथेरानवाले याला 'डेंजर पाथ' का म्हणतात ते बाकी या वाटेने आल्यावरच कळतं. दुपारचा एक वाजला होता म्हणजे आम्हाला आंबेवाडीतून निघाल्यापासून पिसारनाथ मंदिर गाठायला तब्बल साडेचार तास लागले होते. जेवणाची वेळ झाली होतीच. घरून आणलेल्या शिदोऱ्या सोडल्या आणि जेवण करून घेतलं.
जेवल्यानंतर हक्काची थोडी वामकुक्षी पण घेतली आणि बाजूच्याच हॉटेलात चहा पण घेतला. मंदिराच्या बाजूलाच असलेल्या लॉर्ड पॉईंट आणि Charlotte lake वरच्या गुलहौशी मोहास बळी न पडता तडक वन ट्रि हिल पाँईंटकडे निघालो. पॉईंटकडे जाणारी ही कच्च्या रस्त्यावरची वाट निबीड अरण्यातून जात होती.
एकमेकांशी गप्पा मारतामारता वन ट्री हिल पॉईंट केव्हा आला ते कळलंच नाही. पॉईंटच्या टोकावरून उतरायला सुरूवात केली तर समोरच्या खिंडीतून नुकतीच चढून आलेली भयानक चढाची शिडीची वाट दिसली. वाटेमागच्या खोगिरामागे पनवेल शहर दिसत होतं.
खिंडीतून समोरच्या वन ट्रीच्या टेकडीवर रॉक क्यायंबिंग करत जाणारा अवघड मार्ग सोबत्यांना समजावून दिला. यावेळी सोबत रोप आणला नसल्यामुळं वन ट्री हिलवर काही जाता आलं नाही. आता आमची वाट नाळेतून उतरू लागली आणि काही वेळानं एका गवताळ पठारावर आली. तिथून मोठ्या चौक पॉईंटचं टोक दिसत होतं.
आता बाकी प्रत्येकालाच घरचे वेध लागायला लागले होते त्यामुळं कुठही न थांबता वन ट्री हिल पॉईंटवरून शेवटच्या निसरड्या धारेवरून दिड तासात एकदाची आंबेवाडी गाठली. आंबेवाडीतून माथेरानकडे डोळे भरून पहात चिंचवडकडं प्रस्थान ठेवलं ते पुन्हा दोन नवीन वाटा करण्यासाठीच...
समाप्त.
🚩 ट्रेकच्या मार्गाचा व्हिडीओ खाली लाल रंगात दिलेल्या ट्रेकच्या नावाच्या धाग्यावरून पाहता येईल.
👉 आंबेवाडी - शिडीची वाट - माथेरान - फेपट्याची वाट - आंबेवाडी
🚩 ट्रेकभीडू
१) नेताजी भंडारे
२) विनायक गाताडे
३) दिलीप वाटवे
४) शिवाजी शिंदे
५) संदीप बेडकुते
६) श्रीकांत मापारी
७) रविंद्र मनकर
८) आशुतोष गुळवेकर
९) नाना नलावडे
१०) मधुकर थोरात