शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

फाल्कन्सची खंडेनवमी अर्थात शस्त्रपुजन - २०२२

 'फाल्कन ट्रेकर्सचा २०२२ चा खंडेनवमी उत्सव उत्साहात साजरा...'

 

 

       अश्विन शुद्ध नवमी म्हणजेच खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रपुजन करतात. पण असं का करतात बरं? तर यामागं खरंतर पौराणिक संदर्भ आहेत.

       पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणं देवीने महिषासूर नावाच्या असूराशी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे सलग नऊ दिवस, नऊ रात्र युद्ध करून त्याचा वध केला आणि तेव्हापासून देवीला 'महिषासूरमर्दीनी' या नावानं ओळखलं जाऊ लागलं. या युद्धाच्या अखेरीस म्हणजे नवव्या दिवशी वध केल्यानंतरच देवीने तिचं शस्त्र खाली ठेवलं त्यामुळं नवव्या दिवशी म्हणजेच खंडेनवमीला शस्त्रपूजनाची प्रथा आहे. त्यामुळं खंडेनवमीच्या दिवशी प्रत्येकजण तो वापरत असलेल्या आयुधांची पूजा करत असतो.

       ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही बारा बलुतेदारापासून ते सैनिकांपर्यंत प्रत्येकजण खंडेनवमीच्या दिवशी उत्साहात आणि जल्लोषात आपापल्या आयुधांची आणि शस्रांची पुजा करत असतो. अलीकडच्या काळात शस्त्रास्त्रांची व्याख्या काहीशी बदलली आहे हे खरंय पण असं असलं तरीसुद्धा अगदी शहरात रहात असलेल्या आणि लढाऊ परंपरा असणाऱ्या घराण्यांमधे आजही विधिवत आणि अगदी शास्त्रशुद्ध पध्दतीनं शस्त्रपूजन केलं जातं. या दिवशी शिल्पकार, सुतार, कारागीर वगैरे मंडळी आपापल्या उपकरणांचं मनापासून पूजन करतात. शेतक-यांकडे पूर्वी नांगराचं पूजन केलं जात असे. आता या नांगरांऐवजी ट्रॅक्टर आलेत तरीही परंपरागत खंडेनवमीची नांगर पूजनाची प्रथा आजही प्रयत्नपूर्वक पाळली जाताना दिसून येते. काळ बदलला, साधनं बदलली तरीपण आपण आपल्या प्रथा आवर्जून पाळायलाच हव्यात नाही का?

       अशा पारंपारिक प्रथा सगळेजण पाळत असताना मग आपण समस्त ट्रेकर्स मंडळी तरी मागं कसं असू? डोंगरयात्रा करताना आपल्याही बऱ्याच ठिकाणी खडतर वाटांवर सुरक्षासाधनांचा वापर करावा लागतोच की! हो ही साधनं थोडी वेगळी असतील खरी पण खरंतर त्याक्षणी आपली संपूर्ण सुरक्षितता केवळ अशा साधनांवरच तर अवलंबून असते. म्हणूनच डोंगरयात्रा करताना वापरत असलेल्या अशा साधनांच्या प्रती आपण ट्रेकर्स मंडळींनी कायमच ऋणी असायला हवं आणि या ऋणाची अगदी अंशतः का होईना परतफेडही आपण ट्रेकर्स मंडळींनी करायला हवी. याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणं यावर्षी देखील आम्ही 'फाल्कन्स' नी त्यांची सहकुटूंब पूजा करून खंडेनवमी उत्साहात साजरी केली. खरंतर यावर्षी मंगळवारी ०४ ऑक्टोबरला खंडेनवमी होती पण आम्हा बहुतेक फाल्कन्सना रविवारी सुट्टी असल्यामुळं आम्ही लगेचच ती पुढच्या शनिवारी आणि रविवारी अशी दोन दिवस साजरी करायचं ठरवलं होतं. अर्थात त्यालाही एक कारण होतंच.

       फाल्कन्सचे बहुतेक सभासद चिंचवडला रहायला आहेत त्यामुळे सर्वांच्या सोयीनुसार आत्तापर्यंत दरवर्षी ही पूजा चिंचवडलाच होत असे. पण गेल्यावर्षी पुणेकर मंडळींनी पुढे येऊन 'हा उत्सव आम्हाला पुण्यात करायचाय' म्हटल्यामुळं तो पुण्यात घ्यायचं आम्ही सर्वानुमते ठरवलं होतं. यावर्षी मात्र आम्ही फाल्कन्सनी हिमालयातली आमची 'श्री खंड महादेव (१८५७० फूट)' ही पहिली अत्युच्च्य शिखरावरची मोहीम (High Altitude Trekking Programme म्हणजेच HATP) यशस्वीपणे पार पाडली होती त्यामुळं यावर्षीचा कार्यक्रम आम्हा सर्वांनाच थोडा हटके करायचा होता. काय करता येईल, कसं करायचं वगैरेवर आमच्या फाल्कन्सच्या कोअर टिममधे चर्चा सुरू होती. शेवटी खंडेनवमीच्या कार्यक्रमासोबतच अनायसे कार्यक्रमाच्या दिवशीच आलेली कोजागिरी पोर्णिमा, family get-together आणि HATP चा स्मरणचिन्ह वितरण सोहळा असा एकत्रित कार्यक्रम करण्यावर आमचं सर्वांचं एकमत झालं. कार्यक्रम तर भरगच्च होता आणि त्यातून फाल्कन्सचं family get-together म्हटल्यावर उपस्थितांचा आकडा सहज शंभरापर्यंत जातो हे गेल्या काही वर्षातल्या कार्यक्रमांमुळं चांगलंच लक्षात आलंय त्यामुळं अक्षरशः एखाद्या लग्नाच्या तयारी सारखी तयारी करावी लागते. अर्थात दरवर्षी हे करून काहीसं अंगवळणीच पडलंय म्हणा.

       कार्यक्रम तर मोठा करायचं ठरलं पण करायचा कुठे? सगळ्यांच्या फॅमिली येणार म्हटल्यावर आपण ट्रेकर्स मंडळी कसंही adjust करून घेतो तसं adjust करून चालणार नव्हतं. या संदर्भात ग्रूपवर विचारणा केल्या केल्या हा प्रश्न ग्रुपवरच्या राजेंद्र नारखेडेंनी अगदी चुटकीसरशी सोडवला. त्यांची 'गोधाम एको व्हिलेज', आढले बुद्रुक'ला शेती आहे. तिथल्याच 'नितीन घोटकुलेंचं तिथं फार्म हाऊस पण आहे आणि ते आपल्याला खंडेनवमीच्या कार्यक्रमासाठी ते विनामोबदला असेल तरच उपलब्ध करून देतायत' असा नारखेडेंचा निरोप आल्यावर पुढची सुत्रं भराभर हलली आणि आम्हा चिंचवडकर मंडळींची कार्यक्रमाच्या व्यवस्थेबद्दल जोरदार तयारी सुरू झाली. त्यात कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणं आणि त्यानुसार प्रत्येकाला जबाबदारी देणं, सुरक्षासाधनं, संदर्भ पुस्तकं, भटकंती करताना आवश्यक असलेल्या इतर गोष्टींची तयारी करणं, आचारी ठरवणं, जेवणाचे-नाश्त्याचे मेन्यू ठरवणं आणि एकूणच कार्यक्रमाच्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार करणं वगैरे बहुतेक सगळी तयारी करायची होती. तसं या कार्यक्रमाला येणारी सर्वच मंडळी डोंगरात मनमुराद भटकणारी होती. खरं सांगायचं तर भटक्या मंडळींना अशा आयोजित कार्यक्रमात वावरताना तिथं पाळायचे Etiquette किंवा Protocols आपण व्यवस्थित पाळतोय ना याचं काहीसं दडपणच असतं पण हा कार्यक्रम कौटुंबिक असल्यामुळं तसं काही दडपण घ्यायची कुणाला आवश्यकताच नव्हती. बरं या कार्यक्रमाला फाल्कन्सच असलेले धनंजय शेडबाळे प्रमुख पाहुणे होते त्यामुळं कार्यक्रम घरचाच होता. त्यामुळं मग Tension चं काही कारणच उरलं नाही. थोडक्यात हा कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात होणार होता. कार्यक्रमाचा दिवस नक्की होऊन सर्वांना निरोप गेल्यावर बघताबघता कार्यक्रमाला येणाऱ्या मंडळींचा आकडा सत्तरच्यावर गेला. आता ठरवलेलं ठिकाण लहान पडतंय की काय असं वाटू लागलं होतं पण याबाबत नितीन घोटकुलेंशी चर्चा केल्यावर त्यांनी त्यांचा वैयक्तिक बंगलाही वापरायला दिला आणि आम्ही आयोजकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 
 

       खरं म्हणजे दिवसेंदिवस जशी आमच्या सुरक्षासाधनांमधे वाढ होतीये ना अगदी तशीच 'फाल्कन ट्रेकर्स'च्या कुटूंबाची पण हळूहळू वाढ होतीये. एवढंच नाही तर डोंगरयात्रांचा आणि त्यांच्या श्रेणीचा आलेखही उंचावतोय. अर्थात हे सर्व घरच्यांच्या पाठींब्याशिवाय अजिबात शक्य नाही हेही तितकंच खरंय. काही वर्षांपूर्वी एखाद्या फाल्कन्सच्या घरी हॉलमधे होणारा शस्त्रपुजनाचा कार्यक्रम सगळ्याच बाबतीत वाढ झाल्यामुळं आता एखाद्या फार्म हाऊसवर किंवा कार्यालयात घ्यायची वेळ आलीये. दरवर्षी होणारा हा खंडेनवमीचा कार्यक्रम म्हणजे आम्हा फाल्कन्ससाठी एक कौटूंबिक सोहळा झालाय. या कार्यक्रमामुळं आम्हाला एकमेकांच्या कुटूंबियांना भेटता तर येतंच शिवाय त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही मारता येतात आणि एवढंच नाही तर त्यांचे आम्हा भटक्यांच्या बाबतीतले विचारही समजून घेता येतात. माझ्यावर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्यामुळं 'स्वयंसेवकांशी असलेला संपर्क त्याच्या स्वयंपाकघरापर्यंत असायला हवा' हे सुत्र अंगात चांगलंच भिनलंय. साहजिकच फाल्कन्सच्या बाबतीतही आमचा हाच अजेंडा कायम असतो. साहजिकच अशा कौटूंबिक कार्यक्रमाचे निरोप सोबत्यांना देण्याबरोबरच आमच्या सगळ्या वहिनींनाही आवर्जून दिले जातात हे काही वेगळं सांगायला नको. सगळ्यांना निरोप गेले होते त्यामुळं आता सगळेजण ट्रेकप्रमाणेच कार्यक्रमाच्या दिवसाची पण अगदी आतूरतेने वाट पहात होते.

आणि तो दिवसही लवकरच उजाडला...

दिवस पहिला, शनिवार, ०८ ऑक्टोबर २०२२


       संध्याकाळी पाचला कार्यक्रम सुरू करायचा असल्यामुळं advance team मधली मंडळी अगदी दुपारपासूनच झटत होती. हॉल स्वच्छ करून झाला होता. खुर्च्या, टेबलं लावून झाली होती. सगळी सुरक्षासाधनं मांडून झाली होती. एवढंच नाही तर कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदरच्या चहा-भजीची तयारीही आमच्या आजच्या बल्लवाने म्हणजे अंकुशने सुरू केली होती. कार्यक्रमाची अगदी व्यवस्थित आणि जवळजवळ सगळी तयारी झाली होती.

       आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही फाल्कन्सनी ड्रेसकोड ठरवला होता तो म्हणजे प्रत्येकाने झब्बा घालण्याचा. संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून एकेकजण आपापल्या कुटुंबासह झब्बा घालून हळूहळू हॉलवर येऊ लागला. संध्याकाळचा welcome tea आणि नाश्ता करून बरोबर सव्वापाच वाजता खंडेनवमीचा कार्यक्रम वेळेत सुरू पण झाला.





       कार्यक्रमाची सुरूवात झाली तीच मुळी महिला मंडळाच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाने. आठल्ये वहिनी, पुजारी वहिनी आणि माझ्या पत्नीने म्हणजे सुचित्राने त्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. हळदीकुंकवाचं वाण लुटण्यासाठी इको फ्रेंडली अशा फाल्कनचा लोगो छापलेल्या खास कापडी पिशव्या आम्ही तयार करून घेतल्या होत्या.





       हळदीकुंकवाचा कार्यक्रम उरकल्यावर खंडेनवमीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी सुत्रसंचालनाची जबाबदारी श्रीकांत मापारींनी स्विकारली होती. त्यांनी आलेल्या कुटूंबियांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरूवात केली. प्रास्ताविकात त्यांनी आपण खंडेनवमीची पूजा का करायला हवी आणि आपण फाल्कन्स ती का करतो ते सर्वांना थोडक्यात समजावून सांगितलं आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.



       प्रमुख पाहुण्यांनी खंडेनवमीचं शस्त्रपुजन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुजन केलं.







       साधनांचं पुजन केल्यावर सुत्रसंचालक श्रीकांत मापारींनी एकमेकांची ओळख करून द्यायला सांगितलं. 'एकमेकांची' म्हणजे स्वतःची नाही तर बायकोने नवऱ्याची आणि नवऱ्याने बायकोची ओळख करून द्यायची होती. आता आयत्यावेळी मापारींनी असं करायला सांगितल्यावर आमची मात्र चांगलीच गोची होणार होती. ट्रेकींगमुळं घरी नेहमीच खाव्या लागणाऱ्या बायकोच्या शिव्या आताही खाव्या लागणार होत्या आणि त्याही चारचौघात. पण एरव्ही ट्रेकसाठी साधा डबा करून देण्यासाठी नाकं मुरडणाऱ्या सरसकट बायकांनी मनापासून आमच्या ट्रेकींगच्या छंदाला तेव्हा चांगलं म्हटलं. अर्थात आम्हा सर्वांसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्काच होता हे काही वेगळं सांगायला नको बरं. आमच्या बहुतेक सगळ्याच वहिनींनी आमच्याबद्दल जे मत बनवलेलं होतं ते नक्कीच सकारात्मक होतं हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. खरं सांगायचं तर ही आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब होती. आम्ही आमच्या कुटूंबियांचा विश्वास नक्कीच मिळवला होता. त्यामुळं पुढच्या काही ट्रेक्सना तरी घरून परवानगीची कुणाला काहीच अडचण येणार नव्हती.



       पुढचा कार्यक्रम होता फाल्कनची आत्तापर्यंतची वाटचाल सांगण्याचा. जितेंद्र परदेशीने हर्षगडापासून सुरू झालेला फाल्कन्सचा आत्तापर्यंतचा प्रवास स्लाईड शोद्वारे अगदी छान उलगडला. फाल्कनच्या ट्रेक्सच्या अवघडपणाचा चढता आलेख, त्याच्या अनुशंगाने सुरक्षासाधनांच्या खरेदीची निर्माण झालेली गरज, त्यासाठी पैशांची केलेली जमवाजमव आणि त्यांच्या खरेदीनंतर त्याचा ट्रेकमधे झालेला उपयोग याचा सगळा लेखाजोखाच त्याने अतिशय सुंदर पद्धतीने मांडला. स्लाईड शोनंतर त्याने मागच्या खंडेनवमीपासून या खंडेनवमीपर्यंत विकत घेतलेली सुरक्षासाधनं, शिल्लक असलेली गंगाजळी आणि पुढील वर्षात होणाऱ्या फाल्कन्सच्या काही मोठ्या Activities साठी आवश्यक असणाऱ्या सुरक्षासाधनांच्या खरेदीची केलेली तरतूद याबद्दल माहिती दिली.





       कार्यक्रम जसजसा पुढे सरकत होता तसतसा तो अधिक रंगतदार होऊ लागला होता. गेल्या वर्षात जी सुरक्षासाधनं विकत घेतली आहेत तिचा वापर कसा केला जातो याबद्दलची इत्यंभूत माहिती आणि त्याबद्दलचे व्हिडीओ मंगेश आठल्येंनी दाखवल्यामुळं 'every falcon is in safe hands' ची जाणीव प्रत्येकाच्याच कुटुंबियांना झाली.

       आता वर्षभरात केलेल्या डोगरयात्रांची माहिती देण्याची जबाबदारी मिलींद गडदेंवर होती. यावर्षीपासून एक नवीनच प्रथा आम्ही फाल्कन्सनी सुरू केली ती म्हणजे पुरस्कार देण्याची. हे पुरस्कार वर्षभरात सर्वात जास्त ट्रेक करण्याऱ्यांसाठी आणि जास्तीतजास्त ट्रेकचे नेतृत्व करणाऱ्यांसाठी ठेवले होते. असा पुरस्कार देण्यामागचा हेतू एवढाच की प्रत्येकाला यातून प्रोत्साहन मिळावं आणि लोक ट्रेक्स करण्यासाठी किंवा नेतृत्व करण्यासाठी आपणहून पुढे यावेत. पुरस्कारासाठी असलेल्या निकषांची माहिती मिलींदने अगदी अचूक दिली आणि सोबतच यावर्षीच्या विजेत्यांची नावेही जाहीर केली.

       यंदाचा 'Trekker Of The Year, Runner Up' चा पुरस्कार श्री. राजेंद्र क्षीरसागर यांना मिळाला.


       यंदाचे 'Trekker Of The Year' श्री. अनिल सवाने झाले.


      'Lady Trekker Of The Year' चा मान माधुरी भंडारे यांनी मिळवला.


       'Inspirational Leader Of The Year' चा पुरस्कार मनोहर काजिर्णेकर आणि विनायक गाताडे यांना विभागून देण्यात आला.


       या पुरस्कारांसाठी दिलेली सन्मानचिन्ह इतकी सुंदर तयार झाली होती की ती तयार करण्याचं संपूर्ण श्रेय फक्त उमेश माने आणि अमित पवार या आमच्या नेहमीच चोखंदळ असलेल्या अस्सल पुणेकर मंडळींना जातं.

       ट्रेक करत असताना आपल्या हातून बऱ्याच चूका नकळत होत असतात अर्थात तेव्हा त्या लक्षात येतातही. ट्रेक तर होऊन जातो पण त्याच ट्रेकदरम्यान त्याबद्दल बोलायला म्हणावा तसा वेळ नसतो. मग त्या चूका कशा सुधारता येतील किंवा एकूणच आपल्या ट्रेक्समधे काय सुधारणा व्हायला हव्यात याबद्दल सखोल चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी करत असतो. साहजिकच याबद्दलही चर्चा झालीच. महादेव पाटील, शिवाजी शिंदे, उमेश माने, साहेबराव पुजारी यांनी उपयुक्त सूचना केल्या

       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनंजय शेडबाळे यांनी त्यांच्या अनुभवी नजरेतून आलेल्या सुचनांवर त्यांच्या भाषणात त्यावर योग्य असं मार्गदर्शन केलं. खरंतर धनंजय शेडबाळे हे पुर्वाश्रमीचे अस्सल ट्रेकरच. कामाच्या व्यापात माणूस कितीही अडकला तरी त्याचा मूळ पिंड काही बदलत नाही याचं धनंजय शेडबाळे हे मुर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. अधनंमधनं ते फाल्कन्ससोबत ट्रेक्स करतात आणि ट्रेक्स करताकरता झाडांची माहितीही देतात पण त्यांचा मुळ विषय आहे तो म्हणजे 'निसर्ग संवर्धन' आणि त्याविषयी तर ते भरभरून बोलले. देवराई फाऊंडेशन'च्या माध्यमातून अभिनेते सयाजी शिंदेंसोबत त्यांनी महाराष्ट्रभर खूपच भरीव काम केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या 'निसर्गमित्र विभागा'चे ते अध्यक्षही आहेत. निसर्गमित्र विभागाचं 'घोरवडेश्वर' येथील काम तर सर्वांना माहिती आहेच. निसर्ग संवर्धन म्हणजे फक्त झाडं लावणं आणि ती वाढवणं एवढंच नाही तर अगदी आपल्या रोजच्या जीवनात अनावश्यक प्लॅस्टीकचा वापर टाळणं, इंधन बचतीसाठी सायकलचा वापर करणं म्हणजेही निसर्ग संवर्धनच म्हणता येईल हे आम्हा सर्वांना त्यांनी सहजसोप्या भाषेत समजावून दिलं. या खंडेनवमीच्या कार्यक्रमाच्या सुरवातीला झालेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून आम्ही मुद्दाम कापडी पिशव्या दिल्या तोही एक निसर्ग संवर्धनाच्या जागरूकतेचाच एक भाग होता. प्लॅस्टीकची समस्या ही काही सहजपणे सुटणारी नाहीच पण प्रत्येक कुटुंबानी मनापासून ठरवलंच तर ते अशक्यही नक्कीच नाही हेच त्यातून आम्हाला सर्वांना दाखवून द्यायचं होतं. 'लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण' असं न करता इथून पुढं आम्ही प्रत्येकजण निसर्ग संवर्धनाची सुरूवात आमच्या घरापासून करणार होतो.



       कार्यक्रमाचा पुढचा भाग होता तो म्हणजे सन्मानाचा. बहुतेक फाल्कन्स ट्रेक्स करण्यासोबतच इतरही काही विलक्षण कामगिरी नेहमीच करत असतात. गेल्या वर्षभरात त्यांनी केलेल्या अशा विलक्षण कामगिरीबद्दल आम्ही फाल्कन्स त्यांचा सन्मान करत असतो, जेणेकरून इतरांनाही त्यापासून प्रोत्साहन मिळावं. यावर्षी माधुरी भंडारे, नेताजी भंडारे, राजेंद्र क्षीरसागर, आशुतोष गुळवेकर यांचा 'Everest Base Camp Summit' केल्यामुळं सन्मान केला गेला.



       'HATP चे टीशर्ट' बनवण्यासाठी मनोहर काजिर्णेकर यांचा आणि 'Bus arrangements' साठी अमित पवार या दोघांनी मनापासून घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचा सन्मान केला गेला.


       ६८ वर्षाचे सर्वात तरूण फाल्कन नलावडेदादा जपानला मुलाकडे गेल्यावरही काही स्वस्थ बसले नव्हते. जपानमधलं सर्वात उंच शिखर 'माऊंट फुजी' त्यांनी सर केलं त्यासाठी त्यांचाही सन्मान आम्ही केला.

       हिमालयातला अवघड असा 'Seven Great Lakes' चा ट्रेक यशस्वी पूर्ण केल्याबद्दल श्रीकांत मापारींचा सन्मान केला.

       आमच्या फाल्कन्सच्या पहिल्यावहिल्या 'HATP चे यशस्वी नेते' मंगेश आठल्येंचाही आम्ही या कार्यक्रमात सन्मान केला.

       'Diploma in Mountaineering ailed sports' हा पुणे विद्यापिठाचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल शिवाजी शिंदे यांचा सन्मान केला गेला.


       मुलुंडचा महाराष्ट्र सेवा संघ हा दरवर्षी महाराष्ट्र स्तरावर 'ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा' घेतं. त्या स्पर्धेत मला दुसरं पारितोषिक मिळाल्याबद्दल माझाही सन्मान झाला.

       खरं म्हणजे ट्रेकर्सच्या शब्दकोशात 'औपचारिकता' हा शब्दच नसतो. असतो तो फक्त सोबत्यांवर असलेला दृढविश्वास, एकमेकांबद्दल असणारा आदर, प्रेम आणि या सगळ्यांमुळेच त्यांचा वाढत जाणारा आत्मविश्वास. या सगळ्या गोष्टी अगदी प्रत्येक फाल्कन्समध्ये ठासून भरल्यात पण सार्वजनिक कार्यक्रमात आभार प्रदर्शन तर करावं तर लागतंच ना! याची जबाबदारी होती योगेश चौधरींवर. मुळातच बोलक्या असलेल्या योगेशने त्याच्या मिश्कील शैलीत अगदी आमच्या आचाऱ्यांपासून ते जागा उपलब्ध करून देणाऱ्या नितिन घोटकुलेंपर्यंत सर्वांचेच यथोचित आभार मानले.


       आभार प्रदर्शन सुरू असतानाच आचाऱ्यांनी दिलेल्या फोडणीने आतापर्यंत कुणाच्याच लक्षात न आलेली 'भूक' प्रकर्षाने जाणवली. थोड्याच वेळात जेवण तयार झाल्याची वर्दीही आली. आभार प्रदर्शन झाल्यावर खंडेनवमीचा 'औपचारिक' कार्यक्रम पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं आणि अनौपचारीक कार्यक्रमाची सुरूवात झाली.

       अनौपचारीक कार्यक्रमाची सुरूवात म्हणजे बंधनं नसलेली धमाल मस्तीची सुरूवात. ती करण्याआधी बल्लवांनी बनवलेल्या सुग्रास भोजनावर यथेच्च ताव मारला. जेवणात बटाटा प्लॉवर रस्साभाजी, बैंगन मसाला, चपाती, वरणभात, लोणचे, पापड आणि गुलाबजाम असा मेनू होता.


       जेवण झाल्यावर बाहेरच्या लॉनमधे गेलो. तिथं दांडीयाची अगदी डीजेसकट सगळी तयारी करून ठेवली होती. मग काय तासभर सगळे गरबा खेळले. सगळे दमून बसत नाहीत तोवर बल्लवांनी कोजागिरीसाठी मस्तपैकी मसाला दुध बनवून दिलं. दुध पितापिता ट्रेकमधे घडलेले गमतीदार किस्से आणि घरून परवानगीसाठी प्रत्येकाला कायकाय प्रयत्न करावे लागतात यावर सगळ्यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. हे होत नाही तोवर महिलामंडळाने संगीतखुर्चीचा खेळ खेळला तर आम्ही फाल्कन्सनी धावत जाऊन काठीवर कपाळ ठेऊन दहा फेऱ्या मारण्याचा गमतीदार खेळ घेतला. एवढ्यात कुणीतरी म्हणालं अरे रात्रीचा एक वाजलाय झोपायचंय की नाही? तेव्हा कुठं घड्याळ्यावर लक्ष गेलं आणि हळूहळू एकेक जण झोपायला गेला.



 

दिवस दुसरा, रविवार, ०९ ऑक्टोबर २०२२


       सकाळी नेहमीप्रमाणे पाचलाच जाग आली. ट्रेकच्या सवयीनुसार लगेचच चहा करायला घेतला. एकेक जण आवरून येईस्तोवर चहा तयार झाला होता.


       चहा घेऊन झाल्यावर फाल्कन्सचे योगशिक्षक साहेबराव पुजारी यांनी पुरक हालचाली आणि सुर्यनमस्कार घेतले आणि योगासनांचं महत्वही पटवून दिलं.


       योगवर्ग झाल्यावर आम्ही जिथं हा कार्यक्रम घेतला होता त्या 'गोधाम एको व्हिलेज' आणि परिसराचा फेरफटका मारायला सगळे बाहेर पडले. राजेंद्र नारखेडे आणि नितीन घोटकुलेंनी त्यांच्या 'गोधाम एको व्हिलेज'ची इत्यंभूत ओळख करून दिली. त्यांनी सध्या तिथं असलेली गोशाळा, गुरूकुल आणि स्थानिक झाडांची केलेली लागवडही दाखवली. त्याचबरोबर पुढे येऊ घातलेल्या प्रोजेक्टबद्दलही सविस्तर माहिती दिली.





       हे सगळं होत असताना आम्ही काही फाल्कन्सनी तिथल्याच तळ्यावर 'झिपलाईन'चा सेटअप लावला. झिपलाईनसाठी लागणारी सगळी साधनं कालच्या खंडेनवमीच्या कार्यक्रमासाठी अनायसे आणलेली होतीच. मग काय मुलं आणि सगळ्या महिलामंडळाने झिपलाईनचा आनंद घेतला.




       काही मुली तर द्रोणागिरी पर्वत आणणाऱ्या हनुमान सुद्धा झाल्या होत्या.


       झिपलाईनचा कार्यक्रम संपत नाही तोवर बल्लवाचार्यांची नाश्ता तयार असल्याची हाक आली. आज नाश्त्याला मिसळपाव होता.

       पोटभर नाश्ता झाल्यानंतर दोन दिवसांच्या खंडेनवमी कार्यक्रमाची आम्ही यथासांग सांगता केली. आम्ही फाल्कन्स तरी ट्रेकच्या निमित्तानं एकमेकांना भेटत असतो पण एकमेकांना फारसे न भेटणारे किंवा फारफार तर फोनवरच भेटणारे आमचे कुटुंबीय वेगवेगळ्या वातावरणातून येऊनही गेले दोन दिवस एकमेकांत एवढे समरस झाले होते की 'फाल्कन' नावाचं एक कुटुंबच झालं होतं. साहजिकच घरी जाण्यासाठी त्या ठिकाणाहून कुणाचाच पाय निघत नव्हता पण जावं तर लागणारच होतं. शेवटी प्रत्येकजण दोन दिवसांच्या गोड आठवणींसह घरी परतला तोच मुळी पुन्हा लवकरच भेटण्यासाठी.



🚩 फाल्कन्सची वर्षभरातली भरारी...


🚩 किल्ले - २६

🚩 घाटवाटा - ०९

🚩 Rappelling_Activity - ०२

🚩 Jumbo Trek - ०५

🚩 Total Treks - १४

🚩 Total Participants - २१३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा