बुधवार, १९ जून, २०२४

"भारंग, एक औषधी रानभाजी"

"भारंग, एक औषधी रानभाजी"


       नुकताच आहूप्यातून गोरखगडावर गेलो होतो. ट्रेक पुर्ण करून परतताना आहूप्यात मित्राच्या घरी मस्त चुलीवर तयार केलेलं जेवण जेवायला मिळालं. शिवाय जेवताना 'चाई' या रानभाजीचा फक्कड मेनू होता. खरंतर तेव्हा भारंग खायची फार इच्छा झाली होती पण त्या दिवशी ती अजून तयार व्हायची असल्यानं काही खाता आली नाही. त्यावेळची माझी ही इच्छा थोड्याच दिवसांत पुर्ण होईल असं बाकी अजिबात वाटलं नव्हतं.

       काल अगदी अचानक माझ्या ट्रेकमित्राने, मिलींदने घोरवडेश्वरवरून मुद्दाम माझ्यासाठी ही भाजी तोडून आणली आणि आणल्या आणल्या लगेचच, बायकोने ती बनवली पण.

       खरंतर भारंग ही माझी आवडती रानभाजी. वर्षातून किमान एकदा तरी आमच्या घरी आम्ही ती बनवतोच. हीची चवही इतकी रूचकर असते की एरव्ही सगळ्या भाज्यांना नाकं मुरडणारा माझा मुलगा पोळीशी भाजी नाही तर भाजीशी पोळी लावून खातो. 

       पावसाळ्याच्या दिवसांत भारंग सह्याद्रीत सगळीकडे पहायला मिळते आणि ट्रेक करून परत येतानाही ती अगदी सहज आणता येऊ शकते. हीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला ट्रेकला जायला किंवा भाजी आणायला जमलं नाही तरी पावसाळ्याच्या अखेरीस तीला फुले येतात. अगदी या फुलांचीही भाजी करता येते. 

       अशी ही भारंग एक उत्तम औषधी वनस्पती आहे. 

       भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरले जाते. दमा असलेल्यांना भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा आणि अडुळसाची पाने या सर्वांचा एकत्र काढा करून देतात. 

       भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात बऱ्याच ठिकाणी खाल्ली जाते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा खुपच चांगला उपयोग होतो. या भाजीत पाचक गुणधर्म असल्यामुळे पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयोगी आहे. एकंदरीत श्वसनाच्या आणि पोटाच्या विकारावर ही भाजी अत्यंत गुणकारी आहे.

       पावसाळ्यात सहजी मिळणाऱ्या भारंग, टाकळा, चाई, कुडा, गुळवेल, चुका, तांदूळजा या आणि यासारख्या अनेक रानभाज्या एवढया गुणकारी आहेत की वर्षातून एकदा तरी खाव्यात. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा अशा रानभाज्या खाऊन आधीच खबरदारी घेतलेली केव्हाही चांगली. नाही का?

मर्यादेयं विराजते ॥





1 टिप्पणी: