आपल्या मराठीत अशी एक म्हण आहे की 'नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी शोधू नये.' बरेचदा या म्हणीप्रमाणं सर्व मंडळी वागत देखील असतात पण प्रवाहाच्या विरूद्ध दिशेनं पोहणाऱ्या मंडळींना 'हे असं का म्हटलं असेल बरं?' असे 'क' च्या बाराखडीचे प्रश्न मात्र कायमच सतावत असतात. आम्ही फाल्कन्सदेखील त्यापैकीच एक. आत्तापर्यंतच्या अशा प्रवाहाविरूद्ध जाऊन बंड करण्याच्या स्वभावामुळंच तर अनेक बंद पडलेल्या घाटवाटांच्या, किल्ल्यांच्या वाटांच्या किंवा ऐतिहासिक वाटांच्या शोधमोहिमा आम्ही करू शकलो. खरंतर अशा पडलेल्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ते सोडवणं आम्हा फाल्कन्सना नेहमीच भावतं. नदीचं मूळ म्हणजे तिचं उगमस्थान असतं तरी कसं किंवा ते नेमकं ओळखावं तरी कसं? नदीला पवित्र का समजलं जातं? उगम स्थानापासून पुढचा नदीचा प्रवास असतो तरी कसा? नदीची परिसंस्था नेमकी कशी असते? उगमापासून संगमापर्यंतची जैवविविधता नेमकी कशी बदलत जाते? यावर माझी आणि आमचे फाल्कन धनंजय शेडबाळेंची नेहमीच चर्चा होत असे. आपल्या संस्कृतीशी निगडीत असलेल्या गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सप्तसरितांना आपण देवत्व बहाल केलंय याचं कारण याच नद्यांपासूनच आपल्या दैदिप्यमान संस्कृतीचा हळूहळू उत्कर्ष होत गेला. या सप्तसरितांचा आपल्याला कधीही विसर पडू नये म्हणूनच तर दररोज आंघोळ करताना आपण पुढील मंत्र म्हणतो...
या मंत्राचा जप आंघोळ करताना केला तर रोगराई दूर होईल असं पूर्वापार समजलं जातं पण आज कुठं आहेत आपल्या या पवित्र नर्मदा आणि सिंधू? त्या तिथं नाहीयेत. जन्मापासून चिंचवडला राहिलेला मी लहानपणापासून बारमाही वाहणाऱ्या पवनामाईत पोहायला जात असे. नदीची तुलना आपण आईशी करतो कारण स्वच्छ, निर्मळ, प्रेमळ असे स्थायीभाव तिच्या ठाई पुरेपूर भरलेले आहेत म्हणूनच ना? पण मग माझ्या लहानपणीची ती पवनामाई आज आहे कुठे? पोहणं तर दूरच पण घरीसुद्धा ज्या पवना, मुळा-मुठेच्या पाण्याने आपण आंघोळ करतो त्याचं तरी स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं का? ज्या सरितांचं आपण पाणी पितो किंवा ज्या सरितांवर आपण प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून आहोत त्या सरिता आज कुठंतरी लुप्त होताना दिसत आहेत. घरोघरी वॉटर फिल्टर बसू लागले आहेत. घराबाहेर पडलं की पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी बिस्लेरी विकत घेण्याची गरज भासू लागली आहे. का होतोय हा बदल? आणि हे जे काही चाललं आहे यालाच मानवी उत्कर्ष म्हणावं का? फक्त देण्याचं माहित असलेल्या आईकडून आपण फक्त ओरबाडून तर घेत नाहीये ना? असं आता वाटू लागलंय. हल्ली नद्यांपेक्षा किंवा तिच्या आजुबाजूला असणाऱ्या परिसंस्थेपेक्षा तिच्या धरणातील पाणीसाठ्यावर, तिच्या कालव्यांवर, तिच्या आजूबाजूला असलेल्या गावांच्या पूररेषेवरच सर्वांचं जास्त लक्ष असल्याचं दिसून येतं. नदीच्या अनुशंगाने आलेल्या सिंचन, मासेमारी, व्यापार, पाणीपुरवठा आणि त्यावरील अर्थव्यवस्था या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण आपल्या संस्कृतीचा उगम ज्या नदीच्या उगमापाशी, काठावर झाला किंवा आपली ओळख ज्या नदीमुळं झाली ती नदीच जर का लुप्त होऊ लागली तर आपली संस्कृती टिकणार नाही हे देखील सुर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. नदी जगली तरच आपण जगू हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं. नद्या हळूहळू का लुप्त होऊ लागल्या आहेत? नद्यांच्या उगमापाशी असणाऱ्या परिसंस्थेत काय बदल झाला आहे? नदीपासून उगम पावलेली आपली संस्कृती जपायची असेल किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांंना जगायचं असेल तर नदी वाचवायलाच हवी आणि तीही उगमापासून.
खरंतर त्यातूनच आमच्या या नद्यांच्या उगमस्थानांना जोडणाऱ्या भटकंतीच्या कल्पनेचा जन्म झाला. माझी आणि शेडबाळे सरांची असा ट्रेक करण्याची कल्पना बहूदा चांगली असावी म्हणूनच ती सगळ्या सोबत्यांनी लगेच उचलून धरली. एक कल्पना म्हणून हे सगळं ठीक होतं पण वरील 'नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी शोधू नये' या उक्तीप्रमाणं जिथं एका नदीचा उगम शोधणं अवघड तिथं आम्ही आमच्या भटकंतीत ठरवलेल्या अकरा नद्यांची उगमस्थानं शोधावीत तरी कशी? हा एक मोठ्ठा प्रश्न आता आमच्यापुढं आ वासून उभा राहिला होता. या प्रश्नाचं उत्तर आम्हा भटक्यांच्या शोधक बुद्धीला चांगलंच अस्वस्थ करत होतं आणि मग सुरू झाली नद्यांच्या उगमस्थानांची शोधमोहिम. आमची अडचण लक्षात घेऊन इथंही शेडबाळे सर मदतीला धावून आले आणि त्यांनी श्रीकांत इंगळहळीकर सरांचं एक पुस्तक आमच्या हातात ठेवलं 'कृष्णा परिक्रमा.' या पुस्तकानं आमच्या बहूतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं चुटकीसरशी दिली. इंगळहळीकर सर हे धनंजय शेडबाळेंच्या चांगल्या परिचयाचे असल्यामुळं आमच्या ट्रेकची संकल्पना घेऊन आम्ही त्यांना भेटायला गेलो. भेटल्यावर आमच्या सर्व शंकांचं निरसन सरांनी अतिशय सोप्या भाषेत केलं. नद्यांच्या उगमस्थानांना जोडणाऱ्या भटकंतीची आमची ही कल्पना इंगळहळीकर सरांनाही चांगलीच आवडली. एक प्रकारे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा पुढचा अध्याय आम्ही प्रत्यक्ष अनुभवातून साकारणार होतो.
हा ट्रेक करण्यामागं आणखी एक सुप्त हेतू मनात होताच तो म्हणजे 'ट्रान्स सह्याद्री.' एका दमात ट्रान्स सह्याद्री ट्रेक करणं शारिरीकदृष्ट्या जरी शक्य असलं तरी कामातील सुट्टी, प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळं आम्हाला ते कुणालाच शक्य होणार नव्हतं आणि नाही. ट्रान्स सह्याद्री करायचा तर आहे पण एका दमात शक्य नाही मग याला पर्याय काय? तर तो म्हणजे तो टप्प्या-टप्प्यात करणं. आत्तापर्यंत लोणावळा ते भीमाशंकर, भीमाशंकर ते माळशेज, माळशेज-हरिश्चंद्रगड ते रतनगड, रतनगड ते कुलंग असे टप्पे करून झाले होते. प्रत्येकवेळी पुण्याच्या उत्तरेकडं गेलो होतो त्यामुळं आता यावेळी थोडं दक्षिणेकडं जायचं ठरवलं होतं. जागाबदल होणार म्हणून जंबोच्या दोनतीन पर्यायातून 'नीरा उगम ते इंद्रायणी उगम' या ट्रेकची सहजपणे वर्णी लागून गेली होती. साहजिकच सर्वांनी या ट्रेकची कल्पना उचलून धरली आणि आमचं हा ट्रेक करण्याचं नक्की झालं.
🚩 ट्रेक प्लॅनिंग -
फाल्कन ट्रेकर्सचा जंबो ट्रेक नेहमीच कोणत्यातरी हटके संकल्पनेवर आधारलेला असतो. आत्ताच्या भाषेत 'थीम बेस्ड ट्रेकिंग' असं त्याला म्हणता येईल. "प्रतिज्ञेपासून प्रतापाकडे" ही थीम घेऊन आम्ही चार दिवसांचा रायरेश्वर ते प्रतापगड असा ट्रेक केला. यात चार घाटवाटांसह दोन किल्ले आम्ही केले. गेल्या पंचवीस~तीस वर्षात वापरल्या न गेलेल्या एका घाटवाटेचं मॅपिंग आम्ही या ट्रेकमध्ये केलं.
सुभेदार तान्हाजी मालुसरेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी "डोंगरयात्रा एका अखेरच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीची..." ही अनोखी थीम घेऊन आम्ही 'कर्मभूमीपासून दहनभूमीपर्यंत' अर्थात सिंहगडापासून उमरठपर्यंत ट्रेक केला. तान्हाजी मालुसरेंनी ज्या तिथीला रात्री चढाई करून गड घेतला त्याच तिथीला त्याच वाटेने आम्ही देखील चढाई केली. शिवाय नंतर मुद्दाम सिंहगडावर जाऊन तानाजी कड्याचं अवरोहण म्हणजे रॅपलिंग देखील केलं.
"समग्र हरिश्चंद्रगड" ही थीम घेऊन हरिश्चंद्रगडाला असलेल्या सगळ्या म्हणजे पंचवीस वाटा आम्ही फक्त पाच दिवसांत केल्या. खिरेश्वरपासून चालू केलेला हा ट्रेक आम्ही पंचवीस वाटा करून पाचव्या दिवशी पुन्हा खिरेश्वरलाच संपवला. या ट्रेकमध्येही जवळजवळ आठ घाटवाटांचा समावेश होता. ज्यांनी घाटवाटांचे, हरिश्चंद्रगडाच्या वेगवेगळ्या वाटांचे ट्रेक केले आहेत त्यांना या ट्रेकचा आवाका लक्षात येईल.
जावळीच्या चंद्रराव मोरेंनी जावळी खोऱ्यात सप्त शिवालयांची निर्मिती केली. जावळीकर मोरेंच्या बखरीत त्याचे संदर्भ आले आहेत. "ऐतिहासिक कागदपत्रात आलेले संदर्भ भूगोलाच्या कसोटीवर ताडून सप्त शिवालयांची स्थलनिश्चिती" या संकल्पनेवर आधारलेली ही भटकंती होती. पाच दिवसांत १८६ किलोमीटरची चाल आम्ही केली आणि यात दोन घाटवाटांचा देखील समावेश होता. या संपूर्ण ट्रेकमध्ये बहूतेक ठिकाणी आम्हाला गाडी वापरता येत असूनही आम्ही कुठेच गाडीचा वापर केला नाही आणि हेच या ट्रेकचं वैशिष्ट्य होतं.
इ.स. २०२४ ची अखेर आणि २०२५ च्या सुरूवातीला असलेला आमचा यावर्षीचा 'नीरा उगम ते इंद्रायणी उगम' हा ट्रेकही आमच्या थीम बेस्ड ट्रेकिंगच्या ओळखीला साजेसाच होता. ही संकल्पना एका संत वचनेवर आधारलेली होती. तर काय होती या ट्रेकची संकल्पना?
नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी।
अंती तो वैकुंठप्राप्ती, ऐसे परमेष्टी बोलिला॥
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात माऊलींच्या पादुकांना एकूण तीन वेळेला नदी स्नान घातलं जातं. पहिलं आळंदीला इंद्रायणीत, दुसरं नीरेत आणि तीसरं पंढरपूरला भीमेत. आमच्या ट्रेकमध्ये आम्हीही याच नद्यांना भेट देणार होतो त्यामुळं आमचा हा जंबो ट्रेक म्हणजे एक पालखी सोहळाच असणार होता. थोडक्यात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर 'नीरेपासून भीमेपर्यंत' असा सात दिवस आम्हां फाल्कन्सचा मेळा सजणार होता पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. सहा दिवसांची सुट्टी काढून आठवडाभर ट्रेकला येणं कुणालाच जमणार नव्हतं त्यामुळं हा ट्रेक भीमाशंकरला संपवण्याऐवजी लोणावळ्याला इंद्रायणीपाशी संपवून सहा ऐवजी पाच दिवसांचा केला. पाच दिवस येणंही फारसं कुणाला जमेना मग काय करायचं? तर आम्ही एक शक्कल लढवली.
गेल्या वर्षीच्या सप्त शिवालयांचा जंबो ट्रेकमध्ये आमचं बहूतेक चालणं हे डांबरी सडकेनं झालं होतं. या जंबो ट्रेकला सुद्धा आमचं बरचसं चालणं हे डांबरी सडकेनंच होणार होतं. डांबरी सडकेवरचं चालणं अतिशय त्रासदायक होतं याचा अनुभव गाठीशी असल्यामुळं आम्ही यावर्षी आमच्या प्लॅनिंगमध्ये थोडा बदल केला. आमचा हा ट्रेक आम्ही 'Bike & Hike' अशा प्रकारचा केला म्हणजे जिथं रस्ता आहे तिथं आम्ही सायकलिंग करणार होतो. ज्यामुळे आमच्या एकूण प्लॅनिगमधला आणखी एक दिवस वाचला आणि ट्रेक चार दिवसांचा झाला. आमच्या जंबो ट्रेकमध्ये ही concept नवी होती. तसं पाहिलं तर जिथं गाडी जाते ते अंतर आम्हाला गाडीतूनही करता आलं असतं पण त्याला स्थळदर्शन म्हणता आलं असतं, ट्रेक नाही म्हणून आम्ही सायकल वापरण्याचं निश्चित केलं. त्यामुळं सुट्टीचा प्रश्नही मिटला आणि आमचे Efforts ही कमी झाले. शेवटी शनिवार-रविवार जोडून हा ट्रेक ०९ जानेवारी ते १२ जानेवारी म्हणजे गुरूवार ते रविवार असा चार दिवसांत करण्याचं नक्की झालं. गाडी पोहोचू शकेल अशा मुक्कामायोग्य जागा निश्चित करून या चार दिवसांचं ट्रेक प्लॅनिंग केलं होतं.
इथपर्यंत ट्रेक प्लॅनिंगचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता आता लगेचच पुढच्या म्हणजे दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याचं काम सुरू झालं. ट्रेकला येणाऱ्या मंडळींचा एक 'WhatsApp Group' बनवला गेला. आता जंबो ट्रेकबद्दलची सगळी चर्चा आम्ही इथंच करणार होतो.
🚩 ट्रेकभीडू -
१) नारायण सुसंगे - वय ३७
२) जितेंद्र भोसले - वय ५२
३) जितेंद्र परदेशी - वय ५०
४) मिलिंद गडदे - वय ५६
५) संजय मालूसरे - वय ५३
६) शिवाजी शिंदे - वय ५४
७) धनंजय शेडबाळे - वय ५४
८) प्रमोद मस्तूद - वय ३८
९) दिलीप वाटवे - वय ५०
किराणा, भाजीपाला आणि ट्रेकसाठी लागणाऱ्या गरजेच्या सर्व वस्तूंची खरेदी करण्याची जबाबदारी एकेक ट्रेकभीडूवर सोपवली गेली. स्वयंपाकासाठी लागणारा सिलेंडर भरून घेतला आणि शेगडी पण तपासून पाहीली. भांड्यांची जमवाजमव करून ती स्वच्छ धुवून घेण्याची जबाबदारीही दिली गेली.
सरितांच्या चैतन्याचा मेळा।
फाल्कन्सचा एक आनंद सोहळा॥
आता सगळ्यांना पुढच्या चार दिवसांत मिळणाऱ्या वेगळ्या अनुभूतीचे आणि ट्रेकला निघण्याच्या वेळेचे वेध लागले होते...
...आणि तो दिवस उजाडला. बुधवारी रात्री सर्वजण बरोबर साडेनऊ वाजता पहिल्या स्टॉपवर जमले. सामान गाडीत भरलं आणि भोरमार्गे शिरगावला जाऊन गावातल्या मंदिरात रात्री पथाऱ्या पसरल्या. या मंदिरात आधी ट्रेकच्या निमित्तानं बरेचदा राहणं झालं असल्यानं कुणाला फारसं काही सांगावंच लागलं नाही. सकाळची आवरून तयार राहण्याची सगळ्यांना वेळ दिली आणि झोपी गेलो.
🚩 दिवस पहिला
गुरूवार, दिनांक ०९ जानेवारी २०२५.
सकाळी बरोबर सात वाजता चहा तयार झाला. आज ट्रेकमधला पहिला चहा करण्याची जबाबदारी मी घेतली होती. सगळ्यांनीच चहाबिस्कीटांचा पोटाला थोडा आधार दिला आणि गावातल्याच एका घरातून काही फावडी-घमेली घेऊन नीरेबावीकडं निघालो. या 'नीरा' नदीच्या उगमस्थानाला नीरेबावी म्हणतात. नीरा नदीचा उगम वरंध घाटाच्या सुरवातीला असलेल्या शिरगावच्या उत्तरेला डोंगर उतारावर आहे. नीरा इथं उगम पावून नीरादेवघर धरणात जाते. धरणानंतर नीरामाई भोर गावातून वाहत जात वेळवंडी आणि गु़ंजवणीला सोबत घेऊन पुणे-बंगळूर महामार्गावरच्या सारोळ्याजवळ वीर धरणात जाते.
घड्याळ १० वाजल्याचं सांगत होतं. आमच्या आजच्या ठरलेल्या मुक्कामी पोहोचायचं तर आता घाई करायला हवी होती. नीरेबावीपासून पुन्हा गावात आलो. उगमस्थानाची साफसफाई करून चांगलीच भूक लागली होती त्यामुळं मग गावातल्या मंदीरात मित्राच्या हॉटेलातून आणलेल्या मिसळीवर सर्वांनी यथेच्च ताव मारला. श्रीकांत इंगळहळीकर सरांनी ट्रेक चांगला होण्यासाठी शुभेच्छा दिल्यावर फ्लॅगऑफ केला, फोटोसेशन झालं आणि आम्ही पुढच्या वाटेवर मार्गस्थ झालो.
शिरगावातून पुन्हा नीरेबावी गाठली आणि तिथूनच मधल्या वाटेनं द्वारमंडप गाठलं.
इथून डावीकडचा रस्ता महाडला निघून गेला आणि आम्ही शिळींब, कुंड ओलांडून राजीवडीला पोहोचलो. राजीवडीपासून हाकेच्या अंतरावर एका ओढ्यात पश्चिमवाहिनी 'शिवथर' नदीचा उगम आहे. रस्ता सोडून डावीकडच्या शेताडीतून उतरत उगमस्थानापाशी पोहोचलो. इथं दगडात कोरलेलं कुंड दिसलं. कुंडातून नदीचा प्रवाह अजून प्रवाहीत होता. ही शिवथर नदी कोकणात शिवथर घळीपाशी उतरून पुढं कसबे शिवथर, आंबे शिवथर, रानवडी, वाकी करत पडवी गावाजवळ असलेल्या शेंदुर डोहापाशी छत्री निजामपूरहून येणाऱ्या काळ नदीला जाऊन मिळते.
राजीवडीहून आम्ही साळूंगण मार्गे सांगवी गाव गाठलं. गावातल्या एका झाडाखाली बसून घरून आणलेले डबे खाल्ले आणि थोडी वामकुक्षी घेतली. आम्ही जेवलो त्या सांगवीतून आधी सुपेनाळ आणि भोवऱ्या घाटवाटांचा ट्रेक केल्यामुळं सांगवी गाव चांगलं परिचयाचं होतं. गावातून भाटघर धरणाच्या पाणी फुगवट्याच्या बाजुने जात बोपे गाठलं आणि पुढं बोपे स्टॉपवर पोहोचलो.
इथून उजवीकडे गेलं तर कुंबळ्यात जाता येतं पण आम्ही वळलो डावीकडं केळदच्या वाटेवर. डावीकडं असलेल्या बोप्या, आंबेनळी, उपांड्या, मढे घाटवाटांची ओळख पटवत निवांत निघालो होतो. केळद गावातल्या हॉटेलात चहा घेतला आणि मोहरी फाट्याला डावीकडं वळून कुसारपेठ गाठलं. खरंतर केळदहून भोर्डीमार्गेही कुसारपेठला चढून येता आलं असतं पण अंधार पडल्यामुळं तो धोका आम्ही पत्करला नाही. कुसारपेठ गावाच्या कड्यावर काळकाईच्या ठाण्यापाशी 'केळ' नदीचा उगम आहे. कुसारपेठच्या कड्यावरून उडी घेऊन ही नदी दरीतल्या वरदायीनीच्या ठाण्यापासून पुढं भोर्डी धरणात जाते. केळ नदी वेळवंडीची उपनदी आहे. डेरे गावाजवळ वेळवंडी आणि केळ नद्यांचा संगम होतो. संगमावर वाघजाईचं मंदीर आहे. या वाघजाईला संगमाची वाघजाई म्हणूनच ओळखलं जातं.
🚩 दिवस दुसरा
शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५.
सकाळी चहासोबत गरमागरम चपातीचा पोटभर नाश्ता केला. नेहमीच्या सवयीप्रमाणे सोबतच्या जितेंद्र परदेशीने आणलेले पेन पाटलांच्या नातवंडांना दिले आणि सिंगापूर सोडलं. आमचं पुढचं उगमस्थान होतं 'वेळवंडी'चं.
सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड हा ट्रेक बरेचदा केल्यामुळं हारपूड जवळची बामणखिंड पक्की ठाऊक होती. वेळवंडीचा उगम याच बामणखिंडीजवळ आहे. उगमस्थानाचे अक्षांश आणि रेखांश असल्यामुळं नेमकं ठिकाण शोधायला फारसा त्रास झाला नाही. अक्षांश आणि रेखांशच्या आजूबाजूला थोडं फिरून पाहिलं तर एका ओढ्यात कातळात खोदलेलं टाकं मिळालं. टाक्याच्या मागं उंबराचं भलं मोठं झाड होतं. बामणखिंडीजवळची वस्ती बरीच वर्ष याच छोट्या टाक्याच्या पाण्यावर अवलंबून होती त्यामुळं याच ठिकाणाची आम्ही उगमस्थान म्हणून पूजा केली. वस्तीच्या पाण्याच्या गरजेपोटी सरकारी खर्चातून उगमाच्या टाक्याजवळच एका मोठ्या कातळटाक्याचं सुरुंग लावून खोदकाम सुरू होतं. वेळवंडी हारपूडच्या बामणखिंडीजवळ उगम पावून वरोती, पासली, माजगाव, बालवड, भुतोंडे, डेरे करत भाटघर धरणात जाते अणि धरणाखाली लगेचच नीरेला मिळते. प्रत्येक दिवशी पहिल्या नदीच्या उगमस्थानी आम्ही जल प्रतिज्ञा म्हणत असू त्यानुसार आजची प्रतिज्ञा आम्ही वेळवंडी उगमापाशी म्हटली.
आमचा पुढचा टप्पा होता 'कानंदी'चा. मोहरीहून चांदरला जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पहिली मोहरीपासून खाली उतरून पदरातून वळसा मारायचा आणि पुढं खिंड चढून ओढ्याच्या कडेने चांदर गाठायचं तर दुसरी वाट थोडी लांबून वळसा मारून जाते पण या वाटेवर फारसे चढउतार मात्र नाहीत. ही वाट मोहरीतून हारपूडजवळच्या बामणखिंडीतून पलिकडं जाऊन डोंगरधारेने जात चांदरपाशी किंवा पुढं डिगेवस्तीपाशी उतरते. याच वाटेनं मध्यातून उतरून घिसरलाही जाता येतं. आम्हाला कानंदी उगमासाठी याच वाटेनं जायचं होतं. बामणखिंड वस्तीतून पुन्हा मागं येऊन बामणखिंड ओलांडली आणि चांदरच्या दिशेने जाऊ लागलो. पुढं एका शिखरापाशी वाट शोधावी लागली आणि त्यात आमचा बराच वेळ वाया गेला. उजवीकडं वळून ढोरवाटांतून आडवं जात कानंदीचे अक्षांश आणि रेखांश गाठले. हे ठिकाण घिसर गावाच्या वरच्या बाजूला डोंगरात आहे. जवळपास मानवी वस्ती अजिबात नाही. डोंगरमाथ्याच्या थोड्या खालच्या बाजूला एका ओढ्यात उंबराचा भलामोठा वृक्ष मिळाला त्याच्या बुंध्यातूनच कानंदीचा उगम होतो. उगमाची पूजा केली आणि बाजूच्याच एका गर्द सावलीत दुपारची जेवणं उरकली.
उगमानंतर कानंदी घिसरच्या जुगाईच्या देवराईपासून वाहत जाऊन पुढं वरदायीनी कोंड करत निवी गावापाशी चापेट धरणात जाते. धरणक्षेत्राच्या उजवीकडं असलेल्या कानंद गावामुळंच नदीला कानंदी नाव पडलं आहे.
जेवणं झाल्यावर तिथंच दहा मिनिटांची थोडी वामकुक्षी घेतली आणि कानंदी उगमावरचा डोंगरमाथा गाठला. हा डोंगरमाथा आपला सिंहगड असलेल्या भुलेश्वर रांगेवर आहे. आता चांदरच्या दिशेने आमची चाल याच भुलेश्वर रांगेवरून होणार होती. बरेच दिवसांनी वेगळ्या ठिकाणी का होइना पण आईच्या कुशीतच आल्यासारखं आम्हाला सर्वांना वाटत होतं. याच भुलेश्वर रांगेच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा झाल्यामुळं बहुदा असं वाटत असावं.
संध्याकाळ होऊ घातली होती. सुर्य अस्ताला निघाला होता आणि आमच्या मुक्कामाचं ठिकाण अजूनही बरंच लांब होतं. कानंदी उगमापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा बराच वेळ वाया गेला होता त्यामुळं चांदर, डिगा, खानू, टेकपोळे आणि शेवटी घोळ असं मुक्कामी पोहोचण्यासाठी आम्हाला बराच उशीर झाला असता त्यामुळं पुढचं चालणं आवरतं घेत उजवीकडं वळून पोळेवाडीतून पोळे गाठलं आणि गाडीत बसून घोळला मुक्कामी पोहोचलो. वाटेतली माणगावची देवराई अंधार पडल्यामुळं काही पाहता आली नाही. मागं वाघजाई आणि तेल्याच्या नाळेचा ट्रेक केला तेव्हा घोळ गावातलं विठ्ठलरूख्मिणी मंदीर पाहून ठेवलं होतं ते गाठलं. बाजूच्याच घरात रात्रीच्या जेवणासाठी भाकरीचं पीठ आणि दुसऱ्या दिवशीच्या चपात्यांसाठी गव्हाचं पीठ दिलं. आजचं स्टार्टर म्हणून व्हेज मंचाव सूप तर जेवणात गवारबटाटा रस्साभाजी, भाकरी, व्हेज बिर्याणी आणि स्वीट म्हणून गाजराचा हलवा होता.
🚩 दिवस तिसरा
शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५.
सकाळची आन्हिकं उरकली आणि मंदीरात आरती केली. नाश्त्यामध्ये रात्रीची शिल्लक राहीलेली व्हेज बिर्याणी, गवार रस्साभाजी आणि गाजराचा हलवा खाल्ला. मुक्काम केलेलं ठिकाण स्वच्छ केलं.
आता आम्ही आंबीच्या खोऱ्यातून मोसेच्या खोऱ्यात निघालो होतो. हा सगळा भाग पूर्णपणे निर्मनुष्य असल्यामुळं जैवविविधतेनं अतिशय नटलेला होता. रोडे खिंडीनंतर बरीच मोठी सपाटीवरची चाल झाल्यावर वरसगाव धरणाचा पाणीसाठा दिसू लागला. ६००~६५० मीटर्स उतरून नदीपात्रापाशी आलो.
अक्षांश आणि रेखांश सोबत असल्यामुळं 'मोसे' नदीचं उगमस्थान पटकन सापडलं. खरंतर हेच उगमस्थान आहे का असा प्रश्न पडावा अशी ती जागा होती. मानवी हस्तक्षेपामुळं सपाटीकरण करून उगमाचा ओढा पूर्णपणे बुजवला गेला होता. जमीन शेतीच्या लागवडीखाली आणली गेली होती. जे काही दिसत होतं ते मनाला जरी पटत नसलं तरी त्या ठिकाणी पूजा केली आणि मुगावच्या रस्त्याने चालून वरसगाव धरणाच्या पाणलोटाच्या बाजूला एका झाडाखाली बसून डबा खाल्ला. डब्यात काल रात्रीच बनवलेली चपाती आणि बटाटा फ्लॉवर रस्सा भाजी आणि गाजर हलवा होता.
मोसे उगमापासून पश्चिमेकडं गेल्यावर कुर्डूगडाला जाणारा निसणीचा घाट लागतो. जवळच प्रसिद्ध लिंग्या धबधबा आहे. उगमानंतर मोसे नदी पूर्वेकडं वाहत जात धामणओहोळ गावापुढं गडले धरणात जाते. गडले धरणानंतर मोसे नदी मुगाव, लवासा, पठारशेत, मोसे करत वरसगाव धरणात जाते. धरणानंतर पुढं मोसे कुरण गावापाशी पानशेतहून आलेल्या आंबीला मिळते. मोसे हे स्वराज्याच्या पहिल्या सरनौबतांचं म्हणजे बाजी पासलकरांचं गाव. बाजी पासलकरांमुळंच वरसगाव धरणाला बाजी पासलकर तलाव असं नाव दिलं गेलं आहे.
🚩 दिवस चौथा
रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५.
आज सकाळी जरा लवकरच आवरून निघायचं ठरवलं होतं, जेणेकरून ट्रेक उरकून घरी लवकर पोहोचता येईल. गेल्या चार दिवसांची सगळ्यांची कामं रखडली होती त्यामुळं आज सगळ्यांनी थोडं लवकरच निघायचं ठरवलं होतं. ताम्हिणीच्या विंझाई मंदीरामागून आदरवाडीला जायच्या वाटेनं बाहेर पडलो. ही वाट चांगल्या परिचयाची होती त्यामुळं अंधारातही निघता आलं. आज आमची पहिली नदी होती 'निळा.' या निळेचा उगम ताम्हिणी गावाच्या मागच्या डोंगरात होतो. आदरवाडीच्या वाटेवर मूळ विंझाईच्या मागच्या डोंगरावर पोहोचलो आणि डावीकडं चढून एका पठारावर आलो. आडवी ट्रॅव्हर्सी मारत निळा उगमाशी पोहोचलो आणि उगमस्थानाची पूजा केली. ही निळा मुळेची उपनदी ताम्हिणी गावाजवळच्या पुलाखालून मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जाऊन मिळते.
पवना नदीच्या उगमासमोर वाघोबाचं मंदीर आहे. पवना उगमापासुन उत्तरेकडं वाहत जात आतवण गावाजवळ पवना धरणात जाते. पवना धरणक्षेत्रात तुंग आणि तिकोना हे दोन किल्ले आहेत. हा सर्व भाग तुंगारण्य म्हणून शिवकाळात ओळखला जात असे. शास्ताखानाचा सरदार कारतलबखान चाकणच्या विजयानंतर चाकणहून उर्से, पुढं पवनेच्या खोऱ्यातील तुंगारण्यातून आतवण, कुरवंडे आणि आंबेनळी उर्फ उंबरखिंड मार्गाने चावणीला उतरला असावा असा माझा कयास आहे. तुंगारण्याचा उल्लेख कविंद्र परमानंदांनी त्यांच्या शिवभारतात केला आहे.
पवनामाईचं दर्शन घेऊन घुसळखांबला आलो आणि डावीकडं वळून देवघर गावाकडं निघालो. गावाच्या थोडं अलिकडं मुळेच्या उगमाशी मुळेश्वर देवस्थान आहे. मुळेश्वर शिवालयाच्या बाजूलाच 'मुळा' नदीचा उगम आहे. उदबत्ती लावून पुजा केली आणि आमच्या शेवटच्या गंतव्य ठिकाणाकडं म्हणजे इंद्रायणीच्या उगमस्थाकडं निघालो.
उगमानंतर मुळा नदी लगेचच मुळशी धरणात जाऊन मिळते पण धरण होण्यापूर्वी ती कुंभोरी, पोमगाव, शेडाणी, नांदिवली गावातून मालेपर्यंत येत असे. माले गावापाशी तिला पहिल्यांदा निळा, पौड गावापाशी वळकी, तर शेवटी बाणेर गावात रामनदी येऊन मिळते. पुण्यात संगम पुलाजवळ मुळा-मुठेचा संगम होतो.
🚩 उपसंहार -
आम्ही ट्रेकची सुरूवात केलेलं नीरा नदीच्या उगमाचं ठिकाण स्थानिक 'नीरेबावी' नावानं ओळखलं जातं. हे ठिकाण आम्ही केलेल्या सर्व नद्यांच्या उगमस्थानात आदर्श उगमस्थान म्हणता येईल. भोरच्या पंतसचिवांनी नीरेबावीचं १० × १० मीटर्सचं चीरेबंदी कुंडाचं बांधकाम केलं आहे. दगडातून पाझरणारं पाणी ओव्हरफ्लो होऊन गोमुखातून बाहेर पडतं. गोमुखाखाली आणखी एक छोटं कातळकोरीव कुंड असल्याचं आम्ही साफसफाई करत असताना जाणवलं. अर्थात गोमुखानंतरचं हे कुंड सद्यस्थितीत पुर्णपणे गाळ आणि मातीनं भरलं आहे. आम्ही ते थोडं मोकळं केलंय खरं पण ते पूर्णपणे मोकळं करण्यासाठी दोनचार दिवसांची एक विशेष मोहिम राबवावी लागेल. इंगळहळीकर सरांनी आणलेलं कुंतीचं रोप उगमस्थानापाशी लावलं. या कुंतीच्या फुलांना नारंगीसारखा सुगंध असतो. मूळचं भारतातीलच असलेलं कुंती हे मोठं आणि अनेक खोडाचं झुडूप आहे. पानं सदाहरित, गडद हिरव्या रंगाची असतात आणि मणक्याच्या बाजूने तीन ते नऊ पाने आळीपाळीने मांडलेली असतात. हे सदाहरित झुडूप बहुतेक वर्षभर फुलतं. फुलांमागे एक किंवा दोन बिया असलेली लहान अंडाकृती लाल फळे येतात.
आम्ही नीरा नदीच्या उगमस्थानापाशी लावलेल्या कुंती या झाडाव्यतिरिक्त बहूतेक नद्यांच्या उगमस्थानांपाशी शेलू, आंबटी, सीता अशोक, धूप, कासा, देवजांभूळ, पिटकुळी, चिकाडा, अंजनी, विखारा, रान जायफळ, हेद्दी, गोयंडा, सुरंगी, शेरस आणि तिरफळ असे सदाहरित स्थानिक वृक्ष साधारणपणे दिसून येतात. अर्थात हे सगळेच वृक्ष सगळ्याच नद्यांच्या उगमस्थानी असतीलच असंही नाही तर ते प्रदेशनिष्ठ आहेत. थोडक्यात कुंतीचा वृक्ष जर नीरेच्या उगमापाशी असेल तर तो इंद्रायणीच्या उगमाशी असेलच असं सांगता येत नाही. प्रदेशनिष्ठ असलेले हे वृक्ष पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचं पाणी मुळांमध्ये धरून ठेवतात आणि जसजसा पाऊस कमी होईल तसतसं ते मुळातलं पाणी सोडू लागतात. यालाच आपण 'नदीचा उगम' असं म्हणतो. उगमस्थानाशी हे वृक्ष जितके जास्त तितके दिवस उगमातून पाणी बाहेर येण्याचं प्रमाण जास्त असं साधं सोपं गणित आहे. पावसामुळं तयार झालेल्या हंगामी ओढ्यांना नदीचा उगम म्हणणं तसं संयुक्तिक होणार नाही.
आम्ही या ट्रेकमध्ये केलेलं आणखी एक महत्वाचं निरीक्षण असं की आम्ही हा ट्रेक अर्थातच सह्याद्रीच्या मुख्य रांगेवरून केला आणि आम्ही केलेल्या सगळ्या नद्यांचे उगम हे सह्याद्रीमध्ये जी क्रेस्ट लाईन आहे त्याच्या साधारणत: १०० ते २०० मीटर पुर्वेकडं खालच्या बाजूला आम्हाला पहायला मिळाले, ज्या ठिकाणचं सर्वसाधारण वार्षिक पर्जन्यमान अंदाजे पाच हजार मिलिमीटर इतकं आहे. अर्थात ही जरी सरासरी असली तरी गेल्यावर्षी ताम्हिणीत एकाच आठवड्यात अनैसर्गिक असा पाऊस पडला होता आणि हे काहीसं चिंताजनक आहे. पर्जन्यमानात गेल्यावर्षी आपल्या ताम्हिणीने चेरापुंजीलाही मागं टाकलं आहे.
🚩 निसर्ग संवर्धन - चिंता
उगमस्थानापाशी असलेल्या प्रदेशनिष्ठ वृक्षांचं एक कुटूंब असतं ज्याला 'नदी उगमस्थानाची जीवीत परिसंस्था' असं म्हणता येईल. त्यात त्याच्या आसपास असणारी आणि त्याच्या छत्रछायेत वाढणारी झाडं, पशूपक्षी, किटक हे सगळे घटक असतात, जे एकमेकांवर अप्रत्यक्षपणे अवलंबूनही असतात. यातला एक जरी घटक कमी झाला किंवा नष्ट झाला तरी त्याच्या कुटूंबातील इतर घटकांवर त्याचा परिणाम होतो. असं झालं तर पर्यायाने तिथल्या प्रदेशनिष्ठ सदाहरीत वृक्षांवर आणि सरतेशेवटी नदीच्या उगमावर त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम होतोच. प्रदेशनिष्ठ वृक्षांच्या कुटूंबाच्या जागी स्वतःचं कुटुंब ठेवून विचार केला म्हणजे त्यातली गंभीरता लक्षात येईल. नद्यांवर परिणाम होतो म्हणजे नेमकं काय होतं हे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नद्या आटत जातात म्हणजे उगमातून वर्षभर येणारं पाणी हळूहळू कमी होत जातं. नदीच्या उगमावर परिणाम झाला की त्याचा परिणाम थेट आपल्यावर होतो. पाऊस कमी पडतो, धरणं भरत नाहीत त्यातून मग सिंचनाचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. माझ्या लहानपणी चोवीस तास नळाला पाणी यायचं ते आता दोन दिवसातून एकदा फक्त चार तास येतं. जर मागच्या पंचवीस-तीस वर्षात एवढा बदल होऊ शकतो तर पुढच्या पंचवीस तीस वर्षात किती झपाट्याने बदल होईल याचा विचारही करवत नाही.जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केलेल्या आमच्या या भटकंतीत आम्हाला नीरा, शिवथर, आंबी आणि पवना या चारच नद्यांचे उगम अजूनही बऱ्यापैकी सुरू असल्याचं दिसलं. एकूण बारा नद्यांपैकी फक्त चार नद्यांचे उगम सुरू होते म्हणजे फक्त ३३% नद्यांमधून अजून पाणी येत होतं. ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. वर म्हटल्याप्रमाणं ज्या नद्यांचे उगम सुरू आहेत तिथली सदाहरीत कुटूंबं किंवा नदी परिसंस्था थोड्यातरी टिकून आहेत असं म्हणता येईल पण पुर्णपणे नक्कीच नाही कारण या उगमस्थानातूनही वर्षभर पाणी येत नाही. वर उल्लेखलेली नीरा, शिवथर, आंबी आणि पवना ही चार कुटूंब सोडली तर इतर कुटूंब पूर्णपणे देशोधडीला लागली आहेत असं नक्कीच म्हणावं लागेल. फक्त या नद्यांच्या खोऱ्यात राहणाऱ्या रहिवाश्यांनी किंवा या नद्यांवर अवलंबून असणाऱ्यांनीच नाही तर सगळ्याच खोऱ्यातील लोकांनी किमान इथून पुढं तरी नद्या कशा पुनरुज्जीवित होतील याचा अभ्यास करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कारण आज ते जात्यात आहेत आणि तुम्ही सुपात आहात पण आज ना उद्या तुम्हीसुद्धा जात्यात जाणार आहातच हे लक्षात घ्यायला हवं.
शालेय अभ्यासक्रमात सदाहरित वने, निमसदाहरित वने, पानझडीची अरण्ये वगैरे आपण शिकलेलो आहोत त्यामुळं त्याबद्दल सर्वांना माहिती आहेच. सदाहरित वनात असलेल्या प्रदेशनिष्ठ सदाहरीत वृक्षांची जागा आता हळूहळु पानगळीचे वृक्ष घेऊ लागले आहेत म्हणजेच सदाहरित वने संपून त्यांची जागा आता निमसदाहरित वने आणि पानझडीची अरण्ये घेत आहेत. मुख्यतः मानवाच्या हस्तक्षेपामुळे उगमस्थानी असणारे सदाहरित जंगल कमी होत आहे किंवा तेथील सदाहरित परिसंस्था बदलून तिथं पानगळतीची परिसंस्था उदयास येऊ लागली आहे. मोसे नदीच्या उगमस्थानी असणारा ओढा बुजवून शेतीसाठी तिथलं सपाटीकरण केलं गेलं आहे हे आम्ही नुकतंच पाहिलेलं मानवी हस्तक्षेपाचं जिवंत उदाहरण सांगता येईल. लवासा, अँबी व्हॅलीबद्दल तर न बोललेलंच बरं. सध्या जगाला भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळंही नदीची परिसंस्था धोक्यात आली आहेच पण ग्लोबल वॉर्मिंगच्या या परिणामालाही केवळ आणि केवळ मनुष्यच जबाबदार आहे हे विसरून चालणार नाही.
🚩 निसर्ग संवर्धन - आव्हाने
निसर्ग वाचवण्याचं मोठं आव्हान आज आपल्यापुढं आहे. नुसतं वृक्षारोपण करून, झाडं जगवून भागणार नाही तर त्याच्या जोडीला निसर्गात जे शिल्लक आहे, नैसर्गिक अधिवासात जे शिल्लक आहे म्हणजे जे तिथं आपोआप आलेलं आहे ते जसं आहे तसं टिकवावं लागेल. शिल्लक राहिलेल्या अशा ठिकाणांना मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवावं लागेल. सह्याद्रीच्या सदाहरीत अरण्यात येऊ घातलेले रिसॉर्ट्स कुठेतरी थांबवले गेले पाहिजेत. हे थांबवण्याचं मोठं आव्हान स्थानिक भूमिपुत्रांपुढं भविष्यात असणार आहे.
निसर्ग संवर्धन करताना पहिला नियम हाच आहे की, जे निसर्गनिर्मित आहे तेच फक्त मानवाने तिथे लावावं, तेही अगदी गरज असेल, हानी झाली असेल तरच. आम्ही नीरा नदीच्या उगमस्थानी कुंतीचं रोप का लावलं याचं कारण एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.
किल्ले संवर्धन करणाऱ्या जशा बऱ्याच संस्था आहेत तशा आणि तेवढ्या निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था नाहीत. यावरून एवढं नक्की समजतं की आज निसर्ग संवर्धन करण्यासाठीची जागरूकता म्हणावी तशी अजूनही आपल्यात आलेली नाही. आज दु:खानं सांगावं लागतं की महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था सोडल्या तर या विषयावर फारसं कुणी यावर काम करताना दिसत नाही. शिवाय सरकार दरबारीसुद्धा निसर्ग संवर्धनाविषयी आपल्याला अनास्थाच पहायला मिळते आणि जी काही थोडीफार दिसते किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्यात संवर्धनापेक्षा त्यातून किती 'महसूल' मिळेल यावरच भर असल्याचं दिसून येतं.
आपली संस्कृती ज्यायोगे समृद्ध झाली ती नदी, त्या काठची मंदिरं, देवराया यांचं संवर्धन केलं तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना प्यायला पाणी मिळेल आणि श्वासासाठी ऑक्सिजन मिळेल. विकास व्हावा पण तो निसर्गाला, पर्यावरणाला धक्का पोहोचू न देता हे जेव्हा माणसाला समजेल तेव्हाच तो पृथ्वीवर जगू शकेल. निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला तर स्वतःचं अस्तित्व या भुतलावरून हळूहळू संपत जाईल हे माणसाला जेव्हा समजेल तेव्हाच निसर्गाचा सुवर्णकाळ सुरू झाला असं म्हणता येईल. अर्थात ही शक्यता सध्या तरी धूसर वाटते आहे हे काही वेगळं सांगायला नको. वेळ निघून गेल्यानंतर शहाणपण येऊन उपयोग नाही तर त्यासाठी वेळीच प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्रात अनेक संतांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं. त्या संतांच्या 'नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी।' या एका वचनेच्या संकल्पनेवर आमचा हा जंबो ट्रेक आधारलेला होता. सद्य परिस्थितीत समाज प्रबोधन करण्यासाठी त्या संत वचनेत थोडा बदल करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे असं वाटतं. मूळ संत वचनेऐवजी सर्व संतश्रेष्ठींची माफी मागून 'नीरा इंद्रायणी पडता दृष्टी, संवर्धन करिता शुद्ध सृष्टी।' असं मी म्हणेन. हा ब्लॉग वाचून शंभरातले दोन जण जरी नदी, निसर्ग संवर्धनाच्या कामात सहभागी झाले तरी या लिखाणामागचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल.
बहुत काय लिहिणें। बाकी आपण सुज्ञ असा॥
मर्यादेयं विराजते॥
दिलीप वाटवे...
🚩 संदर्भ -
🚩 फोटो -
जबरदस्त माहिती, समर्पक, सूचक वक्तव्य केले आहेस. निरीक्षण काय आणि कसे करावे याचे उत्तम उदाहरण. नदी परिसंस्था टिकवण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक लेख आहे.
उत्तर द्याहटवादिलीप आणि फाल्कन्स ...
उत्तर द्याहटवातुमचे कौतुक आणि अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. तुम्ही थीम बेस्ड ट्रेक तर करताच, पण नद्यांची उगमस्थानं धुंडाळीत केलेली अभ्यासपूर्ण भटकंती विशेष भावली. नद्यांची नैसर्गिक उगमस्थानांचा भवताल, तेथील मानवी हस्तक्षेपामुळे भविष्यातील होणाऱ्या परिणामांचे भीषण वास्तव, इ. सर्वच घटकांवर प्रकाश टाकणारा असा हा ब्लॉग आहे. मा. इंगळहाळीकर सरांचे योग्य मार्गदर्शन आणि दिलीपच्या नेतृत्वाखाली झालेले प्लॅनिंग यात या भटकंतीचे यश सामावलेलं आहे हे नक्कीच. त्याची पूर्ण झलक या ब्लॉगमध्ये मिळते, तरीही ब्लॉगमधील शेवटचे तीन मुद्दे ... उपसंहार, निसर्ग संवर्धन - चिंता आणि निसर्ग संवर्धन - आव्हाने हे जास्त भावले. पुढील अशाच अभ्यासपूर्ण मोहिमांसाठी खूप शुभेच्छा.