रविवार, २४ मे, २०२६

"सप्तबद्री, पंचप्रयाग यात्रा"


       उत्तराखंडच्या भूमीला देवभूमी म्हटलं जातं. देवांची भूमी असलेल्या या उत्तराखंडचं सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व कोणापासूनही लपलेलं नाही. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला हा प्रदेश त्याच्या असंख्य भव्य आणि दिव्य मंदिरांसाठी ओळखला जातो. उत्तराखंड राज्य हे चार धाम यात्रेसाठी सुद्धा ओळखलं जातं ज्यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांचा समावेश आहे. जेव्हा जेव्हा चार धाम यात्रा सुरू होते तेव्हा केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भक्तांचा अखंड ओघ उत्तराखंडमध्ये सुरु होतो.

       हिंदू धर्मातील सर्वोच्च देवता, भगवान शिव आणि भगवान विष्णू ज्यांना आपण त्रिमूर्तीतील एक म्हणून ओळखतो त्यांची उत्तराखंड ही भूमी. भगवान शिव यांची 'विनाश आणि परिवर्तनाची देवता,' तसंच 'योग, ध्यान आणि काळाचे स्वामी' म्हणून पूजा केली जाते तर भगवान विष्णूंना 'विश्वाचे पालनकर्ता आणि रक्षक' म्हणून पूजलं जातं. वैष्णव धर्मात त्यांना सर्वोच्च सत्ता म्हणजेच 'परब्रह्म' मानलं जातं. जर मी तुम्हाला म्हटलं की तिबेटमध्ये असलेली कैलास-मानसरोवर आणि उत्तराखंडमधले केदारनाथ, बद्रीनाथ ही फक्त एक सुरुवात आहे तर नक्कीच तुम्हाला प्रश्न पडेल की मी हे काय म्हणतोय. त्याच्यापुढंही अजून काही आहे का? तर...

       ...तर त्याच्यापुढं सुद्धा अजून बरंच काही आहे जे फारसं कुणाला माहिती नाही कारण कैलास-मानसरोवर म्हणजेच बडा कैलासासोबतच श्रीखंड महादेव, किन्नौर कैलास, मणीमहेश कैलास आणि आदी कैलास असे एकूण पाच कैलास आहेत ज्यांना पंचकैलास असं म्हटलं जातं. जसे पंचकैलास आहेत तसेच पंचकेदार देखील आहेत. बहूतेकांना त्यातला फक्त केदारनाथ माहिती असतो पण केदारनाथासोबतच मध्यमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर असे पाच केदार देखील आहेत. पण आज मी तुम्हाला उत्तराखंडमधल्या पहाडी भागात वसलेल्या बद्रीनाथाच्या म्हणजे विष्णूंच्या सात रुपांबद्दल सांगणार आहे.

       बद्रीनाथच्या वायव्येस २४ किमी अंतरावर असलेल्या सतोपंथपासून ते नंदप्रयागच्या दक्षिणेपर्यंतच्या परिसराला 'बद्रीक्षेत्र' म्हणतात. या प्रदेशात भगवान विष्णूला समर्पित एकूण सात मंदिरं आहेत जी सप्तबद्री म्हणून ओळखली जातात. बद्रीनाथ किंवा विशाल बद्री हे सप्तबद्रींचं मुख्य मंदिर आहे. याशिवाय आदि बद्री, वृद्ध बद्री, नृसिंह बद्री, भविष्य बद्री, ध्यान बद्री आणि योगध्यान बद्री यांसह इतर सहा बद्री मंदिरं देखील आहेत. बद्रीनाथ म्हणजेच विशाल बद्री हे एक ते ठिकाण आहे जिथं विश्वासाचा ओघ अगदी ओसंडून वाहत असतो पण या बद्रीनाथशिवाय उत्तराखंडमध्ये अजून तशाच सहा दिव्य शक्तींचं देखील वास्तव्य आहे. बद्रीनाथाबरोबरच उत्तराखंडमधल्या या सहा दिव्य शक्तींना एकत्रितपणे सप्तबद्री म्हणून ओळखलं जातं.
 

       नुकतीच आम्ही फाल्कन ट्रेकर्सच्या काही मंडळींनी सहकुटूंब सप्तबद्रींसोबत पंचप्रयागांची यात्रा केली. या यात्रेसोबत वाटेतच असलेल्या पंचप्रयागांचं सुद्धा स्नान करुन दर्शन घेतलं. या यात्रेला आम्हाला हरिद्वार, ऋषिकेश, तुंगनाथ आणि कल्पेश्वरसह पुणे ते पुणे असे एकूण तेरा दिवस लागले. आमच्या ट्रिपमधलं एक तुंगनाथ सोडलं तर आम्हाला सप्तबद्री आणि पंचप्रयाग याठिकाणी कुठंही फारसं चालावं लागलं नाही. ही सगळी ठिकाणं गाडीतून जाऊन अगदी आरामात पाहता येतात. बरं सर्वांच्या परिचयाचं असलेलं बद्रीनाथ सोडलं तर इतर सगळ्या बद्रींची ठिकाणं अतिशय शांत आणि अजिबात गर्दी नसलेली आहेत.

       जसं बद्रींचं तसंच प्रयागांचं. 'प्रयाग' म्हणजे दोन नद्यांच्या संगमाचं ठिकाण. हिंदू धर्म आणि संस्कृतीत संगमावर स्नान करणं अत्यंत पवित्र आणि मोक्षदायी मानलं जातं. वाहत्या नद्यांच्या आणि पवित्र ठिकाणांच्या वातावरणाचा मनावर आणि शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. संगमात पवित्र स्नान केल्यामुळं सर्व पापे नष्ट होतात आणि आत्मशुद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे. त्यातून भगिरथाने स्वर्गातून पृथ्वीवर आणलेल्या भागिरथीला ज्या नद्या येऊन मिळतात त्या पाच पवित्र नद्यांच्या संगमावर म्हणजेच पंचप्रयागांवर स्नान करणं म्हणजे आमच्या दृष्टीनं तर भाग्याचंच होतं. पंचप्रयागांमधलं देवप्रयाग हे एक ठिकाण सोडलं तर इतर कोणत्याच प्रयागावर अजिबात गर्दी नव्हती. सप्तबद्रीची यात्रा करताना वाटेतच असलेले पाच प्रयाग देखील पाहून होतात त्यामुळं ज्याला सप्तबद्रीची यात्रा करायची आहे त्यांनी सप्तबद्रीसोबतच पंचप्रयागांमध्ये सुद्धा अवश्य स्नान करावंं.


       ज्या सप्तबद्रींबद्दल आत्ता आपण बोलतो आहोत ते सप्तबद्री कोणते आहेत? सप्तबद्री आणि त्यांचं महत्त्व काय आहे? चला पाहूया...
 
🚩 १) आदि बद्री -

       उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात वसलेला पंचबद्री पैकी हा पहिला बद्री आहे. 'आदि बद्री' कर्णप्रयागपासून सतरा किलोमीटर आणि चांदपूर गढीपासून तीन किलोमीटर अंतरावर हल्द्वानी रस्त्यावर वसलेला आहे. चांदपूर गढीपासून तीन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला प्राचीन मंदिरांचा एक समूह दिसतो. हाच तो आदि बद्री मंदिरसमूह. अशी आख्यायिका आहे की स्वर्गारोहिणी शिखराच्या मार्गाने जात असताना उत्तराखंडमध्ये आलेल्या पांडवांनी ही मंदिरं बांधली. असंही म्हटलं जातं की, ती आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी बांधली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार ती आठव्या ते अकराव्या शतकादरम्यान कत्युरी राजांनी बांधली होती. गेल्या काही वर्षांपासून ही मंदिरं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या देखरेखीखाली आहेत.

       मूळत: या मंदिर संकुलात एकूण सोळा मंदिरं होती त्यापैकी सध्या फक्त चौदा शिल्लक आहेत. मुख्य मंदिर त्याच्या मोठ्या आकारामुळं आणि उंच चौथऱ्यावर बांधलेलं असल्यामुळं लगेचच ओळखता येतं. या मुख्य मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूंची उभ्या चार हातांच्या स्वरूपातील एक मीटर उंच सुंदर काळ्या शाळिग्रामची मूर्ती आहे. आदि बद्री मंदिराचे दरवाजे पौष महिन्यात बंद केले जातात आणि मकर संक्रांतीला पुन्हा उघडले जातात. असं मानलं जातं की भगवान विष्णू सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुगात इथं वास्तव्यास होते. जेव्हा खराब हवामानामुळं बद्रीनाथ धामचा मार्ग बंद असतो तेव्हा भक्त बद्रीनाथाची इथं पूजा करतात.

       मुख्य मंदिरासमोर भगवान विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाला समर्पित एक छोटे मंदिर आहे. या समूहातील इतर मंदिरं सत्यनारायण, लक्ष्मी, अन्नपूर्णा, चक्रभान, मूर्ती नसलेलं कुबेर, राम, लक्ष्मण, सीता, काली, भगवान शिव, गौरी, शंकर आणि हनुमान यांसारख्या इतर देवतांना समर्पित आहेत. ही दगडी मंदिरं अतिशय सुबकपणे कोरलेली आणि तपशीलवार असून, प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य इतरांपेक्षा वेगळं आणि अद्वितीय आहे.

       आजही या मंदिरात पूजा केली जाते आणि जवळच्या थापली गावातील रहिवासी असलेले चक्रदत्त थापलियाल या विष्णू मंदिराची देखभाल करतात. थापली गावातील ब्राह्मण गेल्या सात वर्षांपासून या मंदिराचे पुजारी आहेत.




 
🚩 २) वृद्ध बद्री -

       ऋषिकेश-बद्रीनाथ हमरस्त्यावर, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ऋषिकेशपासून २३८ किलोमीटर आणि जोशीमठच्या अलिकडं ०९ किलोमीटर अंतरावर असलेल्या या सगळ्यात प्राचीन मंदिरात पोहोचण्यासाठी आधी आपल्याला रस्त्यानं 'अनिमठ' गावात पोहोचवं लागतं. या धार्मिक स्थळी पोहोचण्यासाठी देहरादून, ऋषिकेश आणि हरिद्वार इथून बस, कार आणि टॅक्सीनेही सहज पोहोचता येतं. हमरस्त्यापासून गावात उतरणाऱ्या पायी वाटेनं २०० मीटर्स उतरलं की आपण वृद्ध बद्री मंदिरात पोहोचतो.

       सात बद्रींपैकी एक असलेलं 'वृद्ध बद्री' हे भगवान विष्णूला समर्पित असलेलं मंदिर आहे. या मंदिरात त्यांच्या वृद्ध रूपाची पूजा केली जाते. डोंगर, शांतता आणि हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यात वसलेलं हे मंदिर असंख्य भाविकांना आकर्षित करतं. सात बद्रींपैकी हे एकमेव मंदिर असं आहे की जे वर्षभर भाविकांसाठी खुलं असतं. असं म्हटलं जातं की नारदानं भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू एका वृद्धाच्या रूपात तिथं प्रकट झाले आणि त्यांनी नारदांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

       दक्षिण भारतातील ब्राह्मणांकडून पूजा केली जाणारी आणि शाळिग्राम शिळेत तयार केलेली एका वृद्धाची मूर्ती या मंदिरात स्थापित करण्यात आली आहे. असं म्हटलं जातं की कलियुगापूर्वी या ठिकाणी बद्रीनाथाची पूजा केली जात असे पण कलियुगात आलेल्या एका पुरामुळं ही मूर्ती जवळच्याच नारद कुंडात गाडली गेली. ही मूर्ती आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी शोधून काढली आणि मंदिरात तिची प्राणप्रतिष्ठा केली.



🚩 ३) नृसिंह बद्री - 

       श्री नृसिंह मंदिर हे चमोली जिल्ह्यातील जोशीमठ किंवा ज्योर्तिमठ या डोंगराळ गावात वसलेलं आहे. जोशीमठ गाव वरच्या आणि खालच्या अशा दोन मुख्य भागांमध्ये विभागलेलं आहे. नृसिंह मंदिर खालच्या बाजार परिसरात मुख्य बाजारपेठेच्या अगदी मध्यभागी वसलेलं आहे. जोशीमठ गावात होणाऱ्या वाहनकोंडीच्या समस्येमुळं पोलिस प्रशासनानं एकेरी वाहतूक सुरु केली आहे. ऋषिकेशहून बद्रीनाथकडं जाताना खालच्या बाजारपेठेत हे नृसिंह मंदिर आहे. मंदिराच्या जवळपास पार्किंगची सोय नसल्यामुळं मंदिरात जाण्यासाठी थोडं चालत जावं लागतं.

       हे मंदिर भगवान विष्णूचा सिंह आणि मनुष्य अवतार असलेल्या भगवान नृसिंहाला समर्पित आहे. मुळातच उग्र रुप असलेल्या नृसिंहाची शाळिग्राम दगडापासून बनवलेली मूर्ती इथं मात्र नृसिंहाचा चेहरा शांत रूपात दर्शवते. हिवाळ्यात जेव्हा बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात तेव्हा भगवान बद्री विशाल यांची उत्सव मूर्ती या मंदिरात आणली जाते. हिवाळ्याच्या काळात सहा महिने या मंदिरातच त्यांची पूजा केली जाते.

       श्री नृसिंहाचं हे प्राचीन मंदिर आठव्या शतकात स्वत: आदि गुरू शंकराचार्यांनी स्थापन केलं असं मानलं जातं. आदि शंकराचाऱ्यांनी स्थापन केलेल्या चार शक्तिपीठांपैकी पहिलं शक्तिपीठ जोशीमठ इथं ज्योर्तिमठ नावानी स्थापन केलं. जोशीमठ हे ज्योर्तिमठ नावाचंच अपभ्रंश रुप आहे. हे श्री नृसिंह मंदिर सप्तबद्रींपैकी एक 'नृसिंह बद्री' म्हणूनही ओळखलं जातं.

       या मंदिरातील मूर्तीशी एक आश्चर्यकारक रहस्य आणि भविष्यवाणी जोडलेली आहे. स्थानिक मान्यतेनुसार मंदिरात स्थापित भगवान नृसिंहाच्या मूर्तीचा डावा हात दरवर्षी हळूहळू बारीक होत जातो आहे. असं मानलं जातं की ज्या दिवशी हा हात पूर्णपणे निखळून पडेल त्या दिवशी बद्रीनाथ धामच्या रस्त्यावर असलेले नर आणि नारायण नावाचे दोन पर्वत एकमेकांत विलीन होतील. असं झाल्यानंतर सध्याच्या बद्रीनाथ धामचा मार्ग कायमचा बंद होईल आणि भविष्यात भगवान बद्रीनाथ 'भविष्य बद्री' नावाच्या नवीन ठिकाणी प्रकट होतील.

🚩 ४) भविष्य बद्री -

       चमोली जिल्ह्यातील जोशीमठपासून १७ किमी अंतरावर तपोवनच्या पुढं धौलीगंगेच्या खोऱ्यातल्या सुभाई गावाजवळ भविष्य बद्रीचं पवित्र मंदिर आहे. सध्या मंदिराच्या जवळपर्यंत रस्ता झाला आहे त्यामुळं दर्शनासाठी फारसं चालावं लागत नाही. हिंदू पौराणिक कथा आणि स्कंद पुराणानुसार जेव्हा कलियुग परमोच्च बिंदूवर पोहोचेल तेव्हा 'नर' आणि 'नारायण' पर्वत एकमेकांत विलीन होतील ज्यामुळं बद्रीनाथ धामचा मार्ग कायमचा बंद होईल तेव्हा 'भविष्य बद्री' याच ठिकाणी भगवान बद्रीनाथांची पूजा केली जाईल म्हणूनच या मंदिराला 'भविष्यातील बद्री' अर्थात भविष्य बद्री असं नाव पडलं आहे.

       सध्या बद्रीनाथाच्या मंदिराचे दरवाजे बंद केल्यावर बद्रीनाथाची पूजा जोशीमठ येथील नृसिंह मंदिरात केली जाते. जोशीमठच्या या नृसिंह मंदिरातील भगवान नृसिंहाच्या मूर्तीचा एक हात काळाच्या ओघात हळूहळू क्षीण होत आहे. एका भविष्यवाणीनुसार जेव्हा हा हात पूर्णपणे गळून पडेल तेव्हा सध्याच्या बद्रीनाथ इथं पोहोचणं अतिशय दुष्कर होईल त्यामुळं साहजिकच बद्रीनाथाचं दर्शन बंद होईल त्यामुळं भक्तांसाठी विष्णू भगवान भविष्य बद्री येथे प्रकट होतील.

       भगवान विष्णूच्या भविष्यदर्शनाचं स्थान मानलं जाणारं भविष्य बद्री मंदिर एका घनदाट पाइनच्या जंगलात वसलेलं आहे. येथील पुजारी सांगतात की मंदिरातील एका दगडावर भगवान विष्णू आणि इतर देवतांच्या प्रतिमा हळूहळू साकार होत आहेत. ही प्रक्रिया जरी मंद असली तरी सर्वांसाठी पाहणं मात्र ती कठीण आहे.





🚩 ५) योगध्यान बद्री -

       योगध्यान बद्री हे चमोली जिल्ह्यातील पांडुकेश्वर इथं असलेलं भगवान विष्णूचं एक पवित्र आणि प्राचीन मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून १,९२० मीटर उंचीवर हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर बद्रीनाथच्या अलिकडं २२ किलोमीटरवर वसलेलं आहे. हे मंदिर त्याच्या शांत परिसरासाठी आणि आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखलं जातं. योगध्यान या नावाचा अर्थ 'ध्यान आणि भक्ती' असा आहे. याचं कारण असं मानलं जातं की भगवान विष्णू इथं एका योगीप्रमाणे ध्यानस्थ रूपात प्रकट झाले होते.

       योगध्यान बद्री मंदिराचा पांडवांशी घनिष्ठ संबंध आहे. असं मानलं जातं की पांडवांचे वडील राजा पांडू यांनी हिमालयात वास्तव्य करत असताना या ठिकाणी भगवान बद्रीनाथांची योगध्यान मुद्रेतील मूर्ती स्थापित केली. आध्यात्मिक शांती आणि मुक्तीच्या शोधात त्यांनी आपली आयूष्याची शेवटची वर्षे इथं तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला. राजा पांडूने केलेल्या योग आणि ध्यानावरुन हे समर्पक नाव या बद्रीला मिळलं आहे. जिथं ‘योग’ म्हणजे मिलन आणि ‘ध्यान’ म्हणजे एकाग्रता किंवा चिंतन. शांत पर्वत आणि हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यात वसलेलं हे मंदिर केवळ भक्तांनाच नव्हे तर निसर्गप्रेमी आणि आध्यात्मिक साधकांनाही आकर्षित करते.

       भक्तांचा असा विश्वास आहे की इथं केलेल्या प्रार्थनेमुळं पापं धुतली जातात आणि मनुष्याला आंतरिक शांती मिळते. असंही म्हटलं जातं की अर्जुनाचा नातू राजा परीक्षित याने सिंहासनाचा त्याग करून इथंच निवृत्ती घेतली होती. स्थानिक परंपरेनुसार पांडवांनी हिमालयातील प्रवासानंतर स्वर्गारोहणाकडे जाणाऱ्या आपल्या अंतिम मार्गावर या पवित्र स्थळातून प्रवास केला होता. या संबंधामुळे योगध्यान बद्री हे केवळ एक पूजास्थानच नाही तर पांडवांच्या वारसा मार्गावरील एक आध्यात्मिक महत्त्वाचे स्थानही ठरते. जेव्हा भक्त बद्रीनाथासोबतच योगध्यान बद्रीचेही दर्शन घेतात तेव्हाच बद्रीनाथ धामची यात्रा पूर्ण झाली असं मानलं जातं.

       पवित्र शालिग्राम दगडापासून बनवलेल्या या मूर्तीचं दर्शन घेताना स्थिरता आणि दैवी अस्तित्वाची भावना जाणवते. योगध्यान बद्री मंदिराच्या आत भगवान उद्धव आणि भगवान कुबेर यांच्या मूर्ती देखील आहेत. मंदिराची रचना साधी पण पारंपरिक असून दगडी भिंती आणि शांत गर्भगृहाने युक्त अशा आहेत ज्या आपल्यामध्ये शतकानुशतकांची भक्ती आणि इतिहास सामावून घेतात. येथे सापडलेल्या शिलालेखांसह प्राचीन ताम्रपट त्याच्या ऐतिहासिक महत्त्वात भरच घालतात.






🚩 ६) ध्यान बद्री -

       ध्यान बद्री मंदिर उर्गम खोऱ्यात कल्पेश्वरजवळ कल्पगंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. मंदिरातील भगवान विष्णूची मूर्ती चार हातांची असून ती ध्यानस्थ मुद्रेत आणि काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे. सध्याच्या ध्यान बद्री मंदिराची निर्मिती आठव्या शतकात आदि शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. हे मंदिर उत्कृष्ट कलाकृती आणि दगडी कोरीव कामांनी सजवलेलं आहे. हे मंदिर दिसायला साधारण श्री बद्रीनाथ मंदिरासारखंच आहे. प्राचीन काळी जेव्हा हिवाळ्यात भक्तांना श्री बद्रीनाथ मंदिरात जाणं शक्य नसे तेव्हा ते ध्यान बद्री इथं भगवान विष्णूची प्रार्थना करत असत. ध्यान बद्री मंदिराच्या चारही दिशांना चार मंदिरं आहेत. ध्यान बद्री मंदिराच्या पश्चिमेला काशी विश्वनाथ मंदिर, पूर्वेला कुबेर धारा, उत्तरेला घंटाकर्ण मंदिर आणि दक्षिणेला चंडिका मंदिर आहे. ध्यान बद्री मंदिराची देखभाल उर्गम गावातच राहणारं डिमरी कुटुंब करतं की जे श्री बद्रीनाथ मंदिरातील लक्ष्मी मंदिराचे मुख्य पुजारी देखील आहेत.

       ध्यान बद्रीची आख्यायिका अशी सांगितली जाते की हे मंदिर पांडव कुळातील राजा पुरंजय यांचा पुत्र उर्वर्षी यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी उर्गम प्रदेशात तपश्चर्या करून भगवान विष्णूचं मंदिर बांधलं. त्यांच्या हातात चक्र आणि शंख आहेत. ध्यान बद्री मंदिराचं आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहाच्या भिंतींवर पांडवांचे मानवी चेहऱ्यांचे दगडी मुखवटे कोरलेले आहेत ज्यांचा उपयोग जत्रांमध्ये मुखडा नृत्यासाठी केला जातो. भगवान विष्णूच्या मुख्य मूर्तीजवळ अनेक शाळिग्राम दगडही दिसतात. येथे भगवान शिवाचे एक मंदिरही आहे तेही आदि शंकराचाऱ्यांच्या काळात बांधले गेले. उर्गम गावाजवळच असलेलं कल्पेश्वर शिवमंदिर हे शिवाच्या पवित्र पंचकेदारांपैकी एक आहे. ध्यान बद्रीच्या दर्शनासोबतच आपल्याला कल्पेश्वर महादेवाचं दर्शन देखील घेता येतं.









🚩 ७) बद्रीनाथ -

       बद्रीनाथ किंवा बद्रीनारायण मंदिर हे भारतातील चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर हिंदू देवता विष्णूला समर्पित असून हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या चार धामांपैकी एक आहे. हे एक प्राचीन मंदिर असून त्याच्या बांधकामाचे पुरावे सातव्या ते नवव्या शतकातील असल्याचे आढळतात. मंदिराच्या नावावरूनच त्याच्या सभोवतालच्या शहरालाही बद्रीनाथ असं म्हटलं जातं. भौगोलिकदृष्ट्या हे स्थळ समुद्रसपाटीपासून ३,१३३ मीटर म्हणजेच १०,२७९ फूट उंचीवर वसलेलं आहे. हिवाळ्यात या सगळ्या भागात बर्फवृष्टी होत असल्यामुळं हे मंदिर वर्षातील केवळ सहा महिन्यांच्या मर्यादित कालावधीसाठीच खुलं असतं.

       बद्रीनाथ मंदिरात भगवान विष्णूचं एक रूप असलेल्या बद्रीनारायणाची पूजा केली जाते. इथं शाळिग्रामची एक मीटर उंच मूर्ती आहे जी जवळच्याच नारद कुंडातून उत्खनन करून आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी स्थापित केली होती असं मानलं जातं. अनेक भक्त या मूर्तीला विष्णूंच्या आठ क्षेत्रांपैकी एक मानतात. हे मंदिर उत्तर भारतात असलं तरी येथील मुख्य पुजारी ज्यांना 'रावल' म्हटलं जातं ते दक्षिण भारतातील केरळ राज्यातील नंबुदिरी पंथाचे ब्राह्मण आहेत.

       विष्णू पुराण, महाभारत आणि स्कंद पुराण यांसारख्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. आठव्या शतकापूर्वी आळवार संतांनी लिहिलेल्या 'नालायिरा दिव्य प्रबंध' यामध्येही त्याच्या वैभवाचे वर्णन आहे. दुसऱ्या एका सिद्धांतानुसार या मंदिराला बद्री विशाल म्हटलं जातं आणि विष्णूला समर्पित असलेल्या जवळच्या इतर सहा मंदिरांसह आदि बद्री, वृद्ध बद्री, नृसिंह बद्री, भविष्य बद्री, ध्यान बद्री आणि योगध्यान बद्री यांना एकत्र करून 'सप्तबद्री' म्हणून ओळखला जाणारा समूह तयार होतो.

       हिमालयात वसलेलं बद्रीक्षेत्र वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं गेलं. स्कंद पुराणात बद्रीक्षेत्राचा उल्लेख 'मुक्तिप्रदा' असा आहे ज्यावरून असं स्पष्ट होतं की सत्ययुगातही या क्षेत्राचं नाव हेच होतं. त्रेतायुगात भगवान नारायणाच्या या प्रदेशाला 'योग सिद्ध' म्हटलं जात असे आणि नंतर द्वापरयुगात भगवानांच्या प्रत्यक्ष दर्शनामुळे याला 'मणिभद्र आश्रम' किंवा 'विशाल तीर्थ' म्हटलं जाऊ लागलं. कलियुगात हे ठिकाण 'बद्रिकाश्रम' किंवा 'बद्रीनाथ' म्हणून ओळखलं जातं. येथे आढळणाऱ्या बद्री म्हणजेच बोर वृक्षांच्या विपुलतेमुळे या ठिकाणाला त्याचं नाव मिळालं. एडविन टी. ऍटकिन्सन यांनी त्यांच्या 'द हिमालयन गॅझेटियर' या पुस्तकात नमूद केलं आहे की या ठिकाणी एकेकाळी बद्रीची घनदाट जंगले होती पण त्यांचा कोणताही मागमूस आता शिल्लक नाही.

       बद्रीनाथ नावाच्या उत्पत्तीबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा नारद मुनी भगवान विष्णूला भेटण्यासाठी क्षीरसागराला गेले जिथं त्यांनी देवी लक्ष्मीला त्यांचे पाय दाबताना पाहिलं. आश्चर्यचकित होऊन नारदानं याबद्दल देवांना विचारलं त्यामुळं भगवान विष्णू अपराधी भावनेने व्यथित होऊन तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघून गेले. जेव्हा भगवान विष्णू योग ध्यान आसनात ध्यान करत होते तेव्हा जोरदार हिमवर्षाव सुरू झाला. भगवान विष्णू पूर्णपणे बर्फात बुडून गेले. त्यांची अवस्था पाहून देवी लक्ष्मीचे हृदय द्रवले आणि तिने स्वतः बद्री वृक्षाचे रूप धारण करून भगवान विष्णूजवळ उभे राहून सर्व बर्फ स्वतःवर घेण्यास सुरुवात केली. देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंचे सूर्य, पाऊस आणि बर्फापासून रक्षण करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. अनेक वर्षांनंतर जेव्हा भगवान विष्णूंनी आपली तपश्चर्या पूर्ण केली तेव्हा त्यांनी पाहिले की देवी लक्ष्मी बर्फाने झाकलेल्या होत्या. देवी लक्ष्मीची तपश्चर्या पाहून ते म्हणाले 'हे देवी! तू सुद्धा माझ्याइतकीच तपश्चर्या केली आहेस, म्हणून आजपासून या ठिकाणी माझी तुझ्यासोबत पूजा केली जाईल आणि तू बद्री वृक्षाच्या रूपात माझं रक्षण केल्यामुळं आजपासून मला 'बद्री के नाथ' म्हणजेच बद्रीनाथ म्हणून ओळखलं जाईल.'

       पौराणिक लोककथेनुसार, बद्रीनाथ आणि त्याच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर एकेकाळी शिवभूमी म्हणजेच केदारखंड म्हणून ओळखला जात होता. जेव्हा गंगा नदी पृथ्वीवर अवतरली तेव्हा ती बारा प्रवाहांमध्ये विभागली गेली आणि या ठिकाणाहून वाहणारा प्रवाह अलकनंदा म्हणून ओळखला जाऊ लागला. आख्यायिकेनुसार जेव्हा भगवान विष्णू त्यांच्या ध्यानासाठी योग्य जागा शोधत होते तेव्हा ते अलकनंदा नदीजवळील या जागेकडे आकर्षित झाले. नीलकंठ पर्वताजवळ भगवान विष्णू बालकाच्या रूपात अवतरले आणि रडू लागले. त्यांचे रडणे ऐकून देवी पार्वतीचे हृदय द्रवले. त्या बालकाजवळ गेल्या आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बालकाने त्याच्या ध्यानासाठी त्या जागेची विनंती केली. तिच ही पवित्र जागा आता बद्रीविशाल म्हणून ओळखली जाते.

       विष्णू पुराणात या प्रदेशाशी संबंधित आणखी एक कथा सांगितली आहे त्यानुसार धर्माला नर आणि नारायण नावाचे दोन पुत्र होते ज्यांनी धर्माचा प्रसार करण्यासाठी या ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. आपला आश्रम स्थापन करण्यासाठी एका आदर्श जागेच्या शोधात त्यांनी वृद्ध बद्री, योग बद्री, ध्यान बद्री आणि भविष्य बद्री या चार ठिकाणी भेट दिली. अखेरीस त्यांना अलकनंदा नदीच्या काठावर एक गरम आणि एक थंड पाण्याचा झरा सापडला त्यामुळं त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या परिसराला बद्री विशाल असं नाव दिलं. असंही मानलं जातं की व्यासांनी महाभारत याच ठिकाणी लिहिलं आणि नर आणि नारायण त्यांच्या पुढच्या जन्मात अनुक्रमे अर्जुन आणि कृष्ण म्हणून जन्माला आले. महाभारत काळातील आणखी एक मान्यता अशी आहे की पांडवांनी याच ठिकाणी त्यांच्या पूर्वजांसाठी पिंडदान केलं होतं. याच कारणामुळे आजही भाविक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पिंडदान करण्यासाठी बद्रीनाथच्या ब्रह्मकपाल क्षेत्राला भेट देतात.

पवन मंद सुगंध शीतल,
हेम मंदिर शोभितम् ।
निकट गंगा बहत निर्मल,
श्री बद्रीनाथ विश्वंभरम् ॥





       बद्रीनाथ इथलं बद्री विशाल, पांडुकेश्वर इथलं योगध्यान बद्री, ज्योतीर्मठपासून १७ किमी अंतरावर असणाऱ्या सुभाई गावाजवळचा भविष्य बद्री, ज्योर्तिमठपासून सात किलोमीटर अंतरावर अनिमठ  इथला वृद्ध बद्री आणि कर्णप्रयागपासून १७ किमी अंतरावर राणीखेत रस्त्यावर असलेला आदि बद्री या पाच मंदिरांना साधारणपणे पंचबद्री म्हटलं जातं. उत्तराखंडमध्ये याबद्दल माहिती घेतली तर बद्री पाचच आहेत असंच सांगितलं जातं त्यामुळं ही यात्रा करण्यासाठी गेलेल्या मंडळींमध्ये नक्कीच संभ्रम निर्माण होऊ शकतो. वर उल्लेखलेल्या या पंचबद्री मंदिरांमध्ये जोशीमठ इथलं नृसिंह बद्री आणि हेलंगपासून बारा किमीवर असलेलं उर्गम इथलं ध्यान बद्री या दोन मंदिरांची भर पडल्यास या सात मंदिरांना एकत्रितपणे सप्तबद्री असं म्हणता येईल.

       उत्तराखंडमध्ये सप्तबद्री, पंचकेदार आणि पंचप्रयाग हे पौराणिक दृष्ट्या आणि हिंदू धर्मातही खूपच महत्त्वाचे मानले जातात. प्रत्येक भाविकानं या तिर्थक्षेत्रांची यात्रा नक्कीच करायला हवी. शेवटी आपली संस्कृती, आपला वारसा, आपल्या परंपरा आणि आपलं अध्यात्मिक संचित आपणच जपायला हवं. नाही का?

श्री बद्रजी के पंच रत्न,
पढ्त पाप विनाशनम् ।
कोटि तीर्थ भवेत पुण्य,
प्राप्यते फलदायकम् ॥

🚩 फोटो - काही फोटो गुगलवरुन साभार.

🚩 माहिती - काही माहिती गुगलवरुन साभार.

॥ लेखनसीमा ॥

🚩🚩🚩