मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

"भिल्लीणीचा पुड', 'दौंड्याची वाट' ऊर्फ 'नांगरदार"?

"भिल्लीणीचा पुड', 'दौंड्याची वाट' ऊर्फ 'नांगरदार"?



       यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून तानाजीने केलेल्या भीमपराक्रमाच्या आठवणी जागवण्यासाठी आम्ही फाल्कन ट्रेकर्सनी खास मुलांसाठी सिंहगडाच्या 'तान्हाजी कड्याच्या रॅपलिंगची मोहीम' आखली होती. त्या मागचं कारण एवढंच होतं की हळूहळू पुढची पिढी सर्व प्रकारच्या डोंगरयात्रा करण्यासाठी सक्षम व्हावी. पण सध्या सगळीकडे 'तान्हाजी' चित्रपट जोरदार चालतोय त्यामुळे ही घटना जिथे घडली त्या पुण्याजवळच्या सिंहगडावर अलोट गर्दी होतेय. एवढ्या गर्दीत त्याच डोनागिरीच्या कड्यावर रॕपलिंग करणं अतिशय त्रासदायक झालं असतं. दुसरं असं की त्या दिवशी मुलांना शाळेत झेंडावंदनासाठी जावंच लागतं. या सगळ्यामुळं त्या रॅपलिंगच्या मोहिमेचं एकूणच प्रकरण बारगळलं. आता ट्रेकसाठी राखून ठेवलेला सुट्टीचा तो दिवस तर असाच वाया जाऊन द्यायचा नव्हता. अचानक असं झाल्यामुळं मग त्या दिवशी आपल्याला काय करता येईल असा प्रश्न पडला होता पण तेवढ्यात वालिव्हर्‍याच्या मनोज खाकरचा 'नांगरदार' घाटवाटेबद्दल फोन आला आणि...

       ...आणि मागे दोन वेळा जाऊनही न सापडलेल्या 'नांगरदार' घाटवाटेनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. २०१६ मधे नांगरदार शोधण्याचा आम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला होता. गुरुवर्य आनंद पाळंदेंच्या डोंगरयात्रात 'नांगरदार' घाटवाट कोकणातल्या दिवाणपाडा ते घाटमाथ्यावरच्या अंजनावळे दरम्यान आहे असा उल्लेख आहे. त्यामुळे त्यावेळी नांगरदार घाटवाटेच्या शेजारी असलेल्या 'भोरांड्याचं दार' घाटवाटेने कोकणातल्या भोरांड्यात उतरुन आवळ्याची वाडीमार्गे मोरोशी/ दिवाणपाडा गाठायचा आणि नांगरदाराने चढून परत अंजनावळ्यात यायचं असा प्लॅन ठरवला होता. आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन असा प्लॅन ठरवायचं कारण एवढंच होतं की घाटमाथ्यावरच्या लोकांपेक्षा कोकणात राहणार्‍यांना अशा अनवट वाटांची जास्त माहिती असते. तशी त्या ट्रेकला भोरांड्याच्या दाराने कोकणात उतरुन आल्यावर मोरोशी, दिवाणपाड्यातल्या बहुतेक जुन्याजाणत्यांकडे चौकशी केली पण तिथे 'भोरांड्याचं दार आणि एकतंगडी किंवा भोरदार्‍या दरम्यान तुम्ही म्हणता तशी कुठलीही वाट घाटमाथ्यावर चढून जात नाही' अशीच माहिती मिळाली. बराच वेळ चौकशी करूनही काही हाती लागेना म्हटल्यावर शेवटी भोरांड्याच्या दारानेच पुन्हा घाटमाथ्यावर परतावं लागलं होतं.
       दुसरा प्रयत्न केला तो २०१८ मध्ये. कोकणातून या वाटेचा काही सुगावा लागेना म्हणून यावेळी घाटमाथ्यावरुन प्रयत्न करायचं ठरवलं होतं. अंजनावळ्याच्या बरोबर समोर वर्‍हाडाची डोंगररांग आहे. त्याच्या मागच्या बाजूला सह्यधारेपर्यंत एक चिंचोळी सपाटी असलेली पट्टी आहे. या पट्टीत अंजनावळ्याची 'आडोशी' नावाची एक छोटीशी वाडी वसलेली आहे. त्या वाडीत जाऊन तिथून मोरोशीत उतरायला काही वाट आहे काय? असं शोधायला गेलो होतो. त्यावेळी अगदी भैरवगडाच्या जवळपर्यंत जाऊनही कोकणात उतरणारी साधी नाळ किंवा धार वगैरे काहीच दिसली नाही. एवढंच नाही तर या ठिकाणी सह्याद्रीच्या मुख्य धारेला पुर्णपणे २००-२५० फुटांचे सरळसोट ताशीव कडे आहेत. त्यामुळे इथून कोकणात उतरेल अशा वाटेची अजिबात शक्यता नव्हती. आडोशीकरांचंही तेच म्हणणं होतं. शेवटी भैरवपासून दाऱ्यापर्यंत(भोरांड्याचे दार) कुठेही मोरोशी/दिवाणपाड्यात उतरायला वाट नाही अशी आता हळुहळु खात्री पटायला लागली होती. त्यामुळं आता या नांगरदाराची आशा जवळजवळ सोडूनच दिली होती
       दरम्यान जुन्नरच्या 'रमेश खरमाळे' सरांकडेही चौकशी करुन झाली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार 'नांगरदार' अंजनावळ्याजवळच्या दरेवाडीतुन वर्‍हाडाची डोंगररांग ओलांडून तळेमाची किंवा तळेरानमधे उतरते. म्हणजे ही वाट घाटमाथ्यावरची फक्त एक उपरांग ओलांडत होती. त्यामुळं कुकडीच्या खोर्‍यातून पुष्पावतीच्या खोर्‍यात उतरणार्‍या या वाटेला 'घाटवाट' नक्कीच म्हणता येणार नव्हतं. या नांगरदाराबद्दल अंजनावळ्यात चौकशी केल्यावर तिथेही तीच माहिती मिळाली पण या शिवाय अंजनावळ्यातच आणखी थोडी वेगळी माहिती सुध्दा मिळाली. समोरच्या वऱ्हाडा डोंगररांगेवरून दोन नाळा नेमक्या गावात उतरल्या आहेत. पैकी डाव्या नाळेतुन वऱ्हाडाच्या माथ्यावर जाता येतं. डाव्या नाळेत काही कातळकोरीव पायऱ्या आणि वऱ्हाडाच्या माथ्यावर पाण्याची कुंड आहेत असे गावकरी सांगत होते. आता कुंड आहेत म्हटल्यावर माझी उत्सुकता थोडी वाढली. आता ही कुंडे नैसर्गिक की मानवनिर्मित आहेत हे पाहण्यासाठी परत यावं लागणार होतं. पण जर का ती मानवनिर्मित असतील तर नक्कीच कोकणातून कुठूनतरी पूर्वी घाटवाट असणार.
       अंजनावळ्यातून परतताना भेटलेल्या एका धनगरानेही अशी माहिती दिली की माळशेज घाटाच्या बांधकामासाठी घाटावरुन रोजंदारीसाठी सावर्ण्यात जाणारे मजूर लोक जवळ पडतं म्हणून भैरवगडाजवळ असलेली एक वाट वापरायचे. पण तो स्वतः त्या वाटेने गेला नसल्यामुळं त्याला खात्रीलायक असं फारसं काही सांगता येत नव्हतं. मग तो धनगर सांगत होता ती वाट 'भोरदरा' म्हणजेच 'एकतंगडी' तर नाही? अशी शंका आली पण भोरदरा घाटवाट भैरवगडाजवळुन न उतरता तळेरानहून भोजगिरीशेजारच्या खिंडीतून कोकणातल्या निरगुडपाड्यात उतरते तर त्या पुढची निसणी तळेमाचीहून थितबीत. आता त्या धनगराकडून एवढी माहिती मिळाल्यावर परत नांगरदाराबद्दल पुन्हा आशा वाटू लागली होती त्यामुळं त्या भागात कधी ट्रेकला गेलो की जमेल तेवढ्या लोकांना 'नांगरदार' बद्दल विचारत असे.

माळशेज घाटाच्या आसपासच्या घाटवाटा

       नेहमी सगळ्यांना विचारायचो तसंच नुकत्याच माकडनाळ, रोहिदास शिखर, थिटबीची नाळ आणि काळूचा वोघच्या ट्रेकला वाटाड्या म्हणून आलेल्या वालिव्हऱ्याच्या मनोज खाकरला सुद्धा या वाटेबद्दल विचारलं होतं आणि ट्रेक संपवून घरी परतण्यापूर्वी त्याबद्दल चौकशी करायची परत आठवणही करुन दिली होती. त्यानेही न विसरता त्याच्या सासुरवाडीत म्हणजे फांगुळगव्हाणला चौकशी केली आणि जवळपास तीन वर्षांनंतर शेवटी मनोजकडून मात्र खात्रीशीर माहिती कळली की भैरवगडाच्या खिंडीतून एक वाट दौंड्यावर चढून जाते. पण जवळजवळ पंचवीस-तीस वर्षात त्या वाटेने कुणी गेलं नाहीये. मनोजच्या चुलत सासऱ्यांना म्हणजे 'नामा उघडा' यांना ती वाट पक्की माहित होती आणि जावयाच्या शब्दाखातर तेही ती वाट दाखवण्यासाठी यायला तयार झाले. आता एवढ्या वर्षानंतर 'नांगरदार'चं कोडं सुटण्याची आशा दिसू लागली. एवढंच नाही तर वाटाड्याचा प्रश्नही सहजासहजी सुटल्यामुळं आमचं दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा 'नांगरदार'ला जाण्याचंच नक्की झालं. ही वाट अवघड प्रकारातली असल्यानं आम्ही फक्त पाच जणच या ट्रेकला जाणार होतो. जाण्यापूर्वी मनोजशी बोलून ट्रेकसाठी गरजेच्या सुरक्षा साधनांची तयारी करून ठेवली होती. बाकीच्या खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या सोयींबद्दलही सगळं बोलणं झालं होतं. त्यामुळे आता सर्वजण २५ जानेवारी कधी येतेय याचीच उत्सुकतेने वाट पहात होते.

       अखेर २५ जानेवारीचा शनिवार उजाडला. रात्री पोहोचायला उशीर होणार असल्यामुळं दुपारची थोडी जादाची वामकुक्षी पण काढून घेतली होती. नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता जेवण करुन निघालो. वाटेत नारायणगावात दुध पिऊन फांगुळगव्हाणला पोहोचायला रात्रीचे दोन वाजले. एवढी रात्र होऊनही मनोज वाट बघत जागाच होता. त्याच्याशी सकाळच्या कार्यक्रमाबद्दल बोलून गावातल्या शाळेशेजारी असलेल्या आरोग्य केंद्रात पथार्‍या पसरल्या.

       सकाळी पाच वाजता उठून सकाळची आन्हीकं उरकली. तेवढयात मनोजच्या सासुरवाडीतुन गरमागरम चहा आलाच. सकाळचा नाश्ता भैरवगडाच्या टाक्याजवळ करायचा होता. तिथे जाईपर्यंत तरी दम निघावा म्हणून सकाळच्या चहा सोबत बिस्कीटांचा सुपरफास्ट नाश्ता केला. भैरवगडावर जाणारे बहुतेक सगळे ट्रेकर्स ट्रेकची सुरूवात मोरोशीतून करतात त्यामुळे ती वाट अतिशय मळलेली आहे. खरंतर मोरोशीला मुक्काम करता येईल अशी कोणतीच सोय नाही. ना शाळा ना मंदिर. एवढंच काय पण सकाळची आन्हीकं उरकताना लागणाऱ्या पाण्यासाठी सुध्दा तिथल्या टपरीवजा हॉटेल्सवर अवलंबून रहावं लागतं. तेही ती उघडी असतील तरच. नाहीतर सगळंच अवघड होऊ शकतं. मोरोशीजवळच 'भैरवगड' नावाचा धाबा आहे पण त्याचंही काही नक्की सांगता येत नाही बरेचदा तो बंद असतो. या सर्वांपेक्षा फांगुळगव्हाण हे ठिकाण अतिशय सोईस्कर आहे. गावात पन्नासएक जणांना मुक्काम करता येईल एवढी मोठी शाळा आणि आरोग्य केंद्र आहे. बरं समोरच हातपंप असल्यामुळे पाण्याचाही प्रश्न नाही. दुसरं असं की फांगुळगव्हाणहून गडावर जाणारी वाट कमी अंतराची, झाडीभरली आणि सरळसोट असल्यामुळं गडावर लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे. आम्हाला लवकरात लवकर भैरवखिंडीत पोहोचायचं असल्यामुळं आम्ही मुद्दामच ती वाट निवडली होती.


       गावातुन निघाल्यावर आता आमची वाट हायवेवरच्या फांगुळगव्हाण फाट्यापासून मोरोशीकडे वळली.


       थोडं अंतर हायवेवरुन चालत गेल्यावर एका ओढ्यापाशी हायवे सोडून डावीकडे वळली आणि हळूहळू चढू लागली. भैरवगडाखालच्या सपाटीपासून एक धार फांगुळगव्हाणकडे उतरली आहे. आम्हाला त्याच धारेवरून चढून जायचं होतं.


       वाटही मस्त दाट जंगलातून होती.




       धारेवरुन चढताना आजोबा आणि त्याला जोडलेला सीतेचा पाळणा सुळका, पाथरा आणि उंबरदार घाटवाटा, कुमशेतचा कोंबडा, नाप्ता-नकटा जोडगोळी, करपदरा आणि साधले घाट, सीतेचा डोंगर आणि त्याच्या लगतची नळीची वाट, कोकणकडा, माकडनाळ, रोहीदास, तारामती, हरिश्चंद्रचा बालेकिल्ला, तारामती घळ, राजनाळ, तवली, खुर्द्याचं दार, चोरदरा आणि काळूचं खोरं वातावरण स्वच्छ असल्यामुळं अगदी स्पष्ट दिसत होतं.


       तिथे फारसं न थांबता दिडएक तासात भैरवगडाच्या टाक्यापाशी पोहोचलो. घरून आणलेल्या शिदोऱ्या सोडून भरपेट नाश्ता कम् जेवणच करून घेतलं आणि पाण्याच्या बाटल्याही भरून घेतल्या. आता इथून पुढे आम्हाला दौंड्याच्या माथ्यावर जाईपर्यंत तरी जेवायला थांबता येणार नव्हतं आणि पाणी मिळेल की नाही तेही काही सांगता येत नव्हतं.


       भैरवखिंडीत पोहोचलो तेव्हा एका ग्रूपची भैरवगडावर चढाई सुरू होती.



       या भैरवखिंडीतून गडावर जायच्या वाटेच्या नेमक्या विरुद्ध दिशेला आम्हांला दौंड्याच्या माथ्यावर घेऊन जाणारी वाट वळत होती.




       तिथूनच आम्हाला जायचं असलेली माथ्यावरची दौंड्याची खिंडही अतिशय स्पष्ट दिसत होती. या दोन खिंडीदरम्यानचं प्रकरण अजिबात साधंसोपं वाटत नव्हतं. एकंदरीत आत्तापर्यंत केलेल्या घाटवाटांच्या ट्रेकमधे मिळवलेल्या अनुभवाची जणू परीक्षाच होती आणि जिच्यात आम्हा प्रत्येकाला उत्तीर्ण व्हावंच लागणार होतं. त्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता.

zoom करून बघा बरं आम्ही दिसतोय का कुठे?


       डावीकडे वळलो आणि वाट ७०-७५ अंशाच्या कड्यावरून तिरकी चढू लागली. सुरवातच एवढ्या घसार्‍याच्या वाटेची होती की पुढे आमची वाट कशी असेल हेच जणू ती सुचवू पहात होती.




       पाठीमागे असणार्‍या भैरवगडाच्या पायर्‍या प्रबळ शेजारच्या कलावंतीणचीच आठवण करून देत होत्या.


       आता आमची वाट अतिशय खडी आणि घसार्‍याची झाली. मुष्कीलीने दोन्ही पायावर उभं रहायला जागा मिळत होती. पुढची वाट कुठून जातेय ते बघण्यासाठी डोक्यावरची टोपी पडेल एवढं वर बघावं लागत होतं.



       दोन्ही हात सोडून फोटो काढायला जागाही क्वचितच मिळत होती.



       आता समोर माथ्यावरून उतरलेल्या एका धारेला ओलांडून वळायचं होतं आणि पलिकडच्या बाजूने एका नाळेतून कातळात पायर्‍या असलेल्या टप्प्यावर चढून जायचं होतं. समोर रोप फिक्स करायला एक चांगलं झाड दिसत होतं पण तिथपर्यंत जाण्याची वाट भयानकच दिसत होती. उजव्या बाजूला चढ तर डाव्या बाजूला डोळे फिरतील अशी दरी. या अवघड जागेवरून आपला 'अण्णू गोगटे' होऊ नये म्हणून कमरेला 'सिंपल बोलाईन' गाठ मारली आणि हळूहळू ट्रॅव्हर्सी मारत झाडाजवळ पोहोचलो. हे अंतर होतं साधारण साठ मीटर्सचच पण ते पार करायला जवळजवळ अर्धा तास लागला. 'बुडत्याला काडीचा आधार' म्हणतात तसं अशा ठिकाणी चालताना 'पडत्याला दोरीचा आधार' का म्हणतात ते सगळ्यांना चांगलंच समजलं.




       हळूहळू करत एकेक जण झाडापाशी पोहोचल्यावर तिथे उभं रहायला जागा नसल्यामुळं आधी आलेला एकेकजण पुढच्या टप्प्यापर्यंत चढून जात असे. वाटेत मुरमाड कातळावर पायर्‍या खोदलेल्या दिसत होत्या.




       आता आम्हाला जवळपास लंब रेषेत (Vertically) चढाई करायची होती आणि जसजसं वर चढून जात होतो तसा चढण्याचा कोन ८०-८५ अंशावर पोहोचला होता. पूर्णपणे कातळटप्पा आणि खडी चढाई असल्यामुळं पायर्‍या झिगझॅग करत चढत जात होत्या. काही ठिकाणच्या पायर्‍या तुटल्यामुळं दोन पायर्‍यामधलं अंतर एवढं जास्त झालं होतं की छोट्याछोट्या टप्प्यांमधे सरळ क्लायंबिंग करूनच वर जावं लागत होतं. आणि हे सगळं जे चाललं होतं ते एका बाजूला असलेल्या जवळजवळ हजार ते बाराशे फुट दरीच्या काठावर.





       आता माथ्यावरची खिंड दिसायला लागली होती. तिच्या खाली साधारण ६०-७० फुटांवर आडवा कातळटप्पा होता आणि आम्हाला त्या कातळटप्प्याला जाऊन भिडायचं होतं. पायर्‍या संपल्यापासून साधारण पन्नास मीटर्सवरच्या कातळटप्प्यात प्रचंड घसारा होता. चढाईचा शेवट अगदी जवळ आला होता त्यामुळे आता जास्त काळजीपुर्वक चढाई करावी लागणार होती. क्लायंबिंग संपत आलं की ते लवकर संपवण्यासाठी थोडा जास्तीचा धोका पत्करला जातो आणि इथेच अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे डोकं शांत ठेऊन क्लायंबिंगसाठी प्रत्येकाला पुरेसा वेळ देणं गरजेचं होतं. कातळटप्प्याखाली मिळालेल्या एका भक्कम दगडाला दोर बांधला. हळूहळू चढाई करत प्रत्येकजण कातळटप्प्याखालच्या सपाटीवर आला.


       इथून खालच्या बाजुला असलेला भैरवगड अगदीच खुजा दिसत होता.


       सर्वजण खिंडीखाली पोहोचल्यावर शेवटची ६०-७० फुटांची चढाई करुन एका छोट्या झाडाला दोर बांधला.


       एकेक करत सगळे आता खिडीत पोहोचले होते. घड्याळात वेळ साडेतीनची दाखवत होती. म्हणजे भैरवखिंडीपासून या दौंड्याच्या खिंडीत पोहोचायला तब्बल साडेपाच तास लागले होते. एक अवघड टप्पा सुरक्षितपणे पूर्ण झाल्याने सर्वांनाच हायसं वाटत होतं. ऐसेमें फोटो तो बनता है यार, है ना?



       समोरच्या मोठ्या ओढ्यात भरपूर पाणी दिसत होतं. तिथे जाऊनच जेवायला थांबायचं ठरवलं. ओढ्याकडे जाताना डाव्या बाजूला एक नैसर्गिक गुहा दिसली.



       ओढ्यात बसून पोटभर जेवण केलं. पाण्याच्या बाटल्या पण काठोकाठ भरुन घेतल्या आणि फार वेळ न काढता अंजनावळ्याच्या दिशेने निघालो. दुपारचे सव्वाचार वाजले होते आणि अंधार पडायच्या आत आम्हाला भोरांड्याच्या दारापाशी पोहोचायलाच हवं होतं त्यामुळं साधं फोटो काढायला सुद्धा कुणी थांबत नव्हतं. त्यामुळे इथून पुढचे फारसे फोटो कुणीच काढलेले नाहीयेत.


       आता वऱ्हाडा डोंगररांगेवरून खालच्या कुकडीच्या खोऱ्यात उतरण्यासाठी आम्हाला दोन वाटा होत्या. मागे म्हणजे लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेली अंजनावळ्याच्या समोरच्या दोन नाळांपैकी डावी नाळ किंवा याच डोंगररांगेतल्या नवरा, नवरी, भटोबानंतर असलेल्या दुसऱ्या खिंडीतल्या नाळेतून. अंजनावळ्याच्या समोरच्या नाळेतुन उतरलो असतो तर अंजनावळ्याहून भोरांड्याच्या दारापर्यंत खालच्या पठारावरून खूप अंतर चालावं लागलं असतं. म्हणून आम्ही भटोबानंतरच्या दुसर्‍या नाळेतून उतरायचं ठरवलं, जे भोरांड्याच्या दारापासून बऱ्यापैकी जवळ पडणार होतं.



       ही वाटही प्रचंड घसार्‍याची आणि काटेरी झुडूपे माजलेली असल्यामुळं अत्यंत कमी वापराची होती. त्यामुळे एकमेकांना आधार देत, उठत-बसत आणि गरजेच्या ठिकाणी रोप बांधत नाळेच्या पायथ्यापर्यंत आलो. नेमकी या ठिकाणी लाकडं तोडायला आलेल्यांची वाट मिळाली त्यामुळे सगळे येईपर्यंत थांबलो. अजूनही सुर्य मावळायचा होता. तो मावळून अंधार पडायच्या आत भोरांड्याच्या दारापाशी पोहोचायचं होतं. आता इथून निघाल्यावर सपाटी असल्यामुळं प्रत्येकाचा चालण्याचा वेगही वाढला होता. अखेर भोरांड्याच्या दारापाशी पोहोचण्याच्या थोडं अलिकडं सुर्यास्त झाला.


       त्यामुळे प्रत्येकाने आता टॉर्च काढल्या आणि भोरांड्याच्या दारापाशी पोहोचलो. भोरांड्याच्या दाराने या आधी मी स्वत: तीनचार वेळा गेल्यामुळे ही वाट मला पक्की ठाऊक होती. ही घाटवाट चांगली वाहती असल्यामुळे अतिशय मळलेल्या वाटेची होती आणि त्यामुळे ती निर्धोकही होती. अंधार पडल्यामुळे वेग थोडा मंदावला होता खरा पण आता अंधारात वाट शोधण्याची भीती राहिली नव्हती. मागे राहिलेल्यांसाठी थोडं थांबत थांबत जावं लागत होतं इतकंच.


       भोरांड्याच्या दाराने दोन ठिकाणी उतरता येतं, नाळेतुन सरळच उतरून गेलं तर भोरांडे गावात तर साधारण अर्धे उतरुन उजवी मारुन खाली उतरलं तर आवळ्याच्या वाडीत. आमची गाडी फांगुळगव्हाणला लावलेली असल्यामुळे आम्हाला आवळ्याच्या वाडीतच उतरणं जास्त सोईस्कर होणार होतं. आम्ही आवळ्याच्या वाडीत हायवेवर उतरेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. म्हणजे सकाळी सहा ते रात्री आठ असा तब्बल चौदा तास चालून आमचा ट्रेक पूर्ण झाला होता. आम्ही उतरून आलेल्या आवळ्याच्या वाडीतून फांगुळगव्हाण हे अंतर जवळपास आठ किलोमीटरचं आहे आणि ते शेवटचे आठ किलोमीटर चालण्याचं त्राण सुध्दा आता कुणात राहिलं नव्हतं. त्यामुळं पुढची हायवेवरुन तंगडतोड वाचावी यासाठी मनोजने त्याच्या मेहूण्याला मोटारसायकल घेऊन बोलावलं होतं आणि घरी जेवण बनवायला पण सांगितलं होतं. आम्ही हायवेवर उतरेपर्यंत तो आम्हाला न्यायला आलाही होता त्यामुळे आमच्यातले दोघे त्याच्याबरोबर ट्रिपसीने घरी गेले आणि त्यातला एकजण गाडी घेऊन परत आला. सगळे मनोजच्या सासुरवाडीत पोहोचल्यावर हातपाय धुऊन ताजेतवाने झाले, तोपर्यंत जेवणाची ताटेही तयार झाली. थकूनभागून आल्यानंतर असं गरमागरम गावरान जेवण समोर दिसल्यावर मग तर काय 'सोने पे सुहागाच'. त्या गावरान जेवणावर यथेच्य ताव मारून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ती आयुष्यात कधीच न विसरता येणाऱ्या दिवसभरातल्या त्या 'गोड' आठवणी घेऊनच.




परतीच्या प्रवासात मनात अनेक प्रश्न घोळत होते...


१) स्थानिक या वाटेला भिल्लीणीचा पुड किंवा दौंड्याची वाट म्हणतात. त्यांना नांगरदार हे नावच माहिती नाही मग हीच नांगरदार घाटवाट आहे की ती दुसरीकडेच कुठेतरी असावी?

२) ही वाट अत्यंत खड्या चढाईची, प्रचंड घसारा असलेली, भयानक दृष्टीभय असलेली आणि महत्वाचं म्हणजे एकावेळी फक्त एकच जण चढू शकेल अशी आहे मग या वाटेला 'नाणेघाटाच्या प्रभावळीतली घाटवाट' म्हणावं का?

३) कोणत्याही घाटवाटा किल्ल्यातून जात नाहीत किंवा किल्ल्यात चढूनही येत नाहीत आणि ही वाट तर ऐन किल्ल्यातुन जातेय मग ही 'घाटवाट' असू शकेल का?

४) नाणेघाट हा त्याकाळचा एक महत्वाचा व्यापारी मार्ग. त्याच्या आजूबाजूला मुख्य वाटेवरचा ताण कमी करण्यासाठी काही उपघाटवाटा नक्कीच असू शकतात पण या वाटेवरून सड्या माणसला जाणेही अवघड तर मग डोक्यावर सामान घेऊन या वाटेने वाहतुक करणे तर अशक्यच आहे. मग ही वाट का तयार केली गेली असेल?

५) बहुतेक घाटवाटा सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर चढून आल्या की संपतात पण ही वाट मुख्य रांगेवरल्या उपरांगेवर चढून मग पठारावर उतरते. मग एवढी मोठी चढाई असलेली वाट तयार करायचं कारण काय?

६) नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी कोकणात भैरवगड तर घाटमाथ्यावर जीवधनचा किल्ला आहे. जवळचाच दौंड्या किंवा भोजगिरीसुध्दा 'किल्ला' असू शकतो. या किल्ल्यांदरम्यान जलद निरोप पोहोचविण्यासाठी ही वाट वापरत असावेत का?

       पूर्वी नांगरदार वाट सापडत नव्हती, ती वाट नेमकी कुठे असेल म्हणून प्रश्न पडत होते. आता ही वाट सापडली आहे तर या वाटेबद्दलचे प्रश्न स्वस्थ बसू देत नाहियेत. त्यामुळे एकंदरीत माझ्या दृष्टीने तरी नांगरदारचं कोडं अजून सुटलेलंच नाहिये. निदान या नवीन वाटेबद्दल पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी सापडतायत का ते बघूया?

फोटो सौजन्य -


१) जितेंद्र परदेशी
२) रविंद्र मनकर
३) मिलींद गडदे
४) गणेश शितोळे

या ट्रेकचा 3D मार्गाचा व्हिडीओ इथे टिचकी मारून पाहता येईल. 


तर जितेंद्र परदेशीने तयार केलेला या ट्रेकचा संपूर्ण व्हिडीओ इथून पाहता येईल.


सहभागी फाल्कन्स -


१) मिलींद गडदे
२) रविंद्र मनकर
३) जितेंद्र परदेशी
४) आनंद देसाई
५) दिलीप वाटवे

महत्वाचे असे :-


       सह्याद्रीतल्या अशा प्रकारच्या वाटा वापर अजिबात नसल्यामुळे अत्यंत कठीण झाल्या आहेत. घाटवाटांच्या ट्रेक्सचा चांगला अनुभव असल्याशिवाय अशा प्रकारच्या वाटेत चुकूनही जाऊ नये. सोबत या वाटांमधे फिरलेले एक किंवा दोन वाटाडे अवश्य असावेत. सोबत सुरक्षा साधने पुरेशी असावीत आणि ती वापरण्याच्या चांगल्या सरावाबरोबरच अनुभवही गाठीशी असावा. प्रस्तरारोहण (Rock Climbing) करता येणे आवश्यकच आहे. अशा घाटवाटा करणारा डोंगरयात्री शारीरिक तसेच मानसिकदृष्या अतिशय सक्षम असावा.




१४ टिप्पण्या:

  1. जबरदस्त घाटवात आहे ही.. एकूणच रोमांचक अनुभव..

    उत्तर द्याहटवा
  2. Wow Kay perfect varnan kelay ki baas sarva trek dolyasamor aala pratek mahiti sobat lagech photo taklyamule adhikach change samjat hote tevdhach block vachtsna angavar shaharahi yet hits.....great sarva team che abhinandan

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर! विश्लेषणात्मक तरीही एकदम सुदंर वर्णन!!
    सह्याद्रीतील ह्या आडवाटेवरील घाटमार्ग ह्यांची एकदा ओढ लागली की डोक्यातून न उतरणारी भूत आहेत ही!

    उत्तर द्याहटवा
  4. भन्नाट वर्णन.एकंदरीत मला पण ही घाटवाट वाटत नाही.दोन किल्ल्यावर लवकर निरोप नेण्यासाठी कदाचित बनवलेली वाट असावी.

    उत्तर द्याहटवा
  5. सुरेख लिखाण. विडिओ पण पाहिले. वाचताना आणि पाहताना श्वास आपोआप रोखला जात होता. सलाम तुम्हा सर्व ट्रेक व सह्याद्री वेड्यांना. भाषा कौशल्य तर आहेच पण बारकावे ऊन भारीच.

    उत्तर द्याहटवा
  6. पुणे जिल्हा गॅझेटियर मध्ये नांगरदरा चा उल्लेख आहे पण ठाणे जिल्हा गॅझेटियर मध्ये नाही

    उत्तर द्याहटवा
  7. पुणे जिल्हा गॅझेटियर लिंक
    https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Poona%20District/Poona-II/trade_communication.html#

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नांगरदारचा उल्लेख गॕझेटीयरकाराने बहुधा ऐकीव माहितीवरून केला असावा असं वाटतंय. तो भोरांड्याच्या दारालाच रिठ्याचे दार म्हणतोय. खरंतर भोरांड्याचे दार नाणेघाटाच्या उत्तरेकडे तर रिठ्याचे दार दक्षिणेस आहे.
      माळशेजच्या दक्षिणेस 'निसणी' आहे पण तिला शिडी नाहीये. त्यानंतरची भोरदाऱ्या ऊर्फ एकतंगडी पण सोपी वाट आहे. नाणेघाटाच्या आजूबाजूच्या बहुतेक सगळ्या वाटा सोप्याच असायला हव्यात आणि थोड्याफार आहेतही

      हटवा
  8. ठाणे जिल्हा गॅझेटियर लिंक
    https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Thana%20District/Thane-I/trade_roads.html#2

    उत्तर द्याहटवा
  9. Dilip, path not used for last 25 years and you, Falcon group, is always up for such challenge. Hats off to you guys. During this lockdown, reading this kind of adventures boosts our morale.

    उत्तर द्याहटवा