"वरपेडा घाट आणि चांगमोड नाळ"
'वरंध घाट परीसरातल्या दोन अपरिचित घाटवाटा'
खरंतर १ मे ची सुट्टी अशीच वाया जाऊ द्यायची नव्हती. ट्रेकींग ग्रूपवर हाक दिली आणि लगेचच नेहमीच्या मंडळीतले चार जण यायला तयार झाले. सगळे नेहमीचेच असल्याने वेगळं काही सांगायची गरजच नव्हती. काय करायचं तर घाटवाटाच. कारण आता 'ट्रेक म्हणजे घाटवाटा' हे आम्हा सर्वांचं समीकरणच होऊन गेलंय. ट्रेकला जायचं म्हणजे घाटवाटांशिवाय दुसरं काही सुचतच नाही.
आता घाटवाटा ठीक आहेत हो! पण कोणत्या करायच्या? पहिलं तर त्या आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये आणि बजेटमधे बसायला हव्यात आणि दुसरं म्हणजे त्या दाखवायला घेऊन जाणारा माणूसही मिळायला हवा. बरं त्यातून त्या जर नवीन कळलेल्या असतील तर मग काय 'सोनेपे सुहागाच'.
काही दिवसांपूर्वीच वरंध घाटाजवळच्या 'चिकणा आणि कुंभेनळी' अशा दोन घाटवाटा केल्या होत्या. आल्यावर आमच्या 'घाटी' मित्रांना केलेल्या ट्रेकबद्दल सांगितलं तर त्यांच्या म्हणण्यानूसार या घाटवाटेत वाघजाई देवीचं ठाणं असल्यामुळे मी जो कुंभेनळी म्हणतोय तो कुंभेनळी नसून वाघजाई आहे. डोंगरयात्रा पुस्तकातल्या उल्लेखानुसार वाघजाई घाट हा उंबर्डीतून तळीये गावात उतरतो पण आम्ही तर कुंभेनळी गावातून चढून उंबर्डीत आलो होतो. कोकणात असलेल्या कुंभेनळी आणि तळीये या दोन्ही गावात तसं अंतरही बरंच आहे. मग वाघजाई घाट नेमका कोणता? हे गणित काही केल्या सुटत नव्हतं. म्हणून यावेळी या वाघजाईचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आणि त्याच्या सोबत नवीनच समजलेली वारदरा ऊर्फ वाव्हळाची वाट करायची असं ठरवलं होतं पण नशीबात मात्र काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं.
ट्रेकचं ठरल्यापासून शिरगावच्या गोविंदला म्हणजे आमच्या वाटाड्याला सारखा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन काही केल्या लागत नव्हता. अगदी मेसेज पण टाकून ठेवला होता. त्याचाही काही रिप्लाय आला नाही. मग शेवटी ट्रेकच्या आदल्या रात्री एक वाजता त्याला थेट घरी जाऊनच उठवलं आणि दुसर्या दिवशीच्या आमच्या प्लॅनबद्दल सांगितलं. नशीबानं तोही लगेचच तयार झाला. एवढं सगळं करुन मगच गावातल्या दुर्गादेवीच्या मंदीरात मुक्कामाला पोहोचलो.
सकाळी लवकर उठून आवरलं. वरंध घाटातल्या आणि उंबर्डी गावाच्या हद्दीत असणाऱ्या 'पवार हॉटेल' जवळ गाडी पार्क केली त्यावेळी आजूबाजूची बहूतेक सगळी हॉटेलं हळूहळू उघडत होती. आता इथून कोणती तरी 'वाघजाई' नावाची वाट तळीयेत उतरणारी असायला हवी होती. इथले बहूतेक हॉटेलवाले उंबर्डीचे आहेत त्यामुळे त्यांच्याकडेच वाघजाईबद्दल चौकशी केली. पण त्यांच्या म्हणण्यानूसार उंबर्डीतून या नावाची कोणतीच वाट तळीयेत उतरत नाही किंवा जवळपास वाघजाईचं असं ठाणंही नव्हतं की तिच्या जवळून एखादी वाट तळीयेत उतरत असेल. म्हणजे उंबर्डी ते तळीये अशी कोणताही 'वाघजाई' नावाची घाटवाट नव्हती हे नक्की झालं होतं. तिथे दुसरीच एक घाटवाट होती, तिचं नाव 'वरपेडा' घाट'. अर्थात घाटमाथ्यावरचे आणि कोकणातले लोक एकाच घाटवाटेला दोन वेगवेगळ्या नावाने संबोधतात त्यामुळं या घाटवाटेला कोकणातले लोक 'वाघजाई' म्हणत असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आम्हाला तळीये गावात जायचं असल्यामुळे मग याच वाटेने उतरून गेलो. या वाटेने आठदहा वर्षांपूर्वी मी उतरुन माझेरी गाठली होती. त्या वेळच्या आणि आजच्या वाटेत खुपच फरक पडला होता. आताची वाट पुर्णपणे मोडली होती. सुरवातीपासूनच प्रचंड घसारा होता.
नुकताच वणवा लागून गेल्यामुळे नुसते हात-पायच नाही तर सगळे कपडे सुद्धा काळेकुट्ट झाले.
मग जसं जमेल तसं, अगदी वेळप्रसंगी सपशेल खाली बसूनच उतरावं लागत होतं. घसारा असल्यामुळे वाट कमी अंतराची असुनही प्रचंड वेळ लागत होता.
कोकणात उतरल्यावर तळीयेच्या वाटेवर असताना डाव्या बाजूला सुकून गेलेला 'मोरजोत' धबधबा दिसला. पावसाळ्यात तर हा धबधबा वरंध घाटातून फारच सुरेख दिसतो.
धबधब्याचा ओढा ओलांडताना अगदी ओढ्यातच 'मावळाई' देवीचं ठाणं लागलं. या वनदेवीला कळकाच्या परड्या वाहतात.
तसंच पुढं तळीये गावाकडे जाताना डाव्या बाजूला थोडं वर 'चांगमोड' सुळका दिसतो.
त्याला लागूनच अलिकडे 'चांगमोड नाळ' आहे. अजून थोडं पुढं असलेल्या तळीये गावातून एक वाट याच चांगमोड नाळेला वरच्या बाजूने ओलांडून उंबर्डीच्या दांडवाडीची एक छोटीसी वस्ती असलेल्या कोपीदांडावरच्या घरांपाशी चढून जाते. पुढे तळीयेत जाऊन परत याच नाळेत यायचं असल्यामुळं याच नाळेतून शॉर्टकटने सरळ वर चढून तळीये ते दांडवाडीच्या वाटेला लागायचं ठरवलं.
नाळेतच बसून नाश्ता उरकला.
थोडं वर चढून गेल्यावर दोन समांतर नाळा सुरु झाल्या. डाव्या बाजूच्या नाळेतूनच पुर्वी बऱ्यापैकी वाहती वाट होती. पुर्वी वाट वाहती असल्याने त्यात कातळटप्पे नसावेत असा अंदाज बांधला होता. तरीही दोन कातळटप्पे लागलेच. पहिला होता ५०-६० फुटांचा सोप्या श्रेणीचा.
तर एक ३० फुटांचा अवघड श्रेणीचा. आम्ही ट्रेकला सोबत शंभर फुटी सुरक्षा दोर नेहमीच बाळगतो त्यामुळे हे दोन्ही टप्पे अगदी सुरक्षितपणे पार केले.
वाट नाळेतुन डाव्या बाजूला वळून कोपीदांडावर जाते. नेमकी वाट सापडलीच नाही म्हणून मग सरळ नाळेतुनच चढून थेट घाटमाथ्यावर पोहोचलो. आम्ही जिथं सह्यमाथ्यावर होतो त्याच्या थोडं पश्चिमेकडे कुंभेनळीच्या वाडीतून वाव्हळाची वाट किंवा वारदरा घाट चढून येतो.
इथून पुर्वेकडे पाहिल्यावर समोरच्या बा़जूला थोडी वर उंबर्डीची दांडवाडी होती. त्याच्या थोडं अलिकडं कोपीदांडावर दांडवाडीचे वाडे होते. सात-आठ वर्षांपूर्वी शेती करण्यासाठी तिथे लोक रहात होते. पण हल्ली कुणीच रहात नाही. उजव्या बाजूला सोंडेखाली कुंभेनळी, कुंभेनळीवाडी तर डाव्या बाजूला तळीये गाव आणि नेमका पाठीमागे तळीयेच्या जननीचा डोंगर.
घाटमाथ्यावरच्या दाट झाडीत थोडी विश्रांती घेतली. जागोजागी गव्याचे शेण पडलेले दिसत होते. आसपास कुठे पाणी नसल्यामुळं त्यांनी आपला मुक्काम नीरा-देवघर धरण क्षेत्राजवळ हलवला होता असं गोविंदने सांगितल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला होता. कालच दोन गवे धरणात गतप्राण झालेत अशीही माहिती त्याने वर सांगितली.
तासाभरात कोपीदांडावर पोहोचलो. तिथले पडके वाडे पाहून दक्षिण दरीकडे गेलो.
डाव्या बाजूला खाली कुंभेनळी, उजव्या बाजूला कुंभेनळीवाडी आणि त्याला लागून असलेला वारदरा घाट पाहून परत कोपीदांडावर पोहोचलो. इथून एक वाट थेट पवार हॉटेलवरुन उंबर्डीत जाते. पण आमच्या वाटाड्याला गोविंदला ही वाट माहिती नसल्याने धोपट मार्गाने दांडवाडीच्या वाटेला लागलो. हा थोडा वळसा पडणार होता खरा पण वाट चुकण्याची भीती नव्हती.
वाटेत भेकराने झाडावर शिंगे घासल्याच्या खुणा दिसल्या.
उंबर्डीच्या दांडवाडीत पोहोचायला तीन वाजले. तिथे असलेल्या गोविंदच्या बहिणीच्या घरी डबे खाल्ले.
थोडा आराम केला आणि पवार हॉटेल गाठले.
थोडा वेळ हातात असल्यामुळे वरंध घाटाची पायवाट आणि तिच्या खोदलेल्या पायर्या, मुळ वाघजाईचं मंदीर, पाळदार घाटवाट, उंबर्डी गाव, नऊटाक्या पाहिल्या. आजुबाजुला शेवत्या घाट, मढेघाट, उपांड्या घाट, कावळ्या किल्ला, माझेरी, पारमाची, रामदास पठार वगैरे ठिकाणं पाहून गाडीपाशी आलो आणि पुण्याला परतलो.
या ट्रेकमधे नेहमीप्रमाणेच काही नवीन वाटा कळल्यात.
१) उंबर्डीच्या दांडवाडीची काही घरं कोपीदांडावर होती. त्या घरांपासुन एक वाट चांगमोड नाळेतुन तळीये गावात जाते. खरंतर याच वाटेनं आम्हाला दांडवाडीत यायचं होतं पण ही वाट आम्हाला काही सापडली नाही.
२) उंबर्डीतुन पवार हॉटेलच्या जवळुन एक वाट कोपीदांडावरुन तळीयेत जाणार्या वाटेला मिळते. ही वाटही एकदा जाऊन पाहून यायची आहे.
३) पवार हॉटेलपासून म्हणजे उंबर्डीच्या फाट्यावरून एक वाट थेट माझेरीत उतरते. हॉटेलवाल्या पवारांनी समजा हात करुनही उंबर्डीच्या स्टॉपवर एसटी थांबली नाही तर या वाटेने ते एसटी पोहोचण्यापूर्वी चालत माझेरी गाठत अशी माहिती खुद्द पवारांनी दिली.
पाहूया कधी करायला जमतायत या वाटा. आता या वाटा धुंडाळताना अजूनही काही नवीन वाटा सापडतीलच. नाही का?
फोटो सौजन्य -
१) सुजय पुजारी
२) महादेव पाटील
३) शोएब तांबोळी
४) निनाद बारटक्के
समाप्त.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा