"भटकंतीमधला असाही एक विचित्र अनुभव"
इ. स. २००९ च्या डिसेंबर महीन्याचे ते अखेरचे दिवस होते. शुक्रवारच्या ख्रिसमसला जोडून शनिवार-रविवार आल्यामुळं तीन दिवसांची सलग सुट्टीही अनायसे मिळणार होती. असा गोल्डन चान्स अर्थातच आम्ही ट्रेकर्स मंडळी वाया जाऊन देणार नव्हतोच. त्यामुळं बरेच दिवस बकेट लिस्टमधे असलेल्या, महाराष्ट्राच्या सीमेवरल्या 'तेरेखोल' किल्ल्यापासून विजयदुर्ग ऊर्फ घेरीयापर्यंतच्या जवळपास अठरा ठिकाणांचा कोस्टल ट्रेकचा प्लॅन आम्ही केव्हाच करुन टाकला होता. ग्रूपमधे कुणी वाढतंय, कुणी कमी होतंय असं करताकरता शेवटी निघायच्या दिवसाअखेर शेवटी आमचा आठ जणांचा चमू नक्की झाला. त्यात सहा मुलं आणि दोन मुली सामील झाल्या होत्या. दिवसभर पुरातन मंदिरं, वखारी, किल्ले पहायचे, त्यांचं सामरीक महत्व, इतिहास वगैरे जाणून घ्यायचा आणि संध्याकाळी एखाद्या शाळेत किंवा मंदिरात मुक्काम करायचा असा आमचा सर्वसाधारण दिनक्रम ठरला होता.
गुरुवारी रात्रीच पुण्याहून निघालो होतो त्यामुळं शुक्रवारचा पूर्ण दिवस आम्हाला फिरायला मिळणार होता. पहिल्या दिवसअखेर आम्ही तेरेखोल, रेडीचं गणपती मंदिर आणि जवळचाच यशवंतगड, वेंगुर्ल्याची डच वखार, निवती, वेताळगड पाहून मालवणच्या वाटेवरल्या एका छोट्या खेडेगावात मुक्कामाला पोहोचलो. गावातच भेटलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला भेटून आमचं तिथं येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि मंदिरात मुक्काम करण्याबद्दल परवानगी मागितली. मंदिरात मुक्कामाचं विचारल्यावर झरकन त्याच्या कपाळावर एक आठी उमटली. गावकीत विचारुन सांगतो म्हणून तो सटकला आणि बरोबर पंधरा मिनिटात परत आला. आता येताना त्याच्यासोबत तो अजून दोन जणांना घेऊन आला होता. एकंदरीत त्यांच्या हालचालीवरुन आम्हाला बहूदा तिथे राहण्याची परवानगी मिळणार नाही असंच जाणवत होतं. आल्याआल्या त्याने 'तुम्हाला मंदिरात मुक्काम करता येणार नाही' असं स्वच्छ शब्दांत सांगितलं. मालवणात भरपूर लॉजेस आहेत आणि तिथे तुम्हाला कुणीही जागा देईल तिथे रहा असं सांगितलं. थोडक्यात तुम्ही इथे राहू नका असंच त्याला सुचवायचं होतं. बरीच उलटसुलट चर्चा झाल्यावर आता एवढ्या रात्री आम्ही कुठे लॉज शोधणार असं त्याला निकराचं म्हटल्यावर मग शेवटी गावाबाहेर हाकेच्या अंतरावर असलेल्या गणपतीच्या कारखान्यात हवंतर मुक्काम करा एवढच मी सांगू शकतो असं तो म्हणाला. आमच्याकडेही आता दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही गणपतीच्या कारखान्यात मुक्कामाला पोहोचलो. आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात ट्रेकींग करताना असा अनुभव पहिल्यांदाच आला होता आणि तोही चक्क कोकणात आल्यामुळं राहूनराहून मला याचं आश्चर्य वाटत होतं. चला आमची रहायची कुठेतरी सोय झाली होती म्हणून मग मीही तो विषय नंतर डोक्यातून काढून टाकला होता.
दुसर्या दिवशी तिथेच आवरुन मालवणला पोहोचलो आणि सिंधुदुर्ग, पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, रामगड, भरतगड, भगवंतगड, कुणकेश्वर पाहिलं. रविवारी फक्त गिर्येची गोदी, रामेश्वर मंदिर आणि सर्वात शेवटी विजयदुर्ग पाहून पुण्याला परतणं सोईस्कर होणार होतं म्हणून संध्याकाळचा धावता देवगड पाहून मुक्कामाला विजयदुर्ग गावात पोहोचलो. गावात असलेल्या एकमेव 'हॉटेल विजयदुर्ग' मधे जेवण उरकलं आणि काल आलेल्या अनुभवावरुन त्यांच्याच लॉजमधे मुक्कामासाठी रूमची चौकशी केली. रूम अर्थातच शिल्लक नव्हती. बर्यापैकी मोठ्या असलेल्या या गावात सोबत दोन मुली असल्यामुळं रस्त्यावर किंवा कुणाच्या ओसरीत मुक्काम करणं योग्य वाटलं नाही. आता करायचं काय? असा मोठा प्रश्न आम्हा सर्वांपुढे उभा राहिला. शेवटी सर्वानुमते पुन्हा थोडं मागं जाऊन गावाच्या थोडं अलिकडे असलेल्या रामेश्वर मंदिरात मुक्काम करू असं ठरलं आणि इथुनच या ट्रेकमधे घडणार्या त्या नाट्यमय घटनांना सुरूवात झाली...
...मंदिराजवळ पोहोचलो त्यावेळी रात्रीचे १०.४५ वाजले होते. आजूबाजूला डोळ्यात बोट गेलं तरी कळणार नाही एवढा अंधार होता. गाडीच्या दिव्याच्या उजेडात मंदिराच्या प्रवेशद्वाराची कमानच काय ती दिसत होती. प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर खाली उतरत जाणारा कातळकोरीव रस्ता दिसत होता. जवळजवळ शंभरएक मीटर चालत गेल्यावर समोर लाकडी बांधणीतलं सुरेख मंदिर दिसलं. एकंदरीत वरुन पाहिल्यावर कमानी मागच्या कातळाच्या पोटात खोदून काढलेला एक मोठा खड्डा होता आणि त्यात हे मंदिर बांधलेलं होतं. बहूदा परकीय आक्रमकांचं चटकन लक्ष जाऊ नये म्हणून ही उपाययोजना केलेली असावी. मंदिरात राहण्याची परवानगी घेण्यासाठी आजूबाजूला कुणीच दिसत नव्हतं. कुणीतरी येईल या आशेवर थोडावेळ वाट पाहिली. थोड्यावेळाने मंदिराच्या गाभार्यातून कुजबुजण्याचा आवाज आला म्हणून दादा, मामा करुन आवाज दिला तर आतून हाकेला कुणीच ओ देईना. बंद दरवाजा वाजवूनही झाला तरीपण आतून कुणी प्रत्युत्तर दिलं नाही म्हणून मग त्या सर्वाचा नाद सोडून पथार्या पसरल्या.
सकाळी पाचाच्या ठोक्यावर सगळे जागे झाले. प्रवेशद्वाराजवळ हातपंप असल्यामुळं सकाळची आन्हीकं उरकण्यासाठी एकेकजण तिकडे जाऊ लागला. तेवढ्यात दुरुन पोलिसांच्या शिट्टीचा आवाज आला आणि गाडीच्या दिव्याचा उजेड मंदिराकडे येत असलेला दिसला. ती गाडी चक्क आमच्या रोखानेच येत होती. गाडीचा आवाज आमच्याजवळ आल्यावर शांत झाला पण गाडीवरच्या पोलिसाचा चेहरा मात्र संतापानं लालबुंद झाला होता. आल्याआल्या त्याने आमच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली आणि प्रश्नांचा भडीमार सुरु केला. कुठून आलात?, का आलात?, मुलींसोबत काय करताय?, ड्रायव्हर कुठेय?, सगळ्यांनी इथे या आणि स्वतःची ओळख पटवा. त्याने विचारलेल्या या अशा अनपेक्षीत प्रश्नांनी आम्हाला कुणालाच काही सुचत नव्हतं. खरं सांगायचं तर आमची नक्की काय चूक झालीये तेच मुळात समजत नव्हतं. आमच्या जवळचे नकाशे, किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तकं आम्ही त्याला दाखवली. गेल्या दोन दिवसांत कायकाय पाहिलं तेही सांगितलं. एव्हाना आमची झोप पुरती उडाली होती. मी माझं लायसन्स त्याला दिलं आणि थोडं धाडस करून नेमकं काय झालंय ते विचारलं. त्याने लायसन्सवरचं नाव वाचलं आणि एकदा माझ्याकडे पाहिलं.(माझ्या आडनावाला पोलिस सिंधूदुर्ग जिल्ह्यात बर्यापैकी ओळखतात. कुठेही अपघात झाला तरी कुडाळजवळच्या पावशीच्या म्हणजे माझ्या मूळ गावातल्या वाटवेंच्या क्रेन्स गाड्या रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी वापरल्या जातात. अर्थात मला हे नंतर कळलं.) माझ्याकडे पाहिल्यावर तो मला फटकारुनच म्हणाला 'विजयदुर्ग पहायला आलाय ना? मग किल्ला पाहून झाल्यावर किल्ल्यातल्याच पोलिस स्टेशनात या मग सांगतो काय झालंय ते. मंदिरात झोपायला मजा वाटतीये ना?' तरी मी त्याला जाताजाता म्हटलंच 'अहो, आम्ही 'हॉटेल विजयदुर्ग'मधे राहण्यासाठी चौकशी केली होती पण तिथे आम्हाला जागा मिळाली नाही म्हणून इथे झोपायला यावं लागलं'. ध्यानीमनी नसताना अचानक अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागल्यानं आमच्यातल्या काही जणांची तर वाचाच बसली होती तर 'आपण काही केलेलंच नाही तर घाबरायचं कारण काय?' हे लक्षात आल्यानं काहीजण बर्यापैकी सावरलेही होते. जाताना त्याच्या चेहर्यावरुन तरी असं दिसत होतं की आम्ही दिलेल्या उत्तरांनी त्याचं थोडं तरी समाधान झालंय.
आमचं आवरुन झाल्यावर पुढच्या पंधरा मिनिटातच आम्ही किल्यात पोहोचलो. कसाबसा किल्ला पाहिला. तसं तर कुणाचंच किल्ला पाहण्यात फारसं लक्ष नव्हतं. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यासमोरच पोलिस स्टेशन आहे. किल्ला पाहिल्यावर सगळे थेट तिथेच गेलो. त्याने सर्वांना आत बोलावून घेतलं. तो आता पूर्णपणे शांत झालेला दिसत होता. मी त्याला विचारलं 'साहेब, नक्की झालंय काय?' त्याने एकवार सर्वांच्या चेहर्याकडे पाहिलं आणि मग तो सांगू लागला...
तुम्ही मला म्हणाला होतात की 'वर्दमांकडे आपल्याला रहायला जागा मिळाली नाही म्हणून इथे झोपायला आलोय' म्हणून मी तुम्ही खरं बोलताय की नाही हे पाहण्यासाठी येतायेता त्यांना विचारून खात्री करुन आलोय. जेव्हा त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं त्यावेळीच माझी खात्री पटली. गेल्या महिन्यात याच रामेश्वर मंदिरात दरोडा पडला होता. आठ-दहा चोरांनी इथे रात्री प्रचंड धुडगूस घातला होता. बरं गावापासून लांब असल्यामुळं कुणाला काहीच आवाज आला नाही. पुजारी गाभार्याचे दार उघडत नाहिये म्हटल्यावर त्यांनी दरवाजा तोडला आणि पुजार्याला जबरी मारहाण केली. चांदीची मूर्ती, दागिने एवढंच काय तर दानपेटीतले पैसेही चोरून नेले. हा दरोडा घातलेले दरोडेखोर अद्यापही फरार आहेत. एकूणच संपूर्ण सिंधूदुर्ग जिल्ह्यातल्या मंदिरात असलेल्या पुरातन मूर्ती चोरण्याचं प्रमाण सध्या चांगलंच वाढलंय. अशा मूर्त्यांना परदेशात प्रचंड मागणी आहे त्यामुळे संपूर्ण सिंधूदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला आहे. सर्व गावकर्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की त्यांनी रात्री १० ते सकाळी ०६ दरम्यान कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडू नये किंवा दरवाज्यावर आलेल्यांना प्रतिसाद सुद्धा देऊ नये.
आम्ही आ वासुन त्याच्या चेहर्याकडे पहात होतो. आत्ता माझ्या लक्षात येत होतं की आदल्या दिवशी त्या गावात आम्हाला मंदिरात मुक्काम करण्यासाठी का टाळलं जात होतं. त्या पोलिसाने सगळी चौकशी करून खात्री केल्यावरच माझं लायसन्स परत केलं होतं. समजा उद्या तुम्हाला रहायला कुठे जागा मिळाली नाही अशी परिस्थिती कुठे उद्भवलीच तर 'पहिल्यांदा पोलिस स्टेशनला कळवायला हवं. अगदीच ते नाही जमलं तर सरपंच, ग्रामसेवक यांना भेटून तुम्ही तुमची ओळख द्यायला हवी. त्यानंतर तुमचं येण्याचं प्रयोजन सांगून रितसर मुक्काम करण्याबद्दल परवानगी मागायला हवी' असा जाताजाता मोलाचा सल्ला द्यायलाही तो विसरला नाही.
विजयदुर्गात धुुुळपांचा वाडा आहे पण तो खाजगी असल्यामुळं पाहता येत नाही. तसं आता आमचं इथलं काम झालं होतं. सकाळच्या या गोंधळात नेमकं मुक्काम केलेलं मंदिरच पहायचं राहून गेलेलं होतं त्यामुळं गाडी परत मंदिराजवळ नेली. आता मंदिरात बर्यापैकी गर्दी होती. याशिवाय मंदिरात बरेच कामगार रंगरंगोटी करताना पण दिसले. आत गाभार्यात गेल्यावर आम्ही रात्री दर्शनासाठी आलो होतो पण इथे कुणीच नव्हतं असं पुजार्याला सांगितल्यावर त्यानेही रात्रीचा अनुभवलेला प्रकार घाबरुन आमच्या कानावर घातला. आम्हीपण चेहऱ्यावर सोज्वळ भाव आणत 'आम्ही त्या गावचेच नाही' असंच दाखवलं, नाहीतर त्याच्याकडूनही पुन्हा बोलणी ऐकून घ्यावी लागली असती. झाल्या प्रकाराबद्दल त्याला फारसं न छेडता पाचशे रुपये देणगी देऊन विषय संपवून टाकला. वाटेत असलेली गिर्येची शिवाजी महाराजांनी बांधलेली गोदी पाहिली आणि पुण्याचा रस्ता धरला. आजही मी जेव्हा केव्हा त्या मंदिराच्या किंवा विजयदुर्गाच्या परिसरात जातो त्यावेळी हा प्रसंग अगदी काल घडल्यासारखा डोळ्यासमोर येतो.
यासारखे एक ना अनेक प्रसंग आजवर भटकंती करताना अनुभवलेत. कितीतरी अडचणी आल्या पण त्यातून यशस्वीपणे बाहेरही पडलो. ही 'भटकंती' तुम्हाला अगदी कितीही विपरित परिस्थिती आली तरी तिला धाडसाने सामोरं जायला तर शिकवतेच पण अशा अनुभवातून तुमचं आयुष्यही अतिशय समृद्ध करून जाते हे मात्र तितकंच खरं.
समाप्त.