"जिवाभावाचा सवत्या"
खरंतर या घाटवाटांच्या नादी लागल्याला बरीच वर्षे झाली. आषाढी-कार्तिकीला जशी वारकऱ्यांची पंढरपूरला वारी असते ना तशीच दरवर्षी साधारण राज्याभिषेकाच्या जवळच्या रविवारी आम्हा मित्रमंडळींची 'रायगड'वारी असे आणि तीही प्रत्येकवेळी वेगळ्या घाटवाटेने. त्यामुळं सुरवातीच्या काही वर्षातच रायगडाच्या परिघातल्या बहुतेक सर्व घाटवाटा धुंडाळून झाल्या होत्या. आता त्याच त्याच वाटा परत करण्यापेक्षा थोड्या वेगळ्या करू म्हणून हळूहळू उत्तरेकडील वाटांचे ट्रेक सुरू झाले.
त्यातूनच ताम्हीणी जवळची एक नाळ उतरण्यासाठी जायचं ठरवून चिंचवड सोडलं. मागल्या खेपेला आधरवाडीतुन याच घाटाने उतरून 'सातपायरी' ऊर्फ 'सातीपडी' घाटाने परत आधरवाडीस येणार होतो. पण आधरवाडीला गेल्यावर एक 'चोरपायरी' नावाचा एक नवाच घाट असल्याचं समजलं. मग काय त्यानेच उतरलो. त्यामुळं हा नेमका मधला घाट धुंडाळायचा राहिला होता त्याचं नाव "सवत्या".
बऱ्याच दिवसांपासून या सवत्यानं फार अंत पाहीला होता. आता या खेपेला याचा सोक्षमोक्ष लावायचाच असे ठरवून सकाळी नाश्ता करून बाहेर पडलो नी तडक ताम्हीणी गाठलं. माऊली कोकरेंकडे चहा घेऊन मधल्या वाटेने चालतच तासांभरात आधरवाडी गाठली. महामार्गालगतच असलेल्या विंझाईच्या मुळ स्थानाचे दर्शन घेऊन तिथल्याच धाब्यावर थोडी पोटपुजा केली.
धाबेवाला मुळचा आधरवाडीचाच त्यामुळं त्याला थोडं 'बोलतं' करून आसपासच्या वाटांबद्दल चौकशी केली. आम्हांला हवी असलेली घाटवाट गावाजवळच असलेल्या एका जागेच्या plotting मधून जात होती. पुढच्या पंधरा मिनिटांतच तिथे पोहोचलो आणि तेथल्या वृद्ध रखवालदाराला रस्ता विचारला. त्याने सांगितलेल्या वाटेच्या खाणाखूणा आमच्या लक्षात आल्या नसाव्यात असं बहुधा त्याला वाटलं असावं म्हणून की काय कोण जाणे पण तो हातातली कामं टाकून स्वतः आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायला आला. पुढे आम्ही दिसेनासे होईपर्यत तो त्याच जागी थांबून आम्हाला ओरडून रस्त्याचे मार्गदर्शन करत होता. आता इथून पुढचा पल्ला मात्र आमचा आम्हांलाच कापायचा होता. कात्रज-सिंहगड मधल्या टेकड्यांसारखे तीन टप्पे पार केले आणि पुढं अक्षरशः वाट लागली. हल्ली रस्ते झाल्याने अशा घाटवाटांनी चालत कोण उतरणार? चुकूनमाकून एखादा कातकरी आला तरचं. पण गाठीशी असणारं माझं वाटा शोधण्याचं कसब? नेटाने पणाला लावलं आणि एका छोट्या कातळपट्ट्यावरून दगडांचे हाताला चटके घेत एका खिंडीत उतरलो आणि इथे बरोबर वाट सापडली. मागे चुकलेल्या वाटेचा माग काढण्याच्या फंदात न पडता अर्ध्या तासातच पाटणुसच्या कातकरवाडीत उतरणाऱ्या सोंडेवर चढलो. इथून पुढची वाट कमी झाडीच्या पट्ट्यातून हळूहळू उतरत होती म्हणून मग थोडक्यात आलेल्या वाटेचा अंदाज घेतला. एका झाडाखाली थोडी विश्रांती घेऊन पुढच्या दहाच मिनीटात कातकरवाडीचा बसथांबा गाठला. अशा आडबाजूला असलेल्या वाडीत एसटीची वाट पाहणं म्हणजे शुध्द वेडेपणा ठरला असता म्हणून येणाऱ्या एका ट्रॕक्टरला हात केला. त्यानेही काहीच आढेवेढे न घेता ट्रॕक्टर थांबवून आम्हांला विळ्याच्या एसटी थांब्यावर सोडलं. पुढे मात्र एसटीच्या कृपेने ताम्हीणी गाठलं आणि ट्रेकची सांगता केली.
त्या काळात कोडॕकचा हॉटशॉट कॕमेरा मी वापरत असे, तोही अगदीच निवडक ट्रेकला. त्या काळात फोटो काढणं म्हणजे माझ्या दृष्टीने अतिशय खर्चीक बाब होती. त्यामुळं या ट्रेकचे फोटोच काढलेले नाहीयेत. वरचा फोटोही ताम्हीणी-आधरवाडी दरम्यान मी नंतरच्या ट्रेकमधे काढलेला आहे. त्यामुळं 'फोटो' काढण्यासाठी तरी मी आता पुन्हा हा ट्रेक करावा म्हणतोय. बघू माझा 'सवत्या' मला पुन्हा कधी बोलावतोय ते...
छान घाटवाटा ट्रेक
उत्तर द्याहटवा