शनिवार, ४ जुलै, २०२०

॥ गुरुपौर्णिमा ॥

॥ गुरुपौर्णिमा ॥



गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:॥


       आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. हा दिवस आपण गुरुपौर्णिमा म्हणूनही ओळखतो. ज्यांनी महाभारत, पुराणांचं लिखाण केलं त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा दिवस. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरु, आचार्य अद्याप झालेलेच नाहीत त्यामुळं अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणं मानलं जातं. म्हणूनच या दिवसाला व्यासपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं.
       आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासूनच गुरु-शिष्यांची परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या मिळवतो आणि त्याच विद्येच्या योगे आपण समाजात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करतो अशा या गुरूंना मान देणं, आदरानं कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. खरं गुरुपूजन किंवा खरी गुरुपूजा म्हणजे आपल्या गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिलं आहे, जी शिकवण दिली आहे त्याचं प्रत्यक्षात आचरण करणं. ज्यावेळी शिष्याकडून गुरूला अभिप्रत असलेलं वर्तन केलं जाईल त्याचवेळी गुरूपुजन सार्थकी लागलं असं म्हणता येईल.
       गुरूंबद्दल सांगायचंच झालं तर गुरू म्हणजे ज्ञानाचा एक सागर आहे आणि या ज्ञानाच्या सागरातून काय आणि किती घ्यायचं हे फक्त आणि फक्त शिष्याच्याच हातात असतं. गुरू अखंड देत असतो आणि शिष्यानी ते फक्त घेत जायचं असतं.
       गुरु कोणाला म्हणावं? तर जिथं गेल्यावर आपल्याला समाधान मिळतं, आपल्या शंका मिटतात ते ठिकाण. आपल्या समस्त ट्रेकर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या आजूबाजूला असणारा सह्याद्रीतला निसर्ग आणि त्याची ओळख करून देणार्‍या सगळ्या व्यक्ती म्हणजे आपले गुरूच. बरोबर ना? त्यामुळं तापीपासुन तिलारीपर्यंत पसरलेली ही जी भुमी आहे ती म्हणजे आपली गुरूभुमी आणि अशा या भुमीतील प्रत्येक व्यक्ती जिच्याकडून आपल्या काहीतरी शिकायला मिळालंय ती म्हणजे आपले गुरू असंच म्हणावं लागेल.

       तसं वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगायचं तर ज्यांचं बोट धरून मी सह्याद्रीत हिंडूफिरू लागलो ते माझे वडील म्हणजे माझे पहिले गुरू. सायकलींग, ट्रेकींगची पहिली ओळख मला त्यांनी करून दिली. वय वर्ष १९ असताना क्वचितच कुणाचे वडील आपल्या एकुलत्या एका मुलाला त्याच्याच वयाच्या फक्त एका मित्रासोबत सायकलवरून गोव्याला पाठवतील. पण असे धाडस करणारे माझे वडीलच होते. त्यामुळे अशा धाडसाने निर्णय घ्यायला मी त्यांच्याकडून शिकलो.
       नेतृत्व कसं करावं? संघाला एकत्र बांधून कसं ठेवावं? व्यवस्थापन कसं असावं? नेत्याला कोणकोणत्या सर्वकष बाबींचा विचार करावा लागतो हे मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदीन शाखेत गेल्यावर शिकायला मिळालं. स्वयंसेवकापासून सुरू झालेला हा आलेख प्रार्थना प्रमुख, शारीरिक शिक्षण प्रमुख, गटप्रमुख, मुख्यशिक्षक, सहकार्यवाह असा उंचावतच गेला. मग मात्र काही कारणांमुळं थांबावं लागलं. हल्ली जरी शाखेत जाणं जमत नसलं तरी मुळचा पिंड काही बदललेला नाही हेही तितकंच खरं आहे.
       थोडं मोठं झाल्यावर ट्रेकींग करताकरता हळूच पुणे व्हेंचरर्सच्या गोतावळ्यात दाखल झालो आणि ट्रेकींग करण्याची एक नवीन दिशा मिळाली. तिथल्या गुरूंबद्दल सांगायचं तर तीन नावं अग्रक्रमानं घ्यावी लागतील, ती म्हणजे दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, दत्ताराम प्रभु आणि विनायक मोडक. तिथे कुणी ट्रेक प्लॅनिंग कसं करायचं हे शिकवलं तर कुणी ट्रेकींग करताना निर्णय कसे घ्यावे हे शिकवलं. कुणाचं व्यवस्थापन कौशल्य उत्तम तर कुणाचा इतिहास. कुणाचा जैवविवीधतेवर अभ्यास तर कुणी घाटवाटा तज्ञ. पुणे व्हेंचरर्समधल्या अशा एक ना अनेक ट्रेकगुरूंसोबत राहून माझं डोंगरात भटकणं अतिशय समृद्ध झालं. ज्यांचा प्रसिद्धी किंवा पैसा मिळवणं हा उद्देश कधीच नसतो अशा संस्थेचा एक भाग झाल्यानं त्या गोष्टी मनात कायमच्या रूजल्या. आजपर्यंत त्या मनाला कधीच शिवल्या नाहीत आणि इथून पुढेही कधीच शिवणार नाहीत. ही सुद्धा पुणे व्हेचरर्सचीच शिकवण म्हणावी लागेल.
       पुणे व्हेचरर्स बरोबर भटकणं जरी जोरात सुरू होतं तरी पहिल्यांदा मला 'लिहितं' केलं ते उमेश वाघेला सरांनी. लेखनाची बाराखडी मला त्यांनीच शिकवली. त्यांच्या प्राथमिक शाळेतुन उत्तीर्ण झाल्यावर लेखनाचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं माझ्या मित्राच्या म्हणजे मनोज शेडबाळकरच्या तालमीत. माझं लिखाण सुबक घडवलं ते त्यानेच. त्यामुळं त्यालाही माझा गुरूच म्हणावं लागेल. काळाबरोबर चालण्यासाठी टेक्नोसॅव्हीचं ज्ञान मिळालं ते निनाद बारटक्केकडून. 'सोशल मिडीया' या तंत्रज्ञानाच्या बाबतीत तरी तो नक्कीच माझा गुरू आहे. आजही जरी कुठे काही अडलं तरी त्याला हक्काने त्रास देतो. फोटो एडीटींग, ट्रेकरूट मार्कींग, गुगलबाबा वापरून वाटा शोधणं असं अजूनही बरंच काही शिकायचंय त्याच्याकडून. पाहू ती वेळ कधी येते ते. पण येईल लवकरच आणि त्यावेळी तोही काही हातचं राखून ठेवणार नाही एवढं नक्की.
       ऐतिहासिक लिखाण हे भटकंतीच्या लिखाणापेक्षा थोडं वेगळ्या प्रकारे करावं लागतं. ते करत असताना संदर्भ कसे शोधावेत?, अव्वल आणि दुय्यम ऐतिहासिक साधने कोणती?, त्यांचं वाचन कसं करावं?, कालगणना कशी मोजावी? वगैरे मला शिकायला मिळालं ते नितीन बाळपाटकीकडून. इतिहास हे क्षेत्रच असं आहे की यात गुरूची कायमच गरज पडते. आजही कुठे काही अडलं तर मी माझ्या या गुरूला कायमच विचारतो.

       तसं अजून बर्‍याच गुरूंबद्दल सांगायचं राहिलंय पण तुर्तास थांबतो. गुरूंचे आशिर्वाद कायमच पाठीशी असतात. आजही त्यांच्याकडून काही ना काही नवीन शिकायलाच मिळतं. वर उल्लेखलेल्या आणि चुकून उल्लेख राहून गेलेल्या माझ्या सर्व गुरूंना आज गुरूपोर्णिमेच्या निमित्तानं साष्टांग दंडवत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा