🚩 "हिंदू साम्राज्य दिन"
लेख पहिला...
🚩 'हिंदुस्थानातील राजकीय स्थित्यंतरे'
काही दिवसांपूर्वी whatsapp वर भारतवर्षात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांबद्दल एक सुंदर व्हिडीओ सगळीकडे फिरत होता. (हा व्हिडीओ इथे टिचकी मारून पाहता येईल) एकूणच भारतवर्षात लहानमोठ्या सर्व राजवटी सांगायच्या तर त्याची संख्या दहाबारा नक्कीच होईल. त्या व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे सुरवातीच्या काही अतिप्राचिन राजवटींनंतर साधारण इसवीसनपूर्व दुसर्या शतकापासून हिंदूस्थानात सातवाहनांची राजवट राज्य करत होती. या राजवटीत एकंदरीतच व्यापारवृद्धी झाल्याने सगळ्या प्रदेशाची खूपच भरभराट झाली. पण व्हिडीओत दाखवलेल्या त्यातल्यात्यात मोठ्या राजवटींचा विचार करता त्यामधल्या सातवाहनांनंतर एकापाठोपाठ एक अशा शक, क्षत्रप, कुशाण, अभीर किंवा अहीर, त्रैकुटक, वाकाटक, गुप्त, गुर्जर, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव आणि शेवटी विजयनगरचे होयसळ या सर्व हिंदू राजवटी नांदल्या.
याच दरम्यान इ.स. १००० पासून इस्लाम धर्माच्या प्रचाराच्या मुखवट्याखाली गझनीच्या महंमदाच्या स्वार्या भारतावर सुरू झाल्या होत्या. त्याने एकूण अठरा स्वार्या करून हिंदूंची घरेदारे, मठ, देवळे फोडून, भ्रष्ट करून अगणित संपत्ती लूटून नेली. उत्तरेकडून होणार्या या कडव्या, धर्मांध मुस्लिमांच्या धडाक्यापुढे उत्तर हिंदूस्थानातल्या हिंदू राजसत्तांचा प्रतिकार कायमच तोकडा पडला आणि ही पुढे येऊ घातलेल्या हिंदूस्थानातल्या मुस्लिम राजवटींची नांदीच होती. इ.स. १२९४ साली दिल्लीचा बादशहा जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या अफगाण सेनेसह दक्षिणेत उतरून देवगिरीच्या रामदेवराय यादवाचा मोठा पराभव केला आणि प्रचंड खंडणी वसूल केली. पुढच्या दोन वर्षात जलालुद्दीन खिलजीच्या संपूर्ण कुटुंबाची कत्तल करून अल्लाउद्दीन खिलजी बादशहा बनला. नंतरही खिलजीची यादवांवर आक्रमणे सुरूच होती. रामदेवराय यादवानंतर, शंकरदेव आणि त्यानंतर त्याचा मेहुणा हरपालदेव यांचा प्रतिकारही तोकडा पडला आणि महाराष्ट्रातलं शेवटचं 'यादव' हे हिंदू साम्राज्य लयास गेलं.
इ.स. १३२५ साली खिलजींना गादीवरून उतरवून महमंद तुघलक दिल्लीचा बादशहा बनला आणि त्याने आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवली. स्थानिक हिंदूंना कामाला लावून त्याने मुळ देवगिरीच्या डोंगरी किल्ल्याच्या बाजूला सध्या आपल्याला दिसतो तो तिहेरी तटबंदीचा भुईकोट बांधला आणि देवगिरीचं दौलताबाद असं नामकरण केलं. सातशे वर्षे उलटून गेली तरी आजही आपण त्याला 'दौलताबाद' असंच म्हणतो. चौदाव्या शतकात दोन महत्वाची राजकीय स्थित्यंतरं झाली. त्यातलं पहिलं म्हणजे १३२६ साली झालेला विजयनगर साम्राज्याचा उदय आणि १३४७ साली झालेली बहामनी राजवटीची स्थापना. तुंगभद्रेच्या उत्तर तीरावरील अनेगुंदीच्या किल्लेदाराने सार्वभौमत्वाची द्वाही फिरवली आणि बलदंड अशा विजयनगर राजधानीची निर्मिती केली. सध्या या ठिकाणाला आपण हंपी म्हणून ओळखतो. या साम्राज्याच्या सीमा पार महाराष्ट्रातल्या उत्तर कोकणापर्यंत भिडलेल्या होत्या. रायरी ऊर्फ रायगडाचा उल्लेख हा विजयनगरच्या दफ्तरात सापडतो. तत्कालीन कोकण हे शिर्के, शेलार, सुर्वे, सावंत, दळवी, मोरे या अस्सल मराठी पाळेगारांच्या ताब्यात होते. साधारण इ.स. १३४७ च्या काळात महमंद तुघलकाच्या दक्षिणेतल्या सुभेदारांनी हसन गंगु बहामनीच्या नेतृत्वाखाली बंड करून स्वतंत्र राज्याची स्थापना केली. या बहामनी राजवटीची पहिली राजधानी गुलबर्गा होती ती पुढे त्यांनी बिदरला नेली. दक्षिणेत असलेल्या विजयनगर आणि बहामनी राजवटीतला संघर्ष अटळ होता आणि पुढे तो पिढ्यानपिढ्या सुरूच होता. अल्लाउद्दीन बहामनीने विजयनगरचा राजा दुसरा देवराय याचा पराभव केला आणि या शेवटच्या हिंदू साम्राज्याला घरघर लागली. यानंतर विजयनगरचे अस्तित्व बहामनी राजवटीचे मांडलिक एवढेच राहिले. पुढे बहामनींचा विस्तार होऊन कोकण, महाराष्ट्रापासून संपूर्ण दक्षिणेत त्यांची सत्ता स्थापली. आता बलाढ्य असे सांगायचे तर उत्तरेत मंगोल आणि दक्षिणेत अफगाणी बहामनी असा दोनच राजवटी उरल्या.
पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत फारशा काही राजकीय हालचाली झाल्या नाहीत पण १४८५ साली बहामनी राजवटीतला एक सक्षम मंत्री महम्मुद गवान याची दरबारातल्या त्याच्या सहकार्यांनीच हत्या केली आणि हीच घटना बहामनी राजवटीचे तुकडे होण्यास कारणीभुत ठरली. पुढच्या पाच वर्षात म्हणजे १४९० सालापर्यंत अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापुरची आदीलशाही, बिदरची बरीदशाही आणि वर्हाडातली इमादशाही अशी पाच स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. अजून एक महत्वाची घटना १४९८ साली घडली ती म्हणजे 'वास्को द गामा'चा भारतप्रवेश. आतापर्यंत बहुतेक सर्व आक्रमणं उत्तरेकडून होत होती. वास्को द गामाच्या प्रवेशामुळे आफ्रिकेच्या पलिकडच्या युरोपियन राष्ट्रांना भारताचं दार उघडलं गेलं. आता डच, फ्रेंच, पोर्तुगिज आणि ब्रिटीशांना हिंदूस्थानची सोनेरी बाजारपेठ खुणावू लागली होती. सुरवातीला व्यापार, धर्मप्रसार या बहाण्यातून मोक्याची जमीन बळकावणे आणि नंतर संरक्षणाच्या नावाखाली किल्ले उभारणे असे यांचे स्वरूप होते.
सोळाव्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे इ.स. १५२६ साली रजपुतांच्या वाढत्या प्रभावास शह देऊन मंगोलवंशीय बाबर (१५२६-१५३०) हा दिल्लीच्या गादीवर आला. त्यानंतर हुमायुन (१५३०-१५४० आणि १५५५-१५५६), अकबर (१५५६-१६०५), सलीम ऊर्फ जहांगिर (१६०५-१६२७), खुर्रम ऊर्फ शाहजहान (१६२७-१६५८) आणि अबुल मुजफ्फर मोईउद्दीन ऊर्फ औरंगजेब (१६५८-१७०७) या मंगोल किंवा आपण उच्चारतो त्या मोगल बादशहांनी शेरशहा सुरी (१५४०-१५५५) याच्या पंधरा वर्षाचा अपवाद वगळता सलग दोनशे वर्षे राज्य केले. समुद्रमार्गे आलेल्या फिरंग्यांकडुन युद्धसाहीत्य विकत घेऊन आपापसात लढणार्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी इ.स. १५६४ साली एकत्र येऊन तालीकोटच्या लढाईत विजयनगरचे हिंदू साम्राज्य दक्षिणेतुन समूळ नष्ट करून टाकले. आता हिंदूस्थानात मेवाड आणि माळव्यातले रजपूत सोडले तर कोणतेच हिंदू राज्य उरले नव्हते. १५५६ साली गादीवर आलेल्या अकबराने जमेल तेवढ्या सगळ्या मार्गांनी म्हणजे प्रसंगी सेनाबळाचा वापर करून तर प्रसंगी रजपूत राजकन्या जोधाबाईशी विवाह करून रजपूतांना कायमचे संपवले. तरी चितोडच्या रूपाने एक पणती अजूनसुद्धा तेवत होती. पुढे इ.स. १५६७ साली चितोडगडही अकबराच्या ताब्यात आल्यानंतर राणा उदेसिंग याने आपली राजधानी उदयपुरला हलवली पण त्यानंतर त्याची तलवार काही मोगलांविरूद्ध उठली नाही. पण उदेसिंगच्या मुलाने म्हणजे प्रतापसिंहाने राजवाड्यातील विलासी जीवनाचा त्याग करून अरवलीच्या दर्याखोर्यातुन मोगलांविरूद्ध चितोड मिळवण्यासाठी हल्ले चालूच ठेवले होते. शेवट या महाराणा प्रतापाचा हल्दीघाटीत जरी पराभव झाला तरीसुद्धा सिसोदीयांच्या प्रतिष्ठेची ध्वजा त्यांनी शेवटपर्यंत कायमच फडकत ठेवली.
या जवळजवळ सहाशे वर्षांच्या पारतंत्र्यात सतराव्या शतकात कुणी एक व्यक्ती सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात जन्म घेते. पारतंत्र्याच्या पार्श्वभुमीवर फारसा कुणाचा आणि कुठलाच पाठींबा नसताना वडिलांकडून मिळालेल्या फक्त पुणे, सुपे परगणे आणि एक हजार पदातींच्या जोरावर शुन्यातून एक मोठे साम्राज्य उभे करते. हे सर्व देवानेच माझ्या हातून करून घेतलंय असं म्हणून शेवटी श्रेय सामान्यांच्याच पदरात घालते हे दैवी अवताराशिवाय कदापि शक्य नाही. किती आणि कोणत्या विपरीत परीस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. ज्याने तीनशे वर्षांत उध्वस्त झालेल्या या भूमीच्या संस्कृतीचा संसार पुन्हा नीटनेटका मांडला. ज्यांच्यामुळे घरासमोर सडे शिंपले गेले, देवघरात पुन्हा देव मांडले गेले, वृंदावनात तुळस लावली गेली, गोठ्यात गाय बांधली गेली, हिंदूंची प्रतिष्ठा वाढवून त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. स्वराज्यात कोणावर अन्याय म्हणून उरू दिला नाही. सर्वात मुख्य म्हणजे पारतंत्र्य नष्ट केले. स्वराज्य आणि धर्माचे राज्य निर्माण केले. अशा राज्याच्या राजाला सिंहासन नाही? छत्र नाही? असं नाही म्हटल्यावर काशीच्या पंडीत गागाभट्टांनी महाराजांना राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. गागाभट्टांनी महाराजांना राज्याभिषेकाचे महत्व आणि आवश्यकता सांगितली. संस्काराशिवाय मान्यता नाही हेही सांगितले आणि त्यासाठीच राज्याभिषेक करून घेतला पाहिजे असे आग्रहाने सांगितले आणि केवळ त्यानुसारच महाराजांनी शालिवाहन शके १५९६ च्या जेष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या त्रयोदशीला स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. हा राज्याभिषेक म्हणजे या भारतभूमीवर पुन्हा एकदा हिंदूंचं साम्राज्य निर्माण झाल्याचं द्योतक होतं.
🚩 विषयप्रवेश -
अकराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत म्हणजेच जवळजवळ सहाशे वर्षांच्या म्लेंछ राजवटीच्या उरावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या कारणासाठी तो दिवस आपण सर्व हिंदूंनी एकजुटीने 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणूनच साजरा करायला हवा. हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि संभाजीराजांनी कसे प्रयत्न केले? हे करण्यासाठी त्यांनी काय परराष्ट्रीय धोरण अंगिकारलं? कसा पत्रव्यवहार केला? अत्यंत विपरीत परिस्थितीतून साम्राज्य उभं करणाऱ्या महाराजांबद्दल त्यांच्या काही समकालिन व्यक्तींनी याविषयी काही लिहून ठेवलं आहे काय? वगैरे सर्व अभ्यासण्यासारखं आहे. इतिहास म्हणजे फक्त लढाया नाहीत तर आर्थिक, सामाजिक, परराष्ट्रीय धोरण, व्यापार अशा अनेक विषयांचा ससंदर्भ अभ्यास करणे आहे. खरं सांगायचं तर यासाठी संपूर्ण शिवचरित्राचाच बारकाईने अभ्यास करावा लागेल. या लेखापुुुढच्या प्रत्येक लेखात आपण महाराजांच्या समकालीन व्यक्तींनी त्यांच्याबद्दल काय लिहून ठेवलंय याची थोडक्यात माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपण सर्व हिंदूनी हा दिवस 'हिंदू साम्राज्य दिन' म्हणूनच का साजरा करावा याची थोडीफार कल्पना नक्कीच येईल. शेवटी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते त्याचं अगदी नेमकेपणाने वर्णन केलंय, काय ते पाहू आणि थांबू. यातला एकही शब्द अतिशयोक्ती असलेला नाही. प्रत्येक शब्द अतिशय तोलूनमापूनच वापरलाय.
समर्थ म्हणतात...
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥
बहुत काय लिहिणे । आपण सुज्ञ असा ॥
मर्यादेयं विराजते ॥
🚩 संदर्भ -
१) राजा शिवछत्रपति - बाबासाहेब पुरंदरे
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
🚩 व्हिडीओ स्त्रोत -
या सहा भागांच्या लेखमालेचा पुढील भाग या धाग्यावरून वाचता येईल...
रोमांच उठले.. फक्त विजयनगरचे होयसळ हा उल्लेख बरोबर आहे का?
उत्तर द्याहटवाआपल्या योग्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवाइतिहासात वरंगळच्या दोन भावांनी हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली असे सांगितले जाते ते अजूनही खोलात जाऊन तपासून बघितले पाहिजे. होयसळ वीरबल्लाळच्या धडपडींमुळे विजयनगर साम्राज्याचा पाया त्यानेच घातला असावा असे वैयक्तिक तरी मला वाटते. अर्थात या विषयी ससंदर्भ अभ्यास होणे गरजेचे आहे. तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर आनेगुंदीचा किल्ला आणि दक्षिण तीरावर कंपलीचा किल्ला आहे. वीरबल्लाळच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या राजाने व त्यानंतरच्या राजांनी व त्याच्या प्रधानांनी उत्तर सीमा मजबूत करायचे काम मोठ्या जोमात केले. याच प्रयत्नात कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेल्यावर अशाच एका मजबूत तटबंदीची गरज भासू लागली असावी आणि विजयनगरचा उदय झाला असावा. अर्थात याविषयी माझा काहीच अभ्यास नाही. त्यामुळे 'विजयनगरचे होयसळ' असे विधान करणे सध्या तरी चुकीचेच ठरेल त्यानूसार लेखात योग्य तो बदल केला आहे.