मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

"वेडात मराठे वीर दौडले सात"

"वेडात मराठे वीर दौडले सात"

 


म्यानातुनि उसळे तरवारीची पात।

वेडात मराठे वीर दौडले सात ।।


       कवि कुसुमाग्रजांचं हे काव्य आज प्रत्येक शिवप्रेमीला माहिती आहे ते म्हणजे त्यात भरभरून असलेल्या वीररसामुळं. खरंतर कुसुमाग्रजांनी हे काव्य शिवकाळात घडून गेलेल्या एका खर्‍याखुर्‍या प्रसंगाचा आधार घेऊन लिहिलंय.

       ही गोष्ट आहे इसवीसन १६७४ सालातल्या फेब्रुवारी महिन्यातली. जून १६६५ ला नाईलाजानंच करावा लागलेला पुरंदराचा तह ०४ फेब्रुवारी १६७० ला सिंहगड जिंकून मराठ्यांनी मोडीत काढला आणि लगोलग स्वराज्याची प्रादेशिक आणि आर्थिक तुट भरून काढण्यासाठी सुरू झाल्या त्या एकापाठोपाठ अशा मोहिमा. एकूणच हा तीनचार वर्षांचा काळ मराठ्यांसाठी अतिशय धामधुमीचा होता. पुढच्या काळात मराठ्यांनी पुरंदराच्या तहात गेलेला प्रदेश, किल्ले परत घ्यायचा जणू सपाटाच लावला. त्याचबरोबर आदिलशाही-मोगलाईतला प्रदेश, ब्रिटीश वखारी, सुरत लुटून आणि परदेशी मालावर जबर जकात बसवून आर्थिक तुटही भरून काढली जात होती. साधारण याच काळात रायगडावर शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तयारी जोरदार सुरू झाली होती. अशातच अब्दुल करिम बहलोलखान हा आदिलशाही पठाणी सरदार बारा हजारच्या सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. त्याची आणि मराठ्यांच्या सेनापतीची तुंबळ लढाई झाली आणि या लढाईची गोष्ट म्हणजेच हे काव्य. असं काय झालं होतं नेमकं त्या लढाईच्या वेळी की ज्यावर कुसुमाग्रजांना एवढं काव्य लिहावंसं वाटलं?

       तेव्हा नेमकं काय झालं होतं हे जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल. या कुसुमाग्रजांच्या काव्याचे नायक असलेले महान सेनापती होते कडतोजी गुजर. कडतोजी गुजरांचा पहिला उल्लेख कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या सभासद बखरीत असा केला आहे की...

       "पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला आणि 'समयास कैसा पावला नाहींस?' म्हणून शब्द लावून, सरनौबती दूर करून, राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता, त्यांचे नाव दूर करून, प्रतापराव ठेविले आणि सरनोबती दिधली. प्रतापरावांनी सेनापती करीत असतां शाहाण्णव कुळींचे मराठे चारी पादशाहींत जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळविले. पागेस घोडीं खरेदी केलीं. पागा सजीत चालिले व शिलेदार मिळवित चालिले. असा जमाव पोक्त केला. चहूं पादशाहीत दावा लाविला."

       कडतोजी ऊर्फ प्रतापराव गुजर कसे होते हे या वर्णनावरून नक्कीच स्पष्ट होईल. असे हे सक्षम प्रतापराव बहलोलखान स्वराज्यावर चालून येत होता त्यावेळी कोल्हापुर भागात पन्हाळा किल्ल्याजवळच होते. विजापूराहून निघाल्यावर बहलोलखान सोबत असलेल्या बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यात मोठा धुमाकूळ घालत होता. सोबत गरीब रयतेवर अतोनात अत्याचार देखील करत होता म्हणून शिवाजी महाराजांनी सरनौबत प्रतापराव गुजरांना बहलोलखानास धुळीस मिळविण्यासाठी हुकूम केला. प्रतापरावांची बहलोलखानाशी पहिली गाठ चिकोडीजवळच्या उमराणीजवळ पडली. उमराणीजवळ प्रतापरावांनी मराठ्यांच्या अस्सल गनिमीकाव्याने बहलोलखानाचे सैन्य त्याला काही कळायच्या आत चारही बाजूंनी वेढले आणि वर त्याचे पाणीही तोडले. प्रतापरावांच्या या चालीमुळं आता बहलोलखान पुरता जेरीस आला. त्याला काहीच हालचाल करता येईना. म्हणून मग तो आपल्या सैन्यासह बिनशर्त शरण आला. अशा या शरण आलेल्या बहलोलखानाने प्रतापरावांकडे धर्मवाट मागितली आणि प्रतापरावांनीही नुसतं खानाला नाही तर मोठ्या मनाने त्याच्या फौजेला पण ती दिली. आपल्या सैन्याचा दैनंदिन अहवाल महाराजांना समजत असेच. त्यामुळे ही गोष्ट महाराजांना कळल्यावर त्यांनी "सला काय निमित्यें केला?" म्हणजे असं काय कारण झालं की तुम्ही तह केला? असा जळजळीत सवाल प्रतापरावांना पत्राद्वारे विचारला. अतिशय स्वाभिमानी असलेले प्रतापराव या प्रश्नाने खूपच दु:खी झाले आणि त्यांच्या मनात बहलोलखानाविषयी राग उफाळून आला. त्यांना त्यांची झालेली चूक उमगली होती पण आता वेळ निघून गेली होती. सैन्यासोबत असलेल्या हेरांकडून बहलोलखान पुन्हा सैन्याची जमवाजमव करून स्वराज्यावर चढाईची तयारी करतोय अशा बातम्या प्रतापरावांच्या कानावर येतच होत्या. बहलोलखाननेही प्रतापरावांच्या तलवारीचे पाणी चांगलेच जोखले होते त्यामुळे तो सारखा त्यांच्यापासून लांब राहण्याचाच प्रयत्न करत होता. 

       खरंतर प्रतापरावांना त्यांच्या हातून चुकून का होईना पण घडलेल्या कृत्याचा अतिशय पश्चात्ताप होत होता. तोच महाराजांचे पुन्हा एक उकळत्या तेलासारख्या शब्दांचे पत्र प्रतापरावांच्या हाती पडले. पत्रात शब्द होते, "बहलोलखान येवढा वळवळ करीत आहे. त्यास गर्दीस मेळविणे. अन्यथा आम्हांस पुन्हा रायगडावर तोंड न दाखविणे". राज्याभिषेकाच्या ऐन तोंडावर एवढा अपमान आणि इतकी मोठी झालेली चूक सुधारल्याखेरीज आपल्याला रायगडाला जाताही येणार नाही आणि महाराजांना भेटता सुध्दा येणार नाही हे दुःख त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून तेव्हापासून प्रतापराव बहलोलखानास जंगजंग शोधत होते. खान आपल्यावरच चाल करून यावा म्हणून प्रतापराव आदिलशाही मुलखातली हुबळी वगैरे गावं लुटत होते, जाळून बेचिराख करत होते पण खान काही त्यांच्या जवळपास येत नव्हता.

       एके दिवशी आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या चंदगड तालूक्यातल्या नेसरी येथे बहलोलखानाचा तळ पडला आहे असे हेरांकडून प्रतापरावांना कळाल्यावर त्यांना राग अनावर झाला आणि ते तडक घोड्यावर बसून बहलोलखानाच्या छावणीवर चालून निघाले. खरंतर छावणीतले सैन्य लढाईसाठी तयार व्हायला काहीसा वेळ लागतो पण हा वेळही वाया न घालवता त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजी शिंदे हे वीरही निघाले. मागून सैन्य तयार होऊन येईपर्यंत या सात वीरांनी बारा हजाराच्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनीमांना ठार मारले. पण अखेर व्हायचे तेच झाले. या लढाईत प्रतापराव आणि त्यांच्या सोबतचे ते सहा वीर शेवटी मृत्यूमुखी पडले. केवढे हे शौर्य या सात वीरांचे? समोर साक्षात मृत्यु आहे हे माहिती असूनही हजारोंनी असलेल्या सैन्यावर हे सात वीर चालून गेले. पराकोटीची स्वामिनिष्ठा आणि फक्त स्वराज्यावरील प्रेमापोठी या सात वीरांनी स्वत:स मरणाच्या दारात झोकून दिले. या घटनेने स्वराज्याचे कधीच भरून न येणारे नुकसान झाले होते. त्यामुळे ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतिशय दु:ख झाले आणि हे सात वीर कायमच स्मरणात रहावे यासाठी त्यांनी एक स्मारक नेसरीजवळ उभारले. तसेच आपल्या मुलाचा राजारामांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावून दिला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या 'राजा शिवछत्रपति' मध्ये असे वाक्य आहे की, 'खानाला तरी मारीन नाहीतर मी तरी मरेन, अशी तिडीक त्याने धरली होती. दिव्य करून राव मरून गेला. हा दिवस शिवरात्रीचा होता. (२४ फेब्रुवारी १६७४) सप्तदलाचे बिल्वपत्र शिवाच्या मस्तकावर वाहिलें गेले'...

       तर या गोष्टीवर कवि कुसुमाग्रजांनी काय काव्य केलंय ते पहा. पार्श्वभूमी कळल्यावर तर ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल.

 

'वेडात मराठे वीर दौडले सात'

म्यानातुनि उसळे तरवारीची पात ।

वेडात मराठे वीर दौडले सात ।। धृ ।।


ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले ।

सरदार सहा सरसावुनि उठले शेले ।।

रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले ।

उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात ।। १।।

वेडात मराठे...


आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना ।

अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना ।।

छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना ।

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात ।। २ ।।

वेडात मराठे...


खालून आग, वर आग, आग बाजूंनी ।

समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी ।।

गर्दीत लोपले सात जीव ते मानी ।

खग सात जळाले अभिमानी वणव्यात ।। ३ ।।

वेडात मराठे...


दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा ।

ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा ।।

क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा ।

अद्याप विराणी कुणि वार्‍यावर गात ।। ४ ।।

वेडात मराठे...

 

       हे झाले 'काव्य'. आता काव्य या प्रकाराला ऐतिहासिक साधनांत कितपत महत्त्व आहे?

       ऐतिहासिक साधनांविषयीच जर सांगायचं झालं तर दर्जानुसार प्रथम सनदा, पत्रे, महजर, करीने, शकावल्या, बखरी आणि सरतेशेवटी पोवाडे व काव्ये असा क्रमांक लागतो. म्हणजे ज्यामधे सत्त्याचा थोडाच अंश असतो असे काव्य म्हणजे दुय्यम प्रतीचे साधन आहे. आता कोणकोणत्या ऐतिहासिक साधनांत या लढाईबद्दल उल्लेख आलाय ते पाहूया.

 

१) सभासद बखर -

       शिवछत्रपतींचे हे चरित्र कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेले आहे ज्यालाच आपण सभासद बखर म्हणून ओळखतो. हे थोरले राजाराम महाराज यांच्या पदरी सभासद होते. थोरले महाराज म्हणजेच शिवाजीराजांचे आत्मचरित्र पहिल्यापासून लिहावे अशी राजाराम महाराजांनी आज्ञा केल्यामुळे हे चरित्र तंजावर येथे कृष्णाजी अनंत यांनी लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या पश्चात बारा-चौदा वर्षानंतरच हे चरित्र लिहिले गेले. दुसरं असं की सभासद हे महाराजांचे समकालीन आहेत. प्रत्यक्ष महाराजांबरोबर राहिलेली ही व्यक्ती आहे. त्यामुळे हे शिवचरित्र विशेष विश्वसनिय असेच म्हणावे लागेल. त्यातला हा उल्लेख.

 

 

२) मराठ्यांची बखर किंवा History Of The Marathas -

       ही मराठ्यांची बखर कॅप्टन ग्रँट डफच्या मुळ 'History Of The Marathas' या ग्रंथावरून कॅप्टन डेव्हीड केपनने मराठीत अनुवादीत केलेली आहे. ग्रँट डफ (०८ जुलै १७७९ - २३ सप्टेंबर १८५८) हा ब्रिटीश अधिकारी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात पुण्याला होता. पुढे तो सातार्‍याचा गव्हर्नर झाला. या महाराष्ट्रातले लोक इतक्या योग्यतेस कसे पोहोचले हे जगाला कळावं म्हणून त्याने बर्‍याच ठिकाणाहून कागदपत्रे गोळा केली. ब्रिटीश दफ्तर, सनदापत्रे, मुसलमानी बखरी वगैरेंचा अभ्यास करून तो इंग्लंडला गेला आणि तिथे 'History Of The Marathas' नावाचा ग्रंथ इंग्रजी भाषेत छापला. त्या काळात त्याला बरीच अस्सल साधनें मिळाल्यामुळे त्याचा हा ग्रंथ विश्वसनिय असाच म्हणावा लागेल. हा ग्रंथ महाराष्ट्रदेशीच्या लोकांसाठी हितावह असल्याचे जाणून आणि त्यांना तो सहजपणे समजावा म्हणून ग्रँट डफच्या मुळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद कॅप्टन डेव्हीड केपन यांनी करून 'मराठ्यांची बखर' या नावाने १८२९ साली मुंबईत छापला.



३) 'English Records On Shivaji (1659 - 1682) -

       'English records on Shivaji' हे पुस्तक दस्तऐवज, पत्रे आणि पत्रव्यवहाराचा संग्रह आहे जे मराठा इतिहास आणि विशेषत: शिवाजी महाराजांच्या राजकीय जीवनाबद्दल अंतर्दृष्टी देते. हे पुस्तक कागदपत्रांचे तपशील किंवा शिवाजी महाराजांच्या काळातील ब्रिटिश अधिकार्यांमधील आपापसात केलेल्या तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या देवाणघेवाणीबद्दल बोलते.
       'Factory Records' म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या तत्कालीन एजंट्स, फॅक्टरीच्या पूर्वेकडील कारखान्यांची स्थापना आणि इंग्रजांच्या व्यापाराला चालना देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या सुरुवातीच्या नोंदी होय. या नोंदींमध्ये मुख्यतः त्यांची आणि कौन्सिलची झालेली सल्लामसलत, पाठवलेल्या आणि प्राप्त झालेल्या पत्रांच्या प्रती आणि विशिष्ट भटक्या व्यक्तींच्या डायरी आणि लेटरबुक यांचा समावेश आहे.
       वर उल्लेखलेल्या व्यक्ती वैयक्तिकरित्या जे पाहिले किंवा ऐकले ते सांगत आहेत, जेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष त्यांच्याभोवती घडत होत्या. या ग्रंथात त्यांनी लिहिलेल्या कागदपत्रातील संदर्भ एकत्रितपणे दिलेले आहेत. त्यांनी लिहिलेली कागदपत्रे ही पुर्वग्रहदुषीत नसल्यामुळे ती प्रथम श्रेणीची सामग्रीच आहे त्यामुळे ती अत्यंत विश्वसनीय अशीच समजावी लागेल.
       हे मुळ पुस्तक २६ जून १७७९ रोजी रॉबर्ट ऑर्मे यांनी लिहिले त्यावरून हे पुस्तक 'शिवचरित्र कार्यालय, पुणे' यांनी १९३१ साली प्रकाशित केले. ‘Shivaji Tercentenary Memorial Series' ची ही सहावी आवृत्ती आहे.

 

४) मराठी दफ्तर - 

       मराठी दफ्तर ही संस्था ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठाणे येथे सुरु केली गेली. कागदपत्रांचे संशोधन करुन आणि त्यावर ससंदर्भ लेख लिहून प्रकाशित करणे हा या संस्थेचा हेतू होता. या संस्थेने जुन्नरी कागदावर, मध्यम, ढोबळ, कुणबाऊ वळणाने मोडीत लिहिलेली शेडगावकर भोसले बखर १८३९ साली जशीच्या तशी मराठीत अनुवादीत करून प्रसिद्ध केली आहे.



५) शिवकालिन-पत्र-सार-संग्रह -

       रायगड स्मारक मंडळ आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्या सहकार्‍याने चाललेल्या श्रीशिवचरित्र कार्यालयातर्फे 'शिवकालिन-पत्र-सार-संग्रह' या ग्रंथाचे तीन खंड प्रकाशित करण्यात आलेले आहेत. या खंडांमधे शिवकालिन अस्सल पत्रांच्या सारांशाचा समावेश केलेला आहे. शिवाजी महाराजांसंबंधीच्या मराठी, इंग्रजी, पोर्तुगिज, डच, कानडी, फारसी आणि संस्कृत या सात भाषांतील अस्सल पत्रे व समकालिन कागदपत्रांचा यात समावेश केलेला आहे. ऐतिहासिक साधनांत पत्र हे सर्वात अस्सल साधन समजलं जातं. साहजिकच हे साधन विशेष विश्वसनिय असेच म्हणावे लागेल.

 

६) ९१ कलमी बखर -

       प्रस्तुत बखर मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिविस यांनी 'तारीख ए शिवाजी' या मूळ पर्शियन ग्रंथावरून लिहिलेली असून पहिल्यांदा ही बखर वि.का. राजवाडेंनी प्रभात मासिकामधे प्रसिद्ध केलेली होती. नंतरच्या काळात भारतवर्षात प्रसिद्ध केलेली त्रुटीत ९१ कलमी बखर, काव्येतिहास संग्रहात साने यांनी प्रसिद्ध केलेली महाराष्ट्र साम्राज्याच्या छोट्या बखरीतील शिवछत्रपतींची कारकीर्द, फॉरेस्टस सिलेक्शन्स या ग्रंथात आरंभीच छापलेले या बखरीचे फ्रिजेलकृत भाषांतर आणि मॉडर्न रिव्यू या मासिकात सर जदुनाथ सरकार यांनी छापलेले तारीख ए शिवाजी या फारसी बखरीचे इंग्रजी भाषांतर एकत्रित करून २२ ऑक्टोबर १९३० साली वि. स. वाकसकरांनी ती पुनः प्रकाशित केली. यामधे त्यांनी पारसनीस, वि.का. राजवाडे, साने, फॉरेस्ट आणि सर जदुनाथ सरकार यांनी बखरीवर लिहिलेल्या पृथकांचे एकत्रिकरण केले त्यामुळे त्याचा तौलनिक अभ्यास करणं अत्यंत सोईचं झालं.

 

७) जेधे शकावली - 

       या जेधे शकावलीची मूळ प्रत रा. रा. दयाजीराव सर्जेराव ऊर्फ दाजीसाहेब जेधे देशमुख, इसाफतकार मौजे कारी, संस्थान भोर यांच्याकडून लोकमान्य टिळकांकडे आली. त्यांनी मूळ प्रतीची नकल करून मूळ प्रत पुन्हा जेधे देशमुखांना परत केली आणि नकल मंडळाकडे तपासून घेण्यासाठी पाठवली. जेधे शकावलीची मूळ प्रत उभ्या व अरूंद अशा पोर्तुगीज कागदावर लिहिली आहे. तिची पाठपोट बावीस पाने असून, तेविसावे पान अर्धेच लिहिलेले आहे. हीत शके १५४० ते शके १६१९ पावेतोची सालवार हकीकत कमजास्त तपशिलाने दिलेली आहे.


       कवि कुसुमाग्रजांच्या अजरामर काव्यातल्या उल्लेखासारखे खरेच त्या ठिकाणी घडले असेल काय? शेवटी प्रतापराव हे एका साम्राज्याचे सेनापती आहेत. महाराजांनी कुणालाही वंशपरंपरेने कोणतंच पद दिलं नाही पण कर्तुत्व सिध्द केल्यावर मात्र सामान्य व्यक्तीलाही उच्च पदावर बसवलं. शिवकाळात खानदानी घरण्याशी संबंध नसलेली पण स्वकर्तुत्वाने मोठ्या पदापर्यंत पोहोचलेली बरीच उदाहरणं सापडतात. 'कडतोजी गुजर' ही त्यातीलच. थोर इतिहासकार वा. सी. बेंद्रेंनी मात्र याबाबत वेगळे मत मांडताना म्हटले आहे की, आततायीपणा करण्याइतपत सरनोबत प्रतापराव गुजर काही नवखे नव्हते. राजगडाच्या किल्लेदारीपासून आग्राभेट, सूरत स्वारी, साल्हेरची लढाई यामध्ये त्यांनी आपल्या गनिमी काव्याने शत्रूंना सळो की पळो करून सोडलेले होते. त्यामुळे कदाचित नेसरीच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असलेल्या प्रतापरावांची या वेळी काही तरी वेगळी अशी रणनीती असावी, जी बहुधा साध्य झाली नसावी, नाहीतर इतिहास काही वेगळाच लिहिला गेला असता. वर दिलेल्या English Records On Shivaji मधला सहा सरदारांबद्दलचा एकमेव उल्लेख सोडला तर एकाही समकालीन कागदपत्रात त्या सहा सरदारांबद्दल उल्लेख आलेला नाही. एवढंच नाही तर कोणत्याही कागदपत्रात त्यांची साधी नावेही दिलेली नाहीत. जेधे शकावलीत वर दिलेल्या विठोजी शिंदे या नावाचा नेसरीच्या लढाईच्या जवळजवळ तीन महिने आधी म्हणजे कार्तिक महिन्यात 'सातारा घेतला. कार्तिक मासी सर्जाखानासी व विठोजी सीदे यांसी झगडा झाला. विठोजी पडिला.' असा उल्लेख आला आहे. त्यानंतर माघ महिन्याच्या वद्य १४ ला 'सिवरात्रीस बहलोलखानात व प्रतापराव सरनोबत याचा झगडा निवटीयास जाला. प्रतापराव पडिले.' असा उल्लेख आहे. म्हणजे विठोजी शिंदे नेसरीच्या लढाईत नसावेत आणि लढाई पूर्वीच मारले तरी गेले असावेत. असं असेल तर मग त्यांचं नाव सातांत येणं कसं शक्य आहे?

       प्रतापरावांनी दाखवलेलं शौर्य आणि बलिदान साधारण नव्हतं हे नक्कीच पण लढाईचं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करताना कवि त्यांच्या ठाई असलेलं मूळचं 'कर्तुत्व' तर झाकून ठेवत नाहीये ना? अशी शंका मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही. शेवटी बहुत काय लिहिणें, आपण सुज्ञ असा.

लेखनसीमा.


🚩 संदर्भ - 

१) सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद लिखित.

२) मराठ्यांची बखर - मुळ ग्रंथ 'History Of The Marathas' - अनुवाद कॅप्टन डेव्हीड केपन.

३) English Records On Shivaji (1659 - 1682) - Robert Orme.

४) मराठी दफ्तर - रूमाल पहिला (श्रीमंत शेडगावकर भोसले बखर, मुळ प्रती बरहुकुम, शके १८३९) - विनायक लक्ष्मण भावे.

५) शि.प.सा.सं. पत्र क्र. १६२५

६) ९१ कलमी बखर - मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिविस

७) जेधे शकावली

८) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे

 

🚩🚩🚩

 






 

🚩 समाप्त.

६ टिप्पण्या:

  1. सायबा अतिसुंदर... फक्त पुरंदरचा तह १६६५ साली झाला असं वाटतंय मला. बाकी लिखाण आणि दिलेले संदर्भ फारच छान..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद शिवा. ते १६६५ च आहे. चुकून लिहिलं गेलं. केली दुरूस्ती.

      हटवा
  2. एक नंबर... केवढा अभ्यास करून डिटेल मध्ये लिहिलं आहे... हॅट्स ऑफ... __/\__

    उत्तर द्याहटवा