"भूगोल पदरगडापासून कोथळीगडापर्यंतच्या घाटवाटांचा"
पदरगड आणि कोथळीगड हे दोन्ही किल्ले मुख्य रांगेच्या थोडे खाली एकसंध जोडलेल्या पदरात वसलेले आहेत. हा जो एकसंध पदर आहे तो दोन सरळसोट नाळा घाटमाथ्यापासून थेट कोकणात उतरल्यामुळं फक्त दोन ठिकाणी तुटला आहे. या नाळा म्हणजे उत्तरेकडील आंबेनळी तर दक्षिणेकडे असलेली वाजंत्री. यापैकी आंबेनळी नाळेतून घाटमाथ्यावरून थेट कोकणात उतरता येतं तर वाजंत्री नाळेला पदरापासून वरच्या भागात सरळसोट कडे असल्यामुळं फक्त पदरापासून खाली कोकणातल्या सरईवाडीत उतरता येतं. वाजंत्री नाळेपासून आंबेनळीपर्यंतच्या पदराला रानमळा म्हणतात तर दक्षिणेकडे नाखिंदा घाटवाटेपर्यंतच्या पदराला रामखंड. या रामखंडाचेही रामखंड एक आणि रामखंड दोन असे दोन भाग आहेत.
या भागात घाटमाथ्यावरून रामखंडात पडणारा 'रडतोंडी' आणि पुढे रामखंडातून कोकणात पडणारा 'दैत्यासूर' असे दोन मोठे आणि सुंदर धबधबे आहेत.
पदरगड आणि कोथळीगड या दोन किल्ल्यादरम्यान खालच्या, वरच्या अशा सगळ्या मिळून तब्बल पंधरा वाटा आहेत. कोकणातल्या रहाळातलं मुख्य गाव आहे जाम्रूग. या जाम्रूगला ठोंबरवाडी, डुक्करपाडा, सोलनपाडा, सरईवाडी, कामतपाडा, हिरेवाडी अशा सहा वाड्या आहेत. या वाड्यांमधली मंडळी त्यांच्या सोयीच्या वाटांनी प्रथम रानमळा किंवा रामखंडात येऊन मग घाटमाथ्यावर त्यांना भीमाशंकर, कमळजाई, खेतोबा, भोरगिरी, येळवली, वांद्रे वगैरे ज्या भागात जायचं आहे त्यानुसार त्यांना सोईस्कर अशा एक किंवा दोन वाटा निवडतात. त्यामुळं या भागातल्या बहुतेक घाटवाटा दोन टप्प्यात आहेत असंच म्हणावं लागेल. याशिवाय घाटमाथ्यावरची मंडळी शिकारीसाठी पदरापर्यंत उतरत असल्यामुळं पदरापर्यंतच्या आणि पदरावरच्या वाटाही बऱ्यापैकी मळलेल्या आहेत. हा संपूर्ण पदर दाट झाडीने व्यापलेला असल्यामुळं ऐन उन्हाळ्यातही या पदरातली भटकंती सुखावह ठरते.
खाली दिलेल्या या त्या वाटा आहेत ज्यावरून तिथल्या मंडळींची कामानिमित्त बऱ्यापैकी वाहतूक चालते. यातील काही वाटा जनावरे जाऊ शकतील एवढया सोप्या आहेत तर काही फक्त माणसांनी वापरायच्या आहेत. या वाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे असा दिलेला आहे.
१) पेढा (वरची)
२) पावल्या (खालची)
३) आंबेनळी (पूर्ण)
४) पायदरा (खालची फक्त उन्हाळी वाट)
५) तांबडीची वाट (खालची)
६) निसणी (खालची)
७) खेतोबा (वरची)
८) वाजंत्री (खालची)
९) अंधारी (वरची)
१०) घोघोळ (खालची)
११) नाखिंदा (वरची)
१२) कौल्याची धार (वरची)
१३) पाऊलखा (खालची)
१४) किल्ल्याची वाट (खालची)
१५) आंबिवलीची वाट (खालची)
या फोटोत पदरगडाच्या मागे पुसटसा सिद्धगडही दिसतोय मात्र हाडाच्या ट्रेकरलाच तो ओळखू येईल.
पदरगडाच्या पदराची सोंड तुंगी करत कोकणातल्या पाथरजच्या डोंगरपाड्यापर्यंत गेलेली आहे. या टोकावरच्या डोंगरपाड्यातून निसणीची वाट जशी पदरावरच्या तुंगीत चढून येते तशाच सोंडेच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडूनही काही वाटा पदरावर चढून येतात. लेखाचा विषय पदरगड ते कोथळीगडादरम्यानच्या वाटा असल्यामुळं या वाटांचा उल्लेख मुद्दामच इथे केलेला नाही.
मी स्वतः ज्या वाटांचे ट्रेक केले आहेत तेवढयाच वाटा या लेखात दिलेल्या आहेत. या वाटांव्यतिरिक्त अजूनही काही वाटा या परिसरात नक्कीच असू शकतात. त्यामुळं अस्सल भटकी मंडळी वर दिलेल्या माहितीत आणखी भर नक्कीच घालू शकतील. या लेखात जसं पदरगड ते कोथळीगडादरम्याच्या वाटा दिल्यात तशाच उत्तरेच्या पदरगड ते सिध्दगड किंवा तुंगी ते सिध्दगड आणि दक्षिणेच्या कोथळीगड ते ढाक किल्ल्यापर्यंतच्या वाटाही देता येतील. बहुत काय लिहीणें. अगत्य असू द्यावे.
'मर्यादेयं विराजते.'
🚩 फोटो सौजन्य - डॉ. मनीष माळी
🚩 लेखात उल्लेखलेल्या धबधब्यांच्या नावाची माहिती योगेश अहिरे यांच्याकडून साभार.
🚩 नकाशात दाखवलेल्या पायरी आणि अंधारीच्या वाटेच्या मार्कींगची माहिती निनाद बारटक्के यांच्याकडून साभार.
छान माहिती मिळाली. या भागातील भुगोल वैशिष्ट्य पुर्ण आहे हे खरेच. सोबत नकाशा जोडला तर बरे होईल.
उत्तर द्याहटवाब्लॉगमधे दोन नवीन नकाशे टाकलेत ज्यामुळे घाटवाटा नेमक्या कुठे आहेत त्याचा अंदाज येईल.
हटवाछान माहिती दिलीत, धन्यवाद
उत्तर द्याहटवासर खूपच महत्वपूर्ण अशी माहिती ती ही नकाश्या सहित. 🙏
उत्तर द्याहटवासर कोथळी ते धाक ट्रेक ची माहिती मिळेल का?
उत्तर द्याहटवाकोथळीगड ते ढाक किल्ल्या
हटवाघाटवाटांची सविस्तर माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाखूप छान घाट वाटाची माहिती मिळाली
उत्तर द्याहटवा