शनिवार, १७ जुलै, २०२१

"भुलेश्वर रांग"

 "भुलेश्वर रांग"

       आपण प्रत्येकजण एका पत्त्यावर रहात असतो, जो आपण बऱ्याच जणांना आणि बरेचदा सांगतही असतो. बरोबर ना? मग जर आपल्यासारखाच आपल्या सिंहगडाला पण त्याचा 'भौगोलिक' पत्ता सांगायचा असेल तर तो कसा सांगेल बरं?

तर तो बहुधा असा सांगेल...

       'महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाच्या म्हणजेच सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे फुटलेल्या भुलेश्वर रांगेवर विंझरजवळ अजून एक फाटा फुटला आहे. या फुटलेल्या आणखी एका उपफाट्यावर मी 'सिंहगड' मुक्कामाला असतो.'

       आम्ही पुणे व्हेंचरर्सच्या बेसिक अॕडव्हेंचर कोर्सला डोंगररांगा, नद्यांची खोरी यांची माहिती मुलांना आवर्जून सांगतो. कारण एकच ते म्हणजे मुलांच्या भटकंतीची सुरूवातच 'डोळस भटकंती'तून व्हावी. प्रत्यक्षात मुलांना सांगताना वेळेअभावी ते थोडक्यात सांगितलं जातं पण ज्यांना सखोल माहिती हवी आहे त्यांच्यासाठी हे मुद्दाम लिहिलंय. बघा आवडतंय का? तर मग आपला मूळ मुद्दा...

'भुलेश्वर रांग नक्की कशी आहे?'

       तर ही भुलेश्वर रांग सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेल्या खानुच्या डिग्यापासून सुरू होते आणि कादवेखिंड, पाबेखिंड करत शेवटी नसरापुरला संपते. आपण सिंहगड-राजगड ट्रेक करताना कल्याण दरवाज्याच्या समोरच्या टोकावरून विंझरला उतरतो. त्या टोकापासून भुलेश्वर रांगेला आणखीन एक फाटा फुटलाय जो सिंहगड, कात्रज, बोपदेव घाट, कानिफनाथ, दिवेघाट, मल्हारगड, ढवळेश्वर करत शेवटी भुलेश्वरला संपतो. पण या फाट्यालाही कात्रज घाटापुढच्या लक्ष्मी शिखराजवळून आणखीन एक उपफाटा फुटलाय जो चंद्र-सुर्यप्रभात डोंगर, पुरंदर, वज्रगड, हरेश्वर, कडेपठार करत शेवटी जेजुरीला संपतो.


       भुलेश्वर रांग जिथून सुरू होते तिथे सुरवातीला ती कानंदी आणि आंबी नद्यांची खोरी विभागते. कानंदी खोऱ्यात घिसर, वेल्हा वगैरे गावं आहेत तर आंबीच्या खोऱ्यात कशेडी, माणगाव, टेकपवळे, घोळ वगैरे गावं आहेत. कानंदीवर चापेट धरण आहे तर आंबीवर पानशेत. पुढे कानंदीला गुंजवणी मिळते आणि पुढे कानंदी कासुर्डीजवळ नीरेला. पानशेतची आंबी पुढे वरसगाव धरणाच्या मोसीला मिळते आणि या दोघींचं पुढे टेमघरमधून आलेल्या मुठेबरोबर सूत जुळल्यावर तिघी गुण्यागोविंदाने खडकवासल्यात येतात आणि पुणेकरांची तहान भागवतात.

       सिंहगड-राजगड ट्रेक करताना सिंहगडाच्या कल्याण दरवाज्यातून बाहेर पडल्यावर आपण एका धारेनेच विंझरच्या उंच डोंगरापाशी जातो आणि खाली धारेवरून उतरून धनगरवाड्यात पोहोचतो. ही जी विंझर टोकापर्यंतची धार आहे तिच्या दोन्ही बाजूलाही दोन नद्यांची खोरी आहेत. उजवीकडे मुठा तर डावीकडे शिवगंगा. सिंहगडाच्या कल्याण दरवाज्याच्या पायथ्याशी असलेली कल्याण, कोंढणपुर, रांझे, खेडशिवापुर ही सगळी गावं शिवगंगेच्या खेडेबारे खोऱ्यात आहेत. एवढंच नाही तर 'खेडेबारे' नावाचं गावही या खोऱ्यात आहे. खरंतर इथं मावळातल्या खोऱ्यांची, मावळांची बरीच नावं आली आहेत त्यामुळं लेखाच्या शेवटी दिलेल्या धाग्यावरून 'मावळ म्हणजे काय?' हे वाचणंही भूगोल समजण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

       एकूण भुलेश्वर रांगेपैकी खानुच्या डिग्यापासून ते नसरापूर आणि इकडे लक्ष्मी शिखरापर्यंतची भुलेश्वर डोंगररांग धारेच्या स्वरूपाची आहे पण नंतर मात्र ती पठारी स्वरूपाची होते त्यामुळे लक्ष्मी शिखरापर्यंत या रांगेला ओलांडणारे रस्ते/वाटा खिंड प्रकारच्या आहेत. थोडक्यात घाटवाट चढून दुसऱ्या बाजूला लगेचच उतरते पण लक्ष्मी शिखरानंतरच्या रांगेवर मात्र घाटवाटा फक्त चढून येतात. एकूण सांप्रत घाटवाटांपैकी काही घाटवाटा अर्वाचीन आहेत तर काही प्राचीन आहेत. काही घाटवाटांवर डांबरी रस्ते आहेत तर काही ठिकाणी अजूनही कच्चे रस्ते आहेत तर काही वाटा अजूनही फक्त पाऊलवाटाच आहेत.

       पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या या रांगेवर पहिला रस्ता आहे तो म्हणजे माणगावपासून डिगेवस्ती/चांदर. नंतरच्या कादवेखिंड आणि पाबेखिंड या घाटवाटा तर पुणेकरांमधे प्रसिध्दच आहेत. नसरापूरकडे उतरणाऱ्या फाट्यावर निगडे घाट आणि कुसगावखिंड हे दोन अतिशय छोटे घाट आहेत, जे खेडेबारे खोऱ्यातून गुंजन मावळात उतरतात. इकडच्या कात्रज घाटाचा शिंदेवाडी बोगदा अगदी नवीन तर जुना रस्ता प्राचीन. या प्राचीन कात्रज घाटानंतरच्या घाटवाटा फक्त चढून येणाऱ्या आहेत. यात नारायणपूर घाट, दुरकरवाडी घाट ऊर्फ गराडखिंड, मरिआई घाट, बोपदेव घाट, होळकरवाडी घाट, दिवेघाट (जुना), दिवेघाट (नवा), शिंदवणे घाट, ताम्हणवाडी घाट आणि शेवटचा भुलेश्वर घाट सांगता येईल. या सर्व घाटांपैकी दुरकरवाडी घाट, जुना दिवेघाट आणि ताम्हणवाडी या घाटवाटा शिवपूर्व काळापासून अस्तित्वात असाव्यात. यातल्या दिवेघाटात आजही कात्रज घाटासारख्या पाण्याच्या खोदीव टाक्या पहायला मिळतात.


       वर उल्लेखलेला दुरकरवाडी घाट ऊर्फ गराडखिंड तर ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक पण कशी? तर अशी...

       "शाहिस्तेखानाला पुण्याला आला त्यावेळी त्याला मराठ्यांची काळजी करायची गरज नव्हती कारण खुद्द महाराज याच काळात सिद्दी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. पण त्याला मराठ्यांच्या गनिमीकाव्याची चुणूक समजलीच. तो शिरवळहून गराडखिंडीने सासवडकडे येत असताना मराठ्यांच्या म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या तुकडीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की आघाडीवर चाललेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला. गराडे ते सासवड हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. मराठ्यांनी या एवढ्या कमी अंतरामध्येही खानाला हैराण करून सोडले. ही घटना साधारण एप्रिल १६६० च्या शेवटचा आठवड्यात घडली."

       या गराडखिंडीतून थोडं पुढं आल्यावर 'कोडीत' नावाचं गाव लागतं. 'मराठी सैन्यानं मोघलांचं सैन्य या ठिकाणी कोंडीत पकडून त्यांची दाणादाण उडवली होती म्हणून त्या गावाचं नंतर कोडीत असं नामकरण झालं' अशी या गावाबद्दल त्या भागात आख्यायिका ऐकायला मिळते. मुळातच ही गराडखिंडीची घाटवाट खुपच सुंदर आहे आणि पावसाळ्यानंतर तर या परिसराचं सौंदर्य अजूनच खुलतं. या वाटेने मोटारसायकल वरून आजही सहज जाता येतं. चेलाडीपासून तर अगदी हाकेच्या अंतरावर ही घाटवाट आहे. घाट चढून गेल्यावर वरच्या बाजूला दुरकरवाडी हे छोटंसं खेडेगाव आहे. घाटमाथ्यावर एक छोटीशी खिंड आहे. स्थानिक लोक तिला दुरकरवाडीची किंवा सप्रेवाडीची खिंड म्हणतात. हा शिवकाळातला बहुधा पुरंदर ते राजगड असा मार्ग असावा. खरं काय ते जाणून घेण्यासाठी या वाटेचा मुद्दाम एकदा अभ्यास दौरा करायला हवा.

       खानुचा डिग्याचा भाग हा मुख्य रांगेवर असल्यामुळं प्रचंड पाऊस पडणारा तर जेजुरी किंवा भुलेश्वर भाग पर्जन्य छायेचा प्रदेशात मोडतो. साहजिकच या एकाच रांगेवर पश्चिमेकडून पूर्वेकडे जैवविविधतेत प्रचंड बदल होत गेलेला जाणवतो.

       या रांगेवर असलेली कात्रज ते सिंहगड म्हणजे K2S डोंगरयात्रेची पुणेकर मंडळी चक्क पारायणं करतात पण 'खानुचा डिगा ते पाबेखिंड, पाबेखिंड ते नसरापुर', 'विंझर धनगरवाडा/सिंहगड ते कात्रज', 'कात्रज ते दिवेघाट', 'दिवेघाट ते शिंदवणे घाट', 'शिंदवणे घाट ते भुलेश्वर', 'कात्रज ते पुरंदर' आणि 'पुरंदर ते जेजुरी' अशी वेगवेगळ्या एकदिवशीय डोंगरयात्रा असलेली भुलेश्वर रांग टप्प्याटप्प्याने का होईना पण भटकायला हवी.

       भुलेश्वर रांगेवरचा 'सिंहगड' हा एक अतिशय महत्त्वाचा किल्ला. जो किल्ला स्वतःच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना आदिलशाही कैदेतून सोडविण्यासाठी सुद्धा महाराज द्यायला तयार नव्हते. मोगलांबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात महाराजांनी सिंहगडाच्या दरवाज्याची किल्ली स्वतः दिली आणि दस्तुरखुद्द औरंगजेबाने याचं नाव 'बक्षींदाबक्ष' म्हणजे 'देवाची देणगी' असं ठेवलं यावरूनच त्याचं सामरिक महत्त्व लक्षात येईल. सिंहगडाचं सामरिक महत्त्व कळण्यासाठी सिंहगड ज्या भुलेश्वर रांगेवर आहे ती भुलेश्वर रांग भौगोलिकदृष्ट्या समजायलाच हवी आणि नुसती समजायला हवी एवढंच नाही तर जैवविविधता, घाटवाटा, खिंडी, देवस्थाने, किल्ले, पाण्याच्या टाक्या, नद्यांची उगमस्थाने आणि ऐतिहासिक ठिकाणं यांची रेलचेल असलेली आपली भुलेश्वर रांग एक पुणेकर म्हणून तरी एकदा जोखायलाच हवी. बरोबर ना? तर मग मंडळी भुलेश्वर रांग जोखायला कधी करताय सुरूवात? 

🚩🚩

        माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही 

॥ मर्यादेयं विराजते ॥

🚩 'मावळ म्हणजे काय?' हे या दुव्यावर टिचकी मारून वाचता येईल.

🚩 फोटो - 

१) गुगल

२) महादेव पाटील

समाप्त.

२१ टिप्पण्या:

  1. दिलीप, अतिशय उत्तम व माहिती समृद्ध लेख. अनेक धन्यवाद हि माहिती संकलित केल्या बद्दल...👍👌

    उत्तर द्याहटवा
  2. दिलीप,
    अतिशय उत्तम लेख. यातील सिंहगड-कात्रज-कानिफनाथ-वडकी ही भ्रमंती केली आहे हिमालयीन मोहिमेच्या तयारी निमित्ताने.

    उत्तर द्याहटवा
  3. व्वा, निश्चितच अभ्यासपूर्ण लिखाण. एकच रांग, किती विविध अंगाने पहाता येईल हे खूप छान शब्दबद्ध केले आहेस. अशाच अभ्यासपूर्ण पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद काका. पुढचा असाच एक वेगळा विषय मनात घोळतोय. लेख येईल लवकरच.

      हटवा
  4. जबरदस्त माहिती आणि एक वेगळा ऐतिहासिक मार्ग जो तुम्ही आम्हाला
    उपलब्ध करून दिलात...
    त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।
      (फक्त बाजार होणार नाही याची काळजी घेऊन )

      हटवा
  5. वाह, फारच सुंदर माहिती आणि संकलन. अनेक धन्यवाद!🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान माहिती नेहमीप्रमाणे

    उत्तर द्याहटवा
  7. या सगळ्या रांगा, उपरांगा एकेक करुन तुकड्या तुकड्यात करता येतील.

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती! सर्व इतक्या बारकाईनं मांडल्या बद्दल धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा
  10. छान बारीक-सारीक तपशिलासह सर्व माहिती वाचायला मिळते आणि आडवळणाच्या भटकंतीचे असंख्य पर्यायही समोर येतात.दिलीप वाटवे आणि भूगोल दिलीप वाटवे आणि घाटवाटा ते समीकरण दमदार आहे.
    ||जय हो|| अनेक शुभेच्छा 👍

    उत्तर द्याहटवा
  11. उत्तम माहिती व साथीला इतिहासाची जोड!
    माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल खुप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा