“एक गड घेतला, परंतु एक गड गेला!”
तर ती गोष्ट ही होती की 'ज्या दिवशी तानाजी मालुसरेंनी अंधाऱ्या रात्री सिंहगड चढून काबीज केला त्याच दिवशी, त्याच वेळी आणि त्याच ठिकाणावरून अंधार्या रात्री अगदी तसंच म्हणजे तानाजीरावांसारखंच पुन्हा चढून जायचं.' ठरलं तर मग...
सोबतची सगळी मंडळी शेवटच्या टप्प्यातल्या अवघड अशा वाटेवरून चढून येईपर्यंत थांबणं गरजेचंच होतं. सगळी मंडळी आल्यावर इथेही 'लेमन टी' चा एक छोटासा ब्रेक झालाच.
ब्रेक होईपर्यंत घामेजलेलं अंग थंड झालं आणि गडावरचा थंडगार बोचरा वारा चांगलाच जाणवू लागला. 'खूप टाईमपास केलात आता उठा आणि चालू पडा' असंच जणू काही तो सुचवत होता. आम्हीही त्याच्या विनंतीला मान देऊन फारसा वेळ न दवडता थेट तानाजी स्मारक गाठलं आणि सुभेदारांना श्रद्धांजली वाहिली. देव, देश आणि धर्मासाठी केलेल्या अशा वेड्या साहसाच्या ऐतिहासिक घटना तुम्हाला कायमच प्रेरणा देत असतात त्यामुळं मग तिथं प्रेरणा मंत्र म्हटला...
॥ प्रेरणा मंत्र ॥
धर्मासाठी झुंझावें। झुंझोनीं अवघ्यासी मारावें।
मारितां मारितां घ्यावें। राज्य आपुलें ॥१॥
देशद्रोही तितुके कुत्ते। मारोनि घालावें परते।
देवदास पावती फत्ते। यदर्थों संशोयो नाही ॥२॥
देव मस्तकीं धरावा। अवघा हलकल्लोळ करावां।
मुलुख बडवावा कीं बुडवावा। धर्म संस्थापने साठीं ॥३॥
श्रद्धांजली वाहून कर्तव्य तर पार पाडलं होतं पण आता वेळ मात्र स्वहिताची होती. मी जेव्हाजेव्हा सिंहगडावर जातो तेव्हा देवटाक्याचं पाणी घरी झुणका करण्यासाठी न विसरता घेऊन येतो मग यावेळी तरी ती गोष्ट कशी अपवाद असेल? चांगलाच उशीर झाला होता तरीसुद्धा स्मारकाहून थेट देवटाकं गाठलं, पाणी भरून घेऊन आल्या पावली तडक पुन्हा कलावंतीणीच्या बुरूज गाठला. सुरवातीच्या अवघड टप्प्यावरून काळजीपुर्वक उतरून तासाभरात पुन्हा कोळ्याच्या मेटावर दाखल झालो.
तानाजीरावांना ज्या 'खंडोजी नाईक' या कोळ्याच्या मेटाच्या मेटकर्याने सिंहगडाच्या लढाईत मदत केली त्यांचा वाडा पहायचा राहिला होता. परतीच्या वाटेवर असताना तो आवर्जून पाहिला. सध्या खंडोजी नाईकांच्या पुढच्या पिढीतले मेटाचे मेटकरी म्हणुन सुरेश जोरकर तिथे मुक्कामाला असतात. तानाजीरावांनी जसा जागरण-गोंधळ घालून खंडोजी नाईकांना बेलभंडारा देऊन त्यांची आण घेतली होती तशीच दर तीन वर्षांनी जागरण-गोंधळाची प्रथा तेव्हापासून आजतागायत सुरू असल्याचं ते सांगतात.
कोळ्याच्या मेटावरून तासाभरात पुन्हा गाडी पार्क केलेली खालची वाडी गाठली. कडाडून भुक लागली होती त्यामुळं वाडीतल्या विठ्ठ्ल-रूख्मिणी मंदिरात बसून मित्राच्या हॉटेलातून नेलेल्या जेवणावर गरम करून यथेच्च ताव मारला.
माघ महिनाच्या गोठवणाऱ्या थंडीत, नवमीच्या अंधार्या रात्री कुठलाही उजेड आणि आवाज न करता रॉक क्लायंबिंग करून त्यातही गडावरच्या सैनिकांचा कडक पहारा चुकवून आपल्या सोबत्यांसह गडावर दाखल होणं आणि गड जिंकून घेणं काही खायचं काम नाही. आम्ही सगळ्या साधनांसह, कुठलीही धोकादायक परिस्थिती नसताना चढून गेलो तरी आम्हाला नाकीनऊ आले. हा ट्रेक केल्यानंतर तानाजी वगैरे मंडळी नक्की माणसंच होती ना? असं आता वाटू लागलंय. त्यामुळं तानाजीरावांनी काय भीमपराक्रम केलाय ते जर का समजून घ्यायचं असेल तर अशी डोंगरयात्रा करायलाच हवी आणि तीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
खरंतर या ट्रेकला आमच्या 'सिंहगड ते उमरठ' ट्रेकच्या मुख्य भागाचा पुरवणी ट्रेक म्हणता येईल. हा ट्रेक करून आम्ही अर्धवट राहिलेलं एक वर्तुळ पूर्ण केलंय. हा ट्रेक केल्यानंतरच खरंतर तानाजी मालुसरेंना आम्ही खरी श्रद्धांजली वाहली असं म्हणता येईल. अशा या अविस्मरणीय आणि वेगळ्या 'short but sweet' ट्रेकच्या सुंदर आठवणींसह घरी परतलो तेच मुळी मेटकरी सुरेश जोरकरांनी दिलेल्या यंदाच्या तिथीने होणार्या जागरण-गोंधळाचं आवताण घेऊन...
॥ लेखनसीमा ॥
🚩 'सिंहगड ते उमरठ' अर्थात 'कर्मभूमीपासून दहनभूमीपर्यंत' या संकल्पनेवर आधारलेल्या डोंगरयात्रेचा वृत्तांत इथे टिचकी मारून वाचता येईल.
🚩 संदर्भ -
१) तानाजीचा पोवाडा - तुळशीदास शाहिर.
२) मराठी दफ्तर - रुमाल पहिला, पान क्र. ५७/५८.
३) जेधे शकावली.
४) शिवापुरकर शकावली, शिवचरित्र प्रदिप, पान क्र. ६१/६२.
५) सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद लिखित.
🚩 फोटो सौजन्य - फाल्कन्स
🚩 ट्रेकभीडू -
१) साहेबराव पुजारी
२) विनायक गाताडे
३) मंगेश आठल्ये
४) संजय मालुसरे
५) मनीष क्षीरसागर
६) नाना नलावडे
७) जितेंद्र भोसले
८) संदीप बेडकुते
९) अथर्व शिंदे
१०) दिलीप वाटवे
११) अमोल पाटील
१२) अतुल अर्जुनवाडकर
१३) धनंजय शेडबाळे
१४) अनिल सवाने
१५) महादेव पाटील
१६) मिलिंद गडदे
१७) शिवाजी शिंदे
१८) अविनाश पिंगळे
१९) राजेंद्र क्षीरसागर
नेहमी प्रमाणेच वेगळा ट्रेक आणि अप्रतिम वर्णन🙏
उत्तर द्याहटवाखूप छान दादा
उत्तर द्याहटवाजबरदस्त कामगिरी...👍👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिखाण आहे.... कौतुकास्पद... खुपच छान कल्पना...
उत्तर द्याहटवाSimply great 👍
उत्तर द्याहटवामस्तच
उत्तर द्याहटवामलाही तुमच्या बरोबर यायची इच्छा आहे
खूप छान अनुभव आणि लिखाण
उत्तर द्याहटवाSundar varnan...jabardast anubhav
उत्तर द्याहटवाजय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!बंधू .आपण खर्या अर्थाने भीमपराक्रम केला आणि सुभेदार तानाजी मालूसरेंना श्रध्दांजली वाहीली .
उत्तर द्याहटवा