बुधवार, ५ जानेवारी, २०२२

डोंगरयात्रा "एका अखेरच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीची..."

 डोंगरयात्रा "एका अखेरच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीची..."


सरत्या वर्षाच्या अखेरीस फाल्कन ट्रेकर्सची सुभेदार तानाजी मालुसरेंना एक अनोखी श्रद्धांजली...


'कर्मभूमीपासून दहनभूमीपर्यंत' अर्थात 'सिंहगडापासून उमरठपर्यंत'

 

       इ.स. १६६६ मध्ये शिवाजी महाराजांना नाईलाजानंच मोगलांबरोबर पुरंदराचा तह करावा लागला. या तहात त्यांना तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा प्रदेश मोगलांना द्यावा लागला. या तेवीस किल्ल्यात मराठ्यांच्या राज्यातला सामरिकदृष्टीने महत्वाचा असलेला सिंहगडदेखील होता.
       सिंहगड हा मूळचा आदिलशाही किल्ला. दादाजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सिंहगडाचे नामजाद सुभेदार म्हणून नियुक्त होते. त्यांच्या मृत्युनंतर म्हणजे इ. स. १६४७ मध्ये सिंहगड महाराजांकडं आला आणि त्यांनी त्याला आपलं लष्करी केंद्र बनवलं. सिंहगड हा मराठी राज्याच्या आणि सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा किल्ला असूनही इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांना हा किल्ला आदिलशहाला नाईलाजानंच द्यावा लागला होता. जो किल्ला महाराज स्वतःच्या वडिलांच्या सुटकेसाठीसुद्धा आदिलशाहीला देण्यासाठी तयार होत नव्हते यावरुनच तो किल्ला मराठ्यांसाठी किती महत्वाचा असेल हे समजून येईल. पुरंदराच्या तहानंतर स्वराज्याच्या गाभ्यात असलेला सिंहगड मोगलांच्या ताब्यात असणं म्हणजे एक भळभळणारी जखम होती. तिची योग्य ती मलमपट्टी केल्याशिवाय मराठ्यांना स्वराज्याचा विस्तार करणं शक्यच नव्हतं. त्यामुळं इ.स. १६६६ ला नाईलाजानंच करावा लागलेला पुरंदराचा तह ०४ फेब्रुवारी १६७० ला सिंहगड जिंकून मराठ्यांनी मोडीत काढला आणि लगोलग स्वराज्याची प्रादेशिक आणि आर्थिक तुट भरून काढण्यासाठी सुरू झाल्या त्या एकापाठोपाठ अशा मोहिमा.
       इ.स. १६६६ नंतरचा तीनचार वर्षांचा काळ मराठ्यांसाठी अतिशय धामधुमीचा होता पण सिंहगड घेतल्यानंतर म्हणजे इ.स. १६७० नंतरच्या काळात मराठ्यांनी पुरंदराच्या तहात गेलेला प्रदेश, किल्ले परत घ्यायचा जणू सपाटाच लावला. त्याचबरोबर आदिलशाही-मोगलाईतला प्रदेश, ब्रिटीश वखारी, सुरत लुटून आणि परदेशी मालावर जबर जकात बसवून आर्थिक तुटही भरून काढली जात होती. मराठ्यांच्या सुरू झालेल्या या सुवर्णकाळाची सुरुवात मात्र महत्वाच्या अशा सिंहगड घेतलेल्या तानाजीच्या बलिदानानं झाली होती आणि हीच मराठ्यांच्या दृष्टीने एक अतिशय दुर्दैवी बाब होती.


       इ.स. १६७० मध्ये सिंहगडावर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर त्यांचं पार्थिव राजगडावर जिजाऊसाहेबांकडे नेण्यात आलं आणि तिथून मढेघाटमार्गे त्यांना त्यांच्या गावी उमरठला नेलं गेलं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या गावी म्हणजे उमरठला करण्यात आले असा सर्वसाधारण समज आहे. अर्थात हे खरं की खोटं, याला अस्सल ऐतिहासिक संदर्भ आहेत काय? वगैरे वादाचे विषय थोडे बाजूला ठेवून जर सुभेदारांना खरंच उमरठला नेलं असेल तर ते कसं नेलं असेल? त्या काळात तो मार्ग कसा असेल? वगैरे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा मार्ग अभ्यासण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही फाल्कन्सनी नुकताच त्या मार्गानं जाऊन केला. थोडक्यात आमची ही डोंगरयात्रा 'एका अखेरच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीची' होती. आम्ही फाल्कन्सनी सरत्या वर्षाच्या अखेरीस सुभेदार तानाजी मालुसरेंना ही डोंगरयात्रा करुन एक अनोखी श्रद्धांजली वाहिली.

       खरंतर ही डोंगरयात्रा करायचं दोनतीन वर्षांपासूनच मनात घोळत होतं पण त्याला मुहूर्त काही केल्या लागत नव्हता. सुरवातीला काही वैयक्तिक अडचणींमुळं आणि नंतर कोविडच्या निर्बंधांमुळं ही डोंगरयात्रा काहीशी लांबणीवरच पडली होती. हे निर्बंध काहीसे शिथिल झाले आणि पुन्हा या डोंगरयात्रेच्या विचारांनी डोकं वर काढलं. वर्षाच्या अखेरीस आम्ही फाल्कन्स एक तरी जंबो ट्रेक करतोच करतो त्यामुळं यावर्षीच्या प्रलंबित दोनचार पर्यायांमधून या ऐतिहासिक मार्गाच्या डोंगरयात्रेच्या पर्यायाची वर्णी मात्र विनासायास लागून गेली. प्लॅनिंग तर केलेलंच होतं, फक्त शेवटच्या तयारीवर हात फिरवायचा बाकी होतं. सोबत्यांच्या मदतीनं तेही पार पडलं. या डोंगरयात्रेत एकूणच चालणं, वाटेची शोधाशोध आणि कामंही खूप असल्यामुळं सोबत्यांची निवडही अतिशय काळजीपूर्वक आणि विचार करून केली होती. डोंगरयात्रेची पूर्वतयारी तर जय्यत पार पडली होती त्यामुळं आता आम्ही सर्वजण ट्रेकला निघण्याच्या तारखेकडे म्हणजे ३० डिसेंबरकडे डोळे लावून बसलो होतो.


🚩 दिनांक - ३० डिसेंबर २०२१

वार - गुरूवार


       ...आणि तो दिवस उजाडला. ३० डिसेंबरला बरोबर संध्याकाळी सहा वाजता आम्ही सर्व जमलो आणि गाडीत बसून सिंहगड पायथ्याच्या 'आतकरवाडी'त पायउतार झालो. गाडीची पुजा करुन ट्रेकला सुरुवात केली.

       गाडी आता थेट गुंजवण्यात जाऊन थांबणार होती. सिंहगडाची वाट पायाखालची असल्यामुळं तासाभरात पुणे दरवाज्यात पोहोचलो. आमच्या सोबतचे शिवाजी शिंदे पुणे विद्यापीठाच्या डिप्लोमा कोर्सच्या outdoor सेशन्ससाठी सिंहगडीच मुक्कामाला होते. खरं म्हणजे त्यांना या ट्रेकला यायची फार इच्छा होती पण या सेशन्समुळं त्यांना येणं काही शक्य नव्हतं. आता आम्ही गडावर अनायसे येतोच आहे म्हटल्यावर वरिष्ठांची परवानगी काढून ते पुणे दरवाज्यात खास आमच्या स्वागतासाठी आले होते.


        आम्ही सोबतच तानाजी स्मरकापाशी पोहोचलो. तानाजीरावांपुढे नतमस्तक होऊन आमची श्रद्धांजली डोंगरयात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी डोळे मिटून कौल घेतला. क्षणार्धात कुणीतरी खांदा थोपटल्याचा भास झाला आणि झटक्यात शरीरात चैतन्याची एक लहर उमटून गेली.

       शिवाजी शिंदेंचा निरोप घेतला. निरोप देताना त्यांच्या चेहर्‍यावरून त्यांच्या ट्रेकला येण्याच्या प्रबळ इच्छेमागची असमर्थता स्पष्टपणे समजून येत होती. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं. तिथं फार वेळ न दवडता हाकेच्या अंतरावरचा कल्याण दरवाजा गाठला आणि विंझरकडे मार्गस्थ झालो. नुकतीच SRT Ultra Marathon म्हणजे सिंहगड-राजगड-तोरणा अशी डोंगरातून धावण्याची स्पर्धा झाली असल्यामुळं या वाटेचा अगदी हमरस्ता झाला होता. अर्थात या वाटेवरुन बर्‍याचवेळा जाणं झाल्यामुळं चुकण्याचा तसा काही प्रश्नच नव्हता. मजल-दरमजल करत 'विंझर'ला उतरून मार्गासनी मार्गाने मुक्कामाला 'गुंजवण्या'त पोहोचलो. आजच्या रात्रीच्या जेवणासाठी मित्राच्या हॉटेलातूनच नेलेली पार्सल शेवभाजी-पोळी आणि सोबत असलेल्या माधुरी भंडारेने घरून करून आणलेली मस्त सोलकढी होती.


🚩 दिनांक - ३१ डिसेंबर २०२१

वार - शुक्रवार


       ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसार आज वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवशी आम्हाला एकूण ट्रेकमधला सर्वात लांबचा पल्ला मारायचा होता. आज गुंजवण्यातून 'राजगड', 'भुतोंडे' करत मुक्कामाला शिवथरघळीत जायचं होतं. सकाळची आन्हीकं उरकून फक्कड चहा बनवला आणि चहा-बिस्कीटांचा सुपरफास्ट नाश्ता केला.


       गुंजवण्याच्या मारूती मंदिरात आरती केली. चिंचवडहून आणलेलं ताक सगळ्यांनी मोकळ्या बाटलीत भरून घेतलं आणि राजगड चढाईला सुरुवात केली. आमची गाडी शिवथरघळीकडे निघून गेल्यामुळं आता परतीचे दोरही कापले गेले होते.

       राजगड हा बहूतेक सर्व ट्रेकर्सचाच आवडता किल्ला. कितीही वेळा राजगडावर गेलं तरी कधीच कंटाळा येत नाही. चढाई करता करता मराठ्यांच्या मुलकी व्यवस्थेचा विषय निघाला आणि बोलताबोलता महाराजांनी सांप्रतच्या व्यवस्थेत केलेले आमुलाग्र बदल, त्याचा एकूणच समाज व्यवस्थेवर झालेला सकारात्मक परिणाम असं चर्चेनं नवं वळण घेतलं. मग प्रशासकीय व्यवस्था, जमिनीची प्रतवारी आणि त्याच्या अनुशंगाने शेतसारा पद्धती, महसूल विभाग, न्यायव्यवस्था वगैरेवर चांगल्याच गप्पा रंगल्या आणि चोर दरवाज्यात केव्हा पोहोचलो ते कळलंच नाही.




       पुढच्या पाचच मिनिटांत पद्मावती मंदिरात पोहोचलो आणि आरती केली. पुढे मोठाच पल्ला मारायचा असल्यामुळं या खेपेला राजगड काही पाहता येणार नव्हता आणि याचंच वाईट वाटत होतं.

       संजीवनी माचीच्या अळू दरवाज्यातून बाहेर पडलो आणि थेट झुंजार बुरूजाखाली नाश्त्यालाच थांबलो.



       आता आम्हाला 'भुतोंडे' गाठायचं होतं त्यामुळं SRT चा आणि आमचा मार्ग इथून वेगळा झाला. झुंजार बुरूजापासून एक सोंड सरळ 'खुळशी' गावात उतरली आहे त्या सोंडेवरुन मळलेल्या पायवाटेने खुळशी गाठलं. गावापासून हाकेच्या अंतरावर एक तिठा आहे. डावीकडला रस्ता भुतोंड्यात तर उजवीकडला 'गुहीणी'त जातो. आम्हाला सरनौबत येसाजी कंकांचा वाडा पहायचा असल्यामुळं आम्ही डावी मारून भुतोंड्याकडे वळलो. काही अंतरावर असलेल्या फाट्यावरुन डाव्या बाजूला वळलं तर 'भोर'ला जाता येतं. या फाट्यापासून सरळ हाकेच्या अंतरावर कंकांचा वाडा आहे. पुढच्या पाचच मिनिटांत कंकांचा वाडा गाठला. सध्या राजेंद्र कंक तिथे राहून वाड्याची व्यवस्था पाहतात.







       कंकांच्या वाड्यातच आम्हाला नावेतून भाटघर धरणाचा पाणीफुगवटा ओलांडून थेट 'कुंबळे' गाठता येतं अशी माहिती मिळाली म्हणून बोटीपाशी गेलो तर बोट कुणीतरी पलिकडच्या किनार्‍यावर घेऊन गेलं होतं. राजेंद्र कंक स्वतः महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची बोट चालवतात पण ती दुरूस्तीला काढली असल्यामुळं तिचा काही उपयोग होणार नव्हता. राजेंद्र कंकांनी दुसरी बोट पलिकडून अलिकडच्या किनार्‍यावर आणण्याचा तासभर प्रयत्न केला पण शेवटी ते जुगाड काही जमलं नाही. ट्रेक प्लॅनिंग करताना dependency कमीतकमी असायला हवी आणि ही शिस्त पाळली नाही तर काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण होतं. अर्थात मधल्या वेळात आम्ही घरून आणलेले डबे उघडून आमची जेवणे उरकून वाया जाणारा थोडाफार वेळ नक्कीच वाचवला होता. आता एकंदरीत आम्हाला उशीर होणार असंच चित्र दिसत होतं आणि कमीतकमी अंधार पडायच्या आत आम्हाला किमान 'मढेघाट' उतरून जाणं तरी भाग होतं म्हणून इथून पुढं खास फोटो काढायला फारसं कुणी थांबलं नाही.


       बोटीचं जुगाड जमलं नसल्यामुळं आता आम्हाला लांबचा पल्ला मारत मढेघाट गाठावा लागणार होता. तसंही भुतोंड्याहून गोप्या घाटाने शिवथरघळ गाठणं जवळचं आहेच पण आम्ही ठरवल्यानुसार आम्हाला मढेघाटातूनच उतरायचं होतं. राजेंद्र कंकांनी बोट मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना धन्यवाद देऊन रस्त्यानेच 'गुहीणी' गाठलं. अर्थात कंटाळवाण्या डांबरी रस्त्याने जाताजाता स्थानिकांच्या पायवाटेचे शॉर्टकट मारले हे काही वेगळं सांगायला नको. गुहीणीच्या पाणीफुगवट्याच्या पलिकडच्या किनार्‍यावरच्या चांदवण्याला जोडणारा एक छोटा पुल आहे. पुलावरून पाचच मिनिटांत 'चांदवणे' गाठलं. चांदवण्याच्या मागच्या डोंगरावर चढून गेलं की दोन वाटा फुटतात डावीकडची जाते कुंबळ्यात तर उजवीकडची जाते निगड्यात. आम्हाला निगडेपुढल्या केळदला जायचं असल्यामुळं आम्ही उजवी मारून मळलेल्या वाटेने 'निगड्या'त उतरलो. निगड्यातून रस्त्याने 'केळदवाडी' करत शेवटी 'केळद'ला पोहोचलो. तिथल्याच एका हॉटेलात फक्कड चहा मारला आणि मढेघाटाकडे निघालो. राजगड सोडल्यानंतर केळदला पोहोचेपर्यंत एक गोष्ट चटकन नजरेत भरणारी होती ती म्हणजे या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर झालेलं प्लॉटींग आणि त्यामुळं बंद पडू पाहणार्‍या स्थानिकांच्या पायवाटा. अर्थातच आणखी काही वर्षांनी आम्ही यावेळी गेलेल्या वाटांवरून जाता येणार नाही हे मात्र नक्की. मढेघाटाच्या माथ्यावर पोहोचलो तेव्हा सूर्यास्त होत होता म्हणून मग टॉर्च बाहेर काढल्या आणि मढेघाट उतरायला सुरुवात केली. 


       यावर्षी प्रचंड झालेल्या पावसामुळं वाट बर्‍याच ठिकाणी वाहून गेली होती. घसार्‍याच्या वाटेवरून काळजीपूर्वक उतरत पदरात पोहोचलो. आता इथून तीन पर्यायांनी आम्हाला शिवथरघळ गाठता येणार होती. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण मढेघाट उतरून पायथ्याच्या 'वाकी'त पोहोचायचं, दुसरा म्हणजे पदरातून आडवं जात 'कर्णवडी' गाठायची आणि खाली उतरून पायथ्याच्या 'रानवडी'तून बारसगाव-कुंभेशिवथर रस्त्यावरुन 'शिवथरघळ' गाठायची किंवा तिसरा पर्याय म्हणजे कर्णवडीतून तसंच पुढं जाऊन म्हणजे पदरातूनच 'आंबेनळी' ही छोटी वाडी गाठायची आणि खालच्या 'आंबेशिवथर' मार्गे कुंभेशिवथरवरून शिवथरघळ गाठायची. साहजिकच अंधार पडल्यामुळं आणि या तीनही पर्यायात दुसरा पर्याय धोपट आणि वाहती वाट असल्यामुळं आम्ही निवडला आणि शिवथरघळीत मुक्कामाला पोहोचलो. जवळच असलेल्या हॉटेलातून रात्रीच्या आणि दुसर्‍या दिवशीच्या दुपारच्या जेवणासाठी चपात्या बनवून घेतल्या. आजच्या रात्रीच्या जेवणाआधी स्टार्टर म्हणून व्हेज मंचाव सुप तर मुख्य जेवणात बटाटा, टॉमेटोची रस्साभाजी, चपाती, लोणचे, पापड आणि सॅलेड असा फक्कड मेन्यू होता.




🚩 दिनांक - ०१ जानेवारी २०२२

वार - शनिवार


       आजचं चालणं फक्त 'पिंपळवाडी'पर्यंतच असल्यामुळं सकाळी अंमळ उशीरा निघायचं ठरवलं होतं. नेहमीप्रमाणे सकाळची आन्हीकं उरकली. सुंदरमठात बाथरूम वगैरेच्या चांगल्या सोयी असल्यामुळं काहींनी आंघोळी पण केल्या. आज सकाळच्या नाश्त्याला स्पेशल मिसळ-ब्रेड आणि चहा होता. नाश्ता करून घळीत गेलो आणि मारूती स्तोत्र म्हटलं.



       नाश्ता करून दुपारच्या जेवणासाठी आलू-मटरची रस्साभाजी बनवून डब्यात भरून घेतली. त्याच्यासोबत रात्री बनवून घेतलेल्या चपात्या होत्याच. एनर्जी ड्रिंक म्हणून आज पन्हं होतं. ते बाटलीत भरून घेऊन कुंभेशिवथरवरून 'सुनेभाऊ'ला चढून गेलो.



       वाटेतून खुटा, गोप्या, आंबेनळी, उपांड्या आणि काल उतरून आलेला मढेघाट असा चौफेर घाटवाटांचा नजारा दिसत होता. सुपेनाळ, भोवर्‍या, मुसळ्याची नाळ, गरजाई, कोरनाळ किंवा कोळनाळ, पिठगुळीची नाळ आणि पाळदार या घाटवाटा मात्र लपल्यामुळं दिसून येत नव्हत्या पण त्या वाटांचे ट्रेक्स करतानाच्या आठवणी मात्र त्या दिशेकडे पाहताना चटकन नजरेसमोर उभ्या रहात होत्या. सुनेभाऊहून 'पारमाची'ला जाताना डावीकडे 'कावळ्या किल्ला' आणि त्याला चिकटलेला 'न्हाविण सुळका' लक्ष वेधून घेत होता.

       पारमाचीत पोहोचलो तर समोरच प्रचंड घसार्‍याची पारमाची नाळ आणि नाळेत असलेल्या कोरीव पायर्‍या डोळ्यापुढं आल्या. रस्त्यारस्त्यानेच चालत वरंध घाटाचा गाडीरस्ता गाठला आणि उजवीकडे वळून 'माझेरी'त दाखल झालो.

       इथून पुढची म्हणजे सुनेभाऊपासून ते उमरठपर्यंतची आमची चाल आता कोकणातून सह्याद्रीच्या मुख्यरांगेला समांतर अशी असणार होती त्यामुळं ओळीने एकएक घाटवाटा नजरेत येणार होत्या. महाड हायवेपासून आत वळून माझेरी गावात पोहोचलो आणि गाव ओलांडून 'तळीये'च्या वाटेला लागलो. वाटेतून वरंध आणि माझेरीच्या वाटांच्या खिंडी, चांगमोड डोंगर, तळीयेचा जननीचा डोंगर स्पष्ट दिसत होते. थोडं पुढं गेल्यावर समोरचा 'मोरझोत धबधबा' जसा जवळ आला तसा डाव्या बाजूला वरपेडा घाट दिसू लागला. हा वरपेडा घाट उंबर्डी फाट्यावरच्या पवारांच्या हॉटेलच्या मागच्या बाजूने तळीयेत उतरतो. मोरझोतच्या ओढ्यात असलेलं 'मावळाई'चं दर्शन घेऊन चांगमोड नाळेच्या टोकाशी पोहोचलो. ही चांगमोड नाळ तळीयेतून घाटमाथ्यावरच्या उंबर्डीच्या 'दांडवाडी'त चढून जाते. नाळेच्या बाजूलाच चांगमोड डोंगराला 'चांगमोड सुळका' चिकटलेला आहे.


       चांगमोड नाळ ओलांडून जसजसं तळीयेच्या जननीच्या डोंगराकडे जाऊ लागलो तसतशा नुकत्याच झालेल्या भूस्लखनाच्या खुणा दिसू लागल्या. इथून जननीच्या डोंगराच्या मागच्या खिंडीतून आम्हाला पलिकडं असलेल्या 'म्हेत्रेवाडी'त जाता आलं असतं पण आम्ही तळीयेतून जननीच्या डोंगराला वळसा मारून म्हेत्रेवाडीत जायचं ठरवलं होतं. खरं म्हणजे तळीयेतून माझेरी गावात जाणारी पाऊलवाट, वरपेडा घाट, चांगमोड नाळ वगैरे वाटा या तळीयेकरांच्या पण भूस्लखनामुळं पूर्ण गाव नामशेष झाल्यामुळं आता या वाटा वापरायलाच कुणी शिल्लक राहिलेलं नाही. साहजिकच राबता नसल्यामुळं वाटा मोडल्यातच जमा झाल्या आहेत. आमची दुपारच्या जेवणाची वेळ खरंतर झाली होती पण तळीये गावाची अवस्था पाहून तिथं जेवताना घशाखाली घास उतरलाच नसता. उरल्यासुरल्या पडक्या घरांकडं बघवत सुद्धा नव्हतं. काहीही म्हणा पण फारवेळ तिथं थांबवलंच नाही. जवळच्याच म्हेत्रेवाडीतल्या एका घरासमोरच्या आमराईत जाऊन मगच जेवायला थांबलो.

       म्हेत्रेवाडीतून किव्याला जाणारी वाट बर्‍यापैकी मळलेली होती. तसं तर कुंभेनळीवाडीत जाऊन मुख्यरांगेच्या पोटातून आडवं जात 'किवे' गाठता आलं असतं पण तो बराच लांबचा फेरा पडला असता. म्हणून मग म्हेत्रेवाडीतून खालच्या ओढ्यात उतरलो आणि पुन्हा चढाई करून किव्यात पोहोचलो. किव्यातून डाव्या बाजूला ओळीने वारदरा घाट ऊर्फ वाव्हळाची वाट, कुंभेनळी ऊर्फ वाघजाई घाट, खिरण, चिकणा घाट, चोरकणा घाट आणि सर्वात शेवटी देऊळदांड दिसत होता. अस्वलखिंड थोडी आतल्या बाजूला असल्यामुळं दिसत नव्हती. पण रायरेश्वराचा नाखिंदा, कोळेश्वर टोक, मीठखडा, मढीमहाल ऊर्फ ऑर्थरसीट पॉईंट आणि पुढचा पांगळा ऊर्फ एलफिस्टन पॉईंट मात्र उंचावर असल्यामुळे व्यवस्थित दिसत होते.




       किव्यातून 'पिंपळवाडी'ला जाणारी आमची पुढची वाट मात्र पार मोडलेली होती. शेतात कामाला आलेल्या मंडळींनी पुढची थोडी वाट समजावून दिली खरी पण प्रचंड गवत माजलेलं असल्यामुळं काही वेळानी वाट गंडली. खालच्या ओढ्यात आम्हाला उतरायचं होतं एवढं पक्कं माहिती असल्यामुळं वस्पटीतून इकडं घूस तिकडं घूस करत जात होतो. ओढा हाकेच्या अंतरावर राहिलेला असताना थोडं थांबलो. इतक्यात डाव्या बाजूला जोरदार खसखस होऊ लागली आणि ती आमच्याच दिशेने वेगात पुढे सरकत होती. काय होतंय ते समजायच्या आत चार फुटावरून एक पूर्ण वाढ झालेली रानडूकराची मादी आणि तिच्या मागून तिची चार पिल्ले डावीकडून उजवीकडं जोरात पळत गेली. जर मादीचा नेम चुकला असता आणि ती चार फुट अलिकडून आली असती तर?
       ... तर हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कधीच आला नसता एवढं मात्र खरं. खालच्या ओढ्यात उतरल्यावर समोरच्या बाजूला कुठेही पिंपळवाडीत चढून जाणारी वाट दिसत नव्हती.

       आता इथून पुढं आमची खरी परीक्षा होती. पण ओढ्यातच वरच्या बाजूला माणसांची हालचाल दिसली आणि तडक तिकडं निघालो. दोन कातकरी मासेमारी करायला आले होते.



       त्यांच्यापैकी एकाने त्यातल्या त्यात मळलेल्या वाटेला लाऊन दिलं आणि आम्ही पुढं कुठंही न चुकता 'पिंपळवाडी' आरामात गाठली.

       पिंपळवाडीत आमदार भरतशेठ गोगावलेंच्या घरासमोरच्या हॉलमधे मुक्कामाला पोहोचलो. घराच्या मागच्या बाजूला शाळेच्या प्रांगणात पाण्याचा हापसा आहे. हापश्यावर हातपाय धुऊन ताजेतवाने झालो आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरूवात केली. हापश्याबाजूच्याच घरात आजच्या रात्रीच्या आणि उद्या दुपारच्या जेवणाच्या भाकर्‍या करण्यासाठी ज्वारीचं पीठ दिलं. आजच्या रात्रीच्या जेवणाआधी स्टार्टर म्हणून व्हेज मंचाव सुप तर मुख्य जेवणात भरल्या वांग्याची रस्साभाजी, ज्वारीची भाकरी, लोणचे, पापड आणि कोशिंबिर असा पक्का गावरान बेत होता.


🚩 दिनांक - ०२ जानेवारी २०२२

वार - रविवार


       काल पिंपळवाडीला लवकर पोहोचलो होतो त्यामुळं आज लवकर उठून सकाळची आन्हीकं उरकली. आज ट्रेकचा शेवटचा दिवस होता त्यामुळं जेवढ्या लवकर आम्ही आवरून उमरठला पोहोचू तेवढ्या लवकर आम्हाला घरी पोहोचता येणार होतं. आज 'कांगोरी ऊर्फ मंगळगड' पाहून उमरठला पोहोचायचं होतं. खरंतर रात्री साधा भात करून त्याचाच आज सकाळच्या नाश्त्यासाठी फोडणीचा भात करायचा होता पण आदल्या दिवशीच्या मिसळसाठी आणलेले बरेच ब्रेड शिल्लक राहिल्यामुळं ब्रेडची भाजी/उपमा बनवला.

       आज दुपारच्या जेवणासाठी भाकरीसोबत झुणका बनवला आणि डब्यात भरून घेतला. आज एनर्जी ड्रिंक म्हणून लिंबूसरबत होतं. ते वाटेतच पाण्याचं ठिकाण बघून बनवायचं होतं त्यामुळं त्याला लागणारं साहित्य सोबत घेऊन मंगळगडाच्या चढाईला सुरूवात केली. पिंपळवाडीपासून गडाच्या निम्म्यापर्यंत आता चांगला मोठा रस्ता झाला आहे पण आपल्यासारख्या घुमक्कडांना त्या रस्त्यापेक्षा पाऊलवाटच चांगली. म्हणून मग रस्ता होण्यापूर्वी असलेल्या पिंपळवाडीच्या जून्या पायवाटेवरून गडमाथा गाठला.





       कांगोरी देवी मंदिरात जाऊन देवीची आरती केली. खरं म्हणजे ही बुरूड लोकांची देवी पण गडाच्या घेर्‍यातली बहूतेक सगळी मंडळी इथे मनोभावे दर्शनाला येतात. तासाभरात गडफेरी पूर्ण केली आणि उतरणीला लागलो.




       खरंतर गडावरून उतरून आम्ही 'वडघर' गाठणार होतो पण सडे गावाची वाट चांगली मळलेली असल्यामुळं तासाभरात 'सडे' गावात उतरलो. तसं आम्हाला शेवटी पोहोचायचं असलेलं 'उमरठ' हे सड्यापेक्षा वडघरपासून लांब असल्यामुळं सड्यात उतरणं आमच्या काहीसं पथ्यावरच पडलं होतं.


       सड्यासमोरच्या 'महादेवमुर्‍हा' रांगेवर 'नावाले' गाव वसलेलं आहे. आता आमचं पुढचं लक्ष नावाले होतं. सड्यातून शॉर्टकट मारून वडघरच्या रस्त्यावर उतरलो आणि दांडाने चढून नावाले गाठलं.


       गावातल्या विहिरीवर थंड पाणी भरून घेतलं आणि मंदिरासमोरच्या आंब्याखाली बसून दुपारचं जेवण उरकलं.

       नावालेतून डाव्याबाजूला 'साळवीकोंड' आहे आणि त्याच्या आणखी पूर्वेकडे 'महादेवमुर्‍हा'. आम्हाला नावालेच्या दक्षिणेकडच्या 'गोवेली'त जायचं असल्यामुळं डावी वाट सोडून आम्ही उजवी वाट पकडली आणि गोवेलीत पोहोचलो. इथून समोरच आम्हाला आमचं शेवटचं लक्ष म्हणजे उमरठ दिसत होतं पण त्यासाठी आम्हाला खालची ढवळी नदी ओलांडून पुन्हा थोडी चढाई करावी लागणार होती. गोवेलीतून तिच्या खालच्या वाडीत म्हणजे 'तळ्याच्या वाडी'त पोहोचलो.

       तळ्याच्या वाडीतली मुलं दररोज शाळेसाठी उमरठला जातात त्यामुळं वाडीपुढची वाट चांगली मळलेली दिसत होती. मळलेल्या वाटेने नदीपात्रात उतरलो. यावर्षीच्या पावसात नदीवरला पुल वाहून गेलेला दिसला.


       नदीत पाणी असल्यामुळं लिंबू सरबताचा कार्यक्रम इथंच उरकून टाकला.

       नदी ओलांडून पुढच्या अर्ध्या तासात तानाजी मालुसरेंच्या स्मारकापाशी दाखल झालो आणि नरवीरांपुढं नतमस्तक झालो. जवळच असलेल्या नरवीरांच्या पुतळ्याला भेट दिली आणि एका श्रद्धांजली डोंगरयात्रेची यथासांग सांगता केली.



 

🚩 ट्रेकच्या मार्गाचा व्हिडिओ इथे  टिचकी मारून पाहता येईल.

 

🚩 ट्रेकचा दररोजचा कार्यक्रम... 


🚩 दिनांक - ३० डिसेंबर २०२१

वार - गुरूवार

आतकरवाडी
सिंहगड
विंझर
गुंजवणे (मुक्काम)

🚩 दिनांक - ३१ डिसेंबर २०२१

वार - शुक्रवार

राजगड
खुळशी
भुतोंडे
गुहीणी
चांदवणे
निगडे
केळद
मढेघाट
कर्णवडी
राजवडी
कुंभे शिवथर
शिवथरघळ (मुक्काम)

🚩 दिनांक - ०१ जानेवारी २०२२

वार - शनिवार

सुनेभाऊ
पारमाची
माझेरी
तळीये
म्हेत्रेवाडी
किवे
पिंपळवाडी (मुक्काम)

🚩 दिनांक - ०२ जानेवारी २०२२

वार - रविवार

मंगळगड
सडे
नावाले (खांडज - तळ्याची वाडी रस्ता)
गोवेली
तळ्याची वाडी
उमरठ

🚩 ट्रेकभीडू -

१) दिलीप वाटवे - ( वय ४६ )
२) जितेंद्र परदेशी - ( वय ४६ )
३) राजेंद्र क्षीरसागर - ( वय ४७ )
४) अनिल सवाने - ( वय ५२ )
५) अमित पवार - ( वय ४५ )
६) उमेश माने - ( वय ४९ )
७) स्नेहल गोडांबे - ( वय २६ )
८) नेताजी भंडारे - ( वय ४० )
९) माधुरी भंडारे - ( वय ३६ )
१०) शंकर राणे - ( वय ६१ )
११) अर्जुन ननावरे - ( वय ५१ )
१२) संजय मालुसरे - ( वय ४७ )
१३) साहेबराव पुजारी - ( वय ४९ )
१४) सिद्धगौडा पाटील - ( वय ३९ )
१५) मिलींद गडदे - ( वय ५३ )
१६) संदीप बेडकुते - ( वय २५ )
१७) महादेव पाटील - ( वय ५३ )

( मित्रांनो वय हा फक्त एक 'आकडा' असतो हे वरच्या ट्रेकच्या वर्णनावरून एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच)

🚩 फोटो सौजन्य - फाल्कन्स

समाप्त.




२७ टिप्पण्या:

  1. दिलीप दादा,
    अप्रतिम ब्लॉग झालाय..��
    ब्लॉगच्या सुरवातीस दिलेला ऐतिहासिक संदर्भ आणि नंतर ट्रेकदारम्यानचे बारकावे यामुळे हा ब्लॉग खूपच सुंदर झालाय..

    उत्तर द्याहटवा
  2. दादा सुंदर अप्रतिम वर्णन केले आणि आमच्या सारख्या सामान्य माणसाला ट्रेकमध्ये घेऊन पूर्ण केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. जबरदस्त ट्रेक - असं परिपूर्ण लिखाण वाचून लगेच ट्रेकला निघावसं वाटतं.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप सुंदर आणि जबरदस्त आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन अविस्मरणीय असा ट्रेक आणि नवीन नवीन ट्रेंक करण्याचा आपण सर्वांनी केलेल्या संकल्प

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर वर्णन, छोट्या खाणा खुणांसह आवश्यक माहिती सांगितली आहे, सर्व सदस्यांचे अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  6. खुपच बारकावे लक्षात घेवुन वर्णन केले त्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत अप्रतीम वर्णन .

    उत्तर द्याहटवा
  7. दादा, फार सुंदर वर्णन केलंय, प्रत्यक्ष आपणच जणू केला असेल हा ट्रेक असा भास झाला. अभिनंदन तुमचे व सर्व टीम चे.

    उत्तर द्याहटवा
  8. खुप सुंदर ! आपण लिहिलेला ट्रेक चा वृतांत वाचताना खूपच आनंद होत होता जणू काही आपणच ट्रेक करत आहोत असा भास होत होता खरोखर असा ट्रेक करणं भाग्यच लागत खूपच छान आपल्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन !
    ज्ञानेश्वर हिंगे 9096359761
    ( कृपया पुढील ट्रेक ची माहिती देणे)

    उत्तर द्याहटवा
  9. खूपच छान आणि सविस्तर लिखाण केलेलं आहे दादा,

    उत्तर द्याहटवा
  10. सर्व प्रथम तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन , तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात. खूप छान फोटो काढले आहेत आणि
    ट्रेक बद्दल सविस्तर माहिती दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद. असेच भविष्यात तुम्ही अनेक ट्रेक करावे आणि आम्हाला ही तुमच्या सोबत यायला आवडेल, जय जिजाऊ- जय शिवराय .

    उत्तर द्याहटवा
  11. प्रवास हा माणसाच्या आयुष्यातील असा काळ आहे जो शब्दात वर्णन करता येत नाही.आयुष्यातील सगळेच धडे शाळेतून शिकायला मिळत नसतात तर काही धडे निसर्गातून ही मिळत असतात ते धडे घेण्यासाठी घराबाहेर पडायचेही असते अशी आपण तरुणांमध्ये नविन चेतना निर्माण केली.ट्रॅक बद्दल सविस्तर माहिती दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद. असेच भविष्यात तुम्ही अनेक ट्रेक करावे आणि आम्हाला ही तुमच्या सोबत यायला आवडेल .

    उत्तर द्याहटवा
  12. Dada lai bhari, mala tar tumha sarvansobat trek kelyacha feel ala, hats 👒 off to you all FALCON TREKKERS.

    उत्तर द्याहटवा
  13. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. एकदा वाचायला घेतल्यावर थांबता आले नाही, खूप प्रवाही लेखन आहे. माहिती मूल्यवान आहे. अशीच वर्णने करीत राहा अशी विनंती

    उत्तर द्याहटवा
  15. दिलीप:
    थीम मस्तंच,
    आणि झकास ऋतूमध्ये दमदार चाल!
    कोकणातून घाटवाटांची ओळख पटवत जाण्याचा तुमचा आनंद लिखाणातून आमच्यापर्यंत पोहोचला..
    तानाजींबद्दलची दंतकथा आणि प्रत्यक्ष भूगोल बघतानाची निरीक्षणे याबद्दल ऐकायला आवडेल - पुढच्या चहा-मिसळ भेटीला 👍🏻🤝🏻

    उत्तर द्याहटवा
  16. सर्वात महत्वाचं म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्या "कर्मभूमीपासून ते दहनभूमीपर्यंत" चा ट्रेक आयोजित करणे हेच जबरदस्त आवडलं... असा विचार फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या अभ्यासू आणि कसलेल्या ट्रेकरला जमणार...
    सुरवातीला दिलेले ऐतिहासिक संदर्भ, मग ट्रेकवर्णन आणि शेवटी सगळ्यांच्या वयाची यादी वाचून तर थक्कचं झालो... ओव्हरऑल जबरदस्त तंगडतोड ट्रेक आणि तेवढाच दमदार लेख... वाचून मज्जा आली... शुभेच्छा...!

    उत्तर द्याहटवा
  17. दिलीप आणि सर्व सहकारी फाल्कन्स ...
    सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन! नुसता जंबो ट्रेक करणे आणि इतिहास व भूगोलाची योग्य सांगड घालून ट्रेक करणे यातला फरक हा ब्लॉग वाचून नक्कीच अधोरेखीत होतो. इतिहासाचे योग्य संदर्भ देता देता, पर्यावरणाचा तोल ढळल्याने बदलेला भूगोलही इथे छान शब्दबद्ध झाला आहे. प्रामाणिक हेतूने केलेल्या निसर्ग भटकंतीत प्रबळ इच्छशक्ती असेल तर वय कुठेच आड येत नाही हेही खरेच!
    व्वा, अशाच सहेतुक अभ्यासपूर्ण पुढील भटकंतीस खूप शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  18. सध्याच्या ट्रेकिंग (ट्रिप) या कन्सेप्ट ला फाटा मारून केलेल्या भटकंतीला मानाचा मुजरा.

    उत्तर द्याहटवा
  19. सिंह तानाजीराव मालुसऱ्यांच्या स्मृतीला मानाचा मुजरा ! तुम्हा सर्व मावळ्यांचे आनंदाने कौतुक . खरतर दंडवतच !

    उत्तर द्याहटवा
  20. खुपच सुंदर माहिती सादरीकरण, आपला इतिहास सह्याद्री च्या ज्वाले परी जाजवल्य आहे याची प्रचिती आली. आपण खूप भाग्यवान आहेत की हे करण्याची संधी आपणांस मिळाली आणि ती आहाला देखील मिळो अशी मी त्या विधात्या कडे प्रार्थना. छायाचित्रे देखील सुंदर आहेत. पुनःश्च माहिती साठी धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
    जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र🚩

    उत्तर द्याहटवा