'कोस्टल ट्रेक'
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४७ साली मराठ्यांचा स्वराज्याची मुहूर्तमेढ सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर रोवली. सुरवातीला मराठ्यांचा संचार जरी मुख्यतः सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असला तरी इ.स. १६५५ - ५६ साली जावळी ताब्यात घेतल्यानंतर स्वराज्याची सीमा जवळजवळ समुद्राला जाऊन भिडली आणि मराठ्यांचा संबंध सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच इत्यादी दर्यावर्दी परकीय सत्तांशी आला. इ.स. १६५७ साली महाराज तैलघट्टजवळच्या सवाष्णी घाटाने उत्तर कोकणात उतरले. भिवंडी घेतली, कल्याण जवळचा दुर्गाडीचा किल्लाही ताब्यात घेतला. साष्टी, कल्याण आणि भिवंडी घेतल्यामुळं साहजिकच मराठ्यांचा उत्तर कोकणातल्या सिद्द्याशी संघर्ष अटळ होता. साष्टी, कल्याण, भिवंडी, पेण, अलिबाग, श्रीवर्धन वगैरे भागातील लोक जंजीरेकर सिद्दीच्या छळवणूकीने अतिशय पिचले गेलेले होते. या सिद्द्याची राजधानी दंडाराजपुरी जवळच्या 'जजीरे मेहरूब'वर होती. किनारपट्टीवर येऊन धाडी मारणे, लुट करणे, जाळपोळ करणे, बायका पळवून परदेशात विकणे आणि लोक बाटवणे असे अनेक धंदे हा सिद्दी करीत असे. या सिद्दीबद्दलचं गाऱ्हाणं घेऊन लोक महाराजांकडं आले आणि या सर्वातून सोडविण्यासाठी महाराजांकडं मदत मागितली. सिद्द्यांची खरी ताकद या समुद्रात आहे आणि समुद्रामुळंच तो रयतेवर अत्याचार करण्यास धजावतो हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी आरमार बांधायला काढलं. आरमार बांधून तयार होत असतानाच कोकण किनारपट्टीवरील एकेक भाग काबीज करत त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर किल्ल्यांची साखळी तयार केली आणि किनारपट्टी सुरक्षित केली. नंतरच्या काळात मुळातच दर्यावर्दी असलेल्या सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच इत्यादी परकीय सत्तांना मराठ्यांच्या आरमाराने अगदी सळो की पळो करून सोडलं ते किनारपट्टीवर असलेल्या या किल्ल्यांच्या जोरावरच. तर असं या किल्ल्यांत आहे तरी काय की मराठ्यांनी परकीय सत्तांमधे एवढी दहशत निर्माण केली?
बऱ्याच दिवसांपासून आम्हा फाल्कन्सचा याच गोष्टींचा मागोवा घेण्याचा विचार मनात घोळत होता. सह्याद्रीतील किल्ले, घाटवाटा वगैरेचे ट्रेक्स करत असतानाच आम्हाला कोकणही खुणावू लागलं होतं. प्रत्येकवेळी सह्याद्रीतले ट्रेक ठरवताना कोकण किनाऱ्यावरील किल्ल्यांची साखळी किंवा दुर्गपुंज, त्यांचा इतिहास आणि त्याच्यासोबतच कोकणातील अजूनही काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं पाहता येतील काय या संदर्भात आमच्यात नेहमीच चर्चा होत असे. तसं कोकणात जावं ते उन्हाळ्याच्या दिवसांत कारण उन्हाळ्याच्या दिवसांत कोकणात आंबे, फणस वगैरे खाण्यापिण्याची लयलूट असते पण हा एकच मुद्दा सोडला तर कोकणात थंडीच्या दिवसात जाणं घाटमाथ्यावर राहणाऱ्यांसाठी काहीसं सुखावह असतं म्हणून आम्ही फाल्कन्सनी नोव्हेंबर महिन्यातल्या तिसऱ्या शनिवार-रविवारी ही भटकंती ठरवली होती. समर्थ दासबोधात म्हणतात...
सृष्टीमधें बहू लोक । परिभ्रमणें कळे कौतुक ।
नाना प्रकारीचे विवेक । आडळों लागती ॥ १ ॥
अर्थ - सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण परिभ्रमण केल्याने त्यांचे कौतुक किंवा वेगळेपण आपल्याला कळेल आणि हळूहळू त्यांची नाना प्रकारची प्रयोजनेही आपल्या नजरेस पडू लागतील.
समर्थांच्या या श्लोकाचाच परिपाक असलेली वैविध्यपूर्ण भटकंती आम्ही फाल्कन्सनी करायचं नक्की केलं होतं आणि त्या दृष्टीने जोरदार प्लॕनिंगही सुरू केलं होतं. सरखेल कान्होजी आंगेंच्या अफाट कर्तृत्वाची सुरूवात सुवर्णदुर्गापासून तर ज्या किल्ल्याच्या योगानं कान्होजींच्याच कारकीर्दीत मराठी आरमारानं सुवर्णयुग बघितलं त्या आरमारी राजधानी असलेल्या विजयदुर्गादरम्यान आम्ही ही भटकंती करायचं ठरवलं होतं. आमच्यासोबत मूळचे त्या भागातलेच मिलींद गडदे आणि जितेंद्र भोसले हे दोन पक्के कोकणी असल्यामुळं प्लॕनिंग करणं बऱ्यापैकी सोपं झालं होतं. जाण्यायेण्याचे, फिरण्याचे योग्य आणि सुरक्षित मार्ग, पाहण्याची वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि त्यांचा क्रम, राहण्याच्या-जेवणाच्या सोयी या दोघांच्या मदतीने फक्त फोनवरून झाल्या होत्या. या दोघांमुळं एकूणच ही सगळी भटकंती भन्नाट होणार याची खात्री वाटू लागली होती त्यामुळं ट्रेकला निघण्याचा दिवस कधी एकदा उजाडतोय असं आम्हा सर्वांना झालं होतं.
...आणि तो १८ नोव्हेंबरचा शुक्रवार उजाडला. नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता जेवण करून चिंचवडहून निघालो. नवले पुलाजवळ शेवटचा भिडू येणार होता. तिथं पोहोचल्यावर गाडीची पूजा केली.
नवले पुलापासून निघाल्यावर लगेचच खेडशिवापूरच्या टोलनाक्यावर चहासाठी थांबायचं ठरलं होतं पण ट्रेकच्या गप्पांच्या नादात पार कापूरओहोळला पोहोचलो. कापूरओहोळनंतरचा टी-ब्रेक थेट कराडच्या अलिकडं तासवडे टोलनाक्यालाच घेतला.
ट्रेकची सुरूवात विजयदुर्गापासून करायची होती त्यामुळं पुण्याहून कराड, मलकापूर, अणूस्कुरा घाटाने पाचल, ओणी आणि विजयदुर्ग अशा मार्गाने जायचं ठरवलं होतं. हा पल्ला बराच लांबचा असल्यामुळं इथून बाकी पुढं फारसं कुठं न थांबता विजयदुर्गाच्या अलिकडं गिर्ये गावाच्या श्री देव रामेश्वर मंदिराच्या नगारखाना असलेल्या प्रवेशद्वारापाशीच थांबलो. सकाळची आन्हीकं उरकण्याच्या दृष्टीनं ही जागा उत्तम होती.
दिवस पहिला -
आन्हीकं उरकून मंदिर पहायला निघालो. रामेश्वराचं मंदिर खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिसून येत होतं. बहूतांशी मंदिरं ही जमीनीवर बांधलेली दिसून येतात पण हे मंदिर कातळात भलामोठा खड्डा खोदून त्यात बांधलेलं होतं त्यामुळं लांबून इथं मंदिर असेल अशी पुसटशी कल्पनाही आली नाही. ऐन धामधुमीच्या काळात परकीय आक्रमकांपासून मंदिराचं संरक्षण व्हावं म्हणून बहुधा अशी रचना केली गेली असावी असं सहजच वाटून गेलं.
'श्री देव रामेश्वर' हे गिर्ये गावाचं ग्रामदैवत. या मंदिराची स्थापना १२ व्या शतकात झाली म्हणजेच हे मंदिर जवळजवळ आठशे वर्ष जुनं असल्याचं गावकरी सांगतात. प्रवेशद्वारापासून चारशे फूट लांब आणि पंधरा फूट रूंद अशी दगडी वाट आपल्याला मंदिरात घेऊन जाते. या खोदून तयार केलेल्या वाटेच्या दोन्ही बाजूला दिवे ठेवण्यासाठी खोबण्या खोदलेल्या दिसतात. ही वाट उतरून गेल्यावर आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. या प्रवेशद्वारावर १७९१ साल कोरलेली मोठी पितळी घंटा दिसून येते. प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला कमीजास्त उंचीच्या सात दिपमाळा दिसतात. दिपमाळेच्या मागच्या बाजूला भव्य लाकडी सभामंडप दिसून येतो. मंदिराचं नुतनीकरण जरी झालेलं असलं तरी जुना बाज मात्र कायम राखलेला दिसला. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडल्यावर संभाजी आंग्रेंची स्मारक छत्री आहे. मराठ्यांच्या इतिहातल्या एवढ्या थोर व्यक्तीच्या स्मारकावर सध्या सगळीकडं झाडी माजलेल्याचं पाहून वाईट वाटलं पण रामेश्वर मंदिराचा एकूणच मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि अतिशय शांत आहे. विजयदुर्गाच्या भेटीत भेट द्यावी असं हे ठिकाण तर नक्कीच आहे.
रामेश्वर मंदिर पाहून विजयदुर्गापाशी पोहोचलो. समोरच्याच हॉटेल सुरूचीमधे चहा-बिस्कीटं खाल्ली आणि बाहेरच्या मारूतीचं दर्शन घेऊन गडफेरीसाठी निघालो.
वाघोटन खाडीच्या मुखाशी आणि गिर्ये गावाच्या हद्दीत असलेला किल्ला म्हणून या किल्ल्याला 'घेरीया' हे नाव होतं पण विजयनाम संवत्सरात शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्यामुळं त्यांनी याचं 'विजयदुर्ग' असं नामकरण केलं. ११ व्या शतकात भोज राजाने हा किल्ला बांधल्याचं सांगितलं जातं. नंतर हा किल्ला आदिलशाही, मराठे आणि शेवटी ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. आंग्रेंच्या आणि पुढे धुळपांच्या काळात हा किल्ला मराठ्यांची आरमारी राजधानी होता.
किल्ल्याचा इतिहास मनात घोळवत गडावरची ठिकाणं पाहू लागलो. किल्ल्याची तिहेरी तटबंदी, गोमुखी प्रवेशद्वार, जीभी दरवाजा, खुबलढा बुरूज, खलबतखाना, सदर, साहेबाचा ओटा, पाण्याचा तलाव आणि भवानी मंदिर वगैरे ठिकाणं पाहून पुन्हा गाडीपाशी आलो. इथूनच विजयदुर्ग समुद्रातून पाहण्यासाठी बोटी मिळतात. विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेर समुद्रात एक मानवनिर्मित भिंत बांधलेली आहे त्याचं नेमकं ठिकाणही या बोटीतून गेल्यावर बोटवाली मंडळी सांगतात. विजयदुर्ग गावातच धुळपांचा वाडाही पहायला मिळतो. पुढचा बराच पल्ला मारायचा शिल्लक असल्यामुळं तिथं फारवेळ घालवणं परवडणारं नव्हतं. पुढचं ठिकाण होतं 'गिर्येची शिवकालीन गोदी.'
विजयदुर्गातून परतीच्या मार्गावर डाव्या बाजूला पोलिस स्टेशन दिसलं. त्याच्या पुढचं पहिलंच डावं वळण घेऊन आपण गोदीजवळच्या वस्तीपाशी पोहोचतो. वस्तीपासून पाच मिनिटांत गोदीपाशी पोहोचलो. आजही गोदीत नौका नांगरून ठेवलेल्या दिसत होत्या. जवळच एक तोफ पडलेली दिसली. फोटो काढले आणि पंधरा मिनिटांत गोदी पाहून गाडीपाशी आलो. आता पुढचं लक्ष होतं ते म्हणजे कातळशिल्पाचं 'देवाचे गोठणे'
पुढच्या पंधरा मिनिटांत देवाचे गोठणे गावातल्या भार्गवराम मंदिरापाशी गाडी लावून सड्यावर जायला निघालो. स्थानिक याला घाटी म्हणतात. गावातून मस्त पाखाडीने सड्यावर पोहोचलो. सड्यावरच्या त्या मोठ्या आकाराच्या मनुष्याचं कातळशिल्प असलेल्या जागेला स्थानिक पूर्वापार 'रावणाचा कातळ' म्हणतात. इथं निसर्गात 'चुंबकीय विस्थापनाचा' म्हणजेच 'geological phenomenon' चा अद्भुत चमत्कार पहायला मिळतो. साधारणपणे होकायंत्र दिशादर्शकाचं काम करतं पण या ठिकाणी या शिल्पाच्या मधोमध होकायंत्र ठेवलं तर तबकडीवरचा काटा चुकीची दिशा दाखवतो. कोकणात बऱ्याच ठिकाणी कातळशिल्पं आहेत पण सगळ्याच ठिकाणी असा चुंबकीय विस्थापनाचा प्रकार होत नाही. कुणी हे कातळशिल्प खोदलं असेल? चुंबकीय विस्थापनाचा प्रकार का होतो आणि तो नेमका इथेच होतोय हे त्याला कसं समजलं असेल? चुंबकीय विस्थापन जिथं होतंय नेमका तोच मध्य घेऊन माणसाची आकृती खोदण्याची कल्पना त्याला कशी सुचली असेल? खरंतर हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. भारताव्यतिरिक्त आणखी कुठेही जांभा दगडात चुंबकीय विस्थापनाचा प्रकार घडत असल्याची नोंद नाही. ही रावणाचा कातळाची जागा गावातल्याच निलेश आपटेंची आहे. सड्यावर रावणाच्या कातळाची जागा सापडणं थोडं अवघड आहे त्यामुळं निलेश आपटे आपल्यासोबत माहितगार माणूस देतात आणि या ठिकाणाला भेट दिलेल्यांची नोंदही ठेवतात.
देवाचे गोठणे शिवाय 'बारसू', 'सोलगाव', 'हसोळ' वगैरे ठिकाणीही अशी कातळशिल्पं पहायला मिळतात. सध्या बारसूला असलेलं कातळशिल्प महाराष्ट्र शासनाच्या पेट्रो रिफायनरी प्रोजेक्टमधे नामशेष होणार आहे. याशिवाय रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावर एके ठिकाणी प्रचंड मोठा नकाशा कोरलेला होता. तेही शिल्प रस्ता रूंदीकरणात रस्त्याखाली गेलं. रत्नागिरी शहरातील 'नाचणे' गावाचं शिल्प बिल्डिंग बांधली त्यात गेलं. खरंतर हे प्रचंड मोठं आणि पुन्हा कधीही भरून न येणारं नुकसान आहे पण त्याचं कुणालाच काही पडलेलं नाही त्यामुळं यापुढं अशी कितीतरी न उजेडात आलेली कातळशिल्पं परस्पर लुप्त होतील देव जाणे.
देवाच्या गोठण्यातून आता पुढचं लक्ष दिसत होतं 'नाटेचा यशवंतगड'. हा यशवंतगड किल्ला जैतापूरच्या खाडीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला शिवकालात अर्जूना नदीतून राजापूर बंदरात होणाऱ्या व्यापारी आणि लष्करी नौकानयनावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा असं वाटतं. मुख्यत्वे राजापूरच्या ब्रिटीशांच्या वखारीत जाण्यासाठी त्यांची जहाजं या मार्गे जात-येत असत. नाटे गावातल्या अरूंद रस्त्यावरून गावाबाहेर पडल्यावर हाकेच्या अंतरावरच डाव्या बाजूला यशवंतगड दिसला. गाडीतून पायउतार झाल्यावर दोनच मिनिटांत खंदकात उतरून गडाच्या दरवाज्यात पोहोचलो. गड तसा लहानच होता. या गडाला एकूण सतरा बुरूज आणि चार दरवाजे आहेत पण संपूर्ण किल्ल्यात रान माजलेलं असल्यामुळं सगळीकडं काही फिरता आलं नाही. या किल्ल्याची तटबंदी जांभ्या दगडात बांधलेली दिसत होती तर खंदकात एक विहिरही दिसली.
नाटेवरून सरळ जाणारा रस्ता आम्हाला पुढच्या फक्त सहा किलोमीटरवरच्या 'आंबोळगड'ला घेऊन जाणार होता. पंधरा मिनिटांत आंबोळगडापाशी पोहोचलो. आंबोळगड हा मुख्यत्वे बाजूलाच असलेल्या मुसाकाजी बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला. या गडावर एका तुटलेल्या तोफे व्यतिरिक्त एक चौकोनी विहीर आणि घरांची जोती सोडली तर हा किल्ला असल्याच्या फारशा काहीच खूणा शिल्लक नाहीत. समुद्राच्या बाजूला काही तटबंदी असल्याच्या थोड्याच खूणा शिल्लक आहेत. आंबोळगड हा एका उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे अशी माहिती मिळते. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र तर उत्तर आणि पश्चिमेकडे खंदक आहे. एकूणच या किल्ल्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. अजून काही वर्षात या किल्ल्याचं काहीच अस्तित्व शिल्लक राहणार नाही हे मात्र नक्की.
आता पुढचं लक्ष होतं 'आडिवरेचं महाकाली मंदिर.' रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात हे आडिवरे गाव वसलेलं आहे. या गावाला प्राचीन इतिहास आहे. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना याच आडिवरे गावाचं उत्पन्न लावून दिलं असं सांगितलं जातं. असे म्हणतात की आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना तत्कालीन शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली. हे महाकालीचं मंदिर अत्यंत सुंदर असून त्याच्या उत्तम रितीने निगा राखलेली दिसून येते. देवीची मूर्ती सुबक असून तिच्या मागे दोन सुंदर मोर दिसतात. एक वैशिठ्यपूर्ण गोष्ट या मंदिरात दिसते ती म्हणजे मंदिरात असलेल्या विहिरीवरचा रहाट.
संध्याकाळ होऊ लागली होती आणि आम्हाला आजच्या मुक्कामाला सोबतच्या मिलींद गडदेच्या घरी तवसाळला पोहोचायचं होतं. सकाळी विजयदुर्ग गावात असलेला 'धुळपांचा वाडा' पाहता आला नव्हता आणि आता इथून पुढे 'कशेळीचं कनकादित्य सूर्यमंदिर', 'देवघळी बीच', 'पुर्णगड', 'रत्नदुर्ग' आणि 'जयगड' किल्ले, 'गणपतीपुळेचं गणपती मंदिर', 'कऱ्हाटेश्वर मंदिर' पाहता येणार नव्हतं. आजच्या दिवसातले बहूतेक सर्व रस्ते खराब असल्यामुळं दोन ठिकाणांदरम्यानच्या प्रवासात प्रचंड वेळ खर्ची पडत होता त्यामुळं मिलिंदच्या घरी जाताजाता कमी वेळ लागेल असं ठिकाण पहायचं ठरवलं ते म्हणजे भाट्येचं 'मायनाक भंडारींचं स्मारक.'
शिवाजी महाराजांच्या आरमारात असलेल्या प्रमुखांपैकी एक म्हणजे मायाजी भाटकर ऊर्फ मायनाक भंडारी. मायाजी भाटकर हे जातीने भंडारी असल्यामुळं ते मायनाक भंडारी नावानेच इतिहासाला माहिती आहेत. मायनाक भंडारींच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने अनेक पराक्रम केले. खांदेरी किल्ल्याच्या लढाईत त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. पावसाळ्यात सिद्दीचं आरमार मुंबई बेटात वरवायला जात असे. या सिद्दीची आणि ब्रिटीशांची मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली होती. यावर तोडगा म्हणून शिवाजी महाराजांनी खांदेरी बांधायला घेतला. थळ बंदरातून सामान आणि मजूर आले आणि त्यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. खांदेरीचा हा मराठ्यांचा डाव ब्रिटीशांनी बरोबर ओळखला त्यामुळं त्यांनी हे बेट आमचे आहे तुम्ही निघून जा अशी त्यांनी मराठ्यांना धमकी दिली आणि बेटाला वेढा घातला पण मायनाक भंडारींनी मी 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक असून फक्त त्यांचीच आज्ञा मानतो' असं बेडरपणे उत्तर दिलं आणि बांधकाम सुरूच ठेवलं. ब्रिटीशांनी त्यांची आरमारी शक्ती वापरून त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही आणि शेवटी खांदेरी बांधून पूर्ण झालाच. खांदेरी बांधल्यामुळं सिद्दी आणि ब्रिटीश या दोघांमधं मराठ्यांनी पाचर मारली होती आणि त्याचं संपूर्ण श्रेय मायनाक भंडारींना जातं.
शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केल्यानंतर त्यांच्या आरमारात जास्त करून भंडारी लोकांचाच भरणा असे. नौकानयन आणि बरकंदाजी हे या भंडारी लोकांचे परंपरागत धंदे होत. समुद्र खवळलेला असतानाही डोलकाठीवर चढून शीडं सोडण्याचा सराव असल्यामुळं साहजिकच ते धाडशी स्वभावाचे असत.
भाट्येतून निघाल्यावर बाकी कुठे न थांबता जयगडाची जेट्टी गाठली आणि फेरीने तवसाळला मिलिंद गडदेच्या घरी मुक्कामाला पोहोचलो. आदल्या रात्रीचं जागरण, त्यानंतर दिवसभर भटकंती आणि प्रवास झाल्यामुळं सगले थकले होते. आगाऊ कल्पना देऊन ठेवल्यामुळं जेवण तयारच होतं त्यामुळं फारवेळ न काढता फ्रेश होऊन लगेचच जेवण केलं. आजच्या रात्रीच्या जेवणात तांदळाची भाकरी, गावरान पावटा, वांग, बटाटा रस्सा भाजी, वाटण वरण, भात, सोलकढी आणि उकडीचे मोदक असा फक्कड कोकणी मेनू होता. जेवणानंतर फारवेळ न काढता सगळे झोपी गेलो.
दिवस दुसरा -
सकाळी लवकर आवरून नाश्ता केला, मिलिंदच्या घरच्यासोबत फोटो काढले आणि बाहेर पडलो.
आज सुवर्णदुर्गापर्यंत मजल मारायची होती त्यामुळं सकाळची आन्हीकं लवकर उरकून घराबाहेर पडलो आणि हाकेवरच्या विजयगडाजवळ पोहोचलो. जयगड खाडीच्या एका बाजूला जयगड किल्ला आहे तर दुसऱ्या बाजूला 'विजयगड.' हे 'जय-विजय' जयगड खाडीचे संरक्षक दुर्ग. विजयगडाला सध्या एक बुरुज शिल्लक राहिला आहे. बुरुजाच्या खालच्या बाजूला एक विहिर आहे पण ती प्रचंड वाढलेल्या झाडोऱ्यामुळं काही पाहता आली नाही.
आता पुढचं लक्ष होतं 'नरवणचं व्याघ्रांबरी देवीचं मंदिर.' 'बगाड' हा प्रकार साधारण घाटमाथ्यावर पाहायला मिळतो. वाई जवळचं बावधन हे त्याचं उत्तम उदाहरण सांगता येईल. कोकणात बगाडाचा प्रकार फक्त नरवण या गावात व्याघ्रांबरीच्या मंदिराजवळ पाहायला मिळतो. हे बगाड देवदिवाळीच्या दिवशी असतं. आज तारीख होती २० नोव्हेंबर आणि देव दिवाळी होती २४ तारखेला. थोडक्यात बगाडाचा दिवस चुकला आमचा पण बगाडाची तयारी बाकी पाहता आली. तिथलं मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते मंदिर संपूर्ण लाकडी असूनही ते बनवताना एकाही खिळ्याचा वापर केलेला नाहीये. आता असं मंदिर बनवणारे कारागीर मिळणं तर दुरच पण ते दुरूस्त करणारेही कारागीरही मिळणं अवघड झालंय. बगाडाच्या तयारीची लगबग पाहून आणि व्याघ्रांबरीचं दर्शन घेऊन 'हेदवी'ला गेलो.
हेदवीला 'दशभुजा गणेशाचं दर्शन' घेऊन 'बामणघळी'कडे निघालो. वाटेत मिलिंद गडदेच्या मामेसासऱ्यांचं घर आहे. मामेसासऱ्यांनी जावई आणि त्याच्या मित्रांसाठी म्हणजे आमच्यासाठी खास शहाळी काढून ठेवली होती मग त्यांचा आस्वाद घेऊनच बामणघळ गाठली.
बामणघळीत निसर्गाचा एक अदभूत चमत्कार पहायला मिळतो. समुद्रला चिकटलेल्या डोंगराला एक चिर पडलेली आहे आणि या चिरेमधून समुद्राच्या पाण्याचा फवारा ३० ते ४० फूट उंच उडताना पहायला मिळतो. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या उमा महेश्वर मंदिरामागून डोंगराच्या कडेच्या वाटेने बामणघळीपर्यंत गेलो. इथं डोंगर उतारावरच्या कातळाला २० ते २५ फुट लांबीची चीर पडली आहे. त्यालाच बामणघळ असं म्हणतात. दोन्ही बाजुला दिसणाऱ्या कातळाखाली सुमारे ६ फुट लांब, २ फुट रुंद आणि ४ फुट उंच अशी कपार आहे. उधाणाच्या भरतीच्या वेळेस मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घळीत शिरते. हा वेग इतका असतो की निमुळत्या घळीतून हे पाणी ३० ते ४० फुट उंच उडते. आम्ही पोहोचलो तेव्हा ओहोटी असल्यामुळं आणि समुद्रालाही उधाण नसल्यामुळं फार उंच उडलेला फवारा काही पाहता आला नाही. हे दृष्य फक्त पावसाळ्यात समुद्राला उधाण येतं त्यावेळीच पहायला मिळतं. ऑगस्ट महिन्यानंतर दिवाळीपर्यंत अमावास्या, पौर्णिमेला दुपारी १२ वाजता खात्रीने उंच उडलेले फवारे पहायला मिळतात. त्यानंतर गुढीपाडव्याला येणाऱ्या उधाणाच्या भरतीच्या वेळीही हा प्रकार पहायला मिळतो. मात्र मे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत समुद्र शांत असताना हे दृष्य सहसा पहायला मिळत नाही.
आमचा पुढचा टप्पा होता 'पालशेत'चा. पालशेतजवळच्या 'निवोशी'त आदीमानवकालीन काही हत्यारं सापडल्याचे बातमी पेपरात वाचल्याचं स्मरत होतं पण हाताशी तेवढा वेळ नसल्यामुळं पालशेतचं दत्तमंदिर पाहिलं.
पालशेतच्या दत्तमंदिरावरूनच बंदरावरच्या रस्त्याने थेट असगोली गाठता येतं. गुहागरला जायला हा रस्ता जवळचा असला तरी सुरवातीचा रस्ता खूपच खराब होता. त्या रस्त्याने गेल्यामुळं वेळ बराच वाचणार होता त्यामुळं त्याच रस्त्याने जाऊन असगोलीवरून गुहागरच्या 'व्याडेश्वर' मंदिरात पोहोचलो. कालच्या पाहूणचाराचा दिवस जसा मिलिंद गडदेचा होता तसा आजचा जितेंद्र भोसलेचा होता. वेळ नसल्यामुळं त्याच्या पडव्याच्या घरी काही जायला जमलं नव्हतं म्हणून मग तो मंदिराच्या बाजूला असलेल्या तांबेंच्या 'श्रीराम उपहारगृहात' मिसळ खायला घेऊन गेला. तिथली दहीमिसळ तर लाजवाब होती. मिसळ चेपून व्याडेश्वराच्या दर्शनाला गेलो.
‘वाडेश्वर’ किंवा ‘व्याडेश्वर’ नावाचं कोकणात गुहागरला संपूर्ण काळ्या पाषाणाचं पुरातन असं भव्य मंदिर आहे. मुख्य शिवमंदिर मधोमध असून चार कोपऱ्यांत सूर्य, गणपती, दुर्गादेवी आणि लक्ष्मीनारायण यांची छोटी मंदिरं आहेत. पूर्वेकडे असलेल्या महाद्वाराच्या एका बाजूला गरूड हात जोडून उभा आहे तर दुसऱ्या बाजूला मारुती आहे. प्रवेशद्वारासमोरच काळ्या पाषाणाच्या दोन भव्य दीपमाळा आहेत. मंदिराच्या समोर गंडकी शिळेतल्या नंदीचं भव्य शिल्प आहे. वाडेश्वराबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की 'एक शेतकरी शेत नांगरत होता. त्याच्या शेतात एक गाय एका विशिष्ट ठिकाणी येऊन नियमितपणे पान्हा सोडत असे. शेतकऱ्याला कुतूहल वाटले. त्याने त्या ठिकाणावर नांगराचा फाळ खोलवर घुसवून नांगर ओढला. नांगर पुढे जाईना. त्याने रेटा लावल्यावर जमिनीत शिवपिंडिका दिसू लागली. नांगराच्या फाळाने मूळ शाळुंकेचे तीन कपचे उडाले. ते जवळच असलेल्या असगोली, बोऱ्याअडूर आणि अंजनवेल या ठिकाणी पडून तेथे अनुक्रमे 'वाळकेश्वर', 'टाळकेश्वर' आणि 'उडालेश्वर' अशी तीन मंदिरे निर्माण झाली.' ती आजही आपल्याला पाहता येतात.
आता आम्ही निघालो 'अंजनवेलचं लाईटहाऊस' बघायला. गुहागरच्या व्याडेश्वर शिवपिंडीचे जे तीन तुकडे उडाले त्यातल्या अंजनवेलला पडलेल्या टाळकेश्वर मंदिरापाशी हे लाईटहाऊस आहे. मंदिराजवळ गाडी लावून टाळकेश्वराचं धावतं दर्शन घेतलं आणि लाईटहाऊस बघायला निघालो. प्रत्येकी १० रूपये तिकीट काढून हे लाईटहाऊस पहायला मिळतं. जितेंद्र भोसलेच्या मामाचं गाव अंजनवेल साहजिकच त्याची लाईटहाऊसमधे ओळख होती. मामेभावाने आम्ही लाईटहाऊस पहायला येत असल्याची तिथं आगाऊ कल्पना देऊन ठेवल्यामुळं तिथल्या एका प्रतिनिधीने आम्हाला लाईटहाऊस आणि बाजूच्या कोस्टगार्डच्या रडारबद्दलची आम्हाला इत्यंभूत माहिती दिली.
लाईटहाऊससमोरचा सरळ रस्ता जातो 'गोपाळगड'कडे. त्या रस्त्याने थेट गोपाळगड गाठला. गडाच्या गेटबाहेर गाडी पार्क केली आणि गडफेरीला निघालो. पूर्वी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदरापासून चिपळूणपर्यंत व्यापारी जलवाहतूक होत असे. या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेलचा गोपाळगड किल्ला बांधण्यात आला. सात एकर क्षेत्रफळ असलेल्या या किल्ल्याची बरीचशी तटबंदी आजही शाबूत आहे. किल्ल्याच्या जमिनीकडील बाजूला खोल खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या तटाला एकूण १५ बुरुज आहेत. त्यावर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. गडाच्या पूर्वेला एक दरवाजा आहे. गडाचा तट ०७ मीटर उंचीचा आणि २५ मीटर रुंदीचा आहे. हा किल्ला वरचा कोट, बालेकिला आणि पडकोट अशाचा मिळून बनलेला आहे. पडकोटाचा भाग म्हणजे समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणारी ही दुहेरी तटबंदी इ.स. १६९९ मधे सिद्दी खैरतखानाने बांधली. तुळाजी आंग्रे यांनी किल्ल्यालगतचा बालेकिल्ला बांधला. परकोटाच्या टोकाला समुद्राकडील बाजूस कमानी आहेत. त्याच्या बाजूस एक चोर दरवाजा पण आहे आणि त्याच्या समोरच एक खराब पाण्याचं टाकं देखील आहे. परकोटाला समुद्राच्या बाजूने शिरण्यासाठी दरवाजा आहे. पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या व्यतिरीक्त किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, त्याजवळील बांधीव तलाब आणि छोटी-मोठी घरांची जोती असे अवशेष दिसतात. गडाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर कातळात खोदलेली पायऱ्यांची विहीर दिसून येते.
गडावरून निघालो जितेंद्रच्या मामाच्या घरी त्यांचं आदरातिथ्य घ्यायला. किल्ल्यापसून बरंच पुढं आल्यावर वाटेत एक वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम दिसलं. तो एकल बुरूज होता. याला 'मार्टेलो टॉवर (martello tower)' असं म्हणतात. खाडीच्या तोंडावर किल्ले असत पण संपूर्ण खाडीवर तटबंदी बांधणं काही शक्य नसे. याला पर्याय म्हणून अशा मार्टेलो टॉवर्सची निर्मिती केली गेली. लढाईसाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी एखाद्या किल्ल्यात असतात त्या गोष्टी साठवून मारगिरी आणि लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला एकल बुरूज म्हणजे मार्टेलो टॉवर. असे मार्टेलो टॉवर कोकणात फारच कमी ठिकाणी पहायला मिळतात.
जितेंद्रच्या मामाच्या घरचा पाहूणचार घेऊन थेट धोपाव्याला पोहोचलो. आयुर्वेदीक औषधालयात 'कृपा हेअर टॉनीक' मिळतं ते या धोपाव्याचं. त्यांचा कारखाना पाहता येतो पण फेरीची वेळ जवळ आली होती ती न चुकवता दाभोळला जावंच लागणार होतं. फेरीने दाभोळला गेलो.
नदी आणि उंच टेकडीच्या मधील चिंचोळ्या पट्टीत 'दाभोळ' वसलेलं आहे. या ठिकाणाला 'दालभ्यपुरी', 'दालभ्यवती', 'हामजाबाद', 'मैमुनाबाद' अशी नावं विविध काळात होती. एकेकाळी मक्केला जाणारे यात्रेकरू दाभोळ बंदरातून निघत असत त्यामुळे दाभोळला मक्केचा दरवाजा किंवा 'बाबुल-ए-हिंद' असंही नाव होतं. नंतरच्या काळात दाभोळवर विजापूर घराण्याची सत्ता आली. या ऐतिहासिक शहरात अनेक वास्तू आहेत. त्यापैकी सुस्थितीत असलेली एक देखणी वास्तू म्हणजे 'माँसाहेबांची मशीद'. दाभोळ जेट्टी जवळच ही मशीद दिसते. भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यातील या मशिदीत गेल्यावर समोरच असलेला अष्टकोनी रचनेचा हौद आणि त्यामध्ये असलेलं कारंजं लक्ष वेधून घेतं. ही मशीद विजापूरची राजकन्या आयेशा बीबीने १६५९ साली बांधली. या राजकन्येला मक्केला तीर्थयात्रेला जायचं होतं सोबत वीस हजार स्वार आणि पंधरा लाखांची रोकड घेऊन ती दाभोळ बंदरात आली होती पण वादळी हवामान असल्याने मक्केला जाण्याचा बेत तिला रद्द करावा लागला. या घटनेने आयेशा बीबी अस्वस्थ झाली आणि तिनं धर्मगुरूंचं मार्गदर्शन घेतलं. तिच्यासोबत आलेल्या काझींनी तिला धार्मिक कार्यासाठी दानधर्म करण्याचा सल्ला दिला म्हणून तिने ही मशीद बांधली. ही मशीद विजापूरच्या मशिदीची प्रतिकृती आहे असं म्हटलं जातं.
दाभोळ हे पूर्वीपासून ऐतिहासिक बंदर होतं. विजापूरकरांचा या दाभोळ बंदरातूनच विदेशात व्यापार चालत असे. इ. स. १६५९ मध्ये अफजलखान शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा दाभोळ बंदरात त्याने तीन भरलेली जहाजे ठेवलेली होती. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा वध केल्यानंतर महाराजांनी दोरोजीस कोकणात पाठवलं. दोरोजी येत आहे असं समजताच दाभोळचा सुभेदार महमूद शरीफ तिनही गलबतं घेऊन इंग्रजांच्या आश्रयास राजापूरला गेला. जहाजं मिळाली नाहीत म्हणून मराठ्यांनी आदिलशाही दाभोळ लुटलं. इ. स. १६६१ मधे मराठ्यांनी दाभोळची जाळपोळ केली. फेब्रुवारी १६६१ मध्ये स्वतः महाराज तान्हाजी मालुसरे, पिलाजी नीलकंठराव सरनाईक, त्र्यंबक भास्कर वगैरे सरदारांना घेऊन दाभोळला आले. महाराजांनी दाभोळ ताब्यात घेऊन दोन हजार फौज व अधिकारी नेमून आपला मोर्चा चिपळूणकडे वळवला.
इ.स. १६६० मध्ये 'थेवेनॉट' हा युरोपिअन प्रवासी दाभोळचे वर्णन जुने ठेंगण्या घरांचे व काही तटबंदी असलेले शहर असे करतो. इ.स. १६७० मध्ये 'फादर नवराईट' म्हणतो की, शिवाजी महाराजांचा येथे भक्कम व सुंदर किल्ला आहे. तर इ.स. १६७० मध्येच 'ओगिल्बी' असं म्हणतो की, "पूर्वी दाभोळ हे खूप प्रसिद्ध गांव होते, लढायांमुळे आता ते बरेच उध्वस्त झाले आहे आणि त्याचा व्यापारही कमी झाला आहे. त्याला प्रवेशासाठी फक्त दक्षिणेकडून नदीकडून मार्ग असून समोरचं दोन युद्ध–बुरुजांवर संरक्षणासाठी चार लोखंडी तोफा तैनात केलेल्या आहेत." मग सध्या हा दाभोळचा किल्ला आहेतरी कुठे? तर तो वसला आहे सड्यावरच्या चंडिकादेवी मंदिरापासून ते खाडीपर्यंत.
दाभोळ बंदरापासून घाट चढून 'चंडिकादेवी' मंदिरात पोहोचलो. मंदिरात जाण्यासाठी दाभोळ किल्ल्याची तटबंदी फोडूनच रस्ता तयार केला आहे. मंदिराच्या पार्कींगमधे गाडी लावली आणि दर्शन घेतलं. चंडिकादेवी हे एक गुहा मंदिर आहे. मंदिराबाहेर बसून मस्तपैकी कोकम सरबत प्यायलं आणि गडफेरीला निघालो. सध्या हा सगळा भाग खाजगी मालमत्ता आहे. संपूर्ण किल्ल्यात आंब्यांची बाग आहे. मंदिरात शिरताना डाव्या बाजूच्या तटबंदीला सरळ रेषेत आठ बुरूज आहेत. तटबंदीबाहेर खंदकाच्या पुसटशा खुणाही दिसून येतात. शेवटच्या बुरूजानंतर तटबंदी वळते आणि सरळ खाडीच्या दिशेने उतरत जाते. या सगळ्या परिसरात घराची जोती, पाण्याच्या विहिरी, दरवाजे वगैरे गोष्टी नक्कीच असू शकतात. ही संपूर्ण जागा खाजगी असल्यामुळं फार काही फिरता आलं नाही. जेवढं शक्य झालं तेवढं फिरलो, फोटो घेतले आणि गाडीपाशी परतलो.
दुपारचे जवळजवळ तीन वाजत आले होते त्यामुळं आता लोकमान्य टिळकांचं चिखलगाव, पर्णालकदुर्ग किंवा पद्मनाभदुर्ग, पन्हाळेकाजीच्या लेण्या, उन्हावरेची गरम पाण्याची कुंडे पाहता येणार नव्हती. बराच उशीर झाला होता त्यामुळं बुरोंडी, लाडघर, मुरूड, सालदुरेमार्गे थेट हर्णे बंदर गाठायचाच निर्णय घेतला. कोकणात आल्यावर दररोज मोदक खायलाच हवेत. नाही म्हणून कसं जमेल? त्यामुळं हर्णेला जाताना वाटेत मुरूडला जितेंद्रने मोदक सांगून ठेवले होते त्यावर ताव मारूनच हर्णे बंदर गाठलं.
हर्णे बंदरावर गाडी लावली. सुवर्णदुर्गात घेऊन जायला बोटवाल्याला आगाऊ सांगून ठेवल्यामुळं तो तयारच होता. गाडी लॉक करून थेट बोटीत जाऊन बसलो आणि पुढच्या अर्ध्या तासात गडाच्या प्रवेशद्वारापाशी पायउतार झालो.
दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलंय. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली दिसून येते. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून गडफेरी मारताना विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात.
दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत. हल्लीच बांधलेलं एक मंदिर दिसून येतं. इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार होन खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत संदर्भ मिळतो. कान्होजी आंग्रेंच्या कर्तृत्वाची सुरूवात या किल्ल्यापासून झाली. कोणत्याही महत्वाच्या किल्ल्यांना जसे दुर्गपुंज दिसून येतात तसेच हर्णे बंदरावर सुवर्णदुर्गाचा दुर्गपुंज (Fort Clusters) कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागडाच्या रूपाने आपल्याला दिसून येतो. असेच दुर्गपुंज कुलाबा किल्ल्याला आणि सिंधूदुर्गालाही दिसून येतात.
सुवर्णदुर्ग पाहून हर्णे बंदरावर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते त्यामुळं आता सुवर्णदुर्गाचा दुर्गपुंज पाहणं काही शक्य होणार नव्हतं. त्यामुळं परतीचा प्रवासाला सुरूवात केली ती या ट्रेकमधे वेळेअभावी पाहता न आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं परत येऊन पाहण्यासाठीच.
कोकण म्हणजे फक्त समुद्रकिनारे, मोदक, मासे आणि माडी नाही तर ती एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची खाण आहे फक्त आपण 'भटके' असल्यामुळे आपली भटकंती काहीशी वैविध्यपूर्ण आणि डोळस हवी. एक ट्रेकर असलो तरी किल्ल्यांसोबत सिंहनाद येणारी आणि वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती असलेली मंदिरं, देवराया, स्मारकं गरम पाण्याची कुंडं वगैरे आपण पहायला हवीत. या आणि अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पहायला कोकण बोलावतंय.
'येवा कोकण आपलोच असा!'
🚩 फोटो -
१) फाल्कन्स
२) गुगल
🚩 संदर्भ -
१) विकीपिडीया
॥ लेखनसीमा ॥
🚩 ट्रेकभिडू -
१) नेताजी भंडारे
२) शिवाजी शिंदे
३) जितेंद्र भोसले
४) दिलीप वाटवे
५) अमोल पाटील
६) दत्ता चौधरी
७) विनायक गाताडे
८) संदिप बेडकुते
९) प्रताप नामदे
१०) अनिल सवाने
११) मिलिंद गडदे
१२) जितेंद्र परदेशी
१३) अर्जुन ननावरे
१४) रवी जाधव
१५) मधुकर थोरात
१६) शरद बोडागे
१७) अमित पवार
१८) चंद्रशेखर आपटे
उत्कृष्ट प्रवास वर्णन..अशी अनेक ठिकाणे आहेत, जी सहसा कोणाच्या बघण्यात येत नाहीत, दुर्लक्षित आहे पण त्यांच ऐतिहासिक, भौगोलिक महत्व खुप आहे. पुढच्या वेळेस नक्की बघु या.
उत्तर द्याहटवाखूप छान लेख दादा , संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला, फोटोज व्हिडिओ यामुळे जिवंतपणा आला आहे
उत्तर द्याहटवाNicely written and nice photos
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा