"समग्र हरिश्चंद्रगड"
'पाच दिवस पंचवीस वाटा'
'पूर्वरंग'
लेखाचं शीर्षक वाचल्यावर बहुतेक जणांच्या भुवया उंचावल्या असतील आणि मनात पहिला प्रश्न हाच आला असेल की खरंच हरिश्चंद्रगडाला पंचवीस वाटा आहेत का? आणि जर असतीलच तर त्या कोणत्या? बरं एवढया वाटा त्याही फक्त पाच दिवसांत करणं खरंच शक्य आहे का? या ट्रेकसाठी वाटाड्याची गरज आहे का? या वाटा करण्यासाठी काही सुरक्षासाधनं लागतात का? कोणत्या वाटा चढाईस सोप्या आहेत आणि कोणत्या वाटा उतराईस? आपल्याला जर त्या करायच्या असतील तर करता येतील का? आणि वाटांचा क्रम कसा असला म्हणजे कमीतकमी चालीत त्या करता येतील?
या आणि अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी या ट्रेकसाठी लिहिलेले दोन भाग नक्की वाचायला हवेत. पूर्वरंगात 'ट्रेक प्लॅनिंग' कसं केलं याबद्दल उहापोह केला आहे तर आख्यानात प्रत्यक्ष 'ट्रेक एकझिक्युट' कसा केला ते दिलेलं आहे. खरंतर एवढ्या मोठ्या ट्रेकची हकिकत एकाच भागात बसवून सगळ्याच गोष्टींना योग्य न्याय देता आला नसता त्यामुळं हरिश्चंद्रगडाचं समग्र आख्यान दोन भागात सांगितलं आहे.
चला, तर मग करूया पूर्वरंगाला सुरूवात?
🚩 अ) हरिश्चंद्रगडाचे भौगोलिक स्थान आणि महत्त्व...
हरिश्चंद्रगड पाहिलेला नाही असा ट्रेकर शोधून सापडायचा नाही त्यामुळं हरिश्चंद्रगड म्हटल्याबरोबर चटकन तुमच्या नजरेसमोर उंचचउंच डोंगरावर वसलेल्या हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, बालेकिल्ला, तारामती, रोहिदास वगैरे शिखरे येतील पण हा हरिश्चंद्रगड ज्या डोंगरावर वसलेला आहे ते डोंगर आहेत तरी कोणते? त्याला काही विशिष्ट नावे आहेत का?
...तर नक्कीच आहेत आणि ती माहिती करून घ्यायची असेल किंवा हरिश्चंद्रगडाच्या भौगोलिक स्थानाची माहिती करून घ्यायची असेल तर सुरवातीला आपल्याला हरिश्चंद्रगड ज्या डोंगररांगांवर वसलेला आहे त्याची थोडीशी ओळख करून घ्यावी लागेल. चला तर मग आपण या डोंगररांगांची थोडक्यात ओळख करून घेऊ.
🚩 पश्चिम घाट --
पश्चिम घाट हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या तापी नदीपासुन दक्षिणेस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यात पसरलेला आहे. याची दक्षिणोत्तर लांबी जवळजवळ १६०० किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहे. याचे दक्षिणेकडील शेवटचे ठिकाण कन्याकुमारी येथे आहे. पश्चिम घाटाला महाराष्ट्रात सह्याद्री, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे निलगिरी किंवा पालघाट तर केरळमधे अनैमलै असं म्हटलं जातं.
🚩 सह्याद्री --
महाराष्ट्राचा विचार करता तापी नदीपासुन तिलारी नदीपर्यंत दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेमुळे कोकण, घाटमाथा आणि देश किंवा सह्यपठार असे तीन भौगोलीक विभाग पडलेले दिसुन येतात. कोकणातून पूर्वेकडे पाहिले तर सह्याद्रीची मुख्यरांग साधारणपणे सातशे ते हजार मीटर्सपर्यंत उठावलेली दिसून येते. घाटमाथ्याच्या बाजुला असणाऱ्या दोन भागातल्या उंचीतल्या फरकामुळे जडणघडणीत वैविध्य पाहवयास मिळते.
अशा या दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेला काटकोनात म्हणजे पुर्व-पश्चिम उपफाटे वा उपरांगा जोडलेल्या आहेत. त्यांची शैलबारी-डौलबारी, सातमाळ-अजिंठा, त्र्यंबक, कळसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र-बालाघाट, भुलेश्वर, महादेव, कोळेश्वर आणि महाबळेश्वर वगैरे फारच सुरेख नावे आहेत. फक्त चार डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर आहेत त्या म्हणजे घाटमाथ्यावरच्या भाडळी-कुंडल आणि दातेगड रांगा तर कोकणात असलेल्या माथेरान आणि महिपतगड रांगा. या सर्व रांगा नद्यांची खोरी विभागतात.
आपल्या या लेखाचा 'नायक' असलेला हरिश्चंद्रगड हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर आणि अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची १४२२ मीटर्स म्हणजे ४६६५ फूट आहे. या हरिश्चंद्रगडापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे पसरलेली आहे तिला हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग असं म्हटलं जातं. ही डोंगररांग पुष्पावती आणि मुळा नद्यांची खोरी विभागते.
जीवधन या किल्ल्याची निर्मिती जशी नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली तशीच हरिश्चंद्रगडाची निर्मिती पुष्पावती नदीच्या खोऱ्यात चढून येणाऱ्या माळशेज घाटाच्या आणि मुळा नदीच्या खोऱ्यात चढून येणाऱ्या सादडे घाटाच्या संरक्षणासाठी केली गेली. सामरिक दृष्टीनं अतिशय मोक्याच्या जागी असणाऱ्या या किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात मिळतो.
🚩 आ) इतिहास --
हरिश्चंद्रगडाला दोन-चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी महादेव कोळी या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी जिंकला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मोगलांकडून मराठ्यांनी जिंकून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे हे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील होते. शेवटच्या इंग्रज-मराठे युद्धात म्हणजे १८१८ मध्ये इतर किल्ल्यांसोबतच हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी गडावरील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला गेला आहे. गडावर सुमारे बाराव्या शतकापेक्षा जुने असे शालिवाहन काळातील 'हरिश्चंद्रेश्वर' नावाचे शिवमंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते आणि मुळेला मिळते. गडाच्या दक्षिण बाजुने पुष्पावती व काळू या दोन नद्यांचा उगम होतो. पैकी काळू नदी कोकणात उडी घेऊन पुढे उल्हास नदीला जाऊन मिळते तर पुष्पावती पुढे जाऊन कुकडीला. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी 'तत्त्वसार' नावाचा ग्रंथ लिहिला. मंदिराच्या जवळच काही लेण्या आहेत. त्यातल्याच एका गणेश लेण्यात 'तांत्रिक गणेश' दिसून येतो. यालाच संस्कृतमधे 'उच्छिष्ट-गणपति' म्हणजे 'उच्च गणपति' असं म्हटलं जातं. गणपतीची मूर्ती नीट पाहिली की लक्षात येईल की याला लिंग आहे. अशा प्रकारचे गणपती खूपच कमी ठिकाणी पहायला मिळतात.
🚩 इ) ट्रेक कल्पना --
शुद्ध, प्रामाणिक, निष्कलंक, स्वच्छंद आणि हल्लीच्या व्यवसायीकरणाची व्याधी न जडलेलं गिर्यारोहण करणाऱ्या संस्थांच्या नावात 'पुणे व्हेंचरर्स' हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. याच पुणे व्हेंचरर्सच्या संस्कारात वाढलेल्या आम्ही फाल्कन्सनी देखील तोच ध्यास घेतलाय. मागील काही वर्षात आम्ही अनवट आणि अपरिचित अशा घाटवाटांच्या शोधमोहिमा, रायरेश्वर ते प्रतापगड, सिंहगड ते उमरठ, भीमाशंकर ते माळशेज अशा एकापेक्षा एक चाकोरी बाहेरील मोहीमांमधून पारंपारिक भटकंतीला फाटा देत भटकंतीचा वेगळा पैलू समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील चाकोरीबाहेरचं काहीतरी करावं असा विचार करून आणखी एका साहसपूर्ण मोहीमेसाठी गेल्या वर्षापासूनच आमची शोधमोहीम सुरू झाली होती. बऱ्याच खलबतांनंतर शोधमोहीमेची सुई शेवटी तमाम ट्रेकर्स मंडळींच्या लाडक्या हरिश्चंद्रगडावर एकदाची स्थिरावली. खरंतर याची तयारी गेल्या वर्षी जानेवारी २०२१ साली एका दिवसात केलेल्या हरिश्चंद्रगडाच्या प्रदक्षिणेच्या ट्रेकपासूनच सुरू झाली होती. पावसाळा संपल्यानंतर डिसेंबरपर्यंत जंबोट्रेक करण्यासाठी सर्वात चांगला सीझन असल्यामुळं आम्ही फाल्कन्सही डिसेंबरमधेच जंबोट्रेक करतो पण गेल्यावर्षी जुलै महिन्यात श्रीखंड महादेवची (१८७०० फूट) हिमालयीन मोहीम झाल्यामुळं बऱ्याच जणांच्या जवळपास सगळ्या सुट्या संपल्या होत्या त्यामुळं नवीन सुट्या मिळाल्यावर यावर्षी आम्हाला जंबोट्रेक जानेवारीत करावा लागणार होता. अर्थात जानेवारीतही फार उशीर न करता दुसऱ्याच आठवड्यात म्हणजे ०८ ते १२ तारखेला तो करायचं आम्ही ठरवलं होतं. सध्याच्या परिस्थितीत हरिश्चंद्रगडाच्या वापरात असलेल्या पंचवीस वाटांचा जंबोट्रेक तोही सलग पाच दिवसांत पूर्ण करायच्या म्हणजेही एक अवघड टास्क होता. पण असं केल्यामुळं आम्हा फाल्कन्सची नवीन वर्षाच्या ट्रेक्सची सुरूवात मात्र धडाक्यात होणार होती. दोनचार गडवाटांचा अपवाद वगळता तुकड्यातुकड्याने बहुतेक सर्व वाटा आम्हा फाल्कन्सच्या झाल्या होत्याच पण यावेळी त्या एकाच दमात करायचं आम्हा फाल्कन्सचं गेल्या वर्षीपासूनच मनात होतं. वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार होतं.
🚩 ई) ट्रेक प्लॅनिंग --
फक्त पाच दिवसांत पंचवीस वाटा करायच्या म्हणजे ट्रेक प्लॅनिंगही तगडं करावं लागणार होतं. सगळ्या शक्यता गृहीत धराव्या लागणार होत्या. प्रत्येक वाटेला, प्रत्येक ठिकाणी 'Plan B' तयार ठेवावा लागणार होता. प्लॅनिंग थोडं जरी चुकलं तरी पुढचं सगळं प्लॅनिंग फिसकटणार होतं आणि त्यामुळं आम्हाला काही वाटा सोडाव्या देखील लागणार होत्या. ट्रेक प्लॅनिंग करताना ट्रेक प्लॅनरचा भूगोल अतिशय पक्का असावा लागतो. या ट्रेकआधी हरिश्चंद्रगडाच्या भरपूर फेऱ्या झाल्यामुळं हरिश्चंद्रगडाच्या भूगोलाचा थोडाफार अंदाज होताच.
हरिश्चंद्रगडाच्या वाटांची आम्ही भौगोलिक परिस्थितीनुसार एकूण सहा भागात विभागणी केली होती. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हरिश्चंद्रगडाच्या परिघात वसलेल्या एकूण सहा गावातून गडावर वेगवेगळ्या ठिकाणी वाटा चढून येतात. या सहा गावात कोकणातील बैलपाडा आणि थितबी किंवा वाघ्याची वाडी अशी काही गावं देखील होती. कोकणातल्या गडपायथ्याच्या गावातून घाटमाथ्यावर असलेल्या गडावर चढून यायचं असल्यामुळं साहजिकच या वाटा लांबलचक, कठीण आणि ट्रेकर्सचा कस पाहणाऱ्या होत्या आणि आमच्या दृष्टीने त्यांनाच आम्हाला जास्त वेळ लागणार होता. एकूणच गडावर चढून येणाऱ्या वाटांनी चढून येताना किंवा आल्यावर गडावर कोणत्या भागात जायचं आहे त्यानुसार एका किंवा दोन वाटांचा वापर करता येऊ शकतो. थोडक्यात जशा एकच नाव असलेल्या जशा काही वाटा थेट गडावर चढून येतात तशाच काही वाटांना गडावर येताना किंवा आल्यावर दोन किंवा तीन फाटे फुटतात, ज्या वाटांनी गडावर आपल्याला इच्छित स्थळी जाता येतं. साहजिकच या प्रत्येक फाट्याला देखील वेगवेगळी नावं आहेत.
अगदी शिवकाळापासून आपण पाहतो आहोत की कोणतंही प्लॅनिंग हे inputs वर ठरतं. हेरखात्याने दिलेल्या inputs वर महाराजांनी कल्पनातीत योजनांची आखणी केली आणि त्या तडीसही नेल्या. आमचं ट्रेक प्लॅनिंगही सुद्धा याच धर्तीवर आधारलेलं होतं. त्या त्या भागातल्या स्थानिकांना तो तो भाग चांगला परिचयाचा असतो त्यामुळं आम्ही त्या त्या भागातल्या मंडळींशी बोलून त्यांच्याकडून inputs घेऊन आमचं प्लॅनिंग केलं होतं. या inputs साठी आम्हाला लव्हाळीचे बाळू भांबळे, पाचनईचा ज्ञानेश्वर बादड यांची खूपच मदत झाली. आम्हा फाल्कन्सच्या दृष्टीने ही मंडळी आमच्यासाठी 'बहीर्जी नाईक' झाली होती. बाकी कोकणातल्या घाटवाटा आम्ही बैलपाड्याच्या मनोज खाकरबरोबर बरेचदा केल्यामुळं आम्हाला जवळजवळ त्या सगळ्या तोंडपाठच होत्या.
हरिश्चंद्रगडाच्या वाटांच्या ट्रेकचं प्लॕनिंग करताना बहुतेक सर्व वाटा एकाच ट्रेकमधे अंतर्भूत करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता पण गडाचा विस्तारच इतका मोठा आहे की सगळ्याच वाटांची पायथ्याच्या गावातून सुरूवात करणं मात्र आम्हाला काही शक्य होणार नव्हतं. त्यासाठी अर्थातच या सर्व वाटा पायथ्याशी असलेल्या गावातून टप्प्या-टप्प्याने कराव्या लागल्या असत्या आणि आम्हाला ते पाच दिवसांत काही शक्य झालं नसतं. तसं करायचं तर त्याला वेगळ्या प्लॕनिंगची गरज होती. या ट्रेकमधे गडावर चढून येणाऱ्या वाटाच आम्ही करायच्या ठरवल्यामुळं गडावरची ठिकाणं पाहण्याच्या म्हणजे गडदर्शनाच्या वाटा जसं बालेकिल्ला, तारामती, कोकणकडा, आडराई, रोहिदास यात अंतर्भूत केलेल्या नव्हत्या. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या सर्वच वाटा काही गडाच्या मूळ वाटा नाहीत कारण एवढया वाटा असणारा किल्ला हा 'बेलाग' कधीच असूच शकत नाही त्यामुळं या पंचवीस वाटांपैकी बहुतांशी वाटा ह्या स्थानिकांनी त्यांच्या सोयीसाठी नवीनच बनविलेल्या आहेत. ज्या वाटांवर त्या 'पुरातन वाटा' किंवा 'प्राचीन वाटा' असल्याच्या खुणा दिसून येतात अशा वाटा मोजक्याच आहेत. अर्थात हे माहित असूनही सध्याच्या परिस्थितीत जेवढ्या वाटांनी गडावर चढून जाता येतं त्या सर्वच वाटांचा मागोवा घ्यायचं आम्ही ठरवलं होतं.
🚩 ई - १) एकूण वाटा आणि त्यांचे स्थान --
वर म्हटल्याप्रमाणे गडाखाली वसलेल्या एकूण सहा गावातून गडावर वेगवेगळ्या ठिकाणी वाटा चढून येतात. त्यांचे असे विभाग आम्ही पाडले होते.
🚩१) खिरेश्वर - एकूण वाटा दोन
१) तोलार खिंडीची वाट
२) जुन्नर दरवाज्याची वाट
🚩 २) लव्हाळी - एकूण वाटा सहा
१) तटाची किंवा कडेलोटाची वाट
२) गणपतीची वाट
३) राजवाट किंवा दरवाज्याची वाट
४) पायराची वाट
५) गवळ्याची नळी
६) वेताळधार ऊर्फ त्रिंबकसोंड
🚩 ३) पाचनई - एकूण वाटा सहा
१) थनरगडी
२) देवाची वाट
३) कपारीची वाट
४) सातपायरी/साठपायरी?
५) कोकणकड्याची वाट
६) गायवाट
🚩 ४) पेठेची वाडी - एकूण वाटा तीन
१) बैलघाट
२) परिचितराईची वाट
३) बेटाची नळी
🚩 ५) बैलपाडा ऊर्फ वालिव्हरे - एकूण वाटा चार
१) करपदरा
२) सादडे घाट
३) नळीची वाट
४) माकडनाळ
🚩 ६) वाघ्याची वाडी किंवा थितबी - एकूण वाटा चार
१) थितबीची नाळ ऊर्फ रोहिदास घळ
२) तवली
३) खुर्द्याचा दरा/खुर्द्याची धार
४) तारामती घळ
या ट्रेकची सुरूवात आम्ही खिरेश्वरहून तोलार खिंडीच्या वाटेने चढाई करून शेवट खिरेश्वरच्याच जुन्नर दरवाज्याच्या वाटेने उतराई करुन करणार होतो. आम्ही केलेल्या प्लॅनिंगमधे बेटाची नळी वगळता कोणतीही वाट दोनदा करावी लागणार नव्हती. वाटांचा क्रम मुद्दामच counter clockwise म्हणजे घडाळ्याच्या काट्याच्या उलट ठेवला होता. अर्थात हे असं करायचं आम्ही का ठरवलं होतं याचं कारण पुढच्या लेखात येईलच.
सध्याच्या परिस्थितीत हरिश्चंद्रगडावर चढून येणाऱ्या वाटांचीच नावे वर दिलेली आहेत आणि तेवढ्याच वाटा आम्ही या ट्रेकमधे करणार होतो. वर दिलेल्या पंचवीस वाटांशिवाय हरिश्चंद्रगडाच्या जवळच असलेल्या 'जवारीची नाळ', 'गोधनीची वाट' आणि 'माशाचा लोळ' या कोकणातून चढून येणाऱ्या 'घाटवाटा' सध्या वापरात नसल्यामुळे पूर्णपणे मोडल्या आहेत त्यामुळं त्या वाटा मुद्दामच वरील यादीत दिलेल्या नाहीत. अर्थात या ट्रेकच्या अगोदर आम्ही केल्या आहेतच पण या तिन्ही वाटांवर तांत्रिक चढाई किंवा उतराईच करावी लागते त्यामुळं सद्य परिस्थितीत त्याला हरिश्चंद्रगडाच्या 'वाटा' संबोधणं चुकीचं ठरेल. अर्थात या वाटा कुणाला करायच्या असतीलच तर त्याची इत्यंभूत माहिती मी वैयक्तिकरित्या नक्कीच देऊ शकतो.
हरिश्चंद्रगडाच्या दक्षिणेस असलेल्या 'चोरदरा' आणि 'गणपती घाट' या दोन घाटवाटा सुध्दा हरिश्चंद्रगडापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत पण या घाटवाटांचं प्रयोजन हरिश्चंद्रगडासाठी नसल्यामुळं त्यांनाही 'हरिश्चंद्रगडाच्या वाटा' नक्कीच म्हणता येणार नाही. त्यामुळे त्या वाटांचाही आम्ही आमच्या हरिश्चंद्रगडाच्या वाटांच्या ट्रेकमधे मुद्दामच समावेश केलेला नव्हता.
🚩 ई - २) वाटांचा क्रम --
ट्रेक प्लॕनिंग करत असताना वाटांचा योग्य क्रम ठरवणं अतिशय महत्त्वाचं असतं. कोणत्या वाटांनी चढाई करणं सोपं होईल आणि कोणत्या वाटांनी उतराई करणं सोपं पडेल याचं गणित ट्रेक प्लॅनिंग करताना मांडता यायला हवं. शेवटी प्रत्येक ट्रेक लिडरला किंवा ट्रेक प्लॅनरला त्याच्या टिमची strength, weaknesses आणि मर्यादा माहिती असल्या पाहिजेत. ट्रेकचं यशापयश बरचसं या प्लॅनिंगवरच अवलंबून असतं. या ट्रेकच्या वाटांचा क्रम आणि वाटांची चढाई-उतराईचं प्लॅनिंग आम्ही खाली दिलेल्या प्रकारे केलं होतं.
⬆️ - चढाई
⬇️ - उतराई
🚩 दिवस पहिला, खिरेश्वर सुरूवात
(१) लव्हाळीकडील वाटा
१) तोलार खिंड (खिरेश्वर) ⬆️
२) कडेलोटाची/तटाची वाट ⬇️
३) गणपतीची वाट ⬆️
४) राजवाट/दरवाजाची वाट ⬇️
५) पायराची वाट ⬆️
६) गवळ्याची नळी ⬇️
७) वेताळधार ⬆️
मुक्काम - वेताळाजवळ किंवा वेताळधारेवरच्या पाण्याच्या टाक्याजवळ.
🚩 दिवस दुसरा
(२) पाचनईकडील वाटा
८) थनरगडी ⬇️
९) देवाची वाट ⬆️
१०) कपारीची वाट ⬇️
११) सातपायरी ⬆️
१२) कोकणकड्याची वाट ⬇️
१३) गायवाट ⬆️
(३) पेठेच्या वाडीकडील वाटा
१४) बैलघाट ⬇️
१५) प्रचितराई ⬆️
मुक्काम - कोकणकड्याखालच्या माळावर जिथे बेटाची नळी आणि प्रचितराईच्या वाटा वेगळ्या होतात.
🚩 दिवस तिसरा
(४) बैलपाड्याकडील वाटा
१६) बेटाची नळी ⬇️
१७) सादडे घाट ⬇️
१८) करपदरा ⬆️
#) बेटाची नळी ⬆️
१९) नळीची वाट ⬇️
मुक्काम - नळीची वाट आणि माकडनाळेच्या वाटा जिथे वेगळ्या होतात.
🚩 दिवस चौथा
(५) थितबीकडील वाटा
२०) माकडनाळ ⬆️
२१) रोहिदास घळ ⬇️
२२) तवली ⬆️
२३) खुर्द्याचा दरा ⬇️
मुक्काम - पाण्याचं ठिकाण पाहून तारामती घळीतून आलेल्या ओढ्यात.
🚩 दिवस पाचवा
२४) तारामती घळ ⬆️
२५) जुन्नर दरवाज्याची वाट ⬇️
खिरेश्वरला ट्रेक संपेल
🚩 ई - ३) सुरक्षा साधनं --
कोकणातून चढून येणाऱ्या वाटा जसं नळीची वाट किंवा माकडनाळेच्या वाटेवर ज्या सुरक्षा साधनांचा उपयोग करावा लागणार होता तीच सुरक्षा साधनं आम्हाला इतर वाटांवरही पुरेशी ठरणार होती. बाळू भांबळे, ज्ञानेश्वर बादड आणि मनोज खाकर यांच्याबरोबर बोलून त्याची खात्री देखील करून घेतली होती. आम्हा फाल्कन्सकडे स्वतःची पुरेशी अशी सुरक्षा साधनं असल्यामुळं त्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याचा प्रश्नच येणार नव्हता. ट्रेकला निघण्यापूर्वी ती सगळी तपासून सॅकमधे भरून देखील ठेवली होती.
🚩 ई - ४) वाटाडे --
वर दिलेल्या वाटांपैकी लव्हाळीकडील वाटा आमच्या कुणाच्या झालेल्या नव्हत्या. साहजिकच त्या वाटासाठी वाटाड्याची गरज पडणार होती. त्यासाठी आम्ही बाळू भांबळेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होतो पण लव्हाळीत कोणत्याच ऑपरेटरचं नेटवर्क नसल्यामुळं मोठी पंचाईत होत होती. यावर उपाय म्हणून आम्ही पाचनईच्या किरण भारमलला बाळू भांबळेच्या संपर्कात रहायला सांगितलं होतं. किरण भारमल पाचनईवरून लव्हाळीला मोटरसायकलवरून जात असे आणि नेटवर्क असलेल्या ठिकाणी बाळू भांबळेला घेऊन जाऊन त्याच्या फोनवरून आमच्याशी बोलणं करून देत असे. खरंतर हे सगळं उरफाटं काम होत होतं पण असं करण्याशिवाय आमच्याकडे पर्यायदेखील नव्हता. बाकी खिरेश्वर, पाचनई, पेठेची वाडी, बैलपाडा आणि वाघ्याची वाडी कडील सगळ्या वाटा आधी केलेल्या असल्यामुळं परिचयाच्या होत्या त्यामुळं तिथं वाटाड्याची गरज भासणार नव्हती.
या ट्रेकमधे आम्ही वाटाड्याच्या बाबतीत एक नवीन प्रयोग करणार होतो. बैलपाड्याचा मनोज खाकर आमचा खूप जूना वाटाड्या. आम्ही मनोजबरोबर कुमशेतच्या उंबरदारपासून ते भोरांड्याच्या दारापर्यंतच्या २१ घाटवाटा केल्या आहेत. शिवाय त्याच परिसरातल्या आडबाजूच्या बऱ्याच उलट्यासुलट्या वाटा वर्षानुवर्ष त्याच्यासोबत फिरून केल्यामुळं त्याच्याशी एक घट्टं नातं तयार झालंय. अगदी इतकं की कधीही उठावं आणि मनोजच्या घरी मुक्कामाला जावं. आता तर त्याच्या नात्यातल्या लग्नाची आमंत्रणंही आम्हाला सगळ्यांना यायला लागली आहेत. त्याच्यासोबत घरगूती नातं तयार झाल्यामुळं तोही आता फाल्कन्सचाच एक मेंबर झालाय. या ट्रेकच्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्याला मुद्दामच आमच्यासोबत घेणार होतो त्यामुळं हरिश्चंद्रगडाच्या सगळ्या पंचवीस वाटा माहिती असलेला एक वाटाड्या आपोआपच तयार होणार होता. हरिश्चंद्रगडाच्या पंचवीस वाटांचा ट्रेक समजा कुणाला करायचा असेल तेव्हा आम्हाला बाळू भांबळेच्या बाबतीत ज्या अडचणींचा सामना करावा लागला तो नंतर कुणाला करावा लागू नये हीच त्यामागची भावना होती.
🚩 ई - ५) मुक्कामाच्या आणि जेवणाच्या सोयी --
पहिल्या दिवसाचा नाश्ता आणि जेवणाचा आम्ही घरून डबाच नेणार होतो पण रात्रीच्या जेवणासाठी पाचनईच्या किरण भारमलला सांगितलं होतं. लव्हाळी, पाचनई आणि पेठेची वाडी ही सगळी गावं घाटमाथ्यावरच्या पाचनईच्या पठारावर आहेत त्यामुळं या सर्व ठिकाणाच्या मुक्कामाच्या, जेवणाच्या सोयी पाचनईचा किरणच करणार होता. आम्ही नळीच्या वाटेने बैलपाड्याला निघून जाईपर्यंत तो मोबाईलवर दिवसभर आमच्याशी संपर्कात राहणार होता आणि आमच्या सोयीने रात्रीच्या मुक्कामाच्या, जेवणाच्या सोयी करणार होता. या संपूर्ण ट्रेकमधे आम्ही पाचही दिवस ब्रंच करणार होतो. असं केल्यामुळं आमचा दिवसभरातला बराच वेळ वाचणार होता. अर्थात शारीरिक झीज भरून काढण्यासाठी खजूर, ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे, फरसाण, बाकरवडी, बिस्कीटे, चिक्की सोबत होतंच. नळीच्या वाटेने बैलपाड्याला गेल्यावर आणि वाघ्याच्या वाडीला पोहोचल्यावर मात्र तिथल्या मुक्कामाच्या, जेवणाच्या सोयी मनोज करणार होता.
🚩 ई - ६) संघ निवड --
जंबो ट्रेकचा तारखा निश्चित झाल्या आणि फाल्कन्सच्या Whatsapp Group वर तसा मेसेज टाकला पण हा ट्रेक अतिशय अवघड आणि खडतर प्रकारातला होता. साहजिकच या ट्रेकची difficulty level high असणार होती आणि भले फाल्कन्स चालायला भक्कम असले तरी सरसकट कुणालाही ट्रेकला घेऊन जाता येणार नव्हतं. फक्त शारीरिक नाही तर मानसिक तंदुरूस्ती पारखूनच सोबत्यांची निवड करावी लागणार होती. फाल्कन्सच्या कोअर टीमने वर्षभरात झालेल्या ट्रेकमधे पारखलेल्या फाल्कन्सनाच ट्रेकसाठी संधी मिळणार होती त्यामुळं कोअर कमिटीतर्फे वैयक्तिक रित्या फोन करुनच सोबती निवडले गेले हे वेगळं सांगायला नको.
सगळं प्लॅनिंग अगदी व्यवस्थित होत होतं आणि ते जसजसं होत होतं तसतसं ग्रूपवर त्याचे अपडेट्सही दिले जात होते. याशिवाय सहकाऱ्यांना एकत्र जमवून प्रत्यक्ष दोनतीन मिटिंस पण झाल्या होत्या. पूर्ण प्लॅनिंग झाल्यावर शेवटच्या मिटींगमधे सगळ्यांना झालेली तयारी आणि जबाबदाऱ्या सांगून त्यावर शेवटचा हातही फिरवून झाला होता. आता सर्वजण ट्रेकला निघण्याच्या दिवसाची म्हणजे ०७ जानेवारीची एखाद्या चातकाप्रमाणे वाट पहात होते...
क्रमशः
🚩🚩🚩
🚩 ट्रेक पूर्णत्वास कसा गेला याचं इत्यंभूत वर्णन असलेला पुढील भाग या धाग्यावर टिचकी मारून वाचता येईल.
फाल्कन ट्रेकर्स ग्रुपच्या कारकीर्दीत मैलाचा दगड ठरणाऱ्या सगग्र हरिश्चंद्रगड या ट्रेकचे वर्णनही असेच उत्कृष्ट व्हायला पाहीजे.आसे वर्णन वाचून कुणालाही हा ट्रेक करण्याचा मोह व्हावा.
उत्तर द्याहटवा