"समग्र हरिश्चंद्रगड"
'पाच दिवस पंचवीस वाटा'
'आख्यान'
आम्ही सर्वजण ज्या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पहात होतो तो ट्रेकला निघण्याचा दिवस म्हणजे ०७ जानेवारी अखेर उजाडला. आमच्या बहुतेक सगळ्या मंडळींना फक्त रविवारची सुट्टी असते म्हणून शक्यतो आम्ही शुक्रवारी रात्री निघून शनिवार-रविवार असं ट्रेकला जातो म्हणजे ट्रेक संपवून घरी आल्यावर सोमवारपासून परत ऑफिस जॉईन करता येतं. यावेळी मुद्दामच आम्ही शनिवारी निघणार होतो याचं कारण एवढंच की समजा पाच दिवसात ठरवलेला कार्यक्रम उरकला नाहीच तर आयत्यावेळी एक जादाची सुट्टी टाकून का होईना पण आम्हाला तो पूर्ण करायचाच होता. शनिवारच्या दिवसभरत आमचं Logistics सांभाळणाऱ्या सगळ्या स्थानिकांना शेवटचा फोन करून रात्री निघत असल्याची वर्दी दिली आणि ग्रुपवर ट्रेकला कायकाय सामान आणायचंय याची यादी आधी पोस्ट केली होतीच त्यानूसार सॅक पण भरली.
...अखेर आम्हीच ठरवलेल्या मुहूर्ताची घटका-पळे शेवटी भरलीच त्यामुळं इथून पुढं सगळं शुभ आणि मंगलच होणार होतं. दरवेळी ट्रेकला निघतो त्यापेक्षा यावेळी तासभर लवकर निघायचं ठरवलं होतं त्यामुळं यावेळी थोडी जास्तीची विश्रांती आम्हा सर्वांनाच मिळणार होती. नेहमीप्रमाणे नारायणगावात बजरंगकडे दूधथांबा घेऊन खिरेश्वरला बाळू मेमाणेकडे मुक्कामासाठी दाखल झालो. मुंबईहून अजय शेडगे येताना बैलपाड्याच्या मनोज खाकरला घेऊन नुकताच तिथं येऊन पोहोचला होता. सामान काढून बाळूच्या पार्कींगमधे गाडी पार्क केली. आता ती इथून पाचव्या दिवशीच घराकडं परतीच्या प्रवासाला निघणार होती. सकाळच्या नियोजनाच्या सूचना देऊन फारवेळ टाईमपास न करता सगळे पटकन झोपी गेलो.
🚩 दिवस पहिला 🚩
सकाळी लवकरच बाळूचं घर सोडलं. आमची पहिली वाट होती ती म्हणजे खिरेश्वरहून गडावर चढून जाणारी तोलारखिंडीची वाट...
🚩 १) तोलारखिंडीची वाट -
सकाळी ब्राम्ह्य मुहूर्तावर निघाल्यामुळं अजूनही चांगलाच अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात आमची वेगाने चढाई सुरू होती. वाट पायाखालची आणि चांगली मळलेली असल्यामुळं कुठेही न थांबता पुढच्या पन्नास मिनिटांत तोलार खिंडीत दाखल झालो.
पुढच्या वाटेसाठी इथूनच पुन्हा लव्हाळी बाजूकडं खाली उतरायचं असल्यामुळं
पाठीवरचे ब्रम्हराक्षस खिंडीतच ठेवले आणि तडक माथ्यावर पोहोचलो.
प्रत्येकाच्या मनात हा ट्रेक पूर्ण करण्याबद्दलचा आत्मविश्वास आणि भावना
एवढया तीव्र होत्या की पहिली तोलारखिंडीची वाट एका झपाट्यात म्हणजे फक्त
सव्वा तासात पूर्ण झाली होती. दम जिरवण्यासाठी सुद्धा कुणी कुठे थांबलं
नव्हतं. सर्वांची मानसिकता चांगली उंचावल्याचंच हे लक्षण होतं आणि ही ट्रेक
उत्तम रितीने पार पडण्याच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब होती. तिथंच
असलेल्या लव्हाळीच्या नामदेव लाहमटेच्या झापापाशी थोडावेळ रेंगाळलो.
आजूबाजूला दिसणाऱ्या परिसराचं थोडक्यात विहंगावलोकन केलं आणि आल्या पावली
पुन्हा तोलार खिंडीत उतरायला सुरूवात केली.
🚩 २) तटाची किंवा कडेलोटाची वाट -
आता पुढची वाट होती ती म्हणजे तटाची किंवा कडेलोटाची वाट. ही वाट कोथळे गावातून हरिश्चंद्रगडावर तोलार खिंडीतूनच चढून येते. गप्पा मारत मारत पुन्हा तोलारखिंडीत दाखल झालो. दिलेल्या वेळेनुसार एव्हाना आजचा आमचा लव्हाळीतला वाटाड्या बाळू भांबळे तोलार खिंडीत यायला हवा होता पण तो पोहोचला नसल्यामुळं त्याच्यासाठी तोलार खिंडीतल्या वनविभागाच्या चौकीत निरोप ठेवला आणि कोथळे गावाकडं निघालो. तोलार खिंडीत कुणा पाथरवटानं नवीनच बनवलेली सुबक शिवपिंड पाहायला मिळाली.
काही अंतर उतरल्यावर कोथळेच्या या मोठ्या वाटेला लव्हाळीकडे जाणारी वाट
डावीकडं फुटत होती. कोथळेची मुख्य वाट सोडून डावीकडील पाऊलवाट पकडली
तेवढयात बाळू भांबळे येऊन भेटला. दिवसभराचं ठरवलेल्या प्लॕनिंगप्रमाणं
निदान आत्तापर्यंत तरी सगळं वेळेत चाललं होतं. ट्रेकींगमधे dependency चा
rate जसजसा वाढत जातो तसतसा तुमचा success चा आलेख उतरत जात असतो हे
प्लॅनिंग करताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाळू भांबळे वेळेत पोहोचला
नसता किंवा आलाच नसता तर दिवसभराचं वेळापत्रक थोडंफार बिघडलं असतं किंवा
थोडं बदलावं तरी लागलं असतं पण तो वेळेत आल्यामुळं पुढचं दिवसभराचा नियोजित
कार्यक्रम आता उत्तम रितीने पार पडणार होता. कोथळे फाट्यापासून पुढच्या
पंधरा मिनिटांत लव्हाळी बाजूला असलेल्या वेताळसोंडेच्या ऊर्फ
गणेशसोंडेखालच्या माळावर पोहोचलो. आजच्या लव्हाळी बाजूकडील सगळ्या वाटा याच
माळावरून चढून जाणार होत्या. या माळावरच Oleacae family तला Olea dioica म्हणजेच 'पार जांभूळ' चांगलाच बहरला होता.
🚩 ३) गणपतीची वाट -
तोलार खिंडीच्या उत्तरेकडच्या पहिल्या वाटेचं नाव होतं गणपतीची वाट. ही वाट लव्हाळीतुन गणपतीच्या ठाण्यापाशी चढून जाते म्हणून हिला गणपतीची वाट म्हणतात असं साधं सोपं गणित आहे. माळावरून डावी मारून वाट चढू लागली. चढ बाकी चांगलाच छातीवरचा होता. थोडं अंतर चढून गेल्यावर उजवीकडे खडकावर शेंदूर फासलेला दिसला. बाळूने सांगितलं की हे वरच्या गणपतीचंच छोटं ठाणं आहे. याला स्थानिक उंदिर म्हणतात. या वाटेवर जवळजवळ पंचवीसएक खोदीव पायऱ्या/पावट्या दिसून आल्या म्हणजे ही वाट पुरातन होती. वाटेवर 'जंगली तंबाखू'ला बहर आला होता.
माथ्यावर पोहोचताना वाटेत तटबंदीचे अवशेष दिसून आले. माथ्यावर पोहोचल्यावर समोरच गणपतीचं ठाणं दिसलं. त्याच्या बाजूलाच असलेल्या एका डेरेदार जांभळाच्या झाडाखाली बसून नाश्ता उरकला. गणपतीच्या ठाण्याच्या खालच्या बाजूला पन्नास जण सहज मुक्काम करू शकतील एवढी मोठी नैसर्गिक गुहा होती ती पण पाहिली. पुन्हा वर येऊन पुढचा ट्रेक उत्तम होण्यासाठी गणपतीला साकडं घातलं आणि आरती म्हणून पुढच्या दरवाज्याच्या वाटेकडे निघालो.
🚩 ४) दरवाज्याची वाट -
गणपतीच्या ठाण्याच्या उजव्या बाजूने चढ चढून माथा गाठला आणि बरंच पुढे चालत जाऊन थोडं खाली उतरून दरवाज्यापाशी पोहोचलो. समोरच कोथळ्याचा भैरव दिसत होता.
पुढची पायराची वाट पुन्हा याच ठिकाणी चढून येणार असल्यामुळं सॕक तिथंच झाडीत बांधून ठेवल्या आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन दरवाज्याच्या वाटेने उतराई सुरू केली. या वाटेच्या सुरवातीलाच तटबंदीचे, दरवाज्याचे भरपूर अवशेष दिसत होते. वाटही चांगलीच मळलेली होती.
तासाभरात पुन्हा माळावर पोहोचलो आणि माळावरून थोडी उजवी मारून पाणी भरून घेण्यासाठी खाली उतरलो. इथं मार्च महिन्याच्या सुरवातीपर्यंत पाणी मिळू शकतं. पुन्हा माळावर चढून येऊन पुढच्या पायराच्या वाटेकडे निघालो. माळावर पावसाळी भातशेती केली जाते. भाताची खाचरं ओलांडत माळवरच्या छोट्या वस्तीत पोहोचलो. शेतीच्या कामासाठी बाळूचं आख्खं कुटुंब पावसाळ्यात इथं वस्तीला येतं. पहिल्या दोन दिवसांची राहण्याची, जेवणाची सोय करणाऱ्या पाचनईच्या किरण भारमलच्या अंदाजानुसार आज आम्हाला इथे मुक्काम टाकावा लागला असता त्यामुळं रात्रीच्या जेवणाचा, सकाळच्या चहा-नाश्त्याचा सगळा शिधा घेऊन तो इथं येऊन पोहोचला होता पण त्याचा अंदाज आम्ही साफ चुकवला होता. आज सगळेजण कानात वारं भरलेल्या वारूसारखे दौडत होते. शिधा आणलाच आहे म्हटल्यावर तिथं एक चहाब्रेक घेतला. बाळूशी चर्चा करून पुढील वाटांचा अंदाज घेतला आणि किरणच्या जोडीदाराला म्हणजे सुदामला मुक्कामाच्या ठिकाणाच्या सूचना देऊन परत पाठवून दिलं. सुदाम एकटाच परत गेल्यामुळं आता किरणही आमच्यासोबत पुढचा ट्रेक करणार होता. आता आमची पुढची वाट होती पायराची.
🚩 ५) पायराची वाट -
वस्तीपासून थोडं वरती असलेल्या गणेशसोंडेच्या एका छोट्या पदरात आम्हाला चढून जायचं होतं. पदराच्या खाली सरळसोट कडे असल्यामुळं उजव्या बाजूच्या नाळेतून वर चढून जावं लागणार होतं. वस्तीपुढल्या ढोरवांटामधून योग्य वाट निवडून चढाई सुरू केली. नाळेतून चढून एक अवघड कातळटप्पा पार करून पदरात पोहोचलो. या कातळटप्प्यावर काही खोदीव पावट्या दिसून आल्या. पदरातून दक्षिण दिशा पकडत पुन्हा दरवाज्याच्या दिशेने निघालो. वाटेत दिसलेल्या छोट्या झऱ्याचं पाणी पिऊन तहान भागवली.
वाटेत 'Abutilon persicum' म्हणजेच 'मदाम' चांगलाच बहरला होता. थोडं पुढं गेल्यावर उजवीकडे बांबूच्या बनात पूर्वी वस्ती असल्याचं बाळूनी सांगितलं. तिथं पडलेल्या घराची फक्त जोती शिल्लक असल्याचंही त्यानं सांगितलं पण झाडी प्रचंड वाढल्यामुळं आम्हाला काही ती पाहता आली नाहीत. नाही म्हणायला तिथं एक स्मारक शिळा मात्र दिसली. पदरात जागोजागी ओलावा असल्यामुळं अनेक रानफुलं बहरली होती.
या वाटेला पायरीची वाट म्हाणायचं की पायराची वाट? तर 'पायराची वाट' असं म्हणणं जास्त योग्य आहे असं मला वाटतं कारण या वाटेला पूर्वी वाटेवर असलेल्या एका मोठ्या पायराच्या झाडाची खूण सांगितली जात असे. खरंतर ज्या झाडाची खूण सांगितली जात असे ते झाड सध्या जरी तिथं दिसत नसलं तरी पूर्वी तिथं होतं असं बाळुनी सांगितलं. या वाटेच्या आजूबाजूला आजही पायराची अनेक झाडं दिसून येतात. दुसरं असं की या वाटेला 'पायरीची वाट' असं म्हणण्यासाठी वाटेवर पायऱ्या नाहीत तर पावट्या आहेत आणि दोन्हीत नक्कीच फरक आहे. या ज्या पावट्या आहेत त्या वर वस्तीला असलेल्या मंडळींनी त्यांच्या सोयीसाठी खोदलेल्या होत्या अशी माहीती बाळुने दिली. बरं ही वाट फुटलेल्या तटबंदीतून गडात चढून जात असल्यामुळं ही गडाची पुरातन वाट नक्कीच नव्हती त्यामुळं वाटेवरच्या पावट्या पुरातन नक्कीच नाहीत. थोडक्यात काय तर या वाटेला 'पायरीची वाट' म्हणण्यापेक्षा 'पायराची वाट' म्हणणंच जास्त संयुक्तिक वाटतं. असो, पुढच्या अवघड टप्पा पार करून फुटलेल्या तटबंदीतून पुन्हा गडात प्रवेश केला. तिथं जवळच म्हणजे दरवाज्याच्या वाटेच्या आणि पायराच्या वाटेच्या माथ्यावर पाणी जाण्यासाठी खोबणी केलेली दिसून आली.
🚩 ६) गवळ्याची नळी -
दरवाज्याच्या वाटेवर ठेवलेल्या सॅक उचलल्या आणि वेताळसोंडेच्या टोकावर असलेल्या वेताळाच्या मंदिराकडं निघालो. दुपार झाली होती आणि पोटात कावळेही ओरडू लागले होते पण वेताळाच्या ठाण्याजवळ असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ जाऊनच जेवायचं ठरवलं होतं. वेताळाकडे जाताना वाटेत एका ठिकाणी दगडाच्या पॉटहोल्समधे पाणी साठलेलं दिसल्यावर तिथंच जेवायचं ठरवलं. खरंतर डोक्यावरचं उन मी म्हणत होतं पण या गणेशसोंडेवर सावलीत बसून जेवता येईल असं एकही झाड कुठे दिसत नव्हतं त्यामुळं उन्हात बसूनच जेवणं उरकण्याशिवाय पर्यायच नव्हता. पुढच्या गवळ्याची नळी आणि वेताळधार ऊर्फ त्रिंबकसोंड करून पुन्हा इथूनच जायचं असल्यामुळं सॅक इथंच ठेवल्या आणि पुढं निघालो. वाटेत पहिल्यांदा पाण्याचं टाकं दिसलं आणि थोडं पुढं गेल्यावर वेताळाचं ठाणं.
वेताळाच्या ठाण्यावरून वाट सरळ सोंडेच्या टोकाकडं निघाली होती. टोकाच्या थोडं अलिकडं उजवीकडं वळून आम्ही गवळ्याच्या नळीने उतरू लागलो. या वाटेवर इतका प्रचंड घसारा होता की या वाटेनी चढून येणं परवडलं असतं असं शेवटी शेवटी वाटायला लागलं.
घसाऱ्याची वाट संपता संपेना पण एक बरं होतं की अर्धी वाट उतरल्यावर बाजूला धरायला कारवी होती. सहसा कुठं पहायला मिळत नाही अशी एक गोष्ट इथं पहायला मिळाली ती म्हणजे झाडांसाठी असलेलं इथलं पोषक वातावरण. या वातावरणामुळं कारवीच्या झाडांचे वृक्ष झाले होते. चारचार पाचपाच इंच जाडीची कारवीची खोडं इथं पहायला मिळाली. कढीपत्त्याची पानं पाहूनही खरं वाटेना इतकी मोठी पानं होतात कढीपत्त्याला. सोबत असलेले धनंजय शेडबाळे आणि धनंजय कोकाटे ही जोडी जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती याविषयात अभ्यासू होती त्यामुळं आम्हाला बऱ्याच झाडाची ओळख, त्यांचं महत्व याची माहिती आपोआपच मिळत होती. या दोघांनाही तिथल्या पोषक वातावरणाबद्दल चांगलंच अप्रूप वाटत होतं.
घसारा एकदाचा संपला आणि आम्ही माळावर पोहोचलो. इथून वेताळधारेची सुरूवात हाकेच्या अंतरावर होती. सगळी मंडळी आल्यावर दहा मिनिटांची विश्रांती घेतली आणि वेताळधारेच्या वाटेची चढाई सुरू केली.
🚩 ७) वेताळधार ऊर्फ त्रिंबकसोंड -
आजची ही आमची सातवी वाट होती. नारायणराव अस्ताला निघाले होते त्यामुळं आता घाई करायला हवी होती. वेताळधारेचा चढ चांगलाच अंगावर येणारा होता पण उन्हाचा चटका कमी होऊ लागल्यामुळं फारसं दमायला होत नव्हतं. उजवीकडं नाप्त्यामागं सुर्यास्त होत होता. आकाशात रंग गडत होत चालले होते. त्या रंगात पेठेच्या वाडीचा कोंबडा आणि कलाडगड, कुमशेतचा कोंबडा, आजोबा, करंडा, कात्राबाई न्हाऊन निघाले होते. कितीतरी वेळ आम्ही त्यांच्याकडं पहात बसलो होतो. तेवढ्यात बाळूची 'लवकर चला' म्हणून हाळी आली आणि भानावर आलो. खरंच काही ठिकाणं अशी असतात जी मंत्रमुग्ध करून टाकतात.
दोनतीन सोपे रॉकपॅचेस पार करत वेताळधारेचा माथा गाठला. माथ्यावर भक्कम बुरूजाचं बांधकाम आहे. पाचनई, लव्हाळी भागावर या टोकावर असलेल्या बरूजावरून चांगलं लक्ष ठेवता येत असल्यामुळं सामरिकदृष्ट्या हा बुरूज महत्वाचा असावा. वेताळधारेच्या टोकावरून परतत असताना गवळ्याची नळी, वेताळधारेवरच्या पाण्याच्या टाक्या, वेताळाचं ठाणं पहात सॅक ठेवलेल्या जागेपर्यंत येईपर्यंत अंधार पडला. खरंतर प्लॅनिंगनूसार इथंच कुठतरी मुक्काम करायचं ठरवलं होतं पण अजून थोडं ताणलं तर आणखी एक वाट करून सुरक्षित ठिकाणी म्हणजे पाचनईच्या देवाच्या वाटेवर असलेल्या मंगळगंगेच्या ओढ्यात मुक्कामाला जाता येणार होतं. सोबत्यांच्या मनातलं थोडं चाचपलं तर सर्वांनीच त्याला तयारी दाखवली आणि आमची पायगाडी एका ओळीत थनरगडीकडं निघाली. या वाटेकडं जाताना अंधार पडल्यामुळं या वाटेचे फोटो काही काढता आले नाहीत.
🚩 ८) थनरगडी -
खिरेश्वरहून तोलारखिंडीतून चढून गडमाथा गाठल्यावर हरिश्चंद्रेश्वराकडं जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक बालेकिल्ल्याच्या बाजूने तर दुसरी थोड्या खालच्या बाजूने. या खालच्या बाजूने जाणाऱ्या वाटेला लागलो आणि मंदिराकडं निघालो. जाताना वाटेतच थनरगडीची वाट सुरू होते. ज्या मंडळींना खिरेश्वरहून थेट पाचनईला जायचं आहे त्यांना हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत जायची गरज पडत नाही. ते या थनरगडीने सरळ पाचनईच्या देवाच्या वाटेवर येऊ शकतात. ही वाट खास त्याच मंडळींसाठी आहे. आज आम्हीही त्याच मंडळींमधले एक झालो होतो. थनरगडीची वाट सरळ सोंडेवरून जात अगदी शेवटच्या ठिकाणी ओढ्यात उतरत होती. तासाभरात या वाटेनी देवाच्या वाटेवर पोहोचलो तोपर्यंत पायराच्या वाटेखाली सोडलेला किरणचा जोडीदार सुदाम मुक्कामाचं, जेवणाचं सगळं साहित्य घेऊन तिथं पोहोचला होता.
जेवण तयार होईपर्यंत आम्ही टेंट लावले. थंडी चांगलीच जाणवू लागली होती म्हणून शेकोटी पेटवली आणि दिवसभरात केलेल्या वाटांची पुन्हा एकदा उजळणी केली. तेवढ्यात जेवण तयार झाल्याची हाक आली आणि जेवायला गेलो. बहूतेक ट्रेकला प्लॅस्टीकचा कचरा किमान आपल्यामुळं तरी होऊ नये म्हणून आम्ही घरूनच जेवायला ताटं, ग्लास वगैरे घेऊन जातो. आम्हाला आता ती सवयच होऊन गेली आहे. ट्रेकला निघालं की आपोआप ताट सॅकमधे भरलं जातं, कुणाला सांगावंच लागत नाही. ट्रेकर्स मंडळींनी ही सवय लावून घेतली आणि प्रत्येक गडावर आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाचं say 'No' to plastic हे आचरणात आणण्यासाठी प्रबोधन केलं तर आज प्रत्येक गडावर आपण पहात असलेली कचऱ्याची समस्या सहजी सुटेल.
आमच्या आजच्या प्लॅनिंगनूसार जेवढ्या वाटा करायचं ठरवलं होतं त्यापेक्षा एक वाट जास्तीची झाली होती त्यामुळं उद्या थोडा आराम मिळणार होता.
🚩 दिवस दुसरा 🚩
पाचनई गावातून चढून येणाऱ्या चार वाटा आम्ही मुक्काम केलेल्या ठिकाणापासूनच वेगवेगळ्या होत होत्या. पाचनई गाव ते आमच्या मुक्कामाचं ठिकाण थनरगडीपासून कोकणकड्याच्या वाटेपर्यंतच्या पाचही वाटांसाठी एकच होतं. आमचा कालचा मुक्काम याच ठिकाणी करण्याचं हेच एक कारण होतं. या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं आणि सकाळच्या चारही वाटा करताना आम्हाला आमचं सामान वागवायची गरज पडणार नव्हती. एकूण इथल्या पाच वाटांपैकी पहिली थनरगडी आम्ही कालच रात्री उतरून आलो होतो त्यामुळं अनुक्रमणेनुसार आजची पहिली वाट होती देवाची वाट.
🚩 ९) देवाची वाट -
पाचनई गावातून बहूतेक सगळी पर्यटक मंडळी साधारण तासाभरात याच वाटेने गडावर चढून येतात त्यामुळं वाटेचा हमरस्ता झालेला दिसत होता. या ठिकाणावर उतरणारी आमची शेवटची कोकणकड्याची वाट पुन्हा इथंच उतरून येणार असल्यामुळं सगळ्या सॅक बेसकँपवरच ठेऊन निघालो. रस्ता वाहता असल्यामुळं इथं सुदाम सामानावर लक्ष ठेवण्यासाठी थांबणार होता तर किरण खाली गावात जाऊन आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवणार होता. देवाच्या वाटेने चढून हरिश्चंद्रेश्वर मंदिर गाठलं. नेमकी आजच्याच दिवशी हरिश्चंद्रेश्वराची वारी त्र्यंबकेश्वराला निघाली होती त्यामुळं वारीतल्या वारकऱ्यांच्यात सामील होऊन थोडा हरिपाठाचा आनंद घेतला. पुढं हरिश्चंद्रेश्वर मंदिरात जाऊन आमच्या कोकणात घालतात तसं हरिश्चंद्रेश्वराला गाऱ्हाणं घालून आरती केली. बहूतेक सगळ्या शंकराच्या मंदिराच्या पायरीवर असलेल्या किचकाची गोष्ट सोबत्यांना सांगून पुढच्या कपारीच्या वाटेकडं निघालो.
🚩 १०) कपारीची वाट -
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागचा चढ चढून मागच्या हॉटेलांपाशी आलो आणि उजव्या दांडावरून आडवी मारली. हीच ती कपारीची वाट जी पुन्हा आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी उतरून जात होती. यावाटेने उतरून खालच्या ओढ्यात आलो. या वाटेवर कपारीसदृश असं काहीच नव्हतं तरीसुद्धा या वाटेला कपारीची वाट का म्हणतात ते काही कळलं नाही. ओढ्यात उतरल्यावर उजवीकडं कँपसाईटवर न जाता डाव्या बाजूला वळून पुढच्या सात पायरीच्या वाटेला लागलो.
🚩 ११) सात पायरीची वाट -
ही सात पायरीची वाट खालच्या ओढ्यातून कपारीची वाट ज्या हॉटेलांपासून सुरू होते तिथंच पण कोकणकड्याच्या बाजूने चढून येते. ओढ्यातून आडवं जात पायऱ्यांच्या खाली आलो आणि पायऱ्या चढूनच वर आलो. इथं असलेल्या एकूण पायऱ्या पाहिल्या तर त्या दोन टप्प्यात होत्या. पहिल्या टप्प्यात ६२ पायऱ्या आणि त्याच्या बाजूलाच ०७ पावट्या खोदलेल्या होत्या तर वरच्या दुसऱ्या टप्प्यात १९ पायऱ्या दिसून आल्या. एवढ्या पायऱ्या असल्यामुळं या वाटेचं मूळचं नाव 'साठ पायऱ्यांची वाट' असं असावं का? असा मनात विचार आला त्यामुळं नंतरच्या काळात नावात अपभ्रंश होऊन हीला सात पायरीची वाट असं नाव पडलं असावं असं सहज वाटुन गेलं. ही वाट आम्ही पुढे करणार असलेल्या बैलघाटाशी संलग्न असावी. बैलघाटाने चढून आल्यावर हरिश्चंद्रेश्वर मंदिर गाठण्यासाठी ही वाट अत्यंत सोयीची आहे.
🚩 १२) कोकणकड्याची वाट -
सात पायऱ्यांच्या वाटेवरून चढून आल्यावर उजवी मारून मंदिरापासून कोकणकड्यावर जाणाऱ्या वाटेला लागलो आणि कोकणकडा गाठला. शनिवार-रविवार नसल्यामुळं बहूतेक सगळी हॉटेलं बंद होती. त्यातल्याच एका
उघड्या असलेल्या हॉटेलात चहाची ऑर्डर दिली आणि कोकण कड्यावर गेलो.
सोबत्यांना कोकणकड्यावरून दिसणारा परिसर सांगितला तेवढ्यात चहा आला.
चहा पिऊन कोकणकड्याजवळ असणाऱ्या फुटक्या धरणाच्या भिंतीतून कोकणकड्याच्या वाटेने उतरायला सुरूवात केली. 'पाचनईकरांना कोकणकड्यावर जाण्यासाठी शॉर्टकट' असं या वाटेला फारफार तर
म्हणता येईल. ही वाट पूर्णपणे एका ओढ्यातून उतरत होती. हीला 'वाट' म्हणता
येईल अशी ही वाटच नव्हती.
वाटेवर कुणीच नसल्यामुळं सगळीकडं कमालीची शांतता होती त्यामुळं आमच्या
सोबत असलेल्या साहेबराव पुजारींमधला योगशिक्षक जागा झाला आणि त्यांनी
सगळ्यांकडूनच अकरा ओंकार म्हणून घेतले. या ओंकारामुळं वातावरण इतकं भक्तीमय
झालं की पुढचा कितीतरी वेळ आम्ही सगळे डोळे मिटून एकाग्र होऊन बसून राहिलो
होतो. धनंजय शेडबाळेंनी आवाज दिला आणि सगळे भानावर आले.
ओढ्यातल्या कोकणकड्याच्या वाटेने उतरून कँपसाईटला आलो, सॅक उचलल्या आणि पाचनई
गावात आलो. किरणने जेवणाची तयारी करून ठेवलीच होती त्यामुळं हातपाय धुवून
लगेच जेवायलाच बसलो. जेवणानंतर पंधरा मिनिटांचा ब्रेक घेतला आणि आजच्या
आमच्या पुढच्या वाटेकडं निघालो.
🚩 १३) गायवाट -
गावातून बाहेर पडून डांबरी रस्त्यावरूनच पेठेच्या वाडीकडे चालू लागलो. थोडं अंतर गेल्यावर रस्ता सोडून डावी मारली आणि वाटेची चढाई सुरू केली. पाचनईच्या समोर असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या टोकाच्या खालच्या बाजूने वाट गडावर चढून जात होती. नावातच 'गाय' असल्यामुळं वाट अगदी ऐसपैस होती पण ही ढोरवाट फक्त माळापर्यंतच मोठी होती पण पुढं मात्र ती अगदी छोटी आणि अवघड झाली. कातळटप्प्याला भिडल्यावर डावीकडं आडवं जात तटबंदीतून आत गडात गेलो. या वाटेला तटबंदी, दरवाजा असल्यामुळं ही वाट पुरातन असावी आणि हीच पाचनईची गडावर जाणारी मूळ वाट असावी. गायवाटेने गोलाकार ट्रॅव्हर्सी मारून बैलघाटाच्या माथ्यावर आलो.
🚩 १४) बैलघाट -
ही वाट माझ्या चांगल्याच परिचयाची होती. नुकताच या वाटेने मी उतरलो होतो. या वाटेवर हरिश्चंद्रगडाच्या गडपणाच्या सगळ्यात जास्त खूणा दिसून येतात. दगड रचून केलेली पाखाडी किंवा फरसबंदी, दरवाजा, भरभक्कम बुरूज आणि एकाखाली एक असलेले तटबंदीचे अवशेष असं सगळं दिसून आलं. दरवाज्यानंतर धोंडे आळीतून उतरत पायथ्याशी पोहोचलो. सादडे घाटासाठी किंवा कलाडगडाशी संपर्क ठेवण्यासाठी या वाटेचा उपयोग होत असावा. एकूणच ही वाट पूर्णपणे झाडीतून होती त्यामुळं उन्हाचा फारसा त्रास जाणवला नाही. आता आमची पुढची वाट होती ती परिचितराईची.
🚩 १५) परिचितराईची वाट -
बैलघाट उतरून डावी मारली आणि परिचितरायाच्या वाटेकडं निघालो. थोडं अंतर सपाटीवरून चालल्यावर गर्द रानातल्या वाटेने चढू लागलो. थोड्या वेळात वाटेने एका मोकळ्या पठारावर आणून सोडलं. इथून समोर खरंतर हरिश्चंद्रगडाचे कडेच दिसत होते मग वाट होती कुठे? बारीकशा वाटेने चढून छोट्या कातळटप्प्याला जाऊन भिडलो. सराईत मंडळी सोडली तर नवख्यांनी इथं रोपचा वापर केलेलाच बरा असा तो समोर आलेला कातळटप्पा होता. कातळटप्पा चढून वरच्या मोठ्या कारवीला दोर बांधला आणि सगळी मंडळी एकएक करत वर चढून आली. कातळटप्प्याच्या माथ्यावर डावी मारून बाजूच्या ओढ्यात पोहोचलो.
पोटभर थंडगार पाणी पिऊन पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि उजव्या अंगाने पुन्हा चढाई सुरू केली. पुढच्या पंधरा मिनिटांत नळीच्या वाटेने कोकणकड्यावर चढून जातात त्या वाटेला येऊन मिळालो. प्लॅनिंगनुसार आजचा आमचा मुक्काम या वाटनाक्यावर करायचं ठरलं होतं पण सुर्यास्ताला अजून भरपूर वेळ असल्यामुळं अजूनही दोनतीन वाटा सहज होणार होत्या. अर्थात सोबत्यांना याबाबत सांगून आपण आजचा मुक्काम पुढं करूया काय विचारल्यावर सर्वांनीच तयारी दाखवली.
कोकणकड्यावर या वाटेने आधी बरेचदा येऊन गेल्यामुळं ही वाट आमच्या चांगलीच परिचयाची होती. या वाटेने खाली उतरून नळीच्या वाटेच्या खिंडीत पोहोचलो. आता इथून डावीकडं नळीची वाट होती तर उजवीकडं बेटाची नळी. आम्हाला नळीची वाटेने बैलपाड्यात जायचं होतं पण त्याआधी अजून तीन वाटा करायच्या बाकी होत्या.
🚩 १६) बेटाची नळी -
खिंडीतून उजवी मारून बेटाच्या नळीने उतरायला सुरूवात केली. ही वाट अतिशय सोपी, आरामात उतरत जाणारी होती. या वाटेवर उंचच उंच आणि भलेमोठे वृक्ष पहायला मिळाले. या वाटेचं हे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. हरिश्चंद्रगडाच्या आत्तापर्यंत केलेल्या कुठल्याच वाटेवर एवढे मोठे वृक्ष पहायला मिळाले नव्हते. एवढ्या दाट झाडीतून उतरताना उन लागत नसल्यामुळं कुठंही न थांबता पाचनईच्या पठारावर आलो. रतनगड ते हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करणाऱ्यांना गडावर जाण्यासाठी ही बेटाची नळीची वाट अतिशय जवळची आहे. पाचनईच्या पठारावर आल्यावर किरण भेटला. आमचा आजचा मुक्काम याच पठारावर होता पण सुर्यास्तापर्यंत आणखी दोन वाटा सहज होणार होत्या त्यामुळं किरणला रात्रीच्या जेवणाची आणि मुक्कामाची तयारी करायला सांगून सादडे घाटाकडं जायला निघालो.
🚩 १७) सादडे घाट -
हरिश्चंद्रगडावर या सादडे घाटाची वाट जरी थेट चढून येत नसली तरी ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडावर चढून जाण्यासाठी या घाटवाटेचा वापर केला जातो त्यामुळं या वाटेला हरिश्चंद्रगडाची संलग्न असलेली वाट असं नक्कीच म्हणता येईल. बैलपाडा आणि केळेवाडी गावातून या घाटवाटेने पाचनईला चढून येता येतं. हरिश्चंद्रगडाच्या सगळ्या वाटांबरोबरंच त्याच्या संलग्न आणि सध्याच्या परिस्थितीत गडाच्या वापरात असलेल्या वाटाही करण्याचं आम्ही ठरवलं होतं. सादडे घाटवाट अतिशय वाहती वाट आहे. पाचनईच्या पठारावरून घाटमाथ्यावर पोहोचलो आणि सादडे घाट उतरायला सुरूवात केली. सुरवातीला धोंडेआळीतून उतरावं लागणार होतं. घाटवाटेत असलेलं पाण्याचं टाकं, पायऱ्या ही वाट महत्वाची आणि वाहती असल्याचंच सांगत होत्या. नाळेच्या ओपनबुकमधून बाहेर पडल्यावर मातीचा प्रचंड घसारा सुरू झाला. डाव्याबाजूला सिलेंडर सूळका लक्ष वेधून घेत होता तर खालच्या बाजूला कोकणात केळेवाडी स्पष्ट दिसत होती. सावधतेनी उतरत सादडे घाटातल्या करपदऱ्याच्या तिठ्यापाशी पोहोचलो. सरळ उतरत सादडे घाटाची वाट केळेवाडी, बैलपाड्यात निघून गेली आणि आम्ही उजवीकडं वळून करपदऱ्याने चढाई सुरू केली.
🚩 १८) करपदरा -
करपदऱ्याची वाट ही खासकरून पेठेच्या वाडीतल्या मंडळींची. सादडे घाटातून चढून पेठेच्या वाडीत जायचं तर सीतेचा डोंगर आणि कलाडगडाला वळसा मारून जावं लागतं म्हणून हा करपदऱ्याचा शॉर्टकट. स्थानिक भाषेत अंजनीच्या झाडाला करप म्हणतात. या वाटेवर करपाची झाडं खूप असल्यामुळं या वाटेला नाव पडलं करपदरा. या वाटेला पण हरिश्चंद्रगडाची संलग्न असलेली वाट असं म्हणता येईल. करपदऱ्याने चढून बाजूच्याच हपाट्याच्या कड्यावर आलो. सुर्यास्त होतच होता आणि अशा कड्यावरून सुर्यास्त पाहणं म्हणजे स्वर्गसुखच. सूर्यास्त पाहिल्यामुळं दिवसभराचा शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला. सुर्यास्त पहात उरलेला वेळ कसा गेला ते कळलंच नाही.
प्लॅनिंग करताना दिलेल्या यादीतल्या जवारीची नाळ, गोधनीची वाट आणि माशाचा लोळ या कोकणातून चढून येणाऱ्या घाटवाटा सध्या वापरात नसल्यामुळे पूर्णपणे मोडल्या आहेत त्या वाटा याच हपाट्याच्या कड्याच्या परिसरातच चढून येतात. पूर्वी या वाटा आम्ही केल्या होत्या त्यामुळं नवीन मंडळींना त्या वाटा कशा चढून येतात त्याचं इत्यंभूत वर्णन केलं, त्यांचे घाटमाथे दाखवले आणि पेठेच्या वाडीच्या कोंबड्याच्या बाजूने मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झालो.
किरणनी टेंट लावून ठेवले होते आणि जेवणही बनवून ठेवलं होतं त्यामुळं आज आम्हाला काहीच काम नव्हतं. बाजूच्या ओढ्यावर जाऊन हातपायधुवून फ्रेश झालो आणि ताटं घेऊन जेवण्यासाठी हजर झालो. आमच्या आजच्या प्लॅनिंगनूसार थनरगडीपासून परिचितरईच्या वाटेपर्यंतच्या आठ वाटा करायचं ठरवलं होतं त्यापेक्षा दोन वाटा जास्तीच्या झाल्या होत्या म्हणजे कालची एक आणि आजच्या दोन मिळून तीन वाटा जास्तीच्या झाल्या होत्या. त्यामुळं उद्या नळीच्या वाटेने बैलपाड्यात उतरून अर्धा दिवस आराम करायचं ठरवलं होतं.
🚩 दिवस तिसरा 🚩
🚩 १९) नळीची वाट -
आज फक्त नळीची वाटेने उतरून बैलपाड्यात जाऊन मुक्काम करायचं ठरवलं होतं त्यामुळं थोडं उशीराच निघालो. कँपसाईटवरच नाश्ता केला आणि निघालो. आज परत आम्हाला बेटाची नळी चढून जायचं होतं ती चढून नळीच्या वाटेच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. सुरवातीच्या घसाऱ्यावरून उतरून पहिल्या कातळटप्प्यापाशी आलो. रोप फिक्स केला आणि एकएक करत सगळे उतरलो. बाकीचे उतरेपर्यंत आम्ही काहीजण पुढे जाऊन दुसऱ्या कातळटप्प्यावर रोप फिक्स केला. या वाटेनी आत्तापर्यंत बरेचदा चढाई-उतराई केली होती त्यामुळं कुठं वेळ लागतो, कुठं सावधगिरी बाळगायला हवी, कुठं पाणी मिळेल, कुठं फोनला रेंज येते, कुठल्या झाडाखाली बसून आराम करता येईल हे तोंडपाठ झालं होतं. मजल-दरमजल करत एकदाचे बैलपाड्यात येऊन दाखल झालो. आगाऊ सूचना देऊन ठेवल्यामुळं जेवणही तयार होतं. काहींनी हातपाय धुतले तर काहींनी आंघोळी केल्या आणि जेवण करून चांगली झोप काढली. हा अर्ध्या दिवसाचा आराम आम्हाला पुढच्या कठीण वाटांसाठी खूपच गरजेचा होता.
हाताशी असलेला वेळ थोडा सत्कारणी लागावा म्हणून आम्ही काही मंडळी गावातल्या आश्रमशाळेला भेट देण्यासाठी गेलो आणि आश्रमशाळेत राहणाऱ्या २०० मुलं आणि १५२ मुलींची lifestyle जाणून घ्यायचा प्रयत्न केला. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असलेली ही मुलं आपल्या घरापासून लांब राहून शिक्षण घेत होती. काही मुलं तर पार वाडा, जव्हार भागातून शिकण्यासाठी आली होती. बहुतेक ही सगळी मुलं आदिवासी पाड्यातली होती की ज्यांच्याकडं शिक्षण ही दुय्यम गरज समजली जाते. निसर्गसंवर्धन, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज वगैरेवर मुलांशी सूसंवाद साधण्याच्या निमित्तानं अनौपचारिक गप्पा मारण्यासाठी आम्ही खरंतर तिथं गेलो होतो.
ही आश्रमशाळा अनुदानीत असूनही शाळेला मिळणारी सरकारी मदत अतिशय तुटपुंजी होती. सोईसुविधांचा अभाव असूनही ही मुलं तिथं कशी राहतात? स्वच्छतेसंबंधी त्यांच्या काही समस्या आहेत काय? हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. विपरीत परिस्थितीत राहूनही मुलं शिक्षण घेत आहेत म्हटल्यावर काय लागेल ती मदत करण्याचं आश्वासन आम्ही शाळेतल्या शिक्षकवृंदाला देऊन आलोय. पाहूया कसं जमतंय ते...
🚩 दिवस चौथा 🚩
कालच्या अर्ध्या दिवसाचा चांगला आराम झाल्यामुळं आज सगळे एकदम ताजेतवाने झाले होते. आज आम्हाला एकूण चार वाटा करायच्या होत्या. त्यातल्या दोन वाटा Technical होत्या. त्यातूनही पहिली वाट जास्त अवघड होती ती म्हणजे माकडनाळ.
🚩 २०) माकडनाळ -
भल्या पहाटेच मनोजच्या घरून डबा बांधून निघालो. उजाडेपर्यंत नळीची वाट आणि माकडनाळेच्या संगमावर पोहोचलो होतो. मनोज थोडा मागून येणार होता पण वाट माहितीची असल्यामुळं ते चालणारं होतं. निघाल्यापासून फक्त सव्वा तासात मनोज यायच्या आधीच रॉकपॅचपर्यंत आम्ही पोहोचलोही होतो. सुरक्षा साधनं काढून Climbing केलं आणि हळूहळू सगळ्यांना वर घेतलं. झूमार असल्यामुळं वजनी सॅकही विनासायास वर घेता आल्या. माकडनाळेच्या माथ्यावर सगळे पोहोचेपर्यंत साधारण अकरा वाजले होते. इथं जेवायचं तर पाण्यासाठी वाट वाकडी करून आडराईतल्या पायराच्या पाण्यापर्यंत जावं लागलं असतं आणि ते आम्हाला परवडणारं नव्हतं. त्यापेक्षा लगेचच रोहिदास घळीने खाली उतरून वेळ्याच्या पाण्यापाशीच थांबायचा निर्णय घेतला.
🚩 २१) रोहिदास घळ ऊर्फ थितबीची नाळ -
भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले होते पण थेट पाण्यापाशीच थांबायचं ठरलं होतं. सुरवातीला मस्त झाडोऱ्यातून वाट उतरत होती. ही नाळवाट असल्यामुळं घसारा बाकी प्रचंड होता. जागोजागी झाडांवर सांबरांनी शिंगं घासल्याच्या खूणा दिसून येत होत्या. अर्धी नाळ उतरल्यावर एक मोठा टप्पा लागला म्हणून मग उजव्या झाडीतून आडवं जात पुढच्या छोट्या नाळेतून मुख्य ओढ्यात उतरलो. इथून बाकी झाडी संपून उन्हाचा तडाखा सुरू झाला. वेळ्याच्या पाण्यापाशी पोहचल्यावर हातपाय धुवून फेश झालो. हे वेळ्याचं पाणी बारमाही वाहत असतं. जेवण करून थोडी वामकुक्षी घेतली आणि थोडं खाली उतरलो. सरळ जाणारी वाट थितबीत निघून गेली आणि आम्ही डाव्या बाजूने आडराईतून उतरलेल्या ओढ्यात शिरून पुढच्या तवलीच्या नाळेने चढू लागलो.
🚩 २२) तवली -
तवलीची नाळ अतिशय अणकुचीदार आणि चांगली झाडोऱ्यातून होती. उन नसल्यामुळं चढाईला जरी त्रास होत नसला तरी कोकणातला दमटपणा चांगलाच जाणवू लागला होता त्यामुळं चांगलंच थकायला होत होतं. थोड्याच वेळात झाडोऱ्यातून बाहेर पडलो आणि उन्हाचा तडाखा लागू लागला. मूळातच अणकुचीदार असलेली नाळ जसजसं वर जाऊ तसतशी जास्तच अणकुचीदार होऊ लागली. कातळ तापल्यामुळं चढाईच्या छोट्या टप्प्यांवर चढाई करताना हात चांगलेच भाजू लागले आणि जसजसं वर जाऊ तसा घसाराही वाढू लागला. माथा समोरच दिसत होता त्यामुळं फारवेळ हा त्रास सहन करावा लागणार नव्हता. कुठेच न थांबता माथ्यावरच्या कारवीत घुसलो आणि शेवटचा भिडू येईपर्यंत थोडं पुढं जावून एका डेरेदार झाडाच्या सावलीत बसलो. इथून डावीकडं आडराई, त्याच्या वरची बाणवसराई आणि त्याच्याही वरती असलेला खराट्याचा पुड दिसत होता. समोरच जुन्नर दरवाज्याची वाट, त्याच्या वाटेवरचं नेढं, बुध्या डोंगर, पाठराई, काळू आणि रेठीचा झुरा धबधबे, खुबीचं एमटीडीसी रिसॉर्ट, सिंदोळा, हडसर, भणभणी, गायदरा, उधळ्या, तिवई, घोण्या, एकतंगडी, माळशेज आणि शिवाजी घाटवाटा, भोजगिरी आणि दौंड्यापर्यंतचा सगळा भाग दिसत होता. उद्या चढाई करायची असलेली तारामती घळ एका पठारामागं लपल्यामुळं संपूर्णपणे काही दिसत नव्हती. बसलेल्या ठिकाणी हवेची झुळूकही अधनंमधनं छान येत होती त्यामुळं परिसर न्हाहाळत किती वेळ इथं बसून होतो तेच समजलं नाही. अंधाराच्या आत किमान पुढची खुर्द्याचा दरा ऊर्फ खुर्द्याची धार उतरून सपाटीला लागायला हवं होतं. बरं पुढच्या वाटेवर Exposure पण होता त्यामुळं काळजीनं उतरावं लागणार होतं.
सकाळपासून चढत होतो पण ही धोंडेआळी काही संपायचं नाव घेत नव्हती. पुणे व्हेंचरर्सच्या चार दिवसांच्या बेसिक कोर्समधे Rock climbing Techniques चे जेवढे प्रकार आम्ही मुलांना शिकवतो तेवढे सगळे करून झाले होते. Three point climbing, Bouldering, Hand Holds, Foot holds ची पार आवर्तनं होवून बोटं फुटायला लागली होती. शेवटीशेवटी असं वाटायला लागलं की चार दिवसांत जेवढं मुलांना शिकवतो तेवढं एकाच तारामती घळीच्या चढाईत सगळं शिकवता येईल. Jokes apart पण तारामती घळ आमच्या सर्वांच्या सहनशक्तीचा अंत बघत होती हेच खरं.
मजल-दरमजल करत एकदाचे घळीच्या मुखाशी पोहोचलो. इथून थेट चढाई करता येत नाही म्हणून डावी मारून बाजूच्या कारवीत शिरलो. इथल्या कातळटप्प्यावर तटबंदीचे अवशेष दिसत होते. उजव्या नाळेतून चढाई करून माथा गाठला आणि बालेकिल्ल्याच्या वाट चौकात पोहोचलो. वाघ्याच्या वाडीपासून इथपर्यंत यायला आम्हाला तब्बल नऊ तास लागले होते.
कोकणातून घाटमाथा गाठणाऱ्या सर्वात जास्त लांबीच्या आणि अवघड प्रकारात मोडणाऱ्या वाटांमधे तारामती घळीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. या वाटेसाठी कातळारोहण तंत्र आणि त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा साधनांचा सुयोग्य वापर करता यायला हवा. त्याशिवाय पुरेशी शारिरीक आणि मानसिक क्षमता असेल तरच या वाटेच्या नादी लागावं.
वाटनाक्यापासून डाव्या वाटेने बालेकिल्ल्याला वळसा मारून तोलार खिंडीत जाता येतं पण आम्हाला जुन्नर दरवाज्याच्या वाटेने उतरायचं असल्यामुळं आम्ही उजवी मारली आणि जुन्नर दरवाज्याच्या वाटेचा उतार सुरू होतो तिथं पोहोचलो.
🚩 २५) जुन्नर दरवाज्याची वाट -
ही वाट आमच्या पायाखालची होती. त्यामुळं इथून दोन तासात खिरेश्वर गाठता येईल याचा पक्का अंदाज होता. घड्याळ सहा वाजल्याचं दाखवत होतं त्यामुळं खाली बाळू मेमाणेला जेवण बनवायला सांगून वाट उतरायला सुरूवात केली. थोडं खाली उतरल्यावर उजव्या बाजूला थोडी वाट वाकडी करून लेणी गाठली. तिथलं थंडगार पाणी पिऊन पाणपिशव्या भरून घेतल्या आणि खाली उतरून जुन्नर दरवाज्याच्या वाटेवरल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचलो.
सूर्य अस्ताला निघाला होता त्यामुळं आता घाई करायला हवी होती. तसंच थोडं पुढं जाऊन खोदीव पावट्यांपाशी पोहोचलो. या भागात असलेल्या सपाटीवर चौकीचे अवशेष दिसून येत होते की जे या वाटेची प्राचीनता सांगत होते. वाट चांगली मळलेली होती आणि उतरताना तिच्या गत आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. बऱ्याच वर्षांपूर्वी मी या वाटेने उतरत असताना पाचनईची काही मंडळी चढून येताना दिसली. ही मंडळी लग्नासाठी मढला गेली होती. गप्पा मारतामारता त्यांना वाटेबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की ती मढहून खालच्या वसईवाडीपर्यंत चालत येऊन तिथून पुढं वरच्या वसईवाडीत आली होती आणि तसंच पुढं सिंदोळ्याच्या बाजूने खुबीला आली होती. खुबीतून खिरेश्वरला जाण्याऐवजी जुन्नर दरवाज्याने चढून पुढं थनरगडीने पाचनईत उतरणार होती. मढहून ओतूर - ब्राम्हणवाडा - कोतूळ - विहिर - लव्हाळी आणि पाचनईला गाडीरस्त्याने येण्यापेक्षा त्यांच्यासाठी चालत जाण्याचा मार्ग कधीही कमी वेळाचा, कमी खर्चाचा आणि कुठलीही Dependency नसलेला होता. स्थानिक मंडळींकडून याही गोष्टी खरंतर ट्रेकर्स मंडळींनी शिकायला हव्यात आणि ट्रेक प्लॅनिंग करताना त्याचा पुरेपूर उपयोग देखील करायला हवा.
वाटेवरच्या प्राचीनत्वाच्या खुणा पाहत खिरेश्वरला बाळू मेमाणेच्या घरी पोहोचलो आणि जशी सॅक काढून खाली ठेवली तसे डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. कुणाशीही न बोलता स्वस्थपणे दहा मिनिटं बसून राहिलो तेव्हा कुठं भानावर आलो. गेले पाच दिवस आम्ही सगळे एका वेगळ्याच झपाटलेल्या वातावरणात वावरत होतो. तो बांध आज एकदम फुटला होता. दहा मिनिटांनी जेव्हा मनावरचा ताण जाऊन भानावर आलो त्याक्षणी एकदम हलकंहलकं वाटू लागलं होतं. सर्वांना एवढा आनंद झाला होता की सगळ्यांनी एकमेकांना चक्क मिठ्या मारून आनंद व्यक्त केला.
शेवटी हा ट्रेक प्लॅनिंग करण्यापासून ते जसाच्या तसा तो एकझिक्युट करण्यापर्यंतच्या सर्वच पातळ्यांवर अतिशय आव्हानात्मक असा होता पण तो तसा असूनही अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे पूर्ण झाला होता. अशा प्रकारच्या आव्हानात्मक ट्रेकचं प्लॅनिंग करताना बऱ्याच गोष्टी एक लिडर म्हणून मला कराव्या लागल्या. 'समग्र हरिश्चंद्रगड' विस्तृतपणे तुम्हा सर्वांपुढे मांडण्याचं कारण एवढंच की नंतर कुणाला अशा प्रकारच्या ट्रेक्सचं आयोजन करायचं असेल तर अशा प्रकारच्या ट्रेकमधे कोणत्या गोष्टी प्रयत्नपूर्वक अंमलात आणाव्या लागतात हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावं हेच आहे.
🚩 उ - १) सहकाऱ्यांचं मनोधैर्य, प्रेरणा --
वाटांचा क्रम मुद्दामच counter clockwise म्हणजे घडाळ्याच्या काट्याच्या उलट ठेवला होता असं मी पहिल्या भागात सांगितलं होतं. अर्थात हे असं करायचं आम्ही का ठरवलं होतं याचं कारण आता सांगतो. पहिल्या दोन दिवसांतच तोलारखिंड ते बेटाची नळीपर्यंतच्या १६ आणि सादडे घाट, करपदरा धरून १८ वाटा आमच्या करून झाल्या होत्या. कोकणातल्या वाटा मोठ्या असूनही २५ मधल्या १८ वाटा पहिल्या दोन दिवसांतच झाल्यामुळं एकूणच सगळ्या संघावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला त्यामुळं लव्हाळी, पाचनईकडील वाटा आधी संपवून टाकण्याचं प्लॕनिंग केलं होतं. नंतरच्या कोकणातल्या घाटवाटा अवघड असूनही त्या सर्व संघाच्या वाढलेल्या मनोधैर्यामुळं करणं आम्हाला खूपच सोपं गेलं.
पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण टिमचं मनोधैर्य टिकवून ठेवणं, ते कायमच उच्च ठेवणं, वेळोवेळी सहकाऱ्यांना प्रेरणा देत राहणं ही ट्रेक लिडरची जबाबदारी असते आणि त्या परीक्षेत केवळ योग्य प्लॕनिंगमुळं मी पहिल्या दोन दिवसांतच उत्तीर्ण झालो. समजा हच क्रम उलटा केला असता तर पहिल्याच दिवशी जुन्नर दरवाज्याची वाट आणि तारामती घळ अशा दोन्ही दिग्गज वाटा कराव्या लागल्या असत्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा तवली, खुर्द्याचा दरा, रोहिदास घळ आणि माकडनाळ करावी लागली असती. या प्लॕनिंगमधे आमच्या दोन दिवसांत फक्त सहाच वाटा झाल्या असत्या आणि संपूर्ण टिमचं मनोधैर्य खालावलं असतं. संपूर्ण टिमचं मनोधैर्य ट्रेक संपेपर्यंत उच्च ठेवण्याची जबाबदारीही लिडरला पार पाडावी लागते. योग्य प्लॕनिंगमुळं 'दोन दिवसांतच एवढया वाटा केल्यात तर पुढच्याही उडवून टाकू' ही मानसिकता त्यातून आपोआपच तयार झाली आणि ट्रेक लिडर म्हणून माझं निम्मं काम तिथंच झालं. 'मनोधैर्य टिकवणं हे नेत्याचं काम असतं' हे वाक्य जरी युद्धभूमी वरून आलेलं असलं तरी ट्रेकींगचं क्षेत्रही त्याला कसं अपवाद असेल? नाही का?
शिवकाळात घडलेले याचे दोन उत्कृष्ट दाखले आपल्याला सभासद बखरीत वाचायला मिळतात. दोन्ही वेळेस प्रत्यक्ष 'भवानी देवी' महाराजांच्या स्वप्नात आली होती. पहिला दाखला मिळतो तो अफजलखान वधाच्या प्रसंगी तर तर दुसरा मिर्झा राजे जयसिंग भेटीच्या वेळी.
🚩 उ - २) ट्रेकची अंमलबजावणी, वाटांची माहिती, ठिकाणं --
ट्रेक लिडरला काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागतात हे बिबट्याच्या प्रसंगावरनं सर्वांच्या लक्षात आलं असेलच पण काही गोष्टी मुद्दाम सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात. ट्रेकपूर्वी झालेल्या मिटिंग्समधे एकूणच सगळ्या वाटा कशा आहेत, कुठे आहेत, त्याचा अवघडपणा किती आहे किंवा आपल्याला कुठे आणि किती काळजी घ्यावी लागेल, चालणाऱ्या संघाचा म्होरक्या कोण असेल आणि पाठीराखा कोण असेल, प्रत्येकाची जबाबदारी काय असेल वगैरे सगळ्या चर्चा ट्रेकपूर्वीच्या मिटिंग्समधे झाल्यामुळं प्रत्येकाला हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करणं ही काही प्रमाणात वैयक्तिक जबाबदारी वाटू लागली आणि तिथंच हा ट्रेक अर्धा यशस्वी झाला होता. कधीकधी लिडरला असंही करावं लागतं.
🚩 उ - ३) शिस्त --
आम्हा फाल्कनच्या प्रत्येक ट्रेकमधे एक गोष्ट कसोशीने पाळली जाते ती म्हणजे शिस्त. थोडक्यात सकाळी सहा वा़जता सुरू होणारा ट्रेक बरोबर सहा वाजताच सुरू होत होता. ट्रेकची आखलेली दिवसभराची सगळी गणितं ही वेळेवरच अवलंबून असतात त्यासाठी Reverse Engineering चं तंत्र लिडरने उपयोगात आणलेलं असतं त्यामुळं सकाळचं गणित चुकलं की पुढची सगळी गणितं आपोआपच चुकत जातात. जी गोष्ट वेळेची तीच प्रत्येकाने सामाईक सामान उचलण्याची. प्रत्येकाने जे सामाईक सामान आहे ते बरोबरीने उचलायला हवं आणि ते प्रत्येकजण उचलतोय की नाही याची खात्री दररोज लीडरने करायला हवी.
ट्रेकमधे फक्त काही जणांवरच कामाचा भार पडू नये म्हणून प्रत्येकाला थोडीफार कामं नेमून दिली जातात. एखाद्याने काम केलं नाही तर साहजिकच त्याच्या कामाचा ताण दुसऱ्यावर पडतो आणि त्याची तक्रार लगेचच लीडरकडे येते. अशावेळी तिचं वेळीच निराकरण, तेही कुणाचं मन न दुखवता होणं गरजेचं असतं. 'Home Sickness' आल्यामुळं अशा वेळी छोट्या छोट्या खटक्यांचं पर्यवसान मोठ्या भांडणात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं सगळ्या ग्रूपचं बाँडींग निदान ट्रेक संपेपर्यंत तरी रहावं यासाठी असं 'Damage Control' ट्रेक लिडरला वेळीच करावं लागतं. हे असं जर वेळीच झालं नाही तर पुढे जाऊन खुप मोठी समस्या उभी राहते. हे असं प्रत्येक ट्रेकला, खास करुन जंबो ट्रेकला तर हे दररोज करावंच लागतं. प्रत्येक जंबो ट्रेकमधे आम्ही हे जसं करतो तसं याही ट्रेकला दररोज संध्याकाळी यासाठी थोडा वेळ राखून ठेवला होता. रात्रीच्या जेवणानंतर वेळात वेळ काढून न चुकता आम्ही हे काम करत होतो.
🚩 उ - ४) दृढनिश्चय --
ट्रेकमधे सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे दृढनिश्चय. 'हा ट्रेक कितीही अवघड असला तरी आपण तो उत्तम रितीने पूर्ण करणार आहोत' असा दृढनिश्चय एकदा का तुम्ही केलात की आपोआपच तुमची पावलं त्याच्या यशाकडं वळू लागतात. यश मिळेपर्यंत ट्रेक लिडरने सोबत्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता उच्च ठेवण्यासाठी कायमच त्यांना Motivate करणं, प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. स्वयंशिस्त, समर्पणवृत्ती आणि दृढनिश्चय या बळावरच यशाचं शिखर गाठता येतं हे ट्रेक लिडरने नेहमीच लक्षात ठेवायला हवं. फाल्कन्सच्या प्रत्येक ट्रेकमध्ये योग्य प्लॅनिंगसोबतच ही गोष्ट ट्रेक लिडर कसोशीने पाळत असतो त्यामुळं आम्ही ठरवलेले अवघड, अनवट ट्रेक्सही उत्तम रीतीने पूर्ण होतात आणि असे उत्तम रीतीने पूर्ण झालेले ट्रेक्स अप्रत्यक्षपणे तुमचा आत्मविश्वास वाढवतच असतात.
उ - ५) पर्यावरणपूरक ट्रेकिंग --
ही गोष्ट हल्ली फारच महत्वाची झाली आहे. प्लॅस्टीकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हरिश्चंद्रगडावर असलेल्या प्रत्येक हॉटेलमधे जेवणासाठी प्लॅस्टीकच्या डिश दिल्या जातात. फक्त हरिश्चंद्रगडावर नाही तर प्रत्येक किल्ल्यावर हेच चित्र दिसून येतं. एक ट्रेकर म्हणून आपली पहिली हीच जबाबदारी आहे की आपण स्वतः प्लॅस्टीकचा वापर टाळला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही तो करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे किंवा त्यांच्यात जागरूकता तरी निर्माण केली पाहिजे. यासाठी आम्ही फाल्कन्स प्रत्येक ट्रेकला जाताना जेवणासाठी घरून ताटल्या घेऊन जातो. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या कधीच विकत घेत नाही तर नेलेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतो. इतकी वर्ष मी ट्रेकींग करतोय पण डोंगरातलं पाणी पिऊन मी आजारी पडलोय असं कधीच झालेलं नाही. अर्थात हा अनुभव प्रत्येक ट्रेकरला आला असेलच.
🚩 उ - ६) स्थानिकांच्या समस्या समजावून कार्यरत राहणे --
याचाच एक भाग म्हणून आम्ही फाल्कन्सनी जे वचन बैलपाड्यातल्या आश्रमशाळेच्या शिक्षकवृंदाला दिलं होतं त्याच्या वचनपूर्तीसाठी ट्रेकहून आल्यावर ०९ फेब्रुवारीला आम्ही पुन्हा शाळेला भेट देऊन मुलांसाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी देऊन आलो. खरंतरं 'एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या' हाताला सुद्धा कळू देऊ नये असं म्हणतात पण हे इथे हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे आपल्यासारख्या सुखसोयींनीयुक्त अशा जीवनमानात जगत असलेल्या शहरी मंडळींची परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत असलेल्या मंडळींना मदत करणे ही नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं म्हणूनच इथं मुद्दाम सांगावंसं वाटलं. आम्ही शाळेला कोणत्या वस्तू दिल्या हे वाचून तुम्हाला अशी मदत करायची झालीच तर त्यांच्या गरजा नेमक्या काय आहेत हे नक्कीच समजून येईल.
१) Incinerator for Girls
२) ४०० कापडी पिशव्या
३) ग्रंथालयासाठी २५० पुस्तके
४) १२ देशी रोपे
# या व्यतिरिक्त आमच्याबरोबर वाटाड्या म्हणून नेहमीच येणाऱ्या आणि इतरही ट्रेकर्ससाठी डोंगरदऱ्यात धोका पत्करून ट्रेक घडवून आणणाऱ्या बैलपाड्याच्या मनोज खाकरचा आम्ही पाच लाखांचा विमा उतरवला आहे आणि दरवर्षी त्याचं नूतनीकरण देखील करणार आहे. तैलबैलाची घटना ताजी आहे. जाणाऱ्या माणसाच्या मागं त्याच्या कुटुंबाची वानवा होऊ नये म्हणुन आम्हा फाल्कन्सचा हा छोटासा प्रयत्न.
भूगोलाच्या आणि पर्यावरणाच्या सखोल अभ्यासासोबतच निसर्ग संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची योग्य सांगड घालत आम्ही ही भटकंती पूर्ण केली. अशा प्रकारे केलेली भटकंती तुम्हाला कायमच पुढील भटकंतीसाठी प्रेरणा देत असते. आमचंही काहीसं असंच झालंय. सह्याद्रीतल्या अशा अनगड वाटेवरच्या डोंगरयात्रा तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीपेक्षाही जास्त मानसिक सक्षम आणि निर्णयक्षम बनवत असतात. एवढंच नाही तर तुमच्यात प्रचंड सहनशीलता देखील निर्माण करतात. लेखाच्या शेवटी समर्थांचे काही निवडक श्लोक सांगून थांबतो...
सावध चित्ते शोधावे ।
शोधोनी अचूक वेचावे ।
वेचोनी उपयोगावे ।
ज्ञान काही ॥
जितुके काही आपणासी ठावे ।
तितुके हळुहळु सिकवावे ।
शाहाणे करूनी सोडावे ।
बहुत जन ॥
शरीर परोपकारी लावावे ।
बहुतांच्या कार्यास यावे ।
उणे पडो नेदावे ।
कोणी येकाचे ।।
बहूत काय लिहिणें। लेखनसीमा।
🚩 🚩 🚩
🚩 नकाशा -
१) हरिश्चंद्रगड नकाशा गुगलवरून साभार
२) २५ वाटांचा to scale नकाशा निनाद बारटक्के यांच्याकडून
🚩 फोटो -
१) प्रवीण सोनवणे
२) शिवाजी शिंदे
३) राजेंद्र क्षीरसागर
४) अजय शेडगे
५) जितेंद्र परदेशी
६) संजय मालूसरे
🚩 संदर्भ -
१) विकिपीडिया
२) सभासद बखर
समाप्त.
खुप सुंदर साजेसे आणि समर्पक गिर्यारोहण प्रवासात्मक वर्णन....!
उत्तर द्याहटवाखूप छान, फोटो पण छान. सर्वांचे कौतुक.
उत्तर द्याहटवाMicro planing and with respect to that well executed. Heartily congratulations for all kudos.
उत्तर द्याहटवाAll the best for such new expenditures...
Well done !
खूप माहितीपूर्ण लेख आणि सुंदर छायाचित्रांमुळे लेख अधिक भावला.
उत्तर द्याहटवा