"रायगड प्रभावळ परिक्रमा"
🚩 'पूर्वरंग' 🚩
दिवाळी संपून थंडीची चाहूल लागायला लागली की आम्हा फाल्कन्सना वेध लागायला लागतात ते वर्षानुवर्षाच्या प्रथेप्रमाणे वर्षाअखेरीस येणार्या जंबो ट्रेकचे. साधारण डिसेंबर महिन्यात असणाऱ्या या जंबो ट्रेकचं प्लॅनिंग खरंतर आम्हां फाल्कन्सची कोअर टीम जून महिन्यापासूनच करायला सुरूवात करते. गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही फाल्कन्स थीम बेस्ड जंबो ट्रेक करत आलो आहोत. 'आपल्या जंबो ट्रेकच्या सह्यमंडळाचा आवाका, रसद पुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि मुख्य म्हणजे सुट्ट्यांची उपलब्धता पाहून कमीत कमी दिवसांत उत्तम आणि काहीशा वेगळ्या' अशा थीम बेस्ड ट्रेकची आखणी करणं तसं काहीसं कौशल्याचंच काम असतं. पारंपारिक किंवा चाकोरीबद्ध भटकंतीला फाटा देऊन कायमच नाविन्याचा ध्यास घेत आम्ही फाल्कन्स आत्तापर्यंतचा प्रत्येक जंबो ट्रेक हा थीम बेस्डच करत आलो आहोत. खरंतर अशा ट्रेकचं प्लॅनिंग करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासासोबतच तुमचा भूगोल देखील पक्काच असावा लागतो. मुख्य म्हणजे तुमची प्लॅनिंग टीम प्रत्येकवेळी नाविन्याच्या ध्यासाची दांडगी इच्छाशक्ती असणारी, उत्तम निर्मितीक्षम तर ट्रेकची अंमलबजावणी करणारी टीम चांगली निर्णयक्षम आणि केलेल्या नियोजनाची तंतोतंत अंमलबजावणी करणारी असावी लागते. भटकंतीचं योग्य नियोजन करून त्याची जशी ठरवली आहे तशी परिपूर्ण अंमलबजावणी केली तरच त्याचा सुखद समारोप करता येतो असं माझं स्पष्ट मत आहे. नियोजन, अंमलबजावणी आणि समारोप अशा सर्वच पातळ्यांवर खरंतर Trek Leader चा कस लागत असतो. कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा याची निर्णयक्षमता सुद्धा Trek Leader कडे असावी लागते. ट्रेक यशस्वी होण्यासाठी बरेचदा team members चा वाईटपणा घेऊनही काही निर्णय Trek Leader ला घ्यावे लागतात. सर्व गोष्टींमध्ये सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेकमधली शिस्त आहे. फाल्कन्सच्या ट्रेकमध्ये शिस्त कसोशीनेच पाळली जाते आणि हेच फाल्कन्सच्या यशस्वीतेमागचं गमक आहे. वर्षभरात केलेल्या एकदोन दिवसाच्या म्हणजे अलंग चोरवाट, चिकणदरा, नांगरदार, खूट्याची वाट, काट्याचा पूड अशा कित्येक शोधमोहिमांमुळं वाढलेल्या आत्मविश्वासातूनच तर वर्षाच्या अखेरीस असलेल्या जंबोट्रेकची पायाभरणी होत असते. फाल्कन्सच्या अवघड मोहिमा यशस्वी पूर्ण होण्यामागचं कारण योग्य नियोजन, परिपूर्ण अंमलबजावणी, शिस्त आणि भटकंती संघाची योग्य निवड हेच आहे.
फाल्कन्सनी मागं केलेल्या जंबो ट्रेक्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकाच दिवसांत 'हरिश्चंद्रगड प्रदक्षिणा', छत्रपती शिवरायांच्या 'प्रतिज्ञेपासून प्रतापाकडे' म्हणजेच रायरेश्वर ते प्रतापगड, सुभेदार तान्हाजी मालूसरेंच्या 'कर्मभूमीपासून दहनभूमीपर्यंत' म्हणजेच सिंहगड ते उमरठ, ट्रान्स सह्याद्रीचा एक भाग असलेली भटकंती म्हणजेच 'भीमाशंकर ते माळशेज', भंडारदारा धरणाची त्याच्याच आजूबाजूला असलेल्या दिग्गज डोंगरांवरून दोन दिवसांत केलेली प्रदक्षिणा म्हणजेच 'भंडारदरा सर्किट', हरिश्चंद्रगडाच्या पाच दिवसांत पंचवीस वाटांची केलेली भटकंती म्हणजेच 'समग्र हरिश्चंद्रगड', सहा दिवसांत १५६ किलोमीटर संपूर्ण चालत केलेली 'जावळीतील सप्त शिवालय' भटकंती आणि गेल्यावर्षी केलेल्या वरंध घाट ते खंडाळा घाट दरम्यानच्या १४ नदीउगमांना जोडलेली 'नीरा उगम ते इंद्रायणी उगम' अशी बाईक अँड हाईक भटकंती अशा अनेक थीम बेस्ड ट्रेकची नावं सहजपणे सांगता येतील.
🚩 ट्रेक संकल्पना -
एवढं सगळं आत्ताच सांगायचं कारण इतकंच की यावर्षी सुद्धा शिवकालीन साधनांतील संदर्भ घेऊन अर्वाचीन भूगोलात केलेली भटकंती, शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिकतेचा कस देखील लागेल अशी भटकंती, जुन्या मोडलेल्या वाटांचं मॅपिंग करणारी भटकंती आणि नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत असलेली नदीची नैसर्गिक परिसंस्था जसं जंगले, देवराया यांचं पुनरूज्जीवन आणि याबाबतीतला social awareness अशा अनेक थीम डोळ्यापुढं होत्या. या प्रत्येक थीमचे एकदोन पर्याय देखील आमच्याकडं तयार होते पण प्रत्येकाच्या सुट्टीचे दिवस, भटकंती दरम्यानचा रसद पुरवठा, वाहतूक व्यवस्था, ट्रेकसाठी होणारा खर्च या सर्वांवर अनेकवेळा काथ्याकूट करून झाल्यावर अखेर जंबो ट्रेकच्या अनेक पर्यायांमधून फाल्कन्सच्या अशाच एका नाविन्यपूर्ण जंबो ट्रेकची वर्णी अखेर सहजपणे लागून गेली. खलबतावर खलबतं करून झाल्यावर वर्णी लागलेला कोणता होता तो भाग्यवान ट्रेक? तर तो होता सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणीत केलेल्या एका अभिनव प्रयोगाच्या भटकंतीचा "रायगड प्रभावळ परिक्रमा"
🚩 "रायगड प्रभावळ परिक्रमा" 🚩
🚩 'आख्यान' 🚩
ट्रेकचं नाव 'रायगड प्रभावळ परिक्रमा' असं ठेवण्यामागंही एक कारण आहे. 'प्रभावळ' आणि 'परिक्रमा' असे दोन शब्द ट्रेकच्या नावांत आले आहेत त्याचा अर्थ समजून घेतला म्हणजे ट्रेकच्या नावाचं प्रयोजन लगेचच लक्षात येईल. काय आहे ते प्रयोजन? चला पाहूया...
🚩 'प्रभावळ'
मूर्तींच्या पाठीमागें चांदी वगैरे धातूंची जी महिरप करतात तिला सामान्यपणे प्रभावळ असं म्हणलं जातं. प्रभावळ किंवा प्रभावळी हा स्त्रीलिंगी शब्द संस्कृत प्रभा म्हणजे तेज आणि आवलि म्हणजे ओळ असा मिळून तयार झाला आहे. बाजूला असलेल्या ज्या गोष्टीमुळं मधल्या मुख्य गोष्टीवर परिणामकारक प्रभाव पडेल अशी गोष्ट म्हणजे प्रभावळ. या प्रभावळीत किंवा अगदी मंदिराबाहेर असलेल्या शिल्पकलेतसुद्धा पुराण, हिंदू, जैन, वज्रयान बौद्ध धर्माच्या मान्यता आणि मंदिरशास्त्रानुसार मुख्य मुर्तीभोवतीच्या आठ दिशांना आठ रक्षकांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आढळून येतात. सामान्यपणे यांना अष्ट-दिक्पाल असं म्हटलं जातं. दिक् म्हणजे दिशा आणि पाल म्हणजे पालक अथवा रक्षक. हे अष्ट-दिक्पाल प्रभावळीत असलेल्या मुख्य देवतेच्या आठ दिशांचे रक्षक असतात. सतराव्या शतकात दुर्ग बांधणीची शिवाजी महाराजांनी राबवलेली "दुर्गपुंज" ही दुर्ग संरक्षणासाठीची कल्पना याच अष्ट-दिक्पालांच्या संकल्पनेवर आधारलेल्याचं दिसून येतं.
किल्ल्यांच्या दृष्टीने विचार करता जसे अष्ट-दिक्पाल आठ दिशांचे रक्षणकर्ते तसेच प्रभावळीत असलेले किल्ले हे मुख्य किल्ल्याचे रक्षणकर्ते असतात. मुख्य किल्ल्याच्या संरक्षणाच्या अथवा बळकटीच्या दृष्टीने त्याच्या सभोवताली उभारलेल्या उपदुर्गांचा विळखा म्हणजे 'किल्ल्याची प्रभावळ' असं म्हणता येईल. यालाच 'दुर्गपुंज' म्हणजेच 'Fort Cluster' किंवा 'किल्ले समूह' असं देखील म्हणता येईल. महत्वाच्या किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटांवर चौकीवजा किल्ल्यांची मुद्दाम उभारणी केली जाते. अशा प्रभावळीतील किल्ल्यांना मुख्य किल्ल्याचे रक्षक अथवा पहारेकरी दुर्ग म्हणतात. अशा किल्ल्यांचा उपयोग मुख्यत्वे टेहळणीसाठी केला जातो पण प्रसंगी हेच किल्ले मुख्य किल्ल्यावर होणाऱ्या हल्ल्याला काही काळ थोपवण्याचं देखील काम करतात. खास मराठ्यांची ही बांधकामशैली असल्यामुळं असे दुर्गपुंज फक्त महाराष्ट्रातच दिसून येतात. सतराव्या शतकातील 'दुर्गपुंज' हा दुर्गबांधणीतील शिवाजी महाराजांचा अभिनव प्रयोग खरंच अफलातून आहे. महाराजांचा हा प्रयोग खरंतर परंपरेला छेद देऊन अभिनवतेची कास धरणारा म्हणता येईल, जो नंतरच्या काळात यशस्वी झाल्याचंही आपल्याला दिसून येतं.
राजधानी रायगडाच्या प्रभावळीत मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, कावळागड, मोहनगड, मंगळगड, चांभारगड, सोनगड, दासगाव आणि पन्हाळघर असे साधारणपणे १० किल्ले आहेत. यापैकी कोकणदिवा, लिंगाणा, कावळा हे किल्ले अथवा वाटचौक्या काळ नदीच्या खोऱ्यात आहेत. चांभारगड, सोनगड हे किल्ले गांधारी आणि सावित्री नदीच्या खोऱ्यात आहेत तर दासगाव, पन्हाळघर, कुर्डुगड, मानगड हे किल्ले काळू अथवा काळ नदीच्या खोऱ्यात आहेत.
🚩 'परिक्रमा'च का? 'प्रदक्षिणा' का नाही?
रायगडाची एक दिवसाची प्रदक्षिणा बहूतेक जणांनी केली असेलच. ही प्रदक्षिणा रायगडाच्या चित् दरवाज्यापासून सुरू करून रायगडवाडी, टकमकवाडी, धनगरवाडा, धारमिंड खिंड, काळकाईची खिंड, हिरकणीवाडी ते पुन्हा चित् दरवाजा अशी साधारणपणे करतात. आम्ही फाल्कन्स यावर्षी करणार असलेली प्रदक्षिणा काहीशी वेगळी होती. रायगडाच्या प्रभावळीत जे दहा किल्ले आहेत त्या दहा किल्ल्यांना जोडून आम्ही रायगडाला प्रदक्षिणा घालणार होतो. खरंतर रायगडाला आम्ही प्रदक्षिणाच मारणार होतो मग ट्रेकच्या नावात परिक्रमा कसं काय आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडल्यावाचून राहणार नाही. तर परिक्रमा आणि प्रदक्षिणा यात किंचित फरक आहे. काय आहे तो? चला पाहूया...
प्रदक्षिणा आणि परिक्रमा हे दोन्ही संस्कृत प्रचुर शब्द असल्यामुळं दैवादिक पवित्र कार्य करताना बहूतेक ते वापरले जातात. प्रदक्षिणा आणि परिक्रमा या दोन्ही शब्दांचा अर्थ वळसा घालणे असा जरी असला तरी त्यात किंचित फरक आहे. प्रदक्षिणा म्हणजे देवतेच्या मूर्ती किंवा मंदिराभोवती जवळून वळसा घालणे. प्रदक्षिणेचा एक साधा मंत्र ती का घालावी याचा अर्थ स्पष्ट करतो.
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च।
तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिण पदे पदे॥
प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलावर गेल्या अनेक जन्मांमध्ये केलेली सर्व पापे नष्ट होतात असं समजलं जातं पण ही प्रदक्षिणा...
प्रदक्षिणायां प्रकृष्टेन दाक्षिण्यं कुशलता।
म्हणजेच मूर्ती किंवा मंदिराच्या जवळून घालायची असल्याने त्यासाठी थोड्याच कौशल्याची आवश्यकता असते. परिक्रमेचं मात्र तसं नाही हे पुढील सुभाषितावरून स्प्ष्ट होईल.
परिक्रमणं पादविक्षेपे।
परि उपसर्ग पूर्वक क्रमु पादविक्षेपे +घञ्।
म्हणजेच परिक्रमेत देवतेच्या जन्मस्थानाचं, लीलास्थळाचं, आजूबाजूला असलेल्या देवीदेवतांचं दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त अंतरावरून प्रदक्षिणा करावी लागते. थोडक्यात परिक्रमा म्हणजे मुख्य देवतेपासून ठराविक अंतरावर असलेल्या त्याच्या सर्व लीलास्थळांना जोडून केलेली प्रदक्षिणा. परिक्रमेत प्रदक्षिणेचाच अंतर्भाव असतो पण तो काहीसा व्यापक असतो. परिक्रमेच्या अर्थासारखाच त्याचा आवाका देखील तितकाच व्यापक आहे.
'दुर्गदुर्गेश्वर रायगड' हा समस्त भटक्यांसाठी आणि शिवप्रेमींसाठी एक तीर्थक्षेत्र आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही त्यामुळं या तीर्थक्षेत्राला त्याच्या प्रभावळीत असलेल्या किल्ल्यांना जोडून मारलेल्या फेरीला प्रदक्षिणेऐवजी परिक्रमा म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल त्यामुळं आम्ही आमच्या भटकंतीचं नाव 'रायगड प्रभावळ परिक्रमा' असं सार्थ ठेवलं होतं
🚩 ट्रेक प्लॅनिंग -
चर्चेत त्यातल्या त्यात कमी अंतराचा, कमी वेळ लागेल, सुरक्षित आणि कमी त्रासाचा मार्ग कोणता यावर आता पुढील चर्चा सुरू झाली. उपलब्ध अशा सगळ्या पर्यायांवर चर्चा करून अखेर मानगडापासून मंगळगडापर्यंतची सर्वसंमतीनं मार्गनिश्चिती झाली. आता या मार्गावर वाटचालीसाठी लागणारा वेळ पाहून त्यानूसार मुक्कामायोग्य ठिकाणं निवडणं यावर काम सुरू झालं. आमच्या किल्ल्यांच्या यादीत लिंगाणा सुद्धा होता पण लिंगाणा माथा गाठण्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज होती त्यामुळं आम्ही फक्त त्याच्या पायाशी डोकं टेकवून पुढं जाणार होतो आणि त्यासाठी बोराटा नाळेशिवाय पर्याय नव्हता. या भटकंतीत बोराटा नाळेसारख्या एकूण सहा घाटवाटा आम्ही करणार होतो. या प्रत्येक घाटवाटेला लागणारा वेळ, त्या घाटवाटांचा चढाई-उतराईचा क्रम, किल्ले दर्शनासाठी लागणारा वेळ या सर्वांचं गणित जुळवून मुक्कामाची ठिकाणं नक्की केली.
मंगळगडापासून पुढचे चांभारगड, सोनगड, दासगाव आणि पन्हाळघर हे किल्ले सावित्री नदीच्या खोर्यातल्या सपाटीवर होते आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर किंवा महामार्गाला जोडलेल्या डांबरी सडकेवर होते. या सर्वाना रस्त्यारून जोडायचं तर जवळजवळ शंभर किलोमीटर रस्त्यावरून चालावं लागलं असतं. जावळीतील सप्त शिवालयांचा जंबो ट्रेकमध्ये आमचं बहूतेक चालणं हे डांबरी सडकेनं झालं होतं. आता या जंबो ट्रेकला सुद्धा आमचं बरचसं चालणं हे डांबरी सडकेनंच होऊ घातलं होतं. डांबरी सडकेवरचं चालणं अतिशय त्रासदायक होतं याचा अनुभव गाठीशी असल्यामुळं आम्ही गेल्यावर्षीसारखाच यावर्षी देखील आमच्या प्लॅनिंगमध्ये थोडासा बदल केला. आमचा हा ट्रेक देखील आम्ही 'Bike & Hike' अशा प्रकारचा करायचं ठरवलं. थोडक्यात जिथं रस्ता आहे तिथं म्हणजे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही सायकलिंग करणार होतो. ज्यामुळे आमच्या एकूण प्लॅनिगमधला आणखी एक दिवस कमी झाला आणि ट्रेक चार दिवसांचा झाला. सोनगड, दासगाव हे किल्ले तावली टोकापासून किंवा पुनाडेपासून फुटलेल्या एकाच डोंगररांगेवर आहेत आणि पन्हाळघर हा किल्लादेखील या रांगेच्या थोडासाच बाजूला आहे त्यामुळं हे किल्ले आम्हाला चालतही करता आले असते पण पुन्हा एक दिवस वाढला असता, जो उपलब्ध सुट्टीच्या दृष्टीनं आम्हाला कुणालाच परवडणारा नव्हता. जंबो ट्रेक चार दिवसात संपवायच्या दृष्टीनं आम्हाला पुढचे किल्ले सायकलवरूनच करणं योग्य होणार होतं. तसं पाहिलं तर जिथं गाडी जाते ते अंतर आम्हाला गाडीतूनही जाता आलं असतं पण त्याला स्थळदर्शन म्हणता आलं असतं, ट्रेक नाही म्हणून आम्ही यावेळीदेखील सायकल वापरण्याचंच निश्चित केलं. त्यामुळं सर्वांच्याच सुट्टीचा प्रश्न मिटला आणि आमचे Efforts सुद्धा कमी झाले. शेवटी शनिवार-रविवार जोडून हा ट्रेक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर म्हणजे शनिवार ते मंगळवार असा चार दिवसांत करण्याचं नक्की झालं. गाडी पोहोचू शकेल अशा मुक्कामायोग्य जागा निश्चित करून या चार दिवसांचं ट्रेक नियोजन केलं होतं.
इथपर्यंत ट्रेक प्लॅनिंगचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता आता लगेचच पुढच्या म्हणजे दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याचं काम सुरू झालं. ट्रेक मोठा आणि काहीसा अवघड असल्यामुळं सरसकट सगळ्यांनाच घेऊन जाता येणार नव्हतं. WhatsApp message केलेल्या इच्छूकांच्या नावातील निवडक मंडळीना संपर्क करून त्या मंडळींचा एक 'WhatsApp Group' बनवला गेला. यावर्षी काही जुन्या जाणत्या मंडळींसोबत नवीन मंडळीही जोडली गेली होती. हळूहळू पुढची पिढी घडवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. जमलेल्या मंडळींसोबत जंबो ट्रेकबद्दलची सगळी चर्चा आता आम्ही इथंच करणार होतो.
🚩 ट्रेकभीडू -
१) नारायण सुसंगे - वय ३६
२) सिद्धगौडा पाटील - वय ४२
३) जितेंद्र परदेशी - वय ५०
४) मिलिंद गडदे - वय ५८
५) संजय मालूसरे - वय ५६
६) शिवाजी शिंदे - वय ५८
७) नीतू करंजूले - वय ४९
८) सुनील नारखेडे - वय ५१
९) रविंद्र मनकर - वय ५३
१०) महादेव गदाडे - वय ४१
११) जीवन जुनवणे - वय ५१
१२) नितीन फडतरे - वय ५६
१३) पंजाबराव सोन्ने - वय - ५६
१४) प्रभाकर कारंडे - वय ५१
१५) दिलीप वाटवे - वय ५१
१६) रघुरज एरंडे - ४६
१७) बापू तांबे (सारथी) - वय ५२
🚩 ट्रेकच्या जबाबदार्या -
ट्रेक चार दिवसांचा असल्यामुळं प्रत्येकच्या खांद्यावर काहीनाकाही जबाबदारी पडणार होती. ट्रेकला येणारे भीडू नेहमीचेच असल्यामुळं कुणाला कुठली जबाबदारी दिली म्हणजे ती तो जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करेल याचा साधारण अंदाज होता. जबाबदार्या देतानाही काही ठराविक जणांवर कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागणार होती. प्रत्येकाला काय जबाबदारी दिली आणि त्यानं ती कशी पार पाडायची होती ते इथं मुद्दाम देतोय अर्थात त्यामुळं लेख थोडा मोठा होतोय खरा पण जंबो ट्रेकचं प्लॅनिंग करताना खोलवर जाऊन सुक्ष्म योजना बनवावी लागते. ज्याला वेगळ्या अशा जंबो ट्रेकचं प्लॅनिंग करायचं आहे त्याला उपयोगी पडावं म्हणून मुद्दाम इथं देत आहे.
१) Contribution जमा करणं - आम्ही फाल्कन्स काही व्यावसायिक भटकंती करत नाही त्यामुळं खात्यावर जमा झालेली रक्कम साहजिकच उत्पन्न म्हणून दाखवू शकत नाही. शिवाय हल्ली Income tax return file करताना प्रत्येकाला त्याच्या खात्यावर आलेल्या पैशांचा चोख हिशोब द्यावा लागतो. एकाच्याच नावावर ट्रेकचं सगळं Contribution जमा झालं तर ती जमा झालेली मोठी रक्कम tax return file करताना दाखवायला अवघड गेलं असतं म्हणून मी, जितेंद्र परदेशी, मिलिंद गडदे आणि रविंद्र मनकर अशी चार जणांनी ही जबाबदारी विभागून घेतली होती. त्यातही काही जणांना रविंद्र मनकर यांच्याकडं रोख आणि जास्तीतजास्त सुट्ट्या स्वरूपातली रक्कम जमा करायला सांगितलं होतं. आम्हाला खर्च करण्याच्या ठिकाणी नेटवर्क नसेल किंवा ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसेल अशा ठिकाणी रोख रकमेची गरज भासणार होती.
२) बस मॉनिटर - बस मॉनिटरकडं तशी बरीच कामं होती त्यातही सुरूवातीलाच करायचं एक काम म्हणजे प्रत्येकाला सोईस्कर होईल असे बस स्टॉप आणि त्यांच्या वेळा ठरवणं हे होतं. चारही दिवस आमची बस आदल्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून निघून दुसर्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी थेट येणार होती. ड्रायव्हरला पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा रस्ता समजावणं, वाटेत खरेदी करण्याच्या सामुग्रीची यादी देणं आणि त्यासाठी त्याच्या पैशांची तजविज करणं, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून मुक्कामायोग्य ठिकाण शोधणं आणि चपात्यांसाठी सोबत घेतलेली कणीक एखाद्या घरात देऊन त्यांच्याकडून त्या बनवून घेणं, त्यांची बिदागी ठरवणं आणि ही सर्व कामं चारही दिवस ड्रायव्हरशी coordination ठेवून करून घेणं अशी सर्व महत्वाची कामं बस मॉनिटरला करावी लागणार होती. बस मॉनिटरच्या कामात अवलंबित्व प्रचंड होतं. एखादं काम स्वतः करणं सोपं असतं पण दुसर्याकडून ते फोनवर बोलून करून घेणं हे मात्र खूपच अवघड असतं पण या कामासाठी आम्ही भीडू मोठा नामी निवडला होता नितीन फडतरे. हे नितीन फडतरे टाटा मोटर्समध्ये मॅनेजर पदावर बरीच वर्षे काम करत असल्यामुळं त्यांना लोकांकडून काम करून घ्यायचा चांगलाच अनुभव होता. आमच्या दृष्टीनं त्यांच्याखेरीज बस मॉनिटरचं काम दुसरं कुणीच चांगलं केलं नसतं.
३) What to bring ची यादी तयार करणं - एकदिवसीय किंवा दोन दिवसांच्या ट्रेकला लागणार्या गरजेच्या वस्तूंची यादी तयार करणं तसं सोपं असतं पण चार दिवसांची यादी तयार करायची तर ते खूपच अवघड असतं. शहरी भागात राहत असल्यामुळं आपल्याला कोणत्याही गोष्टीची 'तरतूद' करणं सवयीत नसतं. आयत्यावेळी कोणतीही गोष्ट लागली तरी आपण ती पटकन दुकानातून आणतो पण चार दिवस आमचा प्रवास अशा भागातून होता की तिथं काही मिळणं अवघडच नाही तर दुरापास्तच होतं त्यामुळं अगदी बारकाईनं ही What to bring ची यादी तयार करावी लागणार होती आणि गरजेच्या वस्तू नेमक्या कोणत्या हे एका गृहीणीपेक्षा कोण अधिक चांगलं सांगू शकेल? बरोबर ना? त्यामुळं आम्ही हे महत्वाचं काम आमच्यासोबत ट्रेकला येणार्या एकमेव गृहीणीकडं दिलं होतं नीतू करंजूले यांच्याकडं. स्वतः स्थापत्य अभियंता असलेल्या नीतू करंजूले मॅडम घर सांभाळून मिस्टरांना त्यांच्या बांधकाम व्यवसायात देखील मदत करतात त्यामुळं या कामासाठी आम्ही एकदम योग्य व्यक्ती निवडली होती.
🚩 What to bring for trek
1) Sack
2) Shoes, Sleeper
3) Socks - 03 pair
4) Inner garment - 01 set
5) Night dress, Spare dress - 01 each
6) Warm pullover, Monkey cap
7) Sleeping bag
8) Personal medical kit
9) Knee cap
10) Water - minimum 03 ltrs
11) Breakfast and Lunch Tiffin
12) Cold Creem
13) Mobile, Powerbank
14) Torch with two set of spare batteries
15) Tooth brush, Tooth paste
16) Plate, Spoon, Tea cup, Bowl
17) Carrymat
18) Suncap
# या सामानाच्या व्यतिरिक्त खाण्याचे सामान थोडे equipment सर्वात मिळून उचलावे लागेल त्यामुळं सॕक पुरेशी मोठी आणावी.
४) ट्रेक दरम्यान प्रत्येकाचे मोबाईल आणि वॉकी-टॉकी चार्जिंग करणं - आम्ही फाल्कन्स दोन आणि त्यापेक्षा जास्त दिवसांचे ट्रेक बरेचदा करतो आणि हे करत असताना आम्हाला आमचे मोबाईल आणि वॉकी-टॉकी चार्जिंग करण्याची मोठी समस्या येत असे त्यासाठी आम्ही एकाचवेळी सोळा मोबाईल चार्जिंग करता येतील असं एक चार्जिंग युनिटच तयार करून घेतलंय. या युनिटमध्ये टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, प्लायर, एक्टेंशन केबल, वायर स्ट्रिपर, बल्ब अडॅप्टर, इन्सूलेशन टेप अशा गरजेच्या सर्व गोष्टी आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या मंदीरातल्या लाईट बोर्डवर चार्जिंगसाठी सॉकेट असतं पण ते बरेचदा बंद असतं पण देवावरचा दिवा मात्र चालू असतो अशावेळी उपयोगी पडेल असं बल्ब अडॅप्टर आम्ही खास आमच्या चार्जिंग युनिटमध्ये ठेवलं होतं. समजा एखाद्या ठिकाणी मंदीराऐवजी शाळेत मुक्काम करावा लागला तर तिथं बाहेर साधा लाईटही नसतो अशावेळी आमचं बॅकअप व्हेईकल म्हणजे आमची टेम्पो ट्रॅव्हलर उपयोगी पडते. गाडीच्या बॅटरीवर चालणारं एक एलीडी लाईटचं युनिटही आम्ही तयार करून ठेवलंय जे नेहमीच आमच्यासोबत ट्रेकमध्ये असतं. शिवाय आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये खास इन्व्हर्टर बसवलेला आहे त्यामुळं अगदीच गरजेच्या वेळी आम्ही मोबाईल आणि वॉकी-टॉकी चार्जिंग युनिट त्याला जोडून मोबाईल आणि वॉकी-टॉकी चार्जिंग करू शकतो. चार्जिंगचं हे काम देखील आम्ही नीतू करंजूले मॅडम यांच्याकडंच सोपवलं होतं. घरी चहा प्यायला तर कप पण कुणी उचलत नसतील पण ट्रेकमध्ये मात्र आम्ही कोणत्याही गृहीणीला फार जड काम देत नाही. याही ट्रेकला आम्ही आमचा हा नियम कसोशीने पाळणार होतो.
५) ट्रेकमध्ये योग्य जागा पाहून जेवणाची आणि नाश्त्याची ठिकाणं ठरवणं - आम्ही करणार असलेल्या ट्रेकचा संपूर्ण मार्ग मला तोंडपाठ होता त्यामुळं सर्वांना एकत्र बसून जेवता येईल, पाण्याची आणि शेल्टरची सोय असेल अशा जागा मला माहीत होत्या त्यामुळं हे काम साहजिकच माझ्याकडं आलं होतं.
६) दिवसभरातला हिशोब लिहून ठेवणं आणि ट्रेक झाल्यावर संपूर्ण जमाखर्च सर्वांसमोर मांडणं - हे काम आम्ही रविंद्र मनकर यांच्याकडं दिलं होतं. गेल्या दोन, तीन HATP च्या आणि वर्षभरातल्या बर्याच ट्रेकच्या जमाखर्चाची जबाबदारी रविंद्र मनकर यांनी उत्तम सांभाळली होती त्यामुळं आमच्यादृष्टीनं त्यांच्याशिवाय हे काम चोखपणे कुणीच करणं शक्य नव्हतं.
७) Advance team आणि Back-up team ची जबाबदारी - संपूर्ण ट्रेकमध्ये या दोन्ही टीम्सची जबाबदारी खूप मोठी असते. Advance team ला वाटा शोधाव्याही लागतात आणि टीममधला Weakest मेंबरही सहज जाऊ शकेल अशा वाटेची निवड देखील करावी लागते त्यामुळं अशा टीममध्ये अनुभवी आणि वाटा पक्क्या माहीती असणार्या व्यक्ती असाव्या लागतात. या भागात माझी भरपूर भटकंती झाल्यामुळं या टीममध्ये माझी वर्णी लागली होती पण पुढची पिढीसुद्धा तयार व्हावी यासाठी मी माझ्यासोबत नारायण सुसंगे आणि महादेव गदाडेला सोबत घेतलं होतं. Advance team पेक्षाही Back-up team ची जबाबदारी थोडी जास्त कठीण असते. Back-up team ला दमलेल्या, थकलेल्या मंडळींना सोबत घेऊन ट्रेक पूर्ण करायचा असतो त्यामुळं Back-up team मधली मंडळी मनाने खंबीर, कणखर, चिकाटी असलेली आणि अतिशय सहनशीलता असलेली असावी लागतात. या टीममध्येही आम्ही नव्या-जुन्याचा संगम साधला होता. Back-up team मध्ये जितेंद्र परदेशीसोबत जीवन जुनवणे असे दोघेजण होते.
८) गरजेचं Utencials निवडून, स्वच्छ धुवून ते ट्रेकला घेऊन येणं - ही जबाबदारी आमच्यातल्या सर्वात जेष्ठ असलेल्या मिलिंद गडदेकडे होती. चार दिवसांच्या नाश्ता, जेवण यांच्या मेन्यूच्या अनुशंगाने भांडी निवडणं, गॅस सिलेंडर भरून घेणं, शेगडी पेटवून चालू आहे कि नाही ते पाहणं, सुर्यांना धार लावून घेणं, पाण्यासाठी भरलेले जार आणि डिस्पेंसर घेणं आणि या सर्व वस्तू ट्रेकला सोबत घेऊन येणं या सर्व जबाबदार्या अनुभवी मिलिंद गडदेशिवाय दुसरा कुणीच पार पाडू शकणार नव्हता.
९) नाश्त्याचे-जेवणाचे Daywise मेन्यू ठरवणं आणि त्यानुसार रेशन आणि भाजीची यादी तयार करून त्याची खरेदी करणं - ही जबाबदारी नारायण सुसंगेकडं होती. त्यानं नाश्त्याचं आणि जेवणाच्या मेन्यूचं Daywise प्लॅनिंग असं केलं होतं आणि त्यानुसार रेशन, भाजी अशी घेतली होती.
🚩 शनिवार, दिनांक २७/१२/२०२५
सकाळी सहा वाजता
दूध, चहा, बिस्किट
नाश्ता - घरून
दुपारचे जेवण - घरून
रात्रीचे जेवण - मुक्कामी पाने गावात बनवणे.
मेन्यू - व्हेज मंचाव सूप, आलू मटर, चपाती, भात, कांदा, पापड.
🚩 रविवार, दिनांक २८/१२/२०२५
नाश्ता - मिसळपाव
दुपारचे जेवण - केळद (हॉटेलात आगाऊ ऑर्डर देणे)
रात्रीचे जेवण - शिवथरघळीत बनवणे
मेन्यू - टॉमेटो सूप, टोमॅटो बटाटा रस्सा भाजी, चपाती, कांदा, काकडी
🚩 सोमवार, दिनांक २९/१२/२०२५
नाश्ता - पोहे
दुपारचे जेवण - वरंध घाट/शिरगाव
रात्रीचे जेवण - पिंपळवाडी गावात बनवणे.
मेन्यू - व्हेज मंचाव सूप, पिठलं भाकरी, भात, कांदा
🚩 मंगळवार, दिनांक ३०/१२/२०२५
नाश्ता - शिरा/मॅगी
🚩 किराणा -
१) तेल ०२ लिटर
२) गव्हाचे पीठ ०५ किलो
३) ज्वारी पीठ ०२ किलो
४) पोहे ०१ किलो
५) शेंगदाणे २५० ग्रॅम
६) शेंगदाणे कुट ५०० ग्रॅम
७) बेसन ०१ किलो
८) मॅगी ६ × २ पॅकेट
९) तांदूळ ०२ किलो
१०) टोमॅटो सूप
११) व्हेज मंचाव सूप
१२) दूध पावडर २०० × ६ पॅकेट
१३) चहा अर्धा किलो
१४) साखर ०२ किलो
१५) वेलची पूड ०६ पॅकेट
१६) उडीद पापड ०१ किलो
🚩 मसाले -
१) कांदा लसूण मसाला २०० ग्रॅम
२) मिरची पावडर १०० ग्रॅम
३) धना पावडर १०० ग्रॅम
४) सब्जी मसाला १०० ग्रॅम
५) हळद १०० ग्रॅम
६) अंबारी मिसळ मसाला ५० ग्रॅम
७) मीठ एक किलो
🚩 भाजीपाला -
१) मटार ०२ किलो
२) बटाटे ०२ किलो
३) कांदे ०५ किलो
४) लसूण पाव किलो
५) आले पाव किलो
६) मिरची अर्धा किलो
७) काकडी १२० नग
८) टोमॅटो ०२ किलो
९) कोथिंबीर ०१ गड्डी
🚩 इतर सामान -
१) भिजवलेली मटकी अर्धा किलो
२) फरसाण दीड किलो
३) बारीक शेव पाव किलो
४) व्हाईट ब्रेड ८०० ग्रॅम × ०४ नग
🚩 Equipments For Jumbo Trek
1) Short rope - 02 nos
2) Crab - 05 nos
3) Peg - 03 nos
4) Hammer - 01 no
5) Tarpolin + Small Flex - 01 + 02 nos
6) Falcon Banner - 01 no
7) Koyta - 01 no
8) Helmets - 05 nos (with Tempo for cycling)
११) मुक्कामाच्या ठिकाणी जेव्हाजेव्हा आणि जेवढं पाणी लागेल तेवढं आणून देण्यासाठी संघ निवडणं, स्वयंपाकाची भांडी घासणं आणि मुक्कामानंतरची आवराआवरी आणि न चुकता साफसफाई करणं - या संघात सुनील नारखेडे, संजय मालुसरे आणि पंजाबराव सोन्ने ही मंडळी होती. असं असलं तरी ट्रेकमधला प्रत्येकजण कमीअधिक फरकानं ही कामं करणार होता.
१२) संपूर्ण ट्रेकची Documentary photography करणं - ही जबाबदारी शिवाजी शिंदे आणि जितेंद्र परदेशी यांच्यावर होती. ट्रेकनंतर ब्लॉग लिहिताना मला याचा उपयोग होणार होता. दुसरी गोष्ट अशी की जे काम दहा लेख करत नाहीत ते काम एक व्हिडीओमुळं होतं. व्हिडीओ किंवा चित्रफित हे तुमच्या मनातलं दुसर्याला सांगण्याचं उत्तम माध्यम आहे. आम्ही करत असलेला जंबो ट्रेक पुन्हा होईल की नाही हे माहिती नाही पण आम्ही जे केलंय त्याचं दस्तऐवजीकरण करण्याच्या दृष्टीनं हे अतिशय गरजेचं होतं.
१३) स्वयंपाक करणार्यांचा संघ तयार करणं - आमच्यातले काही भीडू उत्तम स्वयंपाक करतात त्यात प्रमुख्यानं नारायण सुसंगे, जीवन जुनवणे आणि महादेव गदाडे ही तरूण मंडळी आहेत. साहजिकच ही जबाबदारी त्यांच्याकडंच होती. दुसरं असं की या संघातल्या नारायण सुसंगे हाच किराणा आणि भाज्यांची खरेदी करणार होता त्यामुळं त्याची या संघात आवश्यकता होतीच. अर्थात या संघाच्या मदतीला आम्ही बाकीची मंडळी होतोच.
१४) First Aid आणि रेस्क्यूसाठीचा संघ तयार करणं - ही जबाबदारी शिवाजी शिंदे यांच्याकडं होती. त्यांचं स्वतःचं मेडीकल शॉप असल्यामुळं त्यांना औषधांची बर्यापैकी माहिती आहे त्यामुळं त्यांच्याखेरीज आमच्या ट्रेकमध्ये या जबाबदारीसाठी दुसरा योग्य माणूस नव्हताच. बाकी रेस्क्यू करायची गरज पडलीच तर त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या मदतीला होतोच.
१६) सायकल संघ - आमच्यातली सगळी मंडळी काही नेहमीच सायकलिंग करणारी नव्हती त्यामुळं सोबत असलेल्या अनुभवी सायकलिस्ट मंडळींचा नव्या सायकलपटूंच्या मदतीसाठी सायकल संघ तयार केला होता त्यामध्ये अर्थातच सिद्धू पाटील होताच पण त्याच्यासोबत अनुभवी जितेंद्र परदेशी, मिलिंद गडदे आणि नारायण सुसंगे हे देखील होते. या मंडळींकडं नवीन सायकलपटूंसोबत सायकल चालवून त्यांना प्रोत्साहन देणं ही मुख्य जबाबदारी होती. बरं हा ट्रेक Bike & Hike प्रकारचा असल्यामुळं शेवटच्या दिवशी सायकलिंग केल्यानंतर सहा किल्ल्यांच्या चढायादेखील करायच्या होत्या त्यामुळं नवीन सायकलपटूंनी दमून चालणारच नव्हतं. हे सर्व पाहता अनुभवी सायकलपटूंकडं नवीन सायकलपटूंचं मनोध्येर्य टिकवण्याची दुहेरी जबाबदारी होती त्यामुळं फारसं त्रासदायक न होता सायकलिंग कसं करावं याच्या क्लूप्त्या देखील त्यांना द्याव्या लागणार होत्या.
१७) सर्वांना सकाळी वेळेत तयार करणं - आमचं चारही दिवसांचं वेळापत्रक इतकं व्यस्त होतं की सकाळी मुक्कामाची जागा वेळेत सोडून बाहेर पडावंच लागणार होतं, उशीर अजिबात करून चालणार नव्हतं त्यासाठी सर्वांना वेळेत तयार करण्यासाठीची जबाबदारी सुद्धा खास एका भीडूवर सोपवण्यात आली. शिवाजी शिंदे हे दररोज घोरवडेश्वर किंवा दुर्गा ट्रेकडीवर जातात त्यामुळं रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी त्यांना सकाळी बरोबर चार वाजता जाग येते त्यामुळं सगळ्यांना सकाळी ठरलेल्या वेळी उठवण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्याकडं सोपवलेली होती. ट्रेक सकाळी वेळेत सुरू झाला म्हणजे दिवसभर चालण्यासाठी आणि किल्ले पाहण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळणार होता.
१८) ट्रेकच्या संपूर्ण मार्गाचं gpx Mapping करणं - आम्ही करत असलेला ट्रेक आधी कुणी केल्याचं ऐकीवात नव्हतं त्यामुळं संपूर्ण ट्रेकचं gpx Mapping आम्हालाच करावं लागणार होतं आणि तसंही आम्ही प्रत्येक ट्रेकचं करतोच. फक्त या ट्रेकमध्ये संपूर्ण रूटचं, Daywise आणि वाटेतल्या टप्प्यांचं असं वेगवेगळं करायचं नियोजन केलं होतं जेणेकरून आमच्या ट्रेकच्या मार्गात काही बदल करून असाच थोडा वेगळा ट्रेक दुसर्या कुणाला करणं शक्य होईल. वेगवेगळ्या टप्प्यांसाठी Route Mapping ची जबाबदारीदेखील माझ्याकडं आणि नारायण सुसंगेकडं होती.
बहूतेक सर्व जबाबदार्या देऊन झाल्या होत्या आणि प्रत्येकाला त्याच्या कामाची Deadline देऊन झाली होती. ट्रेकपुर्वीची सगळी कामं आम्ही ट्रेकला निघण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे मंगळवारी २४ डिसेंबरला संपवली. इथून पुढं ट्रेकचा खरा काऊंट-डाऊन सुरू झाला. पुढचे २५ आणि २६ डिसेंबरचे दोन दिवस आम्ही सर्व तयारी योग्य रितीने झाली आहे हे क्रॉसचेक करण्यातच घालवले. सगळी तयारी तर एकदम चोख झाली होती. आता पुढचे चार दिवस आम्ही सगळं देहभान विसरून निसर्गाशी समरस होणार होतो.
रायगड परिक्रमेच्या चैतन्याचा मेळा।
फाल्कन्सचा एक आनंद सोहळा ॥
आता सगळ्यांना पुढच्या चार दिवसांत मिळणाऱ्या वेगळ्या अनुभूतीचे आणि ट्रेकला निघण्याच्या वेळेचे वेध लागले होते...
...आणि तो दिवस उजाडला. शुक्रवारी रात्री सर्वजण बरोबर साडेनऊ वाजता पहिल्या स्टॉपवर जमले. सामान गाडीत भरलं आणि ताम्हिणी, निजामपूरमार्गे बोरगावला जाऊन रायगडाच्या रस्त्यावर असलेल्या शाळेत रात्री पथाऱ्या पसरल्या.
🚩 दिवस पहिला 🚩
शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५.
पहाटे बरोबर पाच वाजता शिवाजी शिंदेंनी Wake-up whistle दिली आणि लगेचच सगळे अंथरूणातुन बाहेर आले. तशी रात्री भयंकर थंडी असल्यामुळं झोप अशी कुणाला लागलीच नाही. अपवाद फक्त एकदोन जणांचा. त्यांची घोरवडेश्वर एक्सप्रेस आडवं झाल्याझाल्या सुसाट सुटली होती. तसं प्रत्येक ट्रेक ग्रुपमध्ये अशी एकदोन मंडळी असतातच. स्वयंपाक संघानं सिलेंडर-शेगडी जोडून चहाचं आधण ठेवलं तोपर्यंत एकएक जण सकाळची आन्हिकं उरकून येत होता. तासाभरात आन्हिकं उरकून सगळे चहाबिस्किटांचा सुपरफास्ट नाश्ता करायला हजर झाले.
बहूतेक सर्वांचं आवरलंच होतं त्यामुळं शेवटचं चहा बनवण्याचं सगळं सामान गाडीत टाकून बोरवाडीची शाळा सोडली. मानगडाच्या मागं घाटमाथ्यावर पहाटेचं झुंजूमुंजू होऊ लागलं होतं. मानगडाच्या पायथ्याशी असलेल्या मशीदवाडीत सगळेजण पायउतार झाले. इथून आता आमचा खरा ट्रेक सुरू होणार होता. आज मानगड आणि कोकणदिवा करून मुक्कामाला पाने गावात जायचं होतं त्यामुळं ट्रॅव्हलरच्या सारथ्याला पाने गावचा रस्ता समजावून दिला आणि तिथं करायच्या कामाची माहिती समजावून सांगितली.
ट्रेकची सुरूवात रविंद्र मनकरांच्या खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून झाली. बरोबर सात वाजता आम्ही मानगडाची चढाई सुरू केली. वाट चांगली मळलेली दिसत होती. आता या गडाच्या पायथ्याच्या ठिकाणी परिक्रमा करून आम्ही थेट चौथ्याच दिवशी येणार होतो. मानगड हा तसा छोटेखानी किल्ला. कुंभे घाटावर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती केली गेली. पंधरा मिनिटांत मानगडाखालच्या खिंडीतल्या विंझाई मंदिरात पोहोचलो आणि सोबत्यांना आज करायच्या ट्रेकबद्दल थोडक्यात माहिती दिली.
विंझाईला पुढचा ट्रेक चांगला होण्यासाठी साकडं घातलं आणि पुढच्या पंधरा मिनिटांत गडमाथा गाठला. आम्हा सर्वांचे प्रभावळीतले सगळे किल्ले आधीच पाहून झाले असल्यामुळं या ट्रेकमध्ये गडदर्शन हा आमचा हेतूच नव्हता आणि आज आम्हाला पल्लाही मोठा मारायचा असल्यामुळं फक्त ढालकाठी बुरूजावर एक फोटो काढला, गडाची धावती फेरी मारली आणि पुन्हा विंझाई मंदिरात दाखल झालो.
सह्याद्री इथं पदर आणि घाटमाथा अशा दोन टप्प्यात पसरलेला आहे. पदरात केळगण, मांजूत्री, बडदेमाची, बोरमाची अशा छोट्याछोट्या वाड्या वसलेल्या आहेत. आम्हाला घाटमाथ्यावरच्या मुठेच्या खोर्यातल्या घोळ गावात पोहोचायचं होतं त्यासाठी आधी पदरात जावं लागणार होतं आणि मग घाटमाथा गाठावा लागणार होता. विंझाई खिंडीतून आम्हाला घोळ गाव गाठण्यासाठी बरेच पर्याय होते.
पहिला पर्याय शिबंदीच्या वाटेनं मांजूर्णे गाठायचं, पुढं कुंभेघाट चढून कुंभेवाडी गाठायची आणि मग पुढं घोळ गावी जायचं. काही महिन्यांपुर्वीच वाघजाई आणि तेल्याच्या नाळेचा ट्रेक केल्यामुळं ही वाट पक्की ठाऊक होती. कुंभेवाडीनंतर घोळपर्यंतची वाट चांगलीच मळलेली आहे.
दुसरा पर्याय होता विंझाई खिंडीतून पलिकडच्या चाच गावात उतरायचं आणि निसणीच्या वाटेनं मांजूर्णे गाठायचं आणि पुढं पहिल्या पर्यायात दिलेल्या वाटेनं घोळ गाव गाठायचं. या पर्यायात आम्हाला आधी चाचपर्यंत उतराई करावी लागली असती आणि पुन्हा चढाई करायला लागली असती त्यामुळं हा पर्याय आमच्यासाठी फारसा सोयीचा नव्हता.
तिसरा पर्याय होता विंझाई खिंडीतून चाच गावात उतरून पुढं टिटवे गाव गाठायचं आणि चढाई करून बडदेमाची गाठायची आणि वाघजाई घाट चढून कुंभेवाडी गाठायची. हा घाट चढून आम्ही पुन्हा कुंभेमाचीलाच आलो अस्तो त्यामुळं हा पर्याय सुद्धा आमच्यासाठी तसा उपयोगी नव्हता.
चौथा पर्याय होता टिटव्याच्या पुढची बोरावली गाठून पदरातल्या बोरमाचीपर्यंत चढाई करून पुढं तेल्याच्या नाळेनं चढाई करून थेट घोळ गाठायचं. चौथा पर्याय तर खूपच लांबचा, जास्त चढाई-उतराई असलेला त्यामुळं साहजिकच खूपच वेळ खाणारा होता त्यामुळं हा पर्यायही आम्ही बाद केला.
बडदेमाची आणि बोरमाची परिसरातून तेल्याची नाळ आणि वाघजाई घाटांव्यतिरिक्त सोननाळ, चराची नाळ, पापडीची वाट आणि समणीची नाळ अशा अजून काही घाटवाटा सुद्धा कुंभे पठारावर चढून येतात त्यासुद्धा लांबचा वळसा पडत असल्यामुळं आमच्या तशा काहीच कामाच्या नव्हत्या. या सर्व पर्यायामधला पहिला पर्याय आमच्यासाठी त्यातल्यात्यात सोईस्कर होता त्यामुळं शिबंदीची वाट चढून आम्ही मांजूर्णे गाठलं.
मांजूर्ण्यात भेटलेल्या एका वृद्ध जोडप्याने आम्हाला सरळ डांबरी सडकेनं कुंभ्याला जायला सांगितलं पण त्या रस्त्यानं आम्हाला जायचं नव्हतं. अर्थात रस्त्यानी जाणं सोपं असलं तरी तो आम्हाला काहीसा वळसा पडला असता. मागे एका ट्रेकची रेकी करताना मांजूर्ण्यातून बोगद्याजवळच्या वाघजाई मंदिरापाशी चढून येणारी वाट समजली होती. या वाटेवर गेल्या पावसाळ्यात खराळ गेल्यामुळं म्हणजे Landslide झाल्यामुळं गावकरी ही वाट वापरत नव्हते. वरच्या वाघजाई मंदिराच्या मागं कुंभे धबधब्यात जाणार्या ओढ्यावर बांध घालून पाणी अडवलं आहे. या बंधार्यातून डिझेल इंजिन लावून HDPE Pipeline मधून पाणी खाली मांजूर्ण्यात आणलं जातं. ही Pipeline नेमकी खराळ गेलेल्या वाटेवरच आहे त्यामुळं त्याला धरून चढता येतं त्यामुळं आम्ही याच वाघजाईच्या वाटेनं चढून वाघजाई मंदिर गाठलं हे काही वेगळं सांगायला नको. घसार्यावरून सावधगिरीने चढाई करत मंदिरापाशी पोहोचलो.
मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेला तसाच पुढे कुंभे धबधबा गाठला. ओढ्यातून स्वच्छ पाणी वाहत होतं आणि पोटातले कावळेही ओरडू लागले होते. ओढ्यात पाणी होतं आणि सावलीही त्यामुळं नाश्त्यासाठी यापेक्षा सुंदर जागा आम्हाला दुसरीकडं मिळाली नसती त्यामुळं कुंभे धबधब्याच्या ओढ्यात बसूनच नाश्ता उरकला. कुंभे धबधब्याजवळ आणि बोगद्याजवळ फोटो काढले आणि मधल्या वाटेनं कुंभेवाडी गाठली.
नारायणराव आता चांगलेच वर आले होते त्यामुळं वातावरणात थोडा उष्मा जाणवत होता पण थंड वारं वाहत असल्यामुळं चालणं थोडं सुसह्य होत होतं. वाडीतल्या एका घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात थोडा आराम केला. घरासमोरच्या मंदीरातून समोरच कुर्डूगड दिसत होता आणि त्याला पाहिल्याक्षणी मन तिथं जाऊन पोहोचलं होतं. तिथल्या हौद्याच्या डोंगररांगेतले घबल्या आणि किंजळ्या, बुधल्या आणि त्याला चिकटून असलेली बुधल्याची वाट, सातनाळेचा ओढा आणि दिपाचं रान, देवघाटातला चौर्या, दुर्गाडी आणि त्याच्या लगतच्या चौर्याची नाळ आणि दुर्गाडी नाळ, लिंग्या घाट, टाळदेव, उंबर्डीत उतरणारी निसणी, चिपेचं दार, घोडनाळ, रिठ्याचं दार आणि थिबथिब्या असा सुंदर पॅनोरमा दिसत होता. या सर्वांच्या जवळ असलेली विळे-भागाड औद्यागिक वसाहत मात्र चंद्रावरच्या डागाप्रमाणं डोळ्याला खुपत होती. मनमोहक सह्यकडे काही तिथून उठू देत नव्हते पण पाने गाव तिथं पोहोचण्याची आठवण करून देत होतं.
मंदिरात फार वेळ न काढता मळलेल्या वाटेनं घोळ गाव गाठलं.
घोळ गावात पोहोचेपर्यंत जेवणाची वेळही झाली होती त्यामुळं गावातल्या विठ्ठलरूख्मिणी मंदिराशेजारच्या घरातून प्यायच्या पाण्याचा हंडा आणून दुपारची जेवणं उरकली. पुणेकरांच्या सवयीच्या हक्काची थोडी वामकुक्षी पण घेतली. मंदिरात लाईटचं कनेक्शन असल्यामुळं मोबाईल सुद्धा थोडे चार्ज करून घेतले.
घोळ गावातून गारजाईवाडीपर्यंत आता रस्ता झाला आहे. हा रस्ता गावाच्या आम्ही आलो त्याच्या बरोबर विरूद्ध टोकाला होता. रस्त्यानी जायचं तर चढ-उतार लागले नसते पण चालायचं अंतर बाकी नक्की वाढलं असतं आणि आम्हाला चालायचं अंतर काहीही झालं तरी वाढवायचं नव्हतं. आम्ही दुसर्या पर्यायाच्या वाटेनं खालच्या ओढ्यात उतरलो आणि पुन्हा चढाई करून घोळहून फिरून आलेल्या गारजाईवाडीच्या रस्त्याला लागलो. नेमकं या ठिकाणी जुन्या बाजाचं पण नवीनच बांधलेलं घर दिसलं. मूळ वाट या घरापाशीच चढत होती पण या घराच्या मालकानं घराला आणि बाजूच्या शेतीला तारेचं कुंपण घातल्यामुळं वाट थोडी वाकडी करून गारजाईवाडीच्या रस्त्याला लागावं लागलं. घोळ, गारजाईवाडी परिसरात होऊ घातलेल्या विकासाची? ही एक छोटी चुणूक होती.
कोकणदिव्याच्या पायथ्यासमोरच्या पठारावरून एक वाट थेट कावळ्याबावळ्या खिंडीत उतरते त्याने कावळ्या घाटाच्या वाटेला लागलो.
साधारण अर्धा घाट उतरेपर्यंत वाट चांगली मळलेली होती. अर्ध्यातून मळलेली वाट उजवीकडं वळून सावरठकडं निघून गेली आणि आम्ही डाव्या वाटेनं सांदोशीकडं वळलो. या सावरठ गावात कुंभेवाडीतून थेट एक वाट उतरते पण सध्या वापराअभावी ती मोडली आहे. कुंभेवाडीतून आम्हाला या वाटेनं उतरून सावरठ आणि पुढं सांदोशीला जायला जमलं असतं पण तसं केलं असतं तर आमचा कोकणदिवा करायचा राहून गेला असता त्यामुळं आम्ही घोळमार्गेच यायचं ठरवलं होतं. कावळ्या घाटातल्या वाट तिठ्यावर सांदोशी आणि सावरठ असा बाण केलेली पाटी आहे.
सांदोशी गाठेपर्यंत चांगलच अंधारून आलं. काळ नदीवर छत्रीनिजामपूर इथं धरण बांधत आहेत त्यामुळं काही दिवसातच सांदोशी, कावळे आणि छत्रीनिजामपूर ही गावं सुद्धा विस्थापित होतील. सांदोशीतून काळ नदीच्या अलीकडून आणि पलीकडून दोन्ही बाजूंनी पाने गाव गाठता येतं. सांदोशी आणि पाने दरम्यान असलेल्या वारंगी गावापर्यंत डांबरी रस्ता असल्यामुळं आणि सगळीच मंडळी जाम थकल्यामुळं आणखी न ताणता आम्ही आमची ट्रॅव्हलर सरळ वारंगीपर्यंत बोलवून घेतली. पुढं गाडीत बसून पाने गाव गाठलं.
हातपाय धुवून ताजेतवाने झालो आणि व्हेज मंचाव सूप बनवलं. आमच्या सारथ्यानं गव्हाचं पीठ देऊन आधीच चपात्या बनवून ठेवल्या होत्या. सुप तयार होईपर्यंत भाज्या चिरल्या आणि सूप पिऊन होईपर्यंत भाजी देखील तयार झाली. आजचा आमचा जेवणाचा मेन्यू होता गरमागरम व्हेज मंचाव सूप, आलू मटर, चपाती, भात, कांदा आणि पापड. आज जेवण बनवण्यासाठी चुलीचा ताबा जीवन जुनवणेनी घेतला होता. दिवसभर चालून सगळेजण जाम थकले होते त्यामुळं फारसा वेळ न घालवता दुसर्या दिवशीच्या सूचना दिल्या आणि सगळे गावातल्या राम मंदीरात झोपी गेलो.
🚩 दिवस दुसरा 🚩
रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५.
सकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे Wake-up whistle झाली आणि सगळेजण साडेसहा वाजता आवरून तयार झाले. सकाळी दूध, चहा आणि बिस्किटांसोबत रात्रीचं शिल्लक जेवण वाटाणा आलू मटर आणि चपाती सुद्धा पोटभर खाल्ली. शिल्लक राहिलेला स्वयंपाक टाकून न देता कालच्या मोकळ्या झालेल्या डब्यात सर्वांनी दुपारच्या जेवणासाठी सोबत पार्सल घेतला. भटकंती करताना एक नियम आवर्जून पाळायला हवा तो म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत Backup food आणि पाणी हे आपल्या सॅकमध्ये असलंच पाहिजे. वेळ कधीही सांगून येत नाही त्यामुळं कधीही वाईट परिस्थिती ओढवू शकेल असं गृहीत धरून त्याची आगाऊ तजवीज करण्याची प्रत्येक भटक्यानं सवय लावून घ्यायला हवी. ट्रेकच्या पहिल्या दिवशी आम्ही घरून डबे घेऊन गेलो होतो त्यामुळं पहिल्या दिवशी Backup food ठेवण्याची तशी गरज नव्हती पण दुसर्या दिवशीपासून अगदी दररोज आम्ही न चुकता सोबत ठेवण्यासाठी प्रत्येकी एक गुळपोळी आणि एक पुरणपोळी पुण्यातूनच घेऊन गेलो होतो.
आज आम्हाला बोराटा नाळ चढून लिंगाणा पायथा आणि पुढं खाली कोकणात उतरून मुक्कामाला शिवथरघळीत जायचं होतं. पान्यातून पुढं दापोलीला जाऊन सिंगापूर नाळेच्या सोप्या वाटेनंही आम्हाला मोहरी गाठता आलं असतं पण आम्हाला परिक्रमा व्यवस्थित करण्यासाठी लिंगाण्याच्या पायथ्यातूनच जावं लागणार होतं त्यामुळं बोराटा नाळेशिवाय आमच्यापुढं दुसरा पर्याय नव्हता.
आजचाही पल्ला कालच्यासारखाच चांगला मोठा होता. बरोबर सात वाजता आरती करून पाने गावातलं राम मंदीर सोडलं. घाटमाथ्यावरच्या चांदर आणि मोहरी गावापासून येणारा ओढा ओलांडला आणि बाळु कडूच्या झापापाशी पोहोचलो. इथून लिंगणमाचीत जाणार्या वाटेची चढाई सुरू झाली.
कोणत्याही घाटवाटेची सुरूवात कोकणातून करण्यात एक फायदा असा असतो की सकाळच्या पहिल्या प्रहरात नारायणराव माथ्यावर येईपर्यंत घाटवाटेची अर्ध्यापेक्षा चढाई होऊन गेलेली असते. दुसरं असं की कोकणातला उष्मा जाणवायच्या आत आपण जवळजवळ घाटमाथ्यावर पोहोचलेलो असतो. एकच दिवशीच्या ट्रेकसाठी आपल्या सोयीने घाटवाटांची चढाई-उतराई हवी तशी ठरवता येते पण जेव्हा असा एखादा चारपाच दिवसांचा जंबो ट्रेक करायचा असतो तेव्हा ट्रेक संपेपर्यंत प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक तग धरण्याची क्षमता कशी टिकून राहील याकडं ट्रेक प्लॅनिंग करताना विशेष लक्ष द्यावं लागतं आणि तसं सर्वसमावेशक नियोजन देखील करावं लागतं. या ट्रेकमध्ये आमचे सगळे मुक्काम मुख्य रांगेच्या खाली कोकणात होते त्यामुळं चढावी लागणारी प्रत्येक घाटवाट आम्ही सकाळच्या पहिल्या प्रहरात चढून जाणार होतो.
सकाळचं वातावरण अगदी आल्हाददायक होतं त्यातून थोडा गारवाही होता त्यामुळं पहिल्या तासाभरातच आम्ही लिंगणमाचीत पोहोचलो. लिंगणमाची उठून कोकणात गेल्यामुळं बहूतेक सगळी घरं पडली होती. पूर्वी तोरण्याहून रायगडला जाताना कित्येकदा पाहिलेल्या, विसावा घेतलेल्या नांदत्या लिंगणमाचीची सध्या पार रया गेली होती. लिंगणमाचीकडं आता पाहवत देखील नव्हतं त्यामुळं तिथं अजिबात न थांबता चढाई सुरू ठेवली आणि लिंगाण्याच्या पायथ्याच्या खिंडीत पोहोचलो.
खिंडीच्या समोरच्या बाजूला गायनाळ, निसणी, वारंगीचा कणाडोंगर, खानूचा डिगा आणि चांदर दिसत होतं तर मागच्या बाजूला दापोली आणि सिंगापूर नाळेची वाट दिसत होती. आज रायलिंगावरून झिपलाईन करून मुळीच्या पॅचची गुहा आणि तिथून वर लिंगाणा चढाईची अॅक्टीव्हिटी सुरू असलेली दिसली. खरंतर प्रभावळीतल्या प्रत्येक किल्ल्याच्या माथ्यावर आम्ही जाणार होतो पण लिंगाण्यासाठी एक अख्खा दिवस जादाचा मोडला असता त्यामुळं आमच्या नियोजनात लिंगाणा चढाई नव्हती त्यामुळं लिंगाण्याच्या पायाशी डोकं टेकवलं आणि बोराटा नाळेत जायला निघालो.
गेल्यावर्षीच्या जंबो ट्रेकमध्ये कुसारपेठजवळच्या केळ नदीच्या उगमस्थानाला भेट दिली होती. संगमाच्या जवळ असणारी संगमाची वाघजाई रस्त्यावरून दिसते त्यामुळं जाताजाता तिचं दर्शन घेऊन पुढं गेलो.
केळदमध्ये हॉटेलात चहा प्यायला आणि तिथंच आंबेनळीबद्दल चौकशी केली तर वाट चालू असल्याचं समजलं म्हणून मग आम्ही आंबेनळीनेच उतरायचं नक्की केलं. आंबेनळीसाठीसुद्धा आमच्याकडं दोन पर्याय होते. पहिला केळदपुढच्या केळदवाडीपर्यंत रस्त्यानं चालत जायचं आणि उजवीकडं वळून कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरून आंबेनळी घाटात जायचं किंवा उपांड्याच्या वाटेवरल्या पुलावरून वेळवंडी ओलांडायची आणि डावी मारून आंबेनळीला लागायचं. रस्त्यावरून जाण्यापेक्षा हा दुसरा पर्याय आम्ही निवडला हे वेगळं सांगायला नको.
उपांड्याच्या वाटेवरला पुल ओलांडून डावी मारली आणि आंबेनळीकडं निघालो. वाट चांगली मळलेली होती. या मळलेल्या वाटेवरनं तासाभरात आंबेनळीच्या खिंडीत पोहोचलो.
पुढची उतरायची वाट पुरती मोडलेली दिसत होती. सुरवातीलाच ही परिस्थिती होती तर पुढची वाट कशी असेल याची कल्पनाच करवत नव्हती पण थोडं अंतर उतरल्यावर वाट बरी होती. आंबेनळी उतरताना समोर कावळ्या किल्ला आणि त्याला जोडलेला न्हाविण सुळका लक्ष वेधून घेत होता. सुनेभाऊ, पारमाची, रामदास पठार, पलिकडं माझेरी, वरंध घाट, भागडी खिंड, चांगमोडा, चांगमोड नाळ आणि तळीयेच्या जननीचा भुस्लखन झालेला डोंगर असा ओळीनं पॅनोरमा डोळ्यापुढं येत होता. आंबेनळीतून उतरून खालच्या पदरात आलो आणि डावी मारून आंबेनळीवाडीची वाट पकडली. या पदरात कर्णवडी, आंबेनळी आणि सह्याद्रीवाडी अशा वाड्या वसलेल्या आहेत. पैकी सह्याद्रीवाडी खाली कोकणात विस्थापित झाली आहे. इथं एक गंमत आहे. एकाच पदरात वसलेल्या या तीन वाड्यांपैकी सह्याद्रीवाडी आणि आंबेनळी या वाड्या प्रशासकीय दृष्टीनं रायगड जिल्ह्यात मोडतात तर कर्णवडी पुणे जिल्ह्यात. आंबेनळी आणि कर्णवडी या वाड्यांमधली मंडळी त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी रायगड जिल्ह्यावर अवलंबून आहेत. इतकंच नाही तर या वाड्यांना जोडलेला रस्ता सुद्धा रायगड जिल्ह्यातूनच आहे.
आंबेनळीवाडीच्या वाटेवरल्या पदरात दाट जंगल आहे पण या जंगलातल्या झाडांची आता राजरोसपणे कत्तल होऊ लागली आहे. दहा-बारा टनी ट्रक या पदरात लाकडं न्यायला येतो. आंबेनळीवाडीपर्यंत रस्ता झालाय तो लोकांसाठी की लाकडं चोरून नेण्यासाठी असा प्रश्न आता पडू लागलाय. तीनतीन फूट व्यासाचं खोड असलेली भलीमोठी झाडं कापून जंगल जमीनदोस्त करण्याचं काम वेगानं सुरू आहे. वाहतूकीसाठी एखाद्या वस्तीला होणारा रस्ता तत्परतेनं अडवणारं वनखातं इथं मात्र चक्क डोळे झाकून बसलं आहे. हे असंच सुरू राहिलं तर इथलं जंगल पुर्णपणे नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.
आंबेनळीवाडीतून शिवथरघळीत पोहोचलो पण तिथं हल्ली विश्वस्थांच्या परवानगीनेच मुक्काम करता येतो. शिवाय आता तिथं स्वयंपाकदेखील करू देत नाहीत त्यामुळं हे ठिकाण आमच्यासाठी सोईस्कर नव्हतं. मागे खुटा आणि पाळदार घाटवाटांचा ट्रेक करताना शिवथरघळीच्या वरच्या बाजूला वसलेल्या चेराववाडीतल्या मंदिरात मुक्काम करता येईल असं पाहून ठेवलं होतं त्याचा आत्ता उपयोग झाला. भटकंती करताना चौकसपणे केली की त्याचा फायदा होतो तो असा. चेराववाडीत आमची एकदम उत्तम सोय झाली. पुजार्यांनी चपात्या सुद्धा बनवून दिल्या. आजचा आमचा जेवणाचा मेन्यू होता गरमागरम टोमॅटो सूप, भात, चपाती, बटाटा-फ्लॉवर रस्साभाजी, कांदा आणि पापड. जेवण झाल्यावर सगळ्यांनी पथार्या पसरल्या पण त्याआधी दुसऱ्या दिवशी सकाळी उशीर होऊ नये म्हणून नाश्त्यासाठीच्या मिसळीची सगळी तयारी आम्ही रात्रीच करून ठेवली होती.
🚩 दिवस तिसरा 🚩
सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५.
सकाळची आन्हिकं उरकली आणि मंदीरात आरती केली. नाश्त्यामध्ये रात्रीची शिल्लक राहिलेली चहा-चपाती आणि मिसळीसोबत पावाचा पोटभर नाश्ता केला. मुक्काम केलेलं ठिकाण स्वच्छ केलं आणि शिवथरघळीत दर्शनाला गेलो. मारूती स्तोत्र म्हटलं आणि आजचा ट्रेक सुरू केला.
आज आम्ही कावळ्या आणि मोहनगड हे दोन किल्ले करून मुक्कामाला मंगळगडाच्या पायथ्याला असलेल्या पिंपळवाडीत जाणार होतो. गाडी पुढच्या प्रवासाला पाठवून दिली आणि आम्ही कसबे शिवथरमधून माझेरीच्या रस्त्यावरून चालू लागलो. मागे सिंहगड ते उमरठ असा जंबो ट्रेक करताना आम्ही या मार्गे गेलो होतोच. रस्त्यानं माझेरीच्या दिशेनं चढाई करताना काल उतरून आलेली आंबेनळी घाटवाट, त्याच्या पलिकडं उपांड्या, मढे आणि दुरवर शेवत्या दिसत होता तर त्याच्या विरूद्ध दिशेला बोप्या आणि कुंडवरून उतरणारा खुटाघाट दिसत होता. सुपेनाळ, भोवर्या, मुसळ्याची नाळ, गारजाई, कोरनाळ उर्फ कोळनाळ आणि पिठगुळीची नाळ या घाटवाटा शिवथरच्या आतल्या भागातल्या ओढ्यात उतरत असल्यामुळं दिसत नव्हत्या. रस्त्यावरून जमेल तितके शॉर्टकट मारत सुनेभाऊ गावात पोहोचलो. इथून पुढंही रस्त्यानी चालत पारमाची गाठली. पारमाची ही कावळ्या किल्ल्याचीच माची त्यामुळं पारमाचीतून पारमाची नाळेतून किल्ल्यावर जाता येतं. पारमाची ही कावळ्या किल्ल्याचीच माची त्यामुळं किल्ल्याची खरी वाट याच नाळेतून आहे. पूर्वी या वाटेने चढाई करताना आम्हाला तिथं काही पायऱ्या सुद्धा दिसल्या होत्या. पारमाची नाळेशिवाय कावळ्या किल्ल्याला जोडून असलेल्या न्हाविण सुळक्याच्या पलिकडं असलेल्या न्हावंदीण नाळेतूनही किल्ल्याचा माथा गाठता येतो. पैकी पारमाची नाळेच्या वाटेवर प्रचंड घसारा आहे तर न्हावंदिण नाळेत शेवटच्या टप्प्यात थोडं Rock Climbing करावं लागतं. या दोन्ही वाटा वेळखाऊ असल्यामुळं या वाटांनी जायचं टाळून आम्ही सरळ भागडी खिंड गाठली आणि धोपट वाटेनं कावळ्या किल्ला गाठला.
गडाच्या माथ्यावर फोटो काढले आणि पुन्हा भागडी खिंडीत येऊन वरंध घाटातलं वाघजाई मंदिर गाठलं. वरंध घाटात आल्यावर वडापाव आणि भजी खावीच लागते. शास्त्र असतंय ते. वाघजाईपासून समोरच्या दरीपलिकडं उंबर्डीत चढून येणारा पाळदार घाट दिसत होता. वरंध घाटात दोनदोन वडापाव खाल्ले.
वडापाव खाऊन तृप्तीचा ढेकर दिला आणि धारमंडपावरून शिरगावात गेलो. आजचा आमचा मुक्काम पिंपळवाडीत होता आणि खरंतर तळीयेत उतरणारा बोरपेडा घाट, चांगमोडा नाळ, वारदरा उर्फ वाव्हळाची वाट, कुंभेनळी उर्फ वाघजाई घाट, खिरण उर्फ महारदांड, चिकणा घाट आणि वारसाची खिरण या घाटवाटांनी सुद्धा पिंपळवाडीत जाता आलं असतं पण या वाटा करताना मोहनगड मात्र राहून गेला असता त्यामुळं मोहनगड केल्यावर पिंपळवाडीला जाण्यासाठी आम्हाला एखादी घाटवाट निवडायची होती.
शिरगावातून दुर्गादेवीच्या मंदिरात जाताना वाटेत असलेली नीरेबावीकडं जाणारी पायवाट पाहिल्यावर गेल्यावर्षी केलेल्या 'नीरा उगम ते इंद्रायणी उगम' या जंबो ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. शिरगावातून खाली नीरा-देवघरच्या पाणलोट क्षेत्राशेजारी असलेलं दुर्गादेवीचं मंदिर गाठलं आणि रस्ता ओलांडून जननीच्या दुर्गावर जाणारी वाट पकडली. या जननीच्या दुर्गाला सध्या मोहनगड म्हणून ओळखलं जातं.
नारायणराव माथ्यावर आल्यामुळं मोहनगडाचा चढ चांगलाच जाणवत होता पण वाटेत असलेल्या करपाच्या झाडीमुळं काहीसं सुसह्य होत होतं. वाटेतून दुरपर्यंत सह्यनजारा दिसत होता. खिरण उर्फ महारदांड, चिकणा घाट आणि वारसाची खिरण या घाटवाटा आणि त्याच्या पायथ्यातल्या वाड्यावस्त्या अगदी हाकेच्या अंतरावर दिसत होत्या. शेवटच्या कातळटप्प्यावरची चढाई करून जननीच्या मंदिरात विसावलो. मंदिरातला गारवा आल्हाददायक होता. समोर असलेल्या खांबाच्या टोकावर सुंदर अशी Black winged kite म्हणजेच कापशी घार शिकार करण्यासाठी नजर ठेऊन बसली होती. कितीतरी वेळ तो सुंदर नजारा आम्ही पाहत होतो.
जननी आईचं दर्शन घेतलं आणि लगेचच पायउतार झालो. आजच्या दिवसातला हा आमचा दुसरा तर एकूण दहा किल्ल्यातला पाचवा किल्ला पुर्ण झाला होता. मोहनगडानंतर आता आम्हाला मंगळगडाच्या पायथ्याशी असलेली पिंपळवाडी गाठायची होती. कातळटप्पा उतरून खालच्या जननीपाशी आलो आणि उजवी मारून दुर्गाडीची वाट पकडली. आता आमची चाल मोहनगडाला समांतर ठेवून आडवी चालली होती. पुढं एके ठिकाणी डावीकडचा मोहनगडाचा उंचवटा संपला आणि वाट सोंडेवरून उतरू लागली. पुढं उतरणारी मळलेली दुर्गाडीची वाट सोडून आम्ही पुन्हा उजवी मारली आणि मोहनगडाला उजवीकडून प्रदक्षिणा चालू ठेवली. खरंतर सरळ उतरणार्या मळलेल्या वाटेनं खिंडीत उतरून दुर्गाडीचा धनगरवाडा आणि मग उजवी मारून सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर येता आलं असतं पण चढ-उतार आणि धनगरवाड्याचा वळसा वाचवण्यासाठी आम्ही वरच्यावर आडवी मारली आणि सह्याद्रीच्या मुख्य धारेवर पोहोचलो.
इथून पुढं आम्हाला चोरकणा, देवदांड उर्फ देऊळदांड, उडी उर्फ भांबळ या घाटवाटांनी पण उतरता आलं असतं पण चोरकणा उतरून गोठवली आणि तसंच पुढं खालच्या ओढ्यात उतरून चढाई केली की आम्ही थेट दुधाणेवाडीत पोहोचणार होतो. देवदांड किंवा भांबळीच्या वाटेनं उतरण्यापेक्षा चोरकणा ही वाट आम्हाला जवळची होती. असं जरी असलं तरी दांडावरच्या वाटा उतरण्यास अंमळ कठीण, चढाईस ठीक पण आम्ही नमकं उलटं करत होतो. अर्थात चोरकणा, देवदांड किंवा भांबळ या सगळ्या वाटा दांडावरच्याच आहेत आणि कमी-अधिक फरकानं अवघड त्यामुळं आम्हाला कुठूनही उतरायचं तरी थोडा धोका पत्करावा लागणारच होता. धोका पत्करायचा आहेच तर मग त्यातल्या त्यात जवळच्या वाटेचा का नको? म्हणून आम्ही चोरकण्यानेच उतरायचा निर्णय घेतला.
गेल्या पावसाळ्यानंतर या वाटेवर कुणी आल्याचं दिसत नव्हतं त्यामुळं वाट अजून तरी रूळली नव्हती. नुकत्याच या भागातल्या चोरकणा, देवदांड, भांबळ आणि खुट्याच्या वाटांचा ट्रेक केल्यामुळं चोरकणा चांगलीच परिचयाची होती. सुरवातीच्या घसार्यावरून काळजीपुर्वक उतरत खालची गोठवली गाठली. उतरत असतानाच मंगळगडामागं नारायणराव अस्ताला निघाले होते त्यामुळं गोठवलीत पोहोचेपर्यंत चांगलंच अंधारून आलं. गोठवलीत कृष्णा पिलाणेच्या घरी थोडा विसावलो. पाणी वगैरे घेऊन पिंपळवाडीकडं मार्गस्थ झालो.
आमच्या आजच्या प्लॅनिंगनूसार आम्ही पिंपळवाडी गाठायचं ठरवलं होतं आणि आम्ही ती नियोजनाप्रमाणं गाठली होती. गावातल्या हातपंपावर जाऊन जाऊन हातपायधुवून फ्रेश झालो आणि आमच्या बल्लवानं म्हणजे नारायणनं सुप बनवायला घेतलं. आमच्या सारथ्यानं आम्ही पोहोचेपर्यंत गावात ज्वारीचं पीठ देऊन भाकर्या बनवून घेतल्या होत्या. आजचा आमच्या जेवणाचा बेत तसा साधाच होता. गरमागरम मंचाव सूप, पिठलं-भाकरी, भात आणि सॅलेड म्हणून कांदा, काकडी.
ताटं घेऊन जेवण्यासाठी हजर झालो आणि तृप्तीची ढेकर देऊन गावातल्या मंदिरात पथार्या पसरल्या.
🚩 दिवस चौथा 🚩
मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५.
पहाटे नेहमीप्रमाणं शिवाजी शिंदेंनी बरोबर पाच वाजता Wake-up whistle सोबत देवळातली घंटा वाजवली. रात्री पुण्याहून आमच्या सायकली घेऊन येणारा टेम्पो माझा मित्र रघूराज एरंडे घेऊन आला होता. आजचा आमचा पहिला किल्ला मंगळगडच असल्यामुळं उजाडेपर्यंत वाट न पाहता चहा घेऊन आम्ही सहा वाजताच गड चढाईला सुरू केली. कोकणातल्या उन्हाची झळ अजून लागत नव्हती त्यामुळं एकाच दमात कांगोरीआईचं मंदिर गाठलं. कांगोरी उर्फ मंगळगड हा सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून थोडा सुटावल्यामुळं किल्ल्यावरून सह्यपर्वतांचं सुंदर दर्शन होतं. डावीकडून तळीयेचा डोंगर, चांगमोडा आणि त्याला चिकटून असलेला वारदरा घाट, कुंभेनळी उर्फ वाघजाई घाट, खिरण उर्फ महारदांड, चिकणा, वारसाची खिरण, मोहनगड, चोरकणा, देवदांड उर्फ देऊळदांड, उडी उर्फ भांबळ, फणसखिंड, रायरेश्वराचा नाखिंदा आणि खालची अस्वलखिंड, मिठखडा, कोळेश्वर टोक, पाठशिळा, मढीमहाल उर्फ ब्रम्हा आणि प्रतापगड असा लांबलचक पॅनोरमा दिसत होता. थंडीमुळं वातावरण धुरकटलेलं होतं त्यामुळं दूरवरचं फारसं काही दिसत नव्हतं.
कोकणात देवाला गार्हाणं घालायची पद्धत आहे त्यामुळं आमच्यातल्या कोकणी मिलिंद गडदेनी आमच्या सर्वांच्या वतीनं कांगोरीआईला गार्हाणं घातलं. आजचा आमचा टप्पा भलामोठा होता. आज आम्हाला जवळजवळ शंभर किलोमीटर सायकलिंग करून सहा किल्ल्यांची चढाई-उतराई करायची होती त्यामुळं गडदर्शन न करता लगेचच उतराई सुरू केली. थोडं उतरल्यावर सडे गावात उतरणारी वाट डावीकडं निघून गेली आणि आम्ही आलेल्या वाटेनेच पिंपळवाडीत उतरलो. आजचा नास्ता फास्ट करायचा होता म्हणून नारायणने झटपट मसाला मॅगी बनवली त्यासोबत कालचं गरमागरम पिठलं-भाकरी आणि भात आणि पुन्हा एकदा शेवटचा चहा घेतला. आमच्या ट्रॅव्हलरचा आणि काल आलेल्या टेम्पोच्या सारथ्यानं पिंपळवाडी ते ढालकाठी रस्ता प्रचंड खराब असल्याचं सांगितलं त्यामुळं आम्हाला त्या रस्त्यावरून सायकलिंग करणं शक्य होणार नव्हतं. आम्ही इथून पुढच्या चांभारगडापर्यंत सरळ गाडीनेच जाण्याचा निर्णय घेतला. सामानाची आवराआवर केली आणि ढालकाठीमार्गे चांभारखिंडीत पायउतार झालो.
मुंबई-गोवा राष्टीय महामार्गाच्या झालेल्या सहापदरी कामामुळं या मार्गावर बरेच ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. चांभारखिंडीतही असाच एक उड्डाणपूल झालाय त्या उड्डाणपूलाखालून पलिकडं जाऊन डावी मारली आणि बाजूला असलेल्या हनुमान टेकडीवर चढाईला सुरूवात केली. टेकडीवर विराट हनुमान मंदिर असल्यामुळं मंदिरापर्यंत पायर्यांची सोय केलेली आहे. मंदिरापुढून टेकडीचा माथा गाठला आणि चांभारगडाकडं निघालो.
नुकताच वणवा लागुन गेल्यामुळं जिकडंतिकडं काळं झालेलं होतं. गड तसा छोटाच आहे. माथ्यावरची माती ढासळून खाली आल्यामुळं बरेच अवशेष गाडले गेले आहेत. माथ्यावर थोडी तटबंदी आणि दोनचार पाण्याच्या टाक्या सोडल्या तर काहीच शिल्लक नाही. माथ्यावर फोटो घेतला आणि गडफेरी आवरती घेत उतरताना मात्र थेट चांभारखिंड गावात उतरलो.
गाडीपाशी येऊन टेम्पोतून आमच्या सायकली उतरवल्या. इथून पुढच्या किल्ल्यांना जोडणारा प्रवास आम्ही सायकलवरून करणार होतो. आम्ही जंबो ट्रेक करणारे तेरा जण असलो तरी त्यातले आम्ही फक्त पाच जणच सायकलिंग करणार होतो.

इथून पुढचा आमचा किल्ला होता पन्हाळघर. पन्हाळघरासाठी आम्हाला आता गोवा महामार्गानं सरळ लोणेरे, तिथून उजवीकडं वळून पाच किलोमीटरवरचं पन्हाळघर गाव असा मोठा टप्पा सायकलिंग करावा लागणार होता. जमेची बाजू मात्र एक होती की दासगावच्या खिडीतली चढाई सोडली तर रस्त्यावर चढ फारसे नव्हतेच त्यामुळं सायकलिंग बरंच सुसह्य होत होतं. संध्याकाळ होऊ घातली होती त्यामुळं फारसं कुठही न थांबता पन्हाळघर किल्ल्याचा पायथा गाठला. पायथा गाठेपर्यंत पुर्णपणे अंधार पडला त्यामुळं हेडटॉर्चच्या प्रकाशातच गडचढाई केली. माथ्यावर आता काही पाहता येणार नव्हतं आणि तसंही आमचा तो हेतूच नव्हताच. गडमाथ्यावर असलेल्या टाक्याजवळ फोटो काढले आणि पुन्हा पायथा गाठला.
शेवटी हा ट्रेक प्लॅनिंग करण्यापासून ते जसाच्या तसा तो एक्झिक्युट करण्यापर्यंतच्या सर्वच पातळ्यांवर अतिशय आव्हानात्मक असा होता पण तो तसा असूनही अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे पूर्ण झाला होता. अशा प्रकारच्या आव्हानात्मक ट्रेकचं प्लॅनिंग करताना बऱ्याच गोष्टी एक लिडर म्हणून मला कराव्या लागल्या. रायगड प्रदक्षिणा भरपूर जणांनी केल्या आहेत पण अशा वेगळ्या प्रकारे देखील परिक्रमा करता येऊ शकते हे समजावं म्हणूनच केवळ हा लेखनप्रपंच. 'रायगड प्रभावळ परिक्रमा' विस्तृतपणे तुम्हा सर्वांपुढे मांडण्याचं कारण एवढंच की नंतर कुणाला अशा प्रकारच्या ट्रेक्सचं आयोजन करायचं असेल तर अशा प्रकारच्या ट्रेकमधे कोणत्या गोष्टी प्रयत्नपूर्वक अंमलात आणाव्या लागतात हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावं हेच आहे. प्रत्येक ट्रेकला नाविन्याचा ध्यास घेण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच कल्पना सुचत जातात आणि त्यादृष्टीनं मग आपसूकच प्रयत्न देखील केले जातात याचं आम्ही केलेला हा जंबो ट्रेक हे उत्तम उदहरण सांगता येईल.
🚩 ट्रेकचा धावता लेखाजोखा -
🚩 आमचा मार्ग या किल्ल्यांना जोडून आणि याच क्रमाने होता...
१) मानगड
२) कोकणदिवा
३) लिंगाणा (पायथा)
४) कावळ्या
५) मोहनगड
६) मंगळगड
७) चांभारगड
८) सोनगड
९) दासगाव उर्फ दौलतगड
१०) पन्हाळघर
🚩 आणि घाटवाटा या होत्या...
१) शिबंदीची वाट
२) कुंभेघाट
३) कावळ्या घाट
४) बोराटा नाळ
५) आंबेनळी घाट
६) वरंध घाट
७) चोरकणा
🚩🚩🚩
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वराज्याभोवती फास आवळायला सुरूवात केली. त्यानं मार्च १६८९ ला शहाबुद्धीनखानाला रायगड जिंकण्यासाठी झुल्फिकारखानाच्या मदतीला धाडलं. शहाबुद्दीनखान हा पठाणांची फौज घेऊन कावल्याबावल्याच्या खिंडीतून उतरणार असल्याची बातमी सांदोशी गावातील गोदाजी जगताप व सर्कले नाईक यांना कळली. ते ताबडतोब मराठ्यांची एक निवडक तुकडी जमवून खिंडीत दबा धरून बसले. शहाबुद्दीनखान जसा खिंडीजवळ आला तसे मराठे अत्यंत त्वेषाने त्याच्यावर तुटून पडले. मराठ्यांचा आवेशच इतका जबरदस्त होता की मोगलांनी एका झटक्यात माघार घेतली. मराठ्यांनी अनेक पठाणांची कत्तल केली आणि त्याला रायगडाकडे जाण्यापासून रोखलं. प्रभावळीतल्या किल्ल्याचं काम हेच असतं त्यामुळं मुख्य दुर्गाइतकंच उलट कांकणभर महत्व प्रभावळीत असलेल्या या किल्ल्यांना द्यावं लागेल.
रायगडाची जागा एक राजधानी म्हणून अतिशय चपखल आहे. सह्याद्रीच्या ऐन गाभ्यात असलेल्या रायगडाचं भौगोलिक स्थानमहात्म्य ओळखून शिवाजी महाराजांनी राजधानीच्या आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगांवर दुर्गांचं संरक्षक कडं उभं केलं. महाराजांनी आपलं बलस्थान ओळखून त्याचा स्वतःच्या संरक्षणासाठी कसा उत्तम प्रकारे उपयोग करुन घेतला हे जर का जाणून घ्यायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी रायगडाच्या प्रभावळीत असलेल्या किल्ल्यांना जोडून परिक्रमा करायलाच हवी.
🚩🚩🚩
🚩 समारोप -
🚩 १) सहकाऱ्यांचं मनोधैर्य, प्रेरणा -
हा ट्रेक अवघड प्रकारातला नक्कीच म्हणता येईल कारण पहिल्या तीन दिवसांत प्रत्येक दिवशी जवळजवळ तीस किलोमीटर चाल आम्हाला करायची होती. बरं या सहा दिवसांत आम्हाला तीन घाटवाटांची चढाई आणि तीन घाटवाटांची उतराई देखील करावी लागणार होती. तशा तर सगळ्याच घाटवाटा अवघड होत्या पण त्यातही दिग्गज म्हणता येतील अशा कावळ्या घाट, बोराटा नाळ आणि चोरकणा या घाटवाटा होत्या. पहिल्या तीन दिवसांत एवढं करूनही शेवटच्या दिवशी अगदी सगळेजण जरी सायकलिंग करणार नसले तरी शेवटच्या दिवशी मानगडासह आम्हाला सहा किल्ल्यांची चढाई-उतराई करायची होती आणि ही देखील तशी काही सोपी गोष्ट नव्हती त्यामुळं...
...त्यामुळं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण टिमचं मनोधैर्य टिकवून ठेवणं, ते कायमच उच्च ठेवणं, वेळोवेळी सहकाऱ्यांना प्रेरणा देत राहणं ही ट्रेक लिडरची जबाबदारी असते आणि त्या परीक्षेत केवळ योग्य प्लॕनिंगमुळं मी पहिल्या दोन दिवसांतच उत्तीर्ण झालो होतो. शक्यतो सकाळच्या पहिल्या प्रहरात घाटवाटांची चढाई केल्यामुळं त्याचा म्हणावा तेवढा आघात शारीरिक तंदुरूस्तीवर झाला नव्हता. ट्रेक प्लॅनिंग महत्वाचं का असतं हे यावरून लक्षात येईल. शारीरिक थकावटीचा परिणाम मानसिकतेवर नक्कीच झाला असता. थोडक्यात संपूर्ण टिमचं मनोधैर्य खालावलं असतं. संपूर्ण टिमचं मनोधैर्य ट्रेक संपेपर्यंत उच्च ठेवण्याची जबाबदारीही लिडरला पार पाडावी लागते. 'मनोधैर्य टिकवणं हे नेत्याचं काम असतं' हे वाक्य जरी युद्धभूमी वरून आलेलं असलं तरी ट्रेकींगचं क्षेत्रही त्याला कसं अपवाद असेल? नाही का?
🚩 २) ट्रेकची अंमलबजावणी, वाटांची माहिती, ठिकाणं -
ट्रेकपूर्वी झालेल्या मिटिंग्समधे एकूणच ट्रेक कसा आहे, वाटांचे किती पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत, त्यापैकी कोणत्या वाटेनी आपण ट्रेक करणार आहोत, सगळ्या वाटा कशा आहेत, कुठे आहेत, त्याचा अवघडपणा किती आहे किंवा आपल्याला कुठे आणि किती काळजी घ्यावी लागेल, चालणाऱ्या संघाचा म्होरक्या कोण असेल आणि पाठीराखा कोण असेल, प्रत्येकाची जबाबदारी काय असेल वगैरे सगळ्या चर्चा ट्रेकपूर्वीच्या मिटिंग्समधे झाल्यामुळं प्रत्येकाला हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करणं ही काही प्रमाणात वैयक्तिक जबाबदारी वाटू लागली आणि तिथंच हा ट्रेक अर्धा यशस्वी झाला होता. कधीकधी लिडरला असंही करावं लागतं.
🚩 ३) शिस्त -
आम्हा फाल्कनच्या प्रत्येक ट्रेकमध्ये एक गोष्ट कसोशीने पाळली जाते ती म्हणजे शिस्त. थोडक्यात सकाळी सात वा़जता सुरू होणारा ट्रेक बरोबर सात वाजताच सुरू होत होता. त्यासाठी सकाळी सर्वांना वेळेत उठवण्याची जबाबदारी आम्ही एका खास भीडूवर सोपवलेली होती. ट्रेकची आखलेली दिवसभराची सगळी गणितं ही वेळेवरच अवलंबून असतात त्यासाठी Reverse Engineering चं तंत्र लिडरने उपयोगात आणलेलं असतं त्यामुळं सकाळचं गणित चुकलं की पुढची सगळी गणितं आपोआपच चुकत जातात. जी गोष्ट वेळेची तीच प्रत्येकाने सामाईक सामान उचलण्याची. प्रत्येकाने जे सामाईक सामान आहे ते बरोबरीने उचलायला हवं आणि ते प्रत्येकजण उचलतोय की नाही याची खात्री दररोज लीडरने करायला हवी.
ट्रेकमधे फक्त काही जणांवरच कामाचा भार पडू नये म्हणून प्रत्येकाला थोडीफार कामं नेमून दिली जातात. एखाद्याने काम केलं नाही तर साहजिकच त्याच्या कामाचा ताण दुसऱ्यावर पडतो आणि त्याची तक्रार लगेचच लीडरकडे येते. अशावेळी तिचं वेळीच निराकरण, तेही कुणाचं मन न दुखवता होणं गरजेचं असतं. 'Home Sickness' आल्यामुळं अशा वेळी छोट्या छोट्या खटक्यांचं पर्यवसान मोठ्या भांडणात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं सगळ्या ग्रूपचं बाँडींग निदान ट्रेक संपेपर्यंत तरी रहावं यासाठी 'Damage Control' ट्रेक लिडरला वेळीच करावं लागतं. हे असं जर वेळीच झालं नाही तर पुढे जाऊन खुप मोठी समस्या उभी राहते. हे असं प्रत्येक ट्रेकला, खास करुन जंबो ट्रेकला तर हे दररोज करावं लागतं. प्रत्येक जंबो ट्रेकमधे आम्ही हे जसं करतो तसं या ट्रेकला शिवथरघळीचा एकच अपवाद वगळता करावं लागलं नाही.
🚩 ४) दृढनिश्चय -
ट्रेकमधे सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे दृढनिश्चय. 'हा ट्रेक कितीही अवघड असला तरी आपण तो उत्तम रितीने पूर्ण करणार आहोत' असा दृढनिश्चय एकदा का तुम्ही केलात की आपोआपच तुमची पावलं त्याच्या यशाकडं वळू लागतात. यश मिळेपर्यंत ट्रेक लिडरने सोबत्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता उच्च ठेवण्यासाठी कायमच त्यांना Motivate करणं, प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. स्वयंशिस्त, समर्पणवृत्ती आणि दृढनिश्चय या बळावरच यशाचं शिखर गाठता येतं हे ट्रेक लिडरने नेहमीच लक्षात ठेवायला हवं. फाल्कन्सच्या प्रत्येक ट्रेकमध्ये योग्य प्लॅनिंगसोबतच ही गोष्ट ट्रेक लिडर कसोशीने पाळत असतो त्यामुळं आम्ही ठरवलेले अवघड, अनवट ट्रेक्सही उत्तम रीतीने पूर्ण होतात आणि असे उत्तम रीतीने पूर्ण झालेले ट्रेक्स अप्रत्यक्षपणे तुमचा आत्मविश्वास वाढवतच असतात.
🚩 ५) पर्यावरणपूरक ट्रेकिंग -
ही गोष्ट हल्ली फारच महत्वाची झाली आहे. प्लॅस्टीकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हल्ली बर्याच किल्ल्यावर हेच चित्र दिसून येतं. एक ट्रेकर म्हणून आपली पहिली हीच जबाबदारी आहे की आपण स्वतः प्लॅस्टीकचा वापर टाळला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही तो करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे किंवा त्यांच्यात जागरूकता तरी निर्माण केली पाहिजे. यासाठी आम्ही फाल्कन्स प्रत्येक ट्रेकला जाताना जेवणासाठी घरून ताटल्या घेऊन जातो. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या कधीच विकत घेत नाही तर नेलेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतो. इतकी वर्ष मी ट्रेकींग करतोय पण डोंगरातलं पाणी पिऊन मी आजारी पडलोय असं कधीच झालेलं नाही. अर्थात हा अनुभव प्रत्येक ट्रेकरला आला असेलच.
भूगोलाच्या अभ्यासासोबतच इतिहासाचा मागोवा घेत आम्ही ही भटकंती पूर्ण केली. अशा प्रकारे केलेली भटकंती तुम्हाला कायमच पुढील भटकंतीसाठी प्रेरणा देत असते. आमचंही काहीसं असंच झालंय. सह्याद्रीतल्या अशा अनगड वाटेवरच्या डोंगरयात्रा तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीपेक्षाही जास्त मानसिक सक्षम आणि अधिक निर्णयक्षम बनवत असतात. एवढंच नाही तर तुमच्यात प्रचंड सहनशीलता देखील निर्माण करतात.
नकाशात दाखवलेला मार्ग आणि ठिकाणं ही रायगडाच्या भौगोलिक परिसराचा अंदाज बांधता यावा यासाठीच दिलेली आहेत आणि ती gpx mapping मधूनच मार्किंग केली आहेत त्यामुळं ती जास्तीतजास्त to scale असतील पण ती अचूक असतीलच असं खात्रीशीरपणे सांगता येत नाही. मार्किंग करताना थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं देखील मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे किंवा थोडीफार कागदपत्रांची शोधाशोध केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणीवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणीवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. लेखाच्या शेवटी समर्थांचे काही निवडक श्लोक सांगून थांबतो...
सावध चित्ते शोधावे ।
शोधोनी अचूक वेचावे ।
वेचोनी उपयोगावे ।
ज्ञान काही ॥
जितुके काही आपणासी ठावे ।
तितुके हळुहळु सिकवावे ।
शाहाणे करूनी सोडावे ।
बहुत जन ॥
मर्यादेयं विराजते। लेखनसीमा॥
🚩 🚩 🚩















































































































































.jpg)
खूपच सुंदर लिखाण आहे. उत्कृष्ट असा हा ब्लॉग आहे. ट्रेक ठरवण्यापासून ते तो पूर्ण करेपर्यंतच्या सर्व बारकाव्यांची मांडणी तुम्ही अतिशय योग्य आणि प्रभावी पद्धतीने केली आहे.
उत्तर द्याहटवासंपूर्ण ट्रेक डोळ्यासमोरून तरळून गेला. उत्कृष्ट नियोजन आणि त्याची परिपूर्ण फलश्रुती....
उत्तर द्याहटवादिलीप आणि समस्त टीम फाल्कन.... मनःपूर्वक अभिनंदन! काय अफाट ट्रेक केला आहे तुम्ही सर्वांनी. Micro Planning आणि त्याचं तितकंच चोख excution याचं एक उत्तम उदाहरण आहे हे. या जंबो ट्रेकच्या दणदणीत यशाच हेच गमक आहे. हा ब्लॉग जरी मोठ्ठा असला तरीही तो प्रत्येक ट्रेकरने वाचलाच पाहिजे इतका माहितीपूर्ण आहे. पुनश्च सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि अशाच अभ्यासपूर्ण भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा! 💐👍
उत्तर द्याहटवा