३) "श्रीखंड महादेव"
🚩 कसे पोहोचाल? -
🚩 अ) विमानमार्गे - श्रीखंड महादेव यात्रेला विमानाने पोहोचायचं असेल तर सर्वात जवळचा विमानतळ सिमला हा आहे. हा विमानतळ जाओंपासून १८१ किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळावर फारच कमी विमानं उतरत असल्यामुळं चंदीगड विमानतळावरूनही इथं येता येतं. चंदीगड विमानतळापासून जाओं २८३ किलोमीटर आहे.
श्रीखंड महादेवचा प्रवास हिमाचल प्रदेशातील सिमलामार्गे राष्ट्रीय महामार्ग ०५ वरून सुरू होतो. सुमारे ६६० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पंजाबमधील 'फिरोजपूर' ते तिबेट सीमेजवळील हिमाचल प्रदेशातील 'शिपकी ला' पर्यंत म्हणजे भारत-चीन सीमेपर्यंत जातो. हा महामार्ग फिरोजपूर, मोगा, जगरांव, लुधियाना, मोहाली, चंदीगड, पंचकुला, कालका, सोलन, शिमला, थेओग, नारकंडा, रामपूर बुशहर, रिकाँगपियो या शहरांना जोडतो. या महामार्गावर सिमल्याच्या पुढं १३० किलोमीटर अंतरावर आणि रामपूर बुशहर शहराच्या पाच किलोमीटर अलिकडं असलेल्या फाट्याजवळ 'बजीर बावली' पूल आहे. या पुलावरून निरमंडकडं जाता येतं. या फाट्यावर डावीकडं वळलं की ३० किलोमीटर बागीपुल आहे. या बागीपुलावरून पुढं १२ किलोमीटर कच्च्या रस्त्याने जाओंपर्यंत आणि तिथून पुढं चालत श्रीखंड महादेवला पोहोचता येतं. श्रीखंड महादेवच्या पायथ्याशी असलेल्या बागीपुल, जाओं आणि सिंहगाड इथं यात्रा सुरू करण्यापुर्वी आपल्याला होम स्टे किंवा लंघरमध्ये मुक्काम करता येऊ शकतो. यात्राकाळात जाओंपासून श्रीखंड महादेवपर्यंत भरपूर लंघर लागलेले असतात.
बागीपूलापाशी पोहोचल्यानंतर पायथ्याच्या जाओंपर्यंतच्या १२ किलोमीटरसाठी एकतर चालत किंवा खाजगी गाडी करूनच जावं लागतं. स्वतःची खाजगी गाडी असल्यास थेट जाओंपर्यंत जाता येतं. जाओं इथं पार्कींगची सुविधा नसल्यामुळं गाडी बागीपुल इथंच पार्क करावी लागते. बागीपुल ते जाओं हा रस्ता कच्चा आणि वरचेवर भुस्लखन होणारा असल्यामुळं शक्यतो गाडी बागीपुल इथंच पार्क करावी. गाडीत ड्रायवर असल्यास यात्रा पूर्ण झाल्यावर फोन करून पिकअपसाठी गाडी बोलवून घेता येऊ शकते. श्रीखंड महादेवसाठी चंदिगडहून टुरिस्ट गाडी केल्यास शक्यतो ०७ वर्षांच्या आतील करावी. परतीच्या प्रवासात काही कारणास्तव दिल्ली इथं ड्रॉप करण्याची गरज भासली तर ०७ वर्षापुढील गाड्या दिल्ली शहरात आणता येत नाहीत. गाडी ठरवताना गाडीवाल्याशी याबाबतीत जरूर चौकशी करावी.
चंदीगडपासून जाओंपर्यंतच्या पट्ट्यात भुस्लखनाचे प्रकार सारखे होत असतात. आपली गाडी भाड्याची असेल तर रस्ता खुला होईपर्यंत गाडी त्याच जागेवर उभी करून त्या गाडीचे पैसे द्यावेच लागतात. अशावेळी सरकारी बसने प्रवास केल्यास फायद्याचं ठरू शकतं. ज्या ठिकाणी भुस्लखन झालेलं असेल अशा ठिकाणी HRTC च्या बसेस दोन्ही बाजूकडं अडकलेल्या असतातच. दोन्ही गाड्यांच्या चालक-वाहकांच्या परस्पर सहमतीने प्रवाश्यांची आदलाबदल होते आणि भुस्लखन झालेल्या ठिकाणापासून प्रवासी बदललेल्या बसेस माघारी आपल्या गंतव्य स्थळाकडे फिरतात.
HRTC बद्दलचा आणखी एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे त्याची प्रवाश्याबंद्दल असलेली आत्मियता. 'आम्ही २४ जण श्रीखंड महादेवच्या दर्शनासाठी येत आहोत आणि आम्ही संपूर्ण बस आरक्षित करतो' असं म्हटल्यावर फक्त आमच्यासाठी खास बस सोडण्याची तयारी रामपूर बुशहरच्या आगार व्यवस्थापकानं दाखवली. ती बस आम्हाला चंदीगड बसस्थानकाऐवजी चक्क रेल्वेस्थानकावरुन पिकअप करून तेवढ्याच तिकिटात बागीपूल इथं ड्रॉप करणार होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अशा सेवेची साहजिकच आपल्या MSRTC शी तुलना केली गेली नसती तरच नवल.
🚩 श्रीखंड महादेव शिळा दर्शन यात्रा अशी केली जाते...
हिंदू धर्मात पंच कैलासांपैकी एक असलेल्या श्रीखंड महादेव यात्रेला विशेष महत्त्व आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशातील दुर्गम पर्वतीय प्रदेशात आहे. दरवर्षी साधारण जुलै महिन्यात भाविक श्रीखंड महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कठीण प्रवास करतात. ही यात्रा श्रीखंड महादेव यात्रा समिती आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे आयोजित करतं. या यात्रेत सहभागी होण्यासाठी भाविकांना प्रथम नोंदणी करावी लागते. याशिवाय प्रत्येक यात्रेकरूला हा कठीण प्रवास सहन करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी स्वतःची वैद्यकीय तपासणी देखील करून घ्यावी लागते. सर्व पंच कैलासांमध्ये ही यात्रा अत्यंत कठीण मानली जाते आणि भारतातील सर्वात आव्हानात्मक तीर्थक्षेत्रांच्या यात्रांमध्ये ती गणली जाते. यात्रेदरम्यान भाविकांना उंच पर्वत, बर्फाच्छादित मार्ग आणि कमी ऑक्सिजन अशा कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. ही यात्रा जाओं गावापासून सुरू होऊन सिंहगाड, बाराती नाला, थाचडू, काली टॉप, भीमडवारी, पार्वती बाग करत श्रीखंड महादेवाच्या शिळेपाशी पोहोचते.
🚩 अंतरे -
सिमला ते निरमंड - १४७ किमी रस्ता
निरमंड ते बागीपुल - १७ किमी रस्ता
बागीपुल ते जाओं - १२ किमी कच्चा रस्ता
जाओं ते सिंहगाड - ०३ किमी चाल
सिंगगाड ते बाराती नाला - ०२ किमी चाल
बाराती नाला ते थाचडू - १० किमी चाल
थाचडू ते काली टॉप - ०३ किमी चाल
काली टॉप ते भीमडवारी - ०७ किमी चाल
भीमडवारी ते पार्वती बाग - ०२ किमी चाल
पार्वती बाग ते श्रीखंड महादेव - ०५ किमी चाल
🚩 श्रीखंड महादेव यात्रा -
श्रीखंड महादेव पायी यात्रेची सुरूवात जाओं गावापासून होते. हे जाओं गाव समुद्रसपाटीपासून ६३९४ फूट उंचीवर आहे. यात्राकाळात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस म्हणजेच आय. टी. बी. पी जाओंपुढच्या सिंहगाड इथं सुरक्षा चौकी उभारतं. ऑनलाईन नोंदणी केलेल्यांची नोंदणी प्रमाणपत्र तपासणं आणि नोंदणी न केलेल्यांची वैद्यकिय तपासणी करून नोंदणी करण्याचं काम या चौकीकडं असतं. श्रीखंड महादेव यात्रा समिती यात्रामार्गात केलेल्या सुविधांसाठी प्रत्येकाकडून ठराविक शुल्क आकारते. ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना ते शुल्क नोंदणी करतानाच भरावं लागतं तर ऑफलाईन नोंदणी करणार्यांना वैद्यकिय तपासणी उत्तीर्ण झाल्यावर रोख स्वरूपात भरावी लागतं.
श्रीखंड महादेव यात्रा ही भारतातील सर्वात कठीण तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. या यात्रेदरम्यान यात्रेकरूंना फक्त खडकाळ मार्गांवरून जावं लागतं असं नाही तर अनेक ठिकाणी वेगाने वाहणार्या नैसर्गिक धबधब्यातूनही जावं लागतं. प्रत्येक पावलागणीक यात्रेकरू अधिकाधिक उंचीवर जात असताना वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते ज्यामुळं श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय यात्रेकरूंना धोकादायक बर्फाच्छादित मार्गांमधून देखील जावं लागतं. अवघड समजली जाणारी अमरनाथ यात्रा तरी १४,००० फूट उंचीचीच आहे पण श्रीखंड महादेवाची शिळा मात्र समुद्रसपाटीपासून तब्बल १६८६३ फूट उंचीवर आहे.
ही यात्रा जितकी कठीण आहे तितकंच श्रीखंड महादेवाचं दर्शनही लोभस, दिव्य आणि हृदयस्पर्शी होतं. जे भक्त पूर्ण भक्ती आणि धैर्याने ही यात्रा पूर्ण करतात त्यांना दर्शन झाल्यावर एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव आणि आंतरिक शांती मिळते.
🚩 जाओं ते श्रीखंड महादेव शिळा -
श्रीखंड महादेव पर्वतावर ७२ फूट एकसंध दगडाचं बनलेलं शिवलिंग आहे. दरवर्षी साधारण जून-जुलै महिन्यात या ठिकाणी श्रीखंड महादेवची यात्रा भरते. स्थानिक यात्रा कमिटी आणि प्रशासन एकत्रितपणे वातावरणाचा अंदाज घेऊन या यात्रेचं आयोजन करतात त्यामुळं या यात्रेचा कार्यकाळ थोडाफार पुढंमागं होऊ शकतो. मोठ्या संख्येने यात्रेकरू ही यात्रा करतात. श्रीखंड महादेवला जाणारा एकेरी प्रवास सुमारे ३२ किलोमीटर इतका आहे. सर्व यात्रेकरू सोयीसुविधा पुरेशा असल्यामुळं जाओंमार्गेच यात्रा करतात. जाओं, सिंहगाडपुढील बाराती नाला ओलांडला की यात्रेतल्या खर्या चढाईला सुरूवात होते. जाओंमार्गे श्रीखंड महादेव यात्रेचा कार्यक्रम साधारण पाच दिवसांचा आहे. आम्ही ही यात्रा जाओंमार्गेच केली त्यामुळं त्याचाच इतिवृत्तांत इथं देत आहे.
🚩 दिवस पहिला -
जाओं, सिंहगाड ते थाचडू
अंतर - १५ किलोमीटर
उंची - ६३९४ फूट ते १०,६६२ फूट
आम्ही फाल्कन्स पुण्याहून 'चंदिगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस' ने चंदिगडपर्यंत जाणार होतो पण नेमकी त्याच दिवशी गाडी उशीराने धावत होती. साहजिकच आम्हाला चंदिगडला पोहोचायला उशीर झाला आणि पर्यायाने जाओंला. जाओं इथं पटकन टॅव्हलरमधून उतरून गाड्या बागीपुल इथं पाठवून दिल्या आणि आम्ही चालत सिंहगाड इथं पोहोचलो. तिथल्याच एका लंघरमध्ये दुपारची जेवणं उरकली. परवानगीचा सोपस्कार पार पाडला.
श्रीखंड महादेव यात्रा कुर्पनगड नदीच्या डाव्या तीरावरील ६३९४ फूट उंचीवर असलेल्या जाओं गावापासून सुरू होते. हे जाओं गाव श्रीखंड महादेवाच्या डोंगरातून उगम पावणार्या कुर्पनगड नदीच्या काठावर वसलेलं आहे. सिंहगाडपासून बाराती नाल्यापर्यंत वाट याच कुर्पनगड नदीच्या काठावरून जात होती. वरच्या बाजूला जोरदार पाऊस पडला आणि नदीला पाणी वाढलं तर ही वाट पाण्याखाली जाते. आम्ही गेलो तेव्हा पाणी वाटेवर आलं नव्हतं त्यामुळं आम्ही या वाटेने बाराती नाल्यावर पोहोचलो.
बाराती नाल्याजवळ कुर्पनगड आणि उमलीगड नद्यांचा संगम आहे. बाराती नाला ठिकाणापासून आमची पुढची चाल याच उमलीगड नदीशेजारून होणार होती. बाराती नाल्यानंतर आता आमची वाट चढणीला लागली. आजूबाजूला देवदार वृक्षांची गर्दी होती. बाराती नाल्याचा खळाळण्याचा आवाज स्पष्टपणे कानावर पडत होता. जसजसं वर चढू लागलो आणि संध्याकाळ होऊ लागली तसं आभाळात ढग जमू लागले. ठरलेल्या वेळेपेक्षा निघायला उशीर झाल्यामुळं सगळेच जण वेगात चढत होते. काहीही झालं तरी आज आम्हाला थाचडूला पोहोचायलाच हवं होतं. पुण्यापासूनचा रेल्वेप्रवास आणि पुढं रस्त्याने जाओंपर्यंतच्या प्रवासामुळं आलेल्या थकव्यामुळं थाचडूला लागलेल्या पहिल्या तंबूतच डेरा टाकला. हळूहळू करत एकेक भिडू मुकामाच्या तंबूत पोहोचले. सिंहगाड ते बाराती नाला साधारण सपाट चाल तर तिथून पुढच्या थाचडूच्या छातीवरच्या चढाईच्या प्रवासाला आम्हाला तब्बल चार तास लागले होते. आज आम्ही तब्बल ४२६८ फूटांची चढाई केली होती. थाचडूपर्यंतची चढाई देवदारच्या वृक्षराजीतून असल्यामुळं ऑक्सिजनचा त्रास मात्र जाणवला नाही.
🚩 दिवस दुसरा -
थाचडू ते भीमडवारी
अंतर - १० किलोमीटर
उंची - १०,६६२ फूट ते १२३०३ फूट
सकाळी लवकर आवरून थाचडूचा मुक्काम हलवला. थोड्याच अंतरावर थाचडूचा मुख्य थांबा लागला. या ठिकाणी असलेल्या लंघरमध्ये चहानाश्ता उरकला. इथं प्रशासनातर्फे वैद्यकिय छावणी उभारलेली दिसली.
आता आम्ही बर्यापैकी उंची गाठली होती. देवदारचे वृक्ष संपून गवताळ बुग्याल सुरू झाले होते. ढग आता आम्ही वरून पहात होतो. आणखी थोड्या चढाईनंतर आता खडकाळ भाग सुरू झाला. कातळटप्प्यावरून चढाई करत आम्ही काली टॉपवर पोहोचलो. इथं कालीमातेचं ठाणं आहे.
काली टॉपनंतर आता आम्हाला साधारण ५०० फूट खाली भीम तलाईपर्यंत उतरायचं होतं आणि पुन्हा तेवढंच कुन्शापर्यंत चढायचं होतं. कुन्शापासून दोन किलोमीटरची आडवी वाट सुरू झाली. या वाटेत असंख्य ओढे पार करावे लागले. त्यातले काही पाण्याचे होते तर काही बर्फाची ग्लेशियर्स.
वाटेतल्या कुन्शा इथल्या एका तंबूत असलेल्या धाब्यात दुपारची पोटपुजा उरकली. अॅडव्हान्स टीममधली पहिली व्यक्ती जिथं थांबेल तिथं आम्ही तंबूवर आमचा असा फ्लेक्स लावत असू जेणेकरून मागून येणार्या फाल्कन्सना पुढची मंडळी कुठं थांबली आहेत ते समजावं.
हळूहळु आता आम्ही बरीच उंची गाठली होती. दाट ढगांनी दर्या पूर्णपणे भरून टाकल्या होत्या. दुपारी चाडेचार~पाच वाजता आम्ही आमच्या आजच्या मुक्कामी जगदीशच्या तंबूत भीमडवारी इथं पोहोचलो. आज आमची एकूण चढाई जरी १६४१ फूट झाली असली तरी काली टॉपपासून ५०० फूटांची उतराई आणि तेवढीच चढाई देखील झाली होती. उद्या सकाळी लवकर निघायचं असल्यामुळं रात्री लवकर जेवणं उरकून झोपी गेलो.
🚩 दिवस तिसरा -
भीमडवारी ते श्रीखंड महादेव ते भीमडवारी
अंतर - १४ किलोमीटर
उंची - १२३०३ फूट ते १६८६३ फूट ते १२३०३ फूट
आज आमचा मुख्य परिक्षेचा दिवस होता. इथं आम्ही आमच्या संघाचे दोन संघ केले. पहिला शारीरिक सक्षम असलेला तर दुसरा थोड्या आरामानं सक्षम होणारा असा होता. पहिल्या संघाला ज्यामध्ये मी होतो त्यांना आजच्या एका दिवसात १४ किलोमीटर चालून ४५६० फूटांची चढाई आणि तेवढीच उतराई करायची होती. भल्या पहाटे चार वाजता अंधारातच आम्ही आमची आन्हिकं उरकून तंबूबाहेर पडलो. पाऊस हलकासा पडत होता. सुरवातीची साधारण एक किलोमीटरची चाल सपाटीची असल्यामुळं सगळे वेगात चालत होते. पार्वती बागेची चढाई सुरू करणार त्या पायथ्यात एक ओढा वाहत होता. पाऊस जोरदार झाला तर या ओढ्याला पाणी येतं आणि तो ओलांडणं अवघड होतं. आम्ही ओढ्यापाशी पोहोचलो तेव्हा सुदैवानं ओढ्याला कमी पाणी होतं. हा ओढा म्हणजे वाटेतला एक मोठा अडसर आहे. पाणी वाढलं तर तिकडची मंडळी तिकडं आणि इकडची इकडं असं होतं. अर्थात हे आधीच माहिती असल्यामुळं आम्ही सोबत ५० फूटी सुरक्षादोर ठेवला होता पण त्याची गरज भासली नाही. चढाई करून पार्वती बाग गाठलं आणि तसंच पुढं नैन सरोवर. नैन सरोवरापर्यंत आम्ही साधारण अडीच किलोमीटर चालून १६४० फूटांची चढाई केली होती पण यासाठी आम्हाला जवळजवळ तीन तास लागले होते. खरंतर एव्हाना खूप वेळ मोडला होता आता घाई करायला हवी होती.
नैन सरोवरापासून पुढं मोरेनवरून चढाई सुरू झाली. लूज रॉक आणि अधेमधे असलेल्या लूज सॉईलमुळं फारच काळजीपुर्वक चढाई करावी लागत होती. चढाईचा पहिला टप्पा चढल्यावर एका धारेवर पोहोचलो. पलिकडच्या बाजूला खूप लांबपर्यंत परिसर दिसत होता पण शिखरं काही ओळखता आली नाहीत.
जसजशी चढाई होत होती तसतसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागला होता. डोळ्याच्या पापण्या आणि जीभ जड व्हायला लागली होती. थोड्या चढाईनंतर दमायला होत होतं पण इथं येण्यापूर्वी केलेल्या सरावाचा चांगलाच फायदा झाला. दम लागू न देता हळूहळू चढाई सुरू ठेवली. नैन सरोवरानंतर साधारण एक किलोमीटरनंतर भीम बाही नावाची जागा लागली. हे ठिकाण १६०४३ फूट उंचीवर आहे. त्याठिकाणी दगडावर असंख्य खड्डे पडलेले दिसले. याचं नक्कीच काहीतरी शास्त्रीय कारण असू शकतं पण ते बरेचदा आख्यायिकेशी जोडलं जातं. अर्थातच याचा शोध घ्यायला हवा.
इथून पुढच्या चढाईमध्ये आता बर्फावरून चढावं लागलं. या बर्फाखालीसुद्धा मोरेन होतं त्यामुळं प्रत्येक पाय जपून टाकावा लागत होता. दोन दगडांच्या मधल्या मोकळ्या जागेतून पाय कधी खालच्या खड्ड्यात जाईल याचा नेम नव्हता. पुढच्याच्या 'पावलावर पाऊल' टाकून न सांगता प्रत्येकजण चालत होता. थोडं अंतर बर्फातून चालल्यावर पुन्हा मोरेन लागलं.
अखेर ज्यासाठी एवढा अट्टाहास केला होता ते ठिकाण आलं. पोहोचल्या पोहोचल्या श्रीखंड महादेवाला साष्टांग दंडवत घातलं. डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. त्यावेळी मनात नक्की कोणती भावना होती ते सांगू शकत नाही, सांगताही येणार नाही. कर्मकांड आणि अध्यात्मात रमणारा मी नव्हे पण त्यावेळी तिथं जे मनाला जाणवत होतं ते मात्र अनाकलनीय होतं. खरंतर HATP साठी आलेलो मी शेवटी ही यात्राच असल्याचं मनोमन मान्य करून टाकलं. त्या ठिकाणी जे काही जाणवलं ते अद्भूत होतं. प्रत्येकानं त्याची प्रचिती घ्यायला हवी. होय! प्रचितीच कारण ते दुसर्याने सांगून समजणारच नाही. त्याचा अनुभवच घ्यायला हवा.
भीमडवारी ते थाचडू ते सिंहगाड
अंतर - २५ किलोमीटर
उंची - १२३०३ फूट ते ६३९४ फूट
पहिल्या दिवशी थाचडू आणि दुसर्या दिवशी भीमडवारीपर्यंत अशी दोन दिवसात जवळजवळ ६००० फूट चढाई झाल्यामुळं आम्ही ज्याला हवा त्याच्यासाठी तिसर्या दिवशी रेस्ट डे चा पर्याय ठेवला होता. जी मंडळी सक्षम होती त्यांनी तिसर्या दिवशीच श्रीखंड महादेवचं दर्शन घेतलं आणि चौथ्या दिवशी रेस्ट डे घेतला. मी पहिल्या दिवशीच्या संघात असल्यामुळं चौथ्या दिवशी मी पुर्णपणे आराम केला. आज आरामच असल्यामुळं आज आम्ही सर्वांसाठी कांदाभजी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीची बटाट्याची रस्साभाजी बनवली होती. आमच्यापेक्षा आमच्या तंबूमालकालाच त्याचं जास्त अप्रूप वाटत होतं. त्यानेही कुणाकुणाकडं जाऊन कांदे, लसून आणि आलं मागून आणलं होतं.
डॉक्टरांनी त्याला खाली नेण्यासाठी आम्हा पाच जणांसोबत आणखी चार जणांचं बचाव पथक दिलं. इथून पुढचा जाओंपर्यंतचा काळ आमच्यासाठी परिक्षेचा होता. आम्ही एकूण १० जण रात्री तुफान पावसात जाओं इथं जायला निघालो. भीमडवारीच्या डॉक्टरांनी आमच्याकडं एक चिठ्ठी देऊन पुढच्या प्रत्येक वैद्यकिय छावणीत आमच्याबद्दल वॉकीटॉकीवरून कळवून ठेवलं होतं. प्रवासात गरज पडली तर आमच्याकडं आम्ही नेलेल्या तीन ऑक्सिजन सिलेंडरशिवाय आणखी दोन सिलेंदर भीमडवारीच्या डॉक्टरांनी दिले. रात्री साधारण ११ वाजता सुरू झालेला धुंवाधार पावसातला आमचा प्रवास ०६ तासांनंतर सकाळी ०५ वाजता आम्ही कुन्शाच्या वैद्यकिय छावणीत थांबवला. तिथं पुन्हा एकदा त्याला दोनचार इंजेक्शन देऊन दोन तास ऑक्सिजन लावला. दोन तासानंतरही त्याच्या शरीरातल्या ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ होत नव्हती. तिथल्या डॉक्टरांचंही हेच म्हणणं पडलं की त्याला लवकरात लवकर जाओं इथं घेऊन जावं. कुन्शापासून जाओंपर्यंत अजूनही जवळजवळ २०~२२ किलोमीटरची चाल बाकी होती.
कुन्शा इथून निघाल्यावर आम्ही आमचा पुढचा थांबा काली टॉप इथं घेतला. थोडा चहानाश्ता करून आमची पलटण थाचडू इथल्या वैद्यकिय छावणीत पोहोचली. तिथल्या वैद्यकिय छावणीत थोडावेळ ऑक्सिजन दिल्यावर पातळी काहीशी वाढली पण अजूनही धोका टळला नव्हता. थाचडु इथं भरपूर झाडं असल्यामुळं वातावरणातल्या ऑक्सिजनचं प्रमाणही चांगलं होतं. हळूहळू आम्ही बाराती नाल्यावर पोहोचलो. आता बर्यापैकी सपाटीवरून चाल होती आणि शेवटही टप्प्यात आला होता. मजलदरमजल करत चौथ्या दिवशी रात्री निघालेलो आम्ही शेवटी पाचव्या दिवशी संध्याकाळी ०५ वाजता सिंहगाड इथं पोहोचलो. सिंहगाड इथं रात्रभर डॉक्टरांच्या नजरेखाली राहिल्यानंतर त्याचा धोका टळला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि आम्हा सर्वांनाच हायसं वाटलं. एक मोठा धोका टळला होता. एक जीव वाचवल्याचं समाधान आम्हा पाचही जणांच्या चेहर्यावर दिसत होतं. लगेचच त्याचं विमानाचं तात्काळ तिकिट काढून पुण्याला पाठवून दिलं.
'श्रीखंड महादेव यात्रा कमिटी'च्या अध्यक्षांच्या गोविंदभाई शर्मांच्या सिंहगाड इथं असलेल्या लंघरमध्ये आज आमचा मुक्काम होता. 'उशीर झाल्यामुळं आत्ता जाताना थांबू शकत नाही पण येताना मात्र नक्की मुक्काम करू' असं चांगला परिचय असल्यामुळं जाताना त्यांना आवताण दिलं होतं, जे आता आम्ही पाळत होतो. २४ पैकी २४ जणांचं दर्शन झालं म्हटल्यावर त्यांनी त्याच्या पद्धतीनूसार आम्हा सर्वांचा आवर्जून सत्कार केला आणि एक छोटी भॅटवस्तू देखील दिली. 'इतक्या मोठ्या ग्रूपच्या सर्वांचं दर्शन झालं ही खूप मोठी गोष्ट आहे. सहसा असं होत नाही' असं त्यांनी आवर्जून सांगितलं. बचाव पथकातल्या आम्हा पाच जणांचं तर त्यांनी विशेष कौतूक केलं.
रात्रीच्या जेवणानंतर गोविंदभाईंशी अनौपचारिक गप्पा मारत बसलो होतो. नैन सरोवराच्या पुढं भीम बाहीजवळ काही स्थानिक मंडळी दुसर्या वाटेने चढून येताना दिसली. सहजच त्याबद्दल गोविंदभाईंना विचारलं तर त्यांनी श्रीखंड महादेव आणि त्याच्या इतर वाटांबद्दल इत्यंभूत माहिती दिली. श्रीखंड महादेव हे पंचक्रोशीतल्या सर्वांचच दैवत असल्यामुळं आजूबाजूच्या गावांमधूनही चढाई करून त्याचं दर्शन घेता येतं. अर्थात जाओंमार्गे वाट सोपी असल्यामुळं प्रशासनातर्फे फक्त जाओंमार्गेच यात्रेचं आयोजन केलं जातं. आम्ही ही यात्रा २०२२ साली केली होती त्यावेळी गोविंदभाई सांगत असताना मी वाटांचं टिपण करून ठेवलं होतं. ते टिपण आणि गुगलवरची माहिती एकत्र करून आम्ही केलेली एक आणि उरलेल्या पाच अशा एकूण सहा वाटांची माहिती देण्याचा इथं प्रयत्न केला आहे. जाओं सोडून दिलेल्या इतर कोणत्याच वाटेने मी स्वतः गेलेलो नसल्यामुळं या वाटांनी श्रीखंड महादेवचं दर्शन घ्यायचं असल्यास या वाटांबद्दल संपूर्ण चौकशी करून आणि खात्री करूनच जावं. यातल्या बर्याच वाटा सध्या मोडल्यामुळं या वाटांनी श्रीखंड महादेवाचं दर्शन घेणं म्हणजे एक साहसच ठरेल. जोपर्यंत कुणी या वाटांनी जात नाही आणि त्या वाटेची खात्रीलायक माहिती देत नाही तोपर्यंत 'या वाटा सध्या अस्तित्वात नाहीत' असंच समजावं. कोणत्या आहेत श्रीखंड महादेवच्या सहा वाटा?
निरमंड - बागीपुल - जाओं ते श्रीखंड महादेव
आम्ही या वाटेनेच यात्रा केल्यामुळं या मार्गाचं सविस्तर वर्णन वर केलं आहेच.रामपूर बुशहर - ज्यूरी - फांचा ते श्रीखंड महादेव
राष्ट्रीय महामार्ग ०५ वर रामपूर बुशहरच्या पुढं २३ किलोमीटर अंतरावर सिमला जिल्ह्यातल्या गणवी व्हॅलीत असलेल्या ज्यूरी गावापासून १५ किलोमीटर फांचा हे गाव वसलेलं आहे. फांचा गावापासून श्रीखंड महादेवचं अंतर १९ किलोमीटर आहे. या मार्गावर राहण्याच्या सोयींव्यतिरिक्त इतर कोणत्याही सोयी उपलब्ध नाहीत. या मार्गवरील ठिकाणं, त्यांची उंची आणि अंतरे अशी आहेत.१) फांचा (७२६३ फूट) ते फांचा कांडा (८०३८ फूट) - ०३ किलोमीटर
२) फांचा कांडा ते सापावा (१०७८४ फूट) - ०५ किलोमीटर
३) सापावा ते मजबून (१३१२३ फूट) - ०६ किलोमीटर
४) मजबून ते भीम बाही (१६०४३ फूट) - ०३ किलोमीटर
५) भीम बाही ते श्रीखंड महादेव (१६८६३ फूट) - ०२ किलोमीटर
भीम बाहीपासून आपण पहिल्या जाओं मार्गालाच येऊन मिळतो.
सिमला - थेओग - कुमारसैन - अनी - जलोरी खिंड - बंजार - बठाहाड ते श्रीखंड महादेव
सिमल्यापासून मनालीकडं जाऊ लागलं की वाटेत बंजार गाव लागतं. बंजार गावापासून बठाहाड २० किलोमीटर अंतरावर आहे. बठाहाडपासून श्रीखंड महादेवची चाल सुरू करता येते. फलाचन नदी बठाहाड गावाजवळून वाहते. त्यामुळं या भागाला फलाचन व्हॅली असंही म्हटलं जातं. हा सर्व भाग 'ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्याना'मध्ये मोडतो. या मार्गवरील ठिकाणं, त्यांची उंची आणि अंतरे अशी आहेत.१) बठाहाड ( ६७२५ फूट) ते फलाच नदी उगम (१२०४० फूट) - अंतर उपलब्ध नाही.
२) फलाच नदी उगम ते भीमडवारी (१२३०३ फूट) - अंतर उपलब्ध नाही.
भीमडवारीपासून आपण पहिल्या जाओं मार्गालाच येऊन मिळतो.
सिमला - जलोरी खिंड - बंजार - नागिणी - गुशैणी ते ते श्रीखंड महादेव
सिमल्यापासून बंजार गावाच्या रस्त्याने बंजारपुढं रस्ता उजवीकडं वळून १० किलोमीटरवरच्या गुशैणी गावात पोहोचतो. गुशैणी गावाची उंची ५२०० फूट आहे. गुशैणीपासूनची वाट तीर्थन खोऱ्यात वाहणाऱ्या तीर्थन नदीच्या बाजूने पुढं जात राहते. यात मार्गात अनेक छोटी गावं लागतात. चढाई करत जिथं पोहोचतो तिथं तीर्थन नदी हिमनदीचे रूप घेते. त्या ठिकाणाला बन्यांग असं म्हणतात. ही संपूर्ण वाट 'ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्याना'मधून जाते. या वाटेवर ११ तलाव आहेत असं स्थानिक सांगतात. या मार्गात अनेक ओढे, हिमनद्या ओलांडाव्या लागतात. माहितगार वाटाड्या सोबत असल्याशिवाय या वाटेने जाऊ नये.रामपूर बुशहर - झाकरी - समेज ते श्रीखंड महादेव
रामपूर बुशहरपासून ज्यूरीकडं जाऊ लागलं की वाटेत झाकरी गाव लागतं. या झाकरी गावाची उंची ३८७४ फूट आहे. झाकरीपासून एक रस्ता समेज इथल्या हायड्रो पॉवर प्लँटपर्यंत जातो. इथून पुढं जाऊन आपल्याला नैन सरोवरापाशी जाओंच्या मार्गाला मिळता येतं. या वाटेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.🚩 मार्ग सहावा -
चंदिगड - बिलासपूर - सुंदरनगर - मंडी - मनीकरण - खीरगंगा पार्वती व्हॅली ते श्रीखंड महादेव
श्रीखंड कैलासला पोहोचण्यासाठी सहावी वाट खीरगंगा येथून सुरू होते. काळानुरूप ही वाट हिमनद्यांमध्ये गाडली गेली आहे. या वाटेबद्दल कोणालाच काही माहिती नाही. श्रीखंड महादेवाच्या शिखरावर लावलेल्या एका पत्र्याच्या बोर्डवर या वाटेविषयी जुजबी माहिती मिळते आहे. बोर्डवर असं लिहिलेलं वाचता येतं 'ऐसी मान्यता है कि श्री खंड से एक मार्ग खीरी गंगा व मणिकर्ण स्थान को भी निकलता है परन्तू मार्ग बहूत ही कठीन व बर्फ के ग्लेशियरों से भरा है।' अर्थात खाली त्याला कोणताही आधार दिलेला नाही त्यामुळं ही वाट एक आख्यायिकाच म्हणावी लागेल.
🚩 खीरगंगा मार्ग वगळता श्रीखंड महादेवला पोहोचण्याचे इतर मार्ग असे आहेत...
🚩 आख्यायिका -
श्रीखंड महादेवाशी संबंधित एक प्रसिद्ध पौराणिक कथा खूपच मनोरंजक आहे. असं म्हटलं जातं की प्राचीन काळी भस्मासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले. भस्मासुराने असा वर मागितला की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल तो लगेच जळून भस्म होईल. खरंतर देवांना पराभूत करण्याच्या उद्देशाने त्याने ही शक्ती मागितली होती पण ही शक्ती मिळताच त्याला अहंकार झाला आणि तो स्वतःला देवापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला. त्याच्या अहंकाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्याने त्याच शक्तीने भगवान शिवाचाच नाश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा पाठलाग सुरू केला.
भगवान शिव आता संकटात होते त्यामुळं त्यांनी भगवान विष्णूंना मदतीसाठी प्रार्थना केली. भगवान विष्णूनं एका सुंदर स्त्रीचं म्हणजे मोहिनीचं रूप धारण केलं. या रूपात विष्णूनं भस्मासुराला आकर्षित केलं आणि त्याला नृत्य करता करता स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडलं. भस्मासुरानं स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला आणि तो स्वत:च जळून भस्म झाला.
ही घटना श्रीखंड महादेव परिसरात घडली असं मानलं जातं. आजही त्या ठिकाणच्या मातीचा आणि पाण्याचा रंग थोडा लालसर आहे जो आपल्याला भस्मासुराच्या अंताची आठवण करून देतो. ही कथा केवळ श्रीखंड महादेवाच्या वैभवावर प्रकाश टाकत नाही तर अहंकारातून मिळवलेल्या शक्तीचा गैरवापर शेवटी विनाशाकडे नेतो हे देखील शिकवते. भगवान शिवाच्या या कथेवरून हे देखील स्पष्ट होतं की जेव्हा जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा भगवान विष्णू नक्कीच मदतीला धावून येतात.
🚩 नैन/नयन सरोवराशी संबंधित कथा -
श्रीखंड महादेवाकडे जाणाऱ्या वाटेवर नैन सरोवर नावाचं एक पवित्र स्थान आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हे स्थान खूप महत्वाचे आहे. मान्यतेनुसार जेव्हा भगवान शिव भस्मासुरापासून वाचण्यासाठी श्रीखंडाच्या टेकड्यांवर गेले आणि खोल ध्यानात मग्न झाले. तेव्हा देवी पार्वती त्यांच्यापासून विभक्त झाल्यामुळे खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमधून हे सुंदर सरोवर तयार झालं म्हणूनच या जलाशयाला 'नैन सरोवर' असं म्हटलं जातं. ज्याचा अर्थ डोळ्यांचा सरोवर असा सुद्धा आहे. हे सरोवर श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. हे ठिकाण श्रीखंड महादेवाच्या शिखरापासून अलिकडं सुमारे ०३ किलोमीटर अंतरावर आहे.
🚩 देव ढांग -
फिरोजपूर - शिपकीला या राष्ट्रीय महामार्ग ०५ वर असलेल्या 'बजीर बावली' पुलापासून डावीकडं वळलं की १० किलोमीटर अंतरावर हे देव ढांग ठिकाण पहायला मिळतं. हे ठिकाण श्रीखंड महादेवाच्या आख्यायिकेशी जोडलेलं आहे. देव ढांग गुहेलाच धार देव ढांग गुहा म्हणूनही ओळखलं जातं.
निरमंडच्या दक्षिणेस साधारण ०३ किलोमीटर अंतरावर नैसर्गिकरित्या तयार झालेलं शिवलिंग असलेली ही एक विशाल गुहा आहे. गुहेच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचा कोणताही स्त्रोत नसताना गुहेच्या आतल्या बाजूचं छत मात्र ओलसर असतं आणि शिवलिंगावर पाणी ठिबकत असतं. गुहा मंदिरात जाण्यासाठी आपल्याला ६ फूट उंच असलेल्या एका अरूंद फटीतून जावं लागतं. गुहेत गेल्यानंतर बाकी गुहा बरीच खोल आहे.
एका आख्यायिकेनुसार एक स्थानिक ब्राह्मण त्याची मौल्यवान बकरी अचानक गायब झाल्यामुळे गोंधळला होता. भगवान शिव त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाले की ती बकरी एका गुहेत भटकली आहे आणि जिथे ती शिवलिंगाला दूध अर्पण करत आहे. थोडा शोध घेतल्यावर ब्राह्मणाला त्याची बकरी परत मिळाली. त्यानंतर मात्र त्या ब्राह्मणाने त्याचं उरलेलं आयुष्य शिवाच्या सेवेत घालवलं.
आणखी एका आख्यायिकेनुसार भस्मासुर नावाच्या राक्षसाने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शेकडो वर्षे तपस्या केली. प्रसन्न होऊन भोलेनाथांनी त्याला भस्म कंगनाचं वरदान दिलं. या वरामुळं आता तो राक्षस कुणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करू शकत होता. वरदान मिळालेल्या भस्मासुर राक्षसाने खुद्द शिवावरच हात ठेवून त्यांना भस्म करण्याचा विचार केला आणि भगवान शिवाच्या मागे लागला. भस्मासुर राक्षस मागं लागल्यामुळं भगवान शिव धार देव ढांग गुहेच्या गुप्त मार्गाने निसटून कैलासकडे गेले. असं मानलं जातं की देव ढांग गुहेतून एक गुप्त मार्ग थेट श्रीखंड महादेवाकडे जातो. या आख्यायिकेमुळं श्रीखंड महादेवाचं दर्शन घेण्याआधी देव ढांग इथलं दर्शन घेण्याची प्रथा पडली आहे.
🚩 कधी जाल?
श्रीखंड महादेव यात्रा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मे ते ऑक्टोबर दरम्यानची मानली जाते. या दरम्यानच्या पावसाळ्यात यात्रा मात्र चुकूनही करू नये. ही यात्रा पावसाळ्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये करावी. हिवाळ्यात सर्वत्र बर्फवृष्टी होते आणि संपूर्ण मार्ग बंद होतो. उन्हाळा हा श्रीखंड महादेव यात्रा करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
🚩 यात्रा आयोजन -
वातावरणाची परिस्थिती पाहून श्रीखंड महादेव यात्रा कमिटी आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे अधिकृत यात्रेचा कार्यकाळ ठरवते. त्यानूसार सर्व स्थानिक वृत्तपत्रात आणि निरमंड इथं असलेल्या कुल्लू जिल्हा प्रशासनाच्या https://shrikhandyatra.hp.gov.in/register या अधिकृत वेबसाईटवर तो कार्यकाळ सांगितला जातो आणि त्यानूसार नोंदणी प्रक्रियेसाठी धागा उपलब्ध करून दिला जातो. साधारण पंधरा दिवसांच्या यात्राकाळात दरदिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी केलेल्या ८०० यात्रेकरूंना प्रवेश दिला जातो. वयवर्षे १८ ते ६० दरम्यानच्या यात्रेकरूंनाच ही अधिकृत यात्रा करता येते. वयवर्षे १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुणालाच ही यात्रा करण्याची परवानगी मिळत नाही. अधिकृत यात्रेच्या कार्यकाळाव्यतिरिक्त इतर काळात कुणालाही ही यात्रा करता येते मात्र ती स्वतःच्या जबाबदारीवरच करावी लागते. अधिकृत नोंदणी करून यात्रा करणार्या यात्रेकरूंना वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर खालील माहिती भरून नोंदणी करता येते.
Name
Father/Husband Name
Date Of Birth
Mobile No
Gender
Nationality
State
District
Address
Reporting Date At Base Camp
Name of Near Relative
Contact No. of Near Relative
ID proof (Max size 1Mb)
Medical certificate (Max size 1Mb)
Email
वरील माहिती भरून आपलं नाव Register करता येतं.
🚩 यात्रा करताना काय करावं आणि काय करू नये याबरोबरच काही आवश्यक सूचनाही नोंदणी धाग्यावर खाली वाचायला मिळतात -
🚩 क्या करें -
१) यात्री अपना पंजीकरण अवश्य करायें।
२) चिकित्सा प्रमाण पत्र अपने साथ लेकर आयें तथा बेस कैम्प सिंहगाड़ में स्वास्थ्य जांच अवश्य करायें। पूर्णतया स्वस्थ होने पर ही यात्रा करें।
३) अकेले यात्रा न करें केवल साथियों के साथ ही यात्रा करें।
४) चढाई धीरे धीरे चढे सांस फूलने पर वहीं रूक जायें।
५) छाता, बरसाती, गर्म कपडे़, गर्म जूते, टार्च एंव डण्डा अपने साथ अवश्य लायें।
६) प्रशासन द्वारा निर्धारित रास्तों का ही प्रयोग करें।
७) किसी भी प्रकार की स्वास्थ्य सम्बन्धी समस्या हेतू निकटतम कैंप में सम्पर्क करें।
८) सफाई का विशेष ध्यान रखें।
९) दुर्लभ जड़ी बूटियों एंव अन्य पौधो के संरक्षण में सहयोग करें।
१०) इस यात्रा को पिकनिक अथवा मौजमस्ती के रूप में न लें व केवल भक्तिभाव एंव आस्था से ही तीर्थ यात्रा करें।
११) किसी भी प्रकार का दान अथवा चढ़ावा केवल ट्रस्ट के दान पात्रों में ही डालें।
🚩 क्या न करें -
१) सुबह 6 बजे से पहले और शाम 6 बजे के बाद बेस कैम्प सिंहगाड़ से यात्रा न करें।
२) बिना पंजीकरण एंव चिकित्सकीये रूप से फिट न होने पर यात्रा न करें।
३) अपने साथियों का साथ न छोड़े, जबरदस्ती चढाई न चढें़ व फिसलने वाले जूते न पहने यह घातक हो सकता है।
४) किसी भी प्रकार के शॉर्ट कट का प्रयोग न करें।
५) खाली प्लास्टिक की बोतलें एंव रैपर इस्यादि खले में न फंेके बल्कि अपने साथ वापिस लाकन कूड़ादान में डाले।
६) जड़ी बूटियों एंव दुर्लभ पौधों से छेड़ छेड़ा न करें।
७) किसी भी प्रकार के नशाले पदार्थो मांस मदिरा इत्यादि का सेवन न करें। यह एक धार्मिक यात्रा है हसकी पवित्रता का ध्यान रखें।
८) श्री खण्ड महादेव की पवित्र चटान पर किसी भी प्रकार का चढ़ावा अथव त्रिशूल इत्यादि लगाने के लिये न चढें़। पवित्र चटटान अत्यन्त पावन शिवलिंग का स्वरूप है। इसके उपर पैर रखकर इसकी पवित्रता नष्ट न करें।
🚩 आवश्यक सूचना -
१) यह यात्रा दिनांक 10 जुलाई,2025 से 23 जुलाई,2025 तक होगी।
२) यात्रा न करने की सूरत में तथा बेस कैम्प सिंहगड में मेडिकल चैकअप में अस्वस्थ पाए जाने पर पंजीकरण शुल्क वापिस नहीं होगा।
३) 18 साल से कम तथा 60 साल से अधिक उम्र के व्यक्तियों को यात्रा न करने की सलाह दी जाती है।
४) पंजीकरण करना अनिवार्य है, बिना पंजीकरण के यात्रा करने पर किसी भी बेस कैम्प से वापिस भेजा जा सकता है।
५) पंजीकरण फीस प्रति यात्रि 250/- रुपये है।
🚩 जवळची पाहण्याची ठिकाणं -
ही यात्रा करण्यासाठी येताना काही दिवस जादाचे काढून आल्यास जवळपासची बरीच ठिकाणं पाहता येतात. यात युला कांडा, चिटकुल, सिमला, स्पिती व्हॅली वगैरे पाहता येतं. चंदीगडहून या यात्रेला जोडूनच स्पिती, अटल टनेल करून मनालीमार्गे पुन्हा चंदिगड अशी सहल सुद्धा करता येते. हाताशी काही दिवस असतील आणि यात्राच करायची असेल तर श्रीखंड महादेवला जोडून किन्नौर कैलासची यात्रा सुद्धा करता येईल. अर्थात इथंसुद्धा उपलब्ध वेळेनुसार प्रत्येकजण आपला स्वतःचा कार्यक्रम ठरवू शकतो.
॥ ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॥
वैराग्ययोगी शिव शूलपाणी।
सदा समाधी निजबोधवाणी॥
उमानिवासा त्रिपुरांतकारी।
तुजवीण शंभो मज कोण तारी॥
🚩 फोटो सौजन्य -
१) गुगल
२) टिम फाल्कन
🚩 संदर्भ -
१) गुगल
२) विकीपिडीया
३) स्थानिक
लेखनसीमा ॥ लोभ असावा ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा