मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

“What's in a name? म्हणजे नावात काय आहे?“

        'ज्याला आपण गुलाब म्हणतो किंवा इतर कोणत्याही नावाने सुद्धा त्या फुलाचा वास तितकाच गोड असेल.' ही इ.स. १५९१ ते १५९६ दरम्यान लिहिल्या गेलेल्या विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलिएट नाटकातील एक ओळ आहे. ज्युलिएट हे रोमियोला सांगताना पुढं म्हणते की नावात काय आहे? नावं ही फक्त एक परंपरा आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही. पुढं ती रोमिओला असंही म्हणते की ती व्यक्तीवर प्रेम करते, त्याचं नाव किंवा त्याच्या कुटुंबावर नाही.

       नाटकाच्या अनुशंगानं हे सर्व ठीक आहे पण व्यवहारी जगात खरंच असं असतं का? तर मुळीच नाही. हे नाटक लिहिल्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी म्हणजे शिवकाळात देखील कित्येक किल्ल्यांची नावं बदललेली आपल्याला पहायला मिळतं. एकट्या रायगडाची पंधरा नावं ऐतिहासिक साधनांत मिळतात. एवढंच काय तर सिंहगडाचीही पाचसहा नावं आहेत.
       अठराव्या शतकात गडाची जबाबदारी त्र्यंबक शिवदेव व सिधोजी जाधव यांच्यावर होती. त्यांनी दाद न दिल्यानं शेवटी सोमाजी विश्वनाथ पुरंदरे यांच्या मदतीनं राजकारण करून म्हणजे पन्नास हजार रूपये लाच देऊन शेवटी १४ एप्रिल १७०३ मध्ये सिंहगड ताब्यात घ्यावा लागला आणि त्याचं सिंहगड हे नाव बदलून 'बक्षिंदाबक्ष' म्हणजे देवाची देणगी असं ठेवलं गेलं. गड ताब्यात आल्यावर लगेचच म्हणजे १८ एप्रिल रोजी स्वतः औरंगजेब पालखीत बसून किल्ला बघायला आला. अर्थात नंतरच्या काळात बक्षिंदाबक्ष हे नाव रूढ झालं नाही हा भाग वेगळा पण गडाचं नाव मात्र गड ताब्यात आल्यावर लगोलग बदललं गेलं.

       आज आपण एकविसाव्या शतकात असून देखील आपल्याला नावं बदलली जात असल्याचं दिसून येतंय. इंडीयाचं भारत झालं, अलाहाबादचं प्रयागराज झालं, गुलबर्गाचं कलबुर्गी झालं, विजापूरचं विजयपूर झालं, होशंगाबादचं नर्मदापुरम झालं, इतकंच काय तर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि अहमदनगरचं अहिल्यानगर सुद्धा झालं. शिवकाळात, मोगलाईतच नाही तर एकविसाव्या शतकात देखील मुद्दाम नावं बदलली जात आहेत. काय कारण असेल बरं अशी नावं बदलण्यामागचं? चला तर जाणून घेऊया...

       जेव्हा कोणीही एखादा आक्रमक लढाई जिंकल्यानंतर एखाद्या राष्ट्राचा ताबा घेतो तेव्हा लढाई जिंकलेली कोणतीही विजयी शक्ती ते राष्ट्र ताब्यात घेते आणि सर्वप्रथम त्याचं नाव बदलते. तिथल्या पराभूत समाजाचं मानसिक खच्चीकरण करण्याची किंवा मनोधैर्य ढासळवण्याची ती एक चाल असते. बदललेल्या नावामुळं तुम्ही पारतंत्र्यात आहात याचा पगडा तिथल्या समाजमनावर कायम रहावा हेच यामागचं महत्वाचं कारण आहे. Human Psychology म्हणजेच मानसशास्त्रात याला वर्चस्ववादाचं किंवा गुलाम बनवण्याचं एक तंत्र असं म्हटलं जातं. मी विजयी आहे आणि माझ्याकडं माझी परंपरा आहे, माझ्याकडं माझी संस्कृती आहे आणि माझ्याकडं माझं असं तुम्हाला देण्यासाठी अर्थपूर्ण नावही आहे. तुम्ही आता पराजीत असल्यामुळं तुमच्याकडे मात्र आता काहीच शिल्लक नाही. ना परंपरा, ना संस्कृती आणि ना स्वतःचं नाव. तुम्ही पराभूत आहात याची जाणीव तुम्हाला पदोपदी होत रहावी यासाठी नावं बदलली जातात. तुम्हाला dominate केल्यावर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण होऊन तुम्ही त्यापासून कधीच प्रेरणा घेऊ नये हाच त्यामागचा अंतीम उद्देश्य असतो. नंतरच्या काळात ब्रिटीशांनी गडकिल्ल्यांवर जाण्याचे मार्ग तोडले याचंही मुख्य कारण हेच आहे.
       आफ्रिकन-अमेरिकन इतिहासावर एकदा नजर टाकली तर असं पहायला मिळतं की जेव्हा आफ्रिकन लोकांना बंदरावर आणलं गेलं तेव्हा प्रथम त्यांची नावं बदलली गेली. त्यांचं जे काही आफ्रिकन नाव होतं ते काढून घेतलं गेलं आणि त्यांना मूर्ख अशी नावं दिली गेली.

       एवढा लेखनप्रपंच करण्याचं कारण इतकंच की आजच्या तारखेला शासकीय पातळीवर नाव बदलल्यानंतर विल्यम शेक्सपिअरसारखा जर कुणी आपल्याला हे फक्त राजकारण आहे आणि ‘नावात काय आहे’ असा प्रश्न केला तर आज त्याला असा प्रतिप्रश्न करायची वेळ आली आहे की 'नावात काय नाही?'

       माझ्यामते नावातच सर्व काही आहे. आजकाल नाव बदलण्यामागचं होणारं राजकारण थोडं बाजूला ठेवलं तर पूर्वीच्या म्लेंच्छ किंवा आंग्ल आक्रमकांनी बदललेल्या प्रत्येक नावात आज बदल करून आपण आपलं मूळ हिंदूबहूल नाव ठेवायला हवं. खरंतर शासकीय पातळीवर नाव बदलण्यासाठीची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट अशी आहे पण या गोष्टी मनात आणल्या सहजशक्य आहेत पण त्यासाठी नाव बदलण्यामागं असणारं प्रयोजन समजून घेऊन ते बदलण्याची इच्छाशक्ती असणारं नेतृत्व मात्र हवं. शासकीय पातळीवर जेव्हा नाव बदलेल तेव्हा बदलेल पण आपण मूळच्या हिंदू राष्ट्राचे नागरीक म्हणून आपल्या पातळीवर नेहमी बोलताना ज्यातून आपली परंपरा, आपली संस्कृती प्रगट होत असेल अशा नावांचा उल्लेख नेहमीच करायला हवा. आपली परंपरा, आपली संस्कृती पुन्हा यायला काहीसा वेळ लागेल खरा पण आपल्याच अखंडीत प्रयत्नातूनच ती येऊ शकते हे मात्र नक्की.

       त्यामुळं अखेरच्या यादवांच्या हिंदू साम्राज्याचं मुहम्मद बिन तुघलकानं ठेवलेलं 'दौलत-ए-आबाद' हे नाव म्हणायचं की रामदेवरायाचं 'देवगिरी?' याचं उत्तर मात्र आपलं आपल्यालाच शोधायचं आहे.

बहुत काय लिहिणें? आपण सुज्ञ असा॥
लेखनसीमा॥

दिलीप वाटवे...


सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४

"तख्तास जागा हाच गड करावा..."

"तख्तास जागा हाच गड करावा..."

 

'प्रवास अर्थातच रायगडाला राजधानी करण्यामागचा' 

 


🚩 विषयप्रवेश...


       'रायगड' म्हटलं की डोळ्यासमोर चटकन उभा राहतो तो उत्तूंग आणि बलदंड असा पहाड, 'रायगड' म्हटलं की चटकन आठवतो तो शिवराज्याभिषेक आणि ऐन मध्यान्ही झालेला पराक्रमी सुर्याचा अस्त, 'रायगड' म्हटलं की चटकन आठवतो तो शंभुराज्याभिषेक, येसूबाईसाहेब आणि शाहू महाराजांची अटक आणि 'रायगड' म्हटलं की चटकन आठवतं ते राजाराम महाराजांचं दुर्दैवी जिंजीला निसटणं. कवी भूषणाचा, कविंद्र परमानंदांचा, गागाभट्टांचा, अष्टप्रधानांचा आणि खुद्द आऊसाहेबांचा प्राण म्हणजेही 'रायगडच' आणि राज्याभिषेक शक, राजव्यवहारकोश, लेखनप्रशस्ती, कानून जाबता, शिवार्कोदय, करणकौस्तुभ, शिवभारत, आज्ञापत्र, बुधभूषणम् आणि सभासद बखर म्हणजे सुद्धा रायगडच...

       दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. महाराजांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळातील पंचवीस वर्ष व्यथित केलेल्या राजगडावरून राजधानी रायगडावर हलवली. बहुतेक सर्वांनाच माहिती असलेलं 'गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्या प्रमाणे दिड गाव उंच' हे कारण तर आहेच पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक कसलेला सेनानी गडाचं 'सामरिक महत्व' जाणून घेतल्याशिवाय इतकं महत्वाचं पाऊल उचलणार नाही हेही तितकंच खरं. खरंतर राजधानी हलवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आपलाही काही वर्ष राहिलेल्या घरातून दुसरीकडं रहायला जाताना पाय निघत नाही कारण त्या वास्तूशी आपले ऋणानूबंध जुळलेले असतात. इथं तर महाराजांनी ऐन उमेदीतली तब्बल पंचवीस वर्षे घालवली होती. तरीही महाराजांना राजधानी हलवावीशी वाटली. काय कारण असेल बरं याचं? चला पाहूया या लेखात...

       रायगडाच्या बाबतीतले ऐतिहासिक संदर्भ तर आपण पाहणार आहोतच पण भूगोलाच्या कसोटीवर देखील रायगडच राजधानीसाठी कसा योग्य होता ते पण आपण या लेखातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात राजगडावरून रायगडला राजधानी हलविण्यामागे असलेले ऐतिहासिक संदर्भ, भौगोलिक स्थिती तर आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर रायरी ताब्यात घेतल्यापासून ते रायगडाला राजधानी होईपर्यंतच्या रायगडाशी संबंधित घटनांचा धावता आढावा देखील आपण या लेखात आपण घेणार आहोत त्यामुळं लेखाच्या शीर्षकाला अनूसरून खालील मुद्द्यांवर चर्चा करणं अधिक संयुक्तिक ठरेल.

१) ऐतिहासिक संदर्भ
२) भूगोल अथवा भौगोलिक स्थिती
३) सामरिक महत्व
४) दूरदृष्टी

🚩 प्रकरण पहिलं :- 'ऐतिहासिक संदर्भ'


       छत्रपती शिवाजी महाराजांनी पौष वद्य चतुर्दशी, शके १५७७ म्हणजेच मंगळवार, १५ जानेवारी १६५६ रोजी चंद्रराव मोरे याचा पाडाव करून जावळी ताब्यात घेतली. क्षेत्र महाबळेश्वरहून अत्यंत अवघड अशा निसणीच्या घाटाने उतरून स्वतः दोन हजार पदाती म्हणजे पायदळ सैन्य घेऊन त्यांनी ही अजोड कामगिरी केली आणि लगोलग घोणसपुरचा मकरंदगड, महाड जवळचा चांभारगड आणि ढवळ्या ऊर्फ चंद्रगड हे किल्ले स्वराज्यात सामील झाले. जावळीचं हे घनदाट जंगल काबीज झाल्यानंतर महाराजांचं लक्ष महाबळेश्वर समोरच्या भोरप्याच्या डोंगरावर गेलं. जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी त्यावर किल्ला बांधण्याची मोरोपंतांना आज्ञा केली आणि या गडाचं नामकरण केलं गेलं 'किल्ले प्रतापगड'.

       जावळी खोरं ताब्यात घेण्यापूर्वीच मोरेंची जोर आणि जांभळी खोरी मराठ्यांनी हस्तगत केली होती. जावळी खोरं काबीज केल्यावर मोरे जावळीतून रायरीस पळाले. याबद्दल शिवापुर दफ्तरातील यादीत पुढील संदर्भ मिळतात.

शिवापुर दफ्तरातील यादीनुसार...

१) पौष वद्य १४ शके १५७७ - १५ जानेवारी १६५६ - जावळी घेतली.

२) चैत्र शुद्ध १५ शके १५७८ - ३० मार्च १६५६ - जावळीहून स्वार झाले.

३) चैत्र वद्य सप्तमी - ०६ एप्रिल १६५६ - रायरीस आले.

४) भाद्रपद वद्य तृतीया - २७ सप्टेंबर १६५६ - चंद्रराव मोरे पळाले.

 

शिवापूर दफ्तरातील यादी


       जावळी घेऊन तिची व्यवस्था लावल्यानंतर ७४ दिवसांनी महाराज जावळीहून रायरीला जायला निघाले. दरम्यानच्या ७४ दिवसांच्या काळात मोरेंनी जावळी पुन्हा घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश न आल्यामुळं यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायरीवर जाऊन राहिले तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाले. जावळीहून निघाल्यानंतर महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला आणि मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात देखील आला.

       "सके १५७७ संवत्सरी पौष शुध्द चतुर्दस राजश्री सिवाजीराजे याणी देशमुखाचा जमाव घेऊन जाऊन जाऊली घेतली. चंदरराऊ पळोन राइरीस गेले. तेथे राजश्री स्वामीनी किलीयास वेढा घातला. वैशाखमासी सके १५७८ शिवाजी राजे भोसले याणी रायरी घेतली. समागमे कान्होजी जेधे देशमुख ता भोर व बांदल व सिंलींबकर देशमुख व मावळचा जमाव होता. हैबतराऊ व बालाजी नाईक सिंलींबकर याणी मध्यस्ती करुन चंदरराउ किलियाखाली उतरले"

       अशी नोंद जेधे शकावलीत मिळते पण महाराजांच्या छावणीत राहून चंद्ररावानं विजापुरशी संधान बांधलं. त्याच्या 'गुफ्तगु' करणाऱ्या थैल्या महाराजांच्या जासूदाने मधल्यामध्ये पकडल्या. चंद्रराव छावणीतून सुरवातीला निसटला खरा पण शेवटी पकडला गेलाच. शिक्षा म्हणून महाराजांनी त्याची गर्दन तर मारलीच पण त्याची बाजी आणि कृष्णाजी ही दोन मुलं देखील मारली.

जेधे शकावली


       एप्रिल १६५६ साली जावळी ताब्यात घेतल्यानंतर आदिलशहाने त्याच्या कल्याणच्या सुभेदाराला म्हणजे मुल्ला अहमद नवातीयला प्रकृती अस्वास्थ्यामुळे विजापूरला बोलावलं आणि नेमका याचाच फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडीवर हल्ला केला. कल्याण आणि भिवंडी या नवीन मिळालेल्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी, सिद्दी व युरोपियन सत्तांच्या कुरापती थांबवण्यासाठी आणि त्या दर्यावर्दी सत्तांना सागरी मार्गाने मिळणारी रसद तोडण्यासाठी शिवाजी महाराजांना आरमाराची गरज भासू लागली. या गरजेतूनच त्यांनी भिवंडी, कल्याण भागात आरमार बांधायला सुरूवात केली. दरम्यान १६५७ साली आरमार बांधणीला सुरुवात केल्यानंतरच्या पुढच्या आठच वर्षात म्हणजे दि. ८ फेब्रुवारी १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रचंड नौदलाच्या युद्धनौकेवर औपचारिकपणे पहिलं पाऊल ठेवलं. मराठ्यांचं आरमारी सामर्थ्य आता हळूहळू सिंधूदुर्गात एकवटू लागलं होतं. जिथून गोव्याच्या पोर्तुगीजांवरही लक्ष ठेवता येत होतं. भिवंडीपासून मालवणपर्यंतचा बराचसा कोकणप्रांत सुद्धा तोपर्यंत ताब्यात आला होता त्यामुळं आता मराठी राजधानीचा गुरुत्वबिंदू थोडा दक्षिणेला सरकवणं गरजेचं झालं होतं. आता महाराजांना राजधानी म्हणून सामरिक दृष्ट्या सुरक्षित असेल अशी मोक्याची जागा हवी होती जी समुद्र, कोकण आणि घाटमाथा अथवा देश अशा तीनही ठिकाणी लक्ष ठेवू शकेल.

       जावळी ताब्यात येऊनही रायरीला राजधानी करण्याच्या हालचाली केव्हा सुरू झाल्या त्याचा नेमका काळ समजत नाही. बहूधा दोन मोगली स्वाऱ्या किंवा घडलेल्या दोन घटना राजधानी हलवण्यासाठी करणीभूत ठरल्या असाव्यात. पहिली घटना म्हणजे मोगल सरदार शाहिस्तेखानाची पुणे स्वारी आणि दुसरी घटना म्हणजे पुरंदरचा वेढा.

       शाहिस्तेखान पुण्यात ०९ मे १६६० रोजी आला जो पुढची तीन वर्ष पुण्यातच तळ ठोकून होता. या तीन वर्षांच्या काळात मोगलांनी राजगडाच्या खालपर्यंत येऊन जाळपोळ केली होती. एवढंच नाही तर त्यावेळी मावळांतील सगळे देशमुखही राजांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते. नंतर म्हणजे जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटल्यामुळं औरंगजेब प्रचंड चिडला आणि त्याने मिर्झा राजे जयसिंह आणि दिलेरखान यांना महाराजांवर पाठवलं. पुरंदरला वेढा पडला आणि पराभव अपरिहार्य आहे हे समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६५ च्या जूनमध्ये पुरंदरचा तह स्विकारला. या कराराच्या अटींनुसार महाराजांना आग्र्याला जावं लागलं.

       शाहिस्तेखानाची पुण्यातली तीन वर्षे आणि जयसिंहाचा पुरंदर वेढा अशा मोगलांच्या लागोपाठ दोन स्वाऱ्या मराठयांच्या राजधानीच्या इतक्या जवळ झाल्यानं राजधानीचं ठिकाण या कारणासाठी देखील बदलण्याची निकड भासली असावी आणि त्यादृष्टीने मग पुढच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असाव्यात.

       शिवरायांनी राजगडाऐवजी रायगडाची राजधानी म्हणून निवड का केली असेल याबाबत शिवदिग्विजय बखर थोडाफार प्रकाश टाकते. सप्टेंबर १६६६ मध्ये महाराज आग्र्याहून सुटून राजगडावर आले. त्यानंतर काहीच महिन्यात शंभूराजे देखील सुखरुप राजगडावर येऊन पोहोचले. या आनंदाच्या घटनेप्रित्यर्थ जिजाऊंनी मेजवानी देण्याचं ठरवलं. बारा मावळातल्या तालेवार देशमुखांना राजगडावर बोलावलं. शिवदिग्विजय बखर म्हणते...

       "ते समयी कारभारी यांणी मोठा चवरंग होता, त्याजवरी कचेरीत गादी ठेवुन जागा उंच करविली. नंतर दुतर्फा मंडळी बसली. त्यांत मोहीते, महाडिक, शिर्के, निंबाळकर, घाटगे, जाधव आदीकरुन जमा झाले होते. त्याणी महाराजांची जागा उंच करुन गादि घातली हे पाहून इर्षा वाटली की, आता आंम्हा मराठ्यांस सभ्य थोर, मोठेपणा शिवाजीराजे यांजकडे आला. आम्ही कदिम तालेवार, राजे, मोर्चेलाचे अधिकारी असतां ...... असें असता अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्हि सेवकभाव दाखविणार. त्यास आम्हांस कचेरीत बसावयाची गरज काय? म्हणोन बोलोन उठोन चालिले ......  नंतर बाळाजी आवजीस महाराजांनी विचारले, पुढे योजना कोणते प्रकारे करावयाची ती सांगा. त्यावरुन विनंती करते जाले कीं "महाराज या नावांस छत्रसिंहासन पाहीजे. त्याशिवाय राजे म्हणविणे अश्लाघ्य, लाजिरवाणे,खुशामती बोलणे. स्वयंभू पदवी असली म्हणजे खुशामत जसे ईश्वर शोभेप्रत पावतात, तशीच पदवी जो छत्रसिंहासनाशिश राजा असतो ..... छत्रसिंहासन असलें म्हणजे, या लोकांची बोलणी शिशुपालवत्‌ सभेचे ठायी होतील. समयावच्छेदे नाशही पावतील" ...... कशी योजना सांगा म्हणतां, काशीस गागाभट्ट, महासमर्थ ब्राह्मण, तेजोराशी, तपोराशी, अपरसूर्य, साक्षात वेदोनारायण, महाविद्वान, त्याजकडे कोण पाठवून तेथे गोष्टिचा उपक्रम करुन त्यांचे आज्ञेने जे करणे ते केले असतां राजमान्य निर्बाध होते."  

       महाराजांनी बेलाग बुलंद असलेल्या रायगडची निवड का केली असेल याबाबत सभासद बखरीत देखील काही उल्लेख आले आहेत. सभासद बखर म्हणते...

       "राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्या प्रमाणे दिड गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने तो थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच देखोन संतुष्ट जाले आणि बोलिले - तख्तास जागा हाच गड करावा. असे करारी करुन तेच गडी घर, वाडे, माडिया, सदरा, चौसोपे आणि अठरा कारखाने यांस वेगळाले महाल, व राणियांस महाल, तैशींच सरकारकूनास वेगळी घरे व बाजार, पंच हजारियांस वेगळीं घरे व मातबर लोकांस घरे व गजशाळा व अश्वशाळा व उष्टरखाने पालखी महाल व वहिली महाल, कोठी, थटीमहाल चुनेगच्ची चिरेबंद बांधिले." सभासद पुढे असंही म्हणतो "रायगड पहाडी किल्ला चांगला. आजुबासुन शत्रूची फौज बसावयास जागा नाही. घोडे माणूस जाण्यास महत्‌संकट. वरकड किल्ले पन्हाळे बहुत. पण खुलासेवार व मैदान मुलुखात. यास्तव आजच्या प्रसंगास हीच जागा बरी. येथे लवकर उपद्रव होऊ न शकेल."

सभासद बखर


       'रायगडची जीवनकथा' ग्रंथात आवळसकर कुलाबा गॅझेटियरकाराचा संदर्भ देतात.

       "कुलाबा गॅझेटियरकार लिहितात की, रायगड उत्तर अक्षांश १८॰-१४' आणि पूर्व रेखांश ७३॰-२०' वर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २८५१ फूट आहे. तो किल्ले महरुसा उर्फ जंजिरापासून पूर्वेस चाळीस मैलावर आहे. तुटलेल्या कड्यांमुळे सह्याद्रीच्या रांगांपासून तो अलग झाला असून भोवती सुमारे एक मैल रुंदीची दरी निर्माण झाली आहे. या दरीतून काळ व गांधारी या दोन नद्या पर्जन्यकाळात पावसाचे गदळ पाणी महाडजवळ खाडीत आणून सारख्या ओतीत असतात. सह्याद्रीच्या रांगांनी, जवळजवळ सर्व बाजूंनी वेढल्यामुळे आणि झाकल्यामुळे रायगड ठळकपणे आढळात येत नाही.

रायगडची जीवनकथा


       Book Of Bombay मध्ये रायगडाला राजधानी करण्यामागचं भौगोलिक कारण जेम्स डग्लस देतो. तो म्हणतो...

       "Raighur is a great wedge-shaped block, split off from the Western Ghauts, inaccessible on three sides, and wanting only fortifications on the forth, where a gate flanked by towers and ramparts made it impregnable to his enemies, while it was of easy access to his friends. The avenues leading to it were most difficult of access, and the country round about, being a theatre of mountains, has been described by a contemporary of Seevajee, who travelled over it "as a specimen of hell," which d la Dante or Milton, represents the long and toilsome march of a thirsty traveller among cactus bushes, thorns of sorts, and dry water-courses, until the Moslem saw the precipices beetling above his head, which encircled the home of this troublesome idolator."

Book Of Bombay

Book Of Bombay

Book Of Bombay

Book Of Bombay

       अंदाजे शाहिस्तेखान आणि जयसिंहाच्या स्वारीनंतर राजधानी हलविण्याच्या दृष्टीने जरी हालचाली सुरू झाल्या असल्या तरी राजधानीचं स्थलांतर नेमकं कोणत्या दिवशी झालं याची स्पष्टपणे तारीख कोणत्याच साधनांत दिलेली नाही पण स्थलांतराच्या काळाचा अंदाज मात्र नक्की बांधता येतो.

       ०४ फेब्रुवारी १६७० ला सिंहगड घेतला तो राजगडावरून जाऊनच. सिंहगड घेण्यासाठीची तान्हाजीची लढाई सर्वांना माहिती आहेच. सिंहगडाच्या घटनेनंतर लगेचच २४ फेब्रुवारी १६७० ला राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला. म्हणजे तेव्हाही महाराज राजगडीच होते. थोडक्यात फेब्रुवारी १६७० च्या अखेरीपर्यंत तरी राजधानीचं औपरचिकरित्या स्थलांतर झालेलं नव्हतं. फेब्रुवारीनंतर जुलै महिन्यापर्यंत केव्हातरी म्हणजे साधारण पावसाळ्यापूर्वी राजधानी रायगडावर स्थलांतरीत झाली असावी. तत्पूर्वी इतर जिन्नस रायगडी पाठवण्याची प्रक्रिया हळूहळू सुरूच असावी.

       इ. स. १६७० च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जेव्हा जुन्नर पेठ लुटली तेव्हा मात्र महाराज रायगडावर होते आणि नंतर नोव्हेंबर १६७० ची दुसरी सुरत मोहिम सुद्धा रायगडावरूनच आखली गेली.

       थोडक्यात काय तर जुलै १६७० नंतर पुढची दोनतीन वर्ष उलटल्यावर म्हणजे सर्व स्थिरस्थावर झाल्यावर ०६ जून १६७४ ला महाराजांनी स्वतःस रायगडावर राज्याभिषेक करवून घेतला.

       तात्पर्य हेच की राजधानी हलविण्याची प्रक्रिया नेमकी कधी सुरू झाली याचा काळ जरी नक्की सांगता येत नसला तरी महाराज राजगडाहून रायगडाला जुलै १६७० रोजी आले म्हणजे राजधानी रायगडावर जुलै १६७० रोजी स्थलांतरीत झाली असं म्हणायला हरकत नाही.

       पुढं ०२ एप्रिल १६८० म्हणजे शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर पुढच्या दोनच वर्षात म्हणजे १६८२ साली खासा औरंगजेब दक्षिणेत उतरला. सुरवातीच्या काळात स्थिरस्थावर होण्यासाठी काही काळ घेतल्यानंतर औरंगजेबाने सप्टेंबर १६८४ पासूनच रायगडाचा फास आवळण्यास सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात रायगडावर बरंच काही घडून गेलं होतं. १६८४ सालात औरंगजेबाने शहाबुद्दीनखानास चाळीस हजार सैन्यासह रायगडाच्या पायथ्याशी धाडलं. मात्र त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली आणि लुटालूट चालू केली पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. पुढं १६८९ मध्ये छत्रपती शंभुराजांना संगमेश्वरला पकडलं आणि तुळापुरला आणलं. पुढं तुळापूरी शंभूराजांच्या झालेल्या निधनानंतर स्वराज्याची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांवर आली. मराठ्यांची सर्व मदार आता रायगडावर नुकत्याच छत्रपती झालेल्या राजाराम महाराजांवर होती. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा झुल्फिकारखान याला 'इतिकादखान' असा किताब देऊन रायगड घेण्यास पाठवलं. शके १६११ शुक्ल संवत्सरे, चैत्र शुद्ध १५ औरंगजेबाच्या हुकुमानुसार झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला. याच वेळी संपूर्ण राज घराणं म्हणजे येसूबाईसाहेब, छ. राजाराम महाराज, ताराबाईसाहेब तसंच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडली होती. औरंगजेबाचा मुक्काम अजूनही तुळापुरलाच होता. तिथून त्यानं हातात आलेली सुवर्णसंधी साधून २५ मार्च १६८९ ला शहाबुद्धीनखानाला सुद्धा झुल्फिकारखानाच्या मदतीला धाडलं.

किल्ले रायगड स्थलदर्शन


       औरंगजेबाने पाठवलेला शहाबुद्दीनखान रायगडला यायला निघाला. रायगडाला पोहोचण्यासाठी घाटमाथ्यावरून अनेक घाटवाटा कोकणात उतरतात पण सैन्य जाऊ शकेल अशी एक वाट पुण्याहून पानशेत, घोळमार्गे घाटमाथ्यावरील गारजाईवाडी इथं येते आणि कावल्या-बावल्या खिंडीतून कोकणात काळ नदीच्या खोऱ्यातील सांदोशी गावात उतरते. या खिंडीला लागुनच कोकणदिवा हा चौकी वजा किल्ला वसलेला आहे. रायगडाच्या संरक्षण व्यवस्थेत त्याच्याभोवती जी किल्ल्यांची प्रभावळ आहे त्यातील हाही एक. झुल्फिकारखानाचा एक सरदार शहाबुद्दीनखान हा पठाणांची फौज घेऊन कावल्याबावल्याच्या खिंडीतून उतरणार असल्याची बातमी सांदोशी गावातील गोदाजी जगताप व सर्कले नाईक यांना कळली. ते ताबडतोब मराठ्यांची एक निवडक तुकडी जमवून खिंडीत दबा धरून बसले. शहाबुद्दीनखान जसा खिंडीजवळ आला तसे मराठे अत्यंत त्वेषाने त्याच्यावर तुटून पडले. मराठ्यांचा आवेशच इतका जबरदस्त होता की मोगलांनी एका झटक्यात माघार घेतली. मराठ्यांनी अनेक पठाणांची कत्तल केली आणि त्याला रायगडाकडे जाण्यापासून रोखलं.

       शहाबुद्दीनखान झुल्फिकारखानाला जाऊन मिळण्यासाठी काळ खोऱ्यातच उतरण्याच्या का प्रयत्नात होता? सभासद 'रायगड पहाडी किल्ला चांगला. आजुबासुन शत्रूची फौज बसावयास जागा नाही. घोडे माणूस जाण्यास महत्‌संकट. वरकड किल्ले पन्हाळे बहुत. पण खुलासेवार व मैदान मुलुखात. यास्तव आजच्या प्रसंगास हीच जागा बरी. येथे लवकर उपद्रव होऊ न शकेल' असं का म्हणतो? कुलाबा गॅझेटियरकारांच्या म्हणण्यानुसार 'सह्याद्रीच्या रांगांनी, जवळजवळ सर्व बाजूंनी वेढल्यामुळे आणि झाकल्यामुळे रायगड ठळकपणे आढळात येत नाही.' अशी परिस्थिती खरंच तिथं आहे का? 

       या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी रायगड किल्ल्याची रचना आणि त्याच्या आजूबाजूचा नेमका भूगोल समजून घ्यावा लागेल. तर काय आहे रायगडाचा भूगोल. चला पाहूया.

🚩 प्रकरण दुसरं :- 'भूगोल अथवा भौगोलिक स्थिती'


       रायगडाचा भूगोल जाणून घ्यायचा असेल तर खालील मुद्द्यांवर चर्चा करणं अधिक संयुक्तिक ठरेल...

अ) रायगड किल्ल्याची सध्याची भौगोलिक स्थिती
आ) रायगडाची रचना, आजुबाजुला असणारी गावं आणि शिवकालीन गडाची मुख्य वाट
इ) सह्याद्रीची मुख्य रांग आणि तिला ओलांडणाऱ्या घाटवाटा
ई) मुख्य रांगेला जोडलेल्या कोकणातील डोंगररांगा
उ) नद्यांची खोरी

🚩 अ) रायगड किल्ल्याची सध्याची भौगोलिक स्थिती -

       दुर्ग रायगड महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यात आहे. महाडपासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून १३५६ मीटर्स म्हणजे ४४४९ फूट उंचीवर आहे तर पायथ्यापासून ८२० मीटर्स म्हणजे २७०० फूट उठावलेला आहे. ऐतिहासिक साधनात या किल्ल्याचा रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर अशा पंधरा नावांचा उल्लेख सापडतो. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात असून रायगड विकास प्राधिकरण गडावर विकासकामे करते. महाडपासून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड, रायगडवाडीपर्यंत एसटीची बससेवा उपलब्ध आहे. चित दरवाज्यातून आणि नाणे दरवाज्यातून पायरी मार्गाने तर हिरकणीवाडीतून रोपवेने किल्ल्याचा माथा गाठता येतो.

🚩 आ) रायगडाची रचना, आजुबाजुला असणारी गावं आणि शिवकालीन गडाची मुख्य वाट -

       घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेला हा किल्ला पाचाड गावाच्या आसपास असलेल्या एका डोंगर पठारावर उंचावलेला आहे. या पठारावर किल्ल्याच्या अवतीभवती पाचाड, हिरकणीवाडी, पोटल्याची वाडी, रायगडवाडी, टकमकवाडी अशा छोट्या छोट्या वाड्या वसलेल्या आहेत. पाचाडच्या डोंगर पठारावर हा किल्ला वसलेला असल्यामुळं याची चढाई साधारण दोन टप्प्यात करावी लागते. महाडकडून रस्त्याने कोंझर गावी पोहोचल्यावर घाटरस्त्याने चढून पाचाड गाव गाठावं लागतं तर ताम्हिणी घाट उतरल्यानंतर लागणाऱ्या निजामपूरातून घरोशीपासून घाटरस्त्याने चढून घरोशीवाडी, पुनाडे, पुनाडे खिंड ओलांडून, सांदोशी फाटा, बाऊळवाडी वगैरे गावं ओलांडत पाचाड गाव गाठावं लागतं. बिरवाडीकडून आल्यावर छत्रीनिजामपूरला येऊन पुढे घाटरस्त्याने रायगडवाडी गाठावी लागते. पायरी मार्गाने रायगड चढाई करायची असेल तर पाचाड काय किंवा रायगडवाडी काय, कुठूनही आलं तरी आज देखील गाडीरस्त्याने चित दरवाज्यापर्यंत येऊनच पुढची पायी चढाई सुरू करावी लागते.

       हल्लीच्या काळात रायगडावर जाण्यासाठी महाडकडून जरी वहिवाट पडलेली असली तरी शिवकाळात मात्र गडप्रवेश हा सध्याच्या रायगडवाडीकडे असलेल्या गडाच्या मुख्य दरवाज्यातून म्हणजे नाणे दरवाज्यातूनच होता. महादरवाजा हा गडाचा दुसरा दरवाजा होय. नाणे दरवाजा आणि महादरवाज्याव्यतिरिक्त असलेला वाघदरवाजा हा गडाचा तिसरा दरवाजा होता. शिवकाळात नाणे दरवाजा आणि महादरवाजा ही गडाची मुख्य बाजू तर वाघदरवाज्याची बाजू ही गडाची पिछाडीची बाजू होती. वाघदरवाजा हा गडाचा दुय्यम दरवाजा आहे. द्वितीय, तृतिय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी केलेला दरवाजा म्हणजे वाघदरवाजा होय. 'वाघोली गावाकडे उतरणाऱ्या वाटेवरील दरवाजा' म्हणुन तो वाघदरवाजा अशी वाघ दरवाज्याच्या नावाची व्युत्पत्ती असण्याची अधिक शक्यता वाटते. गडाची चोरवाट असा जो समज सध्या वाघदरवाज्याबद्दल पसरलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. सभासद बखरीत वर्णीलेल्या चोर दरवाज्याच्या वर्णनात वाघदरवाजा हा कुठेच बसत नाही पण भवानी कड्यावरुन उतरणाऱ्या वाटेला मात्र चोरवाट नक्कीच म्हणता येईल. मी स्वतः बरेचदा या भवानी कड्याच्या वाटेवरून चढून गेलो आहे. या वाटेवर खोदिव पायऱ्या तर आहेतच त्याशिवाय खालच्या बाजूला पाण्याचं एक टाकं देखील आहे.

रायगडाच्या वाटा
भवानी कड्याच्या वाटेवरील पाण्याचं टाकं

 

 

       सध्या आपण पाचाड गावातून चितदरवाज्यात पोहोचतो आणि पायरी मार्गाने गडचढाई सुरू करतो. चितदरवाज्यात असलेली खिंड ही शिवकाळात नसावी. रायगडवाडी पाचाडला जोडण्यासाठी रस्ता तयार करताना ती फोडून तयार करण्यात आली असावी. सध्याच्या पायरी वाटेवर असलेला खुबलढा बुरुज वाघबिळाशी एका डोंगरधारेने जोडलेल्या डोंगरधारेवर असावा. खुबलढा बुरुजाचा मुख्य उपयोग हा अलिकडची पाचाड आणि पलिकडची रायगडवाडी अशा दोन्ही बाजूंवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असण्याची शक्यता अधिक वाटते. सांगायचं तात्पर्य हेच की शिवकाळात रायगडला येणारा मुख्य मार्ग हा बिरवाडीतून काळ नदिच्या खोऱ्यातून छत्रीनिजामपूर आणि तिथून नाणे दरवाजा, महादरवाजा ओलांडून गडमाथ्यावर येत असे. रायगड भेटीसाठी आलेल्या पाहूण्यांना परवानगीचे सोपस्कार पार पडेपर्यंत छत्रीनिजामपूर या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली असावी. छत्रीनिजामपूर गावात अन्नछत्र असल्यामुळं निजामपूर गावाला छत्रीनिजामपूर म्हणण्याची प्रथा पडली.

रायगडाची मुख्य वाट
रायगडाची मुख्य वाट (काळ खोरे)

🚩 इ) सह्याद्रीची मुख्य रांग आणि तिला ओलांडणाऱ्या घाटवाटा -

       रायगड किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेजवळ वसलेला आहे. साधारणपणे सध्याच्या ताम्हिणी घाट ते वरंध घाट दरम्यानच्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेवरच्या भागाची चर्चा आपण इथं करणार आहोत. पुण्याहून माणगावकडे जाणारा ताम्हिणी घाटाचा रस्ता मुळा नदीच्या खोऱ्यातून घाटमाथा ओलांडून कोकणात उतरतो तर पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणारा वरंध घाटरस्ता नीरेच्या खोऱ्यातून घाटमाथा ओलांडून कोकणात उतरतो.

       मुळा आणि नीरा या दोन नद्यांदरम्यान असणाऱ्या नद्या आणि त्यावर असणारी धरणे, धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या शेवटी असणारे गाव आणि नदीखोऱ्यातून कोकणात उतरणाऱ्या काही सुप्रसिद्ध घाटवाटा खालीलप्रमाणे...

इ - १) नदीचे नाव - मुळा
         धरण - मुळशी
         गाव - ताम्हिणी
         घाटवाटा -
                       १) सवत्या
                       २) सातपायरी

इ - २) नदीचे नाव - मोसी
         धरण - वरसगाव/ वीर बाजी पासलकर जलाशय
         गाव - धामणओहोळ
         घाटवाटा -
                       १) लिंग्याघाट
                       २) देवघाट
                       ३) निसणी

इ - ३) नदीचे नाव - आंबी
         धरण - पानशेत/तानाजीसागर
         गाव - दापसरे/घोळ
         घाटवाटा -
                       १) थिबथिबा
                       २) कुंभे
                       ३) कावळ्या
                       ४) बोचेघोळ उर्फ अन्नछत्राची नाळ
                       ५) गायनाळ

रायगडाच्या प्रभावळीतील घाटवाटा


इ - ४) नदीचे नाव - कानंदी, गुंजवणी
         धरण - चापेट
         गाव - घिसर
         घाटवाटा -
                       १) बोराटा नाळ
                       २) सिंगापूर नाळ
                       ३) आग्या उर्फ एकल्याची नाळ

रायगडाच्या प्रभावळीतील घाटवाटा

रायगडाच्या प्रभावळीतील घाटवाटा
 

इ - ५) नदीचे नाव - वेळवंडी
         धरण - भाटघर/ येसाजी कंक जलाशय
         गाव - भुतोंडे
         घाटवाटा -
                       १) मढेघाट
                       २) उपांड्या घाट
                       ३) गोप्याघाट
                       ४) खुटाघाट

इ - ६) नदीचे नाव - नीरा
         धरण - नीरा-देवघर
         गाव - शिरगाव, दुर्गाडी 
         घाटवाटा -
                       १) वरंध घाट
                       २) वाघजाई घाट
                       ३) चिकणा घाट
                       ४) चोरकणा घाट
                       ५) अस्वलखिंड


       सध्याच्या ताम्हिणी घाटरस्त्यावरच्या डोंगरवाडीपाशी असलेल्या लेंड घाटापासून ते रायरेश्वराच्या नखिंद्याजवळच्या अस्वलखिंडीपर्यंत लहानमोठ्या अशा तब्बल ६५ घाटवाटा आहेत. या सर्व वाटांचा तपशील इथं देणं लेखाच्या विषयाला अनुसरून झालं नसतं तसंच ते लेखाच्या आकारबंधातही बसलं नसतं. सबब घाटवाटांचा तपशील इथं देण्याचं मुद्दाम टाळलं आहे.

🚩 ई) मुख्य रांगेला जोडलेल्या कोकणातील डोंगररांगा -

       पावसाळ्यात लिंग्या घाटाचा ट्रेक भटकी मंडळी आवर्जून करतात. घाटमाथ्यावरच्या धामणओहोळपासून लिंग्या घाट एका पदरात उतरतो. लिंग्या घाट किंवा साधारण कुर्डूपेठपासून सुरू झालेला हा पदर पुढं कुंभारमाची, साखल्याची वाडी, बोरमाची, बडदेमाची, केळगणच्या तिन्ही वाड्या, माजुर्णे, जोर, घरोशीवाडी, निजामपूर-पाचाड रस्त्यावरचं पूनाडे असा लांबलचक पसरलेला आहे. पूनाडे खिंडीच्या साधारण पूर्वेकडं असलेल्या घाटमाथ्यावरच्या तावली टोकापासून या पदराला दोन डोंगररांगा फुटतात ज्या गांधारी नदीच्या अल्याड पल्याड धावतात.

       एक रांग पूनाडे खिंडीच्या पुढं रायगड, पोटल्याच्या डोंगराकडं जाते. याच्या पदरात पाचाड, रायगडवाडी, पोटल्याची वाडी वसलेल्या आहेत. पोटल्याच्या डोंगरापासून पुढेही पोटल्याची डोंगररांग पार महाड जवळच्या चांभारगडापर्यंत धावते. या डोंगररांगेला गांधारी खोऱ्याच्या बाजुला पदर आहे, जो एकदोन तुटक अपवाद वगळता पोटल्याच्या वाडीपासून थेट चांभारगडापर्यंत आहे.

       पूनाडे खिंडीच्या अलिकडं असेलल्या घरोशीवाडीपासून गांधारी नदीला समांतर धावणारी आणखी एक सोंड फुटते जी पुढं नेराव, कोतूर्डे करत शेवटी गांधारपाले लेणी, सोनगडापर्यंत गेलेली आहे. या डोंगरफाट्याला सोनगडाच्या थोडा अलिकडं आणखी एक छोटा फाटा फुटतो जो पुढं दासगाव खिंड ओलांडून दासगावच्या किल्ल्यापाशी संपतो.

पूनाडे खिंडीपासून सुरू झालेल्या कोकणातील डोंगररांगा

🚩 उ) नद्यांची खोरी -

       वर आपण पाहिल्याप्रमाणं रायगडाची मुख्य वाट ही छत्री निजामपूर गावातून चढून येते. हे छत्री निजामपूर गाव सह्याद्रीची मुख्य रांग आणि रायगडाची रांग याच्या दरम्यान काळ नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे त्यामुळं शिवकाळात रायगडाला भेट द्यायची तर एकतर बिरवाडीतून काळ नदीच्या खोऱ्यातून छत्री निजामपूरला येऊन किंवा घाटमाथ्यावरून कावळ्या घाट उतरुनच शक्य होतं. याव्यतिरिक्त आणखी कोणताच पर्याय शिवकाळात उपलब्ध नव्हता. पहिल्या प्रकरणात शेवटच्या संदर्भात शहाबुद्दीनखान काळ खोऱ्यातल्या छत्री निजामपूरला असलेल्या झुल्फिकारखानाला जाऊन मिळण्यासाठी कावळ्या घाटानेच जाण्याच्या का प्रयत्नात होता हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. कावळ्या घाटाशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. वर दिलेल्या बावीस घाटांपैकी कोणतीच घाटवाट ही सैन्य हालचालीसाठी उपयोगी नाही. एखाद-दुसरी असली तरी ती एकतर रायगडापासून बरीच लांब आहे किंवा त्या वाटेवर पहाऱ्यासाठी किल्ले तरी वसलेले आहेत. नुसतेच घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या वाटांवर नाही तर रायगडाकडे येणाऱ्या प्रत्येक वाटेवर चौकीवजा किल्ले आहेत त्यामुळं शहाबुद्दीनखानाला रायगड गाठणं वाटतं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं. रायगडाच्या वाटेवर असलेले हे प्रभावळीतील किल्ले जिथं वसलेले आहेत त्यांच्या प्रभाव क्षेत्रात कोणकोणत्या नद्यांची खोरी येतात ते पाहूया.

उ - १) काळ खोरे -

       काळ नदी ही पुणे जिल्ह्यातील घोळ गावापाशी उगम पावून कोकणात सांदोशी, छत्री निजामपूर, वारंगी, वाघेरी, पाने, वाळणकोंड, पणदेरी, दहिवड करत बिरवाडी/ढालकाठीजवळ येते. इथं तिला शिवथरघळीजवळून येणारी शिवथर नदी येऊन मिळते. दोन्ही नद्या पुढं एकत्रितपणे महाडच्या सावित्री पुलापाशी सावित्री नदीला जाऊन मिळतात. या नदीच्या पुर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग आहे, ज्यावर को़कणदिवा, लिंगाणा आणि कावळा किल्ला आहे तर पश्चिमेकडे चांभारगड किल्ला असलेली चांभारगड रांग आहे.

रायगड प्रभावळीतील नद्यांची खोरी (काळ खोरे)

उ - २) गांधारी खोरे -

       आपण महाडहून नातेखिंडीमार्गे रायगड किल्ल्याकडे जाऊ लागलो की डाव्या बाजूला एक नदी पाचाडचा घाट सुरु होणाऱ्या कोंझरपर्यंत आपल्याला सोबत करते. हीच ती गांधारी नदी. कोंझरच्या अलिकडं डावीकडं एक फाटा कोतूर्डे, नेराव गावी जातो. या कोतूर्डेत एक धरण आहे जे याच गांधारी नदीवर आहे. कोतूर्डेजवळ उगम पावणारी गांधारी नदी गांधारपाले गावाजवळ सावित्री नदीला जाऊन मिळते. गांधारपाले गावाला त्याचं नावच खरंतर या गांधारी नदीमुळं मिळालं असावं. महाडहून रायगडला जाताना डावीकडं सोबत करणाऱ्या गांधारी नदीपल्याड एक डोंगररांग पूर्वेकडून पश्चिमेकडे धावते जिला पुढं दोन फाटे फुटतात एका फाट्याच्या शेवटच्या टोकावर सोनगड आहे तर दुसऱ्या टोकाच्या शेवटी दासगावचा किल्ला वसलेला आहे.

रायगड प्रभावळीतील नद्यांची खोरी (गांधारी खोरे)

उ - ३) काळू अथवा काळ खोरं -

       ताम्हिणी घाट माहिती नाही असा बहूतेक कुणी क्वचितच सापडेल. पुर्वी ताम्हिणी घाटातून रायगडला जाण्यासाठी माणगाव, महाड आणि मग नातेखिंडीतून पाचाडमार्गे जावं लागत असे. ताम्हिणी घाट उतरल्यावर एक नदी आपण चार वेळा ओलांडतो ती म्हणजे काळू अथवा काळ. काही ठिकाणी हीला काळ नदी म्हणतात पण छत्री निजामपूरची काळ आणि माणगावची काळ दोन्ही नद्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. इतकंच काय एकाच घरातल्या असूनही त्यांची खोरी सुद्धा वेगवेगळी आहेत. माणगावच्या गर्दीतून महाडकडे बाहेर पडल्यावर जो पहिला नदीपूल लागतो तो याच काळू नदीवर आहे. ही काळू नदी ताम्हिणी घाट पायथ्याच्या विळेजवळ उगम पावते आणि पुढं कांदलगाव, पाणोसे, माणगाव, गोरेगाव करत दासगाव किल्ल्याजवळ सावित्री नदीला जाऊन मिळते. या नदीच्या खोऱ्यात पन्हाळघर किल्ला वसलेला आहे.

रायगड प्रभावळीतील नद्यांची खोरी (काळू ऊर्फ काळ खोरे)

       आत्तापर्यंतच्या लेखात आपण को़कणदिवा, लिंगाणा, चांभारगड, सोनगड, दासगाव आणि पन्हाळघर किल्ल्यांची नावं वाचली. नेमके कुठे वसलेले आहेत हे किल्ले आणि त्यांचा रायगडाशी काय संबंध? तर आपल्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या प्रकरणात आपण त्याचविषयी तर जाणून घेणार आहोत.

🚩 प्रकरण तिसरं :- 'सामरीक महत्व'

       शहाजीराजांना आदिलशाही कैदेतून सोडविण्यासाठी आदिलशहाने बंगळूर आणि कोंढाणा मागितला. संभाजीराजांनी बंगळूर देऊन टाकलं पण शिवाजी महाराज कोंढाणा काही केल्या देईनात. तेव्हा सोनोपंतांनी महाराजांना 'दुर्गनिती' सांगितली जी कवींद्र परमानंदांनी शिवभारताच्या सोळाव्या अध्यायात दिलेली आहे.

न दुर्गं दुर्गमित्येव दुर्गमं मन्यते जनः l
तस्य दुर्गमता सैव यत्प्रभुस्तस्य दुर्गमः ll ६१ ll

अर्थ - दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानीत नाहींत, तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय.

प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गमः l
अदुर्गमत्वादुभयोर्विद्वषन्नव दुर्गमः ll ६२ ll

अर्थ - प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गांमुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो.

संति ते यानि दुर्गाणि तानि सर्वाणि सर्वथः l
यथा सुदुर्गमाणि स्युस्तथा सद्यो विधीयताम् ll ६३ ll

अर्थ - तुमचे जे दुर्ग आहेत ते सर्व ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबडतोब करा.

       रायगड दुर्गम तर आहेच पण त्याचं सामरिक स्थान सुद्धा दुर्गनीतीत बसणारं आहे. कसं ते पाहू. त्यासाठी पुढील दोन मुद्द्यांवर चर्चा करता येईल.

अ) प्रभावळीतील संरक्षक दुर्ग
आ) रायगडाकडे येणाऱ्या वाटा

🚩 अ) प्रभावळीतील संरक्षक दुर्ग -

       मूर्तींच्या पाठीमागें चांदी वगैरे धातूंची जी महिरप करतात तिला सामान्यपणे प्रभावळ असं म्हणतात. प्रभावळ किंवा प्रभावळी हा स्त्रीलिंगी शब्द संस्कृत प्रभा म्हणजे तेज आणि आवलि म्हणजे ओळ असा मिळून तयार झाला आहे. बाजूला असलेल्या ज्या गोष्टीमुळं मधल्या मुख्य गोष्टीवर परिणामकारक प्रभाव पडेल अशी गोष्ट म्हणजे प्रभावळ. किल्ल्याच्या दृष्टीने विचार करता मुख्य किल्ल्याच्या संरक्षणाच्या अथवा बळकटीच्या दृष्टीने त्याच्या सभोवताली उभारलेल्या उपदुर्गांचा विळखा म्हणजे 'किल्ल्याची प्रभावळ' असं म्हणता येईल. यालाच 'दुर्गपुंज' म्हणजेच 'Fort Cluster' असं देखील म्हणतात. महत्वाच्या किल्ल्याकडे येणाऱ्या वाटांवर चौकीवजा किल्ल्यांची मुद्दाम उभारणी केली जाते. अशा प्रभावळीतील किल्ल्यांना मुख्य किल्ल्याचे पहारेकरी म्हणतात. अशा किल्ल्यांचा उपयोग मुख्यत्वे टेहळणीसाठी केला जातो पण प्रसंगी हेच किल्ले मुख्य किल्ल्यावर होणाऱ्या हल्ल्याला काही काळ थोपवण्याचं देखील काम करतात.

       राजधानी रायगडाच्या प्रभावळीत कोकणदिवा, लिंगाणा, कावळागड, चांभारगड, सोनगड, दासगाव, पन्हाळघर, कुर्डुगड, मानगड असे साधारणपणे ०९ किल्ले आहेत. यापैकी कोकणदिवा, लिंगाणा, कावळा हे किल्ले अथवा वाटचौक्या काळ नदीच्या खोऱ्यात आहेत, चांभारगड, सोनगड हे किल्ले गांधारी/सावित्री नदीच्या खोऱ्यात आहेत तर दासगाव, पन्हाळघर, कुर्डुगड, मानगड हे किल्ले काळू अथवा काळ नदीच्या खोऱ्यात आहेत.

रायगड प्रभावळीतील संरक्षक दुर्ग


🚩 आ) रायगडाकडे येणाऱ्या वाटा -

आ - १) काळ खोरे -

       रायगडाच्या मुख्य दरवाज्याची वाट बिरवाडीमार्गे काळ नदीच्या खोऱ्यातून छत्री निजामपूरला येते हे मागं आपण पाहिलंच. या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कावळागड, लिंगाणा आणि कोकणदिवा आहेत पण कावळागडाला वरंध घाटावर, लिंगाण्याला बोराटा आणि सिंगापूर नाळेच्या वाटेवर तर कोकणदिव्याला कावळ्या आणि बोचेघोळ उर्फ अन्नछत्राच्या नाळेच्या वाटेवर लक्ष ठेवण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत होती. वाघदरवाज्याच्या वाटेनं किल्ल्याखाली उतरल्यावर जसं काळकाईच्या खिडीतून पाचाडकडं जाता येतं तसंच वाघोलीतून वाळणकोंड किंवा मांघरुणला देखील उतरता येतं. रायगड उतरल्यावर पाचाडहून कोंझर पुढं गांधारी खोऱ्यातून सावित्री खोऱ्यात जाता येतं तर पाचाडहून काळकाई उर्फ पोटल्याची खिंड ओलांडून वाघोलीतून मांघरुण, पुढं काळ खोऱ्यातून बिरवाडीमार्गे सावित्री खोऱ्यात जाता येतं.

       ०५ एप्रिल १६८९ साली राजाराम महाराज रायगडावरून प्रतापगडमार्गे जिंजीला गेले. ते वाघदरवाज्यातून किल्ल्याबाहेर पडले की भवानी कडा उतरून? यावर इतिहासकारांत एकमत नाही. बरं रायगडाची भौगोलिक रचनाच अशी आहे की त्याला वेढा घालणंच अवघड आहे. तसा सभासद बखरीत उल्लेख आलेला आपण वर पाहिलंच आहे. रायगडाला अगदी वेढा घातलाच तरी शेजारच्या दोन चौक्यात समन्वय ठेवणं काहीसं अवघड आहे. फारफार तर रायगडावरून बाहेर पडणाऱ्या मार्गांवर चौक्या बसवून ते मार्ग झुल्फिकारखान बंद करू शकतो पण तेही तितकसं सोपं नाही हे राजाराम महाराज सहिसलामत प्रतापगडावर पोहचले यावरूनच सिद्ध होतं.

       नाणे दरवाज्यातून राजाराम महाराज बाहेर पडणार नाहीत कारण मुख्य दरवाज्यावर नक्कीच चौक्या बसवलेल्या असणार त्यामुळं वाघ दरवाजा आणि भवानीकडा हे दोनच पर्याय शिल्लक राहतात, जे प्रतापगडाच्या दिशेकडे असल्यामुळं योग्यच आहेत. काही इतिहास संशोधकांच्या मते राजाराम महाराज भवानीकडा उतरून गेले तर काही इतिहास संशोधकांच्या मते राजाराम महाराज वाघदरवाजा उतरून गेले. भवानीकड्याची वाट मुळातच जशी अवघड आहे तशीच आजच्या तारखेला वाघदरवाज्याची वाट देखील तितकीच अवघड आहे. शिवकाळात मात्र वाघदरवाज्याची वाट नेमकी कशी होती याचे पुरावे आज तरी उपलब्ध नाहीत.

       वाघदरवाज्यातून बाहेर पडल्यावर मोठा कडा आहे. शिवकाळातही तो तसाच होता का? की तिथं पायऱ्या होत्या आणि कालपरत्वे त्या मोडल्या किंवा मुद्दाम तोडल्या गेल्या? काही जणांच्या मते प्रत्येक दरवाज्याच्या बाहेर पायऱ्या करण्याची गरजच नाही तर काहींच्या मते पायऱ्याच करायच्या नव्हत्या तर इतका मोठा दरवाजा बांधण्याची आवश्यकताच नव्हती, राजगडासारखी एखादी चोरदिंडी पण पुरेशी होती. काहींचं मत असंही आहे की राजाराम महाराज पाळण्यात बसले आणि तो पाळणा दोराला बांधून खाली सोडला. काहींचं मत असंही आहे की ते दोराला धरून खाली उतरले. एक मात्र नक्की वाघदरवाज्यातून खालच्या पदरात उतरल्यावर आडवं जात भवानी कड्याच्या वाटेला जाऊन मिळता येतं. मग पुढं धारमिंड खिंडीतून सध्याच्या रायगड प्रदक्षिणा मार्गाने रायगडवाडी किंवा वाघोली असं कुठेही जाता येऊ शकतं. सध्याच्या काळात वाघदरवाज्याच्या वाटेचे अवशेष शोधण्यासाठी अवघड अशी एखादी मोहिमच राबवावी लागेल.

       गडाखाली उतरल्यानंतरचा मार्ग पण निर्धोक असायला हवा त्यामुळं ते वाघोली, मांघरूण, बिरवाडीमार्गे प्रतापगडी गेले की वर सांगितलेल्या पाचाड, रायगडवाडी, पोटल्याची वाडी वसलेल्या चांभारगड रांगेवरून चांभारगडापर्यंत जाऊन पुढं सावित्रीच्या काठाने पारघाट चढून प्रतापगडावर गेले? या विषयावर दोन टप्प्यांत अभ्यास करावा लागेल. पहिला म्हणजे राजाराम महाराज गडाखाली कोणत्या वाटेने आणि कसे उतरले आणि दुसरा म्हणजे गडाखाली उतरल्यावर ते प्रतापगडावर कोणत्या मार्गाने गेले. रायगडाच्या परिघात सखोल फिरून जून्या खाणाखुणा आहेत काय याचा निगुतीने शोध घ्यावा लागेल. एक मात्र नक्की काळकाईच्या खळग्यातून काय किंवा बारा टाक्यांच्या खळग्यातून काय कुठूनही गडाखाली उतरायचं झालं तर आजच्या तारखेला वाघोलीमार्गे मांघरूणशिवाय पर्याय नाही. खरंतर हा विषयच इतका मोठा आहे की त्यावर अभ्यास करून आणि प्रत्यक्षपणे त्या भागात फिरून जून्या वाटेच्या खाणाखुणा शोधाव्या लागतील. खरंतर त्यावर एक अख्खा शोधनिबंध सुद्धा लिहिता येईल. इतिहासाची आवड असणाऱ्या भटक्यांना भूगोलाच्या कसोटीवर हे सिद्ध करणं हे एक निश्चितच आव्हान ठरेल.

       इतिहासाच्या ठळक गोष्टींत वाद कधीच नसतो, वाद असतो तो त्याच्या तपशीलात आणि जो भूगोलाच्या कसोटीवर नक्कीच ताडून पाहता येऊ शकतो त्यामुळं या गोष्टीला आवश्यक असलेल्या इतिहासातील अस्सल दस्तऐवजांचा बारकाईने शोध घ्यायला हवा. एकदा असे दस्तऐवज मिळाले की ते भूगोलाशी ताडून मार्ग निश्चिती नक्कीच करता येऊ शकते. सध्यातरी असे दस्तऐवज उपलब्ध नसल्यामुळं राजाराम महाराज रायगडावरून नेमक्या कोणत्या वाटेने प्रतापगडी गेले याबद्दल तूर्तास केवळ तर्कच करता येऊ शकतो. असो.

       बरंच विषयांतर झालं आणि लेखाचा विषय हा नसल्यामुळं या विषयावर इथं फार उहापोह करणं योग्य होणार नाही त्यामुळं पुन्हा मूळ विषयाशी येऊया.


आ - २) गांधारी खोरे -

       महाड बंदरातून शिवकाळात व्यापार चालत असे. व्यापाराच्या संदर्भात होणाऱ्या कामकाजासाठी जास्त करून गांधारी खोऱ्यातली वाट वापरली जात असावी. ही वाट आत्ताच्या नातेखिंडीतून किंवा गांधारी-सावित्री संगमाजवळच्या गांधारपाले गावाजवळून पाचाडकडे जात असावी. महाड बंदरावर आणि राजधानीकडं जाणाऱ्या या वाटेवर चांभारगड आणि सोनगड लक्ष ठेवत. गांधारी-सवित्री संगमावर महाड बाजूला दस्तूरी नावाचं ठिकाण आहे. एका रस्त्याला दस्तूरी रस्ता असंही नाव आहे. दस्तूरी हा स्त्रीलिंगी शब्द मूळच्या फार्सी 'दस्तूर + ई' या शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ 'रस्तापट्टी' किंवा 'रस्तापट्टीचें नाके' असा होतो. दस्तूरीचा अर्थ 'रस्तापट्टीचें नाके' असा होत असल्यामुळें महाड बंदराच्या ठिकाणी दस्तूरी म्हणजे रस्तापट्टीचें नाके असावे. हे दस्तूरी सोनगडाच्या पायथ्याशी आणि गांधारी-सवित्री संगमावर आहे ही खास लक्षात घेण्याजोगी बाब आहे.

आ - ३) काळू अथवा काळ खोरे -

       १६८९ साली जेव्हा झुल्फिकारखान उर्फ इतिकदखानाने रायगडाला वेढा घातला त्यावेळी औरंगजेबाला पाठवलेला पत्रात तो म्हणतो की 'मी महाड इथं पोहोचलो आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ठाणी पण उध्वस्त केली. गांगोळीच्या मुक्कामी शत्रूने आमच्यावर रात्री हल्ला केला. त्यांनी आमच्यावर बाण फेकले आणि गोळ्यांचा वर्षाव केला. महाडच्या वाटेवर असलेल्या सोनगडच्या डोंगरावर शत्रू जमले होते आणि त्यांनी आमच्यावर तोफांचा आणि बंदुकींचा मारा केला.' १६८९ सालच्या इतिकदखानाच्या या पत्रात रायगडाकडे जाणाऱ्या गांधारी आणि काळू नदीच्या खोऱ्यातल्या वाटांचे अंदाज बांधता येतात.

       मुंबईकर इंग्रजांची रायगडला जाण्याची वाट साधारण याच भागातून होती. मुंबईहून कोरलाईमार्गे कुंडलीकेच्या खोऱ्यातून बोटीने अष्टमी, गांगोळी पुढे खुश्कीच्या मार्गाने निजामपूर पाचाड असे ते रायगडाला जात. ब्रिटीशांच्या बऱ्याच पत्रात अष्टमी, गांगोळी असे उल्लेख मिळतात. या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी पन्हाळघर, कुर्डुगड, मानगड हे किल्ले होते तर दासगावच्या किल्ल्याला रायगडाच्या वाटेशिवाय अरबी समुद्रातून महाड बंदराकडे येणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्याची अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागत असावी.

इतिकदखानाने औरंगजेबाला पाठवलेल्या
पत्राचा मराठी तर्जुमा

🚩 प्रकरण चौथे :- 'दुरदृष्टी'

       रायगडाचा पहाड चढाईस अत्यंत कठीण तर होताच पण तेवढाच आजूबाजूचा सह्याद्रीचा मुलूख देखील शत्रूच्या हालचालीसाठी अतिशय अडचणीचा होता. रायगडाच्या भोवतालचा मुलूख शत्रुच्या दृष्टीने जरी अडचणीचा असला तरीपण उभं आयुष्य डोंगरात घालवणाऱ्या मराठ्यांसाठी मात्र तो एकदम सुरक्षित होता. दुसरं असं की मराठ्यांचं आरमार समुद्रात आलं होतं आणि पुढं जाऊन डोकेदुखी ठरु शकतील अशा ब्रिटीश, पोर्तूगीज, सिद्दी वगैरे सत्ता हळूहळू डोके वर काढू लागल्या होत्या. या दर्यावदी सत्तांवर अंकूश ठेवण्यासाठी असं एखादं ठिकाण हवं होतं की जे आपलं सामर्थ्य असलेल्या जमिनीवर तर असेल पण त्या ठिकाणाहून प्रसंगी समुद्रावर लक्षही ठेवता येईल आणि प्रसंगी सहजपणे समुद्रातही शिरता येईल. समुद्रावरच्या हालचालींवर आणि व्यापारावर नियंत्रण ठेवायला समुद्राला तुलनेनी जवळ असलेली राजधानी गरजेची होती आणि रायगडाचं स्थान त्यादृष्टीनं अतिशय चपखल होतं. समुद्र, कोकण आणि घाटमाथा या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सर्वांवर भक्कम पकड बसवण्यासाठी रायगडासारखं उत्कृष्ट ठिकाण दुसरं असूच शकत नव्हतं. रायगडाची सामरिक सुरक्षेच्या आणि पुढं जाऊन महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणावर प्रभाव पाडेल अशा मोक्याच्या ठिकाणाची महती महाराजांच्या अनुभवी नजरेने ओळखली नसती तरच नवल होतं. 

       २५ मार्च १६८९ रोजी झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा दिला. पुढं ०५ एप्रिल १६८९ मध्ये राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर देखील गेले तरीदेखील पुढं जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता पण खानाला रायगड काही जिंकता आला नाही. रायगडाचं बेलागपण आणि दुर्गमत्व हे यावरूनच सिद्ध होतं.

       इ.स. १६५६ ते इ.स. १६७० असं रायगडाचं बांधकाम हिरोजी इंदळकरांच्या देखरेखीखाली तब्बल १४ वर्ष सुरू होतं.  रायगडावर असलेल्या शिलालेखानूसार हिरोजींनी गडावर बांधलेल्या इमारतींची यादी दिली आहे. ते म्हणतात...

'वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ। स्तंभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते। श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो।'

अर्थात विहीर, आड, रुचकर पाण्याने भरलेले तलाव, रम्य वनं, घरं, रस्ते, स्तंभ,गजशाळा आणि राजवाडा श्रीमत् रायगडावर हे सर्व मी म्हणजे हिराजीने निर्माण केलं.

       रायगडावर असलेल्या इमारतींचं विश्लेषण केलं तर हा सैनिकी वास्तुशास्त्राचा जगातील अद्भूत आणि सर्वोत्तम नमुना असल्याचं आपल्या लक्षात येतं. सैनिकी वास्तूशास्त्राचा नमुना म्हणून जो जगप्रसिद्ध असलेला 'जिब्राल्टर किल्ला' आहे त्याच्याशी रायगडाची तुलना केली गेली. शिवकाळात रायगडाला भेट दिलेल्या परदेशी पाहुण्यांनी रायगडाला पुर्वेकडील जिब्राल्टर असं म्हटलेलं आहे. सैनिकी वास्तूशास्त्राच्या दृष्टीने हा इतका महत्त्वाचा गड आहे की, यावर जर धान्यसाठा आणि मुबलक सैन्य असेल तर हा दुर्ग जगाविरुद्ध लढू शकतो.

🚩 'उपसंहार'

       युद्धशास्त्रानुसार SWOT (strength, weaknesses, opportunities & threats) आणि FMEA (Failure Mode & Effects Analysis) केल्यानंतर आपलं उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेलं रणक्षेत्र निवडून काढणं व आपल्या शत्रूशी तिथंच लढाई देणं हे सेनापतीचं मुख्य काम आणि युध्दशास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे. आपण ठरविलेल्या रणक्षेत्रात शत्रूस लढाई खेळण्यास भाग पाडता येणं हे जसं युध्दशास्त्रातील एक महत्त्वाचं तत्त्व आहे तसंच आपल्या युध्दकौशल्याचा स्वतःच्या संरक्षणासाठी उत्तम प्रकारे उपयोग करुन घेता येणं हे देखील तितकंच महत्वाचं तत्व आहे. युध्दकौशल्याच्या डावपेचांचा तत्कालीन राजकारणाशी कसा आणि किती निकटचा संबंध असतो याचं 'राजधानी राजगडावरून रायगडाला हलवणं' हे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. शिवाय शिवाजी महाराजांसारख्या उत्कृष्ठ सेनानीला राजधानीचं भौगोलिक स्थान नैसर्गिकरित्या सुरक्षित असणं अतिशय आवश्यक वाटत होतं हे वेगळं सांगण्याची गरज ती काय? महाराजांनी आपल्या कल्पकतेतून ही गोष्ट साधून घेतली. शिवाजी महाराजांच्या ‘तख्तास जागा हाच गड करावा’ या एकाच वाक्यात या लेखाचं संपूर्ण सार सामवलेलं आहे.

🚩🚩🚩 


      उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक साधनांच्या आणि स्वतः फिरून स्थानिकांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर हा लेख बेतला आहे. इथून पुढे अस्सल ऐतिहासिक संदर्भ आणि वाटांची माहिती मिळवून त्यानुसार या लेखात, नकाशात वेळोवेळी सुधारणा करण्याचा माझा कायमच प्रयत्न असेल. 

       नकाशात दाखवलेली ठिकाणं ही रायगडाच्या भौगोलिक परिसराचा अंदाज बांधता यावा यासाठीच दिलेली आहेत, ती जास्तीतजास्त to scale देण्याचा प्रयत्न केला आहे पण ती अचूक असतीलच असं नाही. मार्किंग करताना थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं देखील मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे किंवा थोडीफार कागदपत्रांची शोधाशोध केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो...

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही॥

बहूत काय लिहिणें। मर्यादेयं विराजते॥
लेखनसीमा॥

🚩🚩🚩


🚩 संदर्भ -


१) जेधे शकावली - बाळ गंगाधर टिळक

२) शि.च.सा.खंड १० - पृष्ठ - ५४

३) शिवापूर दफ्तरातील यादी (राजवाडे संग्रह)

४) शिवराज-मुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई.

५) शिवदिग्विजय बखर

६) सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद

७) रायगडची जीवनकथा - शांताराम विष्णु आवळसकर

८) Book Of Bombay - James Douglas

९) शिवभारत - कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर

१०) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - प्रा. श. श्री. पुराणिक

११) फार्सी-मराठी कोश - प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन

१२) ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ९, मराठी राजवटीतील काही घाटमार्ग आणि चौक्या.

 

🚩 फोटो -

१) शिवापूर दफ्तरातील यादी

२) जेधे शकावली

३) सभासद बखर

४) रायगडची जीवनकथा

५) रायगड नकाशा - गुगल

६) इतर नकाशे - निनाद बारटक्के

७) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर


🚩 ऋणनिर्देश -

१) अजय ढमढेरे 

२) निनाद बारटक्के

३) फाल्कन ट्रेकर्स


🚩🚩🚩

बुधवार, १९ जून, २०२४

"भारंग, एक औषधी रानभाजी"

"भारंग, एक औषधी रानभाजी"


       नुकताच आहूप्यातून गोरखगडावर गेलो होतो. ट्रेक पुर्ण करून परतताना आहूप्यात मित्राच्या घरी मस्त चुलीवर तयार केलेलं जेवण जेवायला मिळालं. शिवाय जेवताना 'चाई' या रानभाजीचा फक्कड मेनू होता. खरंतर तेव्हा भारंग खायची फार इच्छा झाली होती पण त्या दिवशी ती अजून तयार व्हायची असल्यानं काही खाता आली नाही. त्यावेळची माझी ही इच्छा थोड्याच दिवसांत पुर्ण होईल असं बाकी अजिबात वाटलं नव्हतं.

       काल अगदी अचानक माझ्या ट्रेकमित्राने, मिलींदने घोरवडेश्वरवरून मुद्दाम माझ्यासाठी ही भाजी तोडून आणली आणि आणल्या आणल्या लगेचच, बायकोने ती बनवली पण.

       खरंतर भारंग ही माझी आवडती रानभाजी. वर्षातून किमान एकदा तरी आमच्या घरी आम्ही ती बनवतोच. हीची चवही इतकी रूचकर असते की एरव्ही सगळ्या भाज्यांना नाकं मुरडणारा माझा मुलगा पोळीशी भाजी नाही तर भाजीशी पोळी लावून खातो. 

       पावसाळ्याच्या दिवसांत भारंग सह्याद्रीत सगळीकडे पहायला मिळते आणि ट्रेक करून परत येतानाही ती अगदी सहज आणता येऊ शकते. हीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला ट्रेकला जायला किंवा भाजी आणायला जमलं नाही तरी पावसाळ्याच्या अखेरीस तीला फुले येतात. अगदी या फुलांचीही भाजी करता येते. 

       अशी ही भारंग एक उत्तम औषधी वनस्पती आहे. 

       भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरले जाते. दमा असलेल्यांना भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा आणि अडुळसाची पाने या सर्वांचा एकत्र काढा करून देतात. 

       भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात बऱ्याच ठिकाणी खाल्ली जाते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा खुपच चांगला उपयोग होतो. या भाजीत पाचक गुणधर्म असल्यामुळे पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयोगी आहे. एकंदरीत श्वसनाच्या आणि पोटाच्या विकारावर ही भाजी अत्यंत गुणकारी आहे.

       पावसाळ्यात सहजी मिळणाऱ्या भारंग, टाकळा, चाई, कुडा, गुळवेल, चुका, तांदूळजा या आणि यासारख्या अनेक रानभाज्या एवढया गुणकारी आहेत की वर्षातून एकदा तरी खाव्यात. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा अशा रानभाज्या खाऊन आधीच खबरदारी घेतलेली केव्हाही चांगली. नाही का?

मर्यादेयं विराजते ॥





रविवार, २४ मार्च, २०२४

बचेंगे तो और भी लडेंगे !

 बचेंगे तो और भी लडेंगे !


 

       वरील शीर्षकाला अनुशंगून इतिहासातील तीन घटना इथं सांगाव्याशा वाटतात.

🚩 घटना पहिली...


दिनांक - १० जानेवारी १७६०
स्थळ - बुराडी घाट
घटना नायक - दत्ताजी शिंदे


       लेखाला जे शीर्षक दिलंय त्या शीर्षकाचं मूळ या पहिल्या घटनेत आहे.

       तो काळ होता १७५८ चा. पानिपताच्या युद्धाचे वेध लागायला सुरुवात झाली होती. लाहोर सोडवून दत्ताजी आणि जनकोजी शिंदे हे काका-पुतणे नजीबाचे पारिपत्य करण्यासाठी दिल्लीला यमुनाकाठी रामघाट इथं आले. दरम्यान मल्हारराव होळकरांनी दत्ताजींना नजीबाचे पारिपत्य करण्यापासून परावृत्त केलं. नजीबानं मराठ्यांच्या सैन्याला यमुना नदीचं पात्र ओलांडण्यासाठी 'नावांचा पुल बांधण्यात मदत करतो' या वचनावर जवळजवळ सहा महिने झुलवत ठेवलं. या सहा महिन्यात नजीबानं आतून सर्व मुस्लिम राजांशी संधान बांधून दताजींच्या विरोधात सर्व बाजूंनी चांगलीच मोर्चेबांधणी केली.

       १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यात नजीबाच्या सांगण्यावरून अहमदशहा अब्दाली दत्ताजींच्या पिछाडीने दत्ताजींवर चाल करून आला. समोरचा यमुनेचा पूल नजीबाच्या ताब्यात तर मागे अब्दाली. आता दत्ताजी आणि जनकोजी दोघे चांगलेच कात्रीत सापडले पण अशा परिस्थितीतही दत्ताजींनी थेट नजीबावर चाल करून त्याला मागं रेटलं. परिस्थिती ओळखून नजीबानं दत्ताजींशी तात्पूरता तह केला.

       डिसेंबर महिन्यात अब्दाली कुरूक्षेत्राला येईपर्यंत दिल्लीपती शुजानेही एक कोटी खंडणीची थाप मारून दत्ताजींना कुरूक्षेत्राला अडकवून ठेवलं. कुरूक्षेत्रावर दताजींच्या समोरच्या बाजूला रोहिले तर मागे अब्दाली. दत्ताजी कुरुक्षेत्रावर चांगलेच कात्रीत सापडले पण माघार घेतील ते दत्ताजी कसले? आपल्या पुतण्याला म्हणजे जनकोजींना त्यांनी कबिल्यासह दिल्लीला पाठवलं आणि २४ डिसेंबर १७५९ रोजी कुंजपुरा इथं अहमदशहा अब्दालीशी लढाई छेडली आणि त्याच दिवशी अब्दालीचा सपाटून पराभव केला. हार पत्करल्यावर अब्दाली यमुनापार उतरला आणि नजीब, शुजा आणि मोहम्मद बंगश यांन जाऊन मिळाला. आता सर्व मुसलमान एक झाले आणि दत्ताजी एकटे पडले. त्यामुळं दत्ताजी मराठ्यांचं सैन्य घेऊन दिल्लीला आपल्या पुतण्याला म्हणजे जनकोजींना जाऊन मिळाले. दत्ताजी आणि जनकोजी यांना आता समोरासमोरचे युद्ध टाळता येणार नाही याची पुरेपुर खात्री पटली त्यादृष्टीने त्यांनी युद्धाच्या डावपेचांची आखणी करायला सुरूवात केली.

       १० जानेवारी १७६० ची मकरसंक्रांत उजाडली. दत्ताजींचं सैन्य यमुना पार करण्यासाठी उतार शोधू लागलं पण तो काही मिळेना. हे चालू असतानाच शत्रूसैन्य नदी उतरून मराठ्यांवर थेट हल्ले करू लागलं. दत्ताजींनी आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. नजीबाच्या आणि गिलच्यांच्या ताज्या दमाच्या फौजेकडं बंदूका होत्या ज्या मराठ्यांकडं नव्हत्या साहजिकच एक एक मराठा बंदूकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा खच रणांगणावर जिकडं तिकडं दिसू लागला. गनिमांनी एकाचवेळी तीनही बाजूंनी मराठ्यांवर हल्ला केला होता. बऱ्याच वेळपासून निकराने गिलच्यांना पाणी पाजणाऱ्या जनकोजींच्या दंडाला गोळी लागली आणि ते खाली कोसळले. लगोलग ही बातमी दत्ताजींना पोहोचवण्यात आली. हे ऐकून रागाने लाल झालेल्या दत्ताजींनी रणांगणावर मृत्यूचे तांडव माजवलं. तेवढ्यात त्यांना हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब दिसला. वाटेत येणाऱ्या अफगाणांचे मुडदे पाडत दताजी नजीबावर चालून गेले. इतक्यात जंबूरक्याचा एक गोळा दताजींच्या बरगडीला लागला आणि ते जागीच कोसळले. दताजी कोसळलेत म्हटल्यावर नजीब आणि कुतूबशहा दत्ताजींवर झेपावले. तलवार उचलण्यासाठी धडपडत असलेल्या दत्ताजींचे डोके हातात धरून कुतूबशहा म्हणाला...

'क्यू पटेल, और लडोगे?'

हे ऐकून बाणेदार दत्ताजींनी त्याच तडफेनी त्याला उत्तर दिलं.

'क्यो नहीं, बचेंगे तो और भी लडेंगे !'

हे ऐकून कुतूबशहा दत्ताजींच्या शरीरावर बसला आणि त्यांच्या छातीची चाळण करू लागला. नजीबाने हातातला जमदाडा दताजींच्या मानेवर घातला आणि त्यांचं शीर धडावेगळं केलं.

क्रमशः


🚩 घटना दुसरी...


दिनांक - ११ जून १६६५
स्थळ - किल्ले पुरंदर
घटना नायक - छत्रपती शिवाजी महाराज


       रायरेश्वराच्या प्रतिज्ञेपासून म्हणजे २७ एप्रिल १६४५ पासून शिवाजी महाराजांचे स्वराज्याच्या सीमा विस्तारण्याचे प्रयत्न दररोज वाढतच चालले होते. मोगल आणि आदिलशहा या दोघांनी मिळून अहमदनगरची निजामशाही बुडवल्यावर तिच्या प्रदेशाची आपापसात लगेचच वाटणी पण करून घेतली. पैकी आदिलशाहीकडे मावळातील व कोकणातील जो नवीन प्रांत आला त्यामध्ये आणि मोगलांकडे आलेल्या कल्याण, भिवंडी भागात महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न चालवले होते. इ. स. १६३७ सालात निजामशाही बुडवल्यापासून ते इ. स. १६४५ सालात स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू करेपर्यंतच्या मधल्या ८ - १० वर्षांच्या काळात आदिलशाहीकडे आलेल्या पुणे, सुपे, मावळ आणि लगतच्या कोकण भागावर विजापुरकरांचा म्हणावा तसा अंमल बसला नव्हता. तिथले देशमुख, मुलकी अधिकारी म्हणावे तसे आदिलशाहीच्या अंकीत झाले नव्हते. एकूणच सगळीकडे स्वैराचार माजला होता. त्यांच्या बेबंदशाहीला शिवाजी महाराज परस्पर पायबंद घालू लागल्यामुळे आदिलशाहीच्या ते पथ्यावरच पडले होते. त्या सर्वांचा नाश केल्यावर शेवटी एकट्या राहिलेल्या शिवाजी महाराजांची 'योग्य' व्यवस्था लावता येईल असा आदिलशाहीचा डाव होता. त्यामुळे १६५६ पर्यंत फत्तेखानाची स्वारी सोडता विजापुरकरांकडून फारशा स्वाऱ्या महाराजांवर झाल्या नाहीत पण त्यानंतर वाई, कराड भागात सीमा विस्तारण्यासाठी महाराजांच्या हालचाली सुरू झाल्या. आता मात्र स्थिरस्थावर असलेल्या म्लेंछ सत्तांना साधारणपणे १६५६ नंतर शिवाजी महाराज म्हणजे एक डोकेदुखी होऊ लागली होती. या त्रासाचा सर्वात मोठा फटका विजापुरच्या आदिलशाहीला बसत होता.

       २५ जुलै १६४८ मध्ये आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाकानाने जिंजीजवळ शहाजीराजांना अटक केली. त्यांच्या सुटकेसाठी आदिलशहाने दोन किल्ल्यांची मागणी केली. किल्ले बंगळूर आणि किल्ले कोंढाणा.  शिवाजी राजांना सिंहगड आदिलशहाला नाईलाजानंच द्यावा लागला होता. खरंतर हा किल्ला महाराज स्वतःच्या वडिलांच्या सुटकेसाठीसुद्धा आदिलशाहीला देण्यासाठी तयार होत नव्हते. त्यावेळी सोनोपंतांनी महाराजांना 'दुर्गनिती' सांगितली जी कवींद्र परमानंदांनी शिवभारताच्या सोळाव्या अध्यायात दिलेली आहे. ते म्हणतात...

न दुर्गं दुर्गमित्येव दुर्गमं मन्यते जनः l
तस्य दुर्गमता सैव यत्प्रभुस्तस्य दुर्गमः ll ६१ ll

अर्थ - दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानीत नाहींत, तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय.

प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गमः l
अदुर्गमत्वादुभयोर्विद्वषन्नव दुर्गमः ll ६२ ll 

अर्थ - प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गांमुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो.

संति ते यानि दुर्गाणि तानि सर्वाणि सर्वथः l
यथा सुदुर्गमाणि स्युस्तथा सद्यो विधीयताम् ll ६३ ll

अर्थ - तुमचे जे दुर्ग आहेत ते सर्व ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबडतोब करा.

       या दुर्गनितीच्या श्लोकांचा सारांश शिवभारताच्या प्रस्तावनेत दत्तात्रेय विष्णू आपटेंनी दिला आहे. त्या सारांशाच्या मूळ तर्जुम्याचा अर्थ असा...

       'राजकारणात बलवानाशी मारामारी करण्याचा प्रसंग आणणे शहाणपणाचे गणले जात नाही. शहाजीराजांनी बलवानाशी वैर केले आणि ते गैरसावध राहिले यामुळे त्यांच्यावर कायद्याचा प्रसंग आला. सध्या आदिलशहा व दिल्लीपती हे दोघेही तुमच्यावर (शिवाजी राजांवर) रागावले आहेत आणि त्या दोघांनाही एकजूट होऊन चाल केली तरी तुमचा निभाव लागेल असे दुर्गम स्थान हस्तगत करण्याचा प्रथम प्रयत्न करा तोपर्यंत आधी शत्रूच्या पक्षात फाटा फूट कशी पाडता येईल ते पहा. भेदनीती हीच राजकारणात फार उपयोगी असते. पित्याची सुटका होण्यासाठी एखादा गड द्यावा लागला तरी हा सौदा महाग पडला असे वाटण्याचे कारण नाही. किल्ल्याचा स्वामी अजिंक्य असणे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.'

       नंतरच्या काळात म्हणजे इ.स. १६६५ मध्ये शिवाजी महाराजांना नाईलाजानंच मोगलांबरोबर पुरंदराचा तह करावा लागला. या तहात त्यांना तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा प्रदेश मोगलांना द्यावा लागला. या तेवीस किल्ल्यात मराठ्यांच्या राज्यातला सामरिकदृष्टीने महत्वाचा आणि १६४८ साली शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिलेला सिंहगडदेखील होता. एक सिंहगड जो महाराज स्वतःच्या वडिलांच्या सुटकेसाठीसुद्धा आदिलशाहीला देण्यासाठी तयार होत नव्हते तिथं आज २३ किल्ले मोगलांना द्यायला महाराज तयार झाले होते. पुरंदरचा तह हा खरं सांगायचं तर स्वराज्यस्थापनेच्या प्रवासातील सगळ्यात वेदनादायी प्रसंग म्हणावा लागेल पण या प्रसंगाला जितका वेदनादायी म्हणता येईल तितकाच त्याला खूप काही शिकवून जाणारा सुद्धा म्हणावं लागेल.

       महाबलवान शत्रुविरुद्ध लढून मरण्यापेक्षा तात्पुरती माघार घेऊन वेळ येताच पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीचा निर्धार उरात बाळगायला हवा. म्हणजेच काय तर...

बचेंगे तो और भी लडेंगे !

क्रमशः


🚩 घटना तिसरी...


दिनांक - फेब्रुवारी १९११
स्थळ - सेल्युलर जेल, अंदमान.
घटना नायक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.


       स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या देशसेवेच्या, समाजप्रबोधनाच्या वगैरे केलेल्या कार्याबद्दल इथं सांगत नाही कारण त्याबद्दलची सर्व माहीती सोशल मिडीयावर, अनेक लेखकांनी केलेल्या चरित्र लेखनात मिळेल आणि मुख्य म्हणजे या लेखाचा तो विषय नाही. इथं फक्त मूळ विषयाशी सुसंगत मुद्दा मांडत आहे.

       १९०६ साली स्वातंत्र्यवीर सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्‍लंडला गेले आणि तिथूनच अभिनव भारताच्या आंतरराष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ झाला. इंग्‍लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जिथं राहत होते ते ‘भारत भवन’ हे 'अभिनव भारत' या चळवळीचं मुख्य केंद्र बनलं. भारतातून इंग्‍लंडमध्ये येणारे तरुण विद्यार्थी भारत भवनाकडे आकर्षित होऊन सशस्त्र क्रांतीसाठी आवश्यक असलेले शस्त्रनिर्मितीचे शास्त्रीय ज्ञान निरनिराळ्या देशांतील क्रांतिकारकांशी संपर्क साधून मिळवू लगले. वेगवेगळ्या मार्गांनी भारतात पिस्तुलेही पाठवण्यात येऊ लागली. स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्‍लंडमध्ये असताना १९०९ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचे थोरले बंधू बाबाराव यांच्यावर त्यांच्या देशभक्तीपर केलेल्या पद्यांबद्दल ब्रिटीशविरोधी बंड करण्याचा आरोप ठेवून त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली. ब्रिटीशांनी बाबारावांना केलेल्या या शिक्षेमुळं तरुण पिढीत एक सूडाची भावना निर्माण झाली. मदनलाल धिंग्रा यांनी खुद्द इंग्‍लंडमध्ये केलेला कर्झन वायली याचा तर कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरे यांनी नाशिक इथं केलेला वध हे या सूडाच्या भावनेमुळेच झाले. नाशिकच्या वध हा पूर्वनियोजित कट असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत असं परस्पर ठरवून ब्रिटीश सरकारने त्यांना इंग्‍लंडमध्ये अटक केली. खरंतर जॅक्सनच्या वधामुळं सरकार बिथरून गेलं होतं. भारतात आणल्यावर सेशल ट्रिब्यूनलपुढं खटल्याचं काम सुरू झालं. एकूण सत्तर दिवस या खटल्याचं काम चाललं. शेवटी २४-१२-१९१० या दिवशी निकाल सांगण्यात आला. त्यात सावरकरांना जन्मठेपेची म्हणजे काळ्यापाण्याची पहिली शिक्षा झाली.


       पहिल्या जन्मठेपेची जी शिक्षा झाली तिने ब्रिटीश सरकारचं समाधान झालं नाही म्हणून जॅक्सनच्या खुनास मदत केल्याचा आरोप करत ब्रिटीश सरकारनं सावरकरांवर दुसरं आरोपपत्र दाखल केलं. 'जॅक्सनच्या खुनाला मदत करण्याच्या बाबतीत माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने काहीही संबंध नाही.' अशी दुसऱ्या खटल्यात सावरकरांनी आपली बाजू मांडली खरी पण अर्थातच न्यायमूर्तीनी त्याला मान्यता दिली नाही. विलायतेस जाण्यापूर्वी आरोपीचे चरित्र, इंग्लंडमधील त्याची कृत्ये, इत्यादीवरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की आरोपीने दोन पिस्तुलं सरकारी अधिकाऱ्यांचा खून करण्यासाठीच पाठवली होती आणि यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ३० जानेवारी १९११ रोजी दुसरी जन्मठेप म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पहिली २५ वर्षांची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना सलग दुसरी २५ वर्षांची शिक्षा भोगायची होती. ब्रिटीश सरकारच्या कोर्टानं त्यांना एकूण दोन जन्मठेपांची म्हणजे पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. काय होती ही शिक्षा आणि त्यांच्यावर कोणती कलमे लावण्यात आली होती? तर पुढील कलमं त्यांच्यावर लावण्यात आली होती.

१) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १२१.

"भारत सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे किंवा युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध पुकारणे."

शिक्षा - मृत्यू, किंवा जन्मठेप आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र

२) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १२१(अ).

"राज्याविरुद्ध काही गुन्हे करण्याचा कट रचणे."

शिक्षा - जन्मठेप, किंवा १० वर्षे कारावास आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र

३) भारतीय दंड संहिता १८६०, कलम १०९.

"कोणत्याही गुन्ह्यास उत्तेजन देणे, जर प्रवृत्त केलेले कृत्य परिणामी केले गेले असेल आणि जेथे त्याच्या शिक्षेसाठी कोणतीही स्पष्ट तरतूद केली गेली नसेल."

शिक्षा - उत्तेजित केलेल्या गुन्ह्याप्रमाणेच.

गुन्हा - गुन्ह्यानुसार गुन्हा दखलपात्र किंवा अदखलपात्र आहे. गुन्ह्यानुसार प्रवृत्त केलेले जामीनपात्र किंवा अजामीनपात्र आहे.

४) भारतीय दंड संहिता १८६०, कलम ३०२.

"खून."

शिक्षा - मृत्यू, किंवा आजीवन कारावास आणि दंड.

गुन्हा - अजामीनपात्र.


       अंदमानात असताना सावरकरांना जो बिल्ला दिला होता त्या बिल्ल्याचं हे छायाचित्र आहे. यात १२१, १२१ A, १०९ व ३०२ हीे राजद्रोहाची कलमे, सावरकरांच्या कारावासाची एकूण वर्षे (50 YEARS), शिक्षेची पहिली तारीख (24.12.1910) सावरकरांना मिळालेलं 'डेंजरस' किंवा 'डी' तिकीट (D) व शिक्षेची शेवटची तारीख (23.12.1960) या माहितीचा उल्लेख आहे. हे छायाचित्र २३/१२/१९६० रोजी लंडनच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित झालं. हा अंक लंडनच्या ब्रिटीश लायब्ररीने जपून ठेवलेला आहे.

       भारताच्या इतिहासात हिंसक वा अहिंसक यापैकी कोणत्याही मार्गाने भारताच्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय अन्य कुणालाच जन्मठेपेची ५० वर्षं शिक्षा मिळालेली नाही. ब्रिटीशांनी त्यांना दिलेल्या या काळ्यापाण्याच्या शिक्षेतूनच खरंतर त्यांचा ब्रिटीश सत्तेला असलेला धोका आणि त्यांचं भारताच्या स्वातंत्र्यसमरातील महत्व अधोरेखीत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील कोर्टाने १९१० आणि १९११ साली फर्मावलेली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा कोणताही विरोध न करता स्विकारली. आज या घटनेला तब्बल ११३ वर्षे होऊन गेली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात सहजी दिसून येणारे अटकपुर्व जामीन, रात्री-अपरात्री सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यासारखे किंवा कोर्टाचा अवमान होईल असे कोणतेच प्रकार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देखील केले नाहीत.

       तत्कालिन राजकीय परिस्थितीचा विचार केला तर सावरकरांना तुरूंगात राहून मरण येण्यापेक्षा त्यांचे बाहेर राहणं गरजेचं दिसतं. बरं सावरकरांनी माफीनामा लिहिलाच असेल तर तो त्यांचा सांविधानिक हक्क होता जो तत्कालिन अनेक राजकिय नेत्यांनीही अवलंबला होता. अर्थात हा सगळा एका राजकारणाचाच भाग होता हे नक्की कारण खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी अशी पत्रे औरंगजेबाला पाठवली होती. अखेर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या अर्जांना यश आलं आणि १९२१ साली ब्रिटीशांनी सावरकरांची अंदमानमधून सुटका केली. त्यानंतर पुढं ते तीन वर्षे स्थानबद्धतेत होते. अखेर ०६ जुन १९२४ रोजी ब्रिटीश सरकारनं त्यांना मुक्त केलं. ०६ जुन १९२४ पासून २६ फेब्रुवारीला त्यांनी देह ठेवेपर्यंत समाज सुधारणेचं प्रचंड कार्य केलं. थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील त्यांचाच कित्ता गिरवलेला दिसून येतो...

       'महाबलवान शत्रुविरुद्ध लढताना कैदेत मरण्यापेक्षा तात्पुरती माघार घेऊन वेळ येताच पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीचा निर्धार उरात बाळगायला हवा.' म्हणजेच काय तर...

🚩 बचेंगे तो और भी लडेंगे !

बहुत काय लिहिणे l आपण सुज्ञ असा l

लेखनसीमा ll

🚩 संदर्भ -

१) दत्ताजी शिंदे - विकिपीडिया
२) शिवभारत - कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर
३) मराठी विश्वकोश
४) माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर