मंगळवार, १५ जुलै, २०२५

"किन्नौर कैलास"

२) "किन्नौर कैलास" 

 

 

       'किन्नौर कैलास' हिमाचल प्रदेशातील जोरकंदन (२१२३६ फूट) पर्वतरांगेत, सतलज नदीच्या खोर्‍यात (31°31′14″N, 78°21′49″E) या अक्षांश-रेखांशावर वसलेला आहे. प्रशासकीय दृष्टीने किन्नौर कैलास किन्नौर जिल्ह्यातील कल्पा तालूक्यात असलेल्या तांगलिंग गावाजवळ वसलेला आहे. या कैलासाची समुद्रसपाटीपासून उंची जरी १९८६५ फूट असली तरी किन्नौर शिवलिंग शिळा मात्र १५७४८ फूट उंचीवर आहे. तांगलिंग गावापासून १६ किलोमीटर अंतरावर ७९ फूट उंचीची ही किन्नौर कैलास शिळा आहे.

🚩 अंतरे -

सिमला ते शाँगताँग पूल - २१४ किमी रस्ता
शाँगताँग पूल ते तांगलिंग - ०३ किमी रस्ता
शाँगताँग पूल ते पोवारी झुला - ०३ किमी रस्ता
तांगलिंग ते गणेश/आशिकी पार्क - ०९ किमी चाल
गणेश/आशिकी पार्क ते भीमद्वार/गणेश गुफा - ०१.५० किमी चाल
भीमद्वार/गणेश गुफा ते पार्वती कुंड - ०३ किमी चाल
पार्वती कुंड ते किन्नौर कैलास - ०२.५० किमी चाल

 
🚩 कसे पोहोचाल? -
 
🚩 अ) विमानमार्गे - किन्नौर यात्रेला विमानाने पोहोचायचं असेल तर सर्वात जवळचा विमानतळ सिमला हा आहे. हा विमानतळ तांगलिंगपासून २३७ किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळावर फारच कमी विमानं उतरत असल्यामुळं चंदिगड विमानतळावरूनही इथं येता येतं. चंदिगड विमानतळापासून तांगलिंग ३३९ किलोमीटर आहे.


🚩 आ) रेल्वेमार्गे - किन्नौर यात्रेसाठी ब्रॉडगेज रेल्वेलाईन असलेलं जवळचं रेल्वेस्थानक कालका आहे जे चंदिगड रेल्वेस्थानकापासून फक्त २४ किलोमीटर अंतरावर आहे. कालका रेल्वेस्थानकापेक्षा चंदिगड रेल्वेस्थानक भारतातील अनेक शहरांना जोडलेलं असल्यामुळं किन्नौर यात्रेसाठी चंदिगड रेल्वेस्थानक सोईस्कर होतं. तसं पहायला गेलं तर सिमला हे किन्नौर कैलाससाठी सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे जे कालका रेल्वेस्थानकाशी नॅरोगेज रेल्वेलाईनने जोडलेलं आहे. पुरेसा वेळ हाती असेल तर कालका ते सिमला असा निसर्गसुंदर रेल्वेप्रवास जरूर करावा. साधारण पाच तास लागणार्‍या या नॅरोगेज रेल्वेप्रवासासाठी दिवसभरात टॉयट्रेनच्या ०६ फेर्‍या आहेत. चंदिगड रेल्वेस्टेशनपासून तांगलिंग ३२३ किलोमीटर आहे, कालकापासून तांगलिंग ३०२ किलोमीटर आहे तर सिमलापासून तांगलिंग २१७ किलोमीटर आहे.

 


 

🚩 इ) रस्तामार्गे - चंदिगड सेक्टर ४३ आणि सिमला इथून रिकाँगपियोसाठी HRTC म्हणजेच Himachal Pradesh Transport Corporation ची बससेवा उपलब्ध आहे. चंदिगड सेक्टर ४३ पासून सकाळी ०४.४०, ०६.०५, १६.५०,१७.५०, १८.०० आणि १९.०० वाजता सुटणार्‍या हिमाचल पथ परिवहन निगमच्या दिवसभरात ०६ बसेस रिकाँगपियो इथं जातात. या बसने पोवारी झुल्यापाशी उतरून तांगलिंग गाव गाठता येतं. या बसप्रवासासाठी साधारण १२ ते १३ तास लागतात. १८, २५, २७ आणि ३५ अशा वेगवेगळ्या आसनक्षमता असलेल्या या बस साधी, डिलक्स अशा आहेत. साध्या बससेवेचं तिकीट ८७० रूपये तर डिलक्स बससेवेचं तिकीट ९५३ रूपये आहे. या बसचं आगाऊ आरक्षण HRTC च्या Online Booking च्या https://online.hrtchp.com/oprs-web/guest/home.do?h=1 या सेवेद्वारे करता येतं. पोवारी झुल्यापासून किंवा शाँगताँग पूलापाशी उतरल्यानंतर पायथ्याच्या तांगलिंगपर्यंत मात्र तीन किलोमीटर चालतच जावं लागतं. स्वतःची खाजगी गाडी असल्यास शाँगताँग पूलापासून तांगलिंग पॉवरस्टेशनपर्यंत घेऊन जाता येते.

       किन्नौर कैलाससाठी गाडी चंदिगडहून टुरिस्ट गाडी केल्यास शक्यतो ०७ वर्षांच्या आतील करावी. परतीच्या प्रवासात काही कारणास्तव दिल्ली इथं ड्रॉप करण्याची गरज भासली तर ०७ वर्षापुढील गाड्या दिल्ली शहरात आणता येत नाहीत. गाडी ठरवताना गाडीवाल्याशी याबाबतीत जरूर चौकशी करावी.


🚩 आख्यायिका -

        हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि देवी पार्वतीशी संबंधित हिमालयातील हे स्थान एक अत्यंत पवित्र स्थान मानलं गेलं आहे. किन्नौर कैलास शिखराच्या जवळ एक नैसर्गिक तलाव ज्याला पार्वती कुंड म्हणून ओळखलं जातं. पार्वती कुंड हे देवी पार्वतीची निर्मिती असल्याचं मानलं जातं. देवी पार्वतींनी इथं बराच काळ पूजेत व्यथित केला अशी धारणा आहे. हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचं मिलनस्थळही आहे म्हणूनच गणेश पार्कला आशिकी पार्क असं देखील म्हटलं जातं. आख्यायिकेनुसार भगवान शिव हे प्रत्येक हिवाळ्यात किन्नौर कैलास शिखरावर सर्व देवी-देवतांना भेटत असतात म्हणूनच दरवर्षी नेमक्या याच काळात शिवभक्त किन्नौर कैलासची यात्रा करतात.

🚩 कोणत्या प्रकारे मणीमहेशची यात्रा करता येते ते पाहू...

       असं म्हटलं जातं की 'जर तुम्हाला जगातील सर्वात सुंदर दृश्य पहायची असतील तर कठीण मार्गांनीच जावं लागतं.' कठीण मार्ग असल्यामुळं हिमालय स्वतःची सुंदरता अजूनही टिकवून आहे. त्यामुळं सुंदर ठिकाणं पहायची असतील तर हिमालयाशिवाय तरणोपाय नाही आणि यावर कुणाचंही दुमत नसावं. शारीरिक आणि मानसिकतेची कसोटी पाहणार्‍या हिमालयातील अतिशय कठीण यात्रांमध्ये पंच कैलास यात्रांचा समावेश होतो. पंचकैलास यात्रांमध्ये सुद्धा किन्नौर कैलास आणि श्रीखंड महादेवचा क्रमांक बराच वरचा लागेल. किन्नौर कैलास हा हिमालयातील पंच कैलासांपैकी एक आहे. याचा उच्चार 'किन्नौर' असा आहे 'किन्नर' असा नाही. किन्नौर कैलासाची यात्रा साधारणपणे दोन प्रकाराने करतात. पहिली तांगलिंग गावापासून किन्नौर कैलासाच्या शिळेपर्यंत तर दुसरी ठंगी गावापासून चिटकूलपर्यंत परिक्रमा करून. तुम्हाला जर साहस आवडत असेल तर तुम्ही हिमाचलमध्ये असलेल्या या किन्नौर कैलासची यात्रा किंवा कठीण परिक्रमा अवश्य करावी.

🚩 प्रकार पहिला -

🚩 किन्नौर कैलास शिळा दर्शन यात्रा एकूण तीन ठिकाणाहून केली जाते.

१) तांगलिंग गाव - मालिंग खटा - गणेश/आशिकी पार्क - भीमद्वार/गणेशगुफा - सोरंग/पार्वती कुंड - किन्नौर कैलास शिवलिंग

२) पुरबनी गाव - किब्बर/पुरबनी कांडा - डैंगलोडेन - किन्नौर कैलास शिवलिंग

३) रिब्बा गाव - फुलियाच कांडा - बुग्याल - डुनसरंग कैंपसाइट - भीमद्वार/गणेशगुफा - किन्नौर कैलास शिवलिंग

       बहूतेक सर्व यात्रेकरू सोयीसुविधा पुरेशा असल्यामुळं तांगलिंगमार्गेच यात्रा करतात. तांगलिंग गावानंतर यात्रेच्या खर्‍या चढाईला सुरूवात होते. तांगलिंगमार्गे किन्नौर कैलास यात्रेचा कार्यक्रम साधारण तीन दिवसांचा आहे. आम्ही ही यात्रा तांगलिंगमार्गेच केली त्यामुळं त्याचाच इतिवृत्तांत इथं देत आहे.


🚩 तांगलिंग ते किन्नौर कैलास शिळा -

       किन्नौर कैलास पर्वतावर ७९ फूट एकसंध दगडाचं बनलेलं शिवलिंग आहे. भाविकांसाठी खूप पवित्र समजलं जाणारं हे शिवलिंग सतत रंग बदलत राहतं. दरवर्षी हिवाळ्यात या ठिकाणी किन्नौर कैलासची यात्रा भरते. स्थानिक यात्रा कमिटी आणि प्रशासन एकत्रितपणे या यात्रेचं आयोजन करतात. मोठ्या संख्येने यात्रेकरू ही यात्रा करतात. किन्नौर कैलासला जाणारा एकेरी प्रवास सुमारे १६ किमी आहे.

       किन्नौर कैलासचा प्रवास हिमाचल प्रदेशातील सिमलामार्गे राष्ट्रीय महामार्ग ०५ वरून सुरू होतो. सुमारे ६६० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पंजाबमधील 'फिरोजपूर' ते तिबेट सीमेजवळील हिमाचल प्रदेशातील 'शिपकी ला' पर्यंत म्हणजे भारत-चीन सीमेपर्यंत जातो. हा महामार्ग फिरोजपूर, मोगा, जगरांव, लुधियाना, मोहाली, चंदीगड, पंचकुला, कालका, सोलन, शिमला, थेओग, नारकंडा, रामपूर बुशहर, रिकाँगपियो या शहरांना जोडतो. या महामार्गावर रिकाँगपियोजवळ असलेल्या पोवारी गावापासून किन्नौर कैलासला जाता येतं. यात्रा सुरू करण्यापुर्वी रिकाँगपियो, कल्पा किंवा तांगलिंगमध्ये आपल्याला मुक्काम करता येऊ शकतो.

       किन्नौर कैलास यात्रेची सुरूवात तांगलिंग गावापासून होते. हे तांगलिंग गाव समुद्रसपाटीपासून ७,०५० फूट उंचीवर आहे. यात्राकाळात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस म्हणजेच आय. टी. बी. पी तांगलिंग इथं सुरक्षा चौकी उभारतं. ऑनलाईन नोंदणी केलेल्यांची नोंदणी प्रमाणपत्र तपासणं आणि नोंदणी न केलेल्यांची वैद्यकिय तपासणी करून नोंदणी करण्याचं काम या चौकीकडं असतं. नोंदणी झालेल्या प्रत्येकाला इथं एक टोकन क्रमांक दिला जातो जो पुढील प्रत्येक चौकीवर दाखवून पुढं जाणार्‍या प्रत्येक यात्रेकरूची नोंद ठेवण्यासाठी गरजेचा असतो. किन्नौर कैलास यात्रा समिती यात्रामार्गात केलेल्या सुविधांसाठी प्रत्येकाकडून ठराविक शुल्क आकारते.


🚩 दिवस पहिला -

तांगलिंग ते गणेश/आशिकी पार्क
अंतर - ०९ किलोमीटर
उंची - ७०५० फूट ते ११,७६२ फूट


       किन्नौर कैलास यात्रा सतलज नदीच्या उजव्या तीरावर ७०५० फूट उंचीवर असलेल्या तांगलिंग गावापासून सुरू होते. हे तांगलिंग गाव पार्वती कुंडापासून उगम पावणार्‍या एका लहान नदीच्या आणि सतलज नदीच्या संगमावर वसलेलं आहे. छोटेखानी आणि टुमदार असलेल्या या गावात फक्त १०० घरं आहेत. गावात स्थानिक नागदेवतेचं छोटेखानी सुंदर मंदीर आहे. यात्राकाळात या गावातील बरीच मंडळी आपल्या घरात यात्रेकरूंची अल्पदरात निवास-भोजनाची व्यवस्था करतात. यात्राकाळात राष्टीय महामार्गावर लंघर सुद्धा लागलेले असतात तिथंसुद्धा निवास-भोजनाची मोफत व्यवस्था होऊ शकते.

        तांगलिंग गावातून यात्रा सुरू केल्यावर आपण एका पक्क्या वाटेने सुमारे २.५ किमी पुढे एका लहान ओढ्यापर्यंत जातो. वाटेत सुंदर लाकडी घरं, भाजीपाल्याची शेतं आणि सफरचंदांच्या बागा आहेत त्यामुळं ते सर्व बघत आपण तासाभरात ओढ्यावर असलेल्या लाकडी पुलावर पोहोचतो. हा गोड्या पाण्याचा प्रवाह थेट किन्नौर कैलास पर्वतरांगातून येतो. लाकडी पुलावरून ओढा ओलांडल्यावर तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटा धाबा लागला. तिथं गरमागरम आलूपराठ्याच्या नास्त्याची छान सोय होते. 



       धाब्यापासून आमच्या खर्‍या चढाईला सुरूवात होणार होती त्यामुळं आम्ही इथं थोडी विश्रांती घेतली आणि बर्फाच्छादीत पर्वतांचं सौंदर्य अनुभवलं. या ठिकाणी आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या कारण पुढं गणेश/आशिकी पार्कपर्यंत आम्हाला पाणी मिळणार नव्हतं. इथून पुढची गणेश/आशिकी पार्कपर्यंत ६-७ किलोमीटर चाल असलेली तीव्र चढाईची वाट कैलास धारेवरून आहे. किन्नौर कैलास शिखरावर जाणार्‍या चढाईच्या या मार्गाला कैलास धार म्हणून ओळखलं जातं. कैलास धार जिथून सुरू होते त्या छोट्या ओढ्यापासून गणेश/आशिकी पार्कपर्यंतच्या वाटेवर दोन प्रसिद्ध थांबे आहेत. त्यांना बडा पत्थर (८४१५ फूट) आणि बडा पेड असं म्हणतात. ओढ्यापासून देवदाराच्या दाट जंगलातून जाणार्‍या २.५ किलोमीटरच्या या वाटेने बडा पत्थरपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ०२ तास लागले.

       बडा पत्थर हे ठिकाण एका विशाल खडकासाठी प्रसिद्ध आहे ज्यावर प्रवासी विश्रांती घेतात. हा विशाल खडक दाट देवदाराच्या झाडांमध्ये वसलेला आहे आणि तो अत्यंत सुंदर दिसतो. इथून खाली पाहिल्यास खाली वसलेल्या गावांचं मनमोहक दृश्य आपल्याला दिसतं. आज आम्हाला फक्त गणेश/आशिकी पार्कपर्यंत जायचं असल्यामुळं आम्ही इथं भरपूर वेळ घालवला. बडा पत्थरपासून २.५ किमी पुढं ९६९५ फूट उंचीवर बडा पेड आहे. इथं देवदारच्या मोठ्या झाडांची रांग संपते आणि पुढं गणेश/आशिकी पार्कपर्यंत फक्त झुडुपं आणि औषधी वनस्पती दिसून येतात.

       बुग्याल म्हणजे गवताळ प्रदेश ओलांडल्यानंतर आम्ही गणेश/आशिकी पार्कला पोहोचलो. वाटेत आम्हाला जंगली छोट्या स्ट्रॉबेरी खायला मिळाल्या. गणेश/आशिकी पार्क ११,७७८ फूट उंचीवर आहे. हे एक मोठे बुग्याल आहे. हिरव्यागार मखमली गवत असलेल्या भल्यामोठ्या पठाराला हिमाचली भाषेत 'बुग्याल' असं म्हणतात. भलंमोठं पठार असल्यामुळं साहजिकच इथं मोठ्या प्रमाणावर मुक्कामाची सोय होते. पाण्याचा स्रोत सुद्धा अगदी जवळ आहे. यात्राकाळात इथं यात्रा समितीतर्फे लंघर तर प्रशासनातर्फे वैद्यकिय छावणीची सुविधा दिली जाते. त्याव्यतिरिक्त खाजगी तंबूसुद्धा अल्पदरात उपलब्ध असतात. प्रत्येकाने स्वतःसाठी ओढ्यातून पाईप टाकून पाण्याची सोय केलेली दिसली. इथंच आय. टी. बी. पी. ची दुसरी चौकी आहे जिथं आपल्याला पोहोचल्यावर पुन्हा एकदा नोंदणी करावी लागते. नोंदणी करून आम्ही ठाकूरसिंगच्या तंबूत पाठपिशव्या टाकल्या आणि दुसर्‍या दिवशीच्या वाटेवर हाईट गेन करण्यासाठी गेलो. मुळातच गणेश/आशिकी पार्क बर्‍याच उंचीवर असल्यामुळं इथून आजूबाजुचं सौदर्य पाहण्यात आपला बराच वेळ मोडतो. आम्हीसुद्धा इथून किन्नौर कैलास पर्वतरांगा आणि त्यापलीकडच्या कल्पा, रिकाँगपियो वगैरे पाहण्यात बराच वेळ घालवला. रात्री जेवण झाल्यावर समोर दिसणारं दृश्य तर खरोखरच अफलातून होतं. इथून आम्हाला कल्पा आणि रिकाँगपियो शहराचे दिवे दिसत होते तर चंद्रप्रकाशात उद्याचं आमचं लक्ष म्हणजे कैलास शिखर स्पष्ट दिसत होतं. तांगलिंग गावापासून गणेश/आशिकी पार्कचं अंतर ०९ किलोमीटर आहे. ही चढाई पूर्ण करण्यासाठी साधारणपणे ०५ ते ०६ तास लागू शकतात.


 



🚩 दिवस दुसरा - 

गणेश/आशिकी पार्क ते किन्नौर कैलास ते गणेश/आशिकी पार्क
अंतर - १४ किलोमीटर
उंची - ११७६२ फूट ते १५७४८ फूट ते ११७६२ फूट


       आज आम्हाला शिवलिंगाचं दर्शन घेऊन पुन्हा गणेश/आशिकी पार्कला मुक्कामाला यायचं होतं. आजची एकूण चाल १४ किलोमीटरची असल्यामुळं भल्या पहाटे तीन वाजता विजेरीच्या उजेडात चढाईला सुरूवात करावी लागणार होती. शिवाय आज कैलास दर्शन करून येईपर्यंत आम्हाला वाटेत खाण्यापिण्याची कुठेच सोय होणार नव्हती त्यातून पहाटे लवकर निघायचं असल्यामुळं ठाकूरसिंगनी भल्या पहाटेच उठून आम्हाला आलूपराठ्याची शिदोरी बांधून दिली होती. तंबूतून बाहेर पडल्यावर गणेश/आशिकी पार्कपासून पुढच्या भीमद्वार/गणेश गुहेपर्यंतच्या आडव्या चालीत जनरेटर लावून ओळीने दिव्यांची सोय केलेली दिसली. गणेश/आशिकी पार्कहून किन्नौर कैलासला जाणाऱ्या वाटेवर दोन महत्त्वाचे थांबे आहेत. पहिला भीमद्वार/गणेश गुहा आणि दुसरा पार्वती कुंड. गणेश/आशिकी पार्क ते किन्नौर कैलासमधील अंतर १४ किलोमीटर आहे आणि यात्रेकरूंच्या तंदुरुस्तीनुसार यासाठी ०९ ते १२ तास लागू शकतात.

 
       गणेश/आशिकी पार्कपासून भीमद्वार/गणेश गुहेपर्यंतचा पहिला टप्पा चांगल्याच तीव्र चढाईचा होता. या तीव्र चढाईसाठी आम्हाला तब्बल दीड तास लागला. इथून पुढं मात्र भीमद्वार/गणेश गुहेपर्यंत थोडी सपाटी आणि उतार होता. या वाटेत आम्हाला एक ओढा ओलांडायचा होता जो बहुतेक वेळा गोठलेला असतो पण आम्हाला मात्र तो गोठलेला दिसला नाही. या ओढ्यातून आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या कारण पुढच्या पार्वती कुंडापर्यंत आता आम्हाला पाणी मिळणार नव्हतं.
 

       ओढा ओलांडल्यानंतर सर्वप्रथम आम्ही भीमद्वार/गणेश गुहा इथं थांबलो. हे ठिकाण १२,४०० फूट उंचीवर आहे. या ठिकाणी आय. टी. बी. पी. ची तिसरी चौकी आहे जिथं आपल्याला पोहोचल्यावर पुन्हा एकदा नोंदणी करावी लागते. किन्नौर कैलास भारत-चीन सीमेलगत असल्यामुळं इथून पुढं गेलेली प्रत्येक व्यक्ती पुन्हा परत यायलाच हवी यावर विशेष लक्ष दिलं जातं त्यासाठी या ठिकाणी बचाव दलाची एक तुकडी कायम तैनात असते. दुपारी तीन वाजल्यानंतर दररोज ही तुकडी कैलास शिखरापर्यंत जाऊन वाटेत अडकलेल्या यात्रेकरूंना परत भीमद्वार/गणेश गुहेपाशी घेऊन येते. ही बचाव तुकडी भीमद्वार/गणेश गुहेपाशी असलेल्या चौकीशी आणि गणेश/आशिकी पार्क इथं असलेल्या चौकीशी वॉकीटॉकीवर कायम संपर्कात असते. भीमद्वार/गणेश गुहेपासून सकाळी १० वाजल्यानंतर कुणालाही पुढं दर्शनासाठी सोडलं जात नाही. 


 
       भीमद्वार/गणेश गुहेपाशी नोंदणी करून आम्ही तीव्र चढाईला सुरूवात केली. किन्नौर कैलासच्या वाटेवर आमचा पुढचा थांबा पार्वती कुंड होता, जो किन्नौर कैलास शिखराच्या पायथ्याशी असलेला एक हिमनदी तलाव आहे. या वाटेवरचा पहिला टप्पा १.५ किलोमीटर खडकाळ चढाईचा होता आणि पुढचा पार्वती कुंडापर्यंतचा १.५ किलोमीटर टप्पा दगड आणि बर्फाने झाकलेला होता. या टप्प्यासाठी आम्हाला जवळजवळ २.५ ते ३ तास लागले. भीमद्वार/गणेश गुहेपासून पार्वती कुंडाकडे जाताना आम्हाला दगडांवर पांढर्‍या रंगाने केलेल्या खुणांच्या मदतीने मार्ग शोधावा लागला आणि खडकांवरून चालताना खूपच काळजी घ्यावी लागली.


 
       पार्वती कुंड हे सुमारे ९८४३ फूट उंचीवरच्या एका लहान हिमनदीत असलेला तलाव आहे. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा ते बर्‍यापैकी गोठलेलं होतं. किन्नौर कैलासाची यात्रा सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी बरेच लोक इथं पूजा करतात. आत्तापर्यंत केलेल्या अत्यंत अवघड चढाईमुळं आमच्या सोबत असलेली काही मंडळी इथूनच मागं फिरणार होती. एकूणच बरेच यात्रेकरू इथूनच मागं फिरतात कारण इथून पुढची चढाई अतिशय अवघड आहे. 


       पार्वती कुंडापासून किन्नौर कैलास शिळेपर्यंत पाण्याचा कोणताही स्रोत नाही त्यामुळं आम्हाला इथून शिखरावर आणि परत पार्वती कुंडापर्यंत पुरेसे पाणी सोबत बाळगावं लागणार होतं. पार्वती कुंडात केलेल्या पुजेमुळं तिथलं पाणी पिण्याच्या लायकीचं राहिलेलं नव्हतं. आम्ही भीमद्वार/गणेश गुहेपाशी पाण्याचा पुरेसा साठा केल्यामुळं आम्हाला इथं पाणी भरून घ्यायची गरज भासली नाही. पार्वती कुंडापासून किन्नौर कैलास शिळेपर्यंत आता आमच्या यात्रेचा शेवटचा टप्पा शिल्लक राहिला होता त्यासाठी शारिरीक आणि मानसिक ताकदीची आवश्यकता होती. पार्वती कुंडापासून किन्नौर कैलास शिखरापर्यंत सुमारे २.५० किलोमीटरची तीव्र चढाई होती ज्यासाठी आम्हाला ३ ते ४ तास लागले.

       पार्वती कुंड ते किन्नौर कैलासपर्यंतची वाट हिमनद्यांनी भरलेली होती आणि चढाई करताना जास्त काळजी घ्यावी लागत होती. बेसिक कोर्समध्ये बोल्डरींग म्हणून जो प्रकार शिकवला जातो तो या ०२.५० किलोमीटरमध्ये पूर्णपणे करावा लागतो. सह्याद्रीत केलेल्या नाळवाटांच्या चढाईचा उपयोग या ठिकाणी मात्र पुरेपुर झाला. ही वाट तारामती घळीची सारखी सारखी आठवण करून देत होती. शिखरावर जाताना आम्हाला काही लहान दगडी बोगदे, गुहा ओलांडाव्या लागल्या. पार्वती कुंडापासून किन्नौर कैलासपर्यंत जाण्याचा मार्ग एकच आहे जो दगडांवर केलेल्या पांढर्‍या रंगाच्या खुणांमुळं चटकन ओळखता येतो.



       किन्नौर कैलास शिवलिंग ही एक पवित्र शिळा आहे ज्याची पूजा भगवान शिवाचे लिंग म्हणून केली जाते. वातावरण साफ असेल तर ७९ फूट उंच आणि ३० ते ४० फूट रुंद असलेली ही शिळा रिकाँगपियो इथूनही स्पष्ट दिसते. हे ठिकाण भगवान शिवाचं एक पवित्र स्थान आहे आणि इथं आपण त्याचं तेज अनुभवू शकतो. आम्ही सोबत आणलेलं पुजेचं साहित्य काढून आम्ही शिवलिंगाची पुजा केली आणि शंकराची आरती पण म्हटली. माउंट जोरकंदन आणि माउंट रंग्रिक दिसणारं हे ठिकाण खरंतर इतकं मनमोहक होतं की इथून पायच निघत नव्हता पण भीमद्वार/गणेश गुहेपाशी केल्रेली काळजीयुक्त सूचना पक्की आठवत होती. शेवटी सदसद्विवेकबुद्धी वापरून त्या स्थळाच्या आकर्षणाची जागा कर्तव्यानं घेतली आणि आम्ही परतीचा मार्ग पकडला. ज्या मार्गानं गेलो होतो त्याच मार्गानं आम्हाला परतायचं होतं. कैलासाच्या जागेचं गारूड मनावर इतकं बिंबलं होतं की परतीच्या प्रवासात फारसं कुणी कुणाशीच बोलत नव्हतं.




       गेल्या पावली गणेश/आशिकी पार्क इथं परतलो. रात्री जेवण करून मुक्काम केला. आता तिसर्‍या दिवशी आम्हाला पुन्हा तांगलिंग गाठायचं होतं. चांगली चालणारी मंडळी असतील तर रात्री उशीराही तांगलिंगला परतता येतं. यात्रेत आय. टी. बी. पी., वैद्यकिय पथक, वनविभाग आणि बचाव दल करत असलेल्या कामाचं खरंच करावं तेवढं कौतूक कमीच आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही तिथल्या ऑफिसर्सचा सत्कार केला. परतफेड म्हणून त्यांनीही त्यांच्या प्रथेनुसार माझा सत्कार केला.
 


 


🚩 प्रकार दुसरा -

🚩 किन्नौर कैलास परिक्रमा - ठंगी - लांबर - शूर्टिंग - चारंग - लालंती ते चिटकुल परिक्रमा -

       किन्नौर कैलास परिक्रमेचा मार्ग बर्‍याच ठिकाणी रस्ता होऊनही उरलेला अतिशय खडतर असाच आहे. या परिक्रमेला साधारण पाच दिवस लागतात.

🚩 दिवस पहिला -

कल्पा - पोवारी - रिब्बा - मोरंग - ठंगी ते लांबर
अंतर - ६० किलोमीटर रस्ता
उंची - ९४८१ फूट


       कल्पा ते ठंगीपर्यंत चांगला तर पुढं लांबरपर्यंत आता कच्चा गाडीरस्ता झाला आहे. सकाळी गाडीने निघून लांबरपर्यंत पोहोचता येतं. लांबर गाव हे एका खोल दरीच्या काठावर वसलेलं एक सुंदर ठिकाण आहे. जुनं गाव नव्या गावाच्या आणखी उंचीवर वसलेलं आहे. रात्री मुक्कामी पोहोचल्यावर उर्वरित दिवस आरामात हवामानाशी जुळवून घेण्यात घालवता येतो.

🚩 दिवस दुसरा -

लांबर ते शूर्टिंग
अंतर - ०८ किलोमीटर चाल
उंची - १०३३४ फूट


       किन्नौर कैलास परिक्रमेच्या दुसर्‍या दिवशी आपण सकाळी नाश्ता केल्यानंतर लांबर इथून शूर्टिंगकडे प्रवास सुरू करावा लागतो. हा मार्ग एका लहान नदीच्या काठाने एका उंचीवर चढतो. पुढं मात्र हा एक समांतर चालण्याचा मार्ग आहे. शर्टिंग हा एक लहान उंच प्रदेश आहे आणि तिथं दोन नद्या येऊन लांबर नदी तयार होते. १०३३४ फूट उंचीवर एक आयटीबीपी चौकी आहे जिथं तुम्हाला उंचीवर यात्रा करताना घ्यायच्या काळजीबद्दल माहिती दिली जाते.

🚩 दिवस तिसरा -

शूर्टिंग ते चारंग
अंतर - ०६ किलोमीटर चाल
उंची - ११३१८ फूट


       शूर्टिंग ते चारंग हे ३ ते ४ तासांचं समांतर चालणं आहे. चारंग हे ११ व्या शतकातील रंग्रिक तुंगमा कॉम्प्लेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मठासाठी प्रसिद्ध आहे. योग्य विश्रांती आणि हवामानाशी जुळवून घेत इथं विश्रांती घ्यावी.

🚩 दिवस चौथा -

चारंग ते लालंती बेस
अंतर - ०८ किलोमीटर चाल
उंची - १४५०१ फूट


       या दिवशी सकाळी चारंग व्हॅलीमध्ये चढाई करावी लागते आणि यासाठी सुमारे ६ ते ७ तासांत ८ किमी अंतर कापावे लागते. लालंती बेस इथं हजारो फुले उमललेली सुंदर कुरणं आहेत. हे उघड्या निळ्या आकाशाखाली फुलांचे एक विस्तीर्ण, पिवळे आणि लाल गालीचे अंथरल्यासारखं दिसतं. अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे.  लालंती बेस इथल्या नदीकाठावर कॅम्पिंग करता येतं.

🚩 दिवस पाचवा -

लालंती बेस ते चिटकुल
अंतर - ३० किलोमीटर चाल
उंची - १७१९८ फूट


       हा ट्रेकमधील सर्वात आव्हानात्मक दिवस म्हणता येईल. आजच्या दिवसभरात सुमारे ३० किमी चालणं आहे ज्याला किमान १२ ते १४ तास लागतात. त्यासाठी पहाटे ४ वाजता चालायला सुरुवात करावी लागते. लालंती खिंड किंवा चारंग खिंडीची १७१९८ फूटांवरची चढाई कठीण प्रकारची आहे. एकूण परिक्रमेत हाच टप्पा अतिशय खडतर असा आहे. खिंडीतील चढाई आणि खिंडीतून उतराई करण्यासाठी बराच वेळ लागतो. दिवसभर चालल्यानंतर परिक्रमा चिटकुल या सुंदर गावात संपते.
 

🚩 कधी जाल?

       किन्नौर कैलास यात्रा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मे ते ऑक्टोबर अशी मानली जाते. पावसाळ्यात यात्रा मात्र चुकूनही करू नये. ही यात्रा पावसाळ्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देखील करता येते. हिवाळ्यात सर्वत्र बर्फवृष्टी होते आणि संपूर्ण मार्ग बंद होतो. उन्हाळा हा किन्नौर कैलास यात्रा करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

🚩 यात्रा आयोजन -

       वातावरणाची परिस्थिती पाहून यात्रा कमिटी आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे अधिकृत यात्रेचा कार्यकाळ ठरवते. त्यानूसार सर्व स्थानिक वृत्तपत्रात आणि रिकाँगपियो इथं असणाऱ्या किन्नौर जिल्हा प्रशासनाच्या https://hpkinnaur.nic.in/event/kinnaur-kailash-yatra-2025/ या अधिकृत वेबसाईटवर तो कार्यकाळ सांगितला जातो आणि त्यानूसार नोंदणी प्रक्रियेसाठी धागा उपलब्ध करून दिला जातो. साधारण दिड महिन्याच्या यात्राकाळात दरदिवशी ऑनलाईन नोंदणी केलेल्या १७५ यात्रेकरूंना तर तांगलिंग या ठिकाणी येऊन नोंदणी करणार्‍या १२५ यात्रेकरूंना प्रवेश दिला जातो. याशिवाय किन्नौर टुरिझम असोसिएशनच्या ५० यात्रेकरूंना प्रवेश दिला जातो. वयवर्षे १२ ते ६० दरम्यानच्या यात्रेकरूंनाच ही अधिकृत यात्रा करता येते. वयवर्षे ६० ते ७० दरम्यानच्या यात्रेकरूंना सुद्धा ही यात्रा करता येते पण त्यांना त्यासाठी किन्नौरच्या Primary Health Centre म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. मात्र १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुणालाच ही यात्रा करण्याची परवानगी मिळत नाही. अधिकृत यात्रेच्या कार्यकाळाव्यतिरिक्त इतर काळात कुणालाही ही यात्रा करता येते मात्र ती स्वतःच्या जबाबदारीवरच करावी लागते. अधिकृत नोंदणी करून यात्रा करणार्‍या यात्रेकरूंना खाली दिलेलं Self Declaration द्यावं लागतं.

I understand this Yatra is risky and I am responsible for my safety.
I am medically fit for the Yatra.
I will follow all rules and instructions.
I won’t hold organizers responsible for any issue.
I am participating voluntarily and at my own risk.
I will protect the environment and respect fellow pilgrims.

 I agree to the above terms.

       नोंदणी फॉर्ममध्ये यात्रा तपशील आणि यात्री तपशील भरावा लागतो.

Yatra Details

Route of Yatra -
Date of Yatra -

Yatri Details

Yatri's Name -
Father/Husband's Name -
Gender -
Date Of Birth -
Mobile No -
Emergency Mobile No -
E-Mail -
Address -
District -
State -
Blood Group -

खाली असं Self Declaration द्यावं लागतं.
I agree that all the information provided above is correct.

 
🚩 जवळची पाहण्याची ठिकाणं -

       ही यात्रा करण्यासाठी येताना काही दिवस जादाचे काढून आल्यास जवळपासची बरीच ठिकाणं पाहता येतात. यात युला कांडा, चिटकुल, सिमला, स्पिती व्हॅली वगैरे पाहता येतं.  चंदिगडहून या यात्रेला जोडूनच स्पिती, अटल टनेल करून मनालीमार्गे पुन्हा चंदिगड अशी सहल सुद्धा करता येते. हाताशी काही दिवस असतील आणि यात्राच करायची असेल तर किन्नौर कैलासला जोडून श्रीखंड महादेवची यात्रा सुद्धा करता येईल. अर्थात इथंसुद्धा उपलब्ध वेळेनुसार प्रत्येकजण आपला स्वतःचा कार्यक्रम ठरवू शकतो.

॥ ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॥


जटा विभूती उटि चंदनाची।
कपालमाला प्रित गौतमीची॥
पंचानना विश्वनिवांतकारी।
तुजवीण शंभो मज कोण तारी॥


🚩 फोटो सौजन्य -
१) गुगल
२) टिम फाल्कन

लेखनसीमा ॥ लोभ असावा ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा