बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

"भूगोल पदरगडापासून कोथळीगडापर्यंतच्या घाटवाटांचा"

 "भूगोल पदरगडापासून कोथळीगडापर्यंतच्या घाटवाटांचा"

       पदरगड आणि कोथळीगड हे दोन्ही किल्ले मुख्य रांगेच्या थोडे खाली एकसंध जोडलेल्या पदरात वसलेले आहेत. हा जो एकसंध पदर आहे तो दोन सरळसोट नाळा घाटमाथ्यापासून थेट कोकणात उतरल्यामुळं फक्त दोन ठिकाणी तुटला आहे. या नाळा म्हणजे उत्तरेकडील आंबेनळी तर दक्षिणेकडे असलेली वाजंत्री. यापैकी आंबेनळी नाळेतून घाटमाथ्यावरून थेट कोकणात उतरता येतं तर वाजंत्री नाळेला पदरापासून वरच्या भागात सरळसोट कडे असल्यामुळं फक्त पदरापासून खाली कोकणातल्या सरईवाडीत उतरता येतं. वाजंत्री नाळेपासून आंबेनळीपर्यंतच्या पदराला रानमळा म्हणतात तर दक्षिणेकडे नाखिंदा घाटवाटेपर्यंतच्या पदराला रामखंड. या रामखंडाचेही रामखंड एक आणि रामखंड दोन असे दोन भाग आहेत.

       या भागात घाटमाथ्यावरून रामखंडात पडणारा 'रडतोंडी' आणि पुढे रामखंडातून कोकणात पडणारा 'दैत्यासूर' असे दोन मोठे आणि सुंदर धबधबे आहेत.

       पदरगड आणि कोथळीगड या दोन किल्ल्यादरम्यान खालच्या, वरच्या अशा सगळ्या मिळून तब्बल पंधरा वाटा आहेत. कोकणातल्या रहाळातलं मुख्य गाव आहे जाम्रूग. या जाम्रूगला ठोंबरवाडी, डुक्करपाडा, सोलनपाडा, सरईवाडी, कामतपाडा, हिरेवाडी अशा सहा वाड्या आहेत. या वाड्यांमधली मंडळी त्यांच्या सोयीच्या वाटांनी प्रथम रानमळा किंवा रामखंडात येऊन मग घाटमाथ्यावर त्यांना भीमाशंकर, कमळजाई, खेतोबा, भोरगिरी, येळवली, वांद्रे वगैरे ज्या भागात जायचं आहे त्यानुसार त्यांना सोईस्कर अशा एक किंवा दोन वाटा निवडतात. त्यामुळं या भागातल्या बहुतेक घाटवाटा दोन टप्प्यात आहेत असंच म्हणावं लागेल. याशिवाय घाटमाथ्यावरची मंडळी शिकारीसाठी पदरापर्यंत उतरत असल्यामुळं पदरापर्यंतच्या आणि पदरावरच्या वाटाही बऱ्यापैकी मळलेल्या आहेत. हा संपूर्ण पदर दाट झाडीने व्यापलेला असल्यामुळं ऐन उन्हाळ्यातही या पदरातली भटकंती सुखावह ठरते.

       खाली दिलेल्या या त्या वाटा आहेत ज्यावरून तिथल्या मंडळींची कामानिमित्त बऱ्यापैकी वाहतूक चालते. यातील काही वाटा जनावरे जाऊ शकतील एवढया सोप्या आहेत तर काही फक्त माणसांनी वापरायच्या आहेत. या वाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे असा दिलेला आहे.

१) पेढा (वरची)

२) पावल्या (खालची)

३) आंबेनळी (पूर्ण)

४) पायदरा (खालची फक्त उन्हाळी वाट)

५) तांबडीची वाट (खालची)

६) निसणी (खालची)

७) खेतोबा (वरची)

८) वाजंत्री (खालची)

९) अंधारी (वरची)

१०) घोघोळ (खालची)

११) नाखिंदा (वरची)

१२) कौल्याची धार (वरची)

१३) पाऊलखा (खालची)

१४) किल्ल्याची वाट (खालची)

१५) आंबिवलीची वाट (खालची)

       या फोटोत पदरगडाच्या मागे पुसटसा सिद्धगडही दिसतोय मात्र हाडाच्या ट्रेकरलाच तो ओळखू येईल.

       पदरगडाच्या पदराची सोंड तुंगी करत कोकणातल्या पाथरजच्या डोंगरपाड्यापर्यंत गेलेली आहे. या टोकावरच्या डोंगरपाड्यातून निसणीची वाट जशी पदरावरच्या तुंगीत चढून येते तशाच सोंडेच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडूनही काही वाटा पदरावर चढून येतात. लेखाचा विषय पदरगड ते कोथळीगडादरम्यानच्या वाटा असल्यामुळं या वाटांचा उल्लेख मुद्दामच इथे केलेला नाही.

       मी स्वतः ज्या वाटांचे ट्रेक केले आहेत तेवढयाच वाटा या लेखात दिलेल्या आहेत. या वाटांव्यतिरिक्त अजूनही काही वाटा या परिसरात नक्कीच असू शकतात. त्यामुळं अस्सल भटकी मंडळी वर दिलेल्या माहितीत आणखी भर नक्कीच घालू शकतील. या लेखात जसं पदरगड ते कोथळीगडादरम्याच्या वाटा दिल्यात तशाच उत्तरेच्या पदरगड ते सिध्दगड किंवा तुंगी ते सिध्दगड आणि दक्षिणेच्या कोथळीगड ते ढाक किल्ल्यापर्यंतच्या वाटाही देता येतील. बहुत काय लिहीणें. अगत्य असू द्यावे.

'मर्यादेयं विराजते.'

🚩 फोटो सौजन्य -  डॉ. मनीष माळी

🚩 लेखात उल्लेखलेल्या धबधब्यांच्या नावाची माहिती योगेश अहिरे यांच्याकडून साभार.

🚩 नकाशात दाखवलेल्या पायरी आणि अंधारीच्या वाटेच्या मार्कींगची माहिती निनाद बारटक्के यांच्याकडून साभार.




बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

"ट्रेक सांधणदरी करवलीघाट आणि अपरिचित चिकणदऱ्याचा"

 "ट्रेक सांधणदरी करवलीघाट आणि अपरिचित चिकणदऱ्याचा"


       आपण एखाद्या डोंगरयात्रेची जशी योजना ठरवतो, प्रत्येकवेळी अगदी तशीच्यातशी ती पूर्ण होतेच असं काही नाही. खरं सांगायचं तर बर्‍याच वेळेला त्यात काहीतरी विघ्नेच येतात. पण मग अशा अचानक उद्भवलेल्या अवघड परिस्थितीत त्यातुन मार्ग काढणार नाहीत ते ट्रेकर कसले? आमच्या डिसेंबरमधे ठरवलेल्या ट्रेकचंही अगदी असंच झालं होतं. नोव्हेंबरमधे बागलाण मोहिम झाल्यानंतर डिसेंबरमधे रग्गड चालणं असलेला दोन किल्ले आणि तीन घाटवाटांचा 'रायरेश्वर ते प्रतापगड' असा जंबो ट्रेक काही कारणांमुळं रद्द करावा लागणार होता. या ट्रेकसाठी चार दिवस घराबाहेर राहणं काही घरगुती अडचणींमुळं शक्य होणार नव्हतं. पण मग शनिवार-रविवार असं दोन दिवसांत काही 'हटके' करता येईल काय याबाबतीत आम्हा ट्रेकदोस्तांमधे चर्चा सुरू होती.
       सहसा कुणी जात नाही अशा ठिकाणी जाण्याचा किंवा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा आमचा म्हणजे "फाल्कन ट्रेकर्स"चा पहिला प्रयत्न असतो. तशी ही सुरवात झाली ती हरिहरच्या ट्रेकपासून. तोपर्यंत बहुतेक सगळेजण ट्रेकींग करत होतेच, पण ते आपापले आणि कमी-अधिक प्रमाणात. पण या हरिहरनंतर मात्र हळूहळू ग्रुप जमत गेला. नंतरच्या ट्रेक्समधे जसजसा एकमेकांच्या चालण्याचा, स्वभावाचा अंदाज येत गेला तसतसा आमच्या अवघड ट्रेक्सचा आलेखही उंचावत गेला आणि आम्हाला ट्रेक दरम्यान सुरक्षा साधनांची गरज भासू लागली. आत्तापर्यंतचे सगळे ट्रेक्स आम्ही जेवढा खर्च होईल फक्त तेवढीच वर्गणी काढून केले होते त्यामुळे निदान तोपर्यंत तरी असे पैसे जमवून साधनखरेदीचा प्रश्न आला नव्हता. पण नंतरच्या ट्रेक्समधे अधुनमधुन जशी गरज लागेल तशी थोडी जास्त वर्गणी काढून त्यातून हळूहळू साधनसामुग्रीची खरेदी करु लागलो. सुट्टीच्या दिवशी मुद्दाम ही साधनं हाताळण्याचा, रॅपलिंग करण्याचा सराव देखील करत होतो. आत्तापर्यंत अशा सरावांच्या रंगीत तालमी भरपूर करुन झाल्या होत्या पण मुख्य प्रयोग करणं काही केल्या जमलेलं नव्हतं. पण मग आपण आत्तापर्यंत जी सुरक्षा साधनं जमवली आहेत ती सगळी साधनं वापरुन या दोन दिवसात 'वेगळं' काही करता येईल काय असं आमच्या चर्चेनं थोडं वळण घेतलं. कुणाच्या मदतीशिवाय असा ट्रेक केल्यानं प्रत्येकाचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार होता. त्यासाठी एकएक दिवसाचे दोन छोटे ट्रेक एकत्र करुन दोन दिवसांचा ट्रेक करण्यावर सर्वानुमते ठरलं. मग त्यादृष्टीनं आम्ही आमच्या बेसकँपचं ठिकाणही ठरवलं होतं ते म्हणजे 'साम्रद'. त्याला जोडून दोन ट्रेक्सही ठरले ते म्हणजे पहिल्या दिवशी सांधणदरी उतरायची आणि करवली घाट चढून मुक्कामाला परत साम्रदला यायचं तर दुसर्‍या दिवशी मागच्यावेळी पूर्ण न करता आलेली चिकणदर्‍याची वाट रतनगडावरुन रॅपलिंग करायची होती.

       ज्यावेळी हा प्लॅन नक्की झाला आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला त्यावेळी लगेचच ग्रुपवरच्या विनीत दातेने सांधणदरीत रॅपलिंग करण्यासाठी साम्रदवाल्यांच्या मक्तेदारीबद्दल आधीच कल्पना देऊन ठेवलेली होती. त्यामुळं साम्रदची मंडळी त्यांचे ग्रुप्स घेऊन रॅपलिंगच्या पॅचपर्यंत पोहचण्यापुर्वी आम्हाला त्या जागी पोहोचून निदान रॅपलिंगचं फॉर्मेशन तरी करणं भाग होतं. म्हणून शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे लवकर जेवण केलं. नेहमीप्रमाणे सगळे जमल्यावर गाडीची पुजा केली आणि निघालो.

        पुढे नारायणगावात ज्यावेळी दुध प्यायला थांबलो त्यावेळी मधल्या शॉर्टकटच्या वाटेने साम्रदला जायचं असल्याबद्दल सगळ्यांना कल्पना दिली. त्यासाठी चिंचवडहून नारायणगाव, ओझर, ओतुर, ब्राम्हणवाडा, कोतुळ, राजुर, शेंडी, घाटघर आणि साम्रद असा मार्ग निवडला होता. तो रस्ता एकेरी असूनही बर्‍यापैकी चांगला तसाच निर्धोकही होता.
       सकाळी साम्रदला पोहोचलो त्यावेळी अजून तिथलं 'पर्यटक महामंडळ' जागं व्हायचं होतं. फार वेळ न दवडता सकाळची नित्यकर्म आवरली आणि चहा-बिस्कीटांचा सुपरफास्ट नाश्ता करून ट्रेकला सुरूवात केली

       अजून उजाडायचं होतं तोपर्यंतच निघून सांधणदरीत पोहोचलो. डिसेंबर महीना असल्यामुळं थंडी तर मी म्हणत होती. त्यात छातीएवढ्या पाण्यातून एवढ्या भल्या पहाटे जायचं म्हणजे एक दिव्यच होतं, पण असे उद्योग ट्रेकिंग करताना वेगळीच मजा आणतात नाही का? पाणी पार केल्यावर अंगात थंडी भरण्याआधी कोरडे कपडे घातले. पुढे पॅचवर जाऊन पटकन रॅपलिंगचं फॉर्मेशन केलं तोपर्यंत साम्रदची मंडळी तिथे येऊन पोहोचली होती.




        मागून त्यांचा ग्रुप येईपर्यंत आमची अर्धीअधिक मंडळी उतरुन गेली होती त्यामुळं फार काही गोंधळ झाला नाही. सगळेजण खाली उतरल्यावर मग बाकी फारसं कुठेही न थांबता थेट खालच्या कुंडाजवळच जेवणासाठी पहिला ब्रेक घेतला.

        आदल्या रात्री चिंचवडहून निघाल्यापासून कुणाची विश्रांती अशी झालीच नव्हती. पुढचा करवली घाट चढायचा तर विश्रांती फार गरजेची होती त्यामुळं जेवण झाल्यावर थोडी हक्काची वामकुक्षी पण घेतली.


        अर्ध्या तासाने ताजेतवाने झाल्यावर निघालो तर वाटेत या जागी मुक्कामी असणार्‍या पाहुण्यांसाठी तंबु निवासाची आणि खास मांसाहारी जेवण तयार करण्याची लगबग सुरु असलेली दिसली. कुंडाजवळून समोरच 'बाण' सुळका दिसला. जानेवारी २००८ मध्ये ८१० फुटांचा अत्यंत कठीण श्रेणी असलेला हा सुळका आम्ही सर केला होता. त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी म्हणजे डिसेंबर २०१७ ला, याच सुळक्याच्या पायथ्यातुन नाळेच्या वाटेने रात्री आठ वाजता या कुंडाजवळ आम्ही पोहोचलो होतो. खरंतर इतक्या वर्षानंतरही या सगळ्या घटना अगदी काल घडल्यासारख्या मनात अजूनही ताज्या आहेत.

        हळूहळू उन्हाचा चटका जाणवू लागला होता. आता बाकी घाई करावी लागणार होती. करवली घाट अर्धा चढून आल्यावर वाटेतल्या ओढ्यात एक पाण्यासाठी छोटासा ब्रेक घेतला.

        घाटवाटेचा शेवटचा सोपा कातळटप्पा चढून साम्रदच्या पठारावर आलो आणि एका झाडाखाली सगळेजण येईपर्यंत थोडी विश्रांती घेतली.

       मोकळ्या मैदानात आल्यावर समोरच रतनगड आणि उद्या उतरायची चिकणदर्‍याची वाट स्पष्ट दिसत होती. सोबत्यांना दुसर्‍या दिवशी करायचा मार्ग दाखवला. माथ्यावरून एका बाजूला अलंग, मदन, कुलंग, किर्डा, साकिरा, कळसुबाई तर दुसर्‍या बाजूला पाबरगड, खुटा, रतनगड, चिकणदरा, कात्राबाई, करंडा, कळमंजाच्या दर्‍याची नाळ, गुयरीदार, आजोबा, सीतेचा पाळणा, कुईरानाचा किंवा भायखळ्याचा कडा वगैरे स्पष्ट दिसत होते. रतनगडाच्या पार्श्वभुमीवर काही फोटो काढले आणि लवकरच बेसकँपवर परतलो.



         हातपाय धुऊन ताजेतवाने झालो आणि रात्रीच्या जेवणाला वेळ असल्यामुळं गाण्याच्या भेंड्यांचा फड जमवला. जितेंद्र परदेशीने न विसरता घरून ढोलकी आणली होती, त्यात सोबतचा मिलींद गडदे कोकणी, म्हणजे पक्का तबलजी. मग काय विचारता, फड असा रंगला की बाजुला मुक्कामाला असलेला दुसर्‍या ट्रेकर्सचा गृपही आमच्यात सामील झाला. दुपारचं जेवण करवली घाट चढायचा असल्यानं पोटभरीचं असं केलं नव्हतं त्यामुळं बेसकँपवर आल्यावर थोड्याच वेळात आमच्या बल्लवाने गरमागरम मॅगी तयार केली. या मॅगीमुळं निदान रात्रीच्या जेवणापर्यंत थोडी तरी कळ काढता येणार होती. दुसरं असं की ट्रेकच्या नादात काल निघाल्यापासून घरच्यांशी बोलणं झालं नव्हतं. त्यांना खुशाली कळवणं खुप गरजेचं होतं त्यामुळं गावाच्या एका टोकाला असलेल्या उंचवट्यावरुन पाण्याची जी पाईपलाईन गेली होती, पार तिथं जावं लागलं. त्याच्या एका पिलरवर एका ठराविक अवस्थेत उभं राहिल्यावरच फोन लागत होता. एवढा सगळा द्रविडी प्राणायाम करुन घरी खुशाली कळवल्यावर बाकी सगळे निश्चिंत झाले होते.
       आमचा मुक्काम ज्याच्या घरी होता त्या दत्ता भांगरेला उद्या आम्ही रतनगडावर मदतीसाठी घेऊन जाणार होतो. मागे एकदा तो या चिकणदर्‍यातून उतरला होता त्यामुळं त्याच्या या अनूभवाचा आम्हाला फायदाच होणार होता. दुसरं असं की रॅपलिंगचं सगळी साधनसामग्री तो गडावरुन साम्रदला परस्पर घेऊन जाणार होता. त्यामुळं दुसर्‍या दिवशीच्या एकूण कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी चर्चा केली. गरजेच्या साधनसामग्रीची रात्रीच तयारी करुन ठेवली आणि जेवण करुन लवकर झोपी गेलो.

       गेल्या वर्षी अर्धवट राहीलेली ही चिकणदर्‍याची वाट त्या दिवसापासूनच आमच्या 'बकेट लिस्ट' मधे होती. कसं असतं ना की एखादी वाट किंवा किल्ला, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, काही केल्या नाही म्हणजे नाहीच होत. अगदी तसंच आमचं या वाटेबद्दल झालं होतं. गेलं वर्षभर आम्हाला तिकडं जाणंच जमलेलं नव्हतं. त्यामुळं जंबो ट्रेक रद्द होणं तसं पाहिलं तर आमच्या पथ्थ्यावरच पडलं होतं. आज आम्ही रतनगडावरुन चिकणदर्‍यात उतरुन परत साम्रदला येणार होतो. तसे चिकणदर्‍यात उतरल्यावर आज आमच्याकडे चार पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे चिकणदर्‍यातून सरळ कोकणातल्या डेहण्यात जायचं. दुसरा म्हणजे डेहण्यातच पण बाणच्या नाळेतुन जायचं. तिसरा म्हणजे कुईरानाचा किंवा भायखळ्याचा कडा नावाच्या सुळक्याच्या खिंडीतुन बाणच्या नाळेला ओलांडून परत घाट माथ्यावरच्या साम्रदला यायचं आणि शेवटचा पर्याय म्हणजे रतनगडाला त्याच्या पदरातून वळसा मारुन त्र्यंबक दरवाज्याच्या वाटेला लागायचं आणि पुढच्या मळलेल्या वाटेनं साम्रद गाठायचं. अर्थात पहिल्या तिनही वाटा आमच्या धुंडाळून झाल्यामुळं आम्ही चौथ्या पर्याय वापरुन साम्रद गाठायचं ठरवलं होतं. त्यातून ही वाट कमी अंतराची असल्यामुळं ट्रेक संपवून आम्ही लवकर घरीही पोहचू शकणार होतो.
       आज आम्हाला रतनगडाच्या कोकण दरवाज्यातून जवळजवळ दिडएकशे फुट रॅपलिंग करायचं होतं म्हणून उन्हं चढायच्या आत गडावर पोहोचायला हवं होतं. रॅपलिंगचं फॉर्मेशन करुन रॅपलिंग पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागेल याचा कुणालाच काहीच अंदाज नव्हता. मागल्यावेळी अर्धवट राहिलेली मोहिम परत याहीवेळी अर्धवट ठेवण्याची कुणाचीच इच्छा नव्हती. त्यासाठी पॅचवर आम्हाला जास्तीतजास्त वेळ मिळायला हवा होता. म्हणून सकाळी लवकर आवरुन अंधारातच बाहेर पडलो. साम्रदमधून निघाल्यापासून कुठेच न थांबल्यामुळं उजाडताउजाडता त्र्यंबक दरवाजाच्या पायर्‍यांशी पोहोचलो होतो. दोघेतिघे मागे राहिले म्हणून पायर्‍यांवर थांबून थोडी विश्रांती घेतली. काही वर्षापूर्वीच वनखात्याने या पायर्‍यांना रेलिंग लावलं आहे.


        त्र्यंबक दरवाजाच्या कातळकोरीव पायर्‍यांवर बसून फोटो काढले.

       दरवाज्यातुन गडावर पोहोचल्यावर समोरच घनचक्कर रांगेमागे सुर्योदय होत होता.

        रतनगड आधी बर्‍याचवेळेला पाहिलेला असल्यामुळं कुठेही न फिरता दरवाज्यापासून थेट नेढ्यात गेलो आणि पलिकडील टाक्यांपाशी उतरलो आणि गडाचा कोकण दरवाजा गाठला.



       दरवाज्यापासून खालच्या टप्प्यावर उतरण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या दिसत होत्या तरीपण सुरक्षेसाठी दरवाज्यात असलेल्या असलेल्या बिजागिर्‍यात दोर ओवला आणि त्याच्या आधाराने खालच्या टप्प्यावर उतरलो.

        खालच्या टप्प्यावरुन दरवाज्याच्या बाजूला असलेली तटबंदी सुरेख दिसत होती. या टप्प्यावरही बुरुजाचं थोडसं बांधकाम शिल्लक होतं. त्याच्या आणि उजव्या बाजूच्या खडकामधून खाली सातआठ फुटांचा एक टप्पा होता.


       या टप्प्यापासून पुढे मात्र बर्‍याच खालपर्यंत वळणावळणाची खोदीव पायर्‍यांची रांग दिसत होती. खरं म्हणजे या पायर्‍यांवरुन चालतही खालपर्यंत उतरता आलं असतं पण सगळ्या पायर्‍या अगदीच लहान होत्या. त्यांच्या बाजूच्या कातळाला सुरक्षा दोर बांधण्यासाठी प्रसरणात्मक खिळे ठोकणं वगैरे एकंदरीत वेळखाऊ काम होतं. त्यामुळं ते सगळं टाळून सरळ रॅपलिंग करुनच खाली उतरलो. रॅपलिंग करताना दुसर्‍या टप्प्यापासून पुढे मधेच असलेला एक आठदहा फुटांचा ओव्हरहँग सोडला तर थेट शेवटपर्यंत कातळकोरीव पायर्‍यांची रांग दिसत होती.



        पायर्‍यांच्या खालच्या बाजूला थोडं उजवीकडं कड्याखाली कोरडं असलेलं पाण्याचं खोदीव टाकं दिसलं.

       एकएक करत सगळेजण खाली उतरल्यावर वर उभ्या असलेल्या दत्ताला आवाज देऊन घरी जेवण बनवायला सांगितलं. गावात पोहोचेपर्यंत उशीर होणार होता म्हणून आमच्यासोबत आम्ही आणलेलं थोडंफार खाऊन घेतलं.


        आज सोबत असलेल्या जितेंद्र परदेशीचा वाढदिवस होता. त्याला कळू न देता बाकीच्यांनी त्याच्यासाठी रानफुलांचा बुके तयार करून त्याला दिला. त्याचा असा वाढदिवस साजरा केल्यावर त्यालाही थोडं गहीवरुन आलं. खरंच ज्यावेळी गड नांदता असेल त्यानंतर क्वचितच त्या ठिकाणी कुणी तिथं गेलं असावं. अशा सह्याद्रीतल्या अनवट ठिकाणी वाढदिवस साजरा होणं म्हणजे भाग्यच.


       गेल्यावर्षी आम्ही डेहण्यातून ज्या वाटेने चढून आलो होतो त्यापेक्षा यावेळी पूर्णपणे वेगळ्या वाटेने जाणार होतो. आत्ता आम्ही नेमक्या त्या सांध्यात होतो जिथून बाणची नाळ सुरु होत होती. आम्हाला रतनगडाच्या ज्या पदरातून ट्रॅव्हर्सी मारायची होती त्या ट्रॅव्हर्सीला पोहोचण्यासाठी थोडं खाली उतरणं भाग होतं. त्यासाठी सांध्यातून उजवी मारली आणि एका लहान ओहोळातून बाणच्या नाळेत आलो.

        खरं म्हणजे बाणच्या नाळेत मोठे कातळटप्पे असल्यामुळं मुख्य नाळेतूनच सरळ खाली उतरुन वर उल्लेखलेल्या तिसर्‍या क्रमांकाच्या वाटेला लागून साम्रद गाठणं काही शक्य नव्हतं. त्यामुळं सरळ खाली न उतरता फक्त ट्रॅव्हर्सीच्या उंचीपर्यंत उतरुन आल्यावर उजवीकडं वळलो. नेमक्या या ठिकाणी वाट थोडी शोधावी लागली. अर्थात अशावेळी घाई गडबडीत कुठल्यातरी वाटेने जाऊन नंतर वाट शोधण्यासाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा नेमक्या ठिकाणी वाट शोधण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला परवडतो, हे अनुभवानं काहीसं जमू लागलंय. ट्रेकमधे नेमकं कुठं थांबायचं हे कळलं की वाटा चुकण्याचा धोका बराच कमी होतो. त्यामुळं तिथं थोडी शोधाशोध केल्यावर एक अस्पष्टशी वाट मिळाली जी नेमकी त्याच दिशेला जात होती जिथं आम्हाला जायचं होतं.


        आमचा नेमक्या त्या ठिकाणी वाट शोधण्याचा निर्णय अगदी योग्यच होता कारण त्या सापडलेल्या वाटेने आम्ही तासाभरात त्र्यंबक दरवाज्याच्या हमरस्त्यावर असलेल्या शिड्यांच्या थोडं खालच्या बाजूला येऊन पोहोचलो होतो. आता ट्रेक जवळजवळ संपल्यातच जमा होता. या हमरस्त्यानं साम्रद गाठून आम्हाला फक्त एक औपचारिकता पूर्ण करायची होती.

       दोन दिवसात झालेली अपुरी झोप, प्रचंड चालणं आणि मळलेल्या कपड्यांमुळं आमचा एकूणच अवतार अगदी गबाळ्यासारखा झाला होता. सगळेजण थकलेले असूनही प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दोन अवघड ट्रेक उत्तमप्रकारे पूर्ण केल्यामुळे झालेला आनंद आणि त्यामुळं आलेला आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. हातपाय धुऊन गरमागरम गावरान जेवणावर यथेच्य ताव मारला.

        घाटघरचा शिपनुरशेजारी असलेला कोकणकडा गाठला आणि तिथं असलेल्या उंबरदार आणि चौंढ्या घाटवाटा माथ्यावरुनच पाहिल्या. इथून आता परतीचा प्रवास सुरु केला तो घाटघर जवळ नवीनच कळलेल्या आणि स्थानिकही अगदी क्वचितच वापर करत असलेल्या दोन अवघड घाटवाटा धुंडाळण्यासाठीच.


ट्रेक भिडू -

१) जितेंद्र परदेशी
२) अर्जुन ननावरे
३) राहुल गायटे
४) नंदकुमार नलावडे
५) मिलींद गडदे
६) महादेव पाटील
७) प्रभाकर कारंडे
८) एकनाथ तेलवेकर
९) संजय मालुसरे
१०) सुरज चव्हाण
११) नितीन लोखंडे
१२) रवि मनकर
१३) नितीन फडतरे
१४) अविनाश मनकर
१५) भोसले
१६) दिलीप वाटवे 




शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

"भटकंती भोरजवळच्या ऐतिहासिक ठिकाणांची"

 "भटकंती भोरजवळच्या ऐतिहासिक ठिकाणांची"


       सध्याचा भोर तालूका ऐतिहासिक ठिकाणांच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे. भोरमधल्या या वेळवंडीच्या, नीरामाईच्या लेकरांनी शिवकाळात अतिशय मोलाची कामगिरी केलेली ठिकठिकाणी दिसून येते. या सर्व मंडळींनी तत्कालिन राजकारणावर बराच प्रभाव पाडला. या मंडळींमधे कान्होजी नाईक जेधे, बाजी सर्जेराव जेधे, नागोजी जेधे ही जेधे मंडळी तर कृष्णाजी, कोयाजी बांदल आणि खोपडे या देशमुख मंडळींची नावे प्रामुख्याने सांगता येतील. ऐतिहासिक कागदपत्रांत याविषयी 'हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवाजीराजाला' असा सुंदर उल्लेख आला आहे. या देशमुख मंडळींशिवाय बाजीप्रभु देशपांडे, जीवा महाले, येसाजी कंक, कावजी कोंढाळकर ही नररत्नेही याच मातीत निपजली. या सर्व मंडळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गुरूवारी आम्ही एकदिवशीय भटकंती केली.


       सकाळी लवकर निघून पहिला थांबा कापुरहोळ ते भोर दरम्यानच्या नेकलेस पाँईंटपाशीच घेतला. पावसाळा संपून भादव्याची चाहूल लागू लागल्याने रानफुलं बहरू लागली होती.



       तिथून निघाल्यावर कुठेही न थांबता थेट बाजीप्रभुंच्या 'शिंद'लाच गेलो. तसं या शिंदमधे देशपांड्यांचं काहीच शिल्लक नाही. त्यामुळं मग गावाच्या सुरवातीलाच असलेला बाजीप्रभुंचा पुतळा, त्यामागचं शिवमंदिर आणि बाजूलाच असलेलं सतीचं स्मारक बघून महुडे गाठलं.




       महुड्याच्या पुढं भानुसदर्‍याच्या वाटेवर उजवीकडे पाण्याची टाकी आहे तिथे गाडी पार्क करून साबुदाण्याच्या खिचडीचा नाश्ता उरकला.


       महुड्याला चिकटून असलेल्या घेवडेश्वर डोंगररांगेवर घेवडेश्वराचे पुरातन मंदिर आहे. भौगोलिक दृष्टीने ही घेवडेश्वर डोंगररांग वेळवंडी आणि नीरेचे खोरे विभागते. आमचा चिंचवडचा ट्रेकदोस्त विनीत दाते तिथे नुकताच जाऊन आल्याने त्याच्याकडून ट्रेकचे डिटेल्स आधीच घेतलेले होते. त्यामुळं फार काही शोधाशोध करावी लागली नाही. पाण्याच्या टाकीला लगटूनच सुरूवातीला काँक्रीटचा आणि नंतर कच्चा रस्ता पदरातल्या गोरेवाडीत चढून जातो. त्या वाटेने चालायला सुरूवात केली. वाटेत विविध रंगांची रानफुलं लक्ष वेधून घेत होती.





       कच्चा रस्ता सोडून शॉर्टकट असलेली पायवाट पकडली आणि बांधाजवळ एक ओढा ओलांडून पुन्हा मागे सोडलेल्या कच्च्या रस्त्याला लागलो. ओढ्याच्या वाटेवर वेगवेगळी रानफुले आणि जुन झालेली भारंगी दिसत होती. चिंचार्डाही बहरला होता.



  

       थोडी वाट चढून गेल्यावर गवत कापायला आलेला एक गुराखी आणि मावशी भेटल्या. त्यांनी घेवडेश्वरला चढून जाणारी एक नवीन वाट दाखवली. 


       आम्ही जाणार असलेली ही वाट आधी ठरवलेल्या वाटेच्या पश्चिमेला होती. आता नवीन वाट समजल्यामुळं आयत्यावेळी ट्रेकच्या वाटेमधे थोडासा बदल केला. घेवडेश्वर मंदीरापासून एक धार थेट महुडेपुढच्या भानुसदर्‍यात उतरलेली आहे. आम्हाला आता मावशींनी सांगितलेल्या त्या समोरच्या धारेवरून चढाई करायची होती. या धारेवरची वाट अतिशय खडी, दृष्टीभय आणि थोडी धोकादायक असल्यामुळं गावकरीही अगदी क्वचितच वापरतात. शक्यतो जातायेता दोन वेगळ्या वाटा वापरण्याचा आमचा पहिला प्रयत्न असतो म्हणुन घेवडेश्वर मंदीरापाशी या भानुसदर्‍याच्या समजलेल्या नवीन वाटेनेच चढून जायचं नक्की केलं. 

 

       सुरवातीला चढ साधारण होता पण जसजसं वर चढून जाऊ लागलो तसतसा चढाईचा कोन वाढू लागला.










 
      या वाटेवरही भरपूर रानफुले होती.



        शेवटच्या टप्प्यात डावी ट्रॅव्हर्सी मारून शेजारच्या धारेवरून माथ्यावरचं घेवडेश्वराचं मंदिर गाठलं.







 
      मंदीरापासून पश्चिमकड्यापाशी जाऊन रायरेश्वराचा नाखिंदा, अस्वलखिंड, जननीचा दुर्ग आणि नीरा-देवघरचं पाणलोट क्षेत्र पाहिलं आणि परतीच्या वाटेला लागलो.



       मंदीराशेजारीच चार घरांची वस्ती आहे. वाडीतून वाट गोरेवाडीतून चढून आलेल्या धारेला मिळते.



 
      वेळवंडी खोर्‍यातल्या नांदधूरहून एक वाट या घेवडेश्वरवर चढून येते. या वाटेने थोडं पुढं जाऊन पलिकडचा वेळवंड खोऱ्याचा परिसर न्याहाळला. वातावरण धुरकट असल्यानं फार काही दिसलं नाही पण सिंहगड, राजगड मात्र दिसले. या ठिकाणाहून भाटघर धरणाच्या असलेल्या प्रचंड पाणीसाठ्याचा अंदाज येतो. इथे भेटलेल्या घेवडेश्वर मंदीराशेजारच्या वाडीतल्या गावकर्‍याचा चहासाठी केलेला आग्रह प्रयत्नपुर्वक टाळून उतरायला सुरूवात केली.




 
     इथून पुढची गोरेवाडीमार्गे महुडेपर्यंतची वाट अतिशय मळलेली होती. गरजेच्या ठिकाणी पायर्‍याही खोदलेल्या होत्या. नाचणी आणि भाताची शेती डवरलेली होती.



       वाटेतल्या एका ओढ्यात मस्तपैकी अंघोळी करून ट्रेकचा शिणवटा घालवला.




       मधल्या शॉर्टकटने पिसावर्‍यात दाखल झालो. पिसावरे हे बांदल देशमुखांचं गाव. गावातलं बांदलांच्या कुलदेवतेचं म्हणजे हुमजाईचं दर्शन घेतलं. समोरच चौधरींचा १९४० साली बांधलेला एक चौसोपी वाडा आहे. हल्ली असे वाडे पहायला मिळत नाहीत म्हणून चौधरींची परवानगी घेऊन आवर्जून तो पाहिला. गावातल्या मुख्य चौकातच उजवीकडे गवत माजलेल्या जागेत बांदलांची काही स्मारकं आहेत. अशा स्मारकांचं जतन, संवर्धन झालं तर अनेक इतिहासप्रेमी इथे येतील आणि तरच पुढच्या पिढीला आपला जाज्वल्य इतिहास समजेल.





       पिसावर्‍याहून पुढे आंबेघर-कोर्ले रस्त्यावरच्या कारीफाट्यावर वळून कारीत दाखल झालो. कारीत कान्होजी जेधेंचा हल्लीच नुतनीकरण केलेला वाडा, त्यांच्या तलवारी, चिलखत, देवघर आणि पंचमुखी शिवलिंग पाहिलं.





 
       वाटेतच गोदुबाईंच वृंदावन आहे. या गोदुबाई म्हणजे कान्होजींच्या नातवाच्या आणि बाजी जेधेंच्या मुलाच्या म्हणजे नागोजी जेधेंच्या पत्नी. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी मियाना बंधूंविरूद्धच्या लढाईत नागोजी जेधे कामी आले. त्यावेळी नागोजींचे वय फारफार तर सोळा-सतरा वर्षांचं असेल तर गोदुबाई असतील बारा-तेरा वर्षांच्या. ही बातमी कारीत कळताच त्या वयातही गोदुबाई कारीत सती गेल्या. हिंदवी स्वराज्य नागोजी, गोदुबाईंसारख्या अशा कित्येक ज्ञात-अज्ञातांच्या बलिदानावरच उभं राहिलेलं आहे. नाही का?

 
      कारीतून मधल्या वाटेने आंबवड्यात गेलो. आंबवड्यात कान्होजी जेधे आणि जीवा महालांच्या स्मारक छत्र्या आहेत त्या पाहून विकास जेधेंच्या हॉटेलात जेवणासाठी दाखल झालो. पोटभर जेवण करून नागेश्वराच्या दर्शनाला गेलो. हा नागेश्वर म्हणजे जेधे देशमुखांचं कुलदैवत. करोनामुळं गाभारा अर्थातच बंद होता त्यामुळं नागेश्वराचं बाहेरूनच दर्शन घेतलं. मंदीराशेजारीच महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या मंदीराची छोटी प्रतिकृती पहायला मिळते. बाजूच्या ओढ्यावर भोरच्या पंतसचिवांनी बांधलेला झुलता पुल पाहीला आणि चिखलावड्याकडे निघालो.




 

       चिखलावडे हे रोहिडा किल्ल्याच्या पश्चिम पायथ्याशी असलेलं गाव. या गावातूनही रोहिड्याच्या वाघजाई बुरूजापाशी चढून जाता येतं. हे चिखलावडे म्हणजे कोंढाळकरांचं गाव. गावात जवळजवळ ऐंशी टक्के कोंढाळकर राहतात. या चिखलावड्यात संभाजी कावजी कोंढाळकरांचं? स्मारक असल्याचं ऐकलं होतं. चिखलावड्याच्या फाट्यावर तसा बोर्डही लावलाय. या चिखलावड्याला खालचीवाडी आणि वरचीवाडी अशा दोन वाड्या आहेत. पैकी वरच्यावाडीच्या आवारात गेल्यावर तिथे असलेल्या एका कोंढाळकरालाच घेऊन स्मारक पहायला गेलो तर ते एक वृंदावन होतं. खरंतर 'वीरपुरूषाच्या' स्मारकाच्या नियमात 'वृंदावन' बसणारं नव्हतं. दुसरं असं की संभाजी कावजी कोंढाळकर हे नावच मुळात चुकीचं आहे. खरंतर 'संभाजी कावजी' आणि 'कावजी कोंढाळकर' या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत पण ही दोन्ही नावं एकत्र केली जातात. तिथं खरंच स्मारक असलंच तर ते कावजी कोंढाळकरांचच असेल, संभाजी कावजी कोंढाळकरांचं नक्कीच नव्हे. अर्थात स्मारकाबद्दलचा खरा काय तो शोध संशोधकांना लवकरात लवकर लावावाच लागेल. चुकीच्या समजुतीचं निराकरण वेळीच केलं गेलं नाही तर तोच समज पुढे जाऊन कायमचा रूढ होतो आणि मग तो समाजमनातून काढणं अतिशय कठीण होऊन बसतं.

       आमचं पुढचं लक्ष होतं आळंदेचं कोयाजी बांदलांचं स्मारक. भोर जवळच्या विंग गावचा आमचा मित्र अमोल तळेकरला आम्ही येतोय अशी आगाऊ कल्पना दिली होती. त्यामुळं तोही आळंद्याला खास आम्हाला भेटायला आला. हा अमोल तळेकर म्हणजे एक उत्तम फोटोग्राफर आणि ट्रेकरही. फोटोग्राफीत त्याने अनेक बक्षिसंदेखील मिळवलीयेत. समव्यसनी आणि बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळं त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या.


       अमोल बरोबरच्या गप्पांमुळं मग पुढच्या मोहरीच्या अमृतेश्वराला जाताना पार अंधार झाला. कापुरहोळ ते भोर दरम्यानच्या कासुर्डीहून डावीकडे वळून चार किलोमीटरवरच्या मोहरीला पोहोचलो. गावातच 'अमृतेश्वराचं' मंदिर आहे. हे देवस्थान म्हणजे शिळीमकर देशमुखांचं कुलदैवत. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला काही शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पात क्वचितच आढळणारं 'गंडभैरूंडाचं' शिल्प दिसून येतं. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत इथे एक 'रवादिव्य' झालं होतं. मोहरीचे गावखंडेराव आणि पानसे यांच्यातील वादाचा निर्णय त्यामधे झाला होता. इथंच महादेवाचा ओढा, शिवगंगा आणि गुंजवणीचा त्रिवेणी संगम आहे. अंधार पडल्यामुळं नदीपात्रात असलेलं शिवलिंग पाहण्यासाठी काही जाता आलं नाही. 



       दिवस जवळजवळ मावळलाच होता त्यामुळं आम्हांलाही आता घरचे वेध लागले होते. भोरच्या आसपास असलेली खोपडे देशमुखांची उत्रवळी, नाझरे आणि अंबाडे ही गावं, कंकांचं भुतोंडे, दोन देशमुखांच्या वैमनस्यातून संपूर्ण लग्नाच्या वऱ्हाडाला कापून काढलेली गाडेखिंड वगैरे ठिकाणं अजूनही पहायची राहिली आहेतच आणि ही ठिकाणं पाहताना पुन्हा काहीतरी नवीन नक्कीच सापडेल. त्यामुळं तिथून निघाल्यावर कुठेही न थांबता थेट चिंचवड गाठलं ते पुन्हा या भागातली राहिलेली ठिकाणं पाहण्यासाठी परत येण्याचा निश्चय करूनच.

🚩🚩

       लेखाच्या शेवटीशेवटी, अमृतेश्वर मंदिरात झालेल्या निवाड्यासंदर्भात शिवाजी महाराजांसमोर झालेल्या रवादिव्याचा उल्लेख आलाय. साहजिकच वाचकांच्या मनात हे 'रवादिव्य' म्हणजे काय? असा प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जाताजाता या रवादिव्याविषयी थोडेसे...

       त्या काळातलं न्यायालय म्हणजे कोर्ट रहाळातल्या मंडळींचं प्रमुख दैवत असलेल्या मंदिरात भरत असे. अशा कोर्टात निवाडा करण्यासाठी जी पध्दती वापरली जाई तिला 'दिव्य न्यायपध्दत' म्हणत. तशा बऱ्याच न्यायपध्दती आहेत पण तुर्तास आपण लेखात उल्लेखलेली 'रवादिव्य' न्यायपध्दत म्हणजे नेमकी काय आहे ते थोडक्यात पाहू.


       प्रथम वादी आणि प्रतिवादी या दोघांकडून राजीनामा लिहून घेतला जाई. दिव्यातून जो निकाल मिळेल तो दोघांनाही मान्य असेल याची लेखी कबुली घेतली जाई. नंतर दोघांचे हात धुतले जात. हाताचे परीक्षण करून दोघांचेही हात सील करण्यात येत.

       दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान, पूजा वगैरे करून वादी आणि प्रतिवादी दिव्यास तयार होत. तोपर्यंत एका मोठ्या पात्रामध्ये तूप व तेलाचे मिश्रण करून उकळले जाई. याला रवा पात्र म्हणत. हे पात्र तयार झाले आहे की नाही हे त्यात मका किंवा इतर धान्य टाकून तपासले जाई. उकळलेल्या पात्रात त्याचे त्वरित लाहीत रूपांतर होई. रवा पात्रात असलेल्या मिश्रणातून आता वादीला रवा म्हणजेच लोखंड अथवा इतर निवडलेल्या धातूचा गोळा एका झटक्यात उपस्थित सर्व लोकांसमोर काढावा लागे. काढलेला रवा सभेस दाखवून मग तो पुन्हा पात्रात टाकला जाई. मग वादी माणसाचे हात तपासून त्याचे हात पुन्हा सील केले जात. वादीनंतर प्रतिवादी मग हीच प्रक्रिया पूर्ण करत असे.

       मग दोघांना एक दिवस नजरकैदेत काढावा लागे. नंतर गोत सभा सर्वांसमोर दोघांचेही हात मोकळे करत असे. तपासात हातावर आलेल्या डागाचे किंवा फोडाचे निरीक्षण करून त्याचे टिपण केले जाई. वादीचा हात स्वच्छ दिसल्यास निकाल त्याच्या बाजूने दिला जाई. दोघांचेही हात भाजले असल्यास ज्याच्या जखमा सूक्ष्म किंवा कमी त्याच्या बाजूने कौल दिला जाई. कौल बाजूने लागताच योग्य त्या माणसाचा तात्काळ योग्य ते कागदपत्र करून दिले जाई. त्याला निवाडापत्र (Decree) म्हणत. आज देखील अशी बरीच निवाडापत्रे ऐतिहासिक साधनांत उपलब्ध आहेत.

       शिवकाळात रवादिव्याव्यतिरिक्त अग्नीदिव्य, ऐरणीदिव्य अशा वेगवेगळ्या निवाडा पध्दतीही अस्तित्वात होत्या.

       हे सर्व वाचल्यावर सहज असं मनात येतं की हल्लीच्या काळात प्रचलित असलेल्या कायद्याची जी भीती कुणालाच उरलेली नाही ती अशा प्रकारची निवाडा पध्दती अंमलात आणल्यास पुन्हा येणं शक्य आहे का? 

🚩 या ट्रेकमधल्या 'घेवडेश्वर' च्या मार्गाचा 3D व्हिडीओ इथून पाहता येईल. 


🚩 फोटो सौजन्य -

मंदार दंडवते

🚩 ट्रेकभिडू -

१) रवि मनकर
२) मंदार दंडवते
३) सुमित गडदे
४) दिलीप वाटवे

🚩 संदर्भ -

१) जेधे करीणा
२) जेधे शकावली
३) इतिहासाच्या पाऊलखुणा, भाग पहिला, पान नंबर ६६ ते ६८