शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

"भटकंती भोरजवळच्या ऐतिहासिक ठिकाणांची"

 "भटकंती भोरजवळच्या ऐतिहासिक ठिकाणांची"


       सध्याचा भोर तालूका ऐतिहासिक ठिकाणांच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे. भोरमधल्या या वेळवंडीच्या, नीरामाईच्या लेकरांनी शिवकाळात अतिशय मोलाची कामगिरी केलेली ठिकठिकाणी दिसून येते. या सर्व मंडळींनी तत्कालिन राजकारणावर बराच प्रभाव पाडला. या मंडळींमधे कान्होजी नाईक जेधे, बाजी सर्जेराव जेधे, नागोजी जेधे ही जेधे मंडळी तर कृष्णाजी, कोयाजी बांदल आणि खोपडे या देशमुख मंडळींची नावे प्रामुख्याने सांगता येतील. ऐतिहासिक कागदपत्रांत याविषयी 'हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवाजीराजाला' असा सुंदर उल्लेख आला आहे. या देशमुख मंडळींशिवाय बाजीप्रभु देशपांडे, जीवा महाले, येसाजी कंक, कावजी कोंढाळकर ही नररत्नेही याच मातीत निपजली. या सर्व मंडळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गुरूवारी आम्ही एकदिवशीय भटकंती केली.


       सकाळी लवकर निघून पहिला थांबा कापुरहोळ ते भोर दरम्यानच्या नेकलेस पाँईंटपाशीच घेतला. पावसाळा संपून भादव्याची चाहूल लागू लागल्याने रानफुलं बहरू लागली होती.



       तिथून निघाल्यावर कुठेही न थांबता थेट बाजीप्रभुंच्या 'शिंद'लाच गेलो. तसं या शिंदमधे देशपांड्यांचं काहीच शिल्लक नाही. त्यामुळं मग गावाच्या सुरवातीलाच असलेला बाजीप्रभुंचा पुतळा, त्यामागचं शिवमंदिर आणि बाजूलाच असलेलं सतीचं स्मारक बघून महुडे गाठलं.




       महुड्याच्या पुढं भानुसदर्‍याच्या वाटेवर उजवीकडे पाण्याची टाकी आहे तिथे गाडी पार्क करून साबुदाण्याच्या खिचडीचा नाश्ता उरकला.


       महुड्याला चिकटून असलेल्या घेवडेश्वर डोंगररांगेवर घेवडेश्वराचे पुरातन मंदिर आहे. भौगोलिक दृष्टीने ही घेवडेश्वर डोंगररांग वेळवंडी आणि नीरेचे खोरे विभागते. आमचा चिंचवडचा ट्रेकदोस्त विनीत दाते तिथे नुकताच जाऊन आल्याने त्याच्याकडून ट्रेकचे डिटेल्स आधीच घेतलेले होते. त्यामुळं फार काही शोधाशोध करावी लागली नाही. पाण्याच्या टाकीला लगटूनच सुरूवातीला काँक्रीटचा आणि नंतर कच्चा रस्ता पदरातल्या गोरेवाडीत चढून जातो. त्या वाटेने चालायला सुरूवात केली. वाटेत विविध रंगांची रानफुलं लक्ष वेधून घेत होती.





       कच्चा रस्ता सोडून शॉर्टकट असलेली पायवाट पकडली आणि बांधाजवळ एक ओढा ओलांडून पुन्हा मागे सोडलेल्या कच्च्या रस्त्याला लागलो. ओढ्याच्या वाटेवर वेगवेगळी रानफुले आणि जुन झालेली भारंगी दिसत होती. चिंचार्डाही बहरला होता.



  

       थोडी वाट चढून गेल्यावर गवत कापायला आलेला एक गुराखी आणि मावशी भेटल्या. त्यांनी घेवडेश्वरला चढून जाणारी एक नवीन वाट दाखवली. 


       आम्ही जाणार असलेली ही वाट आधी ठरवलेल्या वाटेच्या पश्चिमेला होती. आता नवीन वाट समजल्यामुळं आयत्यावेळी ट्रेकच्या वाटेमधे थोडासा बदल केला. घेवडेश्वर मंदीरापासून एक धार थेट महुडेपुढच्या भानुसदर्‍यात उतरलेली आहे. आम्हाला आता मावशींनी सांगितलेल्या त्या समोरच्या धारेवरून चढाई करायची होती. या धारेवरची वाट अतिशय खडी, दृष्टीभय आणि थोडी धोकादायक असल्यामुळं गावकरीही अगदी क्वचितच वापरतात. शक्यतो जातायेता दोन वेगळ्या वाटा वापरण्याचा आमचा पहिला प्रयत्न असतो म्हणुन घेवडेश्वर मंदीरापाशी या भानुसदर्‍याच्या समजलेल्या नवीन वाटेनेच चढून जायचं नक्की केलं. 

 

       सुरवातीला चढ साधारण होता पण जसजसं वर चढून जाऊ लागलो तसतसा चढाईचा कोन वाढू लागला.










 
      या वाटेवरही भरपूर रानफुले होती.



        शेवटच्या टप्प्यात डावी ट्रॅव्हर्सी मारून शेजारच्या धारेवरून माथ्यावरचं घेवडेश्वराचं मंदिर गाठलं.







 
      मंदीरापासून पश्चिमकड्यापाशी जाऊन रायरेश्वराचा नाखिंदा, अस्वलखिंड, जननीचा दुर्ग आणि नीरा-देवघरचं पाणलोट क्षेत्र पाहिलं आणि परतीच्या वाटेला लागलो.



       मंदीराशेजारीच चार घरांची वस्ती आहे. वाडीतून वाट गोरेवाडीतून चढून आलेल्या धारेला मिळते.



 
      वेळवंडी खोर्‍यातल्या नांदधूरहून एक वाट या घेवडेश्वरवर चढून येते. या वाटेने थोडं पुढं जाऊन पलिकडचा वेळवंड खोऱ्याचा परिसर न्याहाळला. वातावरण धुरकट असल्यानं फार काही दिसलं नाही पण सिंहगड, राजगड मात्र दिसले. या ठिकाणाहून भाटघर धरणाच्या असलेल्या प्रचंड पाणीसाठ्याचा अंदाज येतो. इथे भेटलेल्या घेवडेश्वर मंदीराशेजारच्या वाडीतल्या गावकर्‍याचा चहासाठी केलेला आग्रह प्रयत्नपुर्वक टाळून उतरायला सुरूवात केली.




 
     इथून पुढची गोरेवाडीमार्गे महुडेपर्यंतची वाट अतिशय मळलेली होती. गरजेच्या ठिकाणी पायर्‍याही खोदलेल्या होत्या. नाचणी आणि भाताची शेती डवरलेली होती.



       वाटेतल्या एका ओढ्यात मस्तपैकी अंघोळी करून ट्रेकचा शिणवटा घालवला.




       मधल्या शॉर्टकटने पिसावर्‍यात दाखल झालो. पिसावरे हे बांदल देशमुखांचं गाव. गावातलं बांदलांच्या कुलदेवतेचं म्हणजे हुमजाईचं दर्शन घेतलं. समोरच चौधरींचा १९४० साली बांधलेला एक चौसोपी वाडा आहे. हल्ली असे वाडे पहायला मिळत नाहीत म्हणून चौधरींची परवानगी घेऊन आवर्जून तो पाहिला. गावातल्या मुख्य चौकातच उजवीकडे गवत माजलेल्या जागेत बांदलांची काही स्मारकं आहेत. अशा स्मारकांचं जतन, संवर्धन झालं तर अनेक इतिहासप्रेमी इथे येतील आणि तरच पुढच्या पिढीला आपला जाज्वल्य इतिहास समजेल.





       पिसावर्‍याहून पुढे आंबेघर-कोर्ले रस्त्यावरच्या कारीफाट्यावर वळून कारीत दाखल झालो. कारीत कान्होजी जेधेंचा हल्लीच नुतनीकरण केलेला वाडा, त्यांच्या तलवारी, चिलखत, देवघर आणि पंचमुखी शिवलिंग पाहिलं.





 
       वाटेतच गोदुबाईंच वृंदावन आहे. या गोदुबाई म्हणजे कान्होजींच्या नातवाच्या आणि बाजी जेधेंच्या मुलाच्या म्हणजे नागोजी जेधेंच्या पत्नी. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी मियाना बंधूंविरूद्धच्या लढाईत नागोजी जेधे कामी आले. त्यावेळी नागोजींचे वय फारफार तर सोळा-सतरा वर्षांचं असेल तर गोदुबाई असतील बारा-तेरा वर्षांच्या. ही बातमी कारीत कळताच त्या वयातही गोदुबाई कारीत सती गेल्या. हिंदवी स्वराज्य नागोजी, गोदुबाईंसारख्या अशा कित्येक ज्ञात-अज्ञातांच्या बलिदानावरच उभं राहिलेलं आहे. नाही का?

 
      कारीतून मधल्या वाटेने आंबवड्यात गेलो. आंबवड्यात कान्होजी जेधे आणि जीवा महालांच्या स्मारक छत्र्या आहेत त्या पाहून विकास जेधेंच्या हॉटेलात जेवणासाठी दाखल झालो. पोटभर जेवण करून नागेश्वराच्या दर्शनाला गेलो. हा नागेश्वर म्हणजे जेधे देशमुखांचं कुलदैवत. करोनामुळं गाभारा अर्थातच बंद होता त्यामुळं नागेश्वराचं बाहेरूनच दर्शन घेतलं. मंदीराशेजारीच महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या मंदीराची छोटी प्रतिकृती पहायला मिळते. बाजूच्या ओढ्यावर भोरच्या पंतसचिवांनी बांधलेला झुलता पुल पाहीला आणि चिखलावड्याकडे निघालो.




 

       चिखलावडे हे रोहिडा किल्ल्याच्या पश्चिम पायथ्याशी असलेलं गाव. या गावातूनही रोहिड्याच्या वाघजाई बुरूजापाशी चढून जाता येतं. हे चिखलावडे म्हणजे कोंढाळकरांचं गाव. गावात जवळजवळ ऐंशी टक्के कोंढाळकर राहतात. या चिखलावड्यात संभाजी कावजी कोंढाळकरांचं? स्मारक असल्याचं ऐकलं होतं. चिखलावड्याच्या फाट्यावर तसा बोर्डही लावलाय. या चिखलावड्याला खालचीवाडी आणि वरचीवाडी अशा दोन वाड्या आहेत. पैकी वरच्यावाडीच्या आवारात गेल्यावर तिथे असलेल्या एका कोंढाळकरालाच घेऊन स्मारक पहायला गेलो तर ते एक वृंदावन होतं. खरंतर 'वीरपुरूषाच्या' स्मारकाच्या नियमात 'वृंदावन' बसणारं नव्हतं. दुसरं असं की संभाजी कावजी कोंढाळकर हे नावच मुळात चुकीचं आहे. खरंतर 'संभाजी कावजी' आणि 'कावजी कोंढाळकर' या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत पण ही दोन्ही नावं एकत्र केली जातात. तिथं खरंच स्मारक असलंच तर ते कावजी कोंढाळकरांचच असेल, संभाजी कावजी कोंढाळकरांचं नक्कीच नव्हे. अर्थात स्मारकाबद्दलचा खरा काय तो शोध संशोधकांना लवकरात लवकर लावावाच लागेल. चुकीच्या समजुतीचं निराकरण वेळीच केलं गेलं नाही तर तोच समज पुढे जाऊन कायमचा रूढ होतो आणि मग तो समाजमनातून काढणं अतिशय कठीण होऊन बसतं.

       आमचं पुढचं लक्ष होतं आळंदेचं कोयाजी बांदलांचं स्मारक. भोर जवळच्या विंग गावचा आमचा मित्र अमोल तळेकरला आम्ही येतोय अशी आगाऊ कल्पना दिली होती. त्यामुळं तोही आळंद्याला खास आम्हाला भेटायला आला. हा अमोल तळेकर म्हणजे एक उत्तम फोटोग्राफर आणि ट्रेकरही. फोटोग्राफीत त्याने अनेक बक्षिसंदेखील मिळवलीयेत. समव्यसनी आणि बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळं त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या.


       अमोल बरोबरच्या गप्पांमुळं मग पुढच्या मोहरीच्या अमृतेश्वराला जाताना पार अंधार झाला. कापुरहोळ ते भोर दरम्यानच्या कासुर्डीहून डावीकडे वळून चार किलोमीटरवरच्या मोहरीला पोहोचलो. गावातच 'अमृतेश्वराचं' मंदिर आहे. हे देवस्थान म्हणजे शिळीमकर देशमुखांचं कुलदैवत. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला काही शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पात क्वचितच आढळणारं 'गंडभैरूंडाचं' शिल्प दिसून येतं. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत इथे एक 'रवादिव्य' झालं होतं. मोहरीचे गावखंडेराव आणि पानसे यांच्यातील वादाचा निर्णय त्यामधे झाला होता. इथंच महादेवाचा ओढा, शिवगंगा आणि गुंजवणीचा त्रिवेणी संगम आहे. अंधार पडल्यामुळं नदीपात्रात असलेलं शिवलिंग पाहण्यासाठी काही जाता आलं नाही. 



       दिवस जवळजवळ मावळलाच होता त्यामुळं आम्हांलाही आता घरचे वेध लागले होते. भोरच्या आसपास असलेली खोपडे देशमुखांची उत्रवळी, नाझरे आणि अंबाडे ही गावं, कंकांचं भुतोंडे, दोन देशमुखांच्या वैमनस्यातून संपूर्ण लग्नाच्या वऱ्हाडाला कापून काढलेली गाडेखिंड वगैरे ठिकाणं अजूनही पहायची राहिली आहेतच आणि ही ठिकाणं पाहताना पुन्हा काहीतरी नवीन नक्कीच सापडेल. त्यामुळं तिथून निघाल्यावर कुठेही न थांबता थेट चिंचवड गाठलं ते पुन्हा या भागातली राहिलेली ठिकाणं पाहण्यासाठी परत येण्याचा निश्चय करूनच.

🚩🚩

       लेखाच्या शेवटीशेवटी, अमृतेश्वर मंदिरात झालेल्या निवाड्यासंदर्भात शिवाजी महाराजांसमोर झालेल्या रवादिव्याचा उल्लेख आलाय. साहजिकच वाचकांच्या मनात हे 'रवादिव्य' म्हणजे काय? असा प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जाताजाता या रवादिव्याविषयी थोडेसे...

       त्या काळातलं न्यायालय म्हणजे कोर्ट रहाळातल्या मंडळींचं प्रमुख दैवत असलेल्या मंदिरात भरत असे. अशा कोर्टात निवाडा करण्यासाठी जी पध्दती वापरली जाई तिला 'दिव्य न्यायपध्दत' म्हणत. तशा बऱ्याच न्यायपध्दती आहेत पण तुर्तास आपण लेखात उल्लेखलेली 'रवादिव्य' न्यायपध्दत म्हणजे नेमकी काय आहे ते थोडक्यात पाहू.


       प्रथम वादी आणि प्रतिवादी या दोघांकडून राजीनामा लिहून घेतला जाई. दिव्यातून जो निकाल मिळेल तो दोघांनाही मान्य असेल याची लेखी कबुली घेतली जाई. नंतर दोघांचे हात धुतले जात. हाताचे परीक्षण करून दोघांचेही हात सील करण्यात येत.

       दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान, पूजा वगैरे करून वादी आणि प्रतिवादी दिव्यास तयार होत. तोपर्यंत एका मोठ्या पात्रामध्ये तूप व तेलाचे मिश्रण करून उकळले जाई. याला रवा पात्र म्हणत. हे पात्र तयार झाले आहे की नाही हे त्यात मका किंवा इतर धान्य टाकून तपासले जाई. उकळलेल्या पात्रात त्याचे त्वरित लाहीत रूपांतर होई. रवा पात्रात असलेल्या मिश्रणातून आता वादीला रवा म्हणजेच लोखंड अथवा इतर निवडलेल्या धातूचा गोळा एका झटक्यात उपस्थित सर्व लोकांसमोर काढावा लागे. काढलेला रवा सभेस दाखवून मग तो पुन्हा पात्रात टाकला जाई. मग वादी माणसाचे हात तपासून त्याचे हात पुन्हा सील केले जात. वादीनंतर प्रतिवादी मग हीच प्रक्रिया पूर्ण करत असे.

       मग दोघांना एक दिवस नजरकैदेत काढावा लागे. नंतर गोत सभा सर्वांसमोर दोघांचेही हात मोकळे करत असे. तपासात हातावर आलेल्या डागाचे किंवा फोडाचे निरीक्षण करून त्याचे टिपण केले जाई. वादीचा हात स्वच्छ दिसल्यास निकाल त्याच्या बाजूने दिला जाई. दोघांचेही हात भाजले असल्यास ज्याच्या जखमा सूक्ष्म किंवा कमी त्याच्या बाजूने कौल दिला जाई. कौल बाजूने लागताच योग्य त्या माणसाचा तात्काळ योग्य ते कागदपत्र करून दिले जाई. त्याला निवाडापत्र (Decree) म्हणत. आज देखील अशी बरीच निवाडापत्रे ऐतिहासिक साधनांत उपलब्ध आहेत.

       शिवकाळात रवादिव्याव्यतिरिक्त अग्नीदिव्य, ऐरणीदिव्य अशा वेगवेगळ्या निवाडा पध्दतीही अस्तित्वात होत्या.

       हे सर्व वाचल्यावर सहज असं मनात येतं की हल्लीच्या काळात प्रचलित असलेल्या कायद्याची जी भीती कुणालाच उरलेली नाही ती अशा प्रकारची निवाडा पध्दती अंमलात आणल्यास पुन्हा येणं शक्य आहे का? 

🚩 या ट्रेकमधल्या 'घेवडेश्वर' च्या मार्गाचा 3D व्हिडीओ इथून पाहता येईल. 


🚩 फोटो सौजन्य -

मंदार दंडवते

🚩 ट्रेकभिडू -

१) रवि मनकर
२) मंदार दंडवते
३) सुमित गडदे
४) दिलीप वाटवे

🚩 संदर्भ -

१) जेधे करीणा
२) जेधे शकावली
३) इतिहासाच्या पाऊलखुणा, भाग पहिला, पान नंबर ६६ ते ६८





७ टिप्पण्या:

  1. Mastach trek and Photos. Good to see that your trek started and have positive vibes now. Corona getting behind vali feeling.

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. घर बसल्या एक मस्त सफर झाली वाचता वाचता.. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  4. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा