बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

"ट्रेक सांधणदरी करवलीघाट आणि अपरिचित चिकणदऱ्याचा"

 "ट्रेक सांधणदरी करवलीघाट आणि अपरिचित चिकणदऱ्याचा"


       आपण एखाद्या डोंगरयात्रेची जशी योजना ठरवतो, प्रत्येकवेळी अगदी तशीच्यातशी ती पूर्ण होतेच असं काही नाही. खरं सांगायचं तर बर्‍याच वेळेला त्यात काहीतरी विघ्नेच येतात. पण मग अशा अचानक उद्भवलेल्या अवघड परिस्थितीत त्यातुन मार्ग काढणार नाहीत ते ट्रेकर कसले? आमच्या डिसेंबरमधे ठरवलेल्या ट्रेकचंही अगदी असंच झालं होतं. नोव्हेंबरमधे बागलाण मोहिम झाल्यानंतर डिसेंबरमधे रग्गड चालणं असलेला दोन किल्ले आणि तीन घाटवाटांचा 'रायरेश्वर ते प्रतापगड' असा जंबो ट्रेक काही कारणांमुळं रद्द करावा लागणार होता. या ट्रेकसाठी चार दिवस घराबाहेर राहणं काही घरगुती अडचणींमुळं शक्य होणार नव्हतं. पण मग शनिवार-रविवार असं दोन दिवसांत काही 'हटके' करता येईल काय याबाबतीत आम्हा ट्रेकदोस्तांमधे चर्चा सुरू होती.
       सहसा कुणी जात नाही अशा ठिकाणी जाण्याचा किंवा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा आमचा म्हणजे "फाल्कन ट्रेकर्स"चा पहिला प्रयत्न असतो. तशी ही सुरवात झाली ती हरिहरच्या ट्रेकपासून. तोपर्यंत बहुतेक सगळेजण ट्रेकींग करत होतेच, पण ते आपापले आणि कमी-अधिक प्रमाणात. पण या हरिहरनंतर मात्र हळूहळू ग्रुप जमत गेला. नंतरच्या ट्रेक्समधे जसजसा एकमेकांच्या चालण्याचा, स्वभावाचा अंदाज येत गेला तसतसा आमच्या अवघड ट्रेक्सचा आलेखही उंचावत गेला आणि आम्हाला ट्रेक दरम्यान सुरक्षा साधनांची गरज भासू लागली. आत्तापर्यंतचे सगळे ट्रेक्स आम्ही जेवढा खर्च होईल फक्त तेवढीच वर्गणी काढून केले होते त्यामुळे निदान तोपर्यंत तरी असे पैसे जमवून साधनखरेदीचा प्रश्न आला नव्हता. पण नंतरच्या ट्रेक्समधे अधुनमधुन जशी गरज लागेल तशी थोडी जास्त वर्गणी काढून त्यातून हळूहळू साधनसामुग्रीची खरेदी करु लागलो. सुट्टीच्या दिवशी मुद्दाम ही साधनं हाताळण्याचा, रॅपलिंग करण्याचा सराव देखील करत होतो. आत्तापर्यंत अशा सरावांच्या रंगीत तालमी भरपूर करुन झाल्या होत्या पण मुख्य प्रयोग करणं काही केल्या जमलेलं नव्हतं. पण मग आपण आत्तापर्यंत जी सुरक्षा साधनं जमवली आहेत ती सगळी साधनं वापरुन या दोन दिवसात 'वेगळं' काही करता येईल काय असं आमच्या चर्चेनं थोडं वळण घेतलं. कुणाच्या मदतीशिवाय असा ट्रेक केल्यानं प्रत्येकाचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार होता. त्यासाठी एकएक दिवसाचे दोन छोटे ट्रेक एकत्र करुन दोन दिवसांचा ट्रेक करण्यावर सर्वानुमते ठरलं. मग त्यादृष्टीनं आम्ही आमच्या बेसकँपचं ठिकाणही ठरवलं होतं ते म्हणजे 'साम्रद'. त्याला जोडून दोन ट्रेक्सही ठरले ते म्हणजे पहिल्या दिवशी सांधणदरी उतरायची आणि करवली घाट चढून मुक्कामाला परत साम्रदला यायचं तर दुसर्‍या दिवशी मागच्यावेळी पूर्ण न करता आलेली चिकणदर्‍याची वाट रतनगडावरुन रॅपलिंग करायची होती.

       ज्यावेळी हा प्लॅन नक्की झाला आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला त्यावेळी लगेचच ग्रुपवरच्या विनीत दातेने सांधणदरीत रॅपलिंग करण्यासाठी साम्रदवाल्यांच्या मक्तेदारीबद्दल आधीच कल्पना देऊन ठेवलेली होती. त्यामुळं साम्रदची मंडळी त्यांचे ग्रुप्स घेऊन रॅपलिंगच्या पॅचपर्यंत पोहचण्यापुर्वी आम्हाला त्या जागी पोहोचून निदान रॅपलिंगचं फॉर्मेशन तरी करणं भाग होतं. म्हणून शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे लवकर जेवण केलं. नेहमीप्रमाणे सगळे जमल्यावर गाडीची पुजा केली आणि निघालो.

        पुढे नारायणगावात ज्यावेळी दुध प्यायला थांबलो त्यावेळी मधल्या शॉर्टकटच्या वाटेने साम्रदला जायचं असल्याबद्दल सगळ्यांना कल्पना दिली. त्यासाठी चिंचवडहून नारायणगाव, ओझर, ओतुर, ब्राम्हणवाडा, कोतुळ, राजुर, शेंडी, घाटघर आणि साम्रद असा मार्ग निवडला होता. तो रस्ता एकेरी असूनही बर्‍यापैकी चांगला तसाच निर्धोकही होता.
       सकाळी साम्रदला पोहोचलो त्यावेळी अजून तिथलं 'पर्यटक महामंडळ' जागं व्हायचं होतं. फार वेळ न दवडता सकाळची नित्यकर्म आवरली आणि चहा-बिस्कीटांचा सुपरफास्ट नाश्ता करून ट्रेकला सुरूवात केली

       अजून उजाडायचं होतं तोपर्यंतच निघून सांधणदरीत पोहोचलो. डिसेंबर महीना असल्यामुळं थंडी तर मी म्हणत होती. त्यात छातीएवढ्या पाण्यातून एवढ्या भल्या पहाटे जायचं म्हणजे एक दिव्यच होतं, पण असे उद्योग ट्रेकिंग करताना वेगळीच मजा आणतात नाही का? पाणी पार केल्यावर अंगात थंडी भरण्याआधी कोरडे कपडे घातले. पुढे पॅचवर जाऊन पटकन रॅपलिंगचं फॉर्मेशन केलं तोपर्यंत साम्रदची मंडळी तिथे येऊन पोहोचली होती.




        मागून त्यांचा ग्रुप येईपर्यंत आमची अर्धीअधिक मंडळी उतरुन गेली होती त्यामुळं फार काही गोंधळ झाला नाही. सगळेजण खाली उतरल्यावर मग बाकी फारसं कुठेही न थांबता थेट खालच्या कुंडाजवळच जेवणासाठी पहिला ब्रेक घेतला.

        आदल्या रात्री चिंचवडहून निघाल्यापासून कुणाची विश्रांती अशी झालीच नव्हती. पुढचा करवली घाट चढायचा तर विश्रांती फार गरजेची होती त्यामुळं जेवण झाल्यावर थोडी हक्काची वामकुक्षी पण घेतली.


        अर्ध्या तासाने ताजेतवाने झाल्यावर निघालो तर वाटेत या जागी मुक्कामी असणार्‍या पाहुण्यांसाठी तंबु निवासाची आणि खास मांसाहारी जेवण तयार करण्याची लगबग सुरु असलेली दिसली. कुंडाजवळून समोरच 'बाण' सुळका दिसला. जानेवारी २००८ मध्ये ८१० फुटांचा अत्यंत कठीण श्रेणी असलेला हा सुळका आम्ही सर केला होता. त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी म्हणजे डिसेंबर २०१७ ला, याच सुळक्याच्या पायथ्यातुन नाळेच्या वाटेने रात्री आठ वाजता या कुंडाजवळ आम्ही पोहोचलो होतो. खरंतर इतक्या वर्षानंतरही या सगळ्या घटना अगदी काल घडल्यासारख्या मनात अजूनही ताज्या आहेत.

        हळूहळू उन्हाचा चटका जाणवू लागला होता. आता बाकी घाई करावी लागणार होती. करवली घाट अर्धा चढून आल्यावर वाटेतल्या ओढ्यात एक पाण्यासाठी छोटासा ब्रेक घेतला.

        घाटवाटेचा शेवटचा सोपा कातळटप्पा चढून साम्रदच्या पठारावर आलो आणि एका झाडाखाली सगळेजण येईपर्यंत थोडी विश्रांती घेतली.

       मोकळ्या मैदानात आल्यावर समोरच रतनगड आणि उद्या उतरायची चिकणदर्‍याची वाट स्पष्ट दिसत होती. सोबत्यांना दुसर्‍या दिवशी करायचा मार्ग दाखवला. माथ्यावरून एका बाजूला अलंग, मदन, कुलंग, किर्डा, साकिरा, कळसुबाई तर दुसर्‍या बाजूला पाबरगड, खुटा, रतनगड, चिकणदरा, कात्राबाई, करंडा, कळमंजाच्या दर्‍याची नाळ, गुयरीदार, आजोबा, सीतेचा पाळणा, कुईरानाचा किंवा भायखळ्याचा कडा वगैरे स्पष्ट दिसत होते. रतनगडाच्या पार्श्वभुमीवर काही फोटो काढले आणि लवकरच बेसकँपवर परतलो.



         हातपाय धुऊन ताजेतवाने झालो आणि रात्रीच्या जेवणाला वेळ असल्यामुळं गाण्याच्या भेंड्यांचा फड जमवला. जितेंद्र परदेशीने न विसरता घरून ढोलकी आणली होती, त्यात सोबतचा मिलींद गडदे कोकणी, म्हणजे पक्का तबलजी. मग काय विचारता, फड असा रंगला की बाजुला मुक्कामाला असलेला दुसर्‍या ट्रेकर्सचा गृपही आमच्यात सामील झाला. दुपारचं जेवण करवली घाट चढायचा असल्यानं पोटभरीचं असं केलं नव्हतं त्यामुळं बेसकँपवर आल्यावर थोड्याच वेळात आमच्या बल्लवाने गरमागरम मॅगी तयार केली. या मॅगीमुळं निदान रात्रीच्या जेवणापर्यंत थोडी तरी कळ काढता येणार होती. दुसरं असं की ट्रेकच्या नादात काल निघाल्यापासून घरच्यांशी बोलणं झालं नव्हतं. त्यांना खुशाली कळवणं खुप गरजेचं होतं त्यामुळं गावाच्या एका टोकाला असलेल्या उंचवट्यावरुन पाण्याची जी पाईपलाईन गेली होती, पार तिथं जावं लागलं. त्याच्या एका पिलरवर एका ठराविक अवस्थेत उभं राहिल्यावरच फोन लागत होता. एवढा सगळा द्रविडी प्राणायाम करुन घरी खुशाली कळवल्यावर बाकी सगळे निश्चिंत झाले होते.
       आमचा मुक्काम ज्याच्या घरी होता त्या दत्ता भांगरेला उद्या आम्ही रतनगडावर मदतीसाठी घेऊन जाणार होतो. मागे एकदा तो या चिकणदर्‍यातून उतरला होता त्यामुळं त्याच्या या अनूभवाचा आम्हाला फायदाच होणार होता. दुसरं असं की रॅपलिंगचं सगळी साधनसामग्री तो गडावरुन साम्रदला परस्पर घेऊन जाणार होता. त्यामुळं दुसर्‍या दिवशीच्या एकूण कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी चर्चा केली. गरजेच्या साधनसामग्रीची रात्रीच तयारी करुन ठेवली आणि जेवण करुन लवकर झोपी गेलो.

       गेल्या वर्षी अर्धवट राहीलेली ही चिकणदर्‍याची वाट त्या दिवसापासूनच आमच्या 'बकेट लिस्ट' मधे होती. कसं असतं ना की एखादी वाट किंवा किल्ला, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, काही केल्या नाही म्हणजे नाहीच होत. अगदी तसंच आमचं या वाटेबद्दल झालं होतं. गेलं वर्षभर आम्हाला तिकडं जाणंच जमलेलं नव्हतं. त्यामुळं जंबो ट्रेक रद्द होणं तसं पाहिलं तर आमच्या पथ्थ्यावरच पडलं होतं. आज आम्ही रतनगडावरुन चिकणदर्‍यात उतरुन परत साम्रदला येणार होतो. तसे चिकणदर्‍यात उतरल्यावर आज आमच्याकडे चार पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे चिकणदर्‍यातून सरळ कोकणातल्या डेहण्यात जायचं. दुसरा म्हणजे डेहण्यातच पण बाणच्या नाळेतुन जायचं. तिसरा म्हणजे कुईरानाचा किंवा भायखळ्याचा कडा नावाच्या सुळक्याच्या खिंडीतुन बाणच्या नाळेला ओलांडून परत घाट माथ्यावरच्या साम्रदला यायचं आणि शेवटचा पर्याय म्हणजे रतनगडाला त्याच्या पदरातून वळसा मारुन त्र्यंबक दरवाज्याच्या वाटेला लागायचं आणि पुढच्या मळलेल्या वाटेनं साम्रद गाठायचं. अर्थात पहिल्या तिनही वाटा आमच्या धुंडाळून झाल्यामुळं आम्ही चौथ्या पर्याय वापरुन साम्रद गाठायचं ठरवलं होतं. त्यातून ही वाट कमी अंतराची असल्यामुळं ट्रेक संपवून आम्ही लवकर घरीही पोहचू शकणार होतो.
       आज आम्हाला रतनगडाच्या कोकण दरवाज्यातून जवळजवळ दिडएकशे फुट रॅपलिंग करायचं होतं म्हणून उन्हं चढायच्या आत गडावर पोहोचायला हवं होतं. रॅपलिंगचं फॉर्मेशन करुन रॅपलिंग पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागेल याचा कुणालाच काहीच अंदाज नव्हता. मागल्यावेळी अर्धवट राहिलेली मोहिम परत याहीवेळी अर्धवट ठेवण्याची कुणाचीच इच्छा नव्हती. त्यासाठी पॅचवर आम्हाला जास्तीतजास्त वेळ मिळायला हवा होता. म्हणून सकाळी लवकर आवरुन अंधारातच बाहेर पडलो. साम्रदमधून निघाल्यापासून कुठेच न थांबल्यामुळं उजाडताउजाडता त्र्यंबक दरवाजाच्या पायर्‍यांशी पोहोचलो होतो. दोघेतिघे मागे राहिले म्हणून पायर्‍यांवर थांबून थोडी विश्रांती घेतली. काही वर्षापूर्वीच वनखात्याने या पायर्‍यांना रेलिंग लावलं आहे.


        त्र्यंबक दरवाजाच्या कातळकोरीव पायर्‍यांवर बसून फोटो काढले.

       दरवाज्यातुन गडावर पोहोचल्यावर समोरच घनचक्कर रांगेमागे सुर्योदय होत होता.

        रतनगड आधी बर्‍याचवेळेला पाहिलेला असल्यामुळं कुठेही न फिरता दरवाज्यापासून थेट नेढ्यात गेलो आणि पलिकडील टाक्यांपाशी उतरलो आणि गडाचा कोकण दरवाजा गाठला.



       दरवाज्यापासून खालच्या टप्प्यावर उतरण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या दिसत होत्या तरीपण सुरक्षेसाठी दरवाज्यात असलेल्या असलेल्या बिजागिर्‍यात दोर ओवला आणि त्याच्या आधाराने खालच्या टप्प्यावर उतरलो.

        खालच्या टप्प्यावरुन दरवाज्याच्या बाजूला असलेली तटबंदी सुरेख दिसत होती. या टप्प्यावरही बुरुजाचं थोडसं बांधकाम शिल्लक होतं. त्याच्या आणि उजव्या बाजूच्या खडकामधून खाली सातआठ फुटांचा एक टप्पा होता.


       या टप्प्यापासून पुढे मात्र बर्‍याच खालपर्यंत वळणावळणाची खोदीव पायर्‍यांची रांग दिसत होती. खरं म्हणजे या पायर्‍यांवरुन चालतही खालपर्यंत उतरता आलं असतं पण सगळ्या पायर्‍या अगदीच लहान होत्या. त्यांच्या बाजूच्या कातळाला सुरक्षा दोर बांधण्यासाठी प्रसरणात्मक खिळे ठोकणं वगैरे एकंदरीत वेळखाऊ काम होतं. त्यामुळं ते सगळं टाळून सरळ रॅपलिंग करुनच खाली उतरलो. रॅपलिंग करताना दुसर्‍या टप्प्यापासून पुढे मधेच असलेला एक आठदहा फुटांचा ओव्हरहँग सोडला तर थेट शेवटपर्यंत कातळकोरीव पायर्‍यांची रांग दिसत होती.



        पायर्‍यांच्या खालच्या बाजूला थोडं उजवीकडं कड्याखाली कोरडं असलेलं पाण्याचं खोदीव टाकं दिसलं.

       एकएक करत सगळेजण खाली उतरल्यावर वर उभ्या असलेल्या दत्ताला आवाज देऊन घरी जेवण बनवायला सांगितलं. गावात पोहोचेपर्यंत उशीर होणार होता म्हणून आमच्यासोबत आम्ही आणलेलं थोडंफार खाऊन घेतलं.


        आज सोबत असलेल्या जितेंद्र परदेशीचा वाढदिवस होता. त्याला कळू न देता बाकीच्यांनी त्याच्यासाठी रानफुलांचा बुके तयार करून त्याला दिला. त्याचा असा वाढदिवस साजरा केल्यावर त्यालाही थोडं गहीवरुन आलं. खरंच ज्यावेळी गड नांदता असेल त्यानंतर क्वचितच त्या ठिकाणी कुणी तिथं गेलं असावं. अशा सह्याद्रीतल्या अनवट ठिकाणी वाढदिवस साजरा होणं म्हणजे भाग्यच.


       गेल्यावर्षी आम्ही डेहण्यातून ज्या वाटेने चढून आलो होतो त्यापेक्षा यावेळी पूर्णपणे वेगळ्या वाटेने जाणार होतो. आत्ता आम्ही नेमक्या त्या सांध्यात होतो जिथून बाणची नाळ सुरु होत होती. आम्हाला रतनगडाच्या ज्या पदरातून ट्रॅव्हर्सी मारायची होती त्या ट्रॅव्हर्सीला पोहोचण्यासाठी थोडं खाली उतरणं भाग होतं. त्यासाठी सांध्यातून उजवी मारली आणि एका लहान ओहोळातून बाणच्या नाळेत आलो.

        खरं म्हणजे बाणच्या नाळेत मोठे कातळटप्पे असल्यामुळं मुख्य नाळेतूनच सरळ खाली उतरुन वर उल्लेखलेल्या तिसर्‍या क्रमांकाच्या वाटेला लागून साम्रद गाठणं काही शक्य नव्हतं. त्यामुळं सरळ खाली न उतरता फक्त ट्रॅव्हर्सीच्या उंचीपर्यंत उतरुन आल्यावर उजवीकडं वळलो. नेमक्या या ठिकाणी वाट थोडी शोधावी लागली. अर्थात अशावेळी घाई गडबडीत कुठल्यातरी वाटेने जाऊन नंतर वाट शोधण्यासाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा नेमक्या ठिकाणी वाट शोधण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला परवडतो, हे अनुभवानं काहीसं जमू लागलंय. ट्रेकमधे नेमकं कुठं थांबायचं हे कळलं की वाटा चुकण्याचा धोका बराच कमी होतो. त्यामुळं तिथं थोडी शोधाशोध केल्यावर एक अस्पष्टशी वाट मिळाली जी नेमकी त्याच दिशेला जात होती जिथं आम्हाला जायचं होतं.


        आमचा नेमक्या त्या ठिकाणी वाट शोधण्याचा निर्णय अगदी योग्यच होता कारण त्या सापडलेल्या वाटेने आम्ही तासाभरात त्र्यंबक दरवाज्याच्या हमरस्त्यावर असलेल्या शिड्यांच्या थोडं खालच्या बाजूला येऊन पोहोचलो होतो. आता ट्रेक जवळजवळ संपल्यातच जमा होता. या हमरस्त्यानं साम्रद गाठून आम्हाला फक्त एक औपचारिकता पूर्ण करायची होती.

       दोन दिवसात झालेली अपुरी झोप, प्रचंड चालणं आणि मळलेल्या कपड्यांमुळं आमचा एकूणच अवतार अगदी गबाळ्यासारखा झाला होता. सगळेजण थकलेले असूनही प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दोन अवघड ट्रेक उत्तमप्रकारे पूर्ण केल्यामुळे झालेला आनंद आणि त्यामुळं आलेला आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. हातपाय धुऊन गरमागरम गावरान जेवणावर यथेच्य ताव मारला.

        घाटघरचा शिपनुरशेजारी असलेला कोकणकडा गाठला आणि तिथं असलेल्या उंबरदार आणि चौंढ्या घाटवाटा माथ्यावरुनच पाहिल्या. इथून आता परतीचा प्रवास सुरु केला तो घाटघर जवळ नवीनच कळलेल्या आणि स्थानिकही अगदी क्वचितच वापर करत असलेल्या दोन अवघड घाटवाटा धुंडाळण्यासाठीच.


ट्रेक भिडू -

१) जितेंद्र परदेशी
२) अर्जुन ननावरे
३) राहुल गायटे
४) नंदकुमार नलावडे
५) मिलींद गडदे
६) महादेव पाटील
७) प्रभाकर कारंडे
८) एकनाथ तेलवेकर
९) संजय मालुसरे
१०) सुरज चव्हाण
११) नितीन लोखंडे
१२) रवि मनकर
१३) नितीन फडतरे
१४) अविनाश मनकर
१५) भोसले
१६) दिलीप वाटवे 




२ टिप्पण्या: