रविवार, २५ जुलै, २०२१

" एक अपरिचित डोंगरयात्रा "

 " एक अपरिचित डोंगरयात्रा "



"कात्रज ते पुरंदर म्हणजेच K2P"

       काही दिवसांपुर्वी मी आणि माझा ट्रेकींगमधला नेहमीचा जोडीदार रघु कात्रज ते भुलेश्वर असा ट्रेक करीत असताना किल्ले पुरंदर आणि वज्रगड उर्फ रुद्रमाळ आम्हांला दुरूनच खुणावत होते. क्षणभर मुरारबाजींच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी आलं. असं त्या पुरंदरात काय होतं कि त्याच्यावरून सातशे मावळ्यांनी आपला जीव क्षणार्धात ओवाळुन टाकला होता. तेव्हाच पुढचा ट्रेक 'कात्रज ते पुरंदर' करायचा अशी खुणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवली होती. पुर्वी हा ट्रेक कोणी केल्याचं ऐकिवात किंवा वाचनातही आलं नव्हतं. तसंच आमच्या संपर्कात असणाऱ्या अनेक ट्रेकर्सपैकी तो कुणीही केला नसल्यामुळं रस्ता शोधण्यापासुन ते ट्रेकला किती वेळ लागेल वगैरे सर्व तयारी करायची होती. आत्तापर्यंत सह्याद्रीतले असे भरपूर आडवाटांचे ट्रेक केल्यामुळं हा ट्रेक सुध्दा यशस्वीपणे पुर्ण करण्याबद्दल आम्हांला पूर्ण आत्मविश्वास होता.

       आमची नेहमीची सकाळची सर्व कामं आटोपून मी, रघु आणि माझी भाची शिवानीला कात्रज घाटापासुन ट्रेक सुरू करायला सकाळचे दहा वाजले. खरंतर ट्रेकींगच्या नियमात हे बसणारं नव्हतं. तसा आमच्या हातात वेळ खूपच कमी होता म्हणून आम्ही कात्रज घाटातल्या वाघजाई देवीला नमस्कार करून ट्रेक चांगला होण्यासाठी साकडं घातलं.

       पुर्वीचा कात्रज घाट-रस्ता वाघजाई मंदिराजवळून जात होता. आजही त्या रस्त्याच्या खुणा काळाशी झुंज देत आपलं अस्तित्व कसंबसं टिकवून आहेत. आज हा रस्ता एक्सप्रेस हायवेच्या युगात अनेकांच्या विस्मृतीत गेला आहे.

       सुरूवातीलाच डोंगरवाटेतल्या मोबाईल टॉवर वरच्या रखवालदाराशी गप्पा मारून पुढं निघालो. कात्रज घाटातल्या लक्ष्मी शिखराला उजव्या बाजूने वळसा घालून डोंगराच्या वाट-नाक्यावर पोहोचायला जवळजवळ एक तास गेला.

       या वाट-नाक्यावरच्या डाव्या बाजूला जाणारी वाट ही बोपदेव घाट, कानिफनाथ, दिवे घाट, मल्हारगड, ढवळेश्वर मार्गे किल्ले दौलतमंगळ उर्फ भुलेश्वरला जाते तर उजवी वाट पुरंदरकडे जाते.




       रस्त्यात स्फटिकासारख्या पाण्याचा एक ओढा होता. त्या ओढ्याच्या गारेगार, प्रदुषण विरहीत पाण्यानं शरीरात नवा जोम संचारला.


       पुढं दरेगावला जाताना टेकडीवर शंकराचं एक मंदिर लागलं. जवळजवळ शंभर लोकांना मुक्काम करता येईल एवढया प्रशस्त सभामंडपाचं बांधकाम चालू होतं. मंदिराचा पुजारी मंदिराच्या शेजारीच रहात असल्यानं त्याला दरेगावचा रस्ता विचारून पुढे निघालो.



       दरेगावला कऱ्हा नदीचा उगम आणि कऱ्हामाता मंदिर आहे. मंदिराच्या जुन्या दगडी बांधकामात सुंदर गोमुख आहे. या छोटेखानी मंदिराच्या परिसरात आल्यावर आचार्य अत्रे लिखित 'कऱ्हेचे पाणी' या त्यांच्या आत्मचरित्राची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.





       दरेगाव सोडल्यावर लगेचच एक छोटासा बंधारा घातलेलं तळं लागलं. गावातले दोघं-तिघं जण करमणूक म्हणून त्या तळ्यात गळ टाकून मासेमारी करीत होते. तळं सोडल्यावर पुढं सासवडहून 'मरिआई' घाटाला जाणारा आडवा रस्ता लागला. दुपारचा एक वाजला होता आणि कडाडून भुकही लागली होती. दरेगावच्या पुढे थापेवाडीच्या रस्त्याच्या कडेला बसुन बरोबर आणलेलं थोडेसं खाऊन घेतलं. पोटोबा शांत झाल्यानं थकलेल्या शरीरात लगेचच नवचैतन्य संचारलं.

       थापेवाडी पार करून दुरकरवाडीत पोहोचलो तोपर्यंत साधारण दिड वाजला होता. रस्त्यात वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं लक्ष वेधून घेत होती. छोटेखानी झुडूप असलेली पावसाळ्यात येणारी 'भारंग' सुध्दा बहरली होती. याच्या जांभळ्या फुलांची किंवा कोवळ्या पानांची भाजी करून खातात.





       दुरकरवाडीतच पण जरासं आडबाजुला 'मानाई' देवीचं छोटेखानी सुंदर मंदिर लागलं. मंदिराच्या परिसरात अनेक छोटी-मोठी झाडे होती. त्यापैकी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली असलेल्या या मंदिराला गोलाकार वळसा घालून एक ओढा वाहतोय. त्या खळाळत वाहणाऱ्या ओढ्यावरच्या पुलावरून या मंदिरात जाता येतं. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. शेजारीच हातपंप असल्यानं क्षणभर विश्रांतीसाठी, न्याहारी आणि भोजनासाठी तर हा परिसर अतिशय उत्तम आहे.





       दुरकरवाडीतुन बाहेर पडल्यावर सोमुर्डी गावाच्या वाटेवर उजवीकडे जुन्नर जवळच्या नाणेघाटासारखी खिंड दिसली. आपोआपच आमचे पाय खिंडीकडे वळले. या खिंडीला स्थानिक लोक दुरकरवाडीची किंवा सप्रेवाडीची खिंड म्हणतात. खिंडीच्या उत्तरेस थोडं खालील बाजूला असलेल्या गावातून पुर्वी राजगड-तोरण्याकडुन येणारा मार्ग असावा असं सहजच वाटलं पण खात्री करून घेण्यासाठी आसपास कोणीच नसल्यामुळं आणि दुपारचे सव्वादोन वाजल्यानं वेळ न दवडता पुढं निघालो.

       दुरकरवाडीच्या पुढच्या सोमुर्डी गावात पोहोचायच्या अलीकडे एक शेततळं लागलं. तळ्याच्या काठावर एका मोठया दगडापाशी जरा विसावलो त्यावेळी दुपारचे चार वाजले होते.


       समोरच 'चंद्र पर्वत' दिसत होता. सोमुर्डी गावाच्या हद्दीत असलेल्या या चंद्र पर्वतावर आणि गावात अशा दोन्ही ठिकाणी भैरवाचं मंदिर आहे. गावातलं मंदिर चांगलं प्रशस्त आहे. चंद्र पर्वतावरून एक धार खाली उतरली आहे. त्या धारेवरची खिंड ओलांडून पुरपोखर गावी पोहोचलो.


       सोमुर्डीपासुन पुरपोखर साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जसा सोमुर्डीला चंद्र पर्वत आहे तसा पुरपोखरला 'सुर्य पर्वत' आहे. या सुर्य पर्वतावरच कानिफनाथांचं छोटेसं मंदिर आहे.

       पुरपोखर गावाच्या जवळ एक वृद्ध शेतकरी वाळत घातलेल्या भुईमुगाच्या शेंगा उचलून पोती भरत होता. बोलता बोलता तो म्हणाला गाडीरस्ता पुरंदरला येत असताना तुम्ही चालत का पुरंदरला आलात? तो माळकरी दिसल्यानं मी त्याला म्हटलं तुम्हांला पंढरपूरला वारीला जाऊन जे मिळतं तेच आम्हांला असं चालत येऊन मिळतं. विठ्ठल जसं तुमचं दैवत तसंच शिवराय हे आमचं दैवत आणि गड किल्ले हीच आमची तिर्थस्थळे. दोघेही वारकरीच. न रहावून दोघेही एकमेकांच्या पाया पडलो. असो, त्याच्याशी गप्पा मारता मारता शेंगांचा मनमुराद आस्वाद घेतला.

       पुरपोखरनंतर किल्ले पुरंदरच्या पायथ्याच्या नारायणपुर गावात पंधरा मिनीटातच पोहोचलो. गावातल्या गजबटात जास्त वेळ न घालवता पायथ्याशी असणाऱ्या नारायणपेठ मार्गे तडक पुरंदरचा बिनी दरवाजा गाठला. समोरच्या मुरारबाजींच्या पुतळ्यासमोर उभं राहिल्यावर क्षणार्धात पुरंदरच्या युद्धाचा प्रसंग डोळ्यांपुढं जसाच्या तसा उभा राहिला. हाकेच्या अंतरावरचा वज्रगड हातातून गेला होता. पुरंदरची पुरंदरेश्वराचं मंदिर, बिनी दरवाजा असलेली माची आणि भैरवखिंडही ताब्यातून गेली होती. फक्त बालेकिल्लाच काय तो शिल्लक राहिला होता. मुरारपंत पडले होते आणि तरीही गडावरच्या मावळ्यांनी महाराजांना निरोप धाडला की 'एक मुरारबाजी पडले म्हणून काय झालं? सातशे मुरारबाजी अजूनही जिवंत आहेत. महाराज, काळजी नसावी.' या मावळ्यांना प्रसंगी स्वतःच्या जीवाची होळी करण्यासाठी कुठून प्रेरणा मिळत असेल? असा विचार फक्त मनात जरी आला तरी अचंबित व्हायला होतं. शिवकाळात घडलेला प्रत्येक युद्धप्रसंग कल्पनातीत धाडसामुळं मावळ्यांनी इतिहासात अक्षरशः अजरामर करून टाकला आहे. धन्य ते मावळे आणि धन्य त्यांची ती स्वराज्यनिष्ठा. 

       रघूने हाक मारली आणि एकदम भानावर आलो. भूतकाळ कितीही गौरवशाली असला तरी वर्तमानात आता समोर वाढून ठेवलेल्या प्रसंगांना सामोरं जायलाच हवं होतं. पायथ्याच्या नारायणपूरातून पुण्याला जाणारी शेवटची एसटी चुकवून चालणार नव्हतं त्यामुळं गडावरच्या पुरंदरेश्वराला दंडवत घालून जड पावलानंच ट्रेकची यशस्वी सांगता केली ती मागे सोडलेल्या दुरकरवाडीतल्या खिंडीचा ट्रेक करण्याचा संकल्प सोडूनच...





🚩 ट्रेकची तारीख - २८ जुलै २०११.

🚩 फोटो - गुगल, दिलीप वाटवे.

🚩 ट्रेकभीडू -

१) दिलीप वाटवे 

२) रघूराज एरंडे

३) शिवानी तापस

लेखनसीमा.






शनिवार, १७ जुलै, २०२१

"भुलेश्वर रांग"

 "भुलेश्वर रांग"

       आपण प्रत्येकजण एका पत्त्यावर रहात असतो, जो आपण बऱ्याच जणांना आणि बरेचदा सांगतही असतो. बरोबर ना? मग जर आपल्यासारखाच आपल्या सिंहगडाला पण त्याचा 'भौगोलिक' पत्ता सांगायचा असेल तर तो कसा सांगेल बरं?

तर तो बहुधा असा सांगेल...

       'महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाच्या म्हणजेच सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे फुटलेल्या भुलेश्वर रांगेवर विंझरजवळ अजून एक फाटा फुटला आहे. या फुटलेल्या आणखी एका उपफाट्यावर मी 'सिंहगड' मुक्कामाला असतो.'

       आम्ही पुणे व्हेंचरर्सच्या बेसिक अॕडव्हेंचर कोर्सला डोंगररांगा, नद्यांची खोरी यांची माहिती मुलांना आवर्जून सांगतो. कारण एकच ते म्हणजे मुलांच्या भटकंतीची सुरूवातच 'डोळस भटकंती'तून व्हावी. प्रत्यक्षात मुलांना सांगताना वेळेअभावी ते थोडक्यात सांगितलं जातं पण ज्यांना सखोल माहिती हवी आहे त्यांच्यासाठी हे मुद्दाम लिहिलंय. बघा आवडतंय का? तर मग आपला मूळ मुद्दा...

'भुलेश्वर रांग नक्की कशी आहे?'

       तर ही भुलेश्वर रांग सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेल्या खानुच्या डिग्यापासून सुरू होते आणि कादवेखिंड, पाबेखिंड करत शेवटी नसरापुरला संपते. आपण सिंहगड-राजगड ट्रेक करताना कल्याण दरवाज्याच्या समोरच्या टोकावरून विंझरला उतरतो. त्या टोकापासून भुलेश्वर रांगेला आणखीन एक फाटा फुटलाय जो सिंहगड, कात्रज, बोपदेव घाट, कानिफनाथ, दिवेघाट, मल्हारगड, ढवळेश्वर करत शेवटी भुलेश्वरला संपतो. पण या फाट्यालाही कात्रज घाटापुढच्या लक्ष्मी शिखराजवळून आणखीन एक उपफाटा फुटलाय जो चंद्र-सुर्यप्रभात डोंगर, पुरंदर, वज्रगड, हरेश्वर, कडेपठार करत शेवटी जेजुरीला संपतो.


       भुलेश्वर रांग जिथून सुरू होते तिथे सुरवातीला ती कानंदी आणि आंबी नद्यांची खोरी विभागते. कानंदी खोऱ्यात घिसर, वेल्हा वगैरे गावं आहेत तर आंबीच्या खोऱ्यात कशेडी, माणगाव, टेकपवळे, घोळ वगैरे गावं आहेत. कानंदीवर चापेट धरण आहे तर आंबीवर पानशेत. पुढे कानंदीला गुंजवणी मिळते आणि पुढे कानंदी कासुर्डीजवळ नीरेला. पानशेतची आंबी पुढे वरसगाव धरणाच्या मोसीला मिळते आणि या दोघींचं पुढे टेमघरमधून आलेल्या मुठेबरोबर सूत जुळल्यावर तिघी गुण्यागोविंदाने खडकवासल्यात येतात आणि पुणेकरांची तहान भागवतात.

       सिंहगड-राजगड ट्रेक करताना सिंहगडाच्या कल्याण दरवाज्यातून बाहेर पडल्यावर आपण एका धारेनेच विंझरच्या उंच डोंगरापाशी जातो आणि खाली धारेवरून उतरून धनगरवाड्यात पोहोचतो. ही जी विंझर टोकापर्यंतची धार आहे तिच्या दोन्ही बाजूलाही दोन नद्यांची खोरी आहेत. उजवीकडे मुठा तर डावीकडे शिवगंगा. सिंहगडाच्या कल्याण दरवाज्याच्या पायथ्याशी असलेली कल्याण, कोंढणपुर, रांझे, खेडशिवापुर ही सगळी गावं शिवगंगेच्या खेडेबारे खोऱ्यात आहेत. एवढंच नाही तर 'खेडेबारे' नावाचं गावही या खोऱ्यात आहे. खरंतर इथं मावळातल्या खोऱ्यांची, मावळांची बरीच नावं आली आहेत त्यामुळं लेखाच्या शेवटी दिलेल्या धाग्यावरून 'मावळ म्हणजे काय?' हे वाचणंही भूगोल समजण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

       एकूण भुलेश्वर रांगेपैकी खानुच्या डिग्यापासून ते नसरापूर आणि इकडे लक्ष्मी शिखरापर्यंतची भुलेश्वर डोंगररांग धारेच्या स्वरूपाची आहे पण नंतर मात्र ती पठारी स्वरूपाची होते त्यामुळे लक्ष्मी शिखरापर्यंत या रांगेला ओलांडणारे रस्ते/वाटा खिंड प्रकारच्या आहेत. थोडक्यात घाटवाट चढून दुसऱ्या बाजूला लगेचच उतरते पण लक्ष्मी शिखरानंतरच्या रांगेवर मात्र घाटवाटा फक्त चढून येतात. एकूण सांप्रत घाटवाटांपैकी काही घाटवाटा अर्वाचीन आहेत तर काही प्राचीन आहेत. काही घाटवाटांवर डांबरी रस्ते आहेत तर काही ठिकाणी अजूनही कच्चे रस्ते आहेत तर काही वाटा अजूनही फक्त पाऊलवाटाच आहेत.

       पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या या रांगेवर पहिला रस्ता आहे तो म्हणजे माणगावपासून डिगेवस्ती/चांदर. नंतरच्या कादवेखिंड आणि पाबेखिंड या घाटवाटा तर पुणेकरांमधे प्रसिध्दच आहेत. नसरापूरकडे उतरणाऱ्या फाट्यावर निगडे घाट आणि कुसगावखिंड हे दोन अतिशय छोटे घाट आहेत, जे खेडेबारे खोऱ्यातून गुंजन मावळात उतरतात. इकडच्या कात्रज घाटाचा शिंदेवाडी बोगदा अगदी नवीन तर जुना रस्ता प्राचीन. या प्राचीन कात्रज घाटानंतरच्या घाटवाटा फक्त चढून येणाऱ्या आहेत. यात नारायणपूर घाट, दुरकरवाडी घाट ऊर्फ गराडखिंड, मरिआई घाट, बोपदेव घाट, होळकरवाडी घाट, दिवेघाट (जुना), दिवेघाट (नवा), शिंदवणे घाट, ताम्हणवाडी घाट आणि शेवटचा भुलेश्वर घाट सांगता येईल. या सर्व घाटांपैकी दुरकरवाडी घाट, जुना दिवेघाट आणि ताम्हणवाडी या घाटवाटा शिवपूर्व काळापासून अस्तित्वात असाव्यात. यातल्या दिवेघाटात आजही कात्रज घाटासारख्या पाण्याच्या खोदीव टाक्या पहायला मिळतात.


       वर उल्लेखलेला दुरकरवाडी घाट ऊर्फ गराडखिंड तर ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक पण कशी? तर अशी...

       "शाहिस्तेखानाला पुण्याला आला त्यावेळी त्याला मराठ्यांची काळजी करायची गरज नव्हती कारण खुद्द महाराज याच काळात सिद्दी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. पण त्याला मराठ्यांच्या गनिमीकाव्याची चुणूक समजलीच. तो शिरवळहून गराडखिंडीने सासवडकडे येत असताना मराठ्यांच्या म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या तुकडीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की आघाडीवर चाललेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला. गराडे ते सासवड हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. मराठ्यांनी या एवढ्या कमी अंतरामध्येही खानाला हैराण करून सोडले. ही घटना साधारण एप्रिल १६६० च्या शेवटचा आठवड्यात घडली."

       या गराडखिंडीतून थोडं पुढं आल्यावर 'कोडीत' नावाचं गाव लागतं. 'मराठी सैन्यानं मोघलांचं सैन्य या ठिकाणी कोंडीत पकडून त्यांची दाणादाण उडवली होती म्हणून त्या गावाचं नंतर कोडीत असं नामकरण झालं' अशी या गावाबद्दल त्या भागात आख्यायिका ऐकायला मिळते. मुळातच ही गराडखिंडीची घाटवाट खुपच सुंदर आहे आणि पावसाळ्यानंतर तर या परिसराचं सौंदर्य अजूनच खुलतं. या वाटेने मोटारसायकल वरून आजही सहज जाता येतं. चेलाडीपासून तर अगदी हाकेच्या अंतरावर ही घाटवाट आहे. घाट चढून गेल्यावर वरच्या बाजूला दुरकरवाडी हे छोटंसं खेडेगाव आहे. घाटमाथ्यावर एक छोटीशी खिंड आहे. स्थानिक लोक तिला दुरकरवाडीची किंवा सप्रेवाडीची खिंड म्हणतात. हा शिवकाळातला बहुधा पुरंदर ते राजगड असा मार्ग असावा. खरं काय ते जाणून घेण्यासाठी या वाटेचा मुद्दाम एकदा अभ्यास दौरा करायला हवा.

       खानुचा डिग्याचा भाग हा मुख्य रांगेवर असल्यामुळं प्रचंड पाऊस पडणारा तर जेजुरी किंवा भुलेश्वर भाग पर्जन्य छायेचा प्रदेशात मोडतो. साहजिकच या एकाच रांगेवर पश्चिमेकडून पूर्वेकडे जैवविविधतेत प्रचंड बदल होत गेलेला जाणवतो.

       या रांगेवर असलेली कात्रज ते सिंहगड म्हणजे K2S डोंगरयात्रेची पुणेकर मंडळी चक्क पारायणं करतात पण 'खानुचा डिगा ते पाबेखिंड, पाबेखिंड ते नसरापुर', 'विंझर धनगरवाडा/सिंहगड ते कात्रज', 'कात्रज ते दिवेघाट', 'दिवेघाट ते शिंदवणे घाट', 'शिंदवणे घाट ते भुलेश्वर', 'कात्रज ते पुरंदर' आणि 'पुरंदर ते जेजुरी' अशी वेगवेगळ्या एकदिवशीय डोंगरयात्रा असलेली भुलेश्वर रांग टप्प्याटप्प्याने का होईना पण भटकायला हवी.

       भुलेश्वर रांगेवरचा 'सिंहगड' हा एक अतिशय महत्त्वाचा किल्ला. जो किल्ला स्वतःच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना आदिलशाही कैदेतून सोडविण्यासाठी सुद्धा महाराज द्यायला तयार नव्हते. मोगलांबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात महाराजांनी सिंहगडाच्या दरवाज्याची किल्ली स्वतः दिली आणि दस्तुरखुद्द औरंगजेबाने याचं नाव 'बक्षींदाबक्ष' म्हणजे 'देवाची देणगी' असं ठेवलं यावरूनच त्याचं सामरिक महत्त्व लक्षात येईल. सिंहगडाचं सामरिक महत्त्व कळण्यासाठी सिंहगड ज्या भुलेश्वर रांगेवर आहे ती भुलेश्वर रांग भौगोलिकदृष्ट्या समजायलाच हवी आणि नुसती समजायला हवी एवढंच नाही तर जैवविविधता, घाटवाटा, खिंडी, देवस्थाने, किल्ले, पाण्याच्या टाक्या, नद्यांची उगमस्थाने आणि ऐतिहासिक ठिकाणं यांची रेलचेल असलेली आपली भुलेश्वर रांग एक पुणेकर म्हणून तरी एकदा जोखायलाच हवी. बरोबर ना? तर मग मंडळी भुलेश्वर रांग जोखायला कधी करताय सुरूवात? 

🚩🚩

        माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही 

॥ मर्यादेयं विराजते ॥

🚩 'मावळ म्हणजे काय?' हे या दुव्यावर टिचकी मारून वाचता येईल.

🚩 फोटो - 

१) गुगल

२) महादेव पाटील

समाप्त.

सोमवार, १७ मे, २०२१

"भूगोल प्रतापगड पर्वात वापरल्या गेलेल्या वाटांचा"

 "भूगोल प्रतापगड पर्वात वापरल्या गेलेल्या वाटांचा"


🚩 विषयप्रवेश...


       तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी घटना जशी तुमच्या पुढच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणते अगदी तशीच एक घटना महाराजांच्या आयुष्यात १६५९ सालात घडली. ज्या घटनेने फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर नाही तर एकंदरीतच महाराष्ट्राच्या तत्कालीन राजकारणावर मोठा प्रभाव पाडला. ती घटना म्हणजे 'प्रतापगड पर्व.'
       रायरेश्वराच्या प्रतिज्ञेपासून म्हणजे २७ एप्रिल १६४५ पासून महाराजांचे स्वराज्याच्या सीमा विस्तारण्याचे प्रयत्न दररोज वाढतच चालले होते. मोगल आणि आदिलशहा या दोघांनी मिळून अहमदनगरची निजामशाही बुडवल्यावर तिच्या प्रदेशाची आपापसात लगेचच वाटणी पण करून घेतली. पैकी आदिलशाहीकडे मावळातील व कोकणातील जो नवीन प्रांत आला त्यामध्ये आणि मोगलांकडे आलेल्या कल्याण, भिवंडी भागात महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न चालवले होते. इ. स. १६३७ सालात निजामशाही बुडवल्यापासून ते इ. स. १६४५ सालात स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू करेपर्यंतच्या मधल्या ८ - १० वर्षांच्या काळात आदिलशाहीकडे आलेल्या पुणे, सुपे, मावळ आणि लगतच्या कोकण भागावर विजापुरकरांचा म्हणावा तसा अंमल बसला नव्हता. तिथले देशमुख, मुलकी अधिकारी म्हणावे तसे आदिलशाहीच्या अंकीत झाले नव्हते. एकूणच सगळीकडे स्वैराचार माजला होता. त्यांच्या बेबंदशाहीला शिवाजी महाराज परस्पर पायबंद घालू लागल्यामुळे आदिलशाहीच्या ते पथ्यावरच पडले होते. त्या सर्वांचा नाश केल्यावर शेवटी एकट्या राहिलेल्या शिवाजी महाराजांची 'योग्य' व्यवस्था लावता येईल असा आदिलशाहीचा डाव होता. त्यामुळे १६५६ पर्यंत फत्तेखानाची स्वारी सोडता विजापुरकरांकडून फारशा स्वार्‍या महाराजांवर झाल्या नाहीत पण त्यानंतर वाई, कराड भागात सीमा विस्तारण्यासाठी महाराजांच्या हालचाली सुरू झाल्या. आता मात्र स्थिरस्थावर असलेल्या म्लेंछ सत्तांना साधारणपणे १६५६ नंतर शिवाजी महाराज म्हणजे एक डोकेदुखी होऊ लागली होती. या त्रासाचा सर्वात मोठा फटका विजापुरच्या आदिलशाहीला बसत होता. शहाजीराजांना अटक वगैरे करूनही ही डोकेदुखी काही केल्या थांबत नव्हती. शेवटी आदिलशाहीने आपला हुकूमाचा एक्का बाहेर काढला आणि मराठे सोडले तर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. हा हुकूमाचा एक्का 'कातील-इ-मुतमर्दिदान' व ‘काफिरान’ म्हणजे बंडखोरांची व काफिरांची कत्तल करणारा आणि 'शिक्नन्दा-इ-बुतान' म्हणजे मूर्ती फोडणारा अफजलखान मुहम्मदशाही होय. त्याच्या बरोबरच्या झालेल्या प्रतापगड युद्धात महाराजांनी केलेला पराक्रम जर का समजून घ्यायचा असेल तर आधी या अफजलखानाला नीटपणे समजून घ्यावं लागेल.

       अफजलखानाची महाराजांवर नेमणूक केल्यावर मोगलही निश्चिंत झाले कारण तत्कालीन दक्खनचा सुभेदार असलेल्या दस्तुरखुद्द औरंगजेबाला अफजलखानाच्या हातून केवळ खान मुहंम्मद खवासखानाच्या मध्यस्तीमुळे एकदा धर्मवाट मिळाली होती. त्यामुळे औरंगजेबही अफजलखानाला चांगलाच ओळखून होता. भविष्यात महाराज ज्यांना त्रासदायक ठरतील असे ब्रिटीश आणि पोर्तुगिजही अफजलखानाच्या या नेमणूकीमुळे निश्चिंत झाले होते. त्यांचा जो काही पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्यातील पत्रांत अफजलखान वधापूर्वीच्या भाषेत आणि नंतरच्या भाषेत चांगलाच फरक जाणवतो. अफजलखान वधापर्यंत जे शिवाजी महाराज फक्त 'एका आदिलशाही सरदाराचा बिघडलेला मुलगा' होते ते वधानंतर मात्र तत्कालीन राजकारणात 'नक्कीच दखल घ्यावी लागेल असे एक सेनानी' झाले होते.
       महाराजांच्या प्रतापगड पर्वाची सुरूवात जावळी सुभा ताब्यात घेतल्यापासून होते तर शेवट मिरजेच्या किल्ल्याच्या वेढ्यापाशी होतो. पुढील लेखात या दोन घटनांदरम्यान घडलेल्या अनुक्रमे या मुद्यांवर चर्चा करणं अधिक संयुक्तिक ठरेल.

१) महाराजांनी जावळी घेण्यासाठी कोणत्या वाटेचा वापर केला असेल?

२) जावळी ताब्यात घेतल्यानंतर चंद्रराव मोरेंच्या रायरीपर्यंतच्या पाठलागाचा मार्ग कोणता?

३) महाराजांच्या आणि अफजलखानाच्या सामरिक हालचाली.

४) कासलोडगडाच्या दुरूस्तीविषयी उहापोह.

५) अफजलखानाची वाई - प्रतापगड वाट.

६) महाराजांना प्रतापगड युद्धाच्या वेळी वापरता येतील अशा अंतर्गत वाटा.

७) अफजलखानाच्या वेढ्यातील सैन्य आणि पारचं सैन्य यांना एकमेकांशी संपर्क ठेवता येईल किंवा प्रसंगी पारला मदतीला येता येईल अशा बहिस्थ वाटा.

८) प्रतापगड परिसरातील घाटमाथ्यावरून पदरात उतरणाऱ्या आणि पदरातून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा.

९) अफजलवधानंतर मुसेखान कोणत्या वाटेने वाईला पळाला?

१०) अफजलवधानंतर महाराजांच्या सैन्याचे तीन भाग आणि त्यांचे मार्ग.

       वर दिलेल्या मुद्यांप्रमाणे पुढे चर्चिल्या जाणाऱ्या लेखाचा विषय प्रतापगड पर्वात वापरल्या गेलेल्या वाटांबद्दल असल्यामुळं 'जावळी ताब्यात का घेतली' किंवा 'जावळी म्हणजे नक्की काय' ते इथे लिहिणं योग्य होणार नाही पण जाताजाता ते वाचणं मात्र नक्कीच आनंददायी असेल. जावळीच्या सीमेबद्दल माहिती करून घेण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं की या लेखाचा आवाका समजण्यासाठी आधी 'जावळी' समजणं अतिशय गरजेचं आहे. पुढील दुव्यावर टिचकी मारून ते तुम्ही वाचू शकता किंवा लेखाच्या शेवटी दिलेल्या दुव्यावरूनही वाचू शकता.

       तर पहिल्या मुद्याप्रमाणे 'महाराजांनी जावळी घेण्यासाठी कोणत्या वाटेचा वापर केला असेल?' ते पाहूया. चला तर मग सुरूवात करू...


🚩 प्रकरण पहिले 


🚩 महाराजांनी जावळी घेण्यासाठी कोणत्या वाटेचा वापर केला असेल?


       महाराजांनी जावळी घेण्यासाठी कोणत्या वाटेचा वापर केला असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर आधी थोडी ऐतिहासिक पार्श्वभुमी जाणून घ्यावी लागेल. वर म्हटल्याप्रमाणे बहुतेक देशमुख, संस्थानिक आपापल्या सीमा वाढवण्याच्या मागे होते त्यामुळे जवळजवळ सर्व देशमुखांत सीमावादामुळे आणि वर्चस्ववादामुळे कायमच कुरबुरी चालत. आता याला जावळीचे मोरे तरी कसे अपवाद असतील. अशाच एका गुंजन मावळातल्या हैबतराव शिळीमकरांची आणि जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांच्या वादाची तक्रार शिळीमकरांनी महाराजांकडे केली होती. खरंतर शिळीमकर हे मोरेंचे मामा. या वादात महाराजांनी शिळीमकरांचा पक्ष घेतल्यामुळं साहजिकच शिळीमकरांची बाजू वरचढ झाली होती. महाराज शेवटी बाहेरचे असल्यामुळे या घरच्या वादात महाराजांविरूद्ध शिळीमकरांचे कान भरण्याचे काम कुणीतरी करत होतं. या संदर्भात एक कौलनामा उपलब्ध आहे.

शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड १ - पत्र क्र. ७०८

शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड १ - पत्र क्र. ७०८
 
         तशी जावळी ताब्यात आणण्यासाठी जी बरीच कारणं होती त्यात हेही एक कारण होतं. या सर्व कारणांचा परिपाक म्हणून महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना जोर खोर्‍यात पाठवून हणमंतराव मोरेंना ठार केलं आणि जोर खोरं ताब्यात आणलं. आता मराठ्यांची सीमा जोर खोर्‍यापर्यंत वाढली होती पण अजूनही जावळी खोरं मात्र ताब्यात आलं नव्हतं. तिथल्या मोर्‍यांचं निश्चित नाव सापडत नाही. जेधे शकावली आणि जेधे करिण्यात चंद्रराव मोरे असेच उल्लेख मिळतात. नंतर स्वतः शिवाजी महाराजांनी जेधे, बांदल आणि शिळीमकर देशमुखांचा जमाव सोबत घेऊन जावळी ताब्यात आणली. 
जेधे शकावली

जेधे करिणा

       ९१ कलमी बखरीत महाराज स्वतः महाबळेश्वरहून निसणीच्या घाटाने तर रघुनाथ बल्लाळ व माणकोजी दहातोंडे रडतोंडीच्या घाटाने चाळीस हजार सैन्यासह जावळीच्या खोऱ्यात उतरले आणि वेढा घालून जावळी घेतली असा उल्लेख आहे. जावळीकर मोर्‍यांची छोटी बखर सुर्यराव काकडेंनी दोन हजार हशम घेऊन, निसणीने उतरून दर्‍यामार्गे जावळीस वेढा घातला असं सांगते. कॅप्टन ग्रॅट डफच्या 'History Of The Marathas' चा स्वैर मराठी अनुवाद असलेली मराठ्यांची बखर आणखी वेगळं तर सांगतेच पण बरीच नावंही चुकीची सांगते. पण कोणतेच ऐतिहासिक साधन जोर खोर्‍यातूनच महाबळेश्वर गाठले असा उल्लेख करत नाही. राजगडापासून जोर खोर्‍यापर्यंतचा मुलूख आता मराठ्यांकडे होता त्यामुळं मराठे नक्कीच जोर खोर्‍यातून गेले. दुसरं असं की महाराजांसोबत असलेले सैन्य हे जवळच्याच गुंजन मावळातल्या शिळीमकरांचं, हिरडस मावळातल्या बांदलांचं आणि भोर खोऱ्यातल्या जेधेंचं होतं. साहजिकच ते जोर खोर्‍यातूनच गणेश घाटाने क्षेत्र महाबळेश्वरला गेले आणि निसणीने उतरून जावळी ताब्यात घेतली.

९१ कलमी बखर
 
९१ कलमी बखर
 
जावळीकर मोर्‍यांची छोटी बखर
मराठ्यांची बखर
 
         शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य जोर खोर्‍यात नेमक्या कोणत्या वाटेने गेलं असेल? तर त्यासाठी हिरडस मावळ ते जोर खोरं दरम्यानचा भूगोल खाली दिलेल्या नकाशात पाहिला म्हणजे थोडा अंदाज येईल.
 
 
       हिरडस मावळ ते जोर खोरे दरम्यान रायरेश्वरची महादेव रांग आणि कोळेश्वर रांग आहे. या दोन्ही रांगा सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होतात. पैकी महादेव रांग मुख्य रांगेपासून सुरू होऊन फलटण जवळच्या शिखर शिंगणापुरजवळ संपते तर कोळेश्वर रांग मुख्य रांगेपासून सुरू होऊन लगेचच कमळगडापाशी संपते. महादेव रांग आणि कोळेश्वर रांगेदरम्यान जांभळी खोरं आहे जिथून वाळकी ऊर्फ कमंडलू नदी वाहते, जी पुढे जाऊन कृष्णेला मिळते. कोळेश्वर रांग आणि महाबळेश्वर रांगेदरम्यान जोर खोरे आहे जिथून कृष्णा नदी वाहते. सध्या जोर खोर्‍यात कृष्णा नदीवर बलकवडी आणि धोम अशी दोन धरणे बांधलेली आहेत. महादेव रांगेवर रायरेश्वराचं मंदिर आहे तर कोळेश्वरावर कोळेश्वराचं मंदिर आहे. रहाळातल्या सर्वांचीच ही दैवतं त्यामुळे साहजिकच बऱ्याच वाटा या दोन्ही रांगांवर चढून जातात. जशा सांप्रत काळात या वाटा आहेत तशाच शिवकाळातही या वाटा नक्कीच असणार. यातल्या काही दुर्गम आहेत तर काही सोप्या. पाहूया कोणत्या आहेत त्या.


🚩 रायरेश्वरवर चढून जाणार्‍या वाटा -
१) श्वानदरा
२) गायदरा
३) गणेशदरा/ रडतोंडीची वाट
४) सांबरदरा
५) लोहदरा
६) वाघदरा
७) खाळप्याचा दरा
८) कुकडीदरा
९) नाखिंदा दरा/ अस्वलखिंड
१०) मारदांड/ सोंडदरा
११) निसणीचा दरा
१२) वारदरा
१३) खाकरादरा

🚩 कोळेश्वरवर चढून जाणार्‍या वाटा -
१) साळूशीचा दरा
२) कुंबळ्याची धार
३) बेटकवणी
४) कोळ्याचं दार
५) आसनधार
६) कंबळदर्‍याची वाट
७) गडाडा
८) ओव्हाचं दार
९) तळमाळ
१०) रायकण्याची वाट

       महाराज आणि त्यांचं सैन्य पुढे दिलेल्या या तीन मार्गानं बहुधा गेलं असावं. कोणते आहेत हे तीन मार्ग? चला पाहूया.

🚩 मार्ग पहिला - हिरडस मावळ किंवा भोर खोर्‍यातून जोर खोर्‍यात सह्याद्रीच्या मुख्य रांगेजवळून जायचं तर आधी रायरेश्वर रांग चढून जांभळीच्या खोर्‍यात उतरावं लागेल मग जांभळीच्या खोर्‍यातून कोळेश्वर रांग चढावं लागेल आणि मगच जोर खोर्‍यात उतरता येईल. म्हणजे वर दिलेल्या रायरेश्वर आणि कोळेश्वरच्या वाटांमधून रायरेश्वराच्या दोन आणि कोळेश्वराच्या दोन वाटा शोधाव्या लागतील, ज्या त्यातल्या त्यात कमी त्रासाच्या आणि निर्धोक असतील.

🚩 मार्ग दुसरा - पहिल्या वाटेवर असणारा सर्व द्रविडी प्राणायाम टाळायचा असेल तर सांप्रतच्या महादेव रांगेवर असलेल्या मांढरदेवी घाटातून वाई गाठावी लागेल आणि मग कृष्णाकाठाने जोर खोर्‍यात जाता येईल. हा मार्ग कमी त्रासाचा असला तरी लांबच्या अंतराचा आहे. त्यातूनही हा मार्ग पांडवगडाजवळून जात असल्यामुळं पांडवगड त्यावेळी कुणाच्या ताब्यात होता तेही पहायला लागलं. ०७ ऑ़टोंबर १६७३ साली पांडवगड आदिलशाहीकडून मराठ्यांनी घेतल्याची नोंद मिळते. दुसरं असं की वाई सुभा अफजलखानाचा वध होईपर्यंत म्हणजे १६५९ सालापर्यंत जर आदिलशाहीकडेच असेल तर मराठे १६५६ साली पहिल्यांदा जोर खोरं आणि नंतर जावळी ताब्यात घेण्यासाठी या दुसर्‍या कमी त्रासाच्या पण धोकादायक मार्गाचा अवलंब करतील का? जर नसेल तर मग महाराज कोणत्या वाटेने जोरखोर्‍यात गेले असतील?

🚩 मार्ग तिसरा - आणखीन एक पर्याय होऊ शकतो तो म्हणजे पुणेकर ट्रेकर्स मंडळी भोर ते महाबळेश्वर ट्रेक करतात साधारण तसा. भोर खोर्‍यातून आंबवडे मार्गाने कोर्ल्यात जायचं. पुढे श्वानदऱ्याच्या वाटेने रायरेश्वर-केंजळगड दरम्यानच्या खिंडीत चढून जायचं आणि पलिकडे खावलीला उतरायचं. पुढे वाळकी नदी ओलांडून म्हणजे सध्याच्या धोम धरणाचा पाणी फुगवटा ओलांडून वासोळ्यात जायचं. मग वासोळ्यातून कोळेश्वर रांगेवर चढून न जाता कोळेश्वर रांगेच्या टोकाशी असलेल्या कमळगडाला वळसा मारून कृष्णाकाठाने मग जोर खोऱ्यात जाता येईल. पहिल्या चढ-उताराच्या आणि दुसर्‍या मांढरदेवी खिंडीतून जाणाऱ्या पर्यायापेक्षा हा शेवटचा पर्यायच जास्त योग्य वाटतो.

       अखेर निबीड जावळी ताब्यात तर आली. लगेचच तिथून चंद्ररावाची बाजी आणि कृष्णाजी नावाची दोन मुले रायरीला निसटली. जावळीची व्यवस्था लावून महाराजांचं सैन्य पाठोपाठ त्यांच्या पाठलागावर गेलं. ते कसं गेलं असेल? पाहूया पुढच्या प्रकरणात.

🚩 प्रकरण दुसरे


🚩 जावळी ताब्यात घेतल्यानंतर चंद्रराव मोरेंच्या रायरीपर्यंतच्या पाठलागाचा मार्ग कोणता?


       जावळी ताब्यात घेण्यापूर्वीच मोरेंची जोर आणि जांभळी खोरी मराठ्यांनी हस्तगत केली होती. जावळी काबीज केल्यावर मोरे जावळीतून रायरीस पळाले हेही आपण मागं पाहिलं. याबद्दल शिवापुर दफ्तरातील यादीत काय संदर्भ आले आहेत ते पाहू.

       जावळी ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी एक मोठी तुकडी रडतोंडी घाटाने पाठवली. रडतोंडी ही त्या परिसरातील एक महत्त्वाची घाटवाट. महाबळेश्वरहून ही घाटवाट पारला उतरते. साहजिकच बहुतेक सर्व राबता याच घाटवाटेतून होत असे. या घाटवाटेने मराठे येत आहेत म्हटल्यावर मोरे जावळी सोडून जावळीच्या दक्षिणेकडे असलेल्या रडतोंडीच्या पायथ्याशी असलेल्या पारला गेले आणि तिथे त्यांची मोठ्या तुकडीशी चकमक झाली. दरम्यान इकडे जावळी मोकळी झालीये म्हटल्यावर महाराजांनी मागून निसणीने थेट दऱ्यात उतरून जावळीच ताब्यात घेतली. थोडक्यात जावळी घेण्यासाठीची लढाई प्रत्यक्ष जावळीत न होता रडतोंडीच्या पायथ्याशी झाली. जावळी ताब्यातुन गेल्याचं समजल्यावर मोरेंनी पुन्हा उत्तरेकडे जावळीत न जाता आणखी दक्षिणेकडे असलेल्या जवळच्याच मकरंदगड, हातलोट किंवा घोणसपुरचा आश्रय घेतला असावा. जावळी ताब्यातून गेली म्हणून लगेचच ते रायरीला गेले असं नक्कीच होणार नाही. ती पुन्हा घ्यायचा त्यांनी जरूर प्रयत्न केला असणार. त्या परिसरात घोणसपुर, मकरंदगड सारखी सुरक्षित आणि जावळीवर हल्ला करण्यासाठी मोक्याची दुसरी जागा दिसून येत नाही. बरं या सर्व जागा त्यांच्याकडेच असल्यामुळे मोरे नक्कीच तिथे जातील. वर दिलेल्या शिवापुर यादीनुसार...

१) पौष वद्य १४ शके १५७७ - १५ जानेवारी १६५६ - जावळी घेतली.

२) चैत्र शुद्ध १५ शके १५७८ - ३० मार्च १६५६ - जावळीहून स्वार झाले.

# ७४ दिवस

३) चैत्र वद्य सप्तमी - ०६ एप्रिल १६५६ - रायरीस आले.

# ७ दिवस

४) भाद्रपद वद्य तृतीया - २७ सप्टेंबर १६५६ - चंद्रराव मोरे पळाले.

# १७४ दिवस म्हणजे जवळजवळ ०६ महिने.

       जावळी घेऊन तिची व्यवस्था लावल्यानंतर ७४ दिवसांनी महाराज जावळीहून रायरीला जायला निघालेत. या ७४ दिवसांत मोरेंनी जावळी घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले असावेत. जावळी ते रायरी प्रवास ०७ दिवसांचा. पुढे ०६ महिने रायरी मोऱ्यांनी लढवला.

       अर्थात 'मोरे घोणसपुरला गेले' याला सध्या तरी कोणताच ऐतिहासिक संदर्भ मिळालेला नाही, तो एक तर्कच आहे. जर ते घोणसपुरला गेले असतील आणि तिथूनच रायरीला गेले असतील तर घोणसपुर ते रायरी या मार्गाचा शोध घ्यावा लागेल. मकरंदगडाच्या आजूबाजूला असलेले कोंडनाळ आणि हातलोट घाट हे कोकणातील जगबुडीच्या खोऱ्यात उतरतात. मोरेंना सावित्रीच्या उपनद्यांच्या म्हणजे काळ आणि गांधारीच्या खोऱ्यातला रायरी गाठायचा असेल तर जगबुडीच्या खोऱ्यातून जाणं अधिक कष्टप्रद आणि वेळखाऊ असेल. त्यामुळे जोपर्यंत अस्सल ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही तोपर्यंत ते जावळीहूनच रायरीला गेले असावेत असं गृहीत धरून ते मार्ग कोणते असू शकतील ते पाहू.

अ) कोकणातून?
आ) ट्रेकर्स मंडळींच्या सध्याच्या प्रतापगड ते रायगड कांगोरी मार्गे करतात तसे?
इ) ढवळे घाटातून?
ई) रायरेश्वर ओलांडून दुर्गाची जननी ऊर्फ मोहनगड शेजारून वरंध घाटमार्गे?

       आपण एकेक शक्यतांचा विचार करूया. मराठी सैन्य चंद्ररावाच्या पाठलागावर गेलं आहे त्यामुळे मोरे रायरीला कसे गेले याबद्दल ऐतिहासिक कागदपत्रांत कुठे काही नमुद केलंय का ते आधी पहावं लागलं. त्या दृष्टीने संदर्भांची जेधे शकावली, जेधे करिणा, ९१ कलमी बखर, जावळीकर मोर्‍यांची छोटी बखर, सभासद बखर आणि मराठ्यांची बखर वगैरे साधनांत शोधाशोध केली पण कुठल्याही ऐतिहासिक साधनांत असे काही संदर्भ सापडले नाहीत. त्यामुळे तर्क लावूनच कोणती वाट असेल ते नक्की करावं लागेल.

जेधे शकावली

सभासद बखर

        पाठलाग घोडदळाने केला की पायदळाने, मोर्‍यांचं सैन्य सोबत होतं की मोजकीच मंडळी होती वगैरे शक्यता लक्षात घेऊन त्यावरून त्यांचे मार्ग ठरवावे लागतील. जावळीकर मोर्‍यांच्या छोट्या बखरीत मोरे हशमांसह गेले एवढाच उल्लेख आहे. हशमांची संख्या मात्र दिलेली नाही. मोरेंना घोड्यावरून रायरीला जायचं तरी आधी त्यांना चालतच कोकणात उतरावं लागेल. तिथून लवकरात लवकर रायरी गाठायचा तर मार्ग कमी त्रासाचा, कमी चढ-उतारांचा आणि कमी धोकादायक असायला हवा. या सर्व शक्यता गृहीत धरून पुढील काही पर्याय दिसून येतात.


अ) जावळीहून चालत लहुळसे - यासाठी दऱ्याचा दांड, धट्याची वाट, कुंभेदांड, दाभिळटोक या घाटवाटा वापरता येतील. लहुळसेहून पुढे घोड्यावरून सावित्री खोऱ्यातून महाड. तिथून पुढे
अ - १) महाड - नातेखिंड - पाचाड - किल्ले रायरी (गांधारी खोरे)
अ - २) महाड - बिरवाडी - छत्री निजामपूर - नाणे दरवाज्यातून किल्ले रायरी (काळ खोरे)
# अर्थात या वाटेवर असणारे चांभारगड आणि सोनगड हे टेहळणीचे किल्ले त्यावेळी मोर्‍यांच्याच अखत्यारीत असावेत.

आ) जावळीहून चालत हारोशी
आ - १) हारोशी - वाडा-कुंभरोशी - दाभिळटोक घाटाने - लहुळसे - कामथीच्या खोर्‍यातून बोरघर - पिंपळवाडी - ढालकाठी - बिरवाडी आणि काळ खोऱ्यातून किल्ले रायरी.
आ - २) हारोशी - पार - पारघाटाने किंवा पांडवदर्‍याने किनेश्वर - कापडे - बोरघर - पिंपळवाडी - ढालकाठी - बिरवाडी आणि काळ खोऱ्यातून किल्ले रायरी.

इ) जावळी - दरे - पांगळा (एलफिस्टन पॉईंट) - मढीमहाल (आॕर्थरसीट पॉईंट) - बहिरीची घुमटी - ढवळे - महादेव मुऱ्हा - कामथे - बोरघर - पिंपळवाडी - ढालकाठी - बिरवाडी आणि काळ खोऱ्यातून किल्ले रायरी.
# चंद्रगड, मंगळगड ऊर्फ कांगोरी (मंगळगड हा एक सुभा देखील आहे.) हे दोन्ही किल्ले जावळी प्रांतातच आहेत साहजिकच ते किल्लेही मोरेंकडेच असावेत.

ई) जावळी - दरे - पांगळा (एलफिस्टन पॉईंट) - मढीमहाल (आॕर्थरसीट पॉईंट) - बहिरीची घुमटी - कोळेश्वर चढून उतरणे - कोळ्याच्या वाटेने रायरेश्वर नाखिंदा चढून कुडलीत उतरणे - दुर्गाडी - मोहनगडाच्या बाजूने शिरगाव - वरंध घाट उतरून बिरवाडी आणि काळ खोऱ्यातून किल्ले रायरी.

       साधारण या मार्गांनी रायरी गाठता येईल पण वर म्हटल्याप्रमाणे चालत की घोड्यावरून, सैन्य होतं की नव्हतं वगैरे बाबींचा विचार नक्कीच करावा लागेल. या शिवाय मार्ग कमी त्रासाचा आणि कमी धोकादायकही असायला हवा. मोरे नक्की कोणत्या वाटेने गेले या निष्कर्षावर येण्यासाठी इतिहासाचा सखोल अभ्यास करून तो मार्ग भूगोलाच्या कसोटीवर ताडून पहावा लागेल. वर सांगितल्याप्रमाणे चांभारगड, सोनगड, चंद्रगड, मंगळगड ऊर्फ कांगोरी स्वतःच्याच ताब्यात असताना मोर्‍यांनी लांबवर असलेला रायरीच का गाठला? तर त्यासाठी नंतरच्या काळात महाराजांनी रायगडाचं सांगितलेलं 'दिड गाव उंच...' वगैरे वर्णन लागू पडतं. इतका बेलाग, अडचणीच्या जागी असलेला अनगड किल्ला ताब्यात असताना मोरे टेहळणीच्या किल्ल्यांचा आश्रय का घेतील? दुसरं असं की वर दिलेल्या एकूण पर्यायात 'आ' पर्याय सुरक्षित आहे पण अतिशय चढ-उताराचा आहे तर 'इ' आणि 'ई' हे वाटांचे पर्याय कमी-अधिक प्रमाणात मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या महाबळेश्वर, जोर, जांभळी आणि हिरडस मावळांतून जातात त्यामुळे हे मार्ग मोर्‍यांच्या दृष्टीने काहीसे धोकादायक आहेत त्यामुळे या सर्व पर्यायात पहिला पर्यायच जास्त योग्य वाटतो.

       पुढे मोर्‍यांनी किल्ले रायरी जवळजवळ सहा महिने लढवला. अखेर हैबतराव आणि बाळाजी शिळीमकरांनी मध्यस्थी केली आणि मोरे किल्याखाली उतरले. राजांनी बाजी आणि कृष्णाजी मोर्‍यांचा सन्मान केला. मोरे पुढे चाकणला आले आणि तिथून त्यांनी मुधोळकर घोरपड्यांशी संधान बांधायला सुरूवात केली. ही गोष्ट महाराजांना कळल्यावर त्यांनी मोर्‍यांचा चाकणला/पुण्याला शिरच्छेद केला. या मोर्‍यांनीच अफजलखानाला प्रतापगडाच्या लढाईसाठी मदत केली आणि मुसेखानाला देखील सुरक्षितपणे वाईला आणून सोडलं. महाराजांवर चालून आलेला अफजलखान हा काही कच्चा योद्धा नव्हे. त्याने शिवाजी महाराजांना मैदानी प्रदेशात लढाईला आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण महाराज त्याच्या या योजनेला काही बधले नाहीत. अफजलखानाने महाराजांना मैदानी प्रदेशात लढाईला आणण्यासाठी कायकाय केलं आणि महाराजांनी त्याला कसा काटशह दिला हे पाहणं म्हणजेच त्या दोघांच्या सामरिक हालचाली पाहणंही इथे संयुक्तिक ठरेल.


🚩 प्रकरण तिसरे


🚩 महाराजांच्या आणि अफजलखानाच्या सामरिक हालचाली.


       आदिलशहाचे शिवाजी महाराजांवर स्वारी करण्याचे प्रमुख कारण म्हणजे महाराजांनी आदिलशाही प्रदेशात सुरू केलेला विस्तारवाद आणि औरंगजेबाने त्याला दिलेली परस्पर मान्यता. इ. स. १६५७ सालात आदिलशहा आणि औरंगजेबाचा तह झाला त्याचवेळी महाराजांच्या या विस्तारवादाचा बंदोबस्त झाला असता पण औरंगजेबाला दिल्लीच्या तख्ताचे वेध लागले होते आणि तीच नाजूक वेळ महाराजांनी अगदी अचूकपणे साधली होती. १६ जून १६५९ ला कान्होजी जेध्यांना पाठवलेले एक फर्मान उपलब्ध आहे. त्या फर्मानात 'शिवाजीने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन लूट चालवलेली आहे' असं कारण दिलंय आणि त्यासाठी अफजलखान महमदशाही यास तिकडची सुभेदारी देऊन पाठवले आहे असं म्हटलं आहे.

शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड १ - पत्र क्र.७७४

       महाराजांनी जशी नाजूक वेळ साधली होती तशीच आदिलशहाही साधू इच्छित होता. त्यासाठी वरील कारण दाखवून १६५७ सालात झालेल्या तहात मोगलांनी लाटलेला प्रदेश पण ताब्यात घ्यायचा आदिलशहाचा डाव होता आणि या कामासाठी आदिलशहाकडे अफजलखानाव्यतिरिक्त दुसरा योग्य सरदार निश्चितच नव्हता.
       अफजलखान विजापुरहून एप्रिल १६५९ च्या पहिल्या आठवड्यात निघाला. विजापुरहून निघाल्यावर जवळच्याच तक्या ऊर्फ अफजलपुर गावात साधारणपणे ०८ ते १० दिवस राहिला. तिथे त्याने आपल्या त्रेसष्ठ बायकांना ठार मारले आणि तिथूनच त्याने मराठे सरदारांना त्याला सामील होण्यासाठी आदिलशहाच्या नावाने फर्माने पाठवली. तक्या गावात असताना त्याच्या निशाणाचा हत्ती मेला म्हणून आदिलशहाने त्याच्या निशाणाचा हत्ती अफजलखानाकडे पाठवला. तिथून निघाल्यावर तो पहिल्यांदा पंढरपुरला गेला आणि पंढरपुरला त्याने 'वैशाख मासी पंढरपुर मूर्ती काडीली.' पंढरपुरला त्याने आपल्या सैन्याचे तीन भाग केले. एक तुकडी तुळजापुरच्या दिशेने पाठवली. या सैन्याने तुळजापुर, माणकेश्वर वगैरे देवस्थानांना उपद्रव दिला. दुसरी तुकडी त्याने पुण्याच्या दिशेला पाठवली. तिने चाकणचा संग्रामदुर्ग आणि पुरंदर किल्ले सोडले तर शिरवळ, पुणे, चाकण, सासवड, सुपे वगैरे सर्व भाग नाईकजी पांढरे, खराटे नाईक, मंबाजी भोसले, घाटगे, काटे यांच्या मदतीने व्यापला आणि तिथे आदिलशाही अंमल बसवला.
       सभासद बखरीतल्या उल्लेखाप्रमाणे अफजलखान आधी तुळजापुरला गेला आणि भवानीची मूर्ती जात्यात भरडली असं दिलं आहे पण विजापुरहून वाट वाकडी करून खान तुळजापुरला जाईल असं वाटत नाही. त्यापेक्षा आधी पंढरपूरला येऊन एखादी तुकडी त्याने तुळजापुरच्या दिशेने पाठवली असण्याची शक्यता अधिक आहे.

 शिवभारत अध्याय १७ वा, श्लोक ५२ - ५४

शिवभारत अध्याय १७ वा, श्लोक ५५ - ५८

शिवभारत अध्याय १८ वा, श्लोक १९ - २२
 
सभासद बखर

       स्वतः तिसरी तुकडी घेऊन अफजलखान मलवडीस गेला. महाराजांना डोंगराळ मुलूखातून बाहेर काढण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून तिथे त्याने महाराजांच्या मेहूण्याला म्हणजे बजाजी निंबाळकराला धरले पण यात नाईकजी पांढरेंनी मध्यस्थी करून ६०,००० होन देऊन त्याची सुटका केली.

शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड १, पत्र क्र.७९६
शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड २, पत्र क्र.१७९७

       अफजलखान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विजापुरहून निघाला आणि साधारण २४ मे पूर्वी म्हणजे पावसाळ्यापूर्वीच वाईला पोहोचला. अफजलखानाच्या या रणनितीज्ञ हालचालींवर महाराजांची काय प्रतिक्रिया होती? तर मैदानी मुलखातून माघार घेणे. त्यासाठी त्यांनी वर म्हटल्याप्रमाणे पुणे, चाकण, शिरवळ, सुपे, बारामती आणि इंदापुर हा भाग मोकळा केला. अफजलखानाने पंढरपुर, तुळजापुर, माणकेश्वर वगैरे देवस्थांनांना उपद्रव दिला आणि बजाजी निंबाळकरालाही पकडलं. हे सगळं करताना शिवाजी महाराज बारामती, फलटण सारख्या मैदानी भागात येतील अशी अफजलखानाची अटकळ होती पण तसं काही झालं नाही. महाराजांची ही कृती म्हणजे प्रदेश देऊन वेळ मिळवणे अशा प्रकारची होती. यालाच महाराजांची रणनितीज्ञ माघार असं म्हणता येईल. जून महिन्यात पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यात मोहिमा बंद असत त्यामुळे महाराजांना अजून चार महिने वेळ मिळाला. श्रावण शु. द्वितीयेला म्हणजे १९ जुलै १६५९ ला महाराज जावळीस गेले असा उल्लेख जेधे शकावलीत मिळतो. या शिवाय जानेवारीपासूनच्या या मधल्या काळातला महाराजांचा कालपट महाराष्ट्र शासन प्रकाशित शिवराज-मुद्रा पुस्तकात दिला आहे. तो असा...

१) ०१ जानेवारी १६५९ ते ०९ मार्च १६५९ - शिवाजी महाराजांचे राजगडावर वास्तव्य.
२) १० मार्च १६५९ ते ०९ जुलै १६५९ - शिवापट्टण व राजगड.
३) १० जुलै १६५९ ते ३१ ऑगस्ट १६५९ - जावळीस वास्तव्य, सईबाईंचा या वेळी मृत्यू.
४) ०१ सप्टेबर १६५९ ते १७ सप्टेबर १६५९ - शिवाजी महाराज राजगडावर असावेत.
५) १८ सप्टेबर १६५९ ते १० नोव्हेंबर १६५९ - प्रतापगडास वास्तव्य, १० नोव्हेंबर १६५९ ला अफजलखानाचा वध.

       अफजलखानाचा मुख्य तळ आता वाई झाला आणि प्रतापगड, कोयना खोरे ही जर मुख्य युद्धभुमी झाली होती तर पावसाळ्यानंतरच्या काळात मराठी राज्याच्या बाहेर अफजलखानाच्या सैन्याची रचना प्रतापगडापासून मुख्यतः पाच भागात अशी झाली.

अ) पुणे प्रांत
आ) पश्चिम भाग
इ) दक्षिण आणि पूर्व  घाटमाथा
ई) दक्षिण आणि पश्चिम कोकण
उ) उत्तर आणि मुख्य रांगेपर्यंतचा कोकण भाग

🚩 अ) पुणे प्रांत - हे सैन्य चार भागात विभागलेलं होतं. (एकूण सैन्य ४५००-६५००)
अ - १) उत्तर आणि पश्चिमेकडील घाटमाथ्यापर्यंतचा भाग (पुणे) - सिध्दी हिलाल
अ - २) पश्चिम भाग (सासवड) - काटे
अ - ३) पश्चिम भाग (शिरवळ) - पांढरे
अ - ४) पश्चिम भाग (सुपे) - जाधव

🚩 आ) पश्चिम भाग - मुख्य तळ वाई (एकूण सैन्य १४०००-१८०००)

🚩 इ) दक्षिण आणि पूर्व  घाटमाथा - वासोटा भाग - सरवरखान (एकूण सैन्य ४०००-५०००)

🚩 ई) दक्षिण आणि पश्चिम कोकण - दाभोळ भाग - सुर्वे, दळवी, पालवणीकर (एकूण सैन्य ५०००-६०००)

🚩 उ) उत्तर आणि मुख्य रांगेपर्यंतचा कोकण भाग - जंजिरा भाग - सिध्दी फत्तेखान (एकूण सैन्य ७०००-८०००)

       अफजलखानाकडे पारला असलेले सैन्य धरून सर्व सैन्याचा आकडा ३८५०० ते ४७५०० एवढा होतो. अफजलखानाच्या या हालचालीमुळे त्याच्या सैन्याने मराठी राज्याचा भूभाग पूर्णपणे वेढला होता. चहूबाजूंनी वेढल्यामुळे आता मराठ्यांची सीमा संग्रामदुर्ग - लोहगड - विसापूर - सिंहगड - राजगड - तोरणा - पुरंदर - वज्रगड - रोहिडा - केंजळगड - कमळगड - महाबळेश्वर भाग - मकरंदगड - रसाळगड - सुमारगड - महिपतगड - पालगड - मंडणगड - चांभारगड - सोनगड - रायरी - मानगड - कुर्डुगड - कोरीगड अशी झाली. हे मराठ्यांच्या ताब्यात असलेले किल्ले एकमेकांना जोडले म्हणजे मराठ्यांची सीमा लगेचच लक्षात येते. थोडक्यात मावळ भाग, जावळी प्रांत, कोकणचा काही भाग आणि त्यामध्ये असलेला प्रदेश व किल्ले महाराजांच्या ताब्यात होते. एकूण या संरचनेत महाराज अंतर्गत संभार मार्गावर अवलंबून होते तर अफजलखान बाह्य संभार मार्गावर अवलंबून होता. या दोघांच्या मार्गात काही बलस्थाने होती तर काही कच्चे दुवेही नक्कीच होते. हे मार्ग कोणते असतील याविषयी आपण पुढे चर्चा करणार आहोतच आणि त्या त्या ठिकाणी त्यांचे नकाशेही येतीलच पण त्याआधी आणखी एका गोष्टीवर चर्चा करणं संयुक्तिक ठरेल.

       अफजलखान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विजापुरहून निघाल्यापासून २४ मे ला वाईला पोहोचण्याच्या मधल्या काळात मराठ्यांनी कासलोडगड नावाचा हिरडस मावळातला एक किल्ला दुरूस्त केला. या दुरूस्तीचा अफजलखान स्वारीशी संबंध जोडला जातो. ही घटना सांगणारं महाराजांचं एक अस्सल पत्र आज उपलब्ध आहे. या घटनेचा खरंच अफजलखान स्वारीशी संबंध असावा का? पाहूया पुढच्या प्रकरणात.

 

🚩 प्रकरण चौथे


🚩 कासलोडगडाच्या दुरूस्तीविषयी उहापोह.


       अफजलखानासोबत अंदाजे ३८५०० ते ४७५०० एवढं सैन्य होतं हे मागे आपण पाहिलंच. खानाचा वध केल्यावर उरलेल्या सैन्याला पळून जाण्यासाठी कुठल्याही वाटा शिल्लक राहू नयेत म्हणून आजूबाजूचा परिसरही संरक्षित करणे भाग होते. याचाच परिपाक म्हणून कमकुवत असलेल्या वरंध घाटाकडच्या बाजूला एखादा किल्ला बांधला तर त्या सैन्याला अटकाव करता येईल. त्यासाठी हिरडस मावळात ओस पडलेल्या डोंगरावर महाराजांनी बाजीप्रभुंना किल्ला बांधण्याची आज्ञा केली असा समज आज जनमानसांत रूजलेला दिसून येतो. बाजीप्रभुंनीही लगोलग तिथे किल्ला बांधला, त्याचं नाव कासलोडगड. त्या संदर्भात महाराजांचं एक अस्सल पत्र उपलब्ध आहे.

शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड १, पत्र क्र. ७७३

       हे पत्र १३ मे १६५९ ला लिहिलेलं आहे आणि अफजल वध १० नोव्हेंबर १६५९ ला झाला. अफजल वधापूर्वीचं हे पत्र आहे पण म्हणून कासलोडगडाचा संबंध अफजलखानाशी जोडणं चुकीचं ठरेल. पाहूया कसं ते.

१) महाराज १० जुलै १६५९ ला ला प्रतापगडावर गेले. तोपर्यंत महाराज हे राजगडावरच वास्तव्याला होते. म्हणजे हे पत्र राजगडावरून बाजीप्रभुंना पाठवलेलं आहे आणि 'पावसाळ्यापूर्वी ही दुरूस्ती पुर्ण करून गडाखाली उतरणे' असा त्यात उल्लेख आलाय. अफजलखान हा वाईला पावसाळ्यापूर्वीच म्हणजे २४ मे १६५९ रोजी किंवा त्यापूर्वीच पोहोचला होता. १३ मे १६५९ ला लिहिलेलं पत्र पुढे दोनचार दिवसांनी बाजीप्रभुंच्या हातात पडलं असेल आणि तिथून पुढे मग गडाची दुरुस्ती मे महिन्याच्या अखेरीस सुरु झाली असेल. मे महिन्यात अफजलखानाविरूध्दच्या युध्दक्षेत्राचा नक्की अंदाज बांधणं तसं कठीण आहे. कारण जूनमधे लगेच पावसाळा सुरु होतो आणि पावसाळ्यात मोहिमा बंद असत. १३ मे १६५९ ला जेव्हा हे पत्र राजगडावर लिहलं गेलं तोपर्यंत वकीलांची ये-जा होऊन अफजलखान पारला भेटायला येणार हेही नक्की झालेलं नव्हतं. त्यामुळे अफजलखान पारला सैन्यासह येईल याचा काहीच अंदाज राजगडाला नसणार. तारखांत अतिशय कमी असलेल्या या फरकामुळे कासलोडगडाची दुरूस्ती अफजलखान मोहिमेशी जोडणं चुकीचं ठरेल.

२) महाराजांचं कासलोडगडाबद्दलचं जे अस्सल पत्र उपलब्ध आहे त्यात किंचितसाही अफजलखान मोहिमेचा उल्लेख नाही. जर स्वराज्यावर एवढं मोठं संकट चालून आलंय आणि त्यासाठीच जर का कासलोटगडाची दुरूस्ती होते आहे तर पत्रात अफजलखान मोहिमेचा काहीच उल्लेख का नसावा? हे संशयास्पद नाही का?

३) अफजलखानाकडे असलेली ३८५०० ते ४७५०० एवढी सैन्यसंख्या पाहता तो जवळचे पार, हातलोट असे मोठे घाट सोडून अडचणीचा वरंध घाट का वापरेल? बरं पार किंवा वाईहून वरंध घाटापर्यंत जाण्याचा रस्ताही सोईस्कर नाही. पहिल्या प्रकरणात महाराजांच्या जावळीपर्यंतच्या वाटेबद्दल आपण चर्चा केली आहेच. एकतर तो मार्ग उंचसखल, दाट अरण्याचा आहे आणि दुसरं असं की पार किंवा वाईपासूनचा वरंध घाटापर्यंतचा पूर्ण मार्ग मराठ्यांच्या हद्दीतून जातो. अफजलखानाचं सैन्य माहिती नसलेल्या आणि त्यातूनही असा धोक्याचा असलेला मार्ग पत्करेल का? तिसरं असं की वरंध घाटाची वाट एवढ्या मोठया सैन्याला जाण्याच्या उपयुक्ततेची अजिबात नाही. बरं हे सैन्य वरंध घाट उतरून कोणत्या सुरक्षित ठिकाणी जाणार होतं? याचंही उत्तर सापडत नाही. हे जसं अफजलखानाच्या सैन्याला लागू होतं तसंच वेळप्रसंगी मदतीला येऊ शकणाऱ्या जंजिऱ्याच्या सिध्दीलाही लागू पडतं. घाटमाथ्यावरून जायचं तर जोर खोर्‍यातून चढून जाऊन कोळेश्वर आणि रायरेश्वर रांगा ओलांडाव्या लागतील आणि नेतोजी जोरखोऱ्यात घोडदळ घेऊन उभा असताना अफजलखानाचं सैन्य या वाटेने वरंध घाटाकडे जाणं काहीसं अशक्यच वाटतं.

       वर दिलेल्या कारणांमुळं कासलोडगडाचा अफजलखानाच्या सैन्याच्या पलायनासाठी थेट संबंध जोडणं चुकीचं वाटतं. अर्थात या एकाच विषयावर अधिक तपशीलवार अभ्यास व्हायला हवा. एकंदरीत वाई किंवा प्रतापगड आणि वरंध घाटामधल्या भूगोलाच्या कसोटीवर ताडून पाहता ते अतिशय अवघड वाटतं. सध्या तरी वरवर पाहता असंच वाटतं की कासलोटगडाची दुरूस्ती हे 'Routine Maintenance Work'  किंवा 'Preventive Maintenance' या सदरात मोडणारं काम असावं.

       या संदर्भात आणखी एक शक्यता अशी वाटते की कासलोडगडाची दुरूस्ती ही जंजिऱ्याच्या सिध्दीसाठी केली गेली असावी काय? अफजल युद्धाच्या वेळी त्र्यंबक भास्करांच्या हाताखालचं मराठी सैन्य जंजिऱ्याच्या सिध्दीशी लढत होतं, जे महाडहून पारच्या थेट युध्दक्षेत्रावर मागवलं गेलं. अफजलखानाबरोबर कुठेही लढाई झाली असती तरी या सैन्याला तिथं जावंच लागलं असतं. ही लढाई राजगडापासून दुर झाली असती तर साहजिकच राजगडाकडील बाजू कमकुवत झाली असती आणि या नाजूक परिस्थितीचा फायदा घेऊन सिध्दीचं सैन्य महाडवरून वरंधा घाट चढून बगलेवरून थेट राजगडावरच हल्ला करू शकलं असतं. अर्थात सिध्दीमधे अशी कुवत / इच्छा / तयारी होती काय? यावरही अभ्यास व्हायला हवा. त्यामुळे भविष्यात जर का सिध्दीचा असा हल्ला आलाच तर महाराजांनी राजगडाच्या वाटेवर कासलोडगडासारखे अडथळे उभारले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


🚩 प्रकरण पाचवे


🚩 अफजलखानाची वाई - प्रतापगड वाट.


       तिसर्‍या प्रकरणात आपण अफजलखान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विजापुरहून निघाला आणि साधारण २४ मे पूर्वी म्हणजे पावसाळ्यापूर्वीच वाईला पोहोचला हे पाहिलंच. पावसाळ्यात मोहिमा बंद असत साहजिकच पुढच्या चार महिन्यात खानाने मावळातल्या देशमुखांना त्याला येऊन मिळण्यासाठी कौलनामे/फर्माने पाठवली. जून १६५९ मधे ही फर्माने मिळाल्यावर मावळांत चांगलीच खळबळ माजली. कान्होजी जेध्यांच्या हातात फर्मान पडल्यावर ते आपल्या पाच मुलांसह राजगडी आले आणि आपल्या वतनावर पाणी सोडले. कान्होजींची ही कृती इतर वतनदार देशमुख मंडळी महाराजांच्या पक्षात राहण्यास कारणीभुत ठरली त्यामुळे अंतर्गत फितुरीचा धोका टळला. अफजलखानाच्या या दटावणीच्या फर्मानांमुळे फक्त केदारजी आणि खंडोजी हे खोपडे बंधू तेवढे खानाला जाऊन मिळाले.

शिवकालीन पत्र-सार-संग्रह खंड १, पत्र क्र. ७९८.

जेधे शकावली


जेधे करिणा

       पावसाळ्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वकिलांच्या भेटीगाठी होऊन भेटीच्या अटी आणि ठिकाण ठरलं. दोन मोठ्या लोकांच्या भेटीचे नियम किंवा रिवाजही ठरलेले असत त्यादृष्टीने कुणी कायकाय करायचं यावरही शिक्कामोर्तब केलं गेलं. या सर्वाच्या अनुशंगाने अफजलखान साधारण ०१ नोव्हेंबरला सोबत जवळजवळ ०५ ते १०,००० पायदळ सैन्य घेऊन वाईहुन निघाला. पुढं वाईहून कृष्णा नदीच्या काठाने तो चिखलीपर्यंत दोन दिवसात आला. तिथून पुढं तायघाटाने महाबळेश्वर रांगेवर चढून आला. १६४८ - ४९ सालच्या चंद्रराव मोर्‍यांविरूद्धच्या मोहिमेत अफजलखान तायघाट चढून आला होता. साहजिकच तो माहिती असलेल्या वाटेनेच प्रतापगड पायथ्याशी जाईल. खानासारखा कसलेला सेनानी असं आयत्यावेळी जावळीतल्या दुसर्‍या कोणत्या नवीन वाटेने जायचा धोका नक्कीच पत्करणार नाही. दुसरं असं की तायघाटाची सोंडेवरून चढणारी ही वाट कमी चढ असलेली, कमी अंतराची देखील आहे. साहजिकच तो एका झटक्यात महाबळेश्वर रांगेवर चढून येऊ शकत होता त्यामुळे तो 'तायघाटानेच महाबळेश्वर रांगेवर चढून आला' याला पुष्ठीच मिळते. आजही वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणी गाव ओलांडल्यावर पाचगणी गिरीस्थानाची पर्यटन शुल्क स्विकारण्याची जी चौकी आहे तिथं मागं 'तायघाट' आणि 'तायघाट गाव' पहायला मिळतं.

शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड १, पत्र क्र. ५६१
 
 मराठी दफ्तर - रूमाल पहिला, शेडगावकर बखर
 

       तायघाट चढून आल्यावर पुढच्या दोन दिवसात अफजलखान शिंगोटे (महाबळेश्वर) आणि तिथून पुढच्या दोन दिवसात रडतोंडी ऊर्फ अश्रुमुखीच्या घाटाने (संकर्षण सकळकळे त्याच्या शिवचरित्रात रडतोंडी घाटाला अश्रूमुखीचा घाट म्हणतो) म्हणजे ६ नोव्हेंबरला पार, कुंभरोशी व दुधोशी या गावात ससैन्य पोहोचला. तिथे त्याने आपली छावणी टाकली. या प्रवासात त्याचे सैन्य अंदाजे ४५० मीटर तायघाट चढले आणि साधारण तेवढेच रडतोंडी घाट उतरले. ही संपुर्ण वाट अतिशय चढ-उताराची आणि दाट जंगलातून आहे. पण महाराजांनी रस्ता केल्याचे उल्लेख आहेत. 

 

सभासद बखर

        रस्ता करण्याच्या नावाखाली महाराजांनी आपले लोक रस्ताभर पेरले. त्या लोकांनी झाडे पाडून आजूबा़जूच्या वाटा बंद केल्या आणि आपल्या सैन्यासाठी लपण्याच्या जागा तयार केल्या. पावसाळा नुकताच संपल्याने झाडीही मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि रस्ताही निसरडा झालेला होता. जंगलात असणार्‍या वळणदार रस्त्यांंमुळे पुर्ण सैन्य एकमेकांना पाहु शकत नव्हते.
       पारला कोयना नदीकाठी छावणीचे तंबु उभारण्यास जागा आहे. प्रतापगड परिसरात अन्य कुठेही अशी सपाटीची जागा सापडत नाही. बाजूलाच कोयना नदी वाहत असल्याने पाण्याचाही प्रश्न येणार नव्हता. जेधे शकावलीसह जवळजवळ सर्व मराठी साधनात 'पारचे लष्कर बुडवणे', 'पारवरुन सैन्यास प्रतापगडावर येऊ न देणे' असे उल्लेख आहेत. पारवरून अफजलखान त्याच्या वाईच्या मुख्य तळाबरोबरच जंजिर्‍याच्या सिद्धीशी, सरवरखानाच्या वासोटा भागातल्या सैन्याशी आणि दाभोळच्या सैन्याशी संपर्क साधु शकत होता. पारची जागा सर्व प्रकाराने योग्य असल्याने अफजलखानाने पारलाच आपली छावणी टाकली. मुख्य छावणी जरी पारला असली तरी एक तुकडी अफजलखानाने वाडा-कुंभरोशी परिसरात ठेवलेली होती, जी वेळप्रसंगी प्रतापगडावर पिछाडीवरुन हल्ला करु शकेल आणि वेळप्रसंगी जावळीवरही हल्ला करून प्रतापगड ते राजगड हा मार्ग बंद करू शकेल किंवा राजगडावरुन येणारी मदत थोपवू तरी शकेल.
       वाई ते प्रतापगडच्या संपुर्ण रस्त्यात, छावणीच्या ठिकाणी महाराजांनी खाण्या-पिण्याची अतिशय चांगली व्यवस्था ठेवली होती. कोयना नदीत भरपुर पाणी होते, रस्ता तयार करताना तोडलेल्या झाडांचे सरपण होते, जनावरांसाठी भरपुर गवत होते. अगदी मांसाहारही उपलब्ध करुन दिला होता. त्यामुळे खानाचे सैन्य निष्काळजी झाले. या सर्व सुविधा महाराजांनी केवळ आपल्या उद्देशपुर्तीसाठीच पुरवल्या होत्या.

जेधे शकावली


९१ कलमी बखर

९१ कलमी बखर

       सरतेशेवटी अफजलखानाच्या वाई ते प्रतापगड वाटेचा सारांश सांगायचा झाला तर वाई - कृष्णा काठाने चिखली - तायघाटाने चढून महाबळेश्वर रांग - शिंगोटे (महाबळेश्वर) - रडतोंडी ऊर्फ अश्रूमुखीच्या घाटाने मेटतळे मार्गे पार असा सांगता येईल. भटक्या मंडळींनी एकदा टप्प्याटप्प्याने का होईना पण वाईतून प्रतापगड अशी डोंगरयात्रा करायला हवी. अफजलखानाला पारला पोहोचायला किती त्रास झाला ते देखील समजायला हवं. महाराजांनी आखलेली परिपूर्ण योजना आणि त्याच्या योगाने घडवून आणलेला अफजलवध जर का समजून घ्यायचा तर त्याच्या अगदी मुळाशी जायलाच हवं. नाही का?


🚩 प्रकरण सहावे


🚩 महाराजांना प्रतापगड युद्धाच्या वेळी वापरता येतील अशा अंतर्गत वाटा.


       तिसर्‍या प्रकरणात आपण अफजलखानाच्या सामरिक हालचालीमुळे मराठ्यांची सीमा कशी तयार झाली होती ते पाहिलं. ती सीमा साधारण संग्रामदुर्ग - लोहगड - विसापूर - सिंहगड - राजगड - तोरणा - पुरंदर - वज्रगड - रोहिडा - केंजळगड - कमळगड - महाबळेश्वर भाग - मकरंदगड - रसाळगड - सुमारगड - महिपतगड - पालगड - मंडणगड - चांभारगड - सोनगड - रायरी - मानगड - कुर्डुगड - कोरीगड अशी होती. मराठ्यांच्या ताब्यात असलेले हे किल्ले एकमेकांना जोडले म्हणजे मराठ्यांची सीमा लगेचच लक्षात येते. थोडक्यात मावळ भाग, जावळी प्रांत, कोकणचा काही भाग आणि त्यामध्ये असलेला प्रदेश व किल्ले महाराजांच्या ताब्यात होते. एकूण या संरचनेत महाराज अंतर्गत संभार मार्गावर अवलंबून होते. अंतर्गत संभार मार्गावर म्हणजे अर्थातच राजगड आणि प्रतापगड दरम्यान असलेल्या वाटांवर. कोणत्या असतील या वाटा? पाहूया.

       पहिल्या आणि दुसर्‍या प्रकरणात आपण त्यातल्या काही वाटा पाहिलेल्या आहेतच, त्या थोडक्यात इथे पुन्हा पाहू. अर्थात इथे दिलेल्या वाटा या पूर्णपणे मराठ्यांच्या हद्दीतून असलेल्या, कमी त्रासाच्या आणि निर्धोक असलेल्याच आहेत.

🚩 मार्ग पहिला - राजगडहून -  वेळवंड खोरे - हिरडस मावळ - भोर खोरे - रायरेश्वर पठार - जांभळी खोरे - कोळेश्वर पठार - जोर खोरे - गणेश घाटाने - क्षेत्र महाबळेश्वर आणि पुढे
अ) निसणी घाटाने जावळीतून प्रतापगड.
आ) रडतोंडी घाटाने पारहून प्रतापगड.

🚩 मार्ग दुसरा - राजगडहून -  वेळवंड खोरे - हिरडस मावळ - भोर खोरे - रायरेश्वर पठार - खावली - वासोळे आणि पुढे कोळेश्वर रांगेच्या टोकाशी असलेल्या कमळगडाला वळसा मारून कृष्णाकाठाने जोर खोरे - जोर खोर्‍यातून पहिल्या मार्गाच्या 'अ' आणि 'आ' या पर्यायांनी प्रतापगड.
       ऐन युद्धाच्या वेळी सरनौबत नेतोजी पालकर जोर खोर्‍यात घोडदळासह थांबलेले होते. या दुसर्‍या मार्गात फक्त रायरेश्वरची महादेव रांग ओलांडावी लागते. महादेव रांगेवर घोडदळासह चढणे आणि उतरणे त्या मानाने सोपे आहे त्यामुळे बहुधा याच दुसर्‍या मार्गाचा वापर करून ते तिथे गेले असावेत. दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही.

🚩 मार्ग तिसरा - राजगडहून -  मळे - पुढे वेळवंड खोर्‍यातून साळूंगण - हिरडस मावळात धारमंडप - कुडली - अस्वलखिंड - महादेवमुऱ्हा - ढवळी खोरे
अ) ढवळी खोरे - सापळखिंडीतून लहुळसे - धट्याचा दांड / दर्‍याचा दांड / आंबेनळी / दाभिळटोक घाटाने वाडा-कुभरोशी - प्रतापगड. (किंवा ढवळ्या घाटातून बहिरीची घुमटी - क्षेत्र महाबळेश्वर - निसणीने उतरूनही प्रतापगड गाठता येईल)
आ) ढवळी खोरे - ढवळे - कापडे - किनेश्वर - पार घाटाने प्रतापगड.

 
        वर दिलेल्या तीन मार्गांपैकी दुसरा मार्ग त्यातल्या त्यात सोयीस्कर वाटतो. नुकतंच महाराजांचं सैन्य जावळी घेण्यासाठी या वाटेने गेल्यामुळे ही वाट त्यांच्या चांगल्याच परिचयाची होती. दुसरं कारण म्हणजे ती पूर्णपणे मराठ्यांच्या हद्दीतूनच होती त्यामुळे दुसर्‍या वाटेचाच पर्याय अधिक योग्य वाटतो.

       आता एवढी चर्चा केल्यावर वर दिलेल्या या सगळ्या वाटा म्हणाव्या तशा सुरक्षित होत्या का? तर त्याचं उत्तर 'नाही' असंच आहे. कसं ते पाहू.

       समजा क्षेत्र महाबळेश्वरहून म्हणजे घाटमाथ्यावरून निसणीने उतरून आलं तर येणाऱ्या तुकडीला सहजासहजी प्रतापगडावर जाता येऊ नये म्हणून अफजलखानाने एक तुकडी ही वाट अडवण्यासाठी हारोशी/दुधोशी किंवा वाडा-कुंभरोशी जवळ तैनात केली होती किंवा घाटमाथ्यावरूनच पण निसणी ऐवजी अगदी रडतोंडीने जरी उतरून आलं तरी पारच्या युद्धक्षेत्रात त्याचा तळ होताच. कोकणातून चढून आलं तरी थेट प्रतापगडावर चढून जाता येत नाही तर त्यासाठी आधी पार किंवा कुंभरोशीत यावंच लागतं. अफजलखानाच्या दृष्टीने विचार केला तर वर दिलेल्या कुठल्याही वाटेने मदत आलीच तरी त्या मदतीला हारोशी/दुधोशी/वाडा-कुंभरोशी किंवा पारचं सैन्य अटकाव करू शकत होतं. थोडक्यात महाराज प्रतापगडावर जवळजवळ अडकलेलेच होते. बरं उद्या काही बरं-वाईट झालंच आणि प्रतापगडावरून निसटायची वेळ आलीच तरी लढल्याशिवाय कुठूनही बाहेर पडता येणार नव्हतं. किंवा कुठून बाहेरून मदत आलीच तरी तिला सहजपणे प्रतापगड गाठणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळे फक्त 'अफजलखान भेटीसाठी आला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी त्याचा वध केला' हे इतिहासात कायमच आपण वाचत आलो आहोत ते वाटतं तितकं सहजपणे झालेलं नाहीये. अतिशय विपरीत परिस्थिती असूनही महाराजांनी बाजी मारली आहे. शिवाजी महाराज समजणं 'अवघड' आहे असं म्हणतात ते यासाठीच.


🚩 प्रकरण सातवे


🚩 अफजलखानाच्या वेढ्यातील सैन्य आणि पारचं सैन्य यांना एकमेकांशी संपर्क ठेवता येईल किंवा प्रसंगी पारला मदतीला येता येईल अशा बहिस्थ वाटा.


       अफजलखानाचा मुख्य तळ आता वाई होता आणि प्रतापगड, कोयना खोरे ही जर का त्याची मुख्य युद्धभुमी झाली असेल तर पावसाळ्यानंतरच्या काळात मराठी राज्याच्या बाहेर अफजलखानाच्या सैन्याची रचना प्रतापगडापासून मुख्यतः पाच भागात अशी झाली हे आपण तिसर्‍या प्रकरणात पाहिलं आहेच. संदर्भ घेण्यास सोपं व्हावं म्हणून इथं पुन्हा देत आहे.

अ) पुणे प्रांत
आ) पश्चिम भाग
इ) दक्षिण आणि पूर्व  घाटमाथा
ई) दक्षिण आणि पश्चिम कोकण
उ) उत्तर आणि मुख्य रांगेपर्यंतचा कोकण भाग

अ) पुणे प्रांत - हे सैन्य चार भागात विभागलेलं होतं. (एकूण सैन्य ४५००-६५००)
अ - १) उत्तर आणि पश्चिमेकडील घाटमाथ्यापर्यंतचा भाग (पुणे) - सिध्दी हिलाल
अ - २) पश्चिम भाग (सासवड) - काटे
अ - ३) पश्चिम भाग (शिरवळ) - पांढरे
अ - ४) पश्चिम भाग (सुपे) - जाधव

आ) पश्चिम भाग - मुख्य तळ वाई (एकूण सैन्य १४०००-१८०००)

इ) दक्षिण आणि पूर्व  घाटमाथा - वासोटा भाग - सरवरखान (एकूण सैन्य ४०००-५०००)

ई) दक्षिण आणि पश्चिम कोकण - दाभोळ भाग - सुर्वे, दळवी, पालवणीकर (एकूण सैन्य ५०००-६०००)

उ) उत्तर आणि मुख्य रांगेपर्यंतचा कोकण भाग - जंजिरा भाग - सिध्दी फत्तेखान (एकूण सैन्य ७०००-८०००)

       अफजलखानाचा मुख्य संभार मार्ग विजापुर - वाई ते पार असा होता. विजापुरहून त्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेवढी मदत मिळू शकत होती. वर दिलेल्या ठिकाणावर असलेल्या सैन्याचा पारमधे असलेल्या सैन्याशी कोणकोणत्या वाटांनी संपर्क ठेवता येईल ते आता आपण पाहूया.

🚩 अ) पुणे प्रांत - पुणे प्रांतात असलेलं सिध्दी हिलाल, काटे, पांढरे, जाधव या मराठा सरदारांचे सैन्य हे 'Contract Labour' पद्धतीचं होतं. हे मराठे सरदार स्वतःचं सैन्य बाळगुन असत. अफलजखान आल्यावर जसं हे सैन्य खानाला मिळालं तसंच खान मेल्यावर हे सैन्य पुन्हा मराठ्यांकडं आलं. पुणे, सुपे, बारामती, सासवड, शिरवळ हा भाग मराठ्यांकडे असलेला अतिशय सुपीक भाग होता. हा प्रदेश ताब्यात घेतल्यावर चिडून जाऊन महाराज मैदानात येतील असा अफलजखानाचा कयास होता. पुणे भागात असलेल्या सैन्यावर महाराजांना डोंगराळ मुलूखातून बाहेर काढणे हीच मुख्य कामगिरी सोपवलेली होती. एकदा का महाराज बारामती, फलटण भागात आले की याच सैन्याचा त्यांच्या बगलेवरून हल्ला करण्यासाठी खानाला उपयोग होणार होता. अफलजखानाच्या या खेळीला महाराज बधले नाहीत आणि खानाला वाईला यावं लागलं. पुढे युद्धस्थळ पारला गेल्यामुळे या सैन्याचा फारसा उपयोग ऐन युद्धाच्या वेळी अफलजखानाला होणारच नव्हता त्यामुळं या सैन्याचं काम हे पुणे भागात स्थापन केलेल्या प्रशासकीय यंत्रणेला मदत करणं एवढंच उरलं. ऐन युद्धाच्या वेळी या सैन्याला अफलजखानाच्या मदतीला येण्याची गरजच उरली नव्हती त्यामुळं या सैन्याचा मार्ग इथं देत नाही.

🚩 आ) पश्चिम भाग, मुख्य तळ वाई - मुख्य तळावर असलेल्या या सैन्याकडे वाईहून किंवा विजापुरहून आलेली रसद पारला पोहोचवण्याचं मुख्य काम होतं. अफजलखान ज्या वाटेने वाईहून पारला आला तो मार्ग आपण पाचव्या प्रकरणात पाहिलेला आहेच. तोच मार्ग या सैन्याचा आहे. तो मार्ग वाई - कृष्णा काठाने चिखली - तायघाटाने चढून महाबळेश्वर रांग - शिंगोटे (महाबळेश्वर) - रडतोंडी ऊर्फ अश्रूमुखीच्या घाटाने मेटतळे मार्गे पार असा आहे. याशिवाय दुसरा सोपा आणि निर्धोक मार्ग दिसून येत नाही.

🚩 इ) दक्षिण आणि पूर्व  घाटमाथा - वासोटा भाग - सरवरखान - सरवरखान हा प्रभानवल्ली व मलकापुर परगण्याच्या बाजूस सरहवालदार होता. प्रतापगड युद्धाच्यावेळी याचं सैन्य कोयना खोर्‍यातच वासोटा भागात होतं. साहजिकच हे सैन्य कोयना काठाने मकरंदगडाच्या बाजूने पारच्या युद्धक्षेत्रात अगदी सहज येऊ शकत होतं.

🚩 ई) दक्षिण आणि पश्चिम कोकण - दाभोळ भाग - सुर्वे, दळवी, पालवणीकर - दाभोळ बंदरात असलेलं सैन्य आणि सुर्वे, दळवी, पालवणीकर वगैरे मंडळी वासोटा भागातून उत्तर तिवरे घाटाने, पर्वत-चकदेव दरम्यानच्या आंबिवली घाटाने किंवा मकरंदगडाजवळच्या हातलोट घाटाने घाटमाथ्यावर चढून येऊ शकत होती. नंतर एकतर हे सैन्य सरवरखानाच्या सैन्याला किंवा थेट पारच्या सैन्याला येऊन मिळू शकत होतं. तशा या भागात घाटमाथ्यावर चढून येण्यासाठी बर्‍याच घाटवाटा आहेत पण वर उल्लेखलेल्या घाटवाटा व्यापारी असल्याने कमी चढावाच्या, रूंद आणि सोप्या आहेत.

🚩 उ) उत्तर आणि मुख्य रांगेपर्यंतचा कोकण भाग - जंजिरा भाग - सिध्दी फत्तेखान - हा तळे, घोसाळे, दंडा राजपुरी भागात होता. त्र्यंबक भास्कर महाड भागात त्याच्या विरूद्ध लढत होते. ते ५००० हशम घेऊन महाडच्या रस्त्याने आले असा उल्लेख शेडगावकर बखरीत मिळतो. साहजिकच सिध्दी फत्तेखान तयारी करून बसला होता. त्याला पारला यायचं तर पारघाटाने किंवा दाभिळटोक घाटाने येऊ शकत होता. 

        शिवाजी महाराज जसे अंतर्गत मार्गांवर अवलंबुन होते तसा अफजलखान बाहेरच्या वाटांवर अवलंबुन होता. राजगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड ही मराठ्यांची लष्करी मुख्यालये होती. या सर्व ठिकाणी भरपुर रसद साठवलेली होती पण हे किल्ले वेढले जाऊ शकत होते किंवा दोन मुख्यालयांमधे सैन्य आणून अफजलखानाला त्यांचा एकमेकांशी संपर्क तोडता येऊ शकत होता या उलट पावसाळ्यानंतर अफजलखानाला विजापुरहून हवी तेवढी मदत म्हणजे सैन्य, दारूगोळा, तोफा सहजी मिळू शकत होत्या. पुणे, वाई, वासोटा भागातल्या सैन्याला जमिनीमार्गे तर दाभोळ आणि जंजिर्‍याच्या सिध्दीला ही सर्व रसद समुद्र मार्गाने सहजी उपलब्ध करून देता येऊ शकत होती. थोडक्यात महाराजांचे अंतर्गत मार्ग जसा अफजलखान बंद करू शकत होता तसे खानाचे बाहेरचे मार्ग महाराज बंद करू शकत नव्हते. एकूणच परिस्थिती अतिशय विपरित होती. मनुष्यबळ आणि साधनसामग्री अशा दुहेरी कसोटीवर इतकेच नव्हे तर संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्याही महाराजांचा जावळीत आलेला शत्रू त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने बलाढ्य होता.


🚩 प्रकरण आठवे


🚩 प्रतापगड परिसरातील घाटमाथ्यावरून पदरात उतरणाऱ्या आणि पदरातून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा.


       महाबळेश्वरच्या पांगळ्यापासून म्हणजे एलफिस्टन पॉईंटपासून एक धार थेट कोकणात उतरलेली आहे. या धारेला लगटून दक्षिणेकडे लगेचच एक पदर सुरू होतो जो सध्याच्या कोयनानगरपर्यंत धावतो. या पदरात संपूर्ण कोयनेचं खोरं सामावलेलं आहे. या पदराच्या पश्चिम धारेवर मकरंदगड, पर्वत, चकदेव, महिमंडणगड, वासोटा आणि जंगली जयगड वसलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला दातेगड रांग वसलेली आहे. पांगळ्यापासून दक्षिणेकडे सुरू होणाऱ्या या पदरातच प्रतापगड सुध्दा वसलेला आहे. पांगळ्यापासून जशी एक धार उतरली आहे तशीच तिला समांतर अशी अजून एक धार उत्तरेकडच्या मढीमहालापासून म्हणजेच ऑर्थरसीटपासून कोकणात उतरलेली आहे. पांगळ्याच्या धारेपासून उत्तरेकडे मढीमहालच्या धारेपर्यंत कोकणात सावित्रीचे खोरे आहे. या सावित्रीच्या खोर्‍यात घाटमाथ्यापासून कोकणापर्यंत थेट कडे आहेत त्यामुळे तिथून कोणत्याही घाटवाटा घाटमाथ्यावर चढून येत नाहीत. मढीमहालपासून उतरलेल्या धारेवर सापळखिंड आहे. मढीमहालाच्या उत्तरेकडील घाटमाथ्यावरच्या जोर खोऱ्यात कोकणातल्या सावित्री खोर्‍यातल्या लहुळश्यातून सापळखिंड आणि ढवळीच्या खोर्‍यात असलेल्या ढवळे गावातून ढवळे घाट चढून येतो.

       पांगळ्यापासून दक्षिणेकडे असलेल्या घाटवाटा, घाटमाथा आणि कोकण यामध्ये असलेल्या पदरामुळे दोन टप्प्यात विभागल्या गेल्या आहेत. घाटमाथ्यापासून पदरात उतरणाऱ्या घाटवाटांना वरघाट तर पदरातून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटांना तळघाट अशा संज्ञा आहेत. काही ऐतिहासिक कागदपत्रात जकात वसूल करण्यासंबंधी 'वरघाट' आणि 'तळघाट' असे उल्लेख सापडतात. जिज्ञासू मंडळींना घाटवाटांसंबंधी सविस्तर माहिती माझ्या 'अथातो घाटजिज्ञासा' या चार भागांच्या ससंदर्भ ब्लॉगमधे वाचता येईल. घाटमाथ्यावरच्या महाबळेश्वरहून पदरातल्या प्रतापगडजवळ उतरणारे आणि ठळकपणे सांगता येतील असे वरघाट सांगायचे झाले तर...

१) पांगळ्याची वाट - क्षेत्र ते दरे
२) निसणी - क्षेत्र ते दरे
३) बाजाराची वाट - नवीन महाबळेश्वर ते दरे
४) लॉडविकची वाट - नवीन महाबळेश्वर ते हारोशी
५) रडतोंडी घाट - नवीन महाबळेश्वर, मेटतळे ते पार
६) शिरगावची वाट - नवीन महाबळेश्वर, मेटतळे ते शिरगाव

       पदरातून कोकणात उतरणाऱ्या तळघाटांचं सावित्री आणि जगबुडी अशा दोन नद्यांच्या खोऱ्यात वर्गीकरण करता येईल. त्यातले काही ठळकपणे सांगता येतील असे तळघाट हे पहा...

१) धट्याची वाट - दरे ते लहुळसे
२) दऱ्याचा दांड - दरे ते लहुळसे
३) कुंभेदांड/आंबेनळी? - कुंभरोशी ते लहुळसे
४) दाभिळटोक - कुंभरोशी/पार ते लहुळसे
५) केवनाळे - पार ते देवळे
६) पारघाट - पार ते किनेश्वर
७) पांडवदरा - पार ते किनेश्वर
८) क्षेत्रपाळ - कुमठे ते पारसोली
९) कुडपण - कुमठे ते कोतवाल

       प्रतापगड परिसरात असलेल्या घाटवाटांचा भूगोल हा असा आहे. अफजलवधानंतर मुसेखान वगैरे मंडळी वाईला पळाली. प्रतापराव मोर्‍यांनी त्यासाठी त्यांना मदत केली. तो मार्ग कोणता? हा देखील अभ्यासाचा विषय आहे. पाहूया पुढच्या प्रकरणात.

शिवभारत अध्याय २४ श्लोक २३ ते २८
शिवभारत अध्याय २९ श्लोक २३ ते ३६

शिवभारत अध्याय २९ श्लोक ३७ ते ४३
 
 शिवभारत अध्याय २९ श्लोक ४४ ते ४६

🚩 प्रकरण नववे


🚩 अफजलवधानंतर मुसेखान कोणत्या वाटेने वाईला पळाला?


       अफजलखानाच्या पारच्या सैन्याभोवती मराठ्यांचं सैन्य कसं उभं होतं ते आधी पाहू म्हणजे यातून वाचून जाण्यासाठी मुसेखान आणि मंडळींना कोणत्या वाटेने जाता येईल ते ठरवता येईल. कान्होजी जेधे शंभर-दिडशेचा जमाव घेऊन खानाच्या हबशी सैन्याजवळ येऊन उभे होते. बांदल-शिळीमकर रात्रीच बोचेघोळीत गेले. मोरोपंत पिंगळे पारला पाच हजार लोक घेऊन त्यांच्या जागी उभे होते. श्यामराजपंत पद्मनाभी मकरंदगड भागात पाच हजार, त्र्यंबक भास्कर महाडहून सावित्री खोर्‍यातून जावळी बाजूला पाच हजार, रघुनाथ बल्लाळ जोरखोर्‍यातून क्षेत्र महाबळेश्वरला एक हजार, बाबाजी भोसले मेटतळे, नवीन महाबळेश्वरला दोन हजार असे ठेवलेले होते. एकूण १८ ते २० हजार.

       कशी गंमत आहे पहा, आपण राहतो त्या ठिकाणी आजूबाजूला काही विशिष्ट लोकांची संख्या वाढू लागली की लगेचच आपल्याला जाणवतं मग पारच्या सैन्यात असलेल्या हेरांना त्यांच्या आजूबाजूला १८ ते २० हजार लोक जमा झालेत हे कळलं कसं नाही? आपल्या भोवती फास आवळला जातोय हे अफजलखानाच्या सैन्यातल्या कुणालाच कसं समजलं नाही? काय कारण असेल याचं? महाराजांनी त्यांना असं काय संमोहीत केलं होतं? पण या सर्वावरून एक मात्र निर्विवाद सिध्द होतं ते म्हणजे महाराजांचं सैन्य अतिशय कडक शिस्तीचं होतं. एवढ्या मोठ्या संख्येने खानाच्या सैन्याच्या जवळ येऊनही कुणीही त्याच्या सैन्याला आपण हल्ला करायला आलोय याचा थांगपत्ता लागू दिला नाही.

मराठी दफ्तर - रूमाल पहिला, शेडगावकर बखर

मराठी दफ्तर - रूमाल पहिला, शेडगावकर बखर

मराठी दफ्तर - रूमाल पहिला, शेडगावकर बखर

       मागच्या प्रकरणात आपण घाटमाथ्यावरच्या महाबळेश्वरहून पदरापर्यंतच्या आणि पदरापासून कोकणात उतरणार्‍या वाटा पाहिल्या. मुसेखान मंडळी पारहून वाईला पळाली. साहजिकच प्रतापगड जवळ असणार्‍या ज्या वाटेने लवकरात लवकर आणि सुरक्षित वाईला पोहोचता येईल त्या वाटेनेच ते जातील. प्रतापराव मोरेंनी या मंडळींना वाईला नेऊन सोडले. प्रतापराव जावळीतला स्थानिक असल्यामुळे त्याला या सर्व वाटा चांगल्याच परिचित होत्या. एकूण किती वाटा वाईच्या दिशेने जातात ते पाहू आणि मग त्यातली कोणती वाट असेल यावर चर्चा करू.      

१) पांगळ्याची वाट - क्षेत्र महाबळेश्वर ते दरे
२) निसणी - क्षेत्र महाबळेश्वर ते दरे
३) बाजाराची वाट - नवीन महाबळेश्वर ते दरे
४) लॉडविकची वाट - नवीन महाबळेश्वर ते हारोशी
५) रडतोंडी घाट - नवीन महाबळेश्वर ते पार
६) शिरगावची वाट - नवीन महाबळेश्वर, मेटतळे ते शिरगाव

🚩 १) पांगळ्याची वाट - ही वाट दर्‍यातून पांगळ्यावर म्हणजेच एलफिस्टन पॉईंटवर चढून येते आणि तशीच पुढे क्षेत्र महाबळेश्वरला जाते. ही अतिशय खड्या चढाईची आणि अवघड वाट आहे.

🚩 २) निसणी - ही वाट दर्‍यातून पांगळा आणि क्षेत्र महाबळेश्वरच्या दरम्यान चढून पानसळीच्या वाटेने क्षेत्र महाबळेश्वरला जाते. ही वाटही अतिशय अवघड प्रकारातलीच आहे.
       पांगळ्याच्या आणि निसणीच्या वाटांनी क्षेत्र महाबळेश्वरला येऊन गणेश घाटाने जोर खोर्‍यात उतरता येईल. घाट चढून गेल्यावर क्षेत्र महाबळेश्वरला रघुनाथ बल्लाळ सैन्य घेऊन उभे होते. अगदी त्यांच्या तावडीतून निसटुन जोर खोर्‍यातून वाई गाठता येईल पण नेतोजी जोरखोर्‍यात सैन्यासह असल्याची बातमी हेरांकडून नक्कीच त्यांना कळली होती. ते सैन्य प्रतागडाच्या मदतीला आले तर अडसर व्हावा म्हणून अफजलखानाने एक तुकडी दुधोशी/हारोशीला ठेवली होती त्यामुळे 'पांगळ्याची' आणि 'निसणी' या वाटा नक्कीच नाहीत. दुसरं असं की क्षेत्र महाबळेश्वरहून अवकाळीवरून तायघाट किंवा पसरणी घाट गाठता येईल पण एकतर हा थोडा लांबचा वळसा होईल आणि दुसरं असं की तायघाट हा शेवटी जोर खोर्‍यातच उतरतो. त्यामुळे पहिल्या दोन्ही वाटांचे पर्याय बाद ठरतील.

 🚩 ३) बाजाराची वाट - ही वाट दर्‍यातून नवीन  महाबळेश्वरला चढून येते. या वाटेला दर्‍याची मंडळी बाजारासाठी, शाळा, कॉलेजात जाण्यासाठी बहुतेक दररोजच वापरतात. आज या वाटेचा वापर भरपुर असला तरी ही वाट पुरातन वाटत नाही. पारसनीसांनी १९१६ साली लिहिलेल्या त्यांच्या 'महाबळेश्वर' पुस्तकात निसणी आणि रडतोंडी घाटवाटांचा उल्लेख केलाय पण या वाटेचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे बहुतेक ती वाट नवीन असावी.

🚩 ४) लॉडविकची वाट - ही वाट लॉडविक पॉईंटच्या बरोबर पायथ्याशी असलेल्या हारोशी गावातून लॉडविक पॉईंटवर चढून येते आणि तिथून नवीन महाबळेश्वरला जाते. ही वाट अतिशय सोपी आहे.

🚩 ५) रडतोंडी घाट - ही वाट पार गावातून कोयना नदी ओलांडून मेटतळेमार्गे सध्याच्या सनसेट ऊर्फ मुंबई पॉईंटवर चढून येते. अफजलखान वाईहून पारला येताना याच वाटेने आला होता.

🚩 ६) शिरगावची वाट - पारहून मकरंदगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोणसपुरकडे जाताना वाटेत शिरगाव लागतं. या शिरगावातून ही वाट मेटतळे मार्गे मुंबई पॉईंटवर चढून येते.
       रडतोंडी घाट आणि शिरगावची वाट या दोन्ही वाटा मेटतळ्याहून महाबळेश्वरला जातात. यापैकी कोणत्या तरी वाटेने अफजलखानाचे सैन्य त्याच्या वाईच्या मुख्य तळावर जाईल ही शक्यता गृहीत धरून महाराजांनी मेटतळ्याला किंवा नवीन महाबळेश्वरला बाबाजी भोसले यांना ससैन्य ठेवले होते. त्यामुळे रडतोंडी आणि शिरगावची वाटही नाही.

       राहिला शेवटचा पर्याय तो म्हणजे लॉडविकची वाट. बहुतेक सर्व ऐतिहासिक साधनांत 'पारचे लष्कर बुडविले' असा संदर्भ मिळतो त्यामुळे दुधोशी/हारोशीच्या तुकडीवर हल्ला झाला नसावा आणि याच सैन्याच्या आणि प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने मुसेखान वगैरे मंडळी वाईला गेली असावीत. शेडगावकर बखरीत बाबाजी भोसले, श्यामराजपंत पद्मनाभी आणि त्र्यंबक भास्कर ही मराठ्यांकडील तोलदार मंडळी ठार झाल्याचं म्हटलं आहे. लॉडविकच्या वाटेने परत जाताना मुसेखानाची बाबाजी भोसलेंबरोबर नवीन महाबळेश्वरला चकमक झाली असेल काय? आणि त्या चकमकीतच ते ठार झाले असावेत का? ही मंडळी नेमक्या कोणत्या वाटेने वाईला गेली हे कुठल्याही ऐतिहासिक साधनांत स्पष्टपणे आलेले नाही त्यामुळे आपण केवळ तर्कच करू शकतो.

शिवभारत अध्याय २३ श्लोक ३७ ते ४३

       अफजलखानाच्या सगळ्या सैन्याची दाणादाण उडाली. त्याचे सगळे सैन्य विखरून गेले. मुसेखान वगैरे मंडळी वाईला तर फाजलखान हेळवाकला पळाला. तिथून तो दाभोळमार्गे राजापुरला जाऊन पुढे रूस्तुमजमाच्या सैन्याला जाऊन मिळाला. पुढे दोघेही एकत्रितपणे पन्हाळगडावर चालून गेले.

 शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड १, पत्र क्र. ८००


🚩 प्रकरण दहावे


🚩 अफजलवधानंतर महाराजांच्या सैन्याचे तीन भाग आणि त्यांचे मार्ग.


🚩 अ) नेतोजी - जोर खोर्‍यातून नेतोजी सकाळी वाईला गेला पण तो तिथे पोहोचेपर्यंत वाईचा तळ पूर्णपणे मो़कळा झालेला होता. वाईहून मुसेखान वगैरे मंडळी रात्रीच पळून गेली होती. त्यामुळे वाईहून निघून तो आदिलशाही राज्यात घुसला. वाईहून नेतोजी कृष्णाकाठाने जाऊन खटाव, मायणी, रामापुर, कलेढोण, वाळवा, हलटणा, वडगाव, आष्टी, आष्टा, वेळापुर, औदुंबर, मसुर, सुपे, कराड, तांबवे, पाली, नेर्ले, कामेरी, सावे, उरण आणि कोळे-नरसिंहपुर वगैरे भागावर ताबा मिळवला. 

शिवभारत अध्याय २३ श्लोक ५९ ते ६१

🚩 ब) दोरोजी, मोरोपंत - मोरोपंत, तानाजी, रामाजी पांगारा वगैरेंनी पार, हातलोट घाटाने कोकणात उतरून खेड, दापोली, दाभोळपर्यंतचा भाग जिंकला. इकडून दाभोळचा सुभेदार महंम्मद शेरीफ हा अफजलखानाची तीन मोठी गलबते घेऊन राजापुरला पळाला. बहुधा याच गलबतांमधून फाजलखान राजापूरला पळाला असावा. त्याच दरम्यान दोरोजी घोडेस्वारांची तुकडी घेऊन राजापुरला आले. तीन जहाजांपैकी एक जहाज इंग्रजांनी त्यांना येणार्‍या रकमेची परतफेड होईपर्यंत ताब्यात ठेऊन घेतलं, बाकी वेंगुर्ल्याला पळाली. इंग्रजांनी ही जहाजे मराठ्यांच्या ताब्यात दिली नाहीत म्हणून राजापूरहून दोरोजींनी गिफर्ड नावाचा एक इंग्रज आणि एक मराठी दलाल यांना पकडून खारेपाटणला नेले. खारेपाटणला दलाल सोडून दिला पण गिफर्डला काही सोडले नाही. पुढे खारेपाटण जिंकून दोरोजी रांगणा घेणार्‍या तुकडीस जाऊन मिळाले.

शिवकालीन पत्र-सार-संग्रह खंड १, पत्र क्र. ८०१.


🚩 क) शिवाजी महाराज - महाराजांनी आपले लक्ष प्रथम दक्षिणेकडे वळवले आणि वासोटा किल्ल्याला वेढा घातला. वासोटा प्रतापगडाच्या दक्षिणेला साधारण तीस किलोमीटरवर आहे. वासोटा घेऊन महाराज प्रथम विशाळगडाकडे गेले. विशाळगड ताब्यात घेतल्यावर लगोलग पन्हाळगडही स्वराज्यात दाखल झाला. अफजलखानाच्या मृत्यनंतर अवघ्या सोळाव्या दिवसात म्हणजे २७-२८ नोव्हेंबरला महाराजांनी पन्हाळगड घेतला. हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतल्यावर पुढे जाऊन महाराजांनी मिरजेच्या किल्ल्याला वेढा घातला.

॥ इति प्रतापगडपर्वः ॥


🚩🚩🚩

       'इतिहास' अजरामर करण्यात भूगोलाचाही तितकाच महत्त्वाचा सहभाग असतो आणि तो कसा असतो ते जास्तीतजास्त जणांना समजावं केवळ यासाठीच हा लेखनप्रपंच होता. या लेखात प्रतापगड परिसरातल्या स्वतः फिरलेल्या जास्तीतजास्त वाटा देण्याचा माझा प्रयत्न होता पण तरीसुद्धा सगळ्याच वाटा या लेखात आल्या असतील असं मला वाटत नाही. अजूनही वाटांची नावं सांगणं राहून गेलं असेलच. हाडाच्या डोंगर भटक्यांनी इतिहासात अजरामर झालेल्या अशा नवनवीन वाटांचा शोध जाणीवपूर्वक घ्यायला हवा. या लेखात काही ठिकाणी मला माहिती असलेल्या वाटा मुद्दामच दिलेल्या नाहीयेत. काही अनवट वाटांची नावं हेतूपुरस्सर टाळलेली आहेत. आपल्या पूर्वजांनी आपलं अस्तित्व टिकून रहावं यासाठी अतिशय पराकोटीचे प्रयत्न केले आहेत आणि हा लेख वाचून कसे ते समजण्यास थोडीफार मदत नक्कीच होईल.

       उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक साधनांच्या आणि स्थानिकांकडून मिळालेल्या वाटांच्या माहितीच्या आधारावर हा लेख बेतला आहे. इथून पुढे अस्सल ऐतिहासिक संदर्भ आणि वाटांची माहिती मिळवून त्यानुसार या लेखात, नकाशात सुधारणा करण्याचा माझा कायमच प्रयत्न असेल. 

       नकाशात दाखवलेल्या वाटा या वाट कशी असेल याचा फक्त अंदाज यावा यासाठीच दिलेल्या आहेत, त्या to scale नाहीत. याशिवाय नावं दिलेल्या वाटांच्या नेमक्या जागाही मुद्दामच दाखवलेल्या नाहीत. डोंगर भटक्यांनी लेखात आलेल्या सर्व वाटांचा निगुतीने शोध घ्यावा एवढी एकच माफक इच्छा यामागे आहे.

       माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं देखील मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे किंवा थोडीफार कागदपत्रांची शोधाशोध केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानाने इथे नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा नक्कीच राहीलेल्या आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणिवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही 

बहुत काय लिहिणें. मर्यादेयं विराजते ॥

🚩 फोटो - गुगल

🚩 नकाशे - निनाद बारटक्के

🚩 संदर्भ -

१) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा - वि. का. राजवाडे.

२) शिवकालीन पत्र-सार-संग्रह खंड १ - पत्र क्र. ७०८, ७७३, ७७४, ७९६, ७९८, ८००, ८०१.

३) शिवकालीन पत्र-सार-संग्रह खंड २ - पत्र क्र. १७९७.

४) जेधे करिणा - स. ग. जोशी.

५) जेधे शकावली - बाळ गंगाधर टिळक.

६) ९१ कलमी बखर - विनायक सदाशिव वाकसकर.

७) जावळीकर मोर्‍यांची छोटी बखर.

८) मराठ्यांची बखर - कॅप्टन डेव्हीड केपन.

९) शिवापूर दफ्तरातील यादी - राजवाडे संग्रह.

१०) खरे जंत्री - कै. गणेश सखाराम खरे.

११) युद्ध प्रतापगडचे, एक नवा प्रकाश - मेजर मुकुंद जोशी.

१२) शिवभारत - कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर.

१३) शिवराज-मुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई.

१४) मराठी दफ्तर - रूमाल पहिला, शेडगावकर बखर - विनायक लक्ष्मण भावे.


🚩 ऋणनिर्देश -

१) पुणे व्हेंचरर्स

२) फाल्कन ट्रेकर्स

३) अजय ढमढेरे 

४) निनाद बारटक्के

५) जितेंद्र बंकापुरे

       हा लेख परिपूर्ण करण्यासाठी मला अनेक डोंगर भटक्यांची मदत झाली आहे. प्रत्येकाचंच नाव इथे नमूद करणं काही शक्य होणार नाही त्यामुळे ज्यांची या लेखासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत झाली आहे त्या सर्वांचा मी कायमच ऋणी असेन.

॥ लेखनसीमा ॥


🚩 या लेखाच्या संबंधित काही लेख खाली दिलेल्या धाग्यावरून वाचता येतील.

१) 'मावळ म्हणजे काय?' - 

https://watvedilip.blogspot.com/2019/12/blog-post_31.html

२) 'जावळी' - 

https://watvedilip.blogspot.com/2019/10/blog-post.html

३) 'अथातो घाटजिज्ञासा' - 

https://watvedilip.blogspot.com/2020/03/blog-post.html