सोमवार, ७ जुलै, २०२५

"पंच कैलास"

 १) "मणीमहेश कैलास" -

 

 
       'मणीमहेश कैलास' हिमाचल प्रदेशातील पीरपंजाल रांगेत आणि रावी नदीच्या खोर्‍यात (32°23′42″N, 76°38′14″E) या अक्षांश-रेखांशावर वसलेला आहे. प्रशासकीय दृष्टीने मणीमहेश कैलास चंबा जिल्ह्यातील भरमौर तालूक्यात असलेल्या हडसर गावाजवळ आहे. या कैलासाची समुद्रसपाटीपासून उंची जरी १८५४७ फूट असली तरी दर्शन मात्र १३३९० फूट उंचीवरूनच घेतात. हडसर गावापासून १३ किलोमीटर अंतरावर दर्शन घेण्याचं ठिकाण म्हणजे मणीमहेश झील आहे.

🚩 अंतरे -

चंबा ते भरमौर - ६५ किमी रस्ता
भरमौर ते हडसर - १३ किमी रस्ता
हडसर ते धनछो - ०६ किमी चाल
धनछो ते सुंदरासी - ०५ किमी चाल
सुंदरासी ते गौरीकुंड - ०१ किमी चाल
गौरीकुंड ते मणीमहेश कुंड - ०१ किमी चाल


🚩 कसे पोहोचाल? -

🚩 अ) विमानमार्गे - मणीमहेश यात्रेला विमानाने पोहोचायचं असेल तर सर्वात जवळचा विमानतळ गग्गल कांगडा हा आहे. हा विमानतळ भरमौरपासून १७५ किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळावर फारच कमी विमानं उतरत असल्यामुळं अमृतसर किंवा चंदिगड विमानतळावरूनही इथं येता येतं. अमृतसर विमानतळापासून भरमौर २८८ किलोमीटर आहे तर चंदिगड विमानतळापासून भरमौर ४२१ किलोमीटर आहे.

🚩 आ) रेल्वेमार्गे - मणीमहेश यात्रेसाठी सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन पठाणकोट आहे. पठाणकोटपासून भरमौर १६० किलोमीटर आहे.

🚩 इ) रस्तामार्गे - पठाणकोट, धर्मशाला आणि डलहौसी इथून भरमौरसाठी HRTC म्हणजेच Himachal Pradesh Transport Corporation ची बससेवा उपलब्ध आहे. पठाणकोटपासून संध्याकाळी ०५.१५ वाजता सुटणारी हिमाचल पथ परिवहन निगमची ऑर्डीनरी प्रकारची बस रात्री १०.३० वाजता जिल्हा मुख्यालय असलेल्या चंबापर्यंत इथं पोहोचते. ३९ आसनक्षमता असलेल्या या बसचं तिकीट फक्त २६५/- रूपये इतकं आहे. या बसचं आगाऊ आरक्षण HRTC च्या Online Booking सेवेद्वारे करता येतं. चंबापासून भरमौरपर्यंत HRTC च्या स्थानिक बससेवेसोबतच खाजगी जीपचा पर्याय देखील उपलब्ध आहे. भरमौरपासून पायथ्याच्या हडसर किंवा पायी यात्रा सुरू करण्याच्या ठिकाणापर्यंत मात्र खाजगी वाहनानेच प्रवास करावा लागतो.

       मणीमहेश कैलासाची यात्रा दोन प्रकाराने करतात. पहिली हडसर गावापासून मणीमहेश कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या मणीमहेश झीलपर्यंत तर दुसरी हडसरपासून हडसरपर्यंत परिक्रमा करून. दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे यात्रा करायची असेल तरीसुद्धा भरमौर इथं असलेल्या भरमाणी देवीचं दर्शन घेऊनच यात्रा सुरू करता येते अशी स्थानिक मान्यता आहे. भरमौर हे तिथं असणार्‍या प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. तिथं असलेल्या ८४ मंदिरांच्या समूहाला एकत्रितपणे 'चौरासी' असं म्हणतात. भरमौर इथं गेल्यावर आवर्जून पहावं असं हे स्थान आहे. स्थानिक लोककथेनुसार भरमौर हे भगवान शिवाचं स्थान मानलं जातं. हे मंदीर संकुल अंदाजे सहाव्या शतकात भरमौरच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बांधलं गेलं. गेल्या काही वर्षांत बहुतेक मंदिरांची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली आहे. चौरासी मंदिर संकुलात पुढील काही महत्वाची मंदीरं आपल्याला पहायला मिळतात.  

🚩 मणीमहेश मंदीर -

       चौरासी मंदिर संकुलाच्या मध्यभागी एका विशाल शिवलिंगाने स्थित भगवान मणीमहेशचे शिखर शैलीतील मंदिर आहे. या मंदीराची आख्यायिका अशी सांगितली जाते की कुरुक्षेत्रापासून मणीमहेश झील इथं प्रवास करणाऱ्या ८४ सिद्धपुरूषांचा एक गट सध्याच्या मंदीरांपाशी थांबला होता. सिद्धपुरूषांना भरमौरच्या एकांतता, शांतता आणि सौंदर्याची इतकी भुरळ पडली आणि ते इथंच ध्यानात एकरूप झाले.

 🚩 गणपती मंदीर -

       हे गणपती मंदीर संकुलाच्या अगदी प्रवेशद्वारापाशी आहे. असं मानलं जातं की किराच्या भरमौरवरील आक्रमणादरम्यान गणपती मंदिराला आग लावण्यात आली होती आणि मूर्तीचे पाय विद्रूप करण्यात आले होते. आज आपण पाहिलं तर गणपतीची पूर्ण आकाराची कांस्य मूर्ती आहे पण त्याचे दोन्ही पाय मात्र गहाळ झालेले आहेत.

🚩 धर्मराज मंदीर -

       चौरासी मंदीर संकुलाच्या उत्तरेकडील कोपऱ्यावर असलेलं मंदिर हे धर्मेश्वर महादेवाचं आहे. 'अंतिम न्यायाचे देव' अशा या धर्मराज यांच्या मंदीराला स्थानिक लोक धाई-पोडी म्हणजेच 'अडीच पावलं' असं म्हणतात. स्थानिकांमध्ये अशी श्रद्धा आहे की शरीरातून निघून जाणाऱ्या प्रत्येक आत्म्याला या मंदिरासमोर उभं राहून मंदिरातून पुढील प्रवास करण्यासाठी आणि मृत्यूनंतर शिवलोकात राहण्यासाठी धर्मराज यांची अंतिम परवानगी घ्यावी लागते.

🚩 लक्षणा देवी मंदीर -

       संकुलातील मध्यभागात वसलेलं आणि समुहात असलेल्या सर्व ८४ मंदिरांपैकी सर्वात जुनं मानलं जाणारं हे मंदिर महिषासुरमर्दिनी देवीच्या रूपाने स्थित आहे. राजा मेरुवर्मनने बांधलेलं हे मंदिर गेबल्ड पेंडंट छताच्या मंदिरांचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदीर उत्तराभिमुख आहे. मंदीराला आयताकृती गर्भगृह आहे ज्याच्या समोर एक लांबलचक त्रिकोणी मंडप आहे. मंडपासमोर दोन मोठे खांब आहेत. मंडपाचे खांब, छत आणि त्यापुढं असलेल्या लाकडी दरवाज्यांवर गेबल्ड ट्रेफोइल कमान आहे. या कमानीवर गरुडावर आरूढ असलेली बारा सशस्त्र विष्णूंची मुर्ती आहे. गर्भगृहात लक्षणा देवी असं नाव असलेली महिषमर्दिनीची कांस्य मूर्ती आहे. दरवाज्याची पट्टी कलात्मक कोरीवकाम आणि वेलबुट्टीच्या नक्षीने सजवलेली आहे. मंदीराचं बांधकाम सहाव्या शतकातील असल्यामुळं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हे मंदीर संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे.

       स्थानिक आख्यायिकेनुसार भरमाणी देवीमुळं ब्रह्मपुरा या गावाचं नाव भरमौर असं पडलं. भगवान शिव जेव्हा मणीमहेश इथं गेले तेव्हा त्यांनी भरमाणी देवीला वरदान दिलं की मणीमहेशच्या तीर्थयात्रेला जाणाऱ्या सर्व व्यक्तींनी आधी भरमाणी मंदीरात असलेल्या पवित्र तलावात स्नान करावं आणि मग यात्रेला सुरूवात करावी. आणखी एक आख्यायिकेनुसार आधी भरमाणी देवी भरमौरच्या चौरासी मंदिर संकुलात राहत होती पण जेव्हा भगवान शिव पहिल्यांदा भरमौरमध्ये प्रकट झाले तेव्हा देवीनं तिचं स्थान भरमौर जवळच्या डोंगराच्या माथ्यावर हलवलं. त्यावेळी भगवान शिव यांनी भरमाणी देवीला वरदान दिलं की मणीमहेशच्या यात्रेला जाणाऱ्या सर्व व्यक्तींनी आधी भरमाणी मंदीरातल्या तलावात स्नान करावं आणि जर असं झालं नाही तर यात्रेकरूंची यात्रा भगवान शिवाला मान्य होणार नाही. तेव्हापासून मणिमहेशची यात्रा सुरू करण्यापूर्वी भरमाणी देवीचं दर्शन घ्यावं अशी सामान्य धारणा आहे.

🚩 कोणत्या प्रकारे मणीमहेशची यात्रा करता येते ते पाहू...

🚩 प्रकार पहिला -

🚩 हडसर ते मणीमहेश झील -

       ही दर्शन यात्रा करताना पायथ्याच्या हडसर गावातून मणीमहेश तलाव गाठण्यासाठी एकूण तीन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला २६ किलोमीटर चालत, दुसरा चालण्याच्याच मार्गाने पण खच्चरनी तर तिसरा हेलीकॉप्टरनी गौरीकुंडपर्यंत आणि तिथून पुढं एक किलोमीटर चालत मणीमहेश झीलपर्यंत जाता येतं. हेलीकॉप्टरचं आरक्षण भरमौर किंवा चंबा इथून केलं जातं. याचं भाडं प्रतिव्यक्ती ८०००/- रुपयांपासून पुढं सुरू होतं. ही हेलीकॉप्टर सेवा चांगल्या वातावरणावर अवलंबून असते. हडसर ते मणीमहेश झील दरम्यानच्या वाटेत धनछो, सुंदरासी, गौरीकुंड आणि सरतेशेवटी मणीमहेश कुंड अशी ठिकाणं आहेत. या प्रत्येक ठिकाणी यात्राकाळात निवास आणि जेवणाखाण्याच्या सोयीसाठी लंघर लागलेले असतातच त्याशिवाय वाजवी दरात खाजगी तंबूसुद्धा उपलब्ध असतात.


🚩 प्रकार दुसरा -

🚩 हडसर, कुगती, मणीमहेश झील ते हडसर परिक्रमा -

       प्रदक्षिणा आणि परिक्रमा या दोन्ही शब्दांचा अर्थ वळसा घालणे असा जरी असला तरी त्यात किंचित फरक आहे. प्रदक्षिणा म्हणजे देवतेच्या मूर्ती किंवा मंदिराभोवती जवळून वळसा घालणे. प्रदक्षिणेचा एक साधा मंत्र तीका घालावी याचा अर्थ स्पष्ट करतो.

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च।
तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिण पदे पदे॥

       प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलावर गेल्या अनेक जन्मांमध्ये केलेली सर्व पापे नष्ट होतात असं समजलं जातं पण ही प्रदक्षिणा...

प्रदक्षिणायां प्रकृष्टेन दाक्षिण्यं कुशलता।

       म्हणजेच मूर्ती किंवा मंदिराच्या जवळून घालायची असल्याने त्यासाठी अधिक कौशल्याची आवश्यकता असते. परिक्रमेचं मात्र तसं नाही हे पुढील सुभाषितावरून स्प्ष्ट होईल

परिक्रमणं पादविक्षेपे।
परि उपसर्ग पूर्वक क्रमु पादविक्षेपे +घञ्।

       म्हणजेच परिक्रमेत देवतेच्या जन्मस्थानाचं, लीलास्थळाचं, आजूबजूला असलेल्या देवीदेवतांचं दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त अंतरावरून प्रदक्षिणा करावी लागते. खरंतर भगवान शिवाला अर्धीच प्रदक्षिणा घालतात याचं कारण असं आहे की शिवलिंगाच्या मागील भागाला म्हणजे जिथं पाणी बाहेर पडतं त्याला 'ब्रह्मसूत्र' असं म्हणतात आणि ते ओलांडणं अयोग्य मानलं जातं. प्रदक्षिणा शब्दाची फोड 'प्र' म्हणजे समोर आणि 'दक्षिणा' म्हणजे उजवी बाजू अशी केलेली आहे. थोडक्यात प्रदक्षिणा घालताना मूर्ती उजव्या हाताला ठेऊन म्हणजे घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने घालावी लागते म्हणुनच तिला प्रदक्षिणा म्हटलं जातं. प्रदक्षिणेला जसं घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने घालण्याचं बंधन आहे तसं परिक्रमेसाठी मात्र कुठलंही बंधन नाही त्यामुळं प्रत्येक कैलासाची संपूर्ण गोलाकार परिक्रमा करता येते. ट्रेकिंगच्या भाषेत यालाच सर्कीट ट्रेक असं म्हणतात. या ट्रेकमध्ये खिंडी म्हणजे पासेस असतात आणि त्या ट्रेकला त्या पासच्या नावानी संबोधलं जातं. मणीमहेश कैलासाच्या सर्कीट ट्रेकला 'Jotnu Pass' असं म्हटलं जातं. अर्थात ज्याप्रमाणे...

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति॥

       ...म्हणजे आकाशातून पडलेलं पाणी जसं शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतं त्याचप्रमाणे प्रदक्षिणा असो, परिक्रमा असो किंवा सर्कीट ट्रेक हेतू मात्र एकच आणि तो म्हणजे 'आत्मिक समाधान.' यात्रा करताना ती परिक्रमा करूनही केली जाते म्हणूनच हा लेखनप्रपंच.

       मणीमहेशाची परिक्रमा हडसरपासून सुरू होते. हडसरनंतरचं गाव कुगती. सध्या कुगतीपर्यंत रस्ता झाला असल्यामुळं ते अंतर गाडीने जाता येतं. कुगतीनंतर मात्र चालत कार्तिकस्वामी मंदीर, दालोतू छावणी, पढर गोथ, अलया बेस कँप, जोत्नू पास (१५४५३ फूट), मणीमहेश झील धनछो ते पुन्हा हडसर असे टप्पे पार करावे लागतात. ही परिक्रमा अतिशय खडतर अशी आहे.

🚩 कधी जाल?

       हिंदू कालगणनेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यात कृष्ण जन्माष्टमी ते राधाष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी या महिन्याभराच्या काळातील पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मणीमहेश तलावावर एक विशाल जत्रा आयोजित केली जाते, जी पुढं सलग सात दिवस चालते. हीलाच मणीमहेश यात्रा असं म्हटलं जातं. ही २६ किलोमीटरची यात्रा काही भाविक अनवाणी पायांनीही करतात. या यात्रेमध्ये यात्रेकरूंनी नेलेली काठी जिला 'पवित्र छरी' म्हटलं जातं ती घेऊन जाताना भाविक भजन म्हणत जातात. यात्राकाळात भगवान शंकर या ठिकाणी वास्तव्य करून असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगवान शिवाला समर्पित या यात्रेत संपूर्ण भारतातून हजारो, लाखो भाविक पवित्र तलावात स्नान करण्यासाठी येतात. 

        भरमौरपासून ०४ किमी अंतरावर असलेल्या भरमाणी देवी कुंडात स्नान आणि नंतर दर्शन घेऊन मणीमहेश यात्रा सुरू केली जाते तर शेवटी मणीमहेश तलावात स्नान करून मणीमहेशाचं दर्शन घेतल्यानंतरच मणीमहेश यात्रा पूर्ण झाली असं समजलं जातं. भरमाणी देवी मंदिरात पोहोचल्यानंतर यात्री मोठ्या आस्थेने शिव–पार्वतींची उपासना, पूजा करून आपली यात्रा सुखरूप पार पडावी यासाठी महादेवाला साकडं घालतात.

 🚩 यात्रा आयोजन -

       मणीमहेश यात्रा समिती आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे या यात्रेचं आजोजन करतं त्यामुळं मणीमहेश यात्रा समितीतर्फे जिल्हा मुख्यालय असलेल्या चंबापासून मणीमहेशकडे जाऊ लागलं की यात्राकाळात भरपूर लंघर लागलेले दिसून येतात. या सर्व लंघरमध्ये जेवणाखाण्याची आणि निवासाची मोफत सोय होते. यात्राकाळात जेवणाखाण्याची आणि निवासाची सेवा देणार्‍या खाजगी तंबूमालकांचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे निश्चित करण्याचं कामही हीच मणीमहेश यात्रा समिती करते. यात्राकाळात हडसरपासून मणीमहेशपर्यंतच्या यात्रामार्गावर प्रशासनातर्फे पोलिस सुरक्षेसोबतच वैद्यकीय आणि बचाव पथकाची सेवा देखील पुरवली जाते. एकूणच स्थनिक ग्रामस्थ, मणीमहेश यात्रा समिती आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी परिश्रम घेतात.

       दर्शन घेणार्‍या यात्रींचा डेटा किंवा त्यांची माहिती असावी, यात्रेत गर्दी होऊ नये आणि दररोज दर्शन घेणार्‍या यात्रेकरूंची संख्या मर्यादित असावी यासाठी प्रशासनाकडं ऑनलाईन नोंदणी/पंजीकरण करावं लागतं. चंबा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर त्याचा धागा दिलेला असतो. आवश्यक कागदपत्रं आणि शुल्क भरून नोंदणी/पंजीकरण करता येतं. अतिशय सोप्या असलेल्या या प्रक्रियेची सुरूवात यात्रा सुरू होण्याच्या साधारण दिड महिना अगोदर होते. आधार कार्ड आणि वैद्यकिय प्रमाणपत्र दिलेल्या धाग्यावर अपलोड करून नाममात्र शुल्क भरलं की ही प्रक्रिया पूर्ण होते.

       Shri Manimahesh Yatra Trust च्या https://www.manimaheshyatra.hp.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्या त्या वर्षीचं Registratoin करता येतं. २०२५ सालची नोंदणी प्रक्रिया 'Manimahesh Yatra Registratoin 2025' अशा नावाची असेल. या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा खालील तपशील भरावा लागतो.

1) Name
2) Fathers Name
3) Date of birth
4) Mobile number
5) Gender
6) Nationality
7) State
8) District
9) Address
10) Reporting Date at Base Camp
11) Name of Emergency contact
12) Contact No. in case of Emergency.
13) Blood Group
14) Email
15) ID Type
16) ID Number
17) Photo ID (Max size 2Mb) (jpg,png,jpeg,pdf)
18) Medical certificate (Max size 2Mb) (jpg,png,jpeg,pdf)
19) Do you wish to donate?

       इतका तपशील भरल्यानंतर 'I hereby confirm that all information provided above is correct to the best of my knowledge.' असं Self Declaration देऊन नाममात्र शुल्क भरावं लागतं. Registration Slip download करून ती प्रत पायथ्याशी असलेल्या छावणीत दाखवावी लागते.

       यात्रा काळात इथं प्रचंड गर्दी असते त्यामुळं गर्दीला टाळण्यासाठी किंवा राहण्याजेवणाच्या सोयींच्या आणि एकूणच स्वच्छतेच्या दृष्टीनं ही यात्रा थोडी महाग पडली तरी काही मंडळी ऐन यात्राकाळापूर्वी काही दिवस अगोदरच ही यात्रा करतात.

🚩 धार्मिक महत्त्व -

       भारतातील हिमालय पर्वत हे धार्मिक आणि पौराणिकदृष्ट्या एक विलक्षण स्थान मानलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला विश्वरूपदर्शन दाखवताना ‘पर्वतांमध्ये मी हिमालय आहे’ असं म्हटलंय. हा हिमालय पर्वत मूळ गंगेचा उगम आहे, जो हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानला जातो. पंचकैलास पर्वत देखील सर्व हिमालयातच आहेत. मणीमहेश कैलास शिखराजवळही एका गंगेचा उगम होतो जीला मणिमहेश गंगा असं म्हटलं जातं. ही गंगा सुरवातीला कमलकुंडात उगम पावते आणि पुढं गौरीकुंडात येऊन शेवटी रावी नदीला जाऊन मिळते. हिंदू धर्मात या कुंडांना मानसरोवर तलावाप्रमाणेच धार्मिक महत्त्व आहे. कैलास पर्वताप्रमाणेच मणीमहेशजवळ एक पर्वत आहे ज्याला मणीमहेश कैलास शिखर असं म्हटलं जातं. स्थानिक रहिवाशांच्या मते मणीमहेश कैलास पर्वत त्यांचे कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण करतो त्यामुळं स्थानिक लोक या संपूर्ण महाकाय पर्वताचीच पूजा करतात.

🚩 आख्यायिका -

       हिंदू पौराणिक कथेनुसार, मणीमहेश तलाव हे भगवान शिवाचं निवासस्थान मानलं जातं. आख्यायिका सांगते की भगवान शिवाने याच ठिकाणी तपश्चर्या केली. एका प्रचलित आख्यायिकेनुसार असंही मानलं जातं की शिवाने मणीमहेशची निर्मिती पार्वतीशी विवाह केल्यानंतर केली, ज्याची 'माता गोर्जा' म्हणून पूजा केली जाते. 'मणीमहेश' या शब्दाची व्युत्पत्ती 'शिवाच्या म्हणजेच महेशाच्या मुकुटावरील रत्न अर्थात मणी' दर्शवते. एका स्थानिक आख्यायिकेनुसार या मणीरूपी दागिन्यातून परावर्तित होणारी चंद्रकिरणे मणीमहेश तलावातून स्वच्छ पौर्णिमेच्या रात्री दिसतात जो एक दुर्मिळ प्रसंग आहे असं मानलं जातं.

 🚩 जवळची पाहण्याची ठिकाणं -

       ही यात्रा करण्यासाठी येताना काही दिवस जादाचे काढून आल्यास जवळपासची बरीच ठिकाणं पाहता येतात. यात डलहौसी, खज्जियार, अमृतसर इथलं सुवर्णमंदिर आणि जालियनवाला बाग, अटारी बॉर्डर, कर्तारपूर कॅरिडॉर वगैरे पाहता येतं. या यात्रेला जोडूनच कटर्‍याच्या वैष्णोदेवीचं सुद्धा दर्शन घेता येतं. अर्थात उपलब्ध वेळेनुसार प्रत्येकजण आपला स्वतःचा कार्यक्रम ठरवू शकतो.

॥ ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॥

रवींदु दावानल पूर्ण भाळीं।
स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी॥
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी।
तुजवीण शंभो मज कोण तारी॥

🚩 फोटो सौजन्य -

१) गुगल
२) संदिप बेडकुते

लेखनसीमा ॥ लोभ असावा ॥

बुधवार, २ जुलै, २०२५

"पंच कैलास"

"पंच कैलास"


कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि॥

 
       हिमालयाच्या पर्वतरांगेत वसलेल्या 'कैलास मानसरोवर' बद्दल माहिती नाही असा भारतीय क्वचितच सापडेल. सध्याच्या तिबेटमध्ये असलेल्या मानसरोवर या ठिकाणाजवळचा कैलास हे भगवान शिवाचं मुख्य निवासस्थान मानलं जातं पण कैलास हा एकच नसून हिमालयाच्या कुशीत मुख्य कैलास पर्वतासह आणखी चार कैलास पर्वत आहेत ज्यांना एकत्रितपणे पंच कैलास तीर्थ असं म्हटलं जातं. या पाचही ठिकाणांच्या वेगवेगळ्या यात्रा करतात. अर्थात हे फारच कमी लोकांना माहिती आहे. पंच कैलासाच्या प्रत्येक कैलास शिखराची स्वत:ची अशी एक कथा, विधी आणि महत्त्व देखील आहे.

       पंच कैलासाचं मूळ स्कंद पुराण आणि इतर प्राचीन हिंदू धर्मग्रंथांत मिळतं. भगवान शिवांनी स्वत:च्या पार्थिवाबाबतची माहिती उघड करण्यासाठी हिमालयातील पाच वेगवेगळ्या शिखरांची निवड केली. या पाच शिखरांना पंच कैलास असं म्हटलं जातं. पंच कैलासाच्या प्रत्येक शिखराचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक शिखर यात्रेकरूंना प्राचीन परंपरा आणि देवत्वाशी जोडण्यास मदत करतं. या पर्वतांच्या यात्रांचा प्रवास करणं म्हणजे अशा जगात प्रवेश करणं जिथं प्रत्येक पावलागणीक तुम्हाला देवत्वाची अनूभुती मिळत राहते. पंच कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शिखरांपाशी पोहोचल्यावर प्रत्येकाला एक वेगळीच अनूभुती मिळते. कैलासांच्या सर्व जागांमध्ये शब्दांत सांगता येणार नाही असं काहीतरी नक्कीच आहे, जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याशिवाय समजायचं नाही. पंच कैलासाची यात्रा तुम्हाला मोक्षाकडं तर घेऊन जातेच पण आध्यात्मिक मुक्ती आणि स्वानंद देखील प्रदान करते. कैलासांच्या ठिकाणी गेल्यानंतर स्वत:तील 'स्व' त्वाला शोधण्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. अशा या पंच कैलास यात्रा पूर्ण केलेल्यांना 'कैलासी' असं म्हटलं जातं. 'कैलासी' आणि 'कैलासवासी' हे दोन्ही शब्द खूपच जवळचे असले तरी दोन्हींच्या अर्थात मात्र जमीन-अस्मानाचा फरक आहे.

       भगवान शंकरांच्या या 'पंच कैलास' यात्रांमधल्या बहूतेक सर्व यात्रा विरळ आॕक्सीजन असल्यामुळं अतिशय कठीण समजल्या जातात. सर्वसाधारपणे १३००० फूट उंचीपासून पुढं आॕक्सीजनचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. बहूतेक सर्व कैलासांना पोहोचण्यासाठी अतिशय खडतर मार्गावरून चढून जावं लागतं त्यामुळं खूपच कमी मंडळी ही सगळ्या कैलासांची यात्रा पूर्ण करू शकतात. कित्येक जणांना समोर कैलास शिखर दिसत असूनही तिथंपर्यंत पोहोचता येत नाही त्यामुळं एकूणच सर्व पंच कैलासांची यात्रा अतिशय खडतर समजली जाते. महाराष्ट्रातून या यात्रा करणाऱ्यांचा टक्का तर नगण्य आहे. या सर्व यात्रांची एकत्रित माहिती आणि तीही मराठीत कुठेच उपलब्ध नाही त्यामुळं साहजिकच या यात्रांबद्दल फारच कमी महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे.

       महाराष्ट्रातून पंच कैलास यात्रा करणारी मंडळी अतिशय कमी असल्यामुळं आम्हां मित्रमंडळींना या यात्रांची माहिती मिळवताना आणि माहिती मिळाल्यानंतर यात्रेचं नियोजन करताना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. आमच्या या यात्रा पूर्ण झाल्यामुळं वैयक्तिक मला या यात्रांच्या संदर्भात बरेच फोन येतात त्यामुळं आम्हाला ज्या ज्या समस्यांचा सामना करावा लागला त्या सर्व समस्यांचं निराकरण करेल असा एक पंच कैलास यात्रांवर समग्र लेख लिहिण्याची बुद्धी मला महादेवांनीच दिली. या पंच कैलास यात्रा जास्तीतजास्त ट्रेकर्स, भ्रमक, साधकांनी कराव्यात आणि त्याहीपेक्षा त्यांना काही समस्या न येता त्यांना त्या करता याव्यात यासाठीच हा लेखनप्रपंच. हा लेख वाचून बहूतेक सर्व शंकांचं निरसन होईलच परंतु त्यातुनही काही शंका असतीलच तर त्यासाठी लेखाच्या शेवटी माझा दूरभाष क्रमांक मुद्दाम देईन. माझ्या या लेखनप्रपंचाचा जास्तीतजास्त मंडळींना उपयोग झाला तर तेच माझं भोलेनाथांप्रती समर्पण असेल.

॥ ॐ नम: शिवाय ॥

🚩🚩🚩

🚩 'तर काय आहेत 'पंच कैलास? चला पाहूया...'

       भगवान शंकराची पाच स्थाने ही 'पंच कैलास' म्हणून ओळखली जातात. सोयीसुविधांचा अभाव, खूपच कमी वावर, मोठ्या लांबीची चाल आणि अतिशय उंचीवर असल्यामुळं वातावरणात झपाट्याने होणारे बदल यामुळं या पाचही ठिकाणच्या यात्रा अतिशय खडतर समजल्या जातात. यातली पाचपैकी चार ठिकाणं भारतात तर एक तिबेट, चीनमध्ये आहे.
 
मणीमहेश कैलास

किन्नौर कैलास

श्रीखंड महादेव

आदी कैलास

बडा कैलास

       कैलास मानसरोवर हे तिबेट, चीनमधे असलेलं एकमेव ठिकाण सोडलं तर उरलेली तीन हिमाचल प्रदेशमधे आणि एक उत्तराखंडमधे वसलेलं आहे. चालण्याचा चांगला सराव असेल तर या चारही ठिकाणच्या यात्रा अतिशय आनंददायी आणि कमी खर्चात होतात. मणीमहेश कैलास आणि तिबेटमध्ये जाऊन केलेली कैलास-मानसरोवर यात्रा सोडली तर इतर तीनही ठिकाणच्या यात्रा पूर्णपणे पायीच कराव्या लागतात. अर्थात प्रत्येक कैलासाच्या माहितीच्या सदरात त्याची इत्यंभूत माहिती मिळेलच.

॥ ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव 

🚩🚩🚩
  
       हिमालय ही देवभूमी आहे आणि या देवभूमीत फिरताना काही पथ्यं पाळावीच लागतात. पंचकैलासाच्या प्रत्येक यात्रेसाठी काही सामाईक पथ्ये आहेत. याशिवाय या यात्रा करताना काय करावं आणि काय करू नये याचा आढावाही आपण घेणार आहोत.

🚩 अ) पाळावयाची पथ्ये -

१) पंचकैलासाच्या यात्रांचा कार्यकाळ स्थानिक यात्रा कमिटी आणि प्रशासन एकत्रितपणे वातावरणाचा आढावा घेऊन निश्चित करतात. साहजिकच वातावरण चांगलं असल्यामुळं दर्शन चांगलं होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळं यात्रा कमिटीने ठरवून दिलेल्या यात्रा काळातच करण्याचा प्रयत्न करावा.

२) यात्रा काळात निवासाच्या, जेवणाखाण्याच्या सोयी पुरेशा आणि योग्य दरात उपलब्ध असतात. पोलिस संरक्षण, वैद्यकीय सेवा आणि बचाव पथकाची सेवा देखील यात्राकाळातच उपलब्ध असते.

३) यात्राकाळात नोंदणी करूनच प्रवेश दिला जात असल्यामुळं यात्रेकरूंची संख्या नियंत्रित असते त्यामुळं गर्दीचा त्रास सहन करावा लागत नाही.

४) बहूतेक सर्व यात्रांच्या ठिकाणी बीएसएनएल, जिओ आणि एयरटेल यांची चांगली सेवा उपलब्ध आहे त्यामुळं यात्रा काळासाठी तात्पूरतं या नेटवर्कचं सीमकार्ड घेऊन जावं.

५) यात्रेला जाण्यापूर्वी शक्यतो ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. बरेचदा पायथ्याशी असलेल्या नोंदणी कँपवर नेटवर्क चांगलं मिळत नसल्यामुळं ओटीपी मिळण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो.

६) वैद्यकीय छावणी पायथ्याशी असते त्या ठिकाणी शरीरस्वास्थ्य चंगलं नसेल तर यात्रा करण्याची परवानगी दिली जात नाही. आपण पायथ्याशी पोहोचेपर्यंत केलेल्या प्रवासाची दगदग आपलं शरीरस्वास्थ्य बिघडवू शकते त्यामुळं वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पायथ्याशी पोहोचल्यानंतर एक दिवस सक्तीच्या विश्रामाचा नक्की असावा.

७) 'मुंबईची फॅशन आणि हिमालयातील वातावरण सारखं बदलत असतं' असं गंमतीत म्हटलं जातं आणि ते काहीसं खरंही आहे. प्रवासादरम्यान अनपेक्षित होणार्‍या भुस्लखनामुळं होणारा उशीर, वातावरण खराब झाल्यामुळं सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाकडून दर्शनाची परवानगी न मिळणं आणि प्रशासनाने परवानगी दिलीच तरी आपल्याला दर्शन न झाल्यामुळं जादाचे काही दिवस मुक्काम करावा लागणं यासाठी एकूणच यात्रेच्या कार्यक्रमात तीन ते चार दिवस जादाचे असू द्यावेत.

८) स्थानिक यात्रा कमिटी आणि प्रशासन प्रत्येक यात्रेसाठी एक वयोमर्यादा निश्चित करतं. काही यात्रांसाठी ती साठ तर काही यात्रांसाठी ती पंच्याहत्तर अशी आहे. त्याबाबतची सर्व माहिती त्या त्या यात्रेसाठी तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असते. यात्रा काळात यात्रा करताना या नियमाचं अतिशय काटेकोरपणे पालन केलं जातं पण यात्राकाळाशिवाय इतर काळात यात्रा करण्यावर मात्र प्रशासनाचं कोणतंही बंधन नसतं. अर्थात अशा यात्रा स्थानिक वाटाड्याला सोबत घेऊन स्वतःच्या जबाबदारीवरच कराव्यात.

🚩 आ) काय करावं -

१) गळ्यात स्वतःची माहिती आणि ज्याला आपल्या यात्रेची सर्व माहिती आहे अशा एखाद्या ओळखीच्या स्थानिकाची माहिती असलेलं आयकार्ड नक्की असावं.

२) यात्रेला निघण्याच्या आधी केलेल्या वैद्यकीय चाचणीचं प्रमाणपत्र सोबत जरूर असू द्यावं.

३) स्वतःचं ओळखपत्र सोबत असावं.

४) काही रोख रक्कम सोबत असावी.

५) चढाई करताना दम लागत असेल तर थांबत थांबत वातावरणाशी जुळवून घेत चढाई करावी.

६) मुक्कामाची जागा १२००० फुटांच्या वर असेल तर त्या ठिकाणी मुक्काम करण्यापूर्वी त्या ठिकाणापेक्षा थोडी जास्त उंची गाठून वातावरणाशी समरस व्हावं आणि मगच मुक्कामाच्या ठिकाणी येऊन मुक्काम करावा. ट्रेकर्सच्या भाषेत याला 'हाईट गेन' असं म्हटलं जातं. अत्युच्च उंचीवर करण्याची ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे जी विनाकंटाळा प्रत्येकानी करायलाच हवी.

७) रात्री झोपताना वायुवीजन (Ventilation) होण्यासाठी तंबुच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि डोक्यावरून चादर घेऊन झोपणं देखील टाळावं.

८) यात्रा मार्गात काही ठिकाणी खडकांचा पट्टा आणि हिमनद्या ओलांडाव्या लागतात त्यामुळं चांगल्या प्रतीच्या बुटांचा वापर करावा.

९) प्रशासनाने ठरवून दिलेल्या यात्रामार्गावरूनच मार्गक्रमण करावं.

१०) श्वसनाचा त्रास होत असल्यास विनासंकोच सोबत्यांना, जवळ असलेल्या कुणालाही सांगावं.

🚩 इ) काय करू नये -

१) दिड महिन्यांच्या गरोदर महिलांनी या यात्रा करू नयेत.

२) कचरा करू नये आणि प्लास्टीकचा वापर टाळावा.

३) झाडं, पानं, फुलं तोडू नयेत.

४) सुर्योदयाबरोबर यात्रा सुरू करावी आणि अंधार पडण्यापुर्वी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावं. क्वचित काही ठिकाणी यात्रा सकाळी तीन, चार वाजता सुरू कराव्या लागतात

५) एकट्याने यात्रा करू नये.
 
🚩🚩🚩
 
       पंचकैलासाच्या सर्व यात्रा ट्रेकर्सच्या भाषेत ज्याला 'High Altitude Trekking Programme' म्हणजेच HATP या भटकंती प्रकारात गणल्या जातात. अत्युच्च उंचीवर असल्यामुळं या यात्रा करताना काही जणांना उंचीचे आजार म्हणजे Acute Mountain Sickness (AMS) शी सामना सुद्धा करावा लागू शकतो. अर्थात असं होणं ही सामान्य गोष्ट आहे. काही पथ्य पाळल्यास AMS टाळता येऊ शकतो. Acute Mountain Sickness म्हणजे काय? आणि तो कसा टाळता येऊ शकतो. चला पाहूया...

🚩 उंचीचे आजार म्हणजे Acute Mountain Sickness कसे टाळावेत...

       उंचीवर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी का असते? चांगली शारीरिक क्षमता असुनही काहींना समस्या जाणवतात तर काहींना अजिबात जाणवत नाहीत असं का?

       ३००० मीटर्स उंचीनंतर दर दिवशी ३०० मीटर्सपेक्षा जास्त चढाई करु नये असं शास्त्र सांगतं पण अगदीच तसं करायची गरच पडलीच तर ३००० आणि ४००० मीटर्सनंतर सक्तीच्या विश्रांतीचा एक दिवस नक्कीच असला पाहिजे. प्रत्येकानं कायमच हायड्रेटेड रहायला पाहिजे म्हणजे प्रत्येकानं आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन देता कामा नये. आपलं शरीर आपल्याला त्याची जाणीव क्षणोक्षणी करून देत असतं त्यामुळं आपल्या शरीराचं ऐका. उंचीवर ट्रेकिंग करताना हाच मुद्दा कायम लक्षात ठेवणं खरंतर सर्वात महत्वाचं आहे.

       याबाबतीत आमचा एक अनुभव सांगावासा वाटतो. श्रीखंड महादेवच्या यात्रेला आम्ही भीमडवारी या ठिकाणी एक दिवस 'रेस्ट डे' चा पर्याय सर्वांपुढे ठेवला होता. सिंहगाड (२०९४ मी.) ते थाचडू (३४४९ मी.) पर्यंत ०७ किलोमीटर चालून आम्ही जवळजवळ १३०० मीटर्स चढाई केली होती पण ही चढाई ३००० मीटर्सच्या जवळपास असल्यामुळं इथं झाडी होती त्यामुळं साहजिकच तिथं पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होता. दुसऱ्या दिवशी मात्र थाचडू (३४४९ मी.) ते भीमडवारी (३७१० मी.) पर्यंत ०९ किलोमीटर चालून आमची २६१ मीटर्सची चढाई झाली होती त्यामुळं आम्ही भीमडवारीला एक दिवस रेस्ट डे घेण्याचा पर्याय सर्वांपुढे ठेवला होता. अर्थात तो सर्वांसाठी गरजेचा होता असं मात्र नाही. त्या ठिकाणी आमच्याकडं ऑक्सिमीटर असल्यामुळं आम्ही सर्वांचीच ऑक्सिजन पातळी मोजली. आमच्यातल्या बहुतेक जणांची ऑक्सिजन पातळी ९० ते ९९% दरम्यान म्हणजे उत्तम होती. ७०% पेक्षा पातळी कमी झाली की थोडं लक्ष देणं गरजेचं असतं.

       ...पण काही जणांना मात्र ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळं श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. घरून निघतांना सर्वांचा फिटनेस चांगला असुनही आमच्यातल्या काही जणांना उंचीच्या आजाराने का ग्रासलं होतं? खरंतर आपल्या सर्वांचं शरीर सारखं आहे. प्रत्येकाचा फिटनेस तर दुसऱ्यापेक्षा काकणभर सरसच होता तरीपण असं दिसून आलं की प्रत्येकासाठी उंचीवरची परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. याचं मूळ कारण म्हणजे तुमचा श्वास आहे.

       तुम्ही ज्या प्रकारे श्वास घेत असता त्याचा तुमच्या संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम होत असतो. परिपूर्ण, सामान्य श्वासोच्छ्वासासाठी ०५.५ ते ०६ सेकंद गरजेचे असतात आणि उच्छवासासाठीही तेवढाच कालावधी गरजेचा असतो. तुमची चालण्याची गती वाढल्यावर साहजिकच ही श्वसनाची वेळ कमी होते ज्याला आपण दम लागला असं म्हणतो. एकदा का अशी प्रक्रिया सुरू झाली की श्वासावाटे तुमच्या शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन कमी पडू लागतो आणि ही भरपाई शरीर तुमच्या शरीरातल्या पाण्यातून ऑक्सिजन घेऊन करत असतं. पण जे कार्य तुमच्या शरीराने करायला हवं तेच कार्य diamox नावाची गोळी करते त्यामुळं बहूतेक डॉक्टर उंचीवरचे ट्रेक्स करताना ही गोळी घेण्याचा सल्ला देतात. Diamox हे Acetazolamide कुळातील तोंडावाटे घेण्याचे औषध आहे जे लघवीचे प्रमाण वाढवते. हे औषध हृदयरोगामुळे होणाऱ्या सूजांवर उपचार करते. हे तुमच्या शरीराला अधिक लघवी करण्यास मदत करून कार्य करते जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीरातील मीठ आणि जास्तीचे पाणी गमावू शकता. 


       Acetazolamide मूत्रपिंडातील कार्बोनिक एनहायड्रेसला प्रतिबंधित करते, बायकार्बोनेट उत्सर्जन वाढवते, परिणामी चयापचय ऍसिडोसिस होतो जो उंचीवर अनुभवलेल्या हायपर व्हेंटिलेशन - प्रेरित अल्कोलोसिसला ऑफसेट करतो. या औषधाबद्दलची अधिक माहिती खाली दिलेल्या धाग्यावर टिचकी मारून वाचता येईल.


       जेव्हा शरीर कोणत्याही गोळीशिवाय स्वतः हे जे शरीरातल्या पाण्यातून ऑक्सिजन घेण्याचं कार्य करत असतं तेव्हा ती अतिशय सामान्य प्रक्रियाच आहे त्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारणच नाही. फक्त त्यासाठी दर थोड्या वेळाने पाणी पिऊन शरीरातल्या पाण्याची पातळी चांगली राखायला हवी. साधारणपणे उंचावरच्या अशा वातावरणात तहान लागत नाही त्यामुळं पाणी प्यायलं जात नाही म्हणून जिथं शक्य असेल त्या ठिकाणी चहा प्यावा.

       आणि सर्वात महत्वाचं, आपल्या नाकातूनच श्वास घ्या, तोंडाने नको. थोडक्यात दम लागल्यामुळं तोंडाने श्वास घ्यावा लागेल इतक्या वेगाने चालू नका. हिमालयात किंवा उंचीवरची चढाई करताना 'Slow and study wins the race' हे वाक्य कायमचं मनात कोरून ठेवा. खरंतर मला माहिती आहे की हे खूप कठीण आहे. तुम्हाला सांगत असलो तरीही माझ्यासाठीही हे काही सोपं नक्कीच नाही. ३५०० मीटर्स वरती चढत्या चढणीवर मी बरेचदा माझ्या नाकाने श्वास सोडू शकत नाही. मला हळू आणि खोल श्वास घ्यायचा असतो परंतु नाकातून खोल आणि शक्य तितक्या हळू श्वास घेणं मलाही नेहमीच अवघड होतं. श्वास सोडण्याची लांबी मात्र समान असावी. तुम्ही हवेतील फक्त २५% ऑक्सिजन शोषून घेऊ शकता त्यामुळं तुम्हाला हळू आणि खोल श्वास घ्यायचा आहे हे पक्कं ध्यानात ठेवा. जर तुम्ही जलद आणि उथळ श्वास घेत असाल तर तुम्ही वेगाने चालत आहात हे समजून जा. तुमच्या चालण्याच्या वेगावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवा. तुमचा श्वास सांगतो तुम्ही किती वेगाने चाललं पाहिजे. थोडक्यात दम लागू न देता चालण्याचा कसून सराव करा. सह्याद्रीतील चालणं आणि हिमालयातील चालणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे तो ध्यानात घ्या आणि तसाच सराव करा.

       जर तुम्ही तोंडाने श्वास घेत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरातलं ४०% जास्त पाणी गमावलंच म्हणून समजा. त्यामुळं नाकाने श्वास घेतल्याने तुम्ही जास्त हायड्रेट राहता हे लक्षात असू द्या. जास्त उंचीवर चढल्यानंतर आणि जास्त झोपल्यावर बहुतेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी तुमच्या श्वासावर तुमचं नियंत्रण नसतं पण ही सामान्य गोष्ट आहे. उठल्यानंतर तुमचा श्वास सामान्य झाला की डोकेदुखी कमी होते. फारफार तर एखादी क्रोसिन घेऊ शकता पण गोळ्या घेणं शक्यतो टाळावंच.

       HATP मधे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या श्वासाविषयी जागरूक राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तितक्या मंद गतीने श्वास घ्या आणि श्वास सोडा जेणेकरून तुम्ही खोल श्वास घेऊ शकाल. तुमचे फुफ्फुस पूर्णपणे रिकामे करून त्याचा पुर्ण क्षमतेने वापर करा. त्यासाठी प्राणायामाचा सराव करावा.

       उंचीच्या आजाराचा त्रास टाळण्यासाठी असाही एक उपाय करता येतो. उत्युच्च उंचीवरील भटकंती/यात्रा करण्यापूर्वी मुख्य भटकंती/यात्रेच्या आधी Acclimatise होण्यासाठी तिथंच जवळपास आपल्या मुख्य चढाईच्या उंचीच्या जवळपास उंची असलेल्या ठिकाणाची एखादी छोटखानी सराव भटकंती/चढाई जरूर करावी. मुख्य यात्रेला उंचीच्या आजारचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. या सराव भटकंतीत माफक उंची गाठून परत खाली येऊन झोपणं म्हणजे Climb High Sleep Low एवढंच करावं म्हणजे तुमच्या शरीराच्या Acclimatisation Cycles ना सुरुवात होते.

       शेवटी सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत, हिमालयाचा आनंद घेत, आपल्या शरीराचे ऐकत डोंगरयात्रा करा. बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

🚩🚩🚩

🚩 हिमालयात जाताना आपल्या पाठपिशवीत जरुरीचं कोणतं सामान असावं?

       खाली दिलेली वैयक्तिक सामानाची यादी ही सर्वसामान्य असून आपली यात्रा किती दिवसांची आहे आणि दिलेल्या सामानापैकी आवश्यक गोष्टी कोणत्या असाव्यात हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे. मात्र आपण एकत्रितपणे यात्रा करत असलेल्या संघाकडं सदस्य संख्येनुसार ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिमीटर, फर्स्ट एड किट आणि पुरेसं एक्विपमेंट जरूर असायला हवं.

🚩 What to bring for Yatra/HATP

(A) Legs Accessories -

1) Shoes - 01 pair
2) Socks - 03 pairs
3) Woollen socks - 01 pair
4) Flotters/Chappal - 01 pair

(B) Inner Essentials -

1) Inner Garments - 03 pairs
2) Towel - 01 no
3) Handkerchief - 02 nos
4) Napkins - 02 nos

(C) Clothing -

1) Half T-shirts - 02 nos
2) Half Pants - 01 nos
3) Track pants - 03 nos
4) Full sleeve T-shirts - 03 nos
5) Warm Pullover - 01 no
6) Hand gloves - 01no
7) Chaddar/Showl - 01 no
8) Monkey cap - 01 no

(D) Rain accessories -

1) Poncho - 01 no
2) Folding Umbrella - 01 no (optional)
3) Plastic Mobile Cover - 01 no
4) Sack Rain Cover - 01 no

(E) Personal Essentials -

1) Personal medical kit
2) Knee Cap
3) Crape Bandage
4) Cold cream
5) Cigarette Lighter
6) Dairy & Pen
7) Safty pins
8) Nadi 10 mtrs
9) Walking Stick
10) Water bottles - 01 ltr × 02 nos
11) Plastic tiffin

(F) Documents -

1) ID proof - Aadhar card

(G) Electronics -

1) Mobile
2) Mobile Charger
3) Powerbank
4) Torch - 02 nos
5) Torch Spare batteries - 03 sets

(H) Essentials -

1) Tooth brush
2) Tooth paste
3) Soap
4) Shaving kit
5) Small knife
6) Comb

(I) Utencials -

1) Plate
2) Spoon
3) Bowl
4) Tea Cup

(J) Carry -

1) Sack 02 nos, 01 big, 01 small

# प्रत्येक ग्रूपमधलं सामान प्लॅस्टिक पिशवीत भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लॅस्टिक पिशवीत भरून मगच सॅकमधे भराव्यात.

🚩 एक महत्त्वाची सूचना - यात्रेला जाण्यापूर्वी प्रत्येकाच्या हातापायाची नखे व्यवस्थित कापलेली असावीत.

कैलासराणा शिवचंद्रमौळी।
फणींद्र माथां मुकुटीं झळाळी॥
कारुण्यसिंधू भवदुःखहारी।
तुजवीण शंभो मज कोण तारी॥

🚩 फोटो सौजन्य -

१) गुगल

🚩🚩🚩


🚩 पुढील धाग्यांवर टिचकी मारून तुम्हाला हव्या असलेल्या कैलासाच्या यात्रेची इथ्यंभूत माहिती मिळेल...

२) "किन्नौर कैलास" लवकरच...
३) "आदी/छोटा कैलास"
लवकरच...
४) "बडाकैलास, मानसरोवर"
लवकरच...
५) "श्रीखंड महादेव" लवकरच...

पुढील कैलासांच्या माहितीसाठी संपर्कात रहा. लवकरच भेटू

लेखनसीमा ॥ लोभ असावा ॥