सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

"खंडेनवमी अर्थात शस्त्रपुजन"

"खंडेनवमी अर्थात शस्त्रपुजन"



     अश्विन शुद्ध नवमी म्हणजेच खंडेनवमी. या दिवशी परंपरेनुसार शस्त्रपुजन करतात. पण असं का करतात बरं? तर यामागं खरंतर पौराणिक संदर्भ आहेत.

     पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणं देवीने महिषासूर नावाच्या असुराशी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे सलग नऊ दिवस, नऊ रात्र युद्ध करून त्याचा वध केला आणि तेव्हापासून देवीला 'महिषासूरमर्दीनी' या नावानं ओळखलं जाऊ लागलं. या युद्धाच्या शेवटच्या म्हणजे नवव्या दिवशी वध केल्यानंतरच देवीने तिचं शस्त्र खाली ठेवलं. त्यामुळं नवव्या दिवशी म्हणजेच खंडेनवमीला शस्त्रपूजनाची प्रथा आहे.

     ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही बारा बलुतेदारांपासून ते सैनिकांपर्यंत प्रत्येकजण खंडेनवमीच्या दिवशी उत्साहात आणि जल्लोषात आपापल्या आयुधांची आणि शस्रांची पुजा करत असतो. अलीकडच्या काळात शस्त्रास्त्रांची व्याख्या काहीशी बदलली आहे हे खरंय पण असं असलं तरीसुद्धा अगदी शहरात रहात असलेल्या आणि लढाऊ परंपरा असणाऱ्या घराण्यांमधे आजही विधिवत आणि अगदी शास्त्रशुद्ध पध्दतीनं शस्त्रपूजन केलं जातं. या दिवशी शिल्पकार, सुतार, कारागीर वगैरे मंडळी आपापल्या उपकरणांचे मनापासून पूजन करतात. शेतक-यांकडे पूर्वी नांगराचे पूजन केलं जात असे. आता या नांगरांऐवजी ट्रॅक्टर आलेत तरीही परंपरागत खंडेनवमीची नांगर पूजनाची प्रथा आजही प्रयत्नपूर्वक पाळली जाताना दिसून येते. काळ बदलला, साधनं बदलली तरीपण आपण आपल्या प्रथा आवर्जून पाळायलाच हव्यात नाही का?

     अशा पारंपारिक प्रथा सगळेजण पाळत असताना मग आपण समस्त ट्रेकर्स मंडळी तरी कसे मागे असू? डोंगरयात्रा करताना आपल्याही बऱ्याच ठिकाणी खडतर वाटांवर संरक्षण साधनांचा वापर करावा लागतोच की. खरंतर त्याक्षणी आपली संपूर्ण सुरक्षितता केवळ अशा साधनांवरच तर अवलंबून असते. म्हणूनच डोंगरयात्रा करताना वापरत असलेल्या अशा साधनांच्या प्रती आपण ट्रेकर्स मंडळींनी कायमच ऋणी असायला हवं. मग या  ऋणाचीच अंशतः परतफेड म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आम्ही 'फाल्कन्स' नी त्यांची सहकुटूंब पूजा करून खंडेनवमी उत्साहाने साजरी केली.



     खरं म्हणजे दिवसेंदिवस जशी या साधनांमधे वाढ होतीये ना अगदी तशीच 'फाल्कन ट्रेकर्स'च्या कुटूंबाची पण हळूहळू वाढ होतीये. एवढंच नाही तर गेल्या चार वर्षात केलेले ट्रेक्स पाहिले तर त्यांच्या श्रेणीचा आलेख चढताच आहे. डोंगरयात्रांची नुसतीच संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ होणं महत्वाचं असतं जे फाल्कन ट्रेकर्सच्या बाबतीत प्रत्येकाने घेतलेल्या कष्टामुळं शक्य झालं होतं आणि पुढेही नक्कीच होणार होतं. अर्थात हे सर्व घरच्यांच्या पाठींब्याशिवाय अजिबात शक्य नाही हेही तितकंच खरंय. ट्रेकवरून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी घरच्यांना ट्रेकचे फोटो दाखवताना, आठवणी सांगताना प्रत्येकाला संदर्भासाठी एकमेकांची फक्त नावं सांगायला लागत. त्यामुळं नावानी सगळे एकमेकांना ओळखत तर होतेच पण प्रत्यक्षात मात्र कुणाच्याच घरच्यांनी कुणाला पाहिलेलं नव्हतं. आत्तापर्यंत काही अपवाद वगळता कधीच आमची एकमेकांच्या घरच्यांशी तशी प्रत्यक्षात भेट झालेली नव्हती. त्यामुळं मग असा एखादा खास घरच्यांसाठी स्नेहमेळावा घेता येईल काय? ज्यामुळं एकमेकांच्या कुटूंबियांना पण भेटता येईल, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारता येतील आणि एवढंच नाही तर त्यांचे आमच्या भटक्यांच्या बाबतीतले विचारही समजून घेता येतील. त्याबद्दल आम्हा सगळ्या फाल्कन्सच्या डोक्यात बर्‍याच दिवसांपासून विचार घोळत होता पण नक्की काय करावं, कसं करावं नेमकं तेच काही सुचत नव्हतं...

     ...आणि दरवर्षी साजरी करणार्‍या या खंडेनवमीच्या पुजेनं हे कोडं अगदी पटकन सोडवलं. 'यंदाच्या खंडेनवमीच्या पुजेचं औचित्य साधून 'फाल्कन ट्रेकर्स'चा एक स्नेहमेळावा घ्यायचा'. ठरलं तर मग. त्यासाठी लगेच सगळ्यांच्या सोयीचा मुहूर्तही ठरवला नेहमीप्रमाणे रविवारच्या सुट्टीचा. सगळ्यांना पटापट निरोप गेले आणि हांहां म्हणता कार्यक्रमाला येणार्‍यांचा आकडा सहज शंभरावर गेला. आता सगळेजण ट्रेकप्रमाणेच त्या दिवसाची अगदी आतूरतेने वाट पहात होते.

     रविवार ०६ ऑक्टोबर. संध्याकाळी सहाला कार्यक्रम सुरू करायचा असल्यामुळं सगळी मंडळी अगदी दुपारपासूनच झटत होती. हॉल स्वच्छ करून झाला होता. खुर्च्या, टेबलं आली होती. सगळी साधनं मांडून झाली होती. वर्षभरात केलेल्या ट्रेकचा आढावा घेणार्‍या स्लाईड-शोसाठी प्रोजेक्टरही सज्ज झाला होता. एवढंच नाही तर कार्यक्रमानंतर पोटोबाची सोय करण्यासाठी आचारीही तयारीला लागले होते. कार्यक्रमाची अगदी व्यवस्थित आणि सगळी तयारी झाली होती.

     संध्याकाळी साडेपाच नंतर एकेकजण हळूहळू हॉलवर येऊ लागला आणि साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू झाला पण. एस. आर. शिंदेंनी सुत्रसंचालनाची जबाबदारी घेतली. त्यांनी आलेल्या कुटूंबियांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरूवात केली. हा कार्यक्रम कौटूंबिक असल्यानं प्रमुख पाहूणे वगैरे काही भानगडच नव्हती. त्यामुळं मग आमच्यातल्या अविनाश मनकर आणि सुनिता वहिनींनीच मग दिपप्रज्वलन करून झाल्यावर साधनांची पुजा केली.



लगेचच सर्वांच्या ओळखीपाळखी झाल्या. ज्या सुरक्षा साधनांची नुकतीच पुजा केली होती ती नेमकी काय आहेत? त्यांना काय म्हणतात? ती वापरतात कशी? वगैरेची सविस्तर माहिती मंगेश आठल्येंनी दिली. आम्ही जेव्हा डोंगरयात्रा करतो त्यावेळी त्या पूर्णपणे सुरक्षितता पाळूनच करतो हे घरच्यांना कळावं, केवळ हाच या मागचा एकमेव उद्देश होता.



     पूर्ण सुरक्षितता बाळगूनही चुकून एखादी दुर्घटना झालीच तर जखमीला सुरक्षित ठिकाणी कसं उचलून आणलं जातं याचं छोटंसं प्रात्यक्षिकही तिथं करून दाखवलं


     आता मागच्या म्हणजे २०१८ च्या खंडेनवमीपासून ते या खंडेनवमीपर्यंत केलेल्या डोगरयात्रांची माहिती देण्याची जबाबदारी जितेंद्र परदेशी आणि माझ्यावर येऊन पडली होती. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री उशीरापर्यंतच नाही तर अगदी कार्यक्रमाच्या दिवशी दुपारपर्यंत बसून प्रेझेंटेशन तयार केलं होतं. त्यामुळं कोणत्या स्लाईडवर काय बोलायचंय वगैरेची तयारी करायला अजिबात वेळ मिळालेला नव्हता. पण जे काही सांगायचंय ते आपल्याच घरच्यांना होतं त्यामुळं जरी काही चुकलंच तरी ते नक्कीच समजून घेणार होते. तसं बघायला गेलं तर एकेका ट्रेकवर एकेक स्लाईड-शो करता येईल एवढा त्यांचा आवाका मोठा होता. पण खास या कार्यक्रमासाठी पुण्याहून चिंचवडला आलेल्यांना परत घरी पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून स्लाईड-शो उरकता घेतला.


     या स्लाईड-शो नंतर वर्षभरात भरीव कामगिरी केली म्हणून ट्रेकचे सुंदर फोटो काढणार्‍या मंदार दंडवतेचा...


     चोख हिशोब ठेवणार्‍या जितेंद्र परदेशीचा...


     प्रत्येक ट्रेकला खाण्यापिण्याची ज्याच्यामुळं चंगळ होते अशा अर्जुन ननावरेचा...


     ट्रेक सुरू असताना कायमच गृपची पिछाडी सांभाळणार्‍या महादेव पाटील, दिपक ब्राम्हणे आणि साहेबराव पुजारींचा...



     सांगली-कोल्हापुर जिल्ह्यातल्या पुरग्रस्तांना प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून मदत पोहोचवणार्‍या विनायक गाताडेचा...


     तर न चुकता दर रविवारी सिंहगड फेरी करणार्‍या दयानंद अडाळे, उमेश माने, अमित पवार, राजु चव्हाण आणि मनिष क्षीरसागरचा सन्मान केला.



     आता इथून पुढचा कार्यक्रम आम्हा सर्वांच्याच दृष्टीने अतिशय महत्वाचा होता तो म्हणजे आमच्या कुटूंबाचा आम्हा सर्वांबद्दल असलेल्या मतप्रदर्शनाचा. आमच्या बर्‍याच वहिनींनी आमच्याबद्दल जे मत बनवलेलं होतं ते नक्कीच सकारात्मक होतं हे त्यांच्या बोलण्यातुन स्पष्टपणे जाणवत होतं.



     खरं सांगायचं तर आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने ही अतिशय चांगलीच गोष्ट होती. एकूणच हा कार्यक्रम करून आम्ही आमच्या कुटूंबियांचा नक्कीच विश्वास मिळवला होता. त्यामुळं पुढच्या काही ट्रेक्सना तरी घरून परवानगीची कुणालाही नक्कीच अडचण येणार नव्हती. सर्वांचे आभार मानून स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता केली.



     खरं म्हणजे ट्रेकर्सच्या शब्दकोशात 'औपचारिकता' हा शब्दच नसतो. असतो तो फक्त सोबत्यांवर असलेला दृढविश्वास, एकमेकांबद्दल असणारा आदर, प्रेम आणि या सगळ्यांमुळेच त्याचा वाढत जाणारा आत्मविश्वास. या सगळ्या गोष्टी प्रत्येक फाल्कन्समध्ये अगदी ठासून भरल्यात त्यामुळंच तर हा खंडेनवमीचा कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि अतिशय उत्तमरित्या पार पडला. छे छे, तो तर पार पडणारच होता.

फाल्कन्सची वर्षभरातली भरारी...


# किल्ले - २० 
# घाटवाटा - १९
# Rappelling Activity - ०१
# Range Trek - ०३
# Total Treks - १३
# Total Participants - ३५२


कार्यक्रमाची अजूनही काही क्षणचित्रे...









बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

"समर्थांची शिवथरघळ - उपांड्या आणि गोप्या घाटांसोबत"

"समर्थांची शिवथरघळ - उपांड्या आणि गोप्या घाटांसोबत"


       खरं सांगायचं तर पावसाळ्यात डोंगरदर्‍यांच्यात भटकणं म्हणजे डोळ्यांना एक सुखद पर्वणीच असते. हिरवेकंच डोंगर, खळाळत्या नद्या, डवरलेली भातशेती, पांढरेशुभ्र धबधबे, सर्वत्र पसरलेले दाट धुके आणि या सर्वांतुन आपल्याला आपल्या लक्षापर्यंत घेवून जाणारी, न चकवणारी पाऊलवाट.
हे सर्व अनुभवायला आम्ही अठराजण निघालो होतो. निमित्त होतं 'धबाबा तोय आदळे' ची शिवथरघळ ऐन पावसाळ्यात पाहण्याचं.

       शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घरीच जेवणं उरकून निघालो. मुक्कामाचं ठिकाण घरापासून जवळ असूनही आमचा ट्रेक सुरू होणार होता त्या कुंबळ्यात पोहोचायला रात्रीचे दोन वाजले. रात्रीच्या धुक्यात गाडी चालवणं म्हणजे मोठं कर्मकठीण काम. त्यामुळे पोहोचायला अंमळ उशीरच झाला होता. गावातल्या मारुती मंदीरात पथार्‍या पसरवून आणि सकाळच्या सुचना देवून झोपायला अडीच वाजले. सकाळी लवकर उठून आन्हीकं उरकली आणि मंदीरातच सोबत घेतलेला नाश्ता केला. वर बाजूच्याच घरातून मिळालेला बिनदुधाचा फक्कड चहा मारला.


       पहिल्या नियोजनाप्रमाणे गोप्या घाटाने उतरुन शिवथरघळीत पोहोचायचं आणि आंबेनळीने चढुन केळदवाडी आणि पुढे रस्त्याने चालत कुंबळ्यात परतायचं असं ठरलेलं होतं. पण घाटांचा हाच क्रम अगदी अचानकपणे उलटा करायचं ठरवलं. त्याचं झालं असं की, समोरच सकाळी साडेसातला कुंबळ्यातुन पुण्यासाठी सुटणारी रात्रीची मुक्कामी एसटी उभी होती तिने केळदवाडी गाठणं विनात्रासाचं होतं. हे असं केल्यामुळं आमची संध्याकाळची चारएक किलोमीटरची रस्त्यावरची पायपिट वाचणार होती आणि संध्याकाळी गोप्याघाटाने चढुन थेट गाडीपाशीच येणार असल्यामुळं शेवटी हाच बेत नक्की केला. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. एसटीतुन केळदवाडीत पायउतार झालो त्यावेळी एवढं धुरकटलेलं होतं की दहा फुटांवरचंही नीटसं दिसत नव्हतं.



       खरं म्हणजे अशावेळी वाटा चुकण्याची दाट शक्यता असते आणि झालंही अगदी तसंच. नदीवरचा पुल ओलांडुन डावी मारायच्या ऐवजी मळलेल्या पायवाटेने उजवी मारली आणि इथंच सगळा घोळ झाला. तसं तर केळदवाडी समोरची वेळवंडी नदी ओलांडल्यावर पंधरा मिनीटात घाटमाथ्यावर पोहोचायला हवं होतं पण आम्ही जवळजवळ तास-दिडतास चालुनही आंबेनळी येईना. मग बाकी आपण चुकलोय हे पक्कं लक्षात आलं. बरं चुकल्याचं लक्षात आल्यावर मळलेली वाटही सोडून जाता येईना. त्यातून एक बरं होतं की वाट चांगली मळलेली होती. त्यामुळं त्याच वाटेने सरळ पुढं जायचा निर्णय घेतला. शेवटी ती वाट आम्हाला उपांड्या घाटवाटेवरच्या दुसऱ्या केळदवाडीत घेऊन आली.


       आता इथुन परत आंबेनळी गाठण्याऐवजी आंबेनळी ऐवजी उपांड्याने उतरुन जाणंच सोईस्कर होतं त्यामुळं असंच करायचं सर्वानुमते ठरवलं. तसं पहायला गेलं तर आंबेनळीची नाळ खुपच निमुळती आहे. त्यातून पावसाळ्यात आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असते म्हणून तो धोकादायक होतो आणि त्यामुळेच त्या वाटेने पावसाळ्यात तरी कुणी जात नाही. वाहतूक नसल्यामुळं वाट मळलेली नव्हती आणि ढग असल्यामुळं आंबेनळीची खिंड दिसतही नव्हती म्हणूनच आम्ही चुकलो होतो. आम्ही निसर्गाच्या थोडं विरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला होता पण निसर्गाने आम्हाला वेळीच समज दिली होती. आम्हीही आमची चुक मान्य करुन उपांड्याने कर्णवडी गाठली. याने आमचं चालणं वाढलं खरं पण प्रवास बाकी निर्धोक झाला होता.
       घाटमाथा सोडून बरंच खाली उतरल्यावर रायगड जिल्ह्यातल्या राजवडीपासुन अगदी दहा मिनीटावर कर्णवडी आहे. पण हे गाव आहे पुणे जिल्ह्यात. कर्णवडीतील सर्व लोक त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी रायगड जिल्ह्यावर अवलंबुन आहेत. एवढंच काय या गावाला रस्ताही रायगड जिल्ह्यातुन जोडलेला आहे. पावसाळ्यानंतर त्याचं डांबरीकरण सुद्धा होईल. सरकार दरबारी कराव्या लागणार्‍या प्रशासकीय कामांसाठी, मतदानासाठी मात्र हे सर्व लोक कागदोपत्री पुणे जिल्ह्यात आहेत.


       कर्णवडीतुन आता आम्हाला शिवथरघळीत पोहोचण्यासाठी दोन पर्याय होते. पहिला म्हणजे राजवडीत उतरुन पुढे बारसगावातुन शिवथरघळीत जाणारा डांबरी रस्ता गाठायचा आणि चालत किंवा गाडीने शिवथरघळ गाठायची आणि दुसरा म्हणजे कर्णवडीतल्या पदरातुनच आंबेनळी गाव गाठायचं. तिथुन पुढे आंबे शिवथरवरुन शिवथरघळीत पोहोचायचं. आम्ही अर्थातच दुसरा पर्याय निवडला. हे वेगळं सांगायला नकोच.


कर्णवडी


कर्णवडीतली भेळपार्टी झाल्यावर


       शिवथरघळीत पोहोचलो तोवर एक वाजला होता. सर्वांनी झटपट दर्शन घेवून खिचडीचा प्रसाद घेतला. एवढं चालुन आल्यावर, बाहेरच्या थंड वातावरणात गरमागरम खिचडीची चव काय लागली म्हणून सांगू? आहाहा !!! घरुन आणलेलं जेवणही सर्वांनी तिथेच करुन घेतलं. घळी समोरच्याच हॉटेलात चहा घेतला आणि मधल्या शॉर्टकटने कसबे शिवथरच्या पुरातन खडकेश्वर महादेव मंदीरात गेलो. आता बाकी आम्हाला घाई करायला हवी होती. ढगांमुळं लवकर अंधारुन येतं आणि अंधार पडायच्या आत आम्हाला घाटमाथा गाठायलाच हवा होता. रस्त्याने चालतच कसबे शिवथर गाठलं. गावातल्या आजींना सह्याद्रीवाडीचा रस्ता विचारला. रस्ता सांगितल्यावर आजी म्हणतात कशा 'पोराहो!! तुम्हास्नी पाऊस-बिऊस लागतो का न्हाई?'त्यांच्या आवाजातला काळजीचा सुर चांगलाच जाणवत होता. म्हटलं अहो आजी आमच्याकडं असे डोंगर बघायला मिळत नाहीत ना, म्हणून येतो आम्ही. आमचं म्हणणं काही त्यांना पटल्यासारखं वाटलं नाही. पण समजूत काढण्यासाठी आम्हालाही तिथे काही फारवेळ थांबता येणं शक्य नव्हतं.
       तडक सह्याद्रीवाडीतुन गोप्या घाटाच्या वाटेला लागलो. वाट चांगली मळलेली होती. सुरवातीला असलेल्या झाडीतुन वेडंवाकडं होत एकदाचे नाळेत शिरलो. नाळेत शिरल्यावर मात्र एक खात्री असते की आता आपण नक्कीच चुकणार नाही. ही नाळ आपल्याला कसंही करुन घाटमाथ्यावर घेऊन जाईलच. ठिकठिकाणी दिसणार्‍या पायर्‍यांमुळे हा घाट फार पुर्वीपासुन अतिशय वाहता असावा असं उगीचच वाटुन गेलं. चालण्याच्या वाटेवरुन जोरात पाणी वाहत होतं. पावसाळ्यात नाळेत दरड कोसळण्याची शक्यता असते आणि नाळेत असल्याने ती चुकवणंही अवघड असतं. याबाबतीत प्रत्येकाला सुचना दिल्यामुळे नाळेत शिरल्यावर फारसं कुणी थांबत नव्हतं. त्यामुळे वाटलं होतं त्या वेळेपेक्षा लवकरच घाटमाथ्यावर पोहोचलो. तिथेच असलेलं खोदीव पाण्याचं टाकं पाहीलं आणि पुढे खरगवाडीतुन गोपे गावात गेलो. गोपे गावापर्यंत सध्या डांबरी रस्ता झालेला आहे त्यामुळं इथुन पुढचं कुंबळ्यापर्यंतचं चालणं अतिशय कंटाळवाणं झालं. कपडे बदलले आणि अंधार पडण्यापुर्वी तिथुन बाहेर पडलो. चहा घ्यायला तडक वेल्हाच गाठलं. अंताक्षरी खेळत खेळत पुण्याला आल्यामुळे उरलेला प्रवासही झाल्यासारखा वाटला नाही.
       हे घाटवाटांचं व्यसन तसं फार वाईट. जो कुणी कसा का असेना एकदा का घाटवाटांच्या नादी लागला की मग किल्यांऐवजी त्याला घाटवाटाचं आवडायला लागतात. सोबत असणाऱ्या बहुतेकांना घाटवाटांचं व्यसन जडलंय. त्यामुळे दिवसभरात ट्रेक सुरु असताना घाटवाटांबद्दलच चर्चा सुरू होती. महाबळेश्वरचा, प्रतापगड युद्धाचा विषय निघाल्यावर तिथं असणाऱ्या घाटवाटांबद्दल आपसुकच बोलणं सुरू झालं. तिथल्या तायघाट, गणेशघाट, जोर ते मढीमहालची अवघड वाट, पांगळ्यावरुन दर्‍यात उतरणारी वाट, निसणीचा घाट, रडतोंडी ऊर्फ अश्रुमुखीचा घाट यावर बरीच चर्चा झाली. सरतेशेवटी अफजलखान वाईहुन ज्या वाटेने प्रतापगडापर्यंत आला त्या वाटेने जाण्याचं नक्की झालंय पण त्यासाठी आता पाऊस संपायची तरी वाट पहावीच लागेल.

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

"जावळी"

"जावळी"


       छत्रपती शिवाजी महाराजांच्या "अफजलखान" प्रकरणाची सुरूवात "जावळी" जिंकून घेतल्यापासून होते. युद्धशास्त्रानुसार, SWOT (strength, weaknesses, opportunities & threats) आणि FMEA analysis (Failure Mode & Effects Analysis) केल्यानंतर आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्द शास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे. 

       आपण ठरविलेल्या रणक्षेत्रात शत्रूस लढाई खेळण्यास भाग पाडणे हे युध्द शास्त्रातील एक मोठे महत्त्वाचे तत्त्व आहे. महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतले ही गोष्ट महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कालसापेक्ष करणे हे जसे युध्दकलेतील एक तत्त्व आहे, त्याप्रमाणे शत्रूचा उत्साह कमी करणे, आपली तयारी वाढविणे, शत्रूला गोंधळात पाडून आपला कार्यभाग साधणे ही सुध्दा त्यापैकीच दुसरी तत्त्वे आहेत. म्हणूनच आपल्याला असं म्हणावं लागेल की अफजलखान प्रकरणात जावळीचा मोठा वाटा होता. या संपूर्ण प्रकरणात जावळी हा शब्द बऱ्याचदा उच्चारला जातो. त्यामुळे मोरेंची "जावळी" म्हणजे नेमकं काय आहे त्या विषयी घेतलेला हा मागोवा...

       छत्रपती शिवाजी महाराजांनी पौष वद्य चतुर्दशी, शके १५७७ म्हणजेच मंगळवार, १५ जानेवारी १६५६ रोजी चंद्रराव मोरे याचा पाडाव करून जावळी ताब्यात घेतली.(जे.श.) क्षेत्र महाबळेश्वरहून अत्यंत अवघड अशा निसणीच्या (निःश्रेणी) घाटाने उतरून स्वतः दोन हजार पदाती (पायदळ सैन्य) घेऊन त्यांनी ही अजोड कामगिरी केली आणि लगोलग घोणसपुरचा मकरंदगड, महाड जवळचा चांभारगड आणि ढवळ्या ऊर्फ चंद्रगड हे किल्ले स्वराज्यात सामील झाले. जावळीचं हे घनदाट जंगल काबीज झाल्यानंतर महाराजांचे लक्ष हे महाबळेश्वर समोरच्या भोरप्याच्या डोंगरावर गेलं. यालाच ७/१२ च्या उताऱ्यात 'रान आडवा गौड' असंही एक नाव आहे. तसंच नुकत्याच उपलब्ध झालेल्या 'प्रतापगडदुर्गामहात्म्य' या ग्रंथात त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो. जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी त्यावर किल्ला बांधण्याची मोरोपंतांना आज्ञा केली (शि.च.सा.ख.-१०-पृ-५४) आणि या गडाचं नामकरण केलं गेलं 'किल्ले प्रतापगड'.

       पण मग जावळीचा मुलूख म्हणजे आजचे कुठले तालुके किंवा गावं सांगता येतील? जर map वर pin point करायची झाली तर नेमकी ठिकाणं कुठली दाखवता येऊ शकतात? या विषयी ऐतिहासिक कागदपत्रात कुठे काही उल्लेख  सापडतात काय? याबाबतीत शोध घेतला असता कुर्डुगडाला पासलकर आणि मोरे यांच्यात लढाई झाली होती आणि कुर्डुगड हा ताम्हीणी घाटाजवळ आहे म्हणून ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाट दरम्यान जावळीचं खोरं येत असावं. सह्याद्रीची मुख्य रांग आणि त्यावर असलेल्या मावळाच्या लगतचा कोकणातील काही भाग मोरेंच्या अधिपत्याखाली येत होता. त्यामुळं जावळीची सीमा चिकटून असलेल्या मावळातल्या देशमुखात आणि मोरेंच्यात कायम कुरबुरी चालत असत. अफजलखान प्रकरणाच्या काही दिवसच आधी शिवाजी महाराजांकडे मोरें विरूद्धची पहिली तक्रार गुंजन मावळातल्या हैबतराव शिळीमकरांनी केली होती.

       याविषयी अजून काही भौगोलिक माहिती मिळती आहे काय याबद्दल शोध घेतल्यावर जावळी सुभा हा घाटावर आणि कोकणात असा दोन्ही भागात येतो अशी माहिती मिळाली. शाहू दप्तरात या सुभ्यांच्या याद्याच दिलेल्या आहेत. तसेच संक्राजी मल्हार याने स्वराज्याच्या सनदेमधे जावळी प्रांताच्या तर्फांची यादी दिलेली आहे. त्यावरून हा प्रांत सिद्ध केला आहे.
यात एकूण अठरा तर्फा आहेत. त्या अशा...

१) सुभा मंगळगड, तर्फा ५ - चांढवे, शिवथर, बीरवाडी, नाते, महाड. एकूण गावे २०७.

२) सुभा जावळी, तर्फा ७ - जोर, बारामुऱ्हे, कदंब, सोनाटसोळशे, आटेगाव, विन्हेरे, कोंढवी. एकूण गावे १९५.

३) सुभा व्याघ्रगड, तर्फा ५ - तांबी, बामणोली, हेळवाक, वनवली, मेसे(मेढे). एकूण गावे १५१.

४) सुभा महिपतगड, तर्फ १ - तेतले. एकूण गावे १८.

       म्हणजे या यादीनुसार लहान मोठी अशी सर्व मिळून तब्बल ५६४ गावं मोरेंच्या अधिपत्याखाली येत होती.

       याशिवाय मराठयांच्या इतिहासाची साधने खंड आठ मधे जावळीच्या १८ तर्फांची काहीशी वेगळी यादी दिली आहे पण यातली बरीच ठिकाणं आज सापडत नाहीत. मराठयांच्या इतिहासाची साधने या ग्रंथात दिलेली यादी पुढीलप्रमाणे...

१) बीरवाडी
२) सोमेश्वर
३) वार्से
४) खोरें
५) वळें
६) वेहेळें
७) कोंढवी
८) चांदेश्वर
९) बिजावली
१०) आठेगाव
११) माद्रणी
१२) माहुली
१३) होर्ते
१४) मेढेखोरे
१५) जोरखोरे
१६) साळवे
१७) बालेखोरे
१८) घरठाण 

जावळी सुभ्यातील महालकरी कचेरी

       यमाजी शिवदेव हे प्रतिनिधींचे मुतालिक ब्राह्मणोळी येथे राहत. यमाजी शिवदेव यांच्याकडे जावळी प्रांत असता तेथील महाल कचेरीत कारकून किती आणि कोणकोणत्या अधिकाराचे असत त्यासंबंधीचे हे टिपण आहे. पेशवेकाळातील हे एक एक टिपण पेशवेकाळात जावळीतील प्रशासन व्यवस्था कशी होती त्यावर काहीसा प्रकाश टाकते. 

       जावळी प्रांतात एकंदरीत तीन सुभे, सुभाप्रांत जावळी, सुभाप्रांत व्याघ्रगड आणि सुभा मंगळगड-कांगोरी हे दिले आहेत. या तिन्ही सुभ्यांकडे सुभेदार, मजमदार? (मुजुमदार) आणि फडणीस हे तीन अधिकारी प्रत्येकी आहेत. दफ्तरदार हा अधिकारी मात्र जावळीप्रांत कचेरीकडेच दिला आहे. सुभ्याच्या पोटी ज्या तर्फा असत त्या प्रत्येक तर्फेकडे एक हवालदार, मजमदार आणि सरदेशमुख या अधिकाराची माणसे कामदार असत. काही ठिकाणी सरदेशमुखाचे काम मजमदार यांजकडेच सोपवलेले दिसते. व्याघ्रगड सुभ्यात पाच तर्फा आणि जावळी सुभ्यातही पाच तर्फा आहेत. मात्र व्याघ्रगडाकडील तर्फांकडे हवालदार, मजमदार आणि सरदेशमुख हे तीन कामदार स्वतंत्र दाखवलेले नाहीत. धनगर, महार म्हणून एक आणि जकातीची ठिकाणे दोन पारघाट, आंबिवली, तिवरा जकातीकडे दोन कारकून आणि यमाजी शिवदेव यांच्या खाजगीकडील गावांकडे एक असामी मिळून एकंदर एकतीस कारकून या जावळी प्रांतातील महाल कचेर्यांमध्ये असत. तीन सुभ्यांच्या तीन कचेऱ्या मुख्य असत.
       यमाजी शिवदेव हा इ. स. १७६३ मध्ये मृत्यू पावला त्यामुळं पेशवेकाळातील या कागदाचा काळ इ. स. १७६३ पूर्वीचा धरावा लागेल.


 
       सुभा, तर्फ ही नावं जरा जड वाटतात ना? थोडं सोपं करून सांगतो...
       प्रांत म्हणजे सध्याच्या भाषेत राज्य म्हणजे जावळी प्रांत/ राज्य. सुभा म्हणजे जिल्हा. म्हणजे एकूण सुभे/ जिल्हे ४.  आणि तर्फ म्हणजे तालुका. ते झाले १८. तर्फ/तालूक्यात येणारी एकूण गावं ५६४. झालं कि नाही सोपं.

       म्हणजेच वर दिलेल्या गावांची नकाशावरील ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं परसलेलं होतं याची खात्री पटते.

       खरंतर शाहू दप्तरात या याद्या आल्या आहेत आणि त्यात शंका घ्यायला थोड्याफार नक्कीच जागा आहेत. पहिलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सुभ्यांचं मुख्यालय सांगितलेलं आहे त्या त्या ठिकाणी मोरेंचं वास्तव्य नक्कीच असायला हवं. थोडक्यात वर उल्लेखलेल्या सुभ्यांच्या ठिकाणावर मोरेंचे राहते वाडे किंवा कचेऱ्या असायलाच हव्यात. बरं त्याचं location, तेही संरक्षण दृष्टीनेही चपखल असायला हवं. शिवाय आजूबाजूला थोडीफार तरी शिबंदी मुक्काम करू शकेल अशी शिबंदीची घरटी किंवा क्वार्टर्स असायला हव्यात. सुभ्याच्या ठिकाणी दारूगोळा ठेवता येईल अशाही जागा असायला हव्यात आणि अगदी युद्धाच्या वेळी गरजच पडली तर बाजूच्या सुभ्यात असणारं मोरेंचं सैन्य चटकन मदतीला येऊ शकेल अशा ठिकाणी सुभा असायला हवा. थोडक्यात सुभ्याचं ठिकाण हे छोटा सैन्यतळ असलेलं प्रशासकीय कामकाज वगैरेच्या सर्व पॕरामीटर्समधे बसेल असं असायला हवं.
       उदाहरणादाखल असं सांगता येऊ शकेल की शिवथरघळीच्या वरच्या बाजूला असलेल्या चेराववाडीच्या हद्दीत मोरेंचा वाडा आहे. पडक्या अवस्थेत असलेला सदर वाडा आजही पाहता येतो. वर म्हटल्याप्रमाणे 'शिवथर' हे ठिकाण सुभ्यासाठी लागणाऱ्या सर्व पॕरामीटर्समधे चपखल बसतं पण शिवथर हा एक सुभा न सांगता एक तर्फ सांगितलेली आहे. अर्थात सुभा मंगळगडाचं शिवथर हे 'दुय्यम निबंधक कार्यालय' असण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही.

       शिवाजी राजांनी जावळी का घेतली याला देखील एक सबळ कारण नक्कीच आहे. मोरे जुमानेसा झाला होता हे एक कारण आहेच आणि जे सर्वांनाच माहिती आहे. त्याबाबत मोरे घराण्याची बखर काय सांगते ते पाहू. महाराजांनी चंद्ररावास पत्र लिहिले...

“तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां, राजे आम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन आपला मुलुक खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करुन फंद कराल, तर जावली मारुन तुम्हास कैद करुन ठेवू” 
उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले की, “तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावर कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पुढे एक मनुष्य जीवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोंकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबलेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितो आम्हा श्रीचे कृपेने पादशाहाने राजे किताब, मोरचले, सिंहासन मेहरेबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दरपिढी राज्य जावलीचे करतो. तुम्ही आम्हांसी खटपट कराल तर पष्ट समजून करणे आणखी वरकड मजकूर तुम्हांस आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश घेता अपयशास पात्र होऊन जाल.”
चंद्रराव मोऱ्याचे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या महाराजांनी मोऱ्यांना अखेरचे पत्र लिहिले.
“जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करुन, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल”
म्हणून चंद्ररावाने महाराजांस आव्हानात्मक लिहिले. “दारूगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविते थोर समर्थ असो” (मो.घ.ब.)


       आणि म्हणूनच महाराजांनी जावळीवर स्वारी केली. पण केवळ या एवढयाच एका कारणामुळं महाराज पुर्ण जावळी प्रांत वा खोरं जिंकून घेतील असं वाटत नाही. सुरवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेत राज्याचं धोरण हे एकछत्री अंमलाखालचं नसून ते 'संघराज्य' असावं असंच होतं. महाराजांनी मावळातल्या कोणत्याच वतनदारांची वतनं खालसा केली नाहीत. पण जावळीच्याच बाबतीत अशी काय गोष्ट घडली की जावळी ताब्यात घ्यावी अशी निकड निर्माण झाली. तर त्याचं मुख्य कारण हे आहे की कोकणातील दाभोळ बंदरातुन जो माल विजापुरला जाई तो पारघाटाने वा हातलोट घाटाने जावळीमार्गे जात असे. त्यामुळे एकतर या मालावरची 'जकात' आता महाराजांना मिळणार होती आणि दुसरं असं कि विजापूरला 'आर्थिक दृष्टीने जखडून' टाकण्याचा तो एक डाव असावा. त्यामुळे बाहेरच्या देशांशी विजापुरचा जो व्यापार दाभोळ बंदरातून चाले त्यावर काही प्रमाणात 'नियंत्रण' आता महाराज ठेवू शकत होते.

       प्रत्येक सुभ्यात एक एक मोरे व्यवहार/ राज्य करीत असे (अफजलखान प्रकरणानंतर जावळीचे मोरे रायरीच्या मोर्यांच्या आश्रयास गेले होते). ते एकमेकांचे नातेवाईक असुनही त्यांच्यात भाऊबंदकी नक्कीच होती.
एकूणच काय तर महाराजांना जावळीची अभेद्य जागा ही विजापूरच्या आदिलशाहीची आर्थिक नाकेबंदी करून रणनीतीकदृष्ट्या जखडून ठेवण्यासाठी हवीच होती आणि त्यासाठी एक कारणही हवंच होतं, मग ते कोणतंही का असेना.

       किल्ले रायरी ते किल्ले खेळणा ऊर्फ विशाळगड? आणि कोयना काठ ते सांप्रतचा मुंबई - गोवा महामार्ग हा जावळीचा आद्य मुलुख आहे. त्या मुलखात...
१) शिवथर - यशवंतराव
२) जोर - हणमंतराव
३) जांभळी - गोविंदराव
४) महिपतगड - दौलतराव
५) केवनाळे व वाकण - बागराव
६) आटेगांव तर्फेतील देवळी - सूर्यराव
७) देवळी - भिकाजीराव
८) खेळणा - शंकरराव
हे आठ अनभिषिक्त मोरे घराण्यांतील आद्य राजे राज्य करीत होते.(मो.घ.ब.)

       सावित्री नदीच्या उगमापासून मुखापर्यंत मोरे घराण्याने महाबळेश्वर, पर्वत, चकदेव, घोणसपूर, तळदेव, गाळदेव, धारदेव, मोळेश्वर, बाणकोट इत्यादी बारा? (की सात?) शिवपुऱ्या निर्माण केल्या. (मो.घ.ब.)

       जावळीप्रांतात जांभूळखोरे, जोरखोरे, शिवथरखोरे, कांदाटखोरे, ताजमहाल?, बामणोली, चतुर्बेट, सोलसखोरे, इ. १८ महाल होते. (मो.घ.ब.)

       जावळी मुलखातल्या घाटांबद्दल सांगायचं झालं तर पारघाट, कोंडेनळी घाट, रडतोंडी घाट, ढवळाघाट, हातलोटचा घाट, सापळाखिंड, कावल्या-बावल्या, अन्नछत्राची नाळ, बोराटयाची नाळ, वरंधा-घाट, आंबेनळीघाट इत्यादी लहान मोठे सुमारे ६० ते ६२ घाट होते. (मो.घ.ब.) ते पुढीलप्रमाणे (डोंगरयात्रा)

१) ताम्हीणी
२) सातपायरी/सातीपडी
३) सवत्या
४) निसणी/देव
५) लिंग्या
६) थिबथिबा
७) कुंभा
८) कावळ्या
९) बोचेघोळ
१०) निसणी
११) गायनाळ
१२) बोराटा नाळ
१३) सिंगापूर नाळ
१४) आग्यानाळ
१५) फडताड नाळ
१६) शेवत्या घाट
१७) मढेघाट
१८) उपांड्या
१९) आंबेनळी
२०) गोप्या
२१) सुपेनाळ
२२) भोवऱ्या
२३) खुटा
२४) पाळदार
२५) सुनेभाऊ/पारमाची
२६) वरंध
२७) वाघजाई
२८) कुंभनळी
२९) चिकणा
३०) चोरकणा
३१) अस्वलखिंड
३२) ढवळे
३३) सापळखिंड
३४) सावित्री
३५) दाभिळटोक
३६) रानकडसरी
३७) आंबेनळी
३८) केवनाळे
३९) पारघाट
४०) क्षेत्रपाळ
४१) कुडपण
४२) हातलोट
४३) कोंडनाळ
४४) अंगठेसरी
४५) नळी
४६) तेल्या
४७) मारखिंड
४८) कांदाट
४९) आंबिवली
५०) शिडीडाक
५१) रघुवीर
५२) भैरोबा
५३) नागसरी
५४) निवे
५५) तिवरे
५६) अंगठेसर
५७) कलावंतीणीची डाक
५८) मोरंगेची व्हळ
५९) सर
६०) शिडीची वाट
६१) डिचोली
६२) नांदिवसे
६३) दुर्गाची सरी
६४) पोफळी
       या व्यतिरिक्त नवीन सापडलेल्या लहानमोठ्या अशा बऱ्याच घाटवाटांची नावं इथं सांगता येतील, जी वरील यादीत नाहीत.

       किल्ल्यांविषयी सांगायचं तर रायगड, लिंगाणा, चंद्रगड, खेळणा, कांगोरी, कावळया, मकरंदगड, सोनगड, चांभारगड, महिपतगड, प्रतापगड (भोरप्या), रसाळगड, सुमारगड, जननीदुर्ग, वासोटा इ. किल्ले होते. (मो.घ.ब.)
       या व्यतिरिक्त डोंगरयात्रात असलेल्या आणि मी स्वतः फिरलेल्या या किल्ल्यांची नावं खाली दिलेली आहेत जी मोरे घराण्याच्या बखरीत नाहीत.

१) कुर्डुगड
२) मानगड
३) रायरी
४) लिंगाणा
५) कोंढवी
६) महिमंडणगड
७) जंगली जयगड
८) पन्हाळघर

       माझ्या या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे किंवा थोडीफार कागदपत्रांची शोधाशोध केली आहे त्यावरून मिळालेल्या ज्ञानानं इथं नमुद केलेली आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणीवा नक्कीच राहीलेल्या आहेत आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणीवांना वाचक मोठ्या मनानं क्षमा करून जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकतील आणि माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पुर्ण तयारी आहे.

       सरतेशेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे । 
शोधोनी अचूक वेचावे ।। 
वेचोनी उपयोगावे । 
ज्ञान काही ।। 

।। लेखनसीमा ।। 

🚩 संदर्भ --
१) जेधे शकावली
२) शिवचरित्रसाहित्य खंड
३) शाहू दप्तर
४) मोरे घराण्याची बखर
५) डोंगरयात्रा
६) मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड आठवा
७) Map Reference: Satara district gazetteer
८) मराठी राजवटीतील काही घाटमार्ग आणि चौक्या - ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ०९, लेखक - शंकर नारायण वत्स जोशी.

नकाशात अफजलखानाचा वाईपासून प्रतापगडापर्यंतचा मार्ग दाखविलेला आहे.


शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

"एका दिवसात दोन घाटवाटांसोबत दोन किल्ल्यांची डोंगरयात्रा"

"एका दिवसात दोन घाटवाटांसोबत दोन किल्ल्यांची डोंगरयात्रा"



       ढाकगड, भीवगड या दोन किल्ल्यांसोबत गाळदेवी आणि बहीरी घाटवाटांचा ट्रेक हा खरं म्हणजे कमीतकमी दोन दिवसांचा आहे पण आम्ही फाल्कन्सनी तो एका दिवसातच करण्याचा घाट घातला होता. आत्तापर्यंत आम्ही सोबत अवघड असे बरेच ट्रेक्स केल्यामुळं प्रत्येकाच्या चालण्याचा वेग, कुवत एकमेकांना चांगलीच माहिती होती. एवढंच काय तर प्रत्येकाचं सामर्थ्य आणि कमकुवतपणा देखील एकमेकांना पक्का ठाऊक आहे. त्यामुळं हे सगळं एका दिवसात नक्की जमवता येईल याची खात्री वाटत होती. तरीपण आम्ही ठरवलेला ट्रेकचा सगळा प्लॅन वेळेत पूर्ण होण्याचं सगळं गणित पावसावर अवलंबून होतं. बहुधा त्यालाही आमची अडचण समजली असावी कारण रविवार २२ सप्टेंबर या ट्रेकच्या दिवसापूर्वी दोन दिवस आधीच तो पूर्णपणे उघडला होता. ट्रेक संध्याकाळी दिवस मावळायच्या आत संपवण्यासाठी सकाळी लवकर सुरु करणं गरजेचं होतं म्हणून आदल्या दिवशीच कुंडलेश्वरला मुक्कामी जायचं ठरवलं होतं. अर्थातच या सर्व दिवसभराच्या कार्यक्रमात पाऊस, वेळ वगैरे गोष्टी पाहून आयत्यावेळी थोडेफार बदल करावे लागणार होते आणि काय ते परिस्थितीनुसार आयत्यावेळी ठरवावे लागणार होते.

       असा हा एक दिवसाचा भलामोठा ट्रेक खरं म्हणजे प्रचंड तंगडतोडीचा होता तरीही कायमचा आठवणीत राहील अगदी असाच झाला. त्यासाठी कुंडलेश्वर मुक्कामासाठी सगळेजण शनिवारी रात्री घरून जेवण करूनच निघालो. तसं चिंचवड ते जांबिवली हे अंतर काही फार नाही तरीसुद्धा पुणेकर मंडळी सोमाटणे फाट्याला पोहोचेपर्यंत सोमाटण्याच्या येवलेंकडं एक चहाथांबा झालाच. नंतर बाकी पुढे कुठेही न थांबता थेट कुंडलेश्वर मुक्कामी पोहोचलो. गाडीतून सामान उतरवून दुसऱ्या दिवसाच्या सूचना दिल्या. कितीही गडबड केली तरी झोपायला रात्रीचे साडेबारा वाजलेच.
       ट्रेक सुरू करण्यापूर्वी नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची भाजी आम्ही स्वतः बनवणार होतो त्यामुळं सकाळी पाचलाच उठावं लागणार होतं. त्यामुळं तशी झोप कमीच मिळणार होती म्हणून फार वेळ वाया न घालवता लगेचच झोपून टाकलं.



       लगेचच झोपलो खरं पण पहाटे साडेतीन-चार वाजता काहीजण मंदिरात आले आणि त्यांनी अगदी जोरजोरात घंटा वाजवून दर्शन घेतलं. मग काय सगळ्यांच्याच झोपेचं पार खोबरं झालं. त्यानंतरही थोडा वेळ तसंच लोळत पडलो खरं पण झोप काही येईना म्हणून मग उठून शेवटी आवरायलाच घेतलं. सकाळची आन्हीकं उरकून नाश्त्यासाठीची कांदाबटाटा रस्साभाजी आणि जेवणासाठी डब्यातून सांडू नये म्हणून मटकीची सुकी उसळ आमच्या नेहमीच्या बल्लवाचार्यांनी म्हणजेच अर्जुन ननावरेंनी बनवली.



       नाश्ता आणि जेवणासाठी पोळ्या प्रत्येकाला घरूनच आणायला सांगितलेल्या होत्या. त्यातल्या नाश्त्यासाठीच्या आणलेल्या सोबत घेऊन मंदीराबाहेरच्या प्रांगणात भरभक्कम पोळीभाजीचा नाश्ता केला आणि वर स्पेशल चहा प्यायला.


       'आधी पोटोबा मग विठोबा' प्रमाणं नाश्ता झाल्यावर नेहमीप्रमाणे कुंडलेश्वराची आरती केली आणि कुंडलेश्वर सोडलं. या शंकराला कुंडेश्वर किंवा कोंडेश्वर असंही म्हणतात पण मंदीरामागच्या कुंडली नदीला लागून असलेलं शिवालय म्हणून याला कुंडलेश्वर हे नाव जास्त योग्य वाटतं. अर्थात 'नावात काय आहे'? असं शेक्सपियर सांगून गेलाच आहे की. होय की नाही?




       ढाक बहिरीकडे जाताना सह्यधारेवरून 'बहिरी' घाटवाटेच्या पायथ्यातलं सांडशी तर त्याच्याच शेजारी मांजरसुंब्याला चिकटून 'दारचा माळ' घाटवाट उतारणारं सालपे दिसत होतं. मांजरसुंब्याच्या मागे किल्ले राजमाची, ड्युक्सनोज ऊर्फ  नागफणी, खंडाळा तर त्याच्या थोडं उजवीकडं किल्ले इर्शाळ, माणिक, प्रबळ आणि अलिकडचं माथेरान सुध्दा स्वच्छ दिसत होतं. या माथेरानच्या दक्षिण टोकाकडे असलेल्या चौक पॉईंट खालून अलेक्झांडर आणि रामबागचा ट्रेक नुकताच म्हणजे गेल्या रविवारीच केला होता त्याच्या आठवणी क्षणार्धात डोळ्यासमोर आल्या.







       गडदच्या बहिरीची वाट पायाखालचीच असल्यामुळं कळकराय खिंडीखालच्या वाटचौकात अगदी झटक्यात पोहोचलो.



       आता इथून ढाक गाव गाठण्यासाठी आमच्यापुढे एकूण दोन पर्याय होते. पहिला म्हणजे सरळ चढून कळकराय खिंड गाठायची. खिंडीतुन सुरवातीला छोटंसं कातळारोहण करून ढाकगड चढून जायचा. गडावरच्या पाण्याच्या टाक्या वगैरे पाहून ढाक गावाकडील बाजूला उतरायचं आणि ढाक पठारावरून चालत ढाक गाव किंवा गारूआई मंदिर गाठायचं. अर्थात पाऊस असेल तर ढाकगडावर कळकराय खिंडीतल्या कातळटप्प्यावर निसरडं होतं हे गेल्यावर्षी मी स्वतः अनुभवलं होतं त्यामुळं तिथून जाणं अजिबात शक्य झालं नसतं. म्हणून मग याला दुसरा सोपा पर्याय वापरून खिंडीखालच्या वाट चौकातून ढाकगडाला उजवीकडून वळसा घालून थेट ढाक गाव गाठावं लागणार होतं. पण दुसऱ्या पर्यायात आम्हाला ढाकगड काही पाहता येणार नव्हता. आमचा हा सगळा जरतरचा खेळ पूर्णपणे पावसावर अवलंबून होता. तसं पावसाने नुकतीच दोन दिवस उघडीप दिली होती त्यामुळंच ढाकचा किल्ला पाहता येईल अशी ट्रेकला निघताना अंधुकशी आशा वाटत होती आणि झालंही अगदी तसंच. पाऊस अजिबात नसल्यानं कातळटप्पा पूर्णपणे कोरडा होता आणि त्यावर कातळारोहण करणं सहज शक्य होणार होतं. तसा हा कातळटप्पा फार काही अवघड नाहीये. अगदी रोप लावला नाही तरीसुद्धा चालण्यासारखं होतं तरीसुद्धा 'सेफ्टी फर्स्ट' ची सवय प्रत्येक ट्रेकरने स्वतःला प्रयत्नपूर्वक लावून घ्यायलाच हवी. नाही का? म्हणूनच कातळारोहण करून वरच्या बाजूला सेफ्टी रोप लावला आणि बाकीच्या सर्व भिडूंना खिंडीतून वर घेतलं.






       आता आडवं जात ढाकगडाच्या माथ्यावर पोहोचायचं होतं. डाव्या बाजूला चढ तर उजव्या बाजूला खोल दरी होती अशा जागेवरून आम्हाला वाट शोधत चढत जायचं होतं. पावसाळा नुकताच झाल्यामुळं प्रचंड वस्पटी होती. ढाकगडावर नेमकं कुठं चढून जायचंय हे पक्कं ठाऊक असल्यामुळं तसा फारसा फरक पडणार नव्हता. अर्थात वस्पटी असल्याचा अशा अवघड वाटेवर फायदाच जास्त होतो. सर्वजण सोबतच आहेत याची खात्री करत करत गडाच्या माथ्यावर पोहोचलो.







       इथून गडाच्या पश्चिमेकडच्या धारेवरून किंवा पूर्वेकडच्या पोटातुन कुठूनही जाऊन ढाक पठारावर उतरता येतं. आम्ही आपली पोटातली वाट निवडली. तिने जात असताना वाटेत लागलेल्या ओढ्यावर थोडी विश्रांती घेतली. पाऊस अजिबात नसल्यामुळं समोरच खांडीचा भाग, ठोकळवाडी जलाशय, कुसुर घाट, भीवपुरी कँप, थोडं मागे तासुबाई रांग, वांद्रे खिंड आणि नाखिंद्याजवळच्या पवनचक्क्या स्पष्ट दिसत होत्या.




       पुढे जात एका ओढ्यात असलेल्या किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्यांच्या समुहापाशी पोहोचलो. खरं म्हणजे ही जागा थोडी आडबाजूला असल्यामुळं चटकन सापडण्यासारखी नाही पण या अगोदर दोनचार वेळेला किल्ल्यावर येऊन गेल्यामुळं ती सापडायला फार काही त्रास झाला नाही.






       किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आणि थोडीफार तटबंदी सोडली तर फारसं काही शिल्लक नाही. जे काय आहे तेवढं पाहिलं आणि ढाक पठाराकडे निघालो. वाटेतुन उजवीकडे एक मोठा धबधबा डोळ्याला सुखावून गेला.




       थोडा पाऊस उघडला की सोनकीला बहर येतो. सगळीकडं पिवळं धमक दिसू लागतं. ढाक पठारावर उतरताना ही वाटेतली सोनकी लक्ष वेधून घेत होती.



       पठारावरच्या भातशेती जवळून जाताना तांदुळाचा सुवास मन प्रसन्न करून गेला.



       अशा या धुंद वातावरणात 'एक कप चाय तो बनती ही है ना भीडू'? चहाला अमृत का म्हणतात ते अशा वातावरणात चांगलंच समजतं.



       किल्ल्यावरून उतरल्यावर वाटेतल्या विहिरीपासून उजवीकडे वळून गावात न जाता सरळ ढाकगाव बायपासने आम्ही थेट गारूआई मंदिराच्या रस्त्याला लागलो होतो. त्यामुळं मग उजवीकडून गावातून आलेली आणि डाव्या बाजूला गाळदेवीकडे गेलेली वाट ओलांडून समोरच्या गारूआई मंदिरात गेलो. या वाट नाक्यावर एक गंमत बघायला मिळाली. समोर मंदीरात असलेल्या गारूआईला फुलं आणि उदबत्त्या या वाटनाक्यावरच वाहलेली दिसली. खरं म्हणजे या नाक्यापासून मंदीर अगदी हाकेच्या अंतरावर आहे तरी सुद्धा गावातले लोक थोडी वाट वाकडी करून मंदीरात जायचे कष्ट का घेत नाहीत ते काही कळलं नाही. गावात चौकशी केली असती म्हणजे नक्की काय ते कळलं असतं, असो. मंदीरातल्या गारूआईचं मनोभावे दर्शन घेतलं. मंदीराच्या जवळच दोन स्मारक शिळा पडलेल्या दिसल्या. मंदीराचा बाज जरी जुना असला तरी सभामंडप बाकी नवीन बांधलेला आहे. पण काहीही असलं तरी एकंदरीत आपल्या सारख्या भटक्यांना ही जागा मुक्कामासाठी बाकी भन्नाट आहे हे मात्र नक्की.



       मंदीरात दर्शन घेऊन पुन्हा वाटनाक्यावर आलो आणि उजवीकडे वळून गाळदेवी घाटवाटेला लागलो. आता ही मळलेली वाट आम्हाला भीवगड आणि पुढे वदप किंवा गौरकामतपर्यंत घेऊन जाणार होती.




       या गाळदेवी घाटवाटेतुन थोडं खाली उतरल्यावर एक छोटी वाट डावीकडे धारेवर असलेल्या कळकरायवाडीत उतरते. कळकरायवाडीची वाट खुपच कमी वापरात असलेली आहे त्यामुळं फारशी मळलेली नाही. या कळकरायवाडीतुन सरळ सांडशीत उतरता येतं. आम्हालाही कळकरायवाडीच्या या वाटेने सांडशी गाठता आली असती पण मग आमचा भीवगड बघायचा राहून गेला असता. याच वाटेने ढाक गावच्या लोकांनाही सांडशी गाठता येऊ शकतं पण सांडशीपेक्षा वदपपासून कर्जत हे बाजाराचं ठिकाण खुपच जवळ आहे. अर्थातच रस्ते वाहतुक सुध्दा सांडशीपेक्षा वदपला थोडी जास्तच आहे त्यामुळं ढाकचे गावकरी सरळसोट वदपलाच उतरतात. बाजाराचं ठिकाण कर्जत असल्यामुळं कोणत्याही वाटेने बाजारासाठी जाऊनयेऊन कमीतकमी पाचसहा तासांची पायपीट तर करावीच लागते त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत ढाक गावातली बरीचशी लोकं कर्जत वगैरे भागात विस्थापित झाली आहेत. नवीन पीढी ढाकसारख्या दुर्गम गावात राहण्यासाठी इच्छूक नसल्यामुळं अर्धे ढाकगाव मोकळे झालेय असं डोक्यावरून लाकडाची मोळी ढाकवरून घेऊन वदपला विकायला निघालेल्या एका ढाकच्या गावकर्‍यानंच सांगितलं. एवढंच नाही तर कोकणातल्या वदप, गौरकामतकडचे लोक घाटमाथा चढून जाऊन ढाक गावाची भातशेती अर्धाईने करायला घेतात. एकूणच सह्याद्रीतल्या अशा दुर्गम गावांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. सध्या अशा गावात थोडीफार वस्ती आहे तरी पण अजून काही दिवसांनी मात्र ही सगळी गावं ओस पडतील एवढं बाकी नक्की.
       गाळदेवी घाटवाट अर्धी उतरल्यावर एका सोंडेवर येते आणि मग सरळ त्या सोंडेवरुनच खाली उतरते. नेमका या सोंडेच्या पायथ्याशी भीवगड आहे. हा भीवगड बहूतेक गाळदेवी घाटवाटेवर नजर ठेवण्यासाठीच बांधला गेला असावा.




       भीवगडावर खुप गर्दी दिसत होती. चौकशी केल्यावर असं कळलं की मुंबईहून वदपमार्गे जवळजवळ दिडशे लोक हा भीवगड पाहण्यासाठी आलेत. डोंगरदर्‍यात, निसर्गात भटकणार्‍या आमच्यासारख्या भटक्यांना त्या लोकांच्या भाऊगर्दीत काही फारवेळ काढणं शक्य होणार नव्हतं त्यामुळं गडावरची होती तेवढी ठिकाणं पटापट पाहिली, फोटो काढले आणि गौरकामतकडच्या बाजूला उतरलो. गौरकामतकडे उतरल्यामुळं आमचे तीन फायदे होणार होते. पहीला म्हणजे उतरताना वाटेत मुंबईकरांची गर्दी लागणार नव्हती, दुसरा म्हणजे गौरकामतकडची कातळकोरीव वाट पाहता येणार होती तर तिसरा फायदा म्हणजे गौरकामतचा बसस्टॉप किल्ला उतरल्यावर वदपपेक्षा बराच जवळ आहे त्यामुळे आमचं चालणं आणि वेळ हे दोन्ही वाचणार होतं.










       भीवगड उतरून आल्यावर बसस्टॉपवर असलेल्या एका किराणा दुकानदाराला लोकल जीपबद्दल विचारलं. आम्ही एवढं चालून आलोय आणि आमच्याकडे वेळ कमी आहे म्हटल्यावर त्यानं माणशी भाडं, एका रिक्षात किती लोक नेतात वगैरे सगळी इत्यंभूत माहिती दिली आणि एका रिक्षावाल्याला फोन करून लगेचच बोलवूनही घेतलं. या सगळ्या रिक्षा कर्जत स्टेशनपर्यंत जातात पण आम्हाला तर उल्हासपुलाच्या अलिकडे वळून सांडशी गाठायची होती म्हणून मग आमच्याच रिक्षावाल्याला सांडशीला सोडण्यासाठी पटवलं. तोही फरसे आढेवेढे न घेता लगेचच तयार झाला. कर्जतला जाताजाता वाटेतच भाडं ठरवून थेट सांडशीलाच पायऊतार झालो.


       सांडशी चौकातून उजवीकडे वळल्यावर एक पुल आहे त्यावरून सालप्यात जाता येतं. या पुलाच्या बाजूलाच शाळा आहे त्या शाळेत बसून दुपारचं जेवण उरकलं आणि थोडा आराम केला. घाटवाट चढून जाण्यापूर्वी तो अत्यंत गरजेचा होता.


       शाळेमागे असलेली नदी ओलांडली आणि वीटभट्टीशेजारून धनगरवाडा गाठला. बहुतेक ट्रेकर्स अशा वाड्यावस्त्यातल्या मुलांना गोळ्या-चॉकलेट वाटतात पण बरोबरचा जितेंद्र परदेशी प्रत्येक ट्रेकला मुलांना शाळेसाठी गरजेच्या वस्तू वाटतो. खरंच त्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.


       भातशेती शेजारुन वाट सह्याद्रीच्या मुख्य रांगेकडे निघाली होती. आकाशात ढगांची गर्दी जमु लागली होती. साहजिकच सगळ्यांचे कॅमेरे सॅकमधे गेल्यामुळं इथून पुढचे फोटो काही काढता आले नाहीत.



       भातशेती संपून वाट सह्याद्रीच्या मुख्य रांगेला भिडली आणि चढू लागली. वाट अतिशय मळलेली पण खडी चढाईची होती. खड्या चढाईच्या वाटेचं एक बरं असतं की अशा वाटांनी पटकन माथ्यावर पोहोचता येतं. ढगाळलेलं वातावरण त्यात गच्च झाडी त्यामुळं खुपच काळवंडलं होतं. फारसं कुठं न थांबता बहिरी गुहेखालच्या पदरात पोहोचलो.

       इथून पुढं आम्हाला एकूण तीन वाटांनी कुंडलेश्वर गाठता येणार होतं. पहिली वाट म्हणजे सरळ बहिरी गुहेच्या वाटेनं जायचं, पायर्‍या चढून गुहेकडे न जाता उजवीकडे वळून कळकराय खिंड गाठायची आणि मळलेल्या वाटेनं कुंडलेश्वरला यायचं. दुसरी वाट कळकराय सुळक्याला वळसा घालून वाट चौकात येते तिने पहिल्या म्हणजेच बहिरी गुहेच्या वाटेच्या वाटेला लागून कुंडलेश्वर गाठायचं तर तिसर्‍या वाटेनं म्हणजे पदरातुन आडवं जात सवाष्णी घाटाने थेट कुंडलेश्वर जवळच्या धारेला लागायचं आणि कुंडलेश्वर गाठायचं. या तीनही वाटांमधे सर्वात सोईची आणि निर्धोक वाट पहिली होती. पण पहिली आणि दुसरी या दोन्ही वाटा जास्त लांबीच्या आणि चढ-उतार जास्त असलेल्या होत्या. तर तिसरी सवाष्णी घाटाची वाट जवळची पण प्रचंड दृष्टीभय असलेली आणि अगदीच निमुळती होती. म्हणजे ट्रेकर्सच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी 'एक टप्पा आऊट' अशी होती.

       अंधार पडत चालला होता त्यामुळं तिसर्‍या वाटेनी जाणं तसं धोक्याचं होतं पण न थांबता गेलो तर अंधार पडण्यापूर्वी माथा गाठणं शक्य होणार होतं. सगळेजण प्रचंड दमले होते तरीपण अंतर कमी असल्यामुळं सर्वानुमते तिसर्‍या वाटेचाच पर्याय निवडला आणि कुठेही न थांबता थेट कुंडलेश्वर जवळच धार गाठली. अंधार पडण्यापूर्वी कसंही करून कुंडलेश्वर गाठायचंच होतं म्हणून सांडशी सोडल्यापासून फारसं कुणीही आणि कुठेच विश्रांतीसाठी थांबलं नव्हतं. माथा गाठल्यावर बाकी सगळ्यांच्या मनावरचं दडपण अगदी हलकं झालं आणि मग काय सगळ्यांनी दहा मिनिटे चक्क झोप काढली. एक प्रचंड तंगडतोडीचा ट्रेक कोणतीही वाईट घटना न घडता अतिशय उत्तमप्रकारे पार पडला होता. इथून कुंडलेश्वर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. आम्हाला घरी पोहोचवणारी गाडी पण समोर दिसत होती मग बाकी सगळ्यांनाच घरचे वेध लागले त्यामुळं अगदी चहाथांबाही न घेता थेट चिंचवड गाठलं आणि ट्रेकची सांगता केली.

फोटो सौजन्य -

नितिन फडतरे
महादेव पाटील
रवि मनकर
उमेश माने
जितेंद्र परदेशी
मिलिंद गडदे
दयानंद अडाळे
साहेबराव पुजारी