सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

"खंडेनवमी अर्थात शस्त्रपुजन"

"खंडेनवमी अर्थात शस्त्रपुजन"



     अश्विन शुद्ध नवमी म्हणजेच खंडेनवमी. या दिवशी परंपरेनुसार शस्त्रपुजन करतात. पण असं का करतात बरं? तर यामागं खरंतर पौराणिक संदर्भ आहेत.

     पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणं देवीने महिषासूर नावाच्या असुराशी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे सलग नऊ दिवस, नऊ रात्र युद्ध करून त्याचा वध केला आणि तेव्हापासून देवीला 'महिषासूरमर्दीनी' या नावानं ओळखलं जाऊ लागलं. या युद्धाच्या शेवटच्या म्हणजे नवव्या दिवशी वध केल्यानंतरच देवीने तिचं शस्त्र खाली ठेवलं. त्यामुळं नवव्या दिवशी म्हणजेच खंडेनवमीला शस्त्रपूजनाची प्रथा आहे.

     ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही बारा बलुतेदारांपासून ते सैनिकांपर्यंत प्रत्येकजण खंडेनवमीच्या दिवशी उत्साहात आणि जल्लोषात आपापल्या आयुधांची आणि शस्रांची पुजा करत असतो. अलीकडच्या काळात शस्त्रास्त्रांची व्याख्या काहीशी बदलली आहे हे खरंय पण असं असलं तरीसुद्धा अगदी शहरात रहात असलेल्या आणि लढाऊ परंपरा असणाऱ्या घराण्यांमधे आजही विधिवत आणि अगदी शास्त्रशुद्ध पध्दतीनं शस्त्रपूजन केलं जातं. या दिवशी शिल्पकार, सुतार, कारागीर वगैरे मंडळी आपापल्या उपकरणांचे मनापासून पूजन करतात. शेतक-यांकडे पूर्वी नांगराचे पूजन केलं जात असे. आता या नांगरांऐवजी ट्रॅक्टर आलेत तरीही परंपरागत खंडेनवमीची नांगर पूजनाची प्रथा आजही प्रयत्नपूर्वक पाळली जाताना दिसून येते. काळ बदलला, साधनं बदलली तरीपण आपण आपल्या प्रथा आवर्जून पाळायलाच हव्यात नाही का?

     अशा पारंपारिक प्रथा सगळेजण पाळत असताना मग आपण समस्त ट्रेकर्स मंडळी तरी कसे मागे असू? डोंगरयात्रा करताना आपल्याही बऱ्याच ठिकाणी खडतर वाटांवर संरक्षण साधनांचा वापर करावा लागतोच की. खरंतर त्याक्षणी आपली संपूर्ण सुरक्षितता केवळ अशा साधनांवरच तर अवलंबून असते. म्हणूनच डोंगरयात्रा करताना वापरत असलेल्या अशा साधनांच्या प्रती आपण ट्रेकर्स मंडळींनी कायमच ऋणी असायला हवं. मग या  ऋणाचीच अंशतः परतफेड म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आम्ही 'फाल्कन्स' नी त्यांची सहकुटूंब पूजा करून खंडेनवमी उत्साहाने साजरी केली.



     खरं म्हणजे दिवसेंदिवस जशी या साधनांमधे वाढ होतीये ना अगदी तशीच 'फाल्कन ट्रेकर्स'च्या कुटूंबाची पण हळूहळू वाढ होतीये. एवढंच नाही तर गेल्या चार वर्षात केलेले ट्रेक्स पाहिले तर त्यांच्या श्रेणीचा आलेख चढताच आहे. डोंगरयात्रांची नुसतीच संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ होणं महत्वाचं असतं जे फाल्कन ट्रेकर्सच्या बाबतीत प्रत्येकाने घेतलेल्या कष्टामुळं शक्य झालं होतं आणि पुढेही नक्कीच होणार होतं. अर्थात हे सर्व घरच्यांच्या पाठींब्याशिवाय अजिबात शक्य नाही हेही तितकंच खरंय. ट्रेकवरून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी घरच्यांना ट्रेकचे फोटो दाखवताना, आठवणी सांगताना प्रत्येकाला संदर्भासाठी एकमेकांची फक्त नावं सांगायला लागत. त्यामुळं नावानी सगळे एकमेकांना ओळखत तर होतेच पण प्रत्यक्षात मात्र कुणाच्याच घरच्यांनी कुणाला पाहिलेलं नव्हतं. आत्तापर्यंत काही अपवाद वगळता कधीच आमची एकमेकांच्या घरच्यांशी तशी प्रत्यक्षात भेट झालेली नव्हती. त्यामुळं मग असा एखादा खास घरच्यांसाठी स्नेहमेळावा घेता येईल काय? ज्यामुळं एकमेकांच्या कुटूंबियांना पण भेटता येईल, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारता येतील आणि एवढंच नाही तर त्यांचे आमच्या भटक्यांच्या बाबतीतले विचारही समजून घेता येतील. त्याबद्दल आम्हा सगळ्या फाल्कन्सच्या डोक्यात बर्‍याच दिवसांपासून विचार घोळत होता पण नक्की काय करावं, कसं करावं नेमकं तेच काही सुचत नव्हतं...

     ...आणि दरवर्षी साजरी करणार्‍या या खंडेनवमीच्या पुजेनं हे कोडं अगदी पटकन सोडवलं. 'यंदाच्या खंडेनवमीच्या पुजेचं औचित्य साधून 'फाल्कन ट्रेकर्स'चा एक स्नेहमेळावा घ्यायचा'. ठरलं तर मग. त्यासाठी लगेच सगळ्यांच्या सोयीचा मुहूर्तही ठरवला नेहमीप्रमाणे रविवारच्या सुट्टीचा. सगळ्यांना पटापट निरोप गेले आणि हांहां म्हणता कार्यक्रमाला येणार्‍यांचा आकडा सहज शंभरावर गेला. आता सगळेजण ट्रेकप्रमाणेच त्या दिवसाची अगदी आतूरतेने वाट पहात होते.

     रविवार ०६ ऑक्टोबर. संध्याकाळी सहाला कार्यक्रम सुरू करायचा असल्यामुळं सगळी मंडळी अगदी दुपारपासूनच झटत होती. हॉल स्वच्छ करून झाला होता. खुर्च्या, टेबलं आली होती. सगळी साधनं मांडून झाली होती. वर्षभरात केलेल्या ट्रेकचा आढावा घेणार्‍या स्लाईड-शोसाठी प्रोजेक्टरही सज्ज झाला होता. एवढंच नाही तर कार्यक्रमानंतर पोटोबाची सोय करण्यासाठी आचारीही तयारीला लागले होते. कार्यक्रमाची अगदी व्यवस्थित आणि सगळी तयारी झाली होती.

     संध्याकाळी साडेपाच नंतर एकेकजण हळूहळू हॉलवर येऊ लागला आणि साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू झाला पण. एस. आर. शिंदेंनी सुत्रसंचालनाची जबाबदारी घेतली. त्यांनी आलेल्या कुटूंबियांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरूवात केली. हा कार्यक्रम कौटूंबिक असल्यानं प्रमुख पाहूणे वगैरे काही भानगडच नव्हती. त्यामुळं मग आमच्यातल्या अविनाश मनकर आणि सुनिता वहिनींनीच मग दिपप्रज्वलन करून झाल्यावर साधनांची पुजा केली.



लगेचच सर्वांच्या ओळखीपाळखी झाल्या. ज्या सुरक्षा साधनांची नुकतीच पुजा केली होती ती नेमकी काय आहेत? त्यांना काय म्हणतात? ती वापरतात कशी? वगैरेची सविस्तर माहिती मंगेश आठल्येंनी दिली. आम्ही जेव्हा डोंगरयात्रा करतो त्यावेळी त्या पूर्णपणे सुरक्षितता पाळूनच करतो हे घरच्यांना कळावं, केवळ हाच या मागचा एकमेव उद्देश होता.



     पूर्ण सुरक्षितता बाळगूनही चुकून एखादी दुर्घटना झालीच तर जखमीला सुरक्षित ठिकाणी कसं उचलून आणलं जातं याचं छोटंसं प्रात्यक्षिकही तिथं करून दाखवलं


     आता मागच्या म्हणजे २०१८ च्या खंडेनवमीपासून ते या खंडेनवमीपर्यंत केलेल्या डोगरयात्रांची माहिती देण्याची जबाबदारी जितेंद्र परदेशी आणि माझ्यावर येऊन पडली होती. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री उशीरापर्यंतच नाही तर अगदी कार्यक्रमाच्या दिवशी दुपारपर्यंत बसून प्रेझेंटेशन तयार केलं होतं. त्यामुळं कोणत्या स्लाईडवर काय बोलायचंय वगैरेची तयारी करायला अजिबात वेळ मिळालेला नव्हता. पण जे काही सांगायचंय ते आपल्याच घरच्यांना होतं त्यामुळं जरी काही चुकलंच तरी ते नक्कीच समजून घेणार होते. तसं बघायला गेलं तर एकेका ट्रेकवर एकेक स्लाईड-शो करता येईल एवढा त्यांचा आवाका मोठा होता. पण खास या कार्यक्रमासाठी पुण्याहून चिंचवडला आलेल्यांना परत घरी पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून स्लाईड-शो उरकता घेतला.


     या स्लाईड-शो नंतर वर्षभरात भरीव कामगिरी केली म्हणून ट्रेकचे सुंदर फोटो काढणार्‍या मंदार दंडवतेचा...


     चोख हिशोब ठेवणार्‍या जितेंद्र परदेशीचा...


     प्रत्येक ट्रेकला खाण्यापिण्याची ज्याच्यामुळं चंगळ होते अशा अर्जुन ननावरेचा...


     ट्रेक सुरू असताना कायमच गृपची पिछाडी सांभाळणार्‍या महादेव पाटील, दिपक ब्राम्हणे आणि साहेबराव पुजारींचा...



     सांगली-कोल्हापुर जिल्ह्यातल्या पुरग्रस्तांना प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून मदत पोहोचवणार्‍या विनायक गाताडेचा...


     तर न चुकता दर रविवारी सिंहगड फेरी करणार्‍या दयानंद अडाळे, उमेश माने, अमित पवार, राजु चव्हाण आणि मनिष क्षीरसागरचा सन्मान केला.



     आता इथून पुढचा कार्यक्रम आम्हा सर्वांच्याच दृष्टीने अतिशय महत्वाचा होता तो म्हणजे आमच्या कुटूंबाचा आम्हा सर्वांबद्दल असलेल्या मतप्रदर्शनाचा. आमच्या बर्‍याच वहिनींनी आमच्याबद्दल जे मत बनवलेलं होतं ते नक्कीच सकारात्मक होतं हे त्यांच्या बोलण्यातुन स्पष्टपणे जाणवत होतं.



     खरं सांगायचं तर आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने ही अतिशय चांगलीच गोष्ट होती. एकूणच हा कार्यक्रम करून आम्ही आमच्या कुटूंबियांचा नक्कीच विश्वास मिळवला होता. त्यामुळं पुढच्या काही ट्रेक्सना तरी घरून परवानगीची कुणालाही नक्कीच अडचण येणार नव्हती. सर्वांचे आभार मानून स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता केली.



     खरं म्हणजे ट्रेकर्सच्या शब्दकोशात 'औपचारिकता' हा शब्दच नसतो. असतो तो फक्त सोबत्यांवर असलेला दृढविश्वास, एकमेकांबद्दल असणारा आदर, प्रेम आणि या सगळ्यांमुळेच त्याचा वाढत जाणारा आत्मविश्वास. या सगळ्या गोष्टी प्रत्येक फाल्कन्समध्ये अगदी ठासून भरल्यात त्यामुळंच तर हा खंडेनवमीचा कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि अतिशय उत्तमरित्या पार पडला. छे छे, तो तर पार पडणारच होता.

फाल्कन्सची वर्षभरातली भरारी...


# किल्ले - २० 
# घाटवाटा - १९
# Rappelling Activity - ०१
# Range Trek - ०३
# Total Treks - १३
# Total Participants - ३५२


कार्यक्रमाची अजूनही काही क्षणचित्रे...









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा