मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

भाग तिसरा "अनवट घाटवाटा, आजोबांच्या कुशीतल्या"

-- भाग तिसरा --


"अनवट घाटवाटा, आजोबांच्या कुशीतल्या"


'पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट'


       या लेखाचा पहिला भाग वाचला नसेल तर वाचा या धाग्यावर...

https://watvedilip.blogspot.com/2019/12/blog-post_24.html


       आणि जर दुसरा भागही हवा असेल तर मिळवा या पुढील धाग्यावरून...


आता आपण शेवटचा भाग पाहू...

       आजचा टप्पा कालच्या एवढा अवघड नव्हता. एकतर गुयरीदार घाट तसा सोप्या प्रकारातला होता आणि तो फक्त उतरायचा होता. त्यामुळे सकाळी थोडं आरामातच आवरलं. समोरच कात्राबाईचा डोंगर दिसत होता. त्याच्या उजव्या बाजूला वाकडीचा सुळका आणि या दोन्हीच्या मधे कात्राबाईची खिंड जाणवत होती. वाकडीच्या जवळच सुर्योदय होत होता.


       सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्‍यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते. अंगातून थंडी जाऊन चैतन्य यावं म्हणून आमच्यातल्या एकानं थोडंसं फिजिकल ट्रेनिंग आणि नंतर हास्यक्लबात घेतले जाणारे हास्यप्रकार करून घेतले. मग काय सगळे एकदम तरतरीत झाले.




       गरमागरम चहा तयार झाल्याची हाक ऐकू आल्यावर सगळे चुलीपाशी जमा झाले. नाश्ता आम्ही माथ्यावर जाऊन आल्यावर करणार होतो आणि तोपर्यंत दम निघावा म्हणून चहा बरोबर बिस्कीटं खाऊन घेतली. आम्ही सर्वजण माथ्यावर जाणार असल्यानं बेसकँपवर थांबून नाश्ता तयार करण्याची जबाबदारी बाळकृष्ण पाटेकरांनी स्विकारली.


       आता आम्ही आमच्या अंतिम लक्षाकडे म्हणजे आजोबा माथ्याकडे निघालो होतो. सर्वजण माथ्यावर जायला आतुर झाले होते त्यामुळे चढताना कुणीच थांबत नव्हतं. पाऊणएक तासात आम्ही माथ्यावर पोहोचलो. माथा बर्‍यापैकी मोठा होता. कोकणाच्या बाजूला सरळसोट कडा तर घाटमाथ्याकडे तो टप्प्याटप्प्याने उतरत गेलेला होता. माथ्यावर मोठी झाडे अशी नव्हतीच. खुरटीच झाडे तीही थोडीच दिसली. बाकी कमरेपर्यंत गवत माजलेलं होतं.






       आजोबा माथ्यावरून दिसणारा नजारा तर अप्रतिम होता. बऱ्यापैकी उंचीवर आल्याने बराच लांबपर्यंत ओळखीचा प्रदेश दिसत होता. त्यात अलंग-मदन-कुलंग, कळसुबाई, शिपनूर, घाटघर, साम्रद, सांधणदरी, खुटा-रतनगड, कात्राबाई, करंडा, वाकडीचा सुळका, मुडा, गवळदेव, अगदी खालच्या बाजुला काल चढुन आलेल्या पाथर्‍याची बेचकी, त्यामागे कुमशेत आणि त्याचा कोंबडा, नाप्ता, कलाडगड आणि अगदी शेवटी हरिश्चंद्रगडाची रोहीदास आणि बालेकिल्ला टोके तर खाली कोकणात डेहणे, शाई आणि करवली नद्यांची खोरी एवढा परिसर अगदी स्वच्छ दिसत होता. पाहतापाहता स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारून पुर्ण झाली होती. माथ्यावर भरपुर फोटो काढले.



       मोबाईलला नेटवर्क मिळाल्यामुळे सर्वांनी घरी खुशालीचे फोन केले आणि नाश्त्यासाठी बेसकँपवर परत आलो. कांदेपोहे आणि काल राहिलेल्या भाताचा केलेला फोडणीचा भात आणि वर कडक कॉफी.
       इथे येण्याचा आमचा अंतस्थ हेतु साध्य झाला होता आणि आता आजोबांचा निरोप घ्यायची वेळ जवळ आली होती.



       ट्रेकला आलेले सर्वच पुणे व्हेंचरर्स या नामांकीत संस्थेच्या तालमीत तयार झाल्यामुळं प्रत्येकाला स्वच्छतेचं बाळकडू अगदी सुरवातीपासुनच मिळालं होतं. त्यामुळे कुणालाही न सांगता सर्वजण बेसकँपवर साफसफाईच्या कामाला लागले. "Leave nothing but footprints, take nothing but memories" हा मुलमंत्र सर्वांच्या अंगवळणीच पडल्यामुळे कुणाला काही सांगावंच लागलं नाही. अक्षरशः पंधरा मिनीटात बेसकँप स्वच्छ झाला. परतीचा प्रवास सुरू करण्यापुर्वी नेहमीप्रमाणेच शिवाजी महाराजांची गारद झाली. जय भवानी-जय शिवाजी वगैरे जयघोषांनी आजोबाचा परीसर अगदी दुमदुमून गेला.




       काल आजोबा माथ्यावर आलेल्या वाटेनेच परतीचा प्रवास असल्याने उतरताना काळजी घेण्याची जास्त गरज होती. परतीच्या प्रवासात प्रत्येकाला घरचे वेध लागलेले असतात त्यामुळं धोका जास्त पत्करला जातो आणि अशाच वेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते. योग्य ठिकाणी दोराचा वापर केल्यामुळे उतरणं सुरक्षीत झालं होतं. एकमेकांना आधार देत, अवघड असलेल्या जागेवर मागच्याला सावध करत हळूहळू सर्वजण पठारावर आले.




       आता आम्हाला आजोबा डाव्या हाताला ठेऊन वळसा घालायचा होता. आजोबाच्या उत्तरेला चिकटूनच साधारण पाऊण तासावर आजोबा आणि करंडा या दोन्हींमधे गुयरीदारची खिंड आहे. वाटेत एक मस्तपैकी पाण्याचा ओहोळ लागला. याला 'शिधोबाचा ओहोळ' म्हणतात. हा ओहोळ बारमाही वाहता असल्याने आजोबा माथ्यावर जाणारे बहूतेक सर्व याच्याच काठावर मुक्काम करतात. ओहोळातलं पाणी ओणवं होऊन पिताना एक वेगळीच मजा आली.




       आमच्यातल्या एकाच्या पायात क्रॅम्स येऊ लागल्याने थोडी विश्रांती घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार केले.


       पुढच्या दहाच मिनीटात घाटमाथ्यावर पोहोचलो. इथुन गुयरीदारची एकच एक नाळ दिसत होती जी आम्हाला डेहण्यापर्यंत घेऊन जाणार होती.




       तसं पहायला गेलं तर ही वाट तितकीही सोपी नव्हती पण कालच्या दिवसभरात सर्वजण अवघड वाटा चालून एवढे सराईत झाले होते या वाटेचं कुणाला काही वाटतच नव्हतं.



       ही नाळ पश्चिमवाहिनी असल्यानं जवळजवळ अर्धी नाळ उतरून येईपर्यंत ऊनच लागलं नाही. त्यामुळे थांबण्याचा प्रश्नच आला नव्हता. थोडं खाली उतरल्यावर घसा कोरडा पडल्याची जाणीव झाली. एक मोठं झाड बघुन क्षणभर विश्रांती घेतली. इथूनच एक वाट डावीकडे वळून पदरात असलेल्या वाल्मिकी आश्रमाखालच्या पाण्याच्या कुंडांपर्यंत जाते. पण आम्हाला डेहणे गाठायचं असल्याने आम्ही सरळ खाली उतरून जाणार होतो. घरून आणलेल्या तहानलाडू भुकलाडूंचा काही वेळातच फडशा पडला. त्यावर सकाळीच तयार केलेलं सरबत प्यायलं.



       थोडं खाली उतरल्यावर दोन मोठे दगड एका लहान झाडाच्या आधाराने सख्ख्या भावांप्रमाणे एकमेकांना टेकून उभे होते.


       नाळेत पुढे एक मोठा कडा असल्याने वाट आता नाळेतून बाजुच्या जंगलात शिरून उतरू लागली. शेवटच्या टप्प्यात झाडे संपली आणि गवताचा एक भयानक उतार लागला. मग काय!! सगळे अगदी लहान झाले आणि त्या गवताळ टप्प्यावरून बहूतेक सर्वांनीच मनसोक्त घसरघुंडी खेळून घेतली.


       सर्वजण खालच्या झाडीत सुखरूप उतरल्यावर डेहण्याकडे निघालो. वाटही सपाटीची आणि झाडीतुन असल्याने एवढे चालूनही थकवा जाणवत नव्हता. गुयरीदाराच्या नाळेतुन आलेल्या ओहोळाची आता 'शाई नदी' झाली होती आणि वाटही तिच्या बाजूबाजूने आम्हांला डेहण्यापर्यंत नेणार होती. थोडं चालल्यावर जंगल संपून वाट उघड्यावर आली. गाव जवळच असल्याच्या खुणाही जाणवू लागल्या होत्या. वाटेचा झालेला 'ट्रॅक्टरचा रस्ता' बरंच काही सांगुन जात होता. शेवटी ही नदीसुद्धा वाळू उपशापासून सुटली नव्हती.


       मुख्य रांगेवरचे आजोबा, कात्राबाईचे कडे, रतनगड आकाशात उंच गेलेले दिसत होते. चालताचालता रतनगडाच्या वाटांचा विषय सुरू झाला आणि गोळी बरोबर लागली. बाळकृष्ण सोबतच चालत होते आणि आमचं बोलणं तेही लक्षपुर्वक ऐकत होते. त्यांनी सहजच 'चिकणदरा' वाटेबद्दल सांगितलं आणि माझे कान टवकारले. चौकशीअंती बरेच वर्षांपासून मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एका चुटकीसरशी मिळालं होतं. पुढच्या महीन्याभरातच हा नवीन घाटवाटेचा अतिशय अवघड ट्रेक आम्ही केला सुद्धा. कोणता होता तो ट्रेक? हे पुढच्या लेखात वाचायला मिळेलच.
       एकंदरीत आम्ही उतरलेला गुयरीदार घाट खुपच देखणा होता. भितारवाडीनंतर आज आम्हाला आमच्या व्यतिरिक्त काही वेगळे लोक दिसू लागले होते.



       घाट उतरून आल्यानंतर वाल्मिकनगरपर्यंतचं तासाभराचं टळटळीत उन्हातुन चालणं सपाटी असुनही अतिशय कंटाळवाणं झालं होतं. एवढ्या उन्हातही शेतकर्‍यांची शेतीची कामांची लगबग सुरू होती.



       ट्रेकर्स अशा आडबाजूच्या खेड्यात गेले की आपसुकच त्यांच्याभोवती गावातल्या लहान मुलांचं चॉकलेट, गोळ्या आणि खाऊसाठी कोंडाळं जमतं. पण आमच्यातला एक ट्रेकरमित्र प्रत्येक ट्रेकला मुलांना थोड्या वेगळ्या गोष्टी वाटतो ते म्हणजे 'शालेय साहित्य'. खरंच त्याचं हे काम कौतुकास्पदच आहे, नाही का?


       वाल्मिकनगरच्या असलेल्या देवराममामांनी आमचा पाहूणचार त्यांच्याच दुकानातला पेप्सिकोला देऊन केला. घरी आलेल्या पाहूण्यांबद्दल त्यांना असलेलं प्रेम जाणवत होतं. केवळ दोन दिवसांच्या सहवासानं आमच्यात अतिशय घट्ट मैत्री झाली होती.



       पुढच्या पंधरा मिनीटातच डेहण्यात बाळकृष्ण पाटेकरांच्या घरी दाखल झालो. घरून पाण्याला बादली घेतली आणि हातपंपावर अंघोळीला गेलो. नाहीतरी अशी अंघोळ आम्हाला पुन्हा लगेच तरी कधी करायला मिळणार होती?


       अंघोळ झाल्यावर भुकही जाम सपाटून लागली त्यातुन पाटेकरांच्या गृहलक्ष्मीने असं चविष्ट गावरान जेवण बनवलं होतं म्हणून सांगू सगळ्यांनी दोन दोन भाकर्‍या जास्तच खाल्ल्या.


       या ट्रेकमधे कोकणातील डेहण्यातुन पाथरा घाटाने आजोबा माथा आणि उतरताना गुयरीदार घाटाने परत डेहणे, असं पाठीवर दोन दिवसांचं सामान घेऊन, एकंदरीत आमचं १६-१७ तासांचं चालणं झालं होतं आणि तसं हे नक्कीच कमी नव्हतं. थकल्यानंतरही अजिबात चिडचिड न करता आम्ही ट्रेक व्यवस्थितपणे पुर्ण केला होता आणि हे केवळ आम्ही एकत्रितपणे, वारंवार करत असलेल्या डोंगरयात्रांमुळेच शक्य झालं होतं.

       खरं म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही कंटाळा करून चालणार नव्हता. दुसर्‍या दिवशीची कामे डोळ्यासमोर दिसत होती त्यामुळे लवकरात लवकर पुण्याला पोहोचायला हवं होतं. देवराममामांच्या मुलासोबत जाऊन गुंड्यातुन गाडी घेऊन आलो आणि लगेचच पाटेकरांचा निरोप घेतला. वाटेत फक्त एकच टी-ब्रेक घेऊन रात्री सुखरुप घरी परतलो.

समाप्त.



समाप्त.

भाग दुसरा "अनवट घाटवाटा, आजोबांच्या कुशीतल्या"

-- भाग दुसरा --


"अनवट घाटवाटा, आजोबांच्या कुशीतल्या"


'पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट'


       या लेखाचा आधीचा भाग वाचला नसेल तर वाचा या धाग्यावर...


       डेहण्यात रात्री उशीरा पोहोचल्यानं सकाळी थोडी उशीराच जाग आली. तरीही सकाळची आन्हीकं उरकून गाडीत बॅगा टाकल्या आणि पाटेकरांकडे नाश्ता करायला बरोबर सव्वासहाला पोहोचलो. नाश्ता करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मंदीरात आरती केली.



       भात तोडणी झाली होती. त्यामुळे बळीराजाची भल्या पहाटेच उठून भात झोडपणी सुरु झाली होती.


       या ट्रेकमधे खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी आम्ही पाटेकरांकडे दिलेली होती. याचं पहिलं कारण म्हणजे आम्हांला शिधा, भांड्यांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नव्हता आणि स्वयंपाक करण्याच्या वेळेत आम्ही मुक्कामाचे ठिकाण फिरून पाहू शकत होतो. दुसरं असं की आम्हाला आपसुकच गाईड मिळाला होता. बाळकृष्ण पाटेकरांनी त्यांच्यासोबत 'देवराम' नावाचा माहितगार माणूस पोर्टर म्हणून घेतला होता. सह्याद्री माथ्यामागून तांबडं फुटायला लागलं होतं. देवरामदादा येईपर्यंत कुलंग, शिपनुर, खुटा, रतनगड, कात्राबाई, गुयरीदार, महाकाय आजोबा ते नाप्त्याची दुकल पर्यंतचा सह्यमाथ्याचं विहंगावलोकन केलं.


       देवरामदादा आल्यावर आम्ही आमच्या गाडीतुनच पाटेकरांच्या नातेवाईकांकडे गुंडे गावापर्यंत गेलो. आमची गाडी तिथे पार्क करून पुढे त्यांच्या गाडीतून त्यांनी आम्हाला पुढच्या वाळशेत आणि भितारवाडीच्या मधेपर्यंत सोडलं. यापुढचा भितारवाडीपर्यंतचा रस्ता खुपच कच्चा असल्यानं वेळ खुप लागतो. तसं भितारवाडीतुनही पाथरा घाटात जाता येते पण त्यापेक्षा अलिकडच्या ठिकाणाहून लवकर पाथरा गाठता येतो. गाडीने या ठिकाणापर्यंत आल्यामुळे आमचा सकाळचा बराच वेळ वाचून आम्ही उन्हं चढायच्या आत पाथरा घाट बर्‍यापैकी चढून जाणार होतो. सर्वांसाठी आणलेल्या सामाईक वस्तुंचं जसं काकडी, पन्हे, किराणा आणि इक्विपमेंटचं सर्वात सारखं वाटप केलं.


       भितारवाडीच्या पुढे नदी ओलांडली, पिट्टूचे बंद करकचकून आवळले आणि पाथर्‍याकडे मार्गस्थ झालो. आता आमच्यासोबत 'बाळकृष्ण' आणि 'देवराम' असल्यामुळं वाल्मिकी आजोबा आम्हा सर्वांना सांभाळून घेणार याबद्दल काही शंकाच नव्हती.


       आजोबा पर्वत आमच्या डाव्या हाताला दुरवर दिसत होता. त्याला जोडून असलेला सीतेचा पाळणा सुळका पाहिल्याबरोबर त्या सुळक्यापाशी असलेल्या खाणाखुणा चटकन डोळ्यासमोर आल्या.


       आता आमची वाट मस्तपैकी झाडीतुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी दक्षिणेकडे चालली होती. सह्यमाथ्यावरून उतरलेल्या दांडांवरून वाट चढ-उतार करत आरामात पुढे जात होती.



       पाऊस उशीरापर्यंत राहिल्याने वाटेत बरेच वाहते ओहोळ ओलांडावे लागत होते.




       थोडं अंतर चालून गेल्यावर मधेच एक पांढरीचं झाड दिसलं. स्थानिक लोक याला 'कांडळ' म्हणतात. शेंगदाण्यासारखी याला फळेही येतात आणि लहान मुले ती आवडीने खातात पण. हे झाड दिसायला पांढरं शुभ्र असल्यामुळं इतर झाडांपेक्षा एकदम वेगळं दिसतं. त्यामुळे या झाडाचा ट्रेकमधे रस्ता लक्षात ठेवण्यासाठी खुपच चांगला उपयोग होतो. उदाहरणच सांगायचं झालं तर तैलबैलाजवळच वाघजाईचा घाट आहे. या घाटातुनच ठाणाळे लेण्यात जाण्याची वाट आहे. पण घाटवाटेतुन नेमका लेण्यात जायचा फाटा कुठे आहे हे समजत नाही. या घाटवाटेतल्या एका पदरावर पांढरीचं झाड आहे नेमकं त्याच्या अलिकडच्या पदरात लेण्यांना जायचा फाटा आहे.


       शेवटच्या ओढ्यात पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या कारण इथून पुढे आम्हाला कुमशेत पठारापर्यंत पाणी मिळण्याची शाश्वती नव्हती.


       या ओढ्यानंतर पुढच्याच एका मोठ्या सोंडेवरचा चढ सुरु झाला. सोंडेवर पुर्ण चढुन गेल्यावर समोरच दिसणार्‍या झाडीत एक छोटासाच खाऊ ब्रेक घेतला. उजव्या बाजूला खाली 'कुंडाची वाडी' दिसत होती. वाडीतून दोन सोंडा सुरू होत होत्या. एक सध्या आम्ही होतो ती आणि दुसरी बरोबर आमच्या पुढची. वाडीतून आलेली एक वाट आम्हाला इथे येऊन मिळाली होती. खरं म्हणजे मुळ पाथरा घाट याच कुंडाच्यावाडीतुन आमच्या पुढल्या धारेवरून चढून येतो. ती वाट खरी सर्वात जवळची पण खूप घसारा असलेली, जास्त चढावाची आणि अतिशय दृष्टीभय असलेली आहे. आमचा ट्रेक डेहण्यात संपणार असल्यामुळे आम्ही आमची गाडी तिथे पार्क करून ट्रेकची सुरूवात आम्हाला सोईस्कर असलेल्या डेहण्यातुन केली होती. खरंतर ही कुंडाचीवाडी गाठण्यासाठी मोरोशी-डोळखांब दरम्यानच्या तळेगावातूनच फाटा फुटतो. या व्यतिरिक्त मोरोशी-टोकावडे-मोढळवाडीतुनही पाथरा घाट गाठता येतो.




       आता पुढची वाट जवळजवळ साठ अंशात असल्याने चांगलीच दमवत होती. जसजसं वर जात होतो तसतशी झाडी विरळ होत चालली होती. ऊनही जाणवायला लागलं होतं. पुढल्या सोंडेच्या माथ्यावर पाथरा घाटाची खिंड आणि त्यातून उतरलेली नाळ झाडीमागे जाणवत होती. पुढे उजवीकडे ट्रॅव्हर्स घेत त्या नाळेत शिरलो.






       आमच्या बाळकृष्ण पाटेकरांना आता घेतलेल्या शिध्याचं वजन चांगलंच जाणवू लागलं होतं. ते कमी करण्यासाठी एका सुकलेल्या ओढ्यात दुपारच्या जेवणाची शिदोरी सोडली आणि सर्वांनी जेवून घेतलं. पण समोरचा चढ बघता जेवण जातंय थोडंच? आवंढाही गिळवत नव्हता. दोन घास पोटात कसेबसे ढकलले आणि पुन्हा चढू लागलो.



       नाळेतला चढ भयानकच होता. एकतर खुपच खडा आणि घसार्‍याचा. बरं पावसाळ्यानंतर आम्हीच पहिले जात असल्याने वाट तयार करतच जावं लागत होतं.





       खिंडीच्या थोडं अलिकडं उजव्या बाजुच्या डोंगराच्या गुहेत पाथरा देवीचं मंदीर लागलं. कुंडाच्या वाडीतून दुसऱ्या धारेवरून येणारी वाट आम्हाला या मंदीरापाशी येऊन मिळाली होती. एका द्रोणात देवीला वाहिलेले सुटे पैसे दिसले. अगदी एक पैसा, दोन पैसे, पाच पैशाची केव्हाच बंद झालेली नाणीही त्यात होती. बाजूलाच पाण्याचं कोरडं टाकं होतं. एक प्रकार बाकी लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे तिथे पडलेली असंख्य छोटी मडकी. घाटाखालच्या पंचक्रोशीतली मंडळी देवपुजेत असणारे मडके जुने झाले की नवे आणतात आणि जुने पाथरा देवीला येवून वाहतात. प्रथा असते प्रत्येक ठिकाणची नाही का?




       मंदीरातून समोरचा घाटातल्या सर्वात अवघड टप्प्यातला एक छोटासाच भाग दिसत होता आणि तोही मनात चांगलीच धडकी भरवत होता. ते बघताच आता समोर काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पना आली. या टप्यात अतिशय घसाऱ्याची वाट दिसत होती. आम्ही सर्वांनी लगेचच शितावरून भाताची परीक्षा केली होती.



       घाटरस्ता चढाव कमी करण्यासाठी जसा वळणे घेत जातो त्याचप्रमाणे पाथर्‍याची जेमतेम एक पाऊल बसेल एवढीच वाट वळणे घेत जात होती पण त्यामुळे पाथऱ्याचा चढाव काही कमी झालेला होता? तर छे!! तो अगदी छातीवर होता. कधी दरी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला.



       इथून पुढे सावलीसाठी तर जाऊच द्या पण आधारासाठी देखील कारवी नव्हती. सुर्यदेवही चांगलेच तापले होते. पर्यायाने ज्याला धरुन चढायचे ते दगडही. हाताला चटके बसू लागताच शाळेत शिकलेली बहिणाबाईंची कविता आठवली 'आधी हाताला चटके...' फक्त इथं भाकर नव्हती तर घाटमाथा होता. बाकी एकूण परिस्थिती तीच होती. दृष्टीभयही एवढं होतं की फोटो काढणंही कुणाला सुचत नव्हतं. फोटो काढू की जीव सांभाळू अशी गत होती सर्वांची. बरं वाट एवढी घसार्‍याची होती की चाळीशीला आलेला माणूसही कसा रांगतो याचं प्रात्यक्षिक पहायला मिळत होतं.









       माथा समोरच दिसत होता पण वाट काही संपत नव्हती. समोरच्या टोकावर सरळ चढायला वाट नसल्याने ती आता उजवीकडून आडवी जात होती. वाट होती एवढी चिंचोळी की जेमतेम एकच पाऊल बसेल. डाव्या बाजुला कडा आणि उजव्या बाजूला डोळे फिरवणारी दरी. बरं डोळे फिरतात तर बघावं कशाला दरीकडं? असं म्हणून तरी जमतंय थोडंच. लक्ष जायचंच हळूच. डाव्या कड्याला धरत आणि मन खंबीर ठेवत एकदाचे माथ्यावर पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. वाळशेत पुढील ट्रेक चालू केलेल्या फाट्यापासून पाथर्‍याचा घाटमाथा गाठायला आम्हाला तब्बल सात तास लागले होते.


       एकंदरीत पाथरा घाट प्रचंड घसाऱ्याचा, भयानक दृष्टीभय असलेला आणि घाटवाटेत पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेला आहे. हा घाट अत्यंत कठीण प्रकारात मोडू शकेल. निष्णात ट्रेकर्स किंवा ज्याला दृष्टीभयाचा त्रास नाही अशांनीच या वाटेने जाण्याचे धाडस करावे. ज्याला या वाटेने जायचेच आहे त्याने या वाटेने शक्यतो चढुन जावे. उतरण्याच्या तुलनेत ते काहीसं सोपं असेल. पावसाळ्यात या वाटेने जाणे अतिशय धोक्याचे आहे त्यामुळं पावसाळ्यात ही घाटवाट टाळावीच.
       कुमशेत पठारावर एका झाडाच्या सावलीत थोडावेळ आराम केला. सर्वांकडील पाणी बर्‍यापैकी संपत आलं होतं. अर्थात माझ्याकडे दोन लिटर पाण्याचा 'रिझर्व स्टॉक' होताच. असा स्टॉक मी फक्त आणीबाणीच्या प्रसंगासाठी ट्रेकची सुरूवात केल्यापासून संपेपर्यंत नेहमीच ठेवतो. तसं आता पठारावर आम्हांला मुबलक पाणी मिळणार होतं आणि झालंही तसंच. थोडं अंतर चालून गेल्यावर एक मस्त वाहत्या पाण्याचा ओहोळ दिसला. मग काय? पोटभर पाणी पिऊन घेतलं. हातपाय धुवून ताजेतवाने होईतोपर्यंत एकाने लिंबु सरबत तयार केलं ते पिऊन लगेचच समोरच्या आजोबाकडे निघालो.




       आता वाट मस्त सपाटीवरुन चालली होती. पाथरा चढून आल्यानंतर तर ते फारच सुखावह वाटत होतं. उजव्या बाजूला कात्राबाईची खिंड, वाकडीचा सुळका, मुडा लक्ष वेधून घेत होते. महिन्याभरापुर्वीच आम्ही कात्राबाईच्या खिंडीतुन उतरुन वाकडीच्या पायथ्यातून हरिश्चंद्रगडाकडे गेलो होतो. कात्राबाईची केलेली आरती, खिंडीतुन उतरणारी अफलातून वाट वगैरे डोळ्यासमोरुन तरळून गेली. कुमशेत पठारावर वेगवेगळ्या रंगाची रानफुले लक्ष वेधून घेत होती.





       तर मधेच गवताचे तुरे वार्‍यासोबत डोलत होते.


       ओहोळावर रचलेला बांध दिसला आणि त्याच्या सांडव्यात मासे पकडण्यासाठी लावलेले फासेही दिसले.


       कधी तोडणी झालेल्या तर कधी तोडणीसाठी तयार असलेल्या भातशेतीतून वाट पुढे जात हळूहळू चढत झाडीत शिरली.





       गेल्यावर्षीच आजोबाच्या पुर्वेकडील फार मोठी दरड कोसळून खाली आली. खाली कोणती वस्ती नाहीये म्हणून बरं नाहीतर माळीण सारखीच घटना घडली असती. या ढासळलेल्या दरडीच्या डाव्या बाजूला असलेल्या धारेवरुनच आजोबा माथ्यावर जाण्याची झाडीभरली वाट आहे. वाट थोडी निसरडी होती खरी पण धरायला कारवी असल्यामुळे काही वाटत नव्हतं. थोडं पुढं गेल्यावर मधल्या नाळेत उतरलो आणि सरळ नाळेतुनच माथ्याच्या कातळटप्प्यापर्यंत चढून गेलो.




       इथून मात्र उजवीकडे वळून ट्रॅव्हर्सी मारली. ही ट्रॅव्हर्सीही खुपच चिंचोळी होती. एवढंच नाही तर समोरच्या कातळभिंतीवर भरपूर आग्या मोहोळं होती. सावधपणे गोंगाट न करता जावं लागणार होतं.



       खरं म्हणजे बहूतेक ट्रेकर्स कुमशेत पठारावरच्या सिधोबाच्या ओढ्याजवळ मुक्काम करतात. खरंतर ते तसं का करतात याचं कारण वर चढता चढता कळलं. पण आम्हाला आजोबावरच मुक्काम करायचा होता. आता आम्ही जवळजवळ वर पोहोचलो होतो. एक डावे वळण घेऊन समोरच्या ओहोळात पोहोचलो. आज रात्रीचं आमचं मुक्कामाचं हेच ठिकाण होतं. सकाळी आठ वाजता चालायला सुरु करून संध्याकाळी पाच वाजता आम्ही मुक्कामी पोहोचलोही होतो.


       अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर पहिली चुल लावली. तोवर सहकार्‍यांनी सरपण गोळा करून आणलं. मग काय तर पहिला फक्कड चहा बनवला.



       आता अंधार पडण्यापुर्वी स्वयंपाक बनवायला हवा होता. मग काय सर्वांनी कामे आपसुकच वाटून घेतली. सर्वांमधला बॅचलर असतानाचा 'बल्लवाचार्य' जागा झाला होता. भाज्या चिरून होत होत्या तोपर्यंत मस्त व्हेज मंचाव सुप बनवलं. आजचा रात्रीचा मेन्यु कांदा-बटाटा रस्सा भाजी कम डाळ, सोबत डेहण्यातुन आणलेल्या चपात्या, पापड आणि लोणचं असा सुग्रास होता. सुप प्यायल्यावर भुक चाळवली गेलीच होती, त्यावर असा मेन्यु म्हटल्यावर असे काय सर्वजण जेवणावर तुटून पडले की विचारता सोय नाही. बरं जेवणही इतकं चविष्ट झालं होतं की सर्वांना घरी रोजच्या स्वयंपाकाची सवय आहे की काय? असा प्रश्न पडावा. एकंदरीत अशा आडजंगलातही आमच्या जेवणाची मात्र चंगळच झाली होती.





       सुरवातीला कॅम्पफायर करायचा असं ठरलं होतं पण दिवसभराच्या चालण्याने सर्वजण एवढे थकून गेले होते की जेवल्यानंतर कॅम्पफायर वगैरेचं कुणी नावच काढलं नाही. त्यामुळं कॅम्पफायर वगैर काहीही न करता सर्वजण लगेचच स्लिपींग बॕगमधे शिरले.


       यापुढचा तिसरा आणि अंतिम भाग वाचा या धाग्यावर...

https://watvedilip.blogspot.com/2019/12/blog-post_90.html

क्रमशः