-- भाग पहिला --
"अनवट घाटवाटा, आजोबांच्या कुशीतल्या"
याच भागातील सर्वांच्या वडीलधार्या असलेल्या 'आजोबांना' भेटण्यासाठी आम्ही फाल्कन्सनी दिवाळीच्या जवळपास जाण्याचं नक्की केलं होतं, तेही कोकणातल्या डेहण्यातुन पाथरा घाटाने. पण सर्वच गोष्टी काही आपल्या हातात नसतात ना. यंदा पाऊस लांबल्याने हा ट्रेक चांगला दोन वेळेला पुढे ढकलावा लागला. पहिली तारीख ट्रेकविना वाया गेली तशी दुसरीही जाऊ नये यासाठी आयत्यावेळी ०७-०८ ऑक्टोबरला याच भागातला 'रतनगड ते हरिश्चंद्रगड' असा ट्रेक केला. हा ट्रेक करून दुधाची तहान ताकावर भागवली खरी, पण आजोबा काही मनातुन जात नव्हता. त्यासाठी डेहण्यातल्या बाळकृष्ण पाटेकरांशी आठवड्यात दोनदोन वेळा फोनवर बोलणं होत होतं. पण ते दरवेळी 'पाऊस खूप आहे, इतक्यात येऊ नका' एवढेच सांगत. सरतेशेवटी त्यांनी एकदाचा होकार कळवला आणि आमचं जाण्याचं नक्की झालं. एकूणच आमचा आजोबाचा ट्रेक सुरेख तर झालाच शिवाय या ट्रेकला अजून एक नवीन घाटवाट कळली आणि लगेचच पुढच्या महिन्याभरात आम्ही त्या वाटेचा ट्रेक केलासुद्धा.
खरं म्हणजे दिवाळीच्या काही दिवस अगोदर फक्त आजोबा ट्रेकचाच प्लॅन होता पण तो न झाल्यानं 'रतनगड ते हरिश्चंद्रगड' असा एक आणि आजोबा दुसरा केल्यानंतर नवीन कळलेला तिसरा (या लेखमालेनंतर त्या डोंगरयात्रेचा लेख येईलच) अशा मिळून दिवाळी नंतरच्या काळात या भागात आम्ही सलग तीन डोंगरयात्रा केल्या. या सगळ्या डोंगरयात्रा एवढ्या भन्नाट झाल्या की तो आम्हा सर्वांसाठी दिवाळीचा बोनसच होता.
एकंदरीत या भागातल्या बहूतेक सर्वच घाटवाटा शारिरीक तसेच मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार्या आहेत. त्यातल्या आजोबा लगतच्या दोन घाटवाटांचा लेखाजोखा आपण एकूण तीन भागात पाहणार आहोत.
'पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट'
हा 'आजोबा पर्वत' म्हणजे सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असणारा उभा-आडवा सर्वच बाजूंनी महाकाय असा पर्वत आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४५११ फुट असून तो अहमदनगर जिल्ह्यात आहे. याच्या पायथ्याशी कोकणात ठाणे जिल्हा आहे जिथे डेहणे नावाचे गाव आहे. डेहणे गावातुन पाहिलं तर या आजोबा वा आजा पर्वताच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन घाटवाटा आहेत ज्यांनी घाटमाथ्यावरच्या आजोबाच्या पायथ्याच्या कुमशेतच्या पठारावर चढून जाता येते. अर्थात हे दोन घाट म्हणजे आम्ही ट्रेक करणार असलेले पाथरा आणि गुयरीदार घाट.
सह्याद्रीत अशी बरीच ठिकाणं आहेत की ज्यांना धार्मिक कथा जोडलेल्या आहेत. त्यातल्या या महाकाय डोंगराला 'आजोबा' नाव कसंकाय पडलं याची गोष्ट तर प्रसिद्ध आहे. पुराणातल्या कथेनुसार रावणवधानंतर काही काळाने श्रीरामांनी सीतामाईचा त्याग केला म्हणून सीतामाई या महाकाय डोंगराच्या पोटात असलेल्या वाल्मिकी ॠषींच्या आश्रमात राहू लागली. तिथे तिने लव आणि कुश नावाच्या दोन मुलांना जन्म दिला. लव आणि कुश लहान असताना वाल्मिकी ॠषींना आजोबा म्हणत म्हणून या पर्वताचे नाव 'आजोबा' असे पडले. या पर्वतावरच वाल्मिकी ॠषींनी रामायण हा ग्रंथ लिहिला असं सांगितलं जातं. आजही या आजोबाच्या पोटात निसर्गरम्य वातावरणात वाल्मिकी ॠषींचा आश्रम आणि त्यांची समाधी आहे. या आश्रमापासून थोडे वर चढून गेल्यावर आजोबा पर्वताला चिकटून एक सुळका आहे. त्याच्या खिंडीत एक पाळणा लावलेला आहे म्हणून या सुळक्याला 'सीतेचा पाळणा' सुळका म्हणतात. या ठिकाणी पाण्याच्या दोन खोदीव टाक्या देखील पहायला मिळतात.
आजोबाला जाणारे बहूतेकजण 'वाल्मिकी आश्रम आणि सीतेचा पाळणा' एवढंच पाहून येतात, जे एकूण पर्वताच्या अर्ध्यात आहे. इथे जाण्याची वाटही सोपी आहे. मागल्या खेपेला या ठिकाणी जाऊन आल्यावर राहून राहून माथ्यावर जावं असं वाटत होतं. पण जाण्यासाठी नवीन वर्ष उजाडावं लागलं. तसं या ठिकाणी घाटमाथ्यावरच्या कुमशेतहूनही जवळची वाट आहे पण घाटवाटांचं व्यसन जडल्यानं आजोबा माथ्यावर जाताना डेहण्यातून पाथरा घाटानं आणि उतरताना गुयरीदार घाटानं परत असा एकंदरीत प्लॅन केलेला होता. यामुळे आजोबासोबत आमच्या दोन घाटवाटा पण पाहून होणार होत्या. डेहण्यातल्या बाळकृष्ण पाटेकरांकडून ट्रेकबद्दलची बरीचशी माहिती घेतली होती. त्यावरून तरी पाथरा आणि आजोबा हे प्रकरण साधंसुधं वाटत नव्हतं.
--दिवस पहिला--
नेहमीप्रमाणेच नारायणगावच्या स्टँडसमोर दुध प्यायला थांबलो.
त्यावेळी माझे पुणे व्हेंचरर्ससोबत ट्रेकला निघालेले काही मित्र तिथे भेटले जे हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेचा ट्रेक करायला निघाले होते. समव्यसनी मंडळी एकत्र आल्यावर मग काय सांगता? चर्चा फक्त एकाच विषयावर. आम्हा सर्वांनाच लवकर मुक्कामी पोहोचायचं असल्यानं गप्पा आवरत्या घेतल्या. आळेफाटा-मोरोशी-तळेगाव करत डोळखांबच्या थोडं पुढं गेलो नाही तर गाडी पंचर झाली. स्टेपनी लावून निघेस्तोवर अर्धा तास गेला.
त्यामुळं पोहोचायला सकाळचे तीन वाजले. एवढी रात्र झाली तरी पाटेकर आमची वाट बघत जागे होते. एवढ्या रात्रीही त्यांनी आनंदानं हसून आमचं स्वागत केलं. दुसर्या दिवसाच्या एकूण कार्यक्रमाबद्दल त्यांच्याशी थोडक्यात बोलून गावातल्या प्रशस्थ मारूती मंदीरात पथार्या पसरल्या.
या लेखाचा पुढील भाग वाचा या धाग्यावर...
https://watvedilip.blogspot.com/2019/12/blog-post_29.html
क्रमशः
हा छंद जीवाला लावी पिसे. छान!
उत्तर द्याहटवा