-- भाग दुसरा --
"अनवट घाटवाटा, आजोबांच्या कुशीतल्या"
'पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट'
या लेखाचा आधीचा भाग वाचला नसेल तर वाचा या धाग्यावर...
डेहण्यात रात्री उशीरा पोहोचल्यानं सकाळी थोडी उशीराच जाग आली. तरीही सकाळची आन्हीकं उरकून गाडीत बॅगा टाकल्या आणि पाटेकरांकडे नाश्ता करायला बरोबर सव्वासहाला पोहोचलो. नाश्ता करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मंदीरात आरती केली.
भात तोडणी झाली होती. त्यामुळे बळीराजाची भल्या पहाटेच उठून भात झोडपणी सुरु झाली होती.
या ट्रेकमधे खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी आम्ही पाटेकरांकडे दिलेली होती. याचं पहिलं कारण म्हणजे आम्हांला शिधा, भांड्यांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नव्हता आणि स्वयंपाक करण्याच्या वेळेत आम्ही मुक्कामाचे ठिकाण फिरून पाहू शकत होतो. दुसरं असं की आम्हाला आपसुकच गाईड मिळाला होता. बाळकृष्ण पाटेकरांनी त्यांच्यासोबत 'देवराम' नावाचा माहितगार माणूस पोर्टर म्हणून घेतला होता. सह्याद्री माथ्यामागून तांबडं फुटायला लागलं होतं. देवरामदादा येईपर्यंत कुलंग, शिपनुर, खुटा, रतनगड, कात्राबाई, गुयरीदार, महाकाय आजोबा ते नाप्त्याची दुकल पर्यंतचा सह्यमाथ्याचं विहंगावलोकन केलं.
देवरामदादा आल्यावर आम्ही आमच्या गाडीतुनच पाटेकरांच्या नातेवाईकांकडे गुंडे गावापर्यंत गेलो. आमची गाडी तिथे पार्क करून पुढे त्यांच्या गाडीतून त्यांनी आम्हाला पुढच्या वाळशेत आणि भितारवाडीच्या मधेपर्यंत सोडलं. यापुढचा भितारवाडीपर्यंतचा रस्ता खुपच कच्चा असल्यानं वेळ खुप लागतो. तसं भितारवाडीतुनही पाथरा घाटात जाता येते पण त्यापेक्षा अलिकडच्या ठिकाणाहून लवकर पाथरा गाठता येतो. गाडीने या ठिकाणापर्यंत आल्यामुळे आमचा सकाळचा बराच वेळ वाचून आम्ही उन्हं चढायच्या आत पाथरा घाट बर्यापैकी चढून जाणार होतो. सर्वांसाठी आणलेल्या सामाईक वस्तुंचं जसं काकडी, पन्हे, किराणा आणि इक्विपमेंटचं सर्वात सारखं वाटप केलं.
भितारवाडीच्या पुढे नदी ओलांडली, पिट्टूचे बंद करकचकून आवळले आणि पाथर्याकडे मार्गस्थ झालो. आता आमच्यासोबत 'बाळकृष्ण' आणि 'देवराम' असल्यामुळं वाल्मिकी आजोबा आम्हा सर्वांना सांभाळून घेणार याबद्दल काही शंकाच नव्हती.
आजोबा पर्वत आमच्या डाव्या हाताला दुरवर दिसत होता. त्याला जोडून असलेला सीतेचा पाळणा सुळका पाहिल्याबरोबर त्या सुळक्यापाशी असलेल्या खाणाखुणा चटकन डोळ्यासमोर आल्या.
आता आमची वाट मस्तपैकी झाडीतुन सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी दक्षिणेकडे चालली होती. सह्यमाथ्यावरून उतरलेल्या दांडांवरून वाट चढ-उतार करत आरामात पुढे जात होती.
पाऊस उशीरापर्यंत राहिल्याने वाटेत बरेच वाहते ओहोळ ओलांडावे लागत होते.
थोडं अंतर चालून गेल्यावर मधेच एक पांढरीचं झाड दिसलं. स्थानिक लोक याला 'कांडळ' म्हणतात. शेंगदाण्यासारखी याला फळेही येतात आणि लहान मुले ती आवडीने खातात पण. हे झाड दिसायला पांढरं शुभ्र असल्यामुळं इतर झाडांपेक्षा एकदम वेगळं दिसतं. त्यामुळे या झाडाचा ट्रेकमधे रस्ता लक्षात ठेवण्यासाठी खुपच चांगला उपयोग होतो. उदाहरणच सांगायचं झालं तर तैलबैलाजवळच वाघजाईचा घाट आहे. या घाटातुनच ठाणाळे लेण्यात जाण्याची वाट आहे. पण घाटवाटेतुन नेमका लेण्यात जायचा फाटा कुठे आहे हे समजत नाही. या घाटवाटेतल्या एका पदरावर पांढरीचं झाड आहे नेमकं त्याच्या अलिकडच्या पदरात लेण्यांना जायचा फाटा आहे.
शेवटच्या ओढ्यात पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या कारण इथून पुढे आम्हाला कुमशेत पठारापर्यंत पाणी मिळण्याची शाश्वती नव्हती.
या ओढ्यानंतर पुढच्याच एका मोठ्या सोंडेवरचा चढ सुरु झाला. सोंडेवर पुर्ण चढुन गेल्यावर समोरच दिसणार्या झाडीत एक छोटासाच खाऊ ब्रेक घेतला. उजव्या बाजूला खाली 'कुंडाची वाडी' दिसत होती. वाडीतून दोन सोंडा सुरू होत होत्या. एक सध्या आम्ही होतो ती आणि दुसरी बरोबर आमच्या पुढची. वाडीतून आलेली एक वाट आम्हाला इथे येऊन मिळाली होती. खरं म्हणजे मुळ पाथरा घाट याच कुंडाच्यावाडीतुन आमच्या पुढल्या धारेवरून चढून येतो. ती वाट खरी सर्वात जवळची पण खूप घसारा असलेली, जास्त चढावाची आणि अतिशय दृष्टीभय असलेली आहे. आमचा ट्रेक डेहण्यात संपणार असल्यामुळे आम्ही आमची गाडी तिथे पार्क करून ट्रेकची सुरूवात आम्हाला सोईस्कर असलेल्या डेहण्यातुन केली होती. खरंतर ही कुंडाचीवाडी गाठण्यासाठी मोरोशी-डोळखांब दरम्यानच्या तळेगावातूनच फाटा फुटतो. या व्यतिरिक्त मोरोशी-टोकावडे-मोढळवाडीतुनही पाथरा घाट गाठता येतो.
आता पुढची वाट जवळजवळ साठ अंशात असल्याने चांगलीच दमवत होती. जसजसं वर जात होतो तसतशी झाडी विरळ होत चालली होती. ऊनही जाणवायला लागलं होतं. पुढल्या सोंडेच्या माथ्यावर पाथरा घाटाची खिंड आणि त्यातून उतरलेली नाळ झाडीमागे जाणवत होती. पुढे उजवीकडे ट्रॅव्हर्स घेत त्या नाळेत शिरलो.
आमच्या बाळकृष्ण पाटेकरांना आता घेतलेल्या शिध्याचं वजन चांगलंच जाणवू लागलं होतं. ते कमी करण्यासाठी एका सुकलेल्या ओढ्यात दुपारच्या जेवणाची शिदोरी सोडली आणि सर्वांनी जेवून घेतलं. पण समोरचा चढ बघता जेवण जातंय थोडंच? आवंढाही गिळवत नव्हता. दोन घास पोटात कसेबसे ढकलले आणि पुन्हा चढू लागलो.
नाळेतला चढ भयानकच होता. एकतर खुपच खडा आणि घसार्याचा. बरं पावसाळ्यानंतर आम्हीच पहिले जात असल्याने वाट तयार करतच जावं लागत होतं.
खिंडीच्या थोडं अलिकडं उजव्या बाजुच्या डोंगराच्या गुहेत पाथरा देवीचं मंदीर लागलं. कुंडाच्या वाडीतून दुसऱ्या धारेवरून येणारी वाट आम्हाला या मंदीरापाशी येऊन मिळाली होती. एका द्रोणात देवीला वाहिलेले सुटे पैसे दिसले. अगदी एक पैसा, दोन पैसे, पाच पैशाची केव्हाच बंद झालेली नाणीही त्यात होती. बाजूलाच पाण्याचं कोरडं टाकं होतं. एक प्रकार बाकी लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे तिथे पडलेली असंख्य छोटी मडकी. घाटाखालच्या पंचक्रोशीतली मंडळी देवपुजेत असणारे मडके जुने झाले की नवे आणतात आणि जुने पाथरा देवीला येवून वाहतात. प्रथा असते प्रत्येक ठिकाणची नाही का?
मंदीरातून समोरचा घाटातल्या सर्वात अवघड टप्प्यातला एक छोटासाच भाग दिसत होता आणि तोही मनात चांगलीच धडकी भरवत होता. ते बघताच आता समोर काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पना आली. या टप्यात अतिशय घसाऱ्याची वाट दिसत होती. आम्ही सर्वांनी लगेचच शितावरून भाताची परीक्षा केली होती.
घाटरस्ता चढाव कमी करण्यासाठी जसा वळणे घेत जातो त्याचप्रमाणे पाथर्याची जेमतेम एक पाऊल बसेल एवढीच वाट वळणे घेत जात होती पण त्यामुळे पाथऱ्याचा चढाव काही कमी झालेला होता? तर छे!! तो अगदी छातीवर होता. कधी दरी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला.
इथून पुढे सावलीसाठी तर जाऊच द्या पण आधारासाठी देखील कारवी नव्हती. सुर्यदेवही चांगलेच तापले होते. पर्यायाने ज्याला धरुन चढायचे ते दगडही. हाताला चटके बसू लागताच शाळेत शिकलेली बहिणाबाईंची कविता आठवली 'आधी हाताला चटके...' फक्त इथं भाकर नव्हती तर घाटमाथा होता. बाकी एकूण परिस्थिती तीच होती. दृष्टीभयही एवढं होतं की फोटो काढणंही कुणाला सुचत नव्हतं. फोटो काढू की जीव सांभाळू अशी गत होती सर्वांची. बरं वाट एवढी घसार्याची होती की चाळीशीला आलेला माणूसही कसा रांगतो याचं प्रात्यक्षिक पहायला मिळत होतं.
माथा समोरच दिसत होता पण वाट काही संपत नव्हती. समोरच्या टोकावर सरळ चढायला वाट नसल्याने ती आता उजवीकडून आडवी जात होती. वाट होती एवढी चिंचोळी की जेमतेम एकच पाऊल बसेल. डाव्या बाजुला कडा आणि उजव्या बाजूला डोळे फिरवणारी दरी. बरं डोळे फिरतात तर बघावं कशाला दरीकडं? असं म्हणून तरी जमतंय थोडंच. लक्ष जायचंच हळूच. डाव्या कड्याला धरत आणि मन खंबीर ठेवत एकदाचे माथ्यावर पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. वाळशेत पुढील ट्रेक चालू केलेल्या फाट्यापासून पाथर्याचा घाटमाथा गाठायला आम्हाला तब्बल सात तास लागले होते.
एकंदरीत पाथरा घाट प्रचंड घसाऱ्याचा, भयानक दृष्टीभय असलेला आणि घाटवाटेत पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेला आहे. हा घाट अत्यंत कठीण प्रकारात मोडू शकेल. निष्णात ट्रेकर्स किंवा ज्याला दृष्टीभयाचा त्रास नाही अशांनीच या वाटेने जाण्याचे धाडस करावे. ज्याला या वाटेने जायचेच आहे त्याने या वाटेने शक्यतो चढुन जावे. उतरण्याच्या तुलनेत ते काहीसं सोपं असेल. पावसाळ्यात या वाटेने जाणे अतिशय धोक्याचे आहे त्यामुळं पावसाळ्यात ही घाटवाट टाळावीच.
कुमशेत पठारावर एका झाडाच्या सावलीत थोडावेळ आराम केला. सर्वांकडील पाणी बर्यापैकी संपत आलं होतं. अर्थात माझ्याकडे दोन लिटर पाण्याचा 'रिझर्व स्टॉक' होताच. असा स्टॉक मी फक्त आणीबाणीच्या प्रसंगासाठी ट्रेकची सुरूवात केल्यापासून संपेपर्यंत नेहमीच ठेवतो. तसं आता पठारावर आम्हांला मुबलक पाणी मिळणार होतं आणि झालंही तसंच. थोडं अंतर चालून गेल्यावर एक मस्त वाहत्या पाण्याचा ओहोळ दिसला. मग काय? पोटभर पाणी पिऊन घेतलं. हातपाय धुवून ताजेतवाने होईतोपर्यंत एकाने लिंबु सरबत तयार केलं ते पिऊन लगेचच समोरच्या आजोबाकडे निघालो.
आता वाट मस्त सपाटीवरुन चालली होती. पाथरा चढून आल्यानंतर तर ते फारच सुखावह वाटत होतं. उजव्या बाजूला कात्राबाईची खिंड, वाकडीचा सुळका, मुडा लक्ष वेधून घेत होते. महिन्याभरापुर्वीच आम्ही कात्राबाईच्या खिंडीतुन उतरुन वाकडीच्या पायथ्यातून हरिश्चंद्रगडाकडे गेलो होतो. कात्राबाईची केलेली आरती, खिंडीतुन उतरणारी अफलातून वाट वगैरे डोळ्यासमोरुन तरळून गेली. कुमशेत पठारावर वेगवेगळ्या रंगाची रानफुले लक्ष वेधून घेत होती.
तर मधेच गवताचे तुरे वार्यासोबत डोलत होते.
ओहोळावर रचलेला बांध दिसला आणि त्याच्या सांडव्यात मासे पकडण्यासाठी लावलेले फासेही दिसले.
कधी तोडणी झालेल्या तर कधी तोडणीसाठी तयार असलेल्या भातशेतीतून वाट पुढे जात हळूहळू चढत झाडीत शिरली.
गेल्यावर्षीच आजोबाच्या पुर्वेकडील फार मोठी दरड कोसळून खाली आली. खाली कोणती वस्ती नाहीये म्हणून बरं नाहीतर माळीण सारखीच घटना घडली असती. या ढासळलेल्या दरडीच्या डाव्या बाजूला असलेल्या धारेवरुनच आजोबा माथ्यावर जाण्याची झाडीभरली वाट आहे. वाट थोडी निसरडी होती खरी पण धरायला कारवी असल्यामुळे काही वाटत नव्हतं. थोडं पुढं गेल्यावर मधल्या नाळेत उतरलो आणि सरळ नाळेतुनच माथ्याच्या कातळटप्प्यापर्यंत चढून गेलो.
इथून मात्र उजवीकडे वळून ट्रॅव्हर्सी मारली. ही ट्रॅव्हर्सीही खुपच चिंचोळी होती. एवढंच नाही तर समोरच्या कातळभिंतीवर भरपूर आग्या मोहोळं होती. सावधपणे गोंगाट न करता जावं लागणार होतं.
खरं म्हणजे बहूतेक ट्रेकर्स कुमशेत पठारावरच्या सिधोबाच्या ओढ्याजवळ मुक्काम करतात. खरंतर ते तसं का करतात याचं कारण वर चढता चढता कळलं. पण आम्हाला आजोबावरच मुक्काम करायचा होता. आता आम्ही जवळजवळ वर पोहोचलो होतो. एक डावे वळण घेऊन समोरच्या ओहोळात पोहोचलो. आज रात्रीचं आमचं मुक्कामाचं हेच ठिकाण होतं. सकाळी आठ वाजता चालायला सुरु करून संध्याकाळी पाच वाजता आम्ही मुक्कामी पोहोचलोही होतो.
अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर पहिली चुल लावली. तोवर सहकार्यांनी सरपण गोळा करून आणलं. मग काय तर पहिला फक्कड चहा बनवला.
आता अंधार पडण्यापुर्वी स्वयंपाक बनवायला हवा होता. मग काय सर्वांनी कामे आपसुकच वाटून घेतली. सर्वांमधला बॅचलर असतानाचा 'बल्लवाचार्य' जागा झाला होता. भाज्या चिरून होत होत्या तोपर्यंत मस्त व्हेज मंचाव सुप बनवलं. आजचा रात्रीचा मेन्यु कांदा-बटाटा रस्सा भाजी कम डाळ, सोबत डेहण्यातुन आणलेल्या चपात्या, पापड आणि लोणचं असा सुग्रास होता. सुप प्यायल्यावर भुक चाळवली गेलीच होती, त्यावर असा मेन्यु म्हटल्यावर असे काय सर्वजण जेवणावर तुटून पडले की विचारता सोय नाही. बरं जेवणही इतकं चविष्ट झालं होतं की सर्वांना घरी रोजच्या स्वयंपाकाची सवय आहे की काय? असा प्रश्न पडावा. एकंदरीत अशा आडजंगलातही आमच्या जेवणाची मात्र चंगळच झाली होती.
सुरवातीला कॅम्पफायर करायचा असं ठरलं होतं पण दिवसभराच्या चालण्याने सर्वजण एवढे थकून गेले होते की जेवल्यानंतर कॅम्पफायर वगैरेचं कुणी नावच काढलं नाही. त्यामुळं कॅम्पफायर वगैर काहीही न करता सर्वजण लगेचच स्लिपींग बॕगमधे शिरले.
यापुढचा तिसरा आणि अंतिम भाग वाचा या धाग्यावर...
https://watvedilip.blogspot.com/2019/12/blog-post_90.html
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा