बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

"मागोवा रायगडाच्या काही अपरिचित वाटांचा"

"मागोवा रायगडाच्या काही अपरिचित वाटांचा"



       पुण्यातील ट्रेकींग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या 'पुणे व्हेंचरर्स' या संस्थेचा आणि माझा घरोबा तसा जुनाच. माझा या संस्थेशी संबंध येण्यापूर्वीही मी ट्रेकींग करीत असे पण पुणे व्हेंचरर्सच्या गोतावळ्यात दाखल झालो आणि ट्रेकींग करण्याची एक नवीन दिशा मिळाली. म्हणतात ना की गुरू मिळाल्याखेरीज तुमचं जीवन समृद्धच होत नाही त्याचप्रमाणं इथं आल्यावर मला देखील अनेक गुरू मिळाले. कुणी ट्रेक प्लॅनिंग कसं करायचं हे शिकवलं तर कुणी ट्रेकींग करताना निर्णय कसे घ्यावे हे शिकवलं. कुणाचं व्यवस्थापन कौशल्य उत्तम तर कुणाचा इतिहास. कुणाचा जैवविवीधतेवर अभ्यास तर कुणी घाटवाटा तज्ञ. अशा एक ना अनेक ट्रेकगुरूंसोबत राहून माझं डोंगरात भटकणं अतिशय समृद्ध झालं आणि मला माझी एक नवी दिशा मिळाली ती म्हणजे जुन्या ऐतिहासिक वाटा धुंडाळण्याची. त्यातुनच इतिहासाचा मागोवा घेऊन नवनवीन वाटा शोधण्याचं थोडंफार कौशल्य अंगी आलं. या कौशल्याचा कस बघणाऱ्या दोन अनवट वाटा सर करणारा एक ट्रेक ५ मार्चला ठरला होता.

       पहिली वाट म्हणजे हिरकणी गवळण ज्या कड्यावरून उतरली ती हिरकणीची वाट आणि दुसरी वाट, ज्या वाटेने छत्रपती राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून सुखरूप निसटून प्रतापगडमार्गे जिंजीला जाऊ शकले ती रायगडाच्या चोर दरवाज्याची म्हणजेच वाघ दरवाज्याची वाट.

       खरं म्हणजे हिरकणी गवळणीची गोष्ट खरी की खोटी? याबद्दलचे पुरावे कोणत्या ऐतिहासिक साधनात सापडतात काय? वगैरे चर्चा थोडी बाजूला ठेवून रायगडाच्या या बाजूकडूनही किल्ल्यावर जाता येऊ शकतं का? वाटेत पाण्याच्या टाक्या, पायऱ्या किंवा या बाजूने पुर्वी असणाऱ्या किल्ल्याच्या वहिवाटेच्या काही खुणा सापडतात का? भवानी कड्यावरून रायगड चढून जाण्यास जशी वाट होती आणि त्याच्या खुणा तिथे शिल्लक आहेत तशा काही खाणाखुणा या वाटेवर सापडतात का हेच पहायला जायचं होतं, त्याचप्रमाणे उतरताना देखील नेहमीच्या पायवाटेने उतरण्याऐवजी वाघ दरवाजाच्या वाटेने उतरण्याचे ठरले होते. या वाघ दरवाजाच्या वाटेला राजाराम महाराजांचा पदस्पर्श झालाय, कदाचित संभाजी महाराज, शिवाजी राजांचादेखील पदस्पर्श झालेला असणे शक्य आहे अशा ऐतिहासिक वाटेने उतरण्याचा अनुभव आंम्ही रविवारी ‘याची देही याची डोळा’ घेणार होतो. उत्साही ट्रेकर जितेंद्र परदेशी आणि शिवमुर्ती भडांगे, निष्णात क्लाईंबर अमित प्रभू, १ मे १९८० पासून म्हणजेच स्थापनेपासून पुणे व्हेंचरर्सच्या सोबत असणारे विनायक मोडक आणि प्रभू सर सोबत येत असल्याने आमचा हुरूप वाढलेलाच होता.

       "राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा."

       असा रायगडाचा अतिशय मार्मिक उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद कृत 'सभासद बखरीत' आलेला आहे. यावरूनच रायगडाचं सामरिक महत्त्व अधोरेखित होतं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या उत्कृष्ट वास्तूविषारदाने त्यांच्या किल्ले बांधणीतल्या सर्व कल्पना रायगडात उतरवलेल्या असणं स्वाभाविकच होतं. हे सर्व त्यांच्या अंगी असलेल्या दूरदृष्टी आणि प्रगल्भता या गुणांची पुष्टीच देतं. रायगडावरच्या बऱ्याच खुबी आपल्याला आजही समजत नाहीत किंवा काळाच्या ओघात सापडत तरी नाहीत. आजही तिथं असणाऱ्या वास्तूंबद्दल लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत. जोपर्यंत आपल्याला का? कशाला? कुठं? कसं काय? असे प्रश्न पडत नाहीत तोपर्यंत आपण कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत नक्कीच पोहोचू शकत नाही.
       किल्ल्यांना असणाऱ्या चोरदरवाजांबद्दल रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या आज्ञापत्रात असं म्हटलंय की...

       "गड पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरीदडया करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व चोरीदडया चिणून टाकाव्यात. या विरहित बलकुवलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालू देऊ नयेत. समयास तेच दिडी दरवाजाचा राबता करून सांजवादा चढवीत जावे."

       किल्ला शत्रूच्या हातात पडण्याची शक्यता निर्माण झाली किंवा दीर्घकाळ चालणा-या वेढयातून राजकीयदृष्टया महत्त्वाच्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी, त्याचप्रमाणे रसद पुरवण्यासाठी चोरवाटा आणि चोरदरवाजांचा उपयोग केला जाई.
       ऐतिहासिक साधनात आलेला राजधानी असणाऱ्या रायगडाच्या दुर्गमत्वाचा, अनगडपणाचा, अवघडपणाचा उल्लेख वरील दोन उदाहरणावरून अतिशय स्पष्ट होतो. अशा रायगडाच्या चोरदरवाजामधून गडाखाली उतरणा-या वाटा किल्ले वापरात असतानाच्या काळातच इतक्या बेलाग असणार तर शेकडो वर्षे अजिबात वापरात नसल्यानं आज त्या वाटेने जाणं किती कष्टप्रद असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळं या खेपेला रायगडाचे चोरदरवाजे, चोरवाटा शोधून काढायला सर्व कसब पणाला लागणार होतं. उत्साही डोंगर-भटक्यांनी या वाटा शोधण्याचा आज प्रयत्न केल्यास तेही एक चित्तथरारक साहस ठरेल.
       महाराजांनी दुरदृष्टीने जशी जिंजीची सुरक्षित जागा अभेद्य करून ठेवली त्याचप्रमाणे राजधानी रायगडाला देखील सुरक्षितपणे निसटून जाण्यासाठी दोनचार चोरवाटा नक्कीच करून ठेवल्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

       ...आणि बघता बघता पन्नास मावळे या मोहीमेवर जाण्यास तयार झाले, त्यात तीन रणरागिणी देखील येऊन सामील झाल्या. आता या पन्नास शिलेदारांना सुखरूपपणे रायगडावर नेऊन आणण्यासाठी आंम्ही सर्वजण सज्ज झालो आणि दिवस ठरला पाच मार्च. रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाडला हल्ली पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष असतं. एप्रिल-मे मधे तर ते प्रचंड जाणवतं त्यामुळं ५ एप्रिल १६८९ म्हणजे ज्या दिवशी छ. राजाराम महाराज रायगडाहून सुखरूप निसटून जाऊ शकले, नेमका तो ५ एप्रिलचा मुहूर्त काही साधता येणार नव्हता. पाच मार्च म्हणजे थोड्या वेगळ्या दिवशी का होईना पण जायला मिळतंय याचाच आनंद अधिक होता.

       हिरकणीवाडीतल्या माझ्या स्नेह्यांना, सखाराम अवकीरकरांना फोन करून दोन्ही वाटांबद्दलची इत्यंभुत माहिती विचारून घेतली. म्हणजे चढण्या-उतरण्यासाठी किती वेळ लागेल? कांही अवघड चढण्याचे टप्पे आहेत काय? कड्यांच्या शेजारून चिंचोळ्या वाटा किती आहेत? रॅपलिंग करावं लागेल का? लागले तर किती फुट उतरावे लागेल? वगैरे. अमितशी बोलून काय काय साहित्य लागेल ते ठरवले आणि यादीनुसार साहित्य काढले.
       आमची जय्यत तयारी सुरू झाली. ट्रेकला येणारे लोक, त्यांचे शुल्क जमा करणे, प्रत्येकाचे राहण्याचे ठिकाण, त्यानुसार त्यांची यादी तयार करणे, वगैरे कामाचा एक महत्वाचा भाग पुर्ण झाला होता. ताम्हीणी घाट उतरल्यानंतर लागणाऱ्या निजामपुरातून रायगडला पोहोचण्यासाठी एक जवळचा मार्ग आहे पण त्या रस्त्याने मोठी बस घेऊन जाणं अरूंद रस्ता आणि अणकुचीदार वळणांमुळे अतिशय अवघड होतं म्हणून दोन छोट्या बस नेण्याचे ठरवले होते. असे केल्याने एकतर अंतरही बरंच वाचणार होतं आणि वेळही. त्यामुळे आंम्हाला शनिवारी रात्री आवश्यक असाणारी विश्रांती थोडी अधिक वेळ मिळणार होती.
       आता इथून पुढं कामाचा दुसरा महत्त्वाचा भाग सुरू झाला आणि तो पहिल्या भागापेक्षाही अवघड होता. संपूर्ण प्रवासाच्या आराखड्यावर काम सुरू झाले. दोन्ही बसचे मॉनिटर ठरवणे, त्यांना डिझेलसाठी लागणारे पैसे, चालकाचे नांव, मोबाईल नंबर वगैरे तपशील देणे. दोन्ही बसमध्ये असणार्‍या ट्रेकर्सची यादी, त्यांचे पुणे आणि चिंचवड असे वेगवेगळे मार्ग ठरवणे, बसचे पिकअप पॉईंट्स आणि त्या ठिकाणच्या वेळा ठरवणे वगैरे क्लिष्ट सोपस्कार एकदाचे पार पडले आणि आम्ही विनासायास शनिवारी रात्री रायगडसाठी प्रस्थान केलं.
       सर्वांना जमा करून पुण्याच्या बाहेर पडायला १०.३० वाजले. रात्रीची जेवणे झाली होतीच म्हणून कुठेही न थांबता निजामपुर मार्गे तडक पाचाड गाठले. सकाळच्या सुचना देऊन सर्वजण लवकरच झोपी गेलो.
       पाचाडलाच सकाळची आन्हीकं उरकून लगेचच हिरकणीवाडीत सखाराम अवकीरकरांच्या घरी पोहोचलो. गरमागरम पोहे चेपले, चहा घेतला आणि क्लाईंबिंग व रॅपलिंगचे साहित्य घेऊन निघालो. नाश्ता करत असताना समोरच हिरकणी बुरूज वाकुल्या दाखवत होता.


       क्षणभरातच आपल्यासोबतच्या पन्नास जणांना घेऊन हिरकणी टोक सर करायचं आहे या आव्हानाची जाणीव झाली. तडक वाळसुरे खिंड गाठली आणि रामभाऊ अवकीरकरांच्या झापात थोडी विश्रांती घेतली.


       पुढील मार्ग थोडा अवघड असल्यामुळं सोबत आणलेल्या साहित्याचं दोनचार जणांत वाटप केलं. इथून फक्त एक पाऊल ठेवता येईल एवढीच वाट होती, तीही घसार्‍याच्या मातीची. त्यातूनच मार्च महिना उजाडल्यामुळे वाटेवरचं गवत पुर्णपणे सुकलेलं होतं.


       आजूबाजूला वाढलेलं गवत धरून जाण्याची पण काही सोय नव्हती कारण धरल्याधरल्या ते हातात येत होतं. त्यात वाट तरी सरळ होती? छे!


       कधी डावीकडे वळण तर कधी उजवीकडे. मधेच सरळ वर चढून जावं लागत होतं तर कधीकधी साक्षात बसून उतरावं लागत होतं.


       आट्यापाट्या खेळत आणि ट्रेकींगच्या नियमात बसणारे आणि न बसणारे सर्व प्रकार करत एकदाचे हिरकणी बुरूजाखाली आलो. आता अवघड टप्पा संपल्यामुळं सर्वजण येईपर्यंत तिथेच थोडी विश्रांती घेतली. हिरकणी टोक चढाईची संपूर्ण वाट गडाच्या पश्चिमेस असल्याने उन्हाचा त्रास अजिबात जाणवला नाही हीच काय ती एक जमेची बाजू. शेवटी आलेल्या आणि ट्रेकींग क्षेत्रात नवीन असणाऱ्या सहकाऱ्याने या वाटेचा इतिवृत्तांत एका शब्दात सांगितला. आल्यावर तो इतकंच म्हणाला "देवा भगवंता..! कुठून बुद्धी झाली आणि या ट्रेकला आलो". पुढे श्रीगोंदे टोक आणि हिरकणी टोक यामधील घळीच्या सोप्या वाटेने हिरकणी बुरूजावर पोहोचलो.


       आजूबाजूच्या परिसरातील महाडचा सोनगड, गांधारीचं खोरं, पाचाडचा कोट, वाघबिळ, रायगडवाडी, सांदोशी, कावल्याबावल्याची खिंड, कावळ्या घाट, कोकणदिवा, छत्री निजामपुरमधल्या छत्रीची खरी आणि काल्पनिक कथा, काळ नदीचं खोरं आदी ठिकाणं अगदी स्वच्छ दिसत होती. सहभागी मित्रांना ती ठिकाणे नीट समजावून सांगितली.



       आम्ही हिरकणी टोकावर चढून आलो ती वाट एवढी अवघड होती की त्या काळी अंधाऱ्या रात्री पोटच्या पोराच्या ओढीने का होईना पण एकटी गवळण कशीकाय उतरून गेली असेल याची कल्पनाच करवत नव्हती. हिरकणीची गोष्ट खरी की खोटी या वादात न पडता, खरंच ती या वाटेने उतरून गेली असेल तर तिच्या हिंमतीला आणि कर्तुत्वाला दाद द्यावीच लागेल. एक मात्र नक्की की आजच्या काळात या वाटेनं चढून जाण्यापेक्षा इथून उतरणं अतिशय अवघड आहे.
       आता फार वेळ न दवडता पुढच्या दहा मिनीटातच मेणा दरवाज्यातून राजवाडा गाठला.


       सोबत्यांना राणीवसा ते वाडेश्वर ऊर्फ जगदीश्वरापर्यंतच्या ठिकाणांची थोडक्यात माहिती दिली.









       शिवस्मारकापासून खाली वारंगी गांवामागे बोचेघोळ नाळ, खानूचा डिगा, गायनाळ, चांदर, निसणीचा घाट, रायलिंग पठार, लिंगाणा, बोराटा नाळ, सिंगापूर नाळ, कावळ्यागड, जननीचा दुर्ग, रायरेश्वर पठार आणि त्याचा नाखिंदा, मंगळगड ऊर्फ कांगोरी, कोळेश्वर पठार, महाबळेश्वर, प्रतापगड आणि सर्वात शेवटी मकरंदगड असा चौफेर नजारा दिसत होता.



       चंद्ररावांच्या जावळीत आता सुर्यराव हळूहळू माथ्यावर आले होते. आता पश्चिमाभिमुख असलेल्या वाघ दरवाज्याच्या वाटेवरचे खडकही उन्हामुळे चांगलेच तापणार होते आणि मग तिथून उतरणं अतिशय खडतर होणार होतं. हिरोजी इंदूलकरांच्या 'सेवेचे ठाई तत्पर...' ची कथा थोडक्यात ऐकवली आणि तेथून 'बारूद' कोठाराच्या बाजूने वाघ दरवाज्यात उतरलो.





       आता फक्त उतरायचंच असल्यानं ट्रेक जवळजवळ संपला असं वाटणं साहजिकच होतं. पण जसं वाघ दरवाज्यातून बाहेर पडलो त्याचवेळी ध्यानात आलं की आपण जेवढं सोपं समजतो आहोत तसं हे प्रकरण अजिबात नाहीये.
       वाघ दरवाज्यातून बाहेर पडल्यावर खालच्या बाजूला जवळजवळ ३५०-४०० फुटांवर एक झाडीभरला ओळखीचा पदर दिसत होता. मी पूर्वी एकदा चित् दरवाज्याच्या सोप्या वाटेने वाघ दरवाजाच्या खालीपर्यंत सहजगत्या आलो पण शेवटच्या टप्प्यात एक भलामोठा कातळ वाट अडवून उभा राहीला होता. तिथं टेक्नीकल क्लाईंबिंगला पर्याय नाही आणि असं साहस करताना 'साधनसामग्री शिवाय ते कधीच करू नये' हा नियम पक्का ठाऊक असल्यानं त्या कातळापासूनच परत फिरलो होतो. या खेपेला त्या कातळावरून उतरायचं असल्यामुळं रॅपलिंग करण्याचं सर्व साहित्य जसं तात्पुरता दोर लावण्यासाठी वापरण्यात येणारे पेग व पिटॉन, अन्य सामग्री उदा. स्टॅटिक रोप, मिटॉन्स, हार्नेस, डिसेंडर वगैरे सोबत असल्यामुळं या वाटेने उतरणं सहजशक्य होणार होतं.


       या टप्प्यावर अमित प्रभूने पुढे होऊन खालील पदरापर्यंत रॅपलिंग करण्याचे नेतृत्व स्विकारलं. उजव्या बाजूला एका छोट्या झाडाला शॉर्ट रोप बांधून एक ट्रॅव्हर्स मारला आणि दहाबारा फुटांखाली असलेल्या पाचसहा जण मावतील एवढया चिंचोळ्या जागेवर उतरलो.


       वाटेत स्थानिक रहिवाश्यांनी एका झाडाला स्टील रोप लावलेला दिसला पण त्याचं दुसरं टोक खाली मोकळंच असल्यानं त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. बरं तो रोप खालच्या पदरापर्यंत तरी होता? तर तसंही नव्हतं आणि त्यात दिवसभरातील उन्हात प्रचंड तापल्यामुळं तो धरताही येणार नव्हता. खडकही तापल्यानं खाली उतरणं अतिशय जिकीरीचं होणार होतं. रोप फिक्सिंग करत करत अमित पुढे निघाला तसतसं आम्ही उर्वरित स्वयंसेवक बाकी लोकांना खाली उतरवत होतो. खाली जमीन तापलेली, वर तळपत असलेला सुर्य त्यामुळे तापलेले खडक, अशा सगळ्या गरम वातावरणात, डोकं थंड ठेवून सर्वांना झाडीभरल्या पदरात उतरवायला चांगले अडीच-तीन तास लागले. मग खालच्या झाडोऱ्यात थोडाशी विश्रांती घेतली.



       रॅपलिंगसाठी वापरलेली साधनं सॅक नावाच्या पोत्यात भरली आणि हिरकणीवाडीकडे निघालो. खरं म्हणजे हिरकणीवाडी खाली हाकेच्या अंतरावर दिसत होती पण रायगडाला सर्व बाजूनं ताशीव कडे असल्यानं परत वाळसुरे खिंडीपर्यंत जाणं भाग होतं. रायगड रोपवे खालून जात असताना, त्यात बसून आमच्याकडे पाहणाऱ्या शिवप्रेमींच्या प्रश्नार्थक मुद्रा बरंच काही सांगून जात होत्या.


       अर्थात प्रत्येकाचं 'शिवप्रेम' व्यक्त करण्याचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं. नाही का? पुढच्या दिड तासात हिरकणीवाडी गाठली. अवकीरकरांकडच्या गावरान स्नेहभोजनावर यथेच्छ ताव मारला आणि ट्रेकची सांगता केली.

       घरी परतताना गडाच्या तटबंदीबद्दल आणि नुकत्याच केलेल्या दोन्ही वाटांबद्दल कांही प्रश्न पडत होते. खरं म्हणजे कोणत्याही किल्याची तटबंदी ही अखंड असते किंवा उपतटबंदी असेल तर ती मुख्य तटबंदीला कुठे ना कुठे तरी जोडलेली असते. मग खुबलढा बुरूज, चित् दरवाजा आणि नाना दरवाजा ही तिन्ही ठिकाणं एकाच सलग उपतटबंदीत असतील, तर ही उपतटबंदी मुख्य तटबंदीला कुठे जोडलेली असेल? हिरकणीची वाट नेमक्या कोणत्या विविक्षीत ठिकाणाहून तटबंदीच्या बाहेर पडत असेल?
       हिरकणीची वाट तशी अवघड प्रकारात मोडणारी होती. पुर्वी ही गडाची वाट असल्याच्या काहीच खाणाखुणा आढळून आल्या नाहीत. एक शंका घेण्यास नक्की जागा होती, ती म्हणजे श्रीगोंदे टोक आणि हिरकणी टोक यामधील घळईतून हिरकणी बुरूजाखाली येताना तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस अडसर ठरावी अशी भिंत बांधलेली आहे. ती तिथे तशी का बांधली असावी?
       जसं हिरकणीच्या वाटेचं तसंच वाघ दरवाज्याच्या वाटेचं. ही वाटसुद्धा परत फिरून वाळसुरे खिंडीतच येते. पण नंतरच्या काळात ही वाघ दरवाजाची वाट ब्रिटिशांनी नक्कीच तोडली असावी कारण ही वाट नसतीच तर तटबंदीत एवढया मोठया दरवाज्याचं बांधकाम केलंच गेलं नसतं. दुसरं असं की छत्रपती राजाराम महाराज या वाटेने सुखरूपपणे निसटून जिंजीला पोहोचले याचा पुरावा देखील उपलब्ध आहे. आताची जी वाट परत वाळसुरे खिंडीत येते ती वाट स्थानिक लोकांनी नवी शोधून काढली असावी. मूळ वाट वाघ दरवाज्यातून सरळ खाली काळकाईच्या खिंडीत किंवा तिच्या आसपास उतरत असावी. जेणेकरून तेथून वाघोलीतून काळ नदीच्या खोऱ्यातही उतरता येईल किंवा गांधारीच्या खोऱ्यातही उतरता येईल. अर्थात राजाराम महाराज वाघोलीमार्गे काळ नदीच्या खोऱ्यातून प्रतापगडावर पोहोचले असल्याचीच दाट शक्यता आहे.
       ट्रेक तर उत्तम प्रकारे पार पडला आणि वेळेतही पुर्ण झाला होता पण वाघ दरवाज्याची वाट काळकाईच्या खिंडीत नक्की कुठे उतरते हे शोधून काढण्यासाठी पुन्हा एकदा रायगड वारी करावी लागणार एवढं मात्र नक्की. पाहूया तो योग कधी येतोय ते !! 

🚩संदर्भ ः-

१) कृष्णाजी अनंत सभासद कृत सभासद बखर.
२) रामचंद्रपंत अमात्य लिखीत आज्ञापत्र.

🚩🚩


1 टिप्पणी: