बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

"Bill Of Exchange अर्थात हुंडी"

"Bill Of Exchange अर्थात हुंडी"


'मराठ्यांच्या इतिहासात घडलेली एक अपरिचित सत्यकथा'


       १९९८ सालच्या मे महिन्यात भारताने पोखरणला अणूचाचणी घेतली त्यावेळी जगाचे पोलिस असलेल्या अमेरिकेला ते अजिबात रूचलं नाही. त्यामुळं त्यांनी आपल्यावर तातडीने आर्थिक निर्बंध घातले होते. पण भारत हा एक असा देश आहे की जो कोणत्याच गोष्टींसाठी अगदी कुणावरही अवलंबून नाही. त्यामुळे निर्बंध घाला किंवा घालू नका आपल्याला तसा फारसा काही फरक पडत नाही. पण असे निर्बंध मुद्दामहून घातले जातात. ज्या महासत्ता असतात त्या अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना आर्थिकदृष्ट्या जखडून टाकतात. त्यांना वित्त पुरवठा करायचाच नाही, एकदम बंद करुन टाकायचा. असं केल्यावर मग त्यांना हवं तसं ते अशा राष्ट्रांकडून करून घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला लढाई करुनच विजय मिळवावा लागतो अशातला काही भाग नसतो.

       दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर नुकताच भारताने इराणशी तेल विकत घेण्याचा केलेला करार संपुष्टात आला. इराणकडून आपण जे तेल विकत घेत होतो त्याचा विनियोय आपण आपल्या चलनात म्हणजेच रुपयात करत होतो. आता आपल्याला 'ओपेक' राष्ट्रांकडून त्यांनी ठरवलेल्या किंमतीला सक्तीने तेल विकत घ्यावे लागेल तेही डॉलरच्या विनियोगात, जे आपल्याला खुपच महाग पडणार आहे. परंतू आपल्याकडे त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाही. यालाच आर्थिकदृष्ट्या जखडून टाकणं म्हणतात. वर्तमानपत्रात याबद्दल वाचल्यावर डोंबिवलीत झालेल्या निनादकाकांच्या व्याख्यानातल्या गोष्टीची आठवण झाली.

       सतराव्या शतकाच्या सुरवातीला इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवलं. हे इंग्रज म्हणजे पक्के व्यापारी. फक्त आपलाच फायदा कसा होईल हे ओळखण्यात तर चांगलेच तरबेज. अशा या 'व्यापारी' म्हणून आलेल्या इंग्रजांना शिवाजीराजांनी एका व्यवहारात असंच काहीसं आर्थिकदृष्ट्या जखडून टाकलेलं होतं. महाराजांनी इंग्रजांचा अंतस्थ हेतू पुरता ओळखलेला होता हेच यावरुन अधोरेखित होतं. या व्यवहाराबद्दल ब्रिटीशांनी लिहिलेली 'English Records on Shivaji' मधली पत्र जर का तुम्ही काढून पाहिली आणि तारखेनुसार ओळीनी लावली तर त्याचा थोडासा उलगडा होतो. त्यात Bill of Exchange - Bill of Exchange अशी संज्ञा सारखी वाचायला मिळते. आता हे Bill of Exchange म्हणजे खरा काय प्रकार आहे? ती सगळी पत्र एकत्र करून वाचली की अक्षरशः एक गोष्ट डोळ्यासमोर उभी राहते.

       शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मुंबईच्या इंग्रजांकडून तांब विकत घेतलं होतं, त्यांना ते काय नाणी पाडायला किंवा भांडी करायला वगैरे कशासाठी तरी लागत असावं. त्यावेळी या व्यवहाराचा हिशोब चुकता करण्यासाठी रायगडावर पुरेसे रोख पैसे नव्हते म्हणून त्या बदल्यात महाराजांनी ब्रिटीशांना एक Bill of Exchange देतो म्हणजे promissory note किंवा हुंडी देतो असं सांगितलं. आता ती हुंडी कुठली होती तर दुरवरच्या गोवळकोंड्याची. त्यावेळी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहकडून मराठ्यांना खंडणी मिळत असे. महाराज म्हणाले 'तुम्ही हा कागद घ्या आणि गोवळकोंड्याला जा तिथे आमची एक कचेरी आहे. तिथं हा कागद दाखवला की तुम्हाला आमचा तिथला माणूस लगेचच पैसे देऊन टाकेल'. खरंतर हा अगदी स्वच्छ आणि सोपा असा व्यवहार होता पण खरी गोची तर पुढेच होती.

       आता मुंबईच्या इंग्रजांकडे त्यांचा जो कुरीयर होता तो गोवळकोंड्याला जात नसे म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी ते सगळे कागद सुरतेच्या इंग्रजांकडे पाठवले. त्यामुळं सुरतेच्या इंग्रजांचा कुरीयर ते कागद घेऊन गोवळकोंड्याला गेला. आश्चर्य म्हणजे खरंच तिथं महाराजांची एक कचेरी होती, एक माणूस बसला सुद्धा होता तिथं. या कुरीयरनं ते सगळे कागद दाखवले आणि म्हणाला द्या पैसे आता आम्हाला. महाराजांच्या माणसाने ते कागद पाहिले आणि तो म्हणाला की ह्या हुंडीसाठी पैसे द्यायचे अधिकार मला नाहियेत. हे अधिकार ज्यांच्याकडे आहेत ते प्रल्हाद निराजी आत्ता रायगडावर गेलेले आहेत. तर थोडक्यात काय तुम्ही एकतर रायगडावर तरी जा किंवा प्रल्हाद निराजी येईपर्यंत थांबा तरी. काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आता काय हा कुरीयर आहे शेवटी. तो काय करणार? त्याने कागदबिगद सगळे धोपटीत घातले आणि परत सुरतेला आला. आल्याआल्या त्यानी सुरतेच्या इंग्रजांना रिपोर्ट केला. सुरतेच्या इंग्रजांनी त्यावर शेरेबाजी केली आणि ते कागद मुंबईला पाठवून दिले.

       आता वाचायला हे सगळं सोपं वाटतंय पण त्या वेळेला घोड्यावरनं जायचं, पालखीतनं जायचं, गाडीतनं जायचं, उंटावरून प्रवास करायचा. हे असले सगळे द्रविडी प्राणायाम करत मुंबईहून सुरत, सुरतेहून गोवळकोंडा, गोवळकोंड्याहून परत सुरत, सुरतहून परत मुंबई आणि मुंबईहून रायगड. या सगळ्याला किती वेळ जात असेल याची कल्पना करा. पण ते कागद आल्यावर मुंबईच्या इंग्रजांना कळून चुकलं की शिवाजी महाराज आपल्याला नक्कीच भारतभ्रमण करायला लावणार.

       झाल्या प्रकारावर चर्चा झाल्यावर कुणीतरी म्हणालं की रायगडावरच जा रे. रायगडावर प्रत्यक्ष महाराजांनाच भेटा आणि त्यांच्याकडून पैसे वगैरे काय असतील ते घेऊन विषय संपवून टाका. म्हणून त्यांनी त्यांच्या एका दुभाष्याला म्हणजे नारायण शेणवी याला रायगडावर पाठवायचं ठरवलं. हा नारायण शेणवी या अगोदर बर्‍याच वेळेला रायगडावर येऊन गेलेला होता. आता त्या काळात मुंबईहून रायगडावर यायचं म्हणजे पहिल्यांदा जहाजातून पेण जवळच्या अष्टमीपर्यंत यायचं, तिथून चालत किंवा घोड्यावरून इंदापुर-माणगाव करत निजामपुर-गांगोळीवरनं पाचाडला यावं लागायचं. असा तो सगळा अवघड प्रवास करत तो नारायण शेणवी एकदाचा पाचाडला आला आणि पुढे रायगडवाडीला आला. आल्यावर त्याला कळलं शिवाजी महाराज गडावर नाहीयेत. म्हणून मग त्याने चौकशी केली की शिवाजी महाराज कुठं गेलेत? गडावर आत्ता कोण आहे? आता इकडे महाराजांचे लोकही चांगलेच वस्ताद. ते म्हणाले महाराज काय आम्हाला सांगून जातात काय? कुठं जातोय ते आणि कधी येणार आहेत ते? आम्हाला महाराज काही सांगून जात नाहीत कधी येणारेत ते. कधी येतील त्यावेळी येतील. हां गडावर कोण आहेत म्हणून विचाताय तर आमचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे आहेत तिथं. मग नारायण शेणवी म्हणाला की मला मोरोपंतांना भेटायचंय. म्हणून मग मोरोपंतांना निरोप गेला, तर मोरोपंत भरपूर कामात होते. त्यामुळे नारायण शेणव्याला खालीच थांबवून ठेवलं. जवळजवळ एक महिन्यानंतर मोरोपंतांनी त्याला गडावर बोलावलं आणि विचारलं काय झालं? मग याने झालेला सगळा प्रकार सांगितला. तुम्ही आमच्याकडून जे तांब घेतलं होतं त्या बदल्यात आम्हाला ही हुंडी दिली होती. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा माणूस गोवळकोंड्याला गेला तर तिथं त्याला सांगितलं की प्रल्हाद निराजी इकडं रायगडला आलेत म्हणून. यावर पंत म्हणाले की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. खरंच प्रल्हाद निराजी इकडं रायगडावर एका बैठकीला आले होते पण आता ते परत गेलेत.

       नारायण शेणवी शेवटी वैतागून म्हणाला की आम्ही सारखं जाणार नाही तिकडं, सारखंसारखं एवढ्या लांब कोण जाईल? आम्हाला काय असतील ते पैसे इथंच द्या आणि मोकळं करा एकदाचं. मोरोपंत म्हणाले, इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर हुंडी दिली तुम्हाला. नाहीतर पैसेच दिले असते. आमच्याकडं खरंच पैसे नाहियेत. शेवटी शेणवी पैसे द्या म्हणत होता, पंत नाही म्हणत होते. तरीपण शेवटी मोरोपंत म्हणाले ठिक आहे बाबा. आता मी या राज्याचा पंतप्रधान आहे आणि आम्हाला इंग्रजांशी व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत म्हणून मी एक उपाय सुचवतो. तर शेणवी म्हणाला काय उपाय? पंत म्हणाले आमची अष्टागारात गोदामं आहेत आणि तिथली प्रजा सरकारला नारळ, सुपारी, भात वगैरेच्या स्वरूपात जो कर देते तो तिथे आणून टाकते. जर तुम्ही म्हणत असाल तर हुंडी एवढ्या किमतीचं नारळ, सुपारी, भात वगैरे तुम्हाला द्यायच्या वराता आम्ही आमच्या अधिकार्‍यांवर काढतो. बरं आता आली का पंचाईत? मिळणार्‍या पैश्याच्या बदल्यात नारळ, सुपारी, भात वगैरे स्विकारायचे अधिकार नारायण शेणव्याकडं नव्हते. त्यामुळं नारायण शेणवी म्हणाला की आता पुढं काय करायचं ते मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारावं लागेल. यावर पंत हसून म्हणाले की अगदी सावकाश जा, काही घाई करू नका. नारायण शेणवी आता परत मुंबईला यायला निघाला. जाताना जसा गेला होता तसाच परत तो पाचाडला आला. गांगोळीला आला, निजामपुराला आला, माणगावला आला, इंदापुरला आला अष्टमीला आला जहाजात बसला मुंबईला आला. त्याला येताना पाहिल्यावरच मुंबई प्रांताच्या गव्हर्नरला म्हणजे जेरॉल्ड ऑन्जिअरला कळलं याच्या हाताला काहीही लागलेलं नाहीये.

       जेरॉल्ड ऑन्जिअरनी विचारलं की नेमकं तिथं झालं काय? शेणवी म्हणाला शिवाजी महाराज रायगडावरच नाहियेत. बरं कुठे गेलेत तेही कुणी सांगायलाही तयार नाही. कधी येतील तेही काही माहित नाही. मोरोपंत पिंगळे बसलेत तिथं आणि ते म्हणाले की अष्टागाराच्या गोदामामधून नारळ, सुपारी, भात वगैरे काय पाहिजे ते घ्या, हवं तर त्याच्या वराता काढतो आम्ही. ऑन्जिअर म्हणाला अरे सगळे बनेल लोक आहेत हे सगळे. ते आपल्या लोकांवर वराता काढतील आणि सांगतील हवा तो माल इंग्रजांना द्या म्हणून. पण आतून प्रजेला निरोप देतील की पुढची सुचना येईस्तोवर अष्टागाराच्या गोदामामधे माल टाकायचा नाही. अष्टागार सोडून कुठेही टाका तुम्ही आणि मग त्या गोदामामधे माल नाही या सबबीखातर आपल्याला ते काहीच देणार नाहीत. आणि तु आता परत रायगडाला जा कारण शिवाजी महाराज रायगडावर आलेले आहेत अशी आपल्या हेरखात्याने खबर दिलेली आहे. आता यावेळी तु बाकी कुणालाही भेटू नको. फक्त  शिवाजी महाराजांना भेट. तुझ्याबरोबर पाहिजे तर एक इंग्रज माणूस देतो. म्हणून जेरॉल्ड ऑन्जिअरनी फ्रांसिस मॉलीव्हेरेर नावाच्या एका माणसाला नारायण शेणव्यासोबत पाठवलं. आता हा फ्रांसिस मॉलीव्हेरेर आणि नारायण शेणवी तो सगळा प्रवास करत रायगडाच्या पायथ्याला आले.

       गडावर महाराजांना निरोप गेला. महाराज नुकतेच मोहिमेवरून आले होते त्यामुळं कामात होते. महिना-दिडमहिना या दोघांना त्यांनी खालीच थांबवून ठेवलं. नंतर वर बोलावून महाराजांनी विचारलं म्हणाले काय ठरलं तुमचं? आता बोला पटापट. हे दोघे म्हणाले महाराज, एकदाचे पैसे देऊन टाका आणि मोकळं करुन टाका आम्हाला. महाराज म्हणाले इथं रायगडावर पैसे नाहीत म्हणून तर हुंडी दिली तुम्हाला. आमच्याकडे आत्ता रोख पैसे नाहीयेत. हे दोघे रोख पैसे द्या म्हणतायेत, महाराज नाही म्हणतायेत. शेवटी महाराज म्हणाले की मी या राज्याचा राजा आहे आणि आम्हाला तुमच्याशी व्यापारी संबंध कायमच टिकवायचेत. आता यावर मी एक उपाय सुचवतो. आता उपाय म्हटल्यावर नारायण शेणव्याच्या पोटात गोळा आला. आता आणखी काय बाबा नवीन उपाय? शेणव्याने विचारलं काय महाराज? तर महाराज म्हणाले ही एवढी किंमत आहे ना त्या किंमतीएवढी चांदी किंवा सोनं देतो तुम्हाला. मग मागच्यावेळी नारळ, सुपारी, भात म्हणाले हे, आता चांदी आणि सोनं म्हणातायत, त्याचे भाव रोज बदलत असतात इथं. बरं चांदी किंवा सोनं घ्यायची याचे अधिकार या दोघांनाही नव्हतेच मुळी. म्हणून नारायण शेणवी म्हणाला की मला मुंबईला जाऊन याबाबत साहेबाला विचारावं लागेल. महाराज म्हणाले सावकाश जा, काही घाई करु नका. मग तो फ्रांसिस मॉलीव्हेरेर नारायण शेणव्याला म्हणाला की मी रायगडावरच थांबतो आणि बघतो काही जमतंय का ते. म्हणून तो रायगडावरच थांबला आणि नारायण शेणवी मुंबईला परत आला. तो सगळा प्रवास करुन मुंबईला आल्यावर लांबून येताना जेरॉल्ड ऑन्जिअरने त्याला पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं याही वेळेला याच्या हाताला काहीही लागलेलं नाहीये. तो म्हणाला अरे काय झालं? शेणवी म्हणाला शिवाजी महाराज आलेत पण ते म्हणतायत  की एवढ्या किमतीचं चांदी किंवा सोनं घ्या हवं तर. जेरॉल्ड ऑन्जिअर म्हणाला अरे तु काही काम करत नाहीस आमचं, नुसते रायगडाला जाऊन प्रवास भत्ते खातोस लेका. तु आता इथंच बस आमचा तो फ्रांसिस मॉलीव्हेरेर काय करतोय ते बघूया. पंधरा दिवस गेले, सोळाव्या दिवशी तो फ्रांसिस मॉलीव्हेरेर येताना दिसला. त्या फ्रांसिस मॉलीव्हेरेरला पाहिल्यावर जेरॉल्ड ऑन्जिअरच्या लक्षात आलं याही माणसाच्या हातात काही लागलेलं नाहिये. मॉलीव्हेरेर म्हणाला काहीही जमत नाहिये तिथे. ते रोज सांगतायत देतो, बघतो, करतो आणि देत बाकी काहीच नाहीत.

       फ्रांसिस मॉलीव्हेरेरच्या टुर रिपोर्टमधे एक वाक्य आहे. पत्रात त्याचा टुर रिपोर्ट छापलाय बरंका. त्यातलं एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे. तो असं म्हणतो 'I got nothing except hollow promises'. पोकळ आश्वासनाखेरीज मला तिथे काहीच मिळालं नाही. शेवटी जेरॉल्ड ऑन्जिअर म्हणाला इतके दिवस वाया चाललेत. व्याजात मरतोय आपण. आता तो देतो म्हणतोय ना सोनं किंवा चांदी. मग काय देतोय ते घेऊन या. ताब्यात घ्या पहिलं. नाहीतर नंतर तो काहीच देणार नाही.

       नारायण शेणवी परत रायगडाला जायला निघाला. परत तो सगळा प्रवास करत रायगडाच्या पायथ्याशी आला. महाराजांनी परत त्याला महिना-दिडमहिना खाली थांबवून ठेवलं आणि मग वर बोलावलं. महाराज म्हणाले मग काय काय ठरलं सांगा बरं तुमचं. नारायण शेणवी शेवटी काकुळतीला येऊन हात जोडून म्हणाला सोनं द्या नाहीतर चांदी द्या, पण द्या काहीतरी. एकदाचं मोकळं करा आम्हाला. महाराज म्हणाले तसं नाही. मला नीट कळलं पाहिजे, तुम्हाला सोनं पाहिजे की चांदी पाहिजे ते? मग शेणवी म्हणाला चांदी द्या पण द्या एकदा काहीतरी लवकर.

       मग महाराज मोरोपंतांना म्हणाले ह्याला जामदारखान्यात घेऊन जा आणि चांदी देऊन टाका तेवढ्या किमतीची आणि हे सगळं हुंडी वगैरे प्रकरण सगळं मिटलंय असं लिहून घ्या त्याच्याकडून. आता हे जामदारखान्यात आले चांदीच्या प्लेट्स निघायला लागल्या. तराजूत मोजल्या जाऊ लागल्या. बरं आता एक छोटंसंच काम मोरोपंतांचं करायचं राहिलं होतं, की रायगडावरची चांदीची किंमत वाढवायची. पंत म्हणाले 'इथे रायगडावर चांदी अठ्ठावीस रुपये प्रति शेर आहे बरं का!' शेणवी म्हणाला अठ्ठावीस कसं काय? सगळीकडं तर तेवीस रुपये शेर आहे ना? पंत म्हणाले इथे अठ्ठाविस रुपये आहे. इथं कुणालाही विचारा हवं तर. बरं तेवीस की अठ्ठावीस याच्यावरनं परत मुंबईला जायचं आणि शिव्या खायच्या. त्यापेक्षा शेणवी म्हणाला देऊन टाका काय असेल ते. शेवटी अठ्ठावीस रूपये अशा चढ्या भावानी चांदी तोलली त्यांनी आणि त्याच्याकडून लिहून घेतलं की हे सगळं प्रकरण मिटलं म्हणून. ती चांदी आणि कागद घेऊन शेणवी मुंबईला आला आणि जेरॉल्ड ऑन्जिअरच्या समोर ते सगळं त्याने ठेवलं.

       या सर्व व्यवहाराबद्दल जेरॉल्ड ऑन्जिअरनी ईस्ट इंडीया कंपनीला जो रिपोर्ट लिहिलाय, त्याच्यात शेवटी एक परिच्छेद घातला आहे. 'नारायण शेणवी आज रायगडाहून परत आला. आम्ही शिवाजीला जे तांबे विकले होते आणि त्या बदल्यात त्यांनी जी हुंडी आपल्याला दिलेली होती, त्याचा निकाल आज शेवटी लागला. जी चांदी सध्या सगळीकडे तेवीस रुपये शेरानी विकली जात आहे तीच चांदी शिवाजीने आम्हाला अठ्ठाविस रुपये शेरानी विकली. पण सरतेशेवटी दिड वर्ष चाललेलं हे सर्व प्रकरण एकदाचं निकालात निघालं आणि ह्या सगळ्या व्यवहारात आपल्याला पंचवीस टक्के तोटा झालेला आहे'.

       इंग्रज लोक 'पक्के व्यापारी' असून सुद्धा महाराजांनी त्यांना मराठी पाण्याची चव चाखायला लावलीच. समुद्रावर गलबतांनी जर तुमचा पराभव आम्हांला करता येत नसेल तर आम्ही तो जमिनीवर पैशांनी करतो तुमचा. सतराव्या शतकात मराठ्यांच्या इतिहासात घडलेली ही गोष्ट आजच्या युगात सुध्दा अभ्यासावी अशीच आहे नाही का?

शब्दांकन - दिलीप वाटवे...

🚩 खाली दिलेल्या इंग्रजांच्या आपापसात झालेल्या पत्रव्यवहारातून संपूर्ण व्यवहार व्यवस्थितपणे स्पष्ट होतो.











संदर्भ ः-

१) शिवभुषण श्री. निनादराव बेडेकर व्याख्यानमाला
     डोंबिवली, विषय - शिवराय आणि समुद्र.
२) English Factory Records on Shivaji (1659
     to 1682) - शिवचरित्र कार्यालय, पुणे.
३) शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड २ - शंकर नारायण जोशी

फोटो स्त्रोत -
१) गुगल



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा